नमस्कार मंडळी >:) ,
अस्मादिकांना ह्या विभागात बघून दचकू नका :O ... व्यावसायिक स्पर्धेमुळे आता आम्ही मिपाच्या सर्व विभागात शिरकाव करायचे ठरवले आहे.. :B
पाककृतीच लिहिणार आहे .. :$ आपापल्या स्वयंपाकघरात तुम्ही तिचे स्वतःच्या जबाबदारीवर विडंबन करू शकता.. :D
गेले काही वर्षे भारता बाहेर राहावे लागते आहे आणि प्राण्यांची प्रेते खात नसल्यामुळे नाईलाजाने कार्यालयातील मुकादमाचे काम संपले की आचार्याचा अवतार घ्यावा लागतो..
थोडी घरी स्वयंपाकघरात केलेली खुडबूड, अनेक दूरदर्शन वाहिन्यांवर पाहिलेले स्वयंपाकाचे कार्यकम आणि वेगवेगळे प्रयोग करायची वृत्ती ह्यातून काही न फसलेल्या पाककृती निर्माण झाल्या त्या आता तुमच्या सेवेस आणायचा मानस आहे..
मग चला हिंमत गोळा करा :SS आणि साहित्य लिहून घ्या.. B)
त्या आधी एक सूचना : आमची पाकृ संपूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावी नंतर होणार्या/झालेल्या त्रासास 8} मंडळ जबाबदार राहणार नाही..
साहित्य:
सर्व साहित्य एका माणसाला >:) पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
अख्खे मसूर १५० ग्रॅम
१ मध्यम आकाराचा कांदा
१ लहान अर्धा कच्चा टोमॅटो
२ लसूण पाकळ्या
१ टेबल चमचा खोवलेले ओले खोबरे
२ टेबल चमचा कांदालसूण मसाला
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, साखर, कोथिंबीर, लिंबू आवडीनुसार
फोडणी साठी मोहरी, जिरे, हिंग, हळद, तेल (ह्याचे प्रमाण किती ते माहिती नसेल तर आपण स्वयंपाकघरात पाय ठेवण्यास लायक नाही असे समजावे ;) )
कृती :
अख्खे मसूर स्वच्छ धूवून २ तास पाण्यात भिजत ठेवा..
कांदा, लसूण, मिरच्या बारीक चिरून घ्या
गॅसवर पॅनमध्ये आपल्या डायेट प्लॅन नुसार तेल गरम करा
"
त्यात हिंग, मोहरी जिरे, बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि मिरच्या टाकून लालसर होई पर्यंत परता..
त्यात आता भिजवलेले मसूर मिसळा वरून थोडी हळद आणि कांदालसूण मसाला घाला. (गडबडितं ह्या पायरीचा फोटो काढायचा राहिला)थोडा पाण्याचा हबका मारावा आणि झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ येऊ द्यावी
नंतर त्यात खोवलेले ओले खोबरे आवडी/तब्बेती नुसार मीठ आणि साखर घालावी अजून ३-४ मिनिटे परतावे. शेवटी कोथिंबीर मिसळावी, लिंबू पिळावे आणि
झाले तयार मसाला मसूर
ह्या बरोबर ज्वारीची भाकरी अर्धा कच्चा टोमॅटोच्या फोडी म्हणजे स्वर्ग..
इथे भाकरी मिळत नाही पण पिटा ब्रेडचा एक प्रकार मिळतो तो ७०% भाकरी गत लागतो.. त्यावर काम चालवून नेतो..
१० मिनिटात फडशा.. चा. पु. सा. के.
अवांतर: मसूर मिळाले नाही तर भिजवलेली तुरडाळ ही फक्कड लागते, इतर डाळी आणि कडधान्ये ही चालू शकतील असे वाटते
नंतर मुखशुद्धीला भरूच शेंग
एक जोरदार ढेकर :\
आणि हो (|: तयारी मध्ये अंथरूण आधीच घालून ठेवा हे सांगायचे विसरलो.. I) O:)
प्रतिक्रिया
9 Jul 2010 - 7:21 am | मुक्तसुनीत
केसु क्या बात !
वीकांताला करून सांगतो !
9 Jul 2010 - 8:01 am | नितिन थत्ते
पाककृती मस्त (कारण मसूर आवडतात).
आमच्या देशात मिळणारे मसूर काळपट (पक्षी= गडद रंगाचे असतात). हे फोटोतले फिक्कट रंगाचे मसूर कुठचे? की त्या तुरी आहेत?
नितिन थत्ते
9 Jul 2010 - 8:46 pm | केशवसुमार
अख्खी तुरी पुर्वी कधी बघीतली नाही.. त्यामुळे सांगता येणार नाही..
(तुरी निरक्षर)केशवसुमार
इथल्या सुपरमार्केट मध्ये दिसायला मसूरासारखे वाटले म्हणून आणले होते.. चवीला पण मसूरा गत आहे..
(अंदाजपंचे)केशवसुमार
प्रतिसादा बद्दल धन्यवाद..
(आभारी)केशवसुमार
9 Jul 2010 - 9:04 am | प्रकाश घाटपांडे
खाना खजाना आमचा प्रांत नाही. पण आपली पाकृ आवडली. मुख्य म्हणजे कुठलाही प्रांत वर्ज्य नाही ही बाब विशेष आवडली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
9 Jul 2010 - 9:45 am | पहाटवारा
साला पदार्थ खुसखुशीत नसला म्हणुन काय झाले , कृती तर खुसखुशीत आहे ना!
वाह !
9 Jul 2010 - 9:58 am | बहुगुणी
फायनल प्रिपरेशनचा फोटो तर झकासच! एकदम तोंडाला पाणी सुटलं!!
'तिकडे' कच्चा माल नसेल तेंव्हा जरूर येत चला पाककृती विभागात! You definitely qualify!
9 Jul 2010 - 10:02 am | वेताळ
बाकी मस्तच अख्खा मसुर केला आहे.
कांदा व इतर तेलात तळताना त्यात भरपुर टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी घातली तर मसुर एकदम झक्कास होतो.त्याला तिखट/गोडसर चव येते.
गुर्जी मिरच्या न वापरता त्यात मिरचीची पावडर वापरा एकदम लाल रंग येतो मसुर ला. :D
फक्त अख्खा मसुर असला तर आपल्याला आमटी किंवा इतर कोणतीही भाजी नसली तरी चालते.
वेताळ
9 Jul 2010 - 10:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
व्वा! मसूराची अशी पाकृ आवडली ... बघायला!
पण फार कष्ट आहेत हो यात ... एका (आळशी) माणसासाठी मसूराची आणखी एक पौष्टीक पाकृ:
तुम्हाला हवे तेवढे मसूर (रात्री खाण्यासाठी) सकाळी भिजत घाला. संध्याकाळी घरी आल्यावर त्यात फारसं पाणी राहिलं नाही, आणि मसूर नीट भिजले आहेत याची खात्री करून घ्या. अंदाज चुकला तर मला विचारू नये; आमच्यात अंदाज चुकण्याची पद्धत नाही. अंदाज चुकलाच तर त्याला नवीन पाकृ म्हणतात.
जेवणाच्या आधी मिपावर भरपूर टी.पी. करा. पोटात कावळे कोकलायला लागले की लगबगीने कुकर उघडा. त्यात अंदाजपंचे, हवा तेवढा दलिया घाला, भिजवलेले मसूर त्यात घाला. हवं असल्यास अंदाजाने त्यात पाणी घाला. वरून थोडं मीठ, थोडा चाट मसाला, थोडी हळद घाला आणि कुकरचं झाकण लावून, कुकर गॅसवर ठेवून, गॅसची तीच शेगडी सुरू करा. मधल्या वेळात फ्रीजमधून गाजर, काकडी वगैरे प्रकार काढा आणि कुकर आवाज काढेपर्यंत या गोष्टींचा फडशा पाडा. मधल्या काळात डान्राव, निदे, मुसु इत्यादींना (मुद्दामच संपादकांची नावं टाकली, म्हणजे प्रतिसाद उडणार नाही!) खरडी टाकून थोड्या काड्या टाका!
तेवढ्या वेळात कुकरच्या शिटीचा आवाज होऊ लागेल, गॅस मंद करा आणि आणखी एक जळजळीत प्रतिसाद टाकून गॅस बंद करा. मग पुन्हा थोड्या वेळाने पोटातून चित्रविचित्र आवाज येतील आणि ते पोटातल्या पोकळीमुळे घुमतील. तेव्हा धावत जाऊन कुकर उघडा. ताटली, वाडगा जे काही हाताला लागेल त्यात दलिया-मसूर वाढून घ्या. पाणी कमी पडून कोरडं वाटत असल्यास दही घ्या! आधी गणपा, स्वातीताई, पांथस्थ अशा गरीबांच्या संजीव कपूर, तरला दलाल इत्यांदींची आठवण काढा... आणि मग ... वरपा!
टीपः प्रचंड भूक लागलेली असतानाच असं जेवण घशाखाली उतरू शकतं, त्यामुळे पाकृतल्या महत्त्वाच्या पायर्या, उदा: टी.पी. करणे, 'तुंगाट' खरडी टाकणे, "बेळगाव कोणाचं" वगैरे धाग्यांवर "अय्या, कित्ती स्वीट" वगैरे प्रतिसाद लिहीणे, विसरू नये.
अदिती
9 Jul 2010 - 9:56 pm | केशवसुमार
अदितीताई..अजीबात कष्ट आणि वेळ लागत नाही.. मसूर भिजवून तयार असतील तर ८-१० मिनिटामध्ये चम्चमीत मसाला मसूर तयार होतात..
(झटपट)केशवसुमार
एकदा मसाला मसूरची चव घेउनच बघा परत दलियामसूरच नाव काढणार नाही..
(विपणक)केशवसुमार
हा आता मध्ये मध्ये करायच्या पायर्या चवी पेक्षा महत्वाच्या असतील तर तुम्ही दिलेल्या कृतीला तोड नाही
(टी.पी)केशवसुमार
10 Jul 2010 - 2:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-)
अर्थात, हे असं जेवण सलग तीन_चौदा दिवस जेवलं की त्याचा कंटाळा येतोच. मग चूपचाप वेळेत हापिसातून बाहेर पडायचं, व्यवस्थित भाजीपाला, टोमॅटो, कोथिंबीर असे प्रकार आणायचे आणि फ्रीज भरून टाकायचा. "एकटीसाठी कुठे एवढे कष्ट" असं वाटलं तर दोन-चार लोकांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं, म्हणजे कांदा-टोमॅटो कोण चिरणार, कोथिंबीर कोण निवडणार असे प्रश्न चुटकीसरशी सुटतात!
ही वेळ लवकरच माझ्यावर येईल; तेव्हा गुरूदक्षिणा म्हणून 'मसाला मसूर'चा फोटो काढून तुम्हाला दाखवतेच.
(कडधान्यप्रेमी) अदिती
9 Jul 2010 - 10:57 am | परिकथेतील राजकुमार
चला आमच्या गणपाशी फाईटला कोणितरी उतरले तर ;)
पा.कृ. बेष्टच हो एकदम. फक्त लिखाणात 'प्राण्यांची प्रेते घात नसल्यामुळे' असे पडले आहे ते 'खात' असे हवे आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
9 Jul 2010 - 11:43 am | जागु
वा खुप टेस्टी दिसतायत मसाला मसुर.
9 Jul 2010 - 11:49 am | छोटा डॉन
एकदम क आणि ड आणि क.
एकदम जबर्या पाकृ आहे शेठ.
घरापासुन दुर राहणार्या व बाहेरचे खाऊन कंटाळणार्या आमच्यासारख्या उंडग्यांसाठी एकदम बेश्ट !
करुन पाहु कधीतरी ;)
बाकी आम्हीही पुर्वी कधीतरी '... उर्फ डॉन्याचा सल्ला ! ' नावाची पाकृ लेखमाला चालु केली होती पण काही कारणांमुळे आम्हाला त्याचा गाशा गुंडाळावा लागला.
आता तिच्यात नवे प्राण फुंकावे म्हणतो ;)
------
(बंडखोर स्वैपाकी) छोटा डॉन
9 Jul 2010 - 12:16 pm | सहज
छान. खर तर नुस्ती वाटीत घेउन खाण्यासारखी (कोरडी व किंचीत गोडसर) वन डीश मील म्हणुन देखील मला मसुर उसळ आवडते.
9 Jul 2010 - 12:02 pm | गणपा
गुर्जी आपल्याला कंचाच विभाग असाध्य नाही हे आज परत सप्रमाण सिध्ध केलत.
समस्त कवी-नवकवींना जाहिर इनंती लवकारात लवकर आपापली काव्ये प्रसवावी. गुर्जी आमच्या पोटावर पाय द्यायला लागलेत.
आधी विडंबणार | मग गद्य ही प्रसवणार |
आता पाकसिद्धी ही करणार| मेजवानी निश्चित||
9 Jul 2010 - 12:03 pm | विसोबा खेचर
मस्त रे...
पूर्वी मनोगती असताना संजोपच्या पिरंगुटच्या बंगल्यावर एकदा कट्टा भरला होता तेव्हा तुझ्या हातची चव चाखली आहे रे.. :)
9 Jul 2010 - 12:24 pm | श्रावण मोडक
काय दिवस आलेत? ;)
मसूर बाकी छानच.
9 Jul 2010 - 12:26 pm | अवलिया
हातातल्या कात्र्या जावुन तिथे स्वयंपाकाची उपकरणे आली.
बदल आवडला.
9 Jul 2010 - 12:31 pm | सुप्रिया
तयार मसूरांचा फोटो टेम्टींग वाटतोय. करून बघायला पाहिजे.
9 Jul 2010 - 4:29 pm | मस्त कलंदर
पाकृ विभागात केसुंना पाहून भीत भीतच धागा उघडला.... चुरचुरीत निवेदनासोबतचे आख्खे मसूर आवडले... मी कडधान्यांच्या सहसा जात नाही, आता मात्र जावे असे वाटायला लागले आहे.
@ डॉनः तुझ्या पाकृ लैच वेळखाऊ असतात.... आठव, ती साबुदाण्याची थालीपीठे... मला लेख वाचताना शेवटी शेवटी तर नक्की ती बनली असतील की नाही असेच वाटायला लागले होते.
@ अदिती: असला प्रकार माझ्या नरड्याच्या खाली उतरेल असे वाटत नाही... :(
केसु, आणखी पाकृ येऊ देत.. रोज रोज गणपाला प्रत्येक पाकृचे व्हेज व्हर्जन टाक म्हणून सांगायला नको.... ;)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 4:56 pm | रेवती
चांगली पाकृ!
फोटो छान चकचकीत आले आहेत, एकदम क्लीन!;)
एका फोटूत तर फक्त प्लेटच दिसतीये चा. पु. सा. केलेली. ;)
तुमचा जालिय वावर चांगलाच वाढलाय याचे अजून एक उदाहरण!
रेवती
9 Jul 2010 - 5:02 pm | चतुरंग
असं वाटून धागा भीतभीतच उघडला पण नव्हे हे विडंबन नव्हे हे लक्षात आल्यावर हायसे वाटले! ;)
गुर्जी पाकृ एकदम जोरदार झाली आहे. अधेमधे खुसखुशीत शाब्दिक पेरणी सुद्धा झकास.
मूग सुद्धा अशा पद्धतीने मस्त लागतील असे वाटते.
(खुद के साथ बाता : रंगा, गुर्जींनी रोल बदलला तुझं काय? :?)
चतुरंग
9 Jul 2010 - 5:56 pm | स्वाती दिनेश
मस्त मस्त मस्त!!!
फ्राफुत आपण केलेल्या अनेक पाकृ आठवल्या,
येऊदेत त्या एकेक.. एक तर अगदी आत्ताच सांगते, केसु स्पेशल मटकीची उसळ ती लवकर येऊ दे.
आणि लवकरच ब्राझील मधून जर्मनीला यायचं बघा,:)
स्वाती
9 Jul 2010 - 9:28 pm | धनंजय
धन्यवाद.
ज्वारीच्या भाकरीच्या उल्लेखाबद्दल निषेध. माझी ही ३ वेळा फसली. (थापताना भेगा गेल्या, तव्याला तुकडे-तुकडे होऊन चिकटली.) पुन्हा प्रयत्न करणार नाही.
9 Jul 2010 - 10:04 pm | केशवसुमार
पिठ किती जुन आहे आणि कसे आणि किती मळलेले (तिंबलेले) आहे ह्यावर सगळा भाकरीचा खेळ अवलंबून असतो.. मी ही शक्यत त्या वाटेला जात नाही..
(अनुभवाने शहाणा)केशवसुमार
पिटा ब्रेड झिंदाबाद..
(पर्यायी)केशवसुमार
9 Jul 2010 - 10:02 pm | मिसळभोक्ता
केसुषेठ,
ब्राझिलातून भारतात परतताना, व्हाया मार्गे सॅन फ्रान्सिस्को जावे ही विनंती.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
10 Jul 2010 - 6:46 am | मुक्तसुनीत
प्रस्तुत लेखाचे शीर्षक सारखे सारखे डोक्यात घोळत होते. दोन नावे सतत कानात घुमत होती : "द मिस्टिक मस्युर" आणि "मेरिलिन मॅन्सन". डॅम यू केसु. =))
10 Jul 2010 - 7:16 am | सन्जोप राव
पाककृती आवडली. मसूर माझ्या आवडीचा. मसुराची उसळ आणि गरमागरम बासमती भात (तूप आणि मीठ - जमल्यास मेतकूटही) हे एक कैवल्यस्वरुपी आनंदाचे साधन. नुसती घट्ट मसुराची उसळ आणि त्यावर पेरले फरसाण, बारीक कच्चा कांदा व कोथिंबीर हे 'सुख जाले हो साजणी' म्हणायला लावणारे दुसरे देशस्थी साधन. एकूणच कडधान्ये हे ईश्वराचे मानावाला दिलेले द्विदलदेणे आहे हेच खरे.
सन्जोप राव
होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने
शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है
10 Jul 2010 - 7:53 pm | ramjya
पुणे ला 'सिटीप्राईड' -सातारा रोड वर ...'जगातभारी कोल्हापुरी' होटेल आहे....खास अख्खा मसूर साथी प्रसिद्ध आहे.....मला अख्खा मसूर आणी सोलेकढी कशी बनवत्तात याची माहीती पाहीजे.....आभारी आहे
11 Jul 2010 - 12:36 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार
13 Jul 2010 - 9:23 am | sur_nair
आम्ही मसूर कुकर मध्ये शिजवून करतो. पण त्याचा लगदा होतो. बाकी मसाला तुम्ही सांगितला तोच बराचसा. आता भिजत घातलेत. करून बघतो तुमच्या पद्धतीने
13 Jul 2010 - 9:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कुकरमधे शिजवतानाही जर शिट्टी व्हायच्या जऽऽस्ट आधी गॅस बंद केलात तर लगदा होणार नाही.
आणि आता धागा वर आला आहेच तर माझी गुरूदक्षिणा इथेही देते.*

*विसू: डान्रावांनी हा प्रतिसाद पाहू नये.
अदिती
13 Jul 2010 - 11:04 am | llपुण्याचे पेशवेll
अय्या, कढई किती छान आहे गं तुझी कुठनं घेतलीस?
(टीपी)
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
14 Jul 2010 - 7:58 am | sur_nair
एकदम मस्त झाली म्हणून मुद्दाम धन्यवाद पुन्हा एकदा. यात फरसाण टाकून चकणा म्हणून खायला छान लागेल असे वाटते.