ओम जय जगदीश
सुरूवातीलाच अटलांटामधे रस्त्याच्या डावीकडून गाड्या जाताना दाखवल्याने हा चित्रपट वास्तववादी नाही याची आपल्याला खात्री होते. वास्तववादी, आर्ट फिल्म वगैरे समजून लोक लगेच पळून जाउ नयेत म्हणून अनुपम खेर ने (दिग्द.) हे प्रीएम्प्टिव्ह टेक्निक वापरले असावे. पण तरीही मी खात्री केली की मी मैदानात उलट्या बाजूला बसून हे पाहात नाहीये. पूर्वी मैदानात पिक्चर्स दाखवत तेव्हा गर्दी असेल तर आम्ही उलटीकडून पाहायचो तसे.
तर ही तीन भावांची कथा. थोरला अनिल कपूर म्यूजिक संबंधी एका कंपनीत कामाला असतो. मधला फ़रदीन हा तो अमेरिकेत शिकायला असतो, तर धाकटा अभिषेक जबरी हुषार असतो व कॉम्प्युटर मधे काहीतरी करत असतो. नक्कीच दोघांतील चुकीचा मुलगा अमेरिकेत गेला असावा. कारण हा धाकटा भारतात जगदीश चे 'जॅग' वगैरे नाव करून पब्स मधे नाचतो तर अस्सल देशी फ़रदीन अमेरिकेत ही प्रचंड धार्मिक, तेथील मोठ्यांच्या पाया पडणारा व तुला कोणते कुझिन आवडते म्हंटल्यावर "हिदुस्थानी" म्हणणारा (लेका निदान अस्सल मराठी, गुजराथी, पंजाबी असे काहीतरी सांग. म्हणे हिन्दुस्थानी. ते काय शास्त्रीय संगीत आहे?). थोडक्यात म्हणजे भारत नाव असते तर पूरब और पश्चिम मधला मनोज कुमार व याच्यात फरक कळाला नसता. त्याला थोडे चेहर्यावरचे नसलेले भाव ही कारणीभूत असतील.
मग एक सकाळी "कॅरेक्टर एस्टॅब्लिश" करणारा शॉट म्हणून अनिल कपूर चा ब्रेकफास्ट, एकदम सद्ध्याच्या रीतीप्रमाणे सॅंडविच व काचेच्या जार मधला तो ऑरेंज ज्यूस. तो बाहेर ठेवल्याने ब्रेकफास्ट झाला की उरलेल्या ज्यूस चे हे सर्व लोक काय करतात मला नेहमी प्रश्न पडतो. एकतर सकाळी सकाळी तो आंबट ढाण ज्यूस पिववतोच कसा? तसेच ती २-३ सफरचंदे जी फक्त एका बाजूने शर्टाला पुसून ते खातात. आणि सॅंडविच हातात घेऊन जर इतर कामे करत असतील तर त्यात दोन पावात फक्त एक काकडी ची चकती घातली असावी. कारण आम्ही त्याहून काही मऊ घातले की एका बाजूने खाताना पुळकन दुसरीकडून बाहेर पडते. पण या चित्रपट वाल्यांचे कोणतेही खाणे एकदम सुबक असते. तरी हा ब्रेकफास्ट जरा बदलला. पूर्वी दौलतवाले लोक सकाळी सकाळी पावाला सुरीने लोणी लावत बसत. येथे या शॉट वरून एवढेच कळते की अनिल कपूर चे लग्न व्हायचे आहे.
या अनिल कपूर ने त्याच्या बॉस कडून कर्ज घेतलेले असते. सव्वा कोटी (ती काय दक्षिणा आहे?). एवढा सव्वा कोटी इंजिनियरिंग ला लागणारा कोणता कोर्स फ़रदीन करत असतो तर काहीतरी ऑटोमोबिल इंजि. कारण त्याला जगातील सर्वात फास्ट गाडी बनवायची असते. एकूणच अमेरिकेत लागणार्या खर्चाबद्दल दिग्दर्शकांना अचूक माहिती दिसते. मागे नाही का त्या अजनबी मधे मॉरिशस ला जायला दोघांसाठी ५०,००० डॉ. लागणार होते?
पण फ़रदीन पास होतो व टोयोटा त्याला ऑफर देते. या कंपनीची जगात इतर कोठेही शाखा नसल्याने अमेरिकेतच काम करावे लागणार असते.
तेथे त्याला उर्मिला भेटते. ती तर 'अमेरिकेतील मुलगी' म्हणजे जे सर्व stereotype लोक गृहीत धरतात त्या सर्व गुणांनी युक्त असते ('यादे' मधल्या मोनिश्काच्या वरताण). त्यांचे भारतात लग्न होते व तेथून गडबड व्हायला सुरूवात होते. एकतर 'अमेरिका व दिल्लीतून' आलेल्या पाहुण्यांना कुटुंबातील जुन्या गाडीतून नवरीला नेण्याची प्रथा रानटी वाटेल म्हणून उर्मिलाच्या आईने 'बडी गाडी' मागवलेली असते. ते अनिल कपूर मान्य करत नाही. तेथूनच उर्मिलाचे सर्वांना बोलणे सुरू होते. मग पहिल्या जेवणात तर प्रचंड मतभेद होतात. कारण उर्मिला पदार्थ नुसते बघून ते किती तिखट आहेत, किती ऑइली हे ओळखू शकते. त्यात अमेरिकेत एखादी गोष्ट मान्य नसेल तर त्याबद्दल मोठा भाऊ व इतर वडीलधारी माणसे यांचा डायरेक्ट अपमान करण्याची पद्धत असल्याने ती तसेच करते.
हे मतभेद विकोपाला जातात तेव्हा त्यात ब्रेक म्हणून सगळेजण पिकनिक ला जातात व गाणे म्हणतात आणि त्यातील 'प्यार का मतलब रब होता है' या वाक्यावर मतैक्य झाल्यावर परत घरी येऊन मतभेदाचा उर्वरित भाग चालू करतात.
तेवढ्यात निष्पन्न होते की अनिल कपूर कडून कर्जासाठी सही घेताना त्यात त्याच्या बॉस ने घर गहाण ठेवण्याच्या पेपरवर ही सही घेतलेली असते. जो गहाणखत करतोय तो त्या घरचा मालक नाही वगैरे क्षुल्लक बाबी कोणी बघत नाही. मग भांडणे झाल्यावर तो बॉस म्हणतो की एवढे असेल तर माझे पैसे परत कर. त्यासाठी फ़रदीन ने भारतात नोकरी करावी असे अनिल कपूर सांगतो (कोणीतरी कंपनी आठ वर्षाच्या बॉन्ड वर त्याला बहुधा पावणे दोन कोटी द्यायला तयार असते). पण फ़रदीन व उर्मिला परत अमेरिकेत जायचे ठरवतात. त्याच वेळी अभिषेक गोत्यात येतो. कारण तो विद्यापीठाची साईट हॅक करून पेपर फोडतो. तो इतका जबरदस्त हॅकर असतो की त्या साईट वर त्याचे जाणे हे तो व त्याच्या मित्रांनी त्या साईटचा पासवर्ड तीन चान्स मधे अचूक ओळखण्यावर अवलंबून असते.
मग अनिल कपूर एका पडीक गायकाला घेऊन यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची गाणी कोणी विकत घेउ नयेत म्हणून तो व्हिलन स्वत:ची सीडी फुकट वाटायची तयारी दाखवतो (त्याच्या थियरीनुसार लोकांची गाणी व साबण घेण्याची पद्धत सारखीच असावी). परत हा सगळा वाद भलताच तात्त्विक पातळीवर असतो, "म्हणजे प्यार की ताकद पैसे की ताकद से बडी होती है क्या". यांच्या सीडीज कोणी विकायला तयार होत नाहीत, पण तेवढ्यात पूर्वी नाकारलेला एक बनावट सीडी विकणारा भेटतो. अनिल कपूर त्याला एका मिनीटात पुन्हा बनावट सीडी विकणार नाही हे मान्य करायला लावून आपल्या पडीक गायकाच्या सीडी विकायची "परवानगी" देतो. एकूणच या चित्रपटात बरेच वाईट लोक आपल्या आयुष्यभराच्या सवयी एका डॉयलॉग मधेच बदलतात. हा बनावट सीडी विक्रेता, तसेच उर्मिला - तिचे वडील एक दोन वाक्ये टाकतात की ही एकदम सरळ!! सर्व गैरधंदे करणार्यांकडे यांना पाठवायला पाहिजे.
पण शेवटी गहाण असलेल्या घराचा लिलाव त्याचा बॉस ठरवतो. कर्ज बहुधा व्याजासकट पावणे दोन कोटीचे झालेले असते व अनिल कपूर कडे त्यापेक्षा बरेच जास्त पैसे असतात. सामान्य माणसे पावणेदोन कोटी देउन घर परत घेतील. पण मग चित्रपत दीड तासात संपेल. म्हणून मग तसे करत नाहीत. तेवढ्यात एका जंकयार्ड किंवा रिपेअर शॉप मधे फ़रदीन खटपटी करत असताना त्याला फास्ट इन्जिनाचा शोध लागतो आणि मग एक कंपनी त्याची टेस्ट घ्यायचे ठरवते. पण ते ठरणार कसे? हाय स्पीड टेस्ट ट्रॅक वगैरे वापरायला हा काही वास्तववादी चित्रपट नाही. त्यामुळे शहरातील ४०-५० मैलांचे लिमीट असलेल्या रस्त्यांवर त्या कंपनीतील एका माणसाच्या गाडीपेक्षा थोडी पुढे गेल्यावर ही कार जगातील सर्वात वेगवान आहे हे सिद्ध होते व ती कंपनी एकदम २ मिलीयन द्यायला तयार होते.
मध्यंतरी अभिषेक बंगलोर ला जाऊन पिझ्झा हट मधे काम करत असतो. एकदा ऑर्डर घेऊन तो कोणत्यातरी इन्फोसिस सारख्या कंपनीत जातो व मधे काय होते ते लक्षात नाही पण एकदम काहीतरी हॅकिंग विरोधी कॉम्पिटिशन असते त्यात एकदम सर्वात पुढे बसून तो तो प्रॉब्लेम सोडवून दाखवतो.
तोपर्यंत इकडे लिलाव चालू झालेला असतो. मुंबईत होणारा हा लिलाव बंगलोर व इतर कोठे कोठे असलेल्या फ़रदीन व अभिषेक ला बरोबर कळतो. पेपर मधे चित्रपट, पेज थ्री, क्रिकेट वगैरे बघण्याचे सोडून तारूण्यसुलभ उत्सुकतेने सगळी तरूण मंडळी 'आजचे लिलाव' हे सदर पहिल्यांदा वाचत असल्याने त्यांना वेळेवर कळते आणि मग लिलावाच्या जागेवर क्लायमॅक्स सुरू होतो.
लिलावास अनिल कपूर आलेला दाखवला असला तरी पुढच्या शॉट्स वरून कळते की सर्व संबंधित मंडळी ब्याकग्राउंड ला दबा धरून बसलेली असतात अचूक वेळी एकदम सीन मधे येण्यासाठी. अनिल कपूर कडे साडे सहा कोटी असतात त्यामुळे तोपर्यंत तो बिन्धास्त किंमत वाढवतो. पण 'सात करोड' बोली लागल्यावर त्याचा चेहरा पडायच्या आत तो बॉस ओरडतो 'प्यार की ताकद' चे काय झाले वगैरे. कथालेखकाला अनिल कपूर कडे तेव्हा साडेसहा कोटी आहेत हे माहीत असते त्यामुळे तोपर्यंत संबंध दुरावलेल्या त्या व्हिलनला ही अचूक माहीत असते किती आहेत अनिल कपूर कडे.
मग 'अमुक करोड एक, अमुक करोड दोन' वगैरे सोपस्कार झाल्यावर साहजिकच 'अमुक करोड तीन' म्हणून हातोडा आपटायच्या आत फ़रदीन तेथे येतो व बोली पुढे वाढवतो. आता एकच दुसरा माणूस शिल्लक राहिलेला असतो पण तोही बोली वाढवत नेतो. शेवटी फ़रदीन ही निराश होतो. मग पुन्हा एकदा '...एक', '...दोन' वगैरे झाल्यावर अभिषेक येतो व पुढची बोली लावतो. इतके दिवस काही एकमेकांचा पत्ता नसूनही प्रत्येक भावाला आधीच्या चे लिमीट बरोबर माहीत असते, तेथून पुढे बोली लावायला. तो दुसरा माणूसही बोली लावत जातो शेवटी वीसेक कोटी झाल्यावर (बहुधा पुढे मोजता न आल्याने) सगळे थकतात व २१ कोटी का अशाच किमतीला लिलाव ठरतो.
आता तो व्हिलन खुनशी हसत जाहीर करतो की हा लिलाव वहिदा (या भावांची आई) च्या हस्ते होईल आणि मग एकदम वहिदा दिसते. पण प्रचंड धक्कातंत्राने "तो बोली वाढवणारा माणूस" सांगतो की मी अभिषेक च्या वतीने बोली लावत होतो. मग बाकीचे बोली लावणारे थांबल्यावर थांबला का नाही? म्हणजे स्वत:चेच घर विकत घेण्याची किंमत अभिषेक स्वत:च स्वत:विरुद्ध वाढवत होता. अभिषेक कितीही किंमत लावू शकतो कारण त्याने ते हॅकिंग विरोधी सॉफ्टवेअर तयार केल्यावर लिलावाची किंमत तीच विकण्याची किंमत ही असे त्या कंपनीच्या माणसाला सांगितलेले असते (तो ही असतोच ना तेथे!)
अशा तर्हेने फसवून गहाण ठेवून घेतलेले घर व्याजासकट मूळ कर्ज परत करून मग घराच्या फसवणूकी साठी न्यायालय वगैरे ची वाट न धरता हे पावणे दोन कोटी च्या कर्जासाठी एकवीस कोटी मधे स्वत:चेच घर परत घेतात.
शेवटी सव्वा कोटी कर्जाच्या बदल्यात एकवीस कोटी परत मिळाल्यावर व्हिलन चे हृदयपरिवर्तन होते व तो प्यार की ताकद कबूल करतो :)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्या पिच्चरपेक्षा मनोरंजक...
हा हा हा
ती तंदुरी चिकनची स्मायली
आवडले.
हेहेहेहेहेहे
वा र ले!
आले .. आले
फारएन्ड ,
थोडी असहमत
३_१४ विक्षिप्त अदिती
लई भारी
शीर्षक वाचुनच कळाले होते की
सहमत. हीच प्रतिक्रिया देणार होतो.
चित्रपट पाहिलेला नाही पण तरी
मेलो
मस्तच
ह. ह. पु. वा!
=)) =)) जबरा परिक्षण. -
:)
ज-ह-ब-ह-रा.....
सॉलिड्ड...
म्याड!
+ १
भारी.....
छानच....
जबरदस्त! खरोखर हसुन हसुन
=))
भन्नाट!
खूपच भारी. शब्द असमर्थ ठरतात
बाबौ
+१
काळजीयुक्त कौतुक वाटते!
हाहाहा
यात एक बिनडोक डायलॉग
हा हा हा.. शेवट तिघांनंतर,
भन्नाट परीक्षण
नशीब
ह्म्म..
गुर्जी.... साष्टांग दंडवत.
सहमत!!
अप्रतीम!!!
"बोकाडिया"
हाहाहा सुदैवाने अजून सगळा
परिक्षण खतरनाक आहे. लै
अशक्य!
बाब्बौ!
लय भारी
पुन्हा वाचलं. पुन्हा डोळे
हा हा हा.
शेवटी सव्वा कोटी कर्जाच्या