नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे...
आज डॉक्टर घैसासाना जी शिक्षा होत आहे, तशी शिक्षा वकीलांना होते का? तर नाही. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता. असो...
सदर पोस्ट नोव्हे २०२४ मधली आहे...
वकील
====
काल ज्ञानेश महाराव नावाच्या एका महाभागाचे व्याख्यान युट्युबवर ऐकत होतो. या गृहस्थांनी या व्याख्यानात जाता-जाता वकीलांकडून आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांना पण यथेच्छ शिव्या घातल्या. त्यामुळे काही माझ्या पण काही आठवणी जाग्या झाल्या...
ते दिवस खुप कठीण होते. माझ्या वडिलांना दोन हार्ट अटॅक अगोदरच येऊन गेले होते. गेलेला प्रत्येक दिवस आपला, उद्याचं माहित नाही, अशा मानसिक अवस्थेमुळे गुंतागुंत वाढली होती. त्यांना जपण्यासाठी आई आणि मी काय करत होतो, हे आमचे आम्हालाच ठाऊक! त्यातच माझ्या वडिलांना एका राहत्या जागेसंदर्भातील वादासंबंधी वकीलाची नोटीस आली. ही नोटीस मुंबईला कोर्टात हजर राहण्यासाठी होती. माझ्या वडिलांना त्या जागेत कसलाही रस नसल्याने आणि तब्येतीच्या तक्रारीमुळे नाही म्हटले तरी धक्का बसलाच. कारण त्यांना एकट्याने प्रवास करु द्यायचा नाही असे बंधन डॉक्टरांनी घातले होते. त्यामुळे कोर्टात हजर कसे राहायचे हा प्रश्न होताच. शेवटी "चांगला" वकील शोधून त्याच्याकरवी कोर्टात डॉ०ची वैद्यकीय शिफारस आणि अर्ज दाखल करून त्या केस मधून सुटका करून घ्यायची असे ठरले.
माझ्या वडिलांनी बर्याच चौकशा करून एक वकील शोधला. त्याने मी तुम्हाला लवकरात लवकर मोकळे करतो, असे आश्वासन दिले. त्याने त्यासाठी तेव्हा ८०० रूपये फी मागितली जी आमच्यासाठी तेव्हा खूप मोठी रक्कम होती. पण तब्येतीसाठी कोणतीही किंमत मोजायची माझ्या आईवडिलांची तयारी असल्याने ते ती फी द्यायला तयार झाले. सुरुवातीच्या एक-दोन सुनावणीच्यावेळी अर्ज मंजूर होऊन त्यावर ऑर्डर होईल असे वकीलाने सांगितले होते. पण प्रत्यक्षात घडले वेगळेच. ८-९ महिने उलटून गेले तरी माझ्या वडिलांच्या अर्जावर निकाल होईना आणि वकीलाने आणखी पैशाची मागणी केली. तारीख पडली की वडिल बेचैन आणि सैरभैर व्हायचे आणि त्यामुळे आमचे टेन्शन वाढायचे. "आपल्याला त्या जागेशी आणि कुणाशीही काहीही देणंघेणं नाही, त्यामुळे तुमच्यावर कसलीही जबाबदारी नाही. तेव्हा उगीच काळजी करू नका" असा आई पण धीर द्यायची. पण त्याचा फारसा उपयोग होत नसे. शेवटी एक दिवस आई वडिलांच्या बरोबर त्या वकीलाला भेटायला गेली आणि त्याला पैसे घेऊनही काही न केल्याबद्दल घाल-घाल शिव्या घातल्या. त्याचा योग्य परिणाम झाला आणि त्या केसमधून माझ्या वडिलांची सुटका झाली.
दूसर्या एका वकीलाची हकीकत ऐकून हादरायला होईल. हा वकील काही कारणाने परिचयाचा होता. त्याच्याबद्दल एका कॉमन मित्राकडून कळले की त्याने आपल्या अशीलांना "केस जिंकल्याचे" खोटे निकालपत्र मिळवून दिले. ते खोटे आहे हे कळल्यावर त्या अशीलाच्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो आजारी पडून शेवटी अकाली दगावला.
आणखी एका माहितीमधल्या व्यक्तीला एका कौटुंबिक समस्येमध्ये कायदेशीर बाजूबद्दल सल्ला हवा होता. त्या व्यक्तीला वकीलाने आपल्या वृद्ध आणि आजारी आईवर खोटी केस ठोकायचा सल्ला दिला. वर सांगितले की केस फक्त लांबवत राहायचे, मग त्यात आई खचून मरून जाईल आणि सगळे प्रश्न सुटतील...
अलिकडे युट्युबमुळे न्यायप्रक्रियेचे जवळून दर्शन घडते. न्याय मिळणे हा हक्क असण्यापेक्षा "भीक मागण्याची" गोष्ट आहे असे काही दावे बघून वाटू लागले आहे.
प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात सर्व संकेत धुळीला मिळवणारे वकील, विशेषत: सरन्यायाधीशांच्यावर गुरकावणारे वकील (Mathews Nedumpara) बघितले की विकृत, भावनाशून्य, विधीनिषेधशून्य असणे यशस्वी वकील बनण्याची पूर्व-अट असावी असे वाटू लागले आहे.
आजकाल एखादा वकील काही कारणाने तडफडतांना दिसला तर मला खूप आनंद होतो. समाज जेव्हा वकीलांना त्यांच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा करेल तेव्हा समाजाचे हरवलेले स्वास्थ्य परत मिळायला मदत होईल.
प्रतिक्रिया
16 Apr 2025 - 5:20 pm | माहितगार
अशा वाक्यांबाबत साशंकता वाटते.
मला विशेषतः राज्यसभेतील आणि अंशतः लोकसभेतील वकिलांच्या आणि विवीध पक्ष प्रवक्ते वकीलांच्या पडद्यामागचे रोल्स काय असतात याचे बरेच कुतुहल आहे ( irrespective of political parties)
16 Apr 2025 - 5:21 pm | माहितगार
माझा कालपासून लेख सदरात लेख प्रकाशित होत नाहीए आता प्रयत्न करून बघतो.
17 Apr 2025 - 6:06 am | सोत्रि
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ह्या लेखातील 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल. तुम्ही करत असलेलं इइजीमापन तंत्रज्ञानाने केलेले ध्यान आणि स्वरैक्य ध्यान यांची परिणामकता वाढवायचा प्रयत्न करावा लागेल.
- (मुमुक्षु) सोकाजी
17 Apr 2025 - 7:52 am | युयुत्सु
श्री० सोकाजी
प्रतिसादाबद्दल आभार!
मी नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 'सर्वात महत्वाचे' आणी 'तात्पर्य' फेल गेलं म्हणावं लागेल हा निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतो. त्याची कारणे येणे प्रमाणे-
० आपण माझे ध्यानमार्गातले गुरु/मार्गदर्शक नसल्याने मी आपले वरील मूल्यमापन विचारात घेऊ शकत नाही. एखाद्या "तोट्यामुळे", "अपयशा"मुळे एखादे तंत्र्/उपचार फेल गेलं असं म्हणणे अपरिपक्वतेचे लक्षण आहे.
० पूर्णपणे निर्विकारी मन:स्थिती हे माझे साध्य नाही. त्यात व्यावहारिक अडचणी (आणि धोके) असतात याची तुम्हाला कल्पना नसली तरी मला आहे. शिवाय एकदा मी राग नाहीसा होणे म्हणजे काय ते चांगले अनुभवले आहे. याबाबतीत मी "अनुभवी साधकांपेक्षा" एखादा न्युरो सायंटिस्ट काय म्हणतो याला जास्त महत्त्व देईन.
० बरेच लोक आयडीयल आणि ऑप्टीमल यात दोन संकल्पनांमध्ये गल्लत करतात. एखाद्याचे आदर्श वजन ७०-८० किलो असायला हवे पण त्याने जर त्रास वाढणार असेल तर त्या आदर्श स्थितीला अर्थ नाही. मग ५-१० किलो किंवा जेव्हढे कमी करणे शक्य आहे तेव्हढे कमी करणे पण शहाणपणाचे ठरते.
. हा प्रतिसाद शक्य तितक्या सौम्य आणि सभ्य भाषेत देऊ शकलो ते ध्यानाने प्राप्त झालेल्या सिद्धींमुळेच...तेव्हा माझ्या ध्यानसाधनेबद्दल तुम्ही निश्चिंत असावे ही विनंति.
17 Apr 2025 - 10:58 am | सोत्रि
ओके, ह्या स्पष्टीकरणबद्दल धन्यवाद.
ही भूमीका आधिच माहिती असती तर माझा आधिचा प्रतिसाद दिला नसता, त्यामुळेच निष्कर्ष घाईघाईत काढलेला वाटतोय.
- (समंजस) सोकाजी