ह्या लेखाचा आधीचा भाग येथे वाचावा...
आतले आणि बाहेरचे... (१)
----------------------------------------------------------------------
आपण शाळेत शिकतो की इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. आपला इतिहास आपल्याला सांगतो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले आणि आपल्या गुलामगिरीची वागणूक दिली. मग काही थोर मंडळी पुढे आली त्यांनी देशाला नेतृत्व दिल , देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला आम्ही स्वतंत्र झालो. वय वर्षे १० ते १६ ला हे एवढं पुरेसं असेलही आणि त्याचमुळे की काय आपल्या शालेय इतिहासात असं रंगतादार इतिहास सांगितलेला असतो. पण जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा लक्षात येतं की जगात असं १००% कृष्ण-धवल (ब्लॅक ऍण्ड व्हाईट) काहीच नसतं. खूप सारे आयाम आपल्या नजरेसमोरच आलेले नसतात. मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं.
पण आपण हे असं मोठं होतच नाही. त्या आधीच आपण कुठल्यातरी विचारसरणीची झूल आपल्यावर ओढतो आणि सुरू होतो आपला प्रवास आपल्या गटातील विचारांचा,विचारवंतांचा प्रभाव वाढवण्याचा सोबतच, त्यांचे जे विरोधक होते किंवा आहेत त्यांना विरोध करण्याचा. आपण काय करतोय हे खरं तर आपल्याला माहितीच नसतं. पण आपण जेथे उभे असतो तेथून मात्र आपण योग्य आणि १००% बरोबर असल्याचं दिसतं - आपल्यालाच भासतं. मग आपला जोष अधिकच वाढतो. यापुढे आपलं सगळं वाचन, मनन एक दिशा ठरवून होतं. येथे एक लक्षात घ्या वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच.
काही लोक मात्र ही अशी झूल पांघरायला नकार देतात, आपला नवा, स्वतंत्र विचार मांडतात. त्यामुळे आधीच्या संथ पसरलेल्या समाज सागरात वादळ उठतं, लोकांच्या विचारांना धक्का बसतो, त्यांच्या स्वप्रतिमेला तडे जाऊ लागतात. मग त्यांचा विरोध होऊ लागतो. ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो.
अश्याच झूल पांघरायला नकार देणार्यांची परंपरा भारतात खूप आहे. मात्र आपल्या सुदैवाने महाराष्ट्राने यात नेहमीच वरचा क्रमांक पटकावला आहे. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. यातील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात वेगळा विचार देऊन गेलेला आहे. किंवा कित्येकदा नव्या विचारांचे प्रवर्तन सुद्धा यांनी केलं आहे. जेव्हा जेव्हा यांनी कुठलाही नवा विचार मांडला तेव्हा तेव्हा प्रस्थापित व्यवस्थेने त्या नव्या विचाराला विरोध केला. हा विरोध तो विचार वाईट आहे किंवा चुकीचा आहे या साठी नव्हता तर तो विचार आताचे जे प्रस्थापित आहेत त्यांचे हितसंबंध धोक्यात आणतो म्हणून होता.
विरोध कशाला झाला?..
मानसाला माणूस मानण्याला झाला. स्त्रियांना बरोबरीने वागणूक देण्याला झाला, विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी झाला, त्यांच्या शिक्षणासाठी झाला, विरोध अस्पृश्यांच्या उथ्थानासाठी मिशन स्थापण्यासाठी झाला, संतती नियमना बद्दल जनजागृती बद्दल झाला, सामाजिक व धार्मिक सुधारणांचा आग्रह 'सुधारक' मधून करण्याला झाला. समाजाचा एक घटक अर्थशास्त्राच्या दृष्टीने पूर्णतः अनुत्पादक आहे असं म्हणण्याला झाला, नैसर्गिक तळ्यावर पाणी पिण्याला झाला, गाईला उपयोगी पशू मानण्याला झाला. हिंदू कोड बिलाला झाला, धर्मांतराला झाला, नामांतराला, मागे राहिलेल्यांना विकासाची संधी मिळावी असं म्हणण्याला सुद्धा झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरचा काळ फार धकाधकीचा होता असं मानतात. भारताला नवीन असलेल्या अनेक गोष्टी या काळात भारताच्या मातीत रुजल्या, उमलल्या आणि भरभरून वाढल्या सुद्धा, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या नव्या मूल्यांची ओळख भारतीय समाजाला झाली. बुल्शेवीक क्रांतीची धग भारतापर्यंत पोहोचली. आमचे मानवेंद्रनाथ रॉय, पंडित नेहरू, स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह आदी लोक या नव्यामुल्यांनी भारावले. यातील प्रत्येकाने परकीय भूमीवर झालेल्या स्वातंत्र्य लढ्यापासून वाढीव प्रेरणा घेतली. विचार घेतले.
त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं?
मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
जरा विस्ताराने सांगतो... त्याकाळी ह्या लोकांना किंवा यांच्या विचारांना किंवा यांच्या वादाला म्हणा हवं तर, विरोध करणार्या लोकांचे काही हितसंबंध धोक्यात आले होते म्हणून त्यांनी विरोध केला असं मान्य करू पण त्याकाळात ह्या नेत्यांनी दाखवलेली वाट योग्य होती, आपल्या समाजाचा एक भाग असा अधू ठेवून आपल्याला प्रगती करता येणार नाही हे खरं होतं आणि आहे, असं मान्य करायला आम्ही आजही तयार नाही.
आज का नाही? कारण आमच्या पूर्वजांना यांनी शिव्या घातल्याहेत. 'हे' लोक यांची लायकी काय? आणि कुठे जाऊन बसलेत हे' असं आणि अधिक खूप काही. पण हे सगळं आज किती योग्य याची दखल कोण घेतंय? इसवी सन. १९२७ ला यांनी असं लिहिलं... असं म्हटलं आदींचे दाखले देत आता वाद घालायचा कारण काय? तर....
अरेरे... चुकलंच ... एकदा झूल पांघरली की असे कारणं विचारायचे नसतात. मग फक्त आपले आणि परके , आतले आणि बाहेरचे...
हे एवढं कमी होतं म्हणून की काय... ह्या लोकांनी ज्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाला, विवेकवादाला प्राधान्य द्या असा संदेश दिलाय त्याचे सुद्धा असेच गट आम्ही बनवलेत. ज्यांनी ग्रंथ किंवा शब्द प्रमाण मानू नका तर त्या मागचा संदर्भ पाहा असे सांगितले त्यांचे अनुयायी (?) सुद्धा आता त्यांचा ग्रंथ प्रमाण माना आणि त्यांनी लिहिलं तेच प्रमाण अशी आग्रहाची भूमिका घ्यायला लागलेत.
मुळात ह्या नवीन विचाराच्या लोकांनी आपला मेंदू कुणाकडेही गहाण टाकायला विरोध केला आहे. आज आम्ही मात्र त्यांच्याच पायाशी आमचा मेंदू गहाण टाकतोय.
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात जनार्दन वाघमारे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात.
एक छान उदाहरण आठवतंय. अमरावतीला संत गाडगेमहाराजांची समाधी आहे. त्यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त तेथे मोठा कार्यक्रम होतो. मोठी शोभायात्रा निघते. जन्मभर 'देव दगडात नाही, दरिद्री नारायणाच्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे, त्याची सेवा करा असे सांगणारे गाडगे बाबा. लोक त्या दिवशी त्यांनी वापरलेल्या गाडीची पुजा करतांनी मी पाहिलेत.
कुणाचा विचार काय होता याचेशी आम्हाला काही सोयरसुतक नाही. आम्हाला तर बस आपले आणि परके कोण हे पाहून; विरोध किंवा जयजयकार करण्यात जास्त रस दिसतो.
इतरांचं सोडा मात्र आपण ज्यांना आदर्श मानतो किमान त्यांचं तरी चरित्र किंवा त्यांचं लिखाण आपण वाचतो का? ह्या बद्दल धक्कादायक माहिती मला मिळाली तेव्हा, जेव्हा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नावानं रान उठवल्या जात होतं. त्यावेळी भर रस्त्यावर अर्वाच्य शिव्या देणार्या कार्यकर्त्याला जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल ५ प्रश्न विचारले तरी सुद्धा बरोबर उत्तरे देता आली नाहीत.
सावरकरांना मानणार्या लोकांना मी 'एवढं' सोडून सावरकर मान्य असं म्हणताना निदान ऐकलं तरी आहे. बाकी सामान्यतः सर्वत्र आनंदच असतो.
एवढं सांगून नेमकं पोहोचायचं कुठं आहे? तर आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. तुम्ही सांस्कृतिक भारताचा अभिमान बाळगणारे असा किंवा नव्याने अस्तित्वात आलेल्या भारताचे नागरिक असा, या दोन्ही विचारसरणीत आपल्या विरोधी मताबद्दल आदर बाळगण्याची परंपरा आहे नव्यासाठी हे आधुनिक मूल्य आहे असं म्हणूया. तर या आपल्या विरोधी मताचं नेमकं म्हणणं तरी काय आहे किमान तेवढं ऐकातरी !
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित.
नीलकांत
प्रतिक्रिया
12 Apr 2008 - 7:05 pm | स्वाती दिनेश
दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले .
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित.
हे अगदी पटले.
स्वाती
12 Apr 2008 - 7:36 pm | आनंदयात्री
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं.
काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट.
...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात ....
या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर..
(बर्याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्या बाजुमुळे व्यथित )
-आनंदयात्री
12 Apr 2008 - 7:51 pm | धनंजय
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.
12 Apr 2008 - 7:52 pm | प्रमोद देव
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.
अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत.
दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले.
तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
12 Apr 2008 - 10:11 pm | अभिज्ञ
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.
अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत.
दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले.
तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
अगदि हेच म्हणतो...
आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा.
असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात.
अबब
13 Apr 2008 - 1:25 am | इनोबा म्हणे
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.
अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत.
दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले.
तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
15 Apr 2008 - 9:24 pm | गोट्या (not verified)
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे.
अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत.
दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले.
तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही.
नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद.
अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
12 Apr 2008 - 10:45 pm | आजानुकर्ण
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;)
लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत
(वाचक) आजानुकर्ण सांगवीकर
12 Apr 2008 - 10:58 pm | रामदास
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे)
वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली.
सामाजीक जाणीव जोपासणार्या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.
12 Apr 2008 - 11:40 pm | चित्रा
विचारांना चालना देणार्या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक.
वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच.
हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात.
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच.
अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/
13 Apr 2008 - 6:25 am | गुंडोपंत
अप्रतिम लेख!
नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच.
पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते.
हे लिखाण,
वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे.
अतिशय मुद्देसूद!
यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो.
हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे.
भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात.
अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत.
या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत.
अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले.
त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे.
तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले.
यावर काही लिहु शकाल का?
आपला
गुंडोपंत
13 Apr 2008 - 10:45 am | विसोबा खेचर
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्या-तिसर्याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात!
अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;)
मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;)
जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित.
क्या बात है...!
वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..!
तात्या.
13 Apr 2008 - 11:04 am | विसोबा खेचर
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ!
नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;)
त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;)
आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल!
त्यामुळे,
"आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!"
हाच एकमेव विचार उरला!
;)
असो,
तात्या.
13 Apr 2008 - 11:21 am | नीलकांत
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे.
वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला.
अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला.
भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन.
विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली.
विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या.
-------------------------------------------
कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार.
नीलकांत
14 Apr 2008 - 8:11 pm | चंबा मुतनाळ
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत.
नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले.
"आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत."
हे एकदम पटले!
झूल कधिच झुगारून दिलेला
--भ्रमरि
14 Apr 2008 - 9:47 pm | चतुरंग
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा.
(अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;)
चतुरंग
15 Apr 2008 - 12:34 pm | विसुनाना
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास.
तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.)
हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे.
आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे.
तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.
15 Apr 2008 - 1:05 pm | विदेश
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात.
या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.
15 Apr 2008 - 2:30 pm | नंदन
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
15 Apr 2008 - 6:13 pm | भडकमकर मास्तर
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)
... फार सुंदर प्रतिसाद...
15 Apr 2008 - 6:30 pm | शितल
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.
15 Apr 2008 - 10:25 pm | प्रकाश घाटपांडे
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून.
प्रकाश घाटपांडे