सुरूवातीलाच अटलांटामधे रस्त्याच्या डावीकडून गाड्या जाताना दाखवल्याने हा चित्रपट वास्तववादी नाही याची आपल्याला खात्री होते. वास्तववादी, आर्ट फिल्म वगैरे समजून लोक लगेच पळून जाउ नयेत म्हणून अनुपम खेर ने (दिग्द.) हे प्रीएम्प्टिव्ह टेक्निक वापरले असावे. पण तरीही मी खात्री केली की मी मैदानात उलट्या बाजूला बसून हे पाहात नाहीये. पूर्वी मैदानात पिक्चर्स दाखवत तेव्हा गर्दी असेल तर आम्ही उलटीकडून पाहायचो तसे.
तर ही तीन भावांची कथा. थोरला अनिल कपूर म्यूजिक संबंधी एका कंपनीत कामाला असतो. मधला फ़रदीन हा तो अमेरिकेत शिकायला असतो, तर धाकटा अभिषेक जबरी हुषार असतो व कॉम्प्युटर मधे काहीतरी करत असतो. नक्कीच दोघांतील चुकीचा मुलगा अमेरिकेत गेला असावा. कारण हा धाकटा भारतात जगदीश चे 'जॅग' वगैरे नाव करून पब्स मधे नाचतो तर अस्सल देशी फ़रदीन अमेरिकेत ही प्रचंड धार्मिक, तेथील मोठ्यांच्या पाया पडणारा व तुला कोणते कुझिन आवडते म्हंटल्यावर "हिदुस्थानी" म्हणणारा (लेका निदान अस्सल मराठी, गुजराथी, पंजाबी असे काहीतरी सांग. म्हणे हिन्दुस्थानी. ते काय शास्त्रीय संगीत आहे?). थोडक्यात म्हणजे भारत नाव असते तर पूरब और पश्चिम मधला मनोज कुमार व याच्यात फरक कळाला नसता. त्याला थोडे चेहर्यावरचे नसलेले भाव ही कारणीभूत असतील.
मग एक सकाळी "कॅरेक्टर एस्टॅब्लिश" करणारा शॉट म्हणून अनिल कपूर चा ब्रेकफास्ट, एकदम सद्ध्याच्या रीतीप्रमाणे सॅंडविच व काचेच्या जार मधला तो ऑरेंज ज्यूस. तो बाहेर ठेवल्याने ब्रेकफास्ट झाला की उरलेल्या ज्यूस चे हे सर्व लोक काय करतात मला नेहमी प्रश्न पडतो. एकतर सकाळी सकाळी तो आंबट ढाण ज्यूस पिववतोच कसा? तसेच ती २-३ सफरचंदे जी फक्त एका बाजूने शर्टाला पुसून ते खातात. आणि सॅंडविच हातात घेऊन जर इतर कामे करत असतील तर त्यात दोन पावात फक्त एक काकडी ची चकती घातली असावी. कारण आम्ही त्याहून काही मऊ घातले की एका बाजूने खाताना पुळकन दुसरीकडून बाहेर पडते. पण या चित्रपट वाल्यांचे कोणतेही खाणे एकदम सुबक असते. तरी हा ब्रेकफास्ट जरा बदलला. पूर्वी दौलतवाले लोक सकाळी सकाळी पावाला सुरीने लोणी लावत बसत. येथे या शॉट वरून एवढेच कळते की अनिल कपूर चे लग्न व्हायचे आहे.
या अनिल कपूर ने त्याच्या बॉस कडून कर्ज घेतलेले असते. सव्वा कोटी (ती काय दक्षिणा आहे?). एवढा सव्वा कोटी इंजिनियरिंग ला लागणारा कोणता कोर्स फ़रदीन करत असतो तर काहीतरी ऑटोमोबिल इंजि. कारण त्याला जगातील सर्वात फास्ट गाडी बनवायची असते. एकूणच अमेरिकेत लागणार्या खर्चाबद्दल दिग्दर्शकांना अचूक माहिती दिसते. मागे नाही का त्या अजनबी मधे मॉरिशस ला जायला दोघांसाठी ५०,००० डॉ. लागणार होते?
पण फ़रदीन पास होतो व टोयोटा त्याला ऑफर देते. या कंपनीची जगात इतर कोठेही शाखा नसल्याने अमेरिकेतच काम करावे लागणार असते.
तेथे त्याला उर्मिला भेटते. ती तर 'अमेरिकेतील मुलगी' म्हणजे जे सर्व stereotype लोक गृहीत धरतात त्या सर्व गुणांनी युक्त असते ('यादे' मधल्या मोनिश्काच्या वरताण). त्यांचे भारतात लग्न होते व तेथून गडबड व्हायला सुरूवात होते. एकतर 'अमेरिका व दिल्लीतून' आलेल्या पाहुण्यांना कुटुंबातील जुन्या गाडीतून नवरीला नेण्याची प्रथा रानटी वाटेल म्हणून उर्मिलाच्या आईने 'बडी गाडी' मागवलेली असते. ते अनिल कपूर मान्य करत नाही. तेथूनच उर्मिलाचे सर्वांना बोलणे सुरू होते. मग पहिल्या जेवणात तर प्रचंड मतभेद होतात. कारण उर्मिला पदार्थ नुसते बघून ते किती तिखट आहेत, किती ऑइली हे ओळखू शकते. त्यात अमेरिकेत एखादी गोष्ट मान्य नसेल तर त्याबद्दल मोठा भाऊ व इतर वडीलधारी माणसे यांचा डायरेक्ट अपमान करण्याची पद्धत असल्याने ती तसेच करते.
हे मतभेद विकोपाला जातात तेव्हा त्यात ब्रेक म्हणून सगळेजण पिकनिक ला जातात व गाणे म्हणतात आणि त्यातील 'प्यार का मतलब रब होता है' या वाक्यावर मतैक्य झाल्यावर परत घरी येऊन मतभेदाचा उर्वरित भाग चालू करतात.
तेवढ्यात निष्पन्न होते की अनिल कपूर कडून कर्जासाठी सही घेताना त्यात त्याच्या बॉस ने घर गहाण ठेवण्याच्या पेपरवर ही सही घेतलेली असते. जो गहाणखत करतोय तो त्या घरचा मालक नाही वगैरे क्षुल्लक बाबी कोणी बघत नाही. मग भांडणे झाल्यावर तो बॉस म्हणतो की एवढे असेल तर माझे पैसे परत कर. त्यासाठी फ़रदीन ने भारतात नोकरी करावी असे अनिल कपूर सांगतो (कोणीतरी कंपनी आठ वर्षाच्या बॉन्ड वर त्याला बहुधा पावणे दोन कोटी द्यायला तयार असते). पण फ़रदीन व उर्मिला परत अमेरिकेत जायचे ठरवतात. त्याच वेळी अभिषेक गोत्यात येतो. कारण तो विद्यापीठाची साईट हॅक करून पेपर फोडतो. तो इतका जबरदस्त हॅकर असतो की त्या साईट वर त्याचे जाणे हे तो व त्याच्या मित्रांनी त्या साईटचा पासवर्ड तीन चान्स मधे अचूक ओळखण्यावर अवलंबून असते.
मग अनिल कपूर एका पडीक गायकाला घेऊन यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची गाणी कोणी विकत घेउ नयेत म्हणून तो व्हिलन स्वत:ची सीडी फुकट वाटायची तयारी दाखवतो (त्याच्या थियरीनुसार लोकांची गाणी व साबण घेण्याची पद्धत सारखीच असावी). परत हा सगळा वाद भलताच तात्त्विक पातळीवर असतो, "म्हणजे प्यार की ताकद पैसे की ताकद से बडी होती है क्या". यांच्या सीडीज कोणी विकायला तयार होत नाहीत, पण तेवढ्यात पूर्वी नाकारलेला एक बनावट सीडी विकणारा भेटतो. अनिल कपूर त्याला एका मिनीटात पुन्हा बनावट सीडी विकणार नाही हे मान्य करायला लावून आपल्या पडीक गायकाच्या सीडी विकायची "परवानगी" देतो. एकूणच या चित्रपटात बरेच वाईट लोक आपल्या आयुष्यभराच्या सवयी एका डॉयलॉग मधेच बदलतात. हा बनावट सीडी विक्रेता, तसेच उर्मिला - तिचे वडील एक दोन वाक्ये टाकतात की ही एकदम सरळ!! सर्व गैरधंदे करणार्यांकडे यांना पाठवायला पाहिजे.
पण शेवटी गहाण असलेल्या घराचा लिलाव त्याचा बॉस ठरवतो. कर्ज बहुधा व्याजासकट पावणे दोन कोटीचे झालेले असते व अनिल कपूर कडे त्यापेक्षा बरेच जास्त पैसे असतात. सामान्य माणसे पावणेदोन कोटी देउन घर परत घेतील. पण मग चित्रपत दीड तासात संपेल. म्हणून मग तसे करत नाहीत. तेवढ्यात एका जंकयार्ड किंवा रिपेअर शॉप मधे फ़रदीन खटपटी करत असताना त्याला फास्ट इन्जिनाचा शोध लागतो आणि मग एक कंपनी त्याची टेस्ट घ्यायचे ठरवते. पण ते ठरणार कसे? हाय स्पीड टेस्ट ट्रॅक वगैरे वापरायला हा काही वास्तववादी चित्रपट नाही. त्यामुळे शहरातील ४०-५० मैलांचे लिमीट असलेल्या रस्त्यांवर त्या कंपनीतील एका माणसाच्या गाडीपेक्षा थोडी पुढे गेल्यावर ही कार जगातील सर्वात वेगवान आहे हे सिद्ध होते व ती कंपनी एकदम २ मिलीयन द्यायला तयार होते.
मध्यंतरी अभिषेक बंगलोर ला जाऊन पिझ्झा हट मधे काम करत असतो. एकदा ऑर्डर घेऊन तो कोणत्यातरी इन्फोसिस सारख्या कंपनीत जातो व मधे काय होते ते लक्षात नाही पण एकदम काहीतरी हॅकिंग विरोधी कॉम्पिटिशन असते त्यात एकदम सर्वात पुढे बसून तो तो प्रॉब्लेम सोडवून दाखवतो.
तोपर्यंत इकडे लिलाव चालू झालेला असतो. मुंबईत होणारा हा लिलाव बंगलोर व इतर कोठे कोठे असलेल्या फ़रदीन व अभिषेक ला बरोबर कळतो. पेपर मधे चित्रपट, पेज थ्री, क्रिकेट वगैरे बघण्याचे सोडून तारूण्यसुलभ उत्सुकतेने सगळी तरूण मंडळी 'आजचे लिलाव' हे सदर पहिल्यांदा वाचत असल्याने त्यांना वेळेवर कळते आणि मग लिलावाच्या जागेवर क्लायमॅक्स सुरू होतो.
लिलावास अनिल कपूर आलेला दाखवला असला तरी पुढच्या शॉट्स वरून कळते की सर्व संबंधित मंडळी ब्याकग्राउंड ला दबा धरून बसलेली असतात अचूक वेळी एकदम सीन मधे येण्यासाठी. अनिल कपूर कडे साडे सहा कोटी असतात त्यामुळे तोपर्यंत तो बिन्धास्त किंमत वाढवतो. पण 'सात करोड' बोली लागल्यावर त्याचा चेहरा पडायच्या आत तो बॉस ओरडतो 'प्यार की ताकद' चे काय झाले वगैरे. कथालेखकाला अनिल कपूर कडे तेव्हा साडेसहा कोटी आहेत हे माहीत असते त्यामुळे तोपर्यंत संबंध दुरावलेल्या त्या व्हिलनला ही अचूक माहीत असते किती आहेत अनिल कपूर कडे.
मग 'अमुक करोड एक, अमुक करोड दोन' वगैरे सोपस्कार झाल्यावर साहजिकच 'अमुक करोड तीन' म्हणून हातोडा आपटायच्या आत फ़रदीन तेथे येतो व बोली पुढे वाढवतो. आता एकच दुसरा माणूस शिल्लक राहिलेला असतो पण तोही बोली वाढवत नेतो. शेवटी फ़रदीन ही निराश होतो. मग पुन्हा एकदा '...एक', '...दोन' वगैरे झाल्यावर अभिषेक येतो व पुढची बोली लावतो. इतके दिवस काही एकमेकांचा पत्ता नसूनही प्रत्येक भावाला आधीच्या चे लिमीट बरोबर माहीत असते, तेथून पुढे बोली लावायला. तो दुसरा माणूसही बोली लावत जातो शेवटी वीसेक कोटी झाल्यावर (बहुधा पुढे मोजता न आल्याने) सगळे थकतात व २१ कोटी का अशाच किमतीला लिलाव ठरतो.
आता तो व्हिलन खुनशी हसत जाहीर करतो की हा लिलाव वहिदा (या भावांची आई) च्या हस्ते होईल आणि मग एकदम वहिदा दिसते. पण प्रचंड धक्कातंत्राने "तो बोली वाढवणारा माणूस" सांगतो की मी अभिषेक च्या वतीने बोली लावत होतो. मग बाकीचे बोली लावणारे थांबल्यावर थांबला का नाही? म्हणजे स्वत:चेच घर विकत घेण्याची किंमत अभिषेक स्वत:च स्वत:विरुद्ध वाढवत होता. अभिषेक कितीही किंमत लावू शकतो कारण त्याने ते हॅकिंग विरोधी सॉफ्टवेअर तयार केल्यावर लिलावाची किंमत तीच विकण्याची किंमत ही असे त्या कंपनीच्या माणसाला सांगितलेले असते (तो ही असतोच ना तेथे!)
अशा तर्हेने फसवून गहाण ठेवून घेतलेले घर व्याजासकट मूळ कर्ज परत करून मग घराच्या फसवणूकी साठी न्यायालय वगैरे ची वाट न धरता हे पावणे दोन कोटी च्या कर्जासाठी एकवीस कोटी मधे स्वत:चेच घर परत घेतात.
शेवटी सव्वा कोटी कर्जाच्या बदल्यात एकवीस कोटी परत मिळाल्यावर व्हिलन चे हृदयपरिवर्तन होते व तो प्यार की ताकद कबूल करतो :)
प्रतिक्रिया
11 Nov 2010 - 9:34 am | शिल्पा ब
त्या पिच्चरपेक्षा मनोरंजक...
11 Nov 2010 - 9:36 am | सहज
मस्त!
काय शॉट आहेत एकसे एक ब्रेकफास्ट अपग्रेड, भारत नाव असते मनोजकुमार .., आयुष्यभराच्या सवयी एका डॉयलॉगमधे, आजचे लिलाव... :-)
अनुपम खेरला वाचायला दिला पाहीजे. :-)
11 Nov 2010 - 9:47 am | स्पंदना
ती तंदुरी चिकनची स्मायली द्या ना मला प्लिज !
आज पहिल्यान्दा लोळुन लोळुन हसायच आहे.
बाय द वे फार फार एन्ड तो सकाळचा ज्युस दिवस भर बाहेर ठेवुन रात्री पार्टीला वापरतात.
11 Nov 2010 - 9:48 am | खालिद
:)
आवडले.
11 Nov 2010 - 9:58 am | वेताळ
मस्त...परत एकदा पिक्चर बघितला पाहिजे ह्या अॅगलने.....
11 Nov 2010 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वारले मी!
11 Nov 2010 - 10:09 am | मुक्तसुनीत
आले ! फार्फार दिवसानी फारएन्ड चे परीक्षण आले. ही सर्व परीक्षणे कुणीतरी बॉलिवूड वाल्याना द्या रे ! सगळे कसे बटबटीत, लडबडलेले, बाळबोध, बिनडोक बनवतात लेकाचे.
फारएन्ड , तुम्ही या प्रकारात निर्वाणपदाला पोचले आहात या पुनरुक्तीची पुनरुक्ती करतो.
11 Nov 2010 - 1:28 pm | विलासराव
तुम्ही या प्रकारात निर्वाणपदाला पोचले आहात या पुनरुक्तीची पुनरुक्ती करतो.
मुक्तसुनीत यांच्याशी सहमत.
परीक्षण आवडले. खुप हसलो एकटाच.
11 Nov 2010 - 1:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
परीक्षण आवडले याच्याशी सहमत.
पण तुम्ही एकटेच कसे काय हसलात? आख्खं मिपा आहे ना तुमच्याबरोबर हसायला! :-)
बाकी मुसुंशी सहमती.
11 Nov 2010 - 7:49 pm | विलासराव
पण तुम्ही एकटेच कसे काय हसलात? आख्खं मिपा आहे ना तुमच्याबरोबर हसायला!
१०० % सहमत.
11 Nov 2010 - 10:25 am | रन्गराव
वाचून दिल खूष झाला! :)
11 Nov 2010 - 11:12 am | मृत्युन्जय
शीर्षक वाचुनच कळाले होते की फारएण्डाचे परीक्षण असणार. लैच आवडले मला. मधले कुठलेतरी परीक्षण फारसे आवडले नव्हते. पण हे तर लैच फर्मास.
बाकी:
शेवटी सव्वा कोटी कर्जाच्या बदल्यात एकवीस कोटी परत मिळाल्यावर व्हिलन चे हृदयपरिवर्तन होते व तो प्यार की ताकद कबूल ...
बहुधा त्याला सव्वा कोटीच मिळतील. म्हणजे भारतातील कायद्याप्रमाणे. इतर पैसे परत ओम जय जगदीश कडे जायला हवेत. पण हिंदी पिक्चरमध्ये काहीही होउ शकते. कदाचित ते परमीत सेठी कडे जाऊ शकतात किंवा चित्रपटातल्या त्याच्या प्रेयसीकडे किंवा प्रत्यक्ष जीवनातल्या त्याच्या बायकोकडे म्हणजे अर्चना पूरणसिंग कडे सुद्धा जाउ शकतात.
12 Nov 2010 - 12:38 am | नेत्रेश
भारतातील कायद्याप्रमाणे लिलाव करणार्याला फक्त त्याचे येणे (सव्वा कोटीच) मिळतील. इतर पैसे परत ओम जय जगदीश कडे जायला हवेत.
म्हणजे २० कोटीचा चुना त्या सॉफ्टवेअर कंपनीला लागला, आणि जास्त किमतीत लिलाव जिंकल्यामुळे अभीषेकचा चांगलाच फायदा झाला. अभीषेकचे डोकेच जबरी :), फक्त दि़क्दर्शक हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडला.
11 Nov 2010 - 11:19 am | नगरीनिरंजन
चित्रपट पाहिलेला नाही पण तरी मज्जा आली.
11 Nov 2010 - 11:36 am | दिपक
'प्यार कि ताकद'
11 Nov 2010 - 11:55 am | बद्दु
एकदम झक्कास.
खुसखुशीत ..अगदी दिवाळिच्या फराळासारखा..
11 Nov 2010 - 12:16 pm | ढब्बू पैसा
एकदम जबरा चिरफाड! अतिशय "राजश्री " छापाचा एक फडतूस पिक्चर आहे हा!
11 Nov 2010 - 12:47 pm | सूर्य
=)) =)) जबरा परिक्षण.
- सूर्य.
11 Nov 2010 - 1:21 pm | ब्रिटिश टिंग्या
खल्लास! :)
11 Nov 2010 - 1:46 pm | सविता
ज-ह-ब-ह-रा.....
11 Nov 2010 - 1:50 pm | स्वाती दिनेश
नेहमीप्रमाणेच मस्त ,धमाल परीक्षण !
मजा आया!!!
स्वाती
11 Nov 2010 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते
म्याड!!!!
पहिल्या वाक्यापासूनच हसतोय... अजून हसतोय.
11 Nov 2010 - 6:34 pm | मेघवेडा
पहिल्या वाक्यापासूनच हसतोय... अजून हसतोय
असेच म्हणतो. सुरूवात तुफान आहेच, अख्खं परीक्षण भ न्ना ट लिहिलंय!

11 Nov 2010 - 1:58 pm | अवरंग
परीक्षण आवडले......
चित्रपट तुकड्या तुकड्या बघितला आहे......स्टार गोल्ड वर बहुतेक वेळा लागतो.....
काही भावनात्मक प्रसंग तर इतके बकवास आहेत की चॅनेल कधी बदलला गेला हेही कळत नाही.....
11 Nov 2010 - 2:03 pm | satish kulkarni
अनुपम खेर कडुन असल्या चित्रपटाची अपेक्षा नव्हती.
विडम्बन झकास... येउ द्या अजुन....
एक विनन्ती आहे... गाजलेल्या चित्रपटान्चे विडन्बन करा... जसे दि.दु.ले.जा. आणि दि.चा.है. चे केले होते...
11 Nov 2010 - 2:18 pm | इंटरनेटस्नेही
जबरदस्त! खरोखर हसुन हसुन पुरेवाट झाली!
11 Nov 2010 - 2:19 pm | यशोधरा
=))
11 Nov 2010 - 2:22 pm | बेसनलाडू
हा चित्रपट स्वतः सहन केला असल्याने परीक्षणाशी, त्यामागील तळमळीशी, उद्वेगाशी जवळीक साधू शकलो.
यातील चोरी चोरी देखा तुम्हे हे अभिषेक-तारा शर्मा जोडीचे गाणे बाकी श्रवणीय वाटते.
(चित्रपटप्रेमी)बेसनलाडू
11 Nov 2010 - 5:28 pm | शुचि
खूपच भारी. शब्द असमर्थ ठरतात नेहमी आमच्या हास्याचे धबधबे तुमच्यापर्यंत पोहोचवायला.
11 Nov 2010 - 6:21 pm | प्रियाली
असे चित्रपट फ्रेम बाय फ्रेम पाहणार्या आणि त्यावर फ्रेम बाय फ्रेम लिहिणार्या फारएन्डांचे कौतुक वाटते. :)
11 Nov 2010 - 8:07 pm | पैसा
सहनशक्तीसाठी एखादं अॅवॉर्ड आहे काय? फारेण्ड ना देऊन टाका!

पिच्चर पाह्यला नाही पण हे 'परीक्षण' भयंकर आहे!
11 Nov 2010 - 11:29 pm | आळश्यांचा राजा
काळजीयुक्त कौतुक वाटते!
11 Nov 2010 - 6:34 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा... प्रियालीशी सहमत!
12 Nov 2010 - 1:08 am | प्राजु
यात एक बिनडोक डायलॉग आहे..
"हमारे पापा चाहते थे की हम तिनोका नाम एकही सांस मे लिया जाये..इस लिये ओम जय जगदीश.."
आता मला पडलेले प्रश्न :
१. पहिल्या मुलानंतर दुसरा आणि तिसरा ही मुलगाच होणार हे माहित होते का त्यांच्या बापाला?
२. की तिसर्याच्या जन्मानंतर एकदमच तिघांची बारशी केली?? ;)
12 Nov 2010 - 1:31 am | मेघवेडा
हा हा हा.. शेवट तिघांनंतर, हरीनाम घेऊन "हरे (नि आता पुरे!)" सुद्धा केलं असावं! ;)
12 Nov 2010 - 2:22 am | राजेश घासकडवी
याबाबत सर्वांशी एकमत!
नाही, पण बाप हुशार होता. त्याने तीनही शक्यतांचा विचार केला होता
- ओम शांती ओम्
- ओम शांती शांतिही
- ओम जय जगदंबा
12 Nov 2010 - 2:47 am | मुक्तसुनीत
नशीब पुढे याचा सिक्वेल नाही आला.
ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे.
13 Nov 2010 - 1:23 pm | धमाल मुलगा
ते वारले ना लवकर. .. पमपम खेरतरी काय करेल मग?
13 Nov 2010 - 1:05 pm | बबलु
गुर्जी.... साष्टांग दंडवत. _/\_
- ओम शांती ओम्
- ओम शांती शांतिही
- ओम जय जगदंबा
13 Nov 2010 - 1:17 pm | बेसनलाडू
सिक्वेलच्या दूरदृष्टीबद्दल मुसुंनाही शि.सा.न. _/\_
(नतमस्तक)बेसनलाडू
12 Nov 2010 - 1:20 am | एक
दुसरे शब्दच नाहीत..
केवळ अशी परिक्षणं वाचायला मिळावीत म्हणून बॉलीवूड वाल्यांनी "ओ. ज. ज." सारखे पिक्चर्स काढावेत अशी त्यांना नम्र विनंती..
सुधाकर बोकाडिया, किंवा ८०-९० च्या दशकातले म्हातार्या धर्मेंद्र-जितेंद्र च्या सिनेमांकडे आपलं लक्ष कधी जाणार याच्या प्रतिक्षेत!
12 Nov 2010 - 1:25 am | मुक्तसुनीत
बोकाडिया नव्हे हो , आपल्या बोकांडी बसणारा ना , म्हणून बोकांडिया !
12 Nov 2010 - 5:32 am | Pain
हाहाहा :)
सुदैवाने अजून सगळा चित्रपट पाहिला नाहीये पण कल्पना आली होती. मस्त लक्तरे टांगली आहेत.
13 Nov 2010 - 1:06 pm | बबलु
परिक्षण खतरनाक आहे. लै भारी.
अजून येउ द्यात.
13 Nov 2010 - 1:28 pm | धमाल मुलगा
इतकी जीवघेणी लक्तरं काढलीये, वाचुन खुळावलोच. :)
बरं झालं, प्रोमोज पाहूनच सिनेमा न पाहण्याचा निर्णय घेतला होता (किंवा, अरेरे! 'एका प्रचंड यशानंतर आपल्या गावात- कौटुंबिक, सामाजिक (धमाल विनोदी) तीन ताशी सिनेमाचा प्रयोग' चुकवला. :D )
21 Mar 2013 - 2:17 pm | उत्खनक
औकत काढणे का काय ते हेच बहुदा! :D
30 Sep 2013 - 5:09 pm | मुक्त विहारि
ह ह पु
6 Jan 2017 - 4:34 am | गवि
पुन्हा वाचलं. पुन्हा डोळे पुसत, ठसका आवरत वाचलं.. फारेण्डरावांच्या मास्टरपीसपैकी एक.
6 Jan 2017 - 6:26 am | रेवती
हा हा हा.
6 Jan 2017 - 10:28 am | पुंबा
हहपुवा.. खूपच जब्रा लेख.. फारएन्डराव आजकाल का लिहीत नाहीत?
6 Jan 2017 - 2:50 pm | पद्मावति
=)) मस्तं, मस्तं. खास फारएन्ड टच.
8 Jan 2017 - 8:13 pm | तिमा
हे कसं सुटलं २०१० मधे, नजरेतून ?
साष्टांग नमस्कार गुरुवर्य!
9 Jan 2017 - 5:56 am | सुखीमाणूस
धागा वर आला म्हणुन बर झाल!!
वाचुन खूप करमणूक झाली
10 Jan 2017 - 1:15 pm | ज्योति अळवणी
जबरदस्त
16 Jan 2017 - 7:37 am | नेत्रेश
सगळे २१ कोटी व्हीलनला नाय मिळत हो, ते घर फक्त गहाण होते. व्हीलनच्या मालकीचे नव्हते की लिलावाची सगळी रक्कम त्याला मीळेल. कर्ज फेडल्यावर उअरलेली रक्कम (भारतीय कायद्यानुसार) घराच्या मालकाला मिळते.
म्हणजे अभिषेकने मुद्दाम घराची किंमत वाढऊन मोठ्या अक्कलहुशारीने आपला व आपल्या भावाचा फायदा करुन घेतला.
येवढ सरळ लॉजीक लोकांना कळत नाही म्हणजे कमाल आहे.
LOL :)