वैकुंठराव अगोदरच कुठेतरी निघून गेले होते. सासुबाईंनी ओठावर लावायला सायीची वाटी दिली. म्हणल्या हे लाव.तोंडावर. आणि सगळं आवरून मगच ये बाहेर. भरल्या घरात असलं रडव्या तोंडाने नांदायचे नसते. लक्ष्मी बाहेर निघून जाते अशाने.
क्रमशः
मागील दुवा : https://www.misalpav.com/node/53386
खूप गदगदून रडायचे होते पण गळ्यातले त्राणच संपून गेले होते. त्या दिवशी तशीच पडून राहिले. खाण्यापिण्याचीही वासना हरवली होती. संध्याकाळी सासूबाई नी जवळ घेतले. माझ्या पाठीवरून तोंडावरून हात फिरवला. मला माई आठवली. मला कुठे दुखले खुपले की ती ही असेच करायचे. माझ्या डोक्यावर हात फिरवत सासूबाई म्हणाल्या. खा पोरी दोन घास खाऊन घे. आता तुझे लग्न झालंय. अंगात त्राण हवं. वैकुंठरावाना सांगेन धसमुसळेपणा करू नका म्हणून. शिकशील सगळं हळूहळू.. मग मला त्यानी भाताची पेज दिली. आणि कालच्यासारखाच दुधाचा गडू दिला. म्हणाल्या हळदीचे दूध आहे. अंगदुखी कमी होईल.
हे असेच कितीतरी दिवस चालू राहिले. माईला कसे सांगू तेच कळत नव्हते.रोज सकाळी उठल्यावर तीच अवस्था असायची.
हळू हळू त्याचीही सवय झाली. शरीराला. मनाला सवय करून घ्यावी लागली. इच्छा नसताना. आपल्या शरीरासोबत काहीतरी अजिबात नको असलेलं होतंय हे कळत असताना ही.
घरी असताना बाबांच्या बरोबर कधी कीर्तनातले दोहे आर्या साक्या दिंड्या म्हणायचे. कधी भजन म्हणायचे. इथे तसे काही म्हणायला लागले की सासूबाई काहितरी काम सांगायच्या. दळण कांडण स्वयंपाकात सासूबाईना मदत करण्यातच सगळा दिवस संपणार. गाणे वगैरे नाहीच. एकदा वैकुंठराव नाटकाची तिकीटे घेऊन आले. गंधर्वांचे नाटक होते. संगीत स्वयंवर. बाल गंधर्वांची नाथ हा माझा म्हणतानाची तान ऐकली. त्या स्वर्गीय आवाजाने माझे भानच हरपले. नाटकात मला रुक्मिणीच्या जागी मी स्वतःच दिसायला लागले. कृष्णाच्या प्रेमात पडलेली रुक्मिणी. कृष्णासारखा सखा असलेली रुक्मिणी किती भाग्यवान ना.... नाटक संपले तरी मी त्याच तंद्रीत होते. घरी येतानाही माझ्या डोळ्यासमोर तो मोठा आंबाडा असलेली रुक्मिणीच होती काय तो तीचा भरजरी शालू, काय तीचे ते चालणे तो रुबाब. आणि कृष्णाच्या नुसत्या दिसण्याने विद्ध होणे, दादा ते आले ना असे विचारताना तीचे ते लाजणे. गातानाचा तो आवाज. शालूपेक्षाही मखमली. नाथ हा माझा हे पद माझ्या डोक्यातुन जात नव्हते.
असलं आयुष्य पाहिजे.
रुक्मिणीला गाता आली तशी तान आपल्याला यायला हवी. मी गुणगुणते. काम करताना. अंगण लोटून काढताना. माझ्यातच मग्न. खूप आनंद वाटत होता. गालावरून मोरपीस फिरवल्यासारखे. घरी असताना कीर्तनाच्या आर्या गायचे तशी मी गातेय. नाथ हा माझा मोही खला..शिशुपाला भारी झाला..... नाथ हा.... म्हणताना ना वर जशी आवाजाची फिरक आहे अगदी तश्शी जमली मला. मी तर उडीच मारली. कित्ती मस्त मज्जा ना. मी पुन्हा ती ओळ गायली. नाथ हा माझा....... माझ्या गळ्यातुन अगदी हुबेहूब तश्शीच फिरक आली. सूर अगदी खणखणीत पक्का लागला. बाबा असते समोर तर त्यानी नक्की मला दोन रेवड्या दिल्या असत्या बक्षीस म्हणून. नाथ हा माझा.... गळ मस्त फिरतोय. अगदी वरच्या सप्तकातला गंधारही सहज येतोय गळ्यातून. आता मध्यम आणि मग पंचम.... गाताना माझे डोळे मिटले आहेत समोर कृष्ण दिसतोय. आणि भरजरी शालू नेसून मी उभी आहे. सोबत ऑर्गनचा स्वर.एक छान तान गंधारापासून ते एकदम थेट वरच्या सप्तकातल्या पंचमा पर्यंत. अगदी आकाशापर्यंत.शिशुपाला म्हणताना पोहोचलाय माझा स्वर. वीज चमकावी तशी मी गाते. आणि खाडकन काहीतरी गालावर आदळले. तोल जाऊन मी खालीच पडले. डोळ्यासमोर अंधारी आली.कानात एक प्रकारचा सुन्न करणारा आवाज. रातकीडा सतत वाजत रहावा तसा. . काय थेरं चालवलीत ही. वैकुंठरावांच्या कर्कश्श आवाजाने माझे डोळे उघडले. नायकीणी नी गायचं असते गाणे. हा असला नटवेपणा चालणार नाही या घरात, फालतू गाणं बजावणं दारिद्र्याची लक्षणे, तरी आईला सांगत होतो. की कीर्तनकाराची मुलगी घरात नको म्हणून. चला जा आत माजघरात. तुमचं गाणं घाला चुलीत. पुन्हा जर गाताना दिसलात तर जीभ हासडून ठेवेन. काय समजलात. भरल्या घरात ती दरिद्री लक्षणे नकोत.
मला कय चुकले तेच कळत नव्हते. बाबा असते तर माझी तान ऐकून इतके आनंदी झाले असते की त्यानी बंदा रुपया दिला असता चांदीचा. गाणे तेही नाटकातलेपद म्हणण्यात काय चूक आहे तेच कळत नव्हते.
मला भोवळ येत होती. कानात दडे बसले होते. आणि वैकुंठरावांचा तो आवाज घुमत होता. कोणीतरी मला अंगणातून आत नेले. माजघरात भिंतीशी बसवले.पाणी पाजले. मी तिथेच सुन्न बसून राहिले.
आपले गाणे म्हणणे आता संपले. इतकेच काय ते कळाले.
दिवसभर घरातले आणि रात्री शेजेवरले काम. हेही काम आणि ते देखील काम.
कधीतरी मी ऋतूमती झाले. सासूबाईनी बायकाना बोलावून मला नहाण केले.
मग काही दिवसातच मला समजले की मला दिवस गेले आहेत. अवघ्या अकरा वर्षांची होते मी तेंव्हा. दिवस जाणे म्हणजे काय हे ही कळत नव्हते.
मग एक दिवस ओटीभरण केले. खास छकडा घेऊन बाबा मला न्यायला आले होती. माईदेखील पोटुशी होती. त्यामुळे तीला यायला जमले नव्हते. मी घरी आले.काही दिवस शरीराला आराम मिळाला.माई अवघडलेली होती. तीला बिचारीला त्रास होतोय ते मला कळत होते. पण मलाही थोडा आराम मिळाला. घरातल्या कामाचे काही वाटत नाही.पण वैकुंटरावांच्या त्रासापासून काही दिवसतरी सुटका झाली.
क्रमशः
प्रतिक्रिया
27 Dec 2025 - 11:53 pm | विजुभाऊ
पुढचा दुवा https://www.misalpav.com/node/53389