नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे. पण नाही, ते "तसे करोडपती" नाहीत! त्यांची संपत्ती ही त्यांच्या गावाची वनसंपत्ती आहे आणि तिचं पैशातलं मूल्य कित्येक करोड असलं तरी त्यांच्यासाठी ती अनमोल आहे.
बारीपाडा! मांगी- तुंगी शिखरांच्या परिसरात असलेला आणि महाराष्ट्र- गुजरातच्या सीमा भागामध्ये असलेला एक आदिवासी पाडा! आज बारीपाडा हेसुद्धा मांगी- तुंगीसारखंच एक आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलं गेलेलं शिखर आहे. पण ज्या दरीतून आणि अंध:काराच्या वाटचालीतून बारीपाड्याने हा प्रवास केला तो खूप प्रेरणादायी आहे. आणि त्याचे नायक चैतराम दादा आहेत. चैतराम पवार हे इथले पहिल्या पिढीचे उच्चशिक्षित. त्या काळामध्ये खूप कष्टाने व संघर्ष करून शिकत राहिले. शाळेतही शिकत राहिले आणि वर्गाबाहेरही शिकत राहिले. एम. कॉम. झाल्यावर १९९० च्या सुमारास वनवासी कल्याण आश्रमाच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी बारीपाडा गावासाठी काम सुरू केलं. त्यांना जिथून कुठून काही चांगल्या गोष्टी मिळाल्या त्या त्यांनी गावामध्ये करून बघितल्या. सुधारित शेती, वन संवर्धन, जल संवर्धन, ग्राम विकासाचे प्रयोग आणि इतर सर्व. भारत सरकारने संयुक्त वन व्यवस्थापन अधिनियम २००५ मध्ये आणला, पण त्याच्याही अनेक वर्षं आधी इथे गाव मिळून वन व्यवस्थापन करत होतं. वन म्हणजे जंगल, जमीन, जनावर (पशुधन), जल आणि जन असं 5 J वर त्यांचं काम सुरू वाढत गेलं.
हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल.
थोडा विचार करून पाहा! ज्या गावात कोणीच शिकलं नव्हतं अशा गावात उच्चशिक्षण घेऊन आणि मोठी नोकरी मिळालेली असतानाही त्यांनी ती नाकारली! आणि तिथून पुढे विकासाची वाट धरली. त्यांना वनवासी कल्याण आश्रम, शेती व संवर्धन विषयातले इतर तज्ज्ञ, मार्गदर्शक अशी मंडळी मिळत गेली. चैतरामजी व बारीपाडा ग्रामस्थांनी अखंड प्रयोगशील राहून सगळे प्रयोग सुरू केले. दिवस, महिने वर्षं सरत गेली! काम पुढे सरकत गेलं. पूर्वीचं वन क्षेत्र तोडण्यापासून तर वाचलंच पण वाढलं. त्याचे चांगले परिणामही मिळाले. कालांतराने तर घनदाट जंगल झालं, पूर्वीच्या पिढीने बघितलेले वन्य प्राणी परत तिथे वस्तीला आले. गरजेपुरतं इंधन घेऊन संवर्धन काम सुरू राहिलं. सुधारित चूल, बायोगॅस, चार सूत्री भात शेती असं ग्राम विकासामध्ये येणारं सगळं गावाने केलं. सगळेच प्रयोग काही लगेच सफल ठरले नाहीत. अडथळेही अनेक आलेच. विरोधही झाला. पण दृढनिश्चय त्यांच्याकडे होता. त्यामुळे वाटचाल पुढे पुढे होत राहिली.
२००३ मध्ये IFAD (International Fund for Agricultural Development) ह्या आंतराष्ट्रीय पुरस्कारामुळे बारीपाडा अचानक प्रसिद्धी झोतात आलं. कालांतराने राज्यातल्या व देशातल्या पुरस्कारांची मालिका सुरू राहिली. पारंपारिक बीज संवर्धनासाठी वन भाजी स्पर्धा इथे सुरू झाली. ४५० हेक्टर वन क्षेत्रामुळे गाव सुजलाम् सुफलाम् झालं. महिला आरोग्य, महिला शिक्षण, बचत गट अशा विषयांवरही काम झालं. आणि आज तर बारीपाडा एका खूप वेगळ्या अर्थाने विकासाचा ब्रँड व ब्रँड एम्बेसेडर बनला आहे. शाश्वत विकासाचे बहुतांश निकष हे गाव पूर्ण करतं. गावात आज कोणीही भूमिहीन नाहीत. निसर्गाचा कृपावर्षाव बारीपाड्यावर होतोय. संत कबीर म्हणाले होते, "ज्यों की त्यों धरि दीनी चदरिया" (त्यांना निसर्गाने जे शुद्ध रूप दिलं ते त्यांनी तसंच परत केलं, कोणताच डाग पडू दिला नाही). अगदी त्याच प्रकारे बारीपाड्यानेही आपल्याला मिळालेलं निसर्गाचं वैभव टिकवलं. आणि पुढे वाढवलंसुद्धा.
चैतराम दादाही कालांतराने इतर अनेक गावांचे मार्गदर्शक झाले. वनवासी कल्याण आश्रमाचे संघटक आणि पुढे सरकारच्या विविध समित्यांवर संसाधन व्यक्ती असा त्यांचा पुढे प्रवास झाला. बारीपाडामध्ये झालेल्या कामाकडून अनेक गावांनी व कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेतली. चैतराम दादा व इतर कार्यकर्त्यांनीही त्या दिशेने प्रयत्न केले. केवळ एका गावात वन संवर्धन होऊन किंवा जल संवर्धन होऊन प्रश्न मिटत नाहीत. पूर्ण जिल्हात व पूर्ण प्रदेशात ते व्हावं लागतं तर दुष्काळ कमी होतो व पर्यावरणाचं शाश्वत संवर्धन होतं, असं चैतराम दादा सांगतात. बारीपाडा आज एक विकासाचं शिखर म्हणून उभं आहे; पण हे शिखर न राहता त्याचा एक महाखंड व्हावा ही त्यांची धडपड आहे. बारीपाडा ही विकेंद्रित विकासाची एक आडवाट न राहता वहिवाट व्हावी ह्या दिशेने परिसरातल्या व राज्याबाहेरच्या गावांमध्येही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
काही वर्षांपूर्वी जैव विविधतेच्या एका सर्वेक्षणामध्ये गावाच्या परिसरातील वन संपत्ती, फळ वृक्ष, पशुधन ह्यांचं मूल्यमापन केलं गेलं! ऑक्सीजन देण्याचं प्रमाण, उत्पादने, मृदा संधारण ह्या अनेक निकषांवर हे मूल्यमापन केलं गेलं. त्यामध्ये समोर आलं की, बारीपाडा परिसरातील वन संपत्तीचं मूल्य करोडोंमध्ये आहे. पण हे गावच वेगळं आहे. निसर्गाला इथे देव मानलं जातं. वृक्षांना- पशुंना आपला भाग मानलं जातं. त्यामुळे बाहेरच्या प्रभावापासून हे गाव पूर्ण मुक्त आहे. वस्तुत: इथल्या एक एक गोष्टी "बाजारात" आणल्या तर सर्व जण सहजपणे पैशांनी श्रीमंत होऊ शकतील. पण त्यापेक्षा त्यांना निसर्गाच्या श्रीमंतीला जपण्याची ओढ जास्त आहे! हे सगळं मी केलं असं चैतराम दादा कधीच म्हणत नाहीत. सगळे ग्रामस्थ आणि त्याहीपलीकडे बारीपाडा गावात आलेल्या सगळ्यांनी मिळून हे केलंय, "हे आपण केलंय", असंच ते म्हणतात.
चैतराम दादांना पद्म श्री पुरस्कार मिळाला, ह्यामध्ये खरं तर भारत सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे! आणि चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे. बारीपाड्याबद्दल "मुक्काम बारीपाडा" हे प्रकाश कामत ह्यांनी लिहीलेलं पुस्तक उपलब्ध आहे. शिवाय चैतराम पवार + बारीपाडा असं इंटरनेटवर शोधता येऊ शकतं. त्यांच्या मुलाखती व बरीच माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.
(वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 29 एप्रिल 2025)
प्रतिक्रिया
30 Apr 2025 - 12:24 am | सुक्या
छान! चैतराम दादांचे अभिनंदन!!
30 Apr 2025 - 12:35 am | चामुंडराय
नतमस्तक _/\_
30 Apr 2025 - 9:08 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद...
30 Apr 2025 - 10:56 am | प्रसाद गोडबोले
हे असे लिहिले असल्याने , ह्या लेखनावर शुभेच्छा द्याव्यात की न द्याव्यात असा यक्ष प्रश्न पडलेला आहे.
असो.
30 Apr 2025 - 5:20 pm | मुक्त विहारि
त्यांना शुभेच्छा द्या
आणि
आपण जमेल तशी मदत , वनवासी कल्याण आश्रम, ह्या संस्थेला करू शकता....
30 Apr 2025 - 2:50 pm | विअर्ड विक्स
उत्तम माहिती... त्यांच्या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती इथेच डकवली तर बरे पडेल
30 Apr 2025 - 5:23 pm | मुक्त विहारि
तिथल्या कार्यवाहकांना प्रत्यक्ष भेटा...
https://vanvasi.org/
1 May 2025 - 3:16 pm | मार्गी
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!! :)
त्यांची एक मुलाखत इथे बघता येईल: https://www.youtube.com/watch?v=mT7pMoWLUuM मुलाखतीत त्यांनी संक्षिप्त स्वरूपात त्यांचा प्रवास सांगितला आहे. शिवाय इंटरनेटवर बरेच लेख- बातम्या सुद्धा आहेतच. धन्यवाद.