माईदेखील पोटुशी होती. त्यामुळे तीला यायला जमले नव्हते. मी घरी आले.काही दिवस शरीराला आराम मिळाला.माई अवघडलेली होती. तीला बिचारीला त्रास होतोय ते मला कळत होते. पण मलाही थोडा आराम मिळाला. घरातल्या कामाचे काही वाटत नाही.पण वैकुंठरावांच्या त्रासापासून काही दिवसतरी सुटका झाली.
क्रमशः
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53387
मला डोहाळ्यांचा त्रास व्हायला लागला. काहीही खाल्ले की पोटात टिकत नाही. कसली कसली स्वप्ने पडायला लागली. स्वप्नात कोणीतरी मला चाबकाने फोडून काढतंय, तर कधी सगळीकडून कोल्ही कुत्री मला ओरबाडून खाताहेत तर कधी एका झाडाचे मूळ माझ्या गळ्याला धरू पहात आहे अशी स्वप्ने पडायला लागली. स्वप्न पडेल या भीतीने झोपायचीही भीती वाटू लागली. कुणीतरी पिंगळे गुरुजींकडे माझी पत्रीका मला घेऊन गेले.त्यानी सांगितले की हीच्या पोटात घराण्याचा मूळपुरूष जन्माला येणार आहे. आणि ही त्याची चिन्हे आहेत.मला स्वतःचा राग राग येवू लागला. हे असले कसले अभद्र डोहाळे. कावेरीच्या मोठ्या ताईला स्वप्नात कुबेर वृक्ष दिसला होता. तीला तर नाव ही केली होती डोहाळे जेवणाच्या वेळेस कित्ती आनंदी होती ती. झोपाळ्याच्या वेळेस तर तीने स्वतः गाणीही म्हंटली होती.डोहाळे चांगले असतात. रामायणात कौसल्येला डोहाळे लागले होते. तीला स्वप्नात ऐरावत दिसायचा पांढरा शुभ्र.म्हणे. कीर्तनात बाबा सांगायचे हे. आणि मग रामाचा जन्म झाला.
पण मग आपल्याला का असले हे ......... कौसल्येचे मूल हे देवाचा अंश होता. माझ्या पोटात वाढणारा अंश वकुंठरावांसारख्या राक्षसाचा होता म्हणून तर नसेल असे होत?
त्य प्रश्नासरशी मला माझ्या गर्भातल्या त्या जीवाचा विचारही नकोसा वाटू लागला. पण काय करणार ? अष्टौप्रहर तो जीव माझ्या उदरात वाढत होता. माझ्याच रक्तमांसावर. वैकुंठरावानी माझा तसा छळ केला. त्यांचा अंश असा छळतोय.
रडण्याशिवाय माझ्या हातात काहीही नाही. मी रडत बसते. स्वतःशीच कुढत बसते.माझी स्थिती कशी कोण जाणे माईला समजते. तीने माझ्या पाठीवरून हात फिरवला . मला रडू आवरले नाही. माईच्या कुशीत शिरून मी ढसाढसा रडले. माईने मला पाणी पाजले, डोक्यावरून हात फिरवला. गालावरून हात फिरवला..मी माईला म्हणाले कशाला लावलेस माझे लग्न त्या दैत्याशी. तशीच राहिले असते तर तुला काय जड नसती झाले. चार घरचा स्वयंपाक करून का होईना जगले असते मोकळेपणाने. माई बराच वेळ काही बोलली नाही.फक्त माझ्या गालावरून हात फिरवत राहिली. म्हणाली विश्वास ठेव सड्यावरच्या रवळनाथावर सगळे चांगले होईल.मला नाही जायचे परत त्या घरी. जिथे एखादे पद म्हणणे सोडा पण श्वास देखील घेऊ देत नाहीत सुरात. लक्ष्मीचा अवमान झालेला चालत नाही गाण्याचा दुस्वास करून सरस्वतीचा धडधडीत अपमान झाला तर चालतो? हे कसले खोत. हे असूरच आहेत. ज्याला सूर आवडत नाहीत ते असूरच असतात. औरंग्जेबही तस्साच होता.
आपल्या ओटीपोटात असलेले हे मूल तसेच निपजले तर? मी त्या शंकेने धास्तावले. नकोच .हा असला जीव जन्मालाच यायला नको.
माई म्हणाली सगळे संस्कारांवर असते गं. हिरण्यकश्यपूच्या घरात प्रल्हादासारखा भक्त जन्माला आलाच ना? रावणाच्या घरात बिभीषणासारखा भक्त होताच ना.लहान मूल हे कोर्या पाटीसारखे असते. आपण त्यावर जे लिहू ते वाचले जाते. ओवी लिहीली वाचणारा ओवी वाचेल. शिवी लिहीली वाचणारा शिवी वाचेल.तुझ्यावर तुझ्या बाबानी संस्कार केले. कीर्तनाचे, रामायणाचे , महाभारताचे, ज्ञानेश्वरीचे .तुझ्या मनाचा निष्पाप्पणा त्या जीवात उतरेल. तुझा सूर त्याच्यात नांदेल.
त्या दिवशी काय झाले माहीत नाही. माईच्या शब्दांनी काय माया केली माहीत नाही. बाबाही त्या दिवशी एकतारी घेऊन बसले. त्यानी तुलसीदासांचे पद गायले.
ठुमक चलत रामचंद्र. बाजत पैंजनीया.
किलकि किलकि उठत धाय गिरत भूमि लटपटाय
धाय मात गोद लेत दशरथकी रनियाँ.
एकतारीचा नाद असेल. बाबांचा आवाज असेल , माझ्या डोळ्यासमोर धडपडत लुटूलुटू चालणारे बाळ दिसू लागले. मनगटात वळ्या घातलेले गोबरे हात दिसू लागले. त्या च्या इवलुशा पायातल्या नाजूक पैंजणांची छुमछुम ऐकू येवू लागली.मी शांतावले. आईने सांगितले तशा सगळ्या भ्रांती कुशंका त्या रवळनाथाच्या आधीन केल्या. किती तरी दिवसानी मी आश्वस्त होऊन झोपले. त्या दिवशी स्वप्नात छान पिंपळाचे कोवळे गुलाबी पान आले होते.
मग एक दिवस अचानक पोटात कळा येवू लागल्या माईचेही दिवस भरत आलेले होते. ती बिचारी अवघडलेलीच होती. दुर्गाआज्जीने खालच्या आळीतल्या गंगूमावशी ना बोलावणे धाडले.माईची सगळी बाळंतपणे गंगुमावशीनीच केली होती सुईण म्हणून. कळानी मी बेजार झाले होते. गंगुमावशीनी कसलासा पाला आणला होता. तो पाला मला खाउ घातला.गुळवेलीचा रस आणला होता. मला ग्लानी येत होती. तेंव्हा अंगातले त्राण संपताना असेच होत. हा जीव जन्माला येतानाच बापाचा वसा घेऊन आला होता. प्रसवकळानी जीवाची तगमग वाढतच चालली होती. काय झाले कळाले नाही थकव्याने आणि ग्लानीने मी अर्धवट बेशुद्धीत गेले. काहीतरी बरळत होते. आसपास गंगुमावशी दिसत होत्या अंधूक अंधूक . मग अचानक एक जोराची कळ आली. एकदा ...दुसर्यांदा. माझा नक्की जीव घेणार हा. घे बाबा , एकदाच काय तो जीव घेऊन टाक.उपकार होतील त्या वैकुंठरावांच्या राक्षसी तडाख्यातून एकदाची सुटेन तरी. त्याही क्षणी वैकुंठरावांची ती नकोशी आठवण माझी पाठ सोडत नव्हती. मग एक आणखीन जोराची कळ आली. सहन करण्या पलीकडची. जन्माला येतानाच हा जीव इतका यातना देतोय तर आयुष्यभर काय करेल मला. मला शिव्या येत असत्या तर त्या दिल्या असत्या. जोरात किंचाळावेसे वाटत होते. श्वास फुटत नव्हता. मग अचानक एकदम.काहितरी झाले. मला एकदम मोकळे मोकळे वाटले.आणि मी बेशुद्ध झाले.
माझ्या अंगावरून एक उबदार हात फिरतोय. मी त्या आश्वासक उबदार स्पर्षाने जागी होते. गंगुमावशी घंघाळातल्या पाण्याने माझे अंग पुसून काढत होत्या. माझ्या कपाळावर त्यानी कअसलासा लेप लावला होता. मला कसलासा काढा पाजला. थोडी हुशारी आली. बघीतले का बाय माझे. मुलगा झालाय. बाळकृष्ण जन्माला आलाय तुझ्या पोटी.गंगुमावशी आनंदाने मला त्या पाळण्यात ठेवलेल्या छोट्या वळकटीला उचलून माझ्या हातात देत म्हणाल्या. मला आता चांदीचे वळे हवे तुझ्याकडून.
मी तिकडे पाहिले.डोक्यावर मऊसूत जावळ.इवलेले डोळे.मिटलेलेच होते. लालचुटूक ओठ.छोटेसे नाक. इवलुली बोटे. माझ्या शरीरातून जन्माला आलेला जीव. मी भीतभीतच हातात घेतले त्याला. माझा स्पर्ष झाला आणि त्याने डोळे उघडले. माझ्याकडे डोळे भरून पाहिले. दोन्ही हाताच्या मुठी घट्ट मिटत एक जांभई दिली.हा इवलासा जीव माझ्या वर पूर्ण अवलंबून आहे त्याचे आस्तित्व माझ्यावर आहे. आत्तापर्यंत माझ्या शरीराचा भाग होता. माझ्या र्हदयाचे प्रत्येक स्पंदन याने ऐकलेले आहे.ही भावनाच काही वेगळी होती. थकव्याने माझे डोळे मिटत होते. तरीही मी त्याला हातात घेतले होते. तळहातभर असलेल्या त्या देहाचे तोळाभर वजन असेल फारतर. माझे हात थरथरत होते. माझी ती अवस्था बघून गंगूमावशीनी दुपट्यात गुंडाळून पुन्हा ठेवून दिले.त्या शिणवठ्याने मी पुन्हा ग्लानीमधे गेले.
माईची खाटही ही माझ्या शेजारीच लावली. माईलाही मुलगा झाला . अगदी दोन दिवसांच्या अंतराने.तीची खाट माझ्या शेजारीच. मामा आणि भाचा एकाच पाळण्यात ठेवले होते.
पाच एक दिवस झाले असतील अजून अंगावर पाजायला सुरवात केली नव्हती. बाळाला पाजायची इच्छाच होत नव्हती. पान्हाच फुटायचा नाही. चेहरामोहरा थेट वैकुंठरावांचा. त्याला दुरून जरी पाहिले की वैकुंठरावांची आठवण व्हायची आणि अंगावर एक शहाराच यायचा. हा त्यांचा वंश. तसाच निपजणार. मोठा झाल्यावर कोणातरी लहान मुलीला तसाच राक्षसीपणाने भोगणार. तीला गाण्याची आवड असेल तर ती पूर्ण ठार मारणार.औरंगजेबासारखी.
बाळाचा जन्म व्यतिपात योगावर झाला होता बापाने किमान तीन महिन्या नंतरच ते देखील शांत केल्या नंतरच बापाने बाळाचे तोंड पहायचे असते त्यामुळे खोतांकडचे बातमी कळवुनही कोणी विचारपूस करायला आले नव्हते.पण सासूबाईनी खोतांचा वंश पुढे नेणारा दिवा मिळाला म्हणून सोन्याचे वळे पाठवून दिले होते शकुनाचे बाळासाठी.
माईने आग्रह केला म्हणून एक दिवस धीर करून बाळाला अंगावर पाजायला घेतले. मनात इच्छा नसतानाही. पान्हा फुटत नव्हता तरीही. मला वैकुंठरावांच्या त्या वंशाला हातही लावायची इच्छा नव्हती. इतका तीटकारा भरला होता मनात. थोडावेळ छातीशी धरले. मनात आले की खोतांचा वंश आपण वाढवतोय.एक प्रकारे पापाच्या रोपट्याला पाणी घालतोय. तेही पापच की. एक क्षण मनात येवून गेले वैकुंठराव खोतांच्या वंशाचा संपूर्ण नायनाट व्हायला हवा. त्या राक्षसाचा वंशच पूर्ण नष्ट व्हायला हवा. त्या विचारासरशी मी बाळाला खाली ठेवून दिले. माई माझ्याकडे पहात होती. माझ्या मनातले भाव तीला समजले तर काय या भीतीने मी नजर चोरली. हे देखील तीच्या नजरेतून सुटले नाही. ती काही बोलली नाही. पण तीने एकवार माझ्या पाठीवरुन हात फिरवला.
संध्याकाळ झाली. मला अजूनही थकव्याने ग्लानी येत होती. तशातच डोळा लागला. रात्री कसल्याशा आवाजाने जाग आली. माईचे बाळ मधूनच रडत होते.मी माझ्या बाळाकडे पाहिले तो शांत झोपला होता.
माझ्या उशीवर थापटीमारतच माईने मला सकाळी उठवले. ऊठ गोपिके. ऊठ अघटीत घडलंय गं. ऊठ. माई अगदी काकुळतीला आल्यासारखी बोलावत होती.
अहो अहो.... इकडे या. हे बघा. सासूबाई. अहो...इकडे या. गोपिके हे बघ काय झालंय. बघ बघ.
मी पाहिले. माईचा बाळ जागाच होता. माझा बाळ अजूनही झोपलेलाच होता. रात्री झोपला होता तितक्याच शांतपणे. त्याच स्थितीमधे.माई माझ्या खांद्यावर थापट्या मारत होती. मधूनच माझ्या बाळाच्या अंगाला हात लावत होती.बाळाचे ओठ आता तितके लालचुटूक राहिले नव्हते.त्याच्या शरीरात प्राणही राहिले नव्हते. रात्री कधीतरी त्याने त्याचा ग्रंथ आटोपला होता.
मी ते ऐकून सुन्न झाले. जे झाले ते चांगले झाले की वाईट तेच कळत नव्हते . तितक्यात बाबा तेथे आले. दुर्गा आज्जीही आली.जे घडले ते पाहून ते दोघेही अवाक झाले.
माईनेच मग पुढाकार घेतला माझ्या बाळाला तीने दुपट्यात गुंडाळले. आणि बाबांच्या हातात दिले.म्हणाली हे पिशवीत घेऊन जा. सोबत हरीभाऊला घेऊन जा.बाकी याची कुठेही वाच्यता करू नका. अजून उजाडायचे आहे. नदीच्या बाजूला लहानमुलांची कर्मभूमी आहे तेथे या देहाला पुरून टाका. आणि तिथे भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय म्हणून या. पुढच्या गोष्टी आपण तुम्ही आल्यावर बोलते. माईने काहीतरी निर्णय घेतला होता.
तीने स्वतःचे बाळ माझ्या ओटीत ठेवले. म्हणाली हे तुझे बाळ आहे असे सांग सगळ्याना. जो गेला तो माझा बाळ असे सांगेन कोणी विचारले तर.
दुर्गा आज्जीला विश्वेश्वराची शपथ घातली काही न बोलण्यासाठी . हरीभाऊला इतकेच कळाले होते की बाळाचा मृत्यू झाला.
सत्तर वर्षांपूर्वीचा हा प्रसंग गोपिकाबाईना संपूर्ण आठवत होता. कधीच कोणाला न संगितलेला. आपण जो विचार केला तेच घडले. बाळ गेल्या नंतर पंधरा वीस दिवसातच प्लेगच्या साथीत ज्वर विकोपाला जाऊन वैकुंठरावानी देह ठेवल्याचा निरोप आला. खोतांचा वंश तिथेच संपला.आता खोतांच्या घरात जो आहे तो माझ्या बाबांचा वंश आहे. खोतांचा नाही. हा योगायोग म्हणायचा की मग माई म्हणाली तसे सड्यावरच्या रवळनाथानेच न्याय दिला होता मला.
बोलाफुलाला गाठ पडली असे म्हणायचे झाले तर मग आपण बोललो हे चुकलेच. त्या कोवळ्या जीवाच्या मृत्यूला आपण कारणीभूत होतो. या विचाराने गोपिकाबाई कावर्याबावर्या होतात. आपण क्षमा मागूया त्या जीवाची. बाळहत्या घडली आपल्याकडून.
गोपिकाबाई दवाखान्यातल्या खोलीत कुठेतरी आढ्याकडे पहात हात जोडले. त्याना समोर तोच बाळकृष्णासारखे जावळ असलेला लालचुटूक ओठ असलेला गोबर्या गालांचा त्या अनामीक बाळाचा चेहरा दिसत होता.त्यांच्या कडे पाहून निर्व्याज हसत होता. त्या निष्पाप डोळ्यांकडे पाहून गोपिकाबाई म्हणत होत्या . क्षमा कर रे बाळा या चुकलेल्या आईला. बाळा. करशील ना. जन्मोजन्मी ऋणी राहीन मी. त्या निषाप डोळ्यात पाहून आपल्या चुकीची कबुली द्यायची होती. गोपिकाबाईंची शेवटची इच्छा पूर्ण झाली.
त्यांचे नमस्कारासाठी जोडलेले हात विलग झाले खाली आले. माईंच्या शरीरासोबत तेही निष्चेष्ठ झाले होते.
समाप्त