मडिकेरी ( कूर्ग ) - एक धावती सहल

कंजूस's picture
कंजूस in मिपा कलादालन
1 Apr 2024 - 5:53 am

मडिकेरी - एक धावती सहल

मागच्या महिन्यात कर्नाटकातील चिक्कमगळुरु येथे जाण्याचा योग आला. आता मार्चमध्ये उडुपीला एका समारंभात जायचे होते. त्याला धरून थोडे मडिकेरी फिरून आलो. दोन्ही ठिकाणं कॉफीच्या मळ्यांसाठी नावाजलेली आहेत. ८०० ते १००० मिटर्स उंचीवर डोंगर उतारावर आणि उंच झाडांच्या सावलीत कॉफीची झाडे चांगली वाढतात. पाऊस जास्ती लागतो. त्यासाठी पोषक वातावरण इथे आहे. विशेष म्हणजे कॉफीच्या झाडसाठी डोंगरावरची झाडे कापून टाकावी लागत नाहीत. तसे चहा लागवडीचे नाही. एकूण हा भाग रम्य आहे. आम्ही मंगळुरूला रेल्वेने उतरून बसने मडिकेरीला गेलो. तिथे दोन दिवस राहून परत बसने मंगळुरूमार्गे उडुपीला पोहोचलो. कोस्टल रोड छान मोठा आहे. वाहने वेगात जाऊ शकतात. मंगळुरू ते उडपी ६६ किमतीचे अंतर बसने सवा तासांत कापले. (मागच्या महिन्यात उडुपीला राहून मल्पे बीच पाहिले होते. इकडे मट्टु बीच सहा किमीटरवर, काउप बीच अठरा किलोमीटर अंतरावर आहे. शहरात बरीच हॉटेल्स आहेत. या वेळेस श्रीकृष्ण मठाच्या आवारात राहिलो. )

जाण्याअगोदर यूट्यूबवर काही वाडिओ पाहून घेतले. या साईटवर चांगली माहिती मिळाली.
Thrillophilia ....25 Best Tourist Places in Madikeri
यातल्या बऱ्याच ठिकाणांमध्ये आवड नव्हती.
इरप्पू आणि अबी या धबधब्यांना भेट देणे उपयोगाचे नव्हते कारण मार्च महिन्यात पाणी कमी असते.
भागमंडला+तलकावेरी ४३ किमी दूर मडिकेरीच्या पश्चिमेस आहे. याच रस्त्यावर ग्लास ब्रिज आहे.
कुशालनगरा(तिबेटी वस्ती आणि मंदिर), निसर्गधामा (मुलांसाठी बाग), दुबारे ( हत्ती पाहणे) या तीन जागा मडिकेरीच्या पूर्वेला मैसुरू रोडवर साधारण तीस किमी अंतरावर आहेत.
राजाज टूम (थडगे समाधी)२ किमी, अबी (कोदवू भाषेत धबधबा)फॉल्स ८ किमी उत्तरेस आहे.
राजाज सीट एक किमी दक्षिणेकडे आहे.
ओंकारेश्वर टेंपल आणि मडिकेरी फोर्ट ( पॅलेस आतमध्येच आहे) हे बस स्टँड पासून तीनशे मिटर्स इतके जवळच आहे. यास लागूनच पोस्ट ऑफिसची इमारत आहे.
का जावे: सुटी घालविण्यासाठी थंड हवेचे धार्मिक नसलेले उंचावरचे ठिकाण म्हणता येईल.
कसे जावे : मंगळूरू येथे रेल्वे किंवा विमानाने गेल्यावर पुढील १४० किमी मडिकेरीला रस्त्यानेच जावे लागते. मंगळूरू - बंटवाल - पुत्तुर - सूल्या - मडिकेरी मार्गे मैसुरू बसेस सतत असतात. सूल्यापासून पंचवीस किमी गेल्यावर नंतरचे पंचवीस किमी घाट चढून ११०० मिटर्स उंचीवर मडिकेरी आहे. रात्रीचे तापमान २३° सेंग्रेडहोते. दिवसा २७°. बेंगळूरू -मैसुरू-मडिकेरी असा २५० किमीटरसचा रस्ता पडतो. म्हणजे तिकडूनही सहल पुरी करता येईल.

राहाणे कुठे : मडिकेरी बस स्टँड, फोर्ट यांच्या आजुबाजूला बरीच हॉटेल्स आहेत. सभोवार बघितलं तर डोंगर उतारावर अनेक हॉटेल्स दाटीवाटीने उभी दिसतात. शिवाय विविध रस्त्यांच्या दोन्ही बाजूस कॉफीमळे (इस्टेटस) आहेत त्यात होम स्टे आहेत. आमचे फिरणे स्थानिक बसेसनेच होत असल्याने शहरातील हॉटेल्स शोधतो.

खाणे : दूरच्या किंवा इस्टेटमधील होम स्टेमध्ये त्यांचीच खानावळ असते. शहरात पर्याय बरेच असतात. फोर्टासमोरचे शांती सागर वेज हॉटेल चांगले आहे. येथे इडली, वडे, डोसे, भजी चांगली मिळतात परंतू एकूणच उडपी,मंगळूरू , मडिकेरी, चिक्कमगळुरू भागांत मुख्य शाकाहारी जेवणाची वाट लागते. अत्यंत बेचव आमटी भाजी असते. एक डाळीचं पातळ तिखट पाणी, आणखी एक जरा तिखट पाणी आणि भोपळ्याच्या फोडी घातलेलं आणखी एक तिखट पाणी अधिक भात हा प्रकार. भाजी म्हणजे भोपळ्याची मोहरी खोबरं घातलेली बेचव भाजी. कोशिंबीर म्हणजे बीट, कांदा खोबरं मिक्स. एक खिरीची वाटी. पोळी नाही. कुठे असलीच तर जाड रोडगे असतात. पुऱ्या कडक असतात. बाहेर दुकानातून पाव लोणी घ्यावे तर सॅन्डविच ब्रेड आणि अमुल बटर कुठेही मिळत नाही. मडिकेरीत 'कोदवू' लोक राहात होते. त्यांच्या पद्धतीचे खाणे आणि जेवण देणारी हॉटेल्सही बरीच दिसतील. यांचा मुख्य भर पोर्क डिशेस असतो.

फिरणे, मडिकेरीतील भटकंती : दूर दूरच्या होम स्टेमध्ये राहाणारे (बेंगळुरूहून येणारे) आपल्या कारनेच येतात त्यामुळे फिरण्याचा प्रश्न नसतो. कार, बाईक रेंटल मिळतातच. मुंबई पुण्याकडून येणारे मराठी लोक बरेच दिसले. ते टॅक्सी भाड्याने घेऊन फिरतात. आम्ही एसटीनेच फिरतो. आणि ती वाहन व्यवस्था तिकडे फारच चांगली आहे. बसेस,बस डेपो, आणि त्यातील कॅन्टिनस स्वच्छ आहेत. भरपूर बसेस असतात. मडिकेरी भाग संपूर्ण डोंगराळ आहे. सलग शंभर दोनशे मिटर्सचा सरळ सपाट रस्ता सापडणार नाही. ( चिक्कमंगळुरूत तसे नाही.खूप छान शहर आणि बाजाराचे रस्ते दिसतात.) सतत वळणावळणाचे चढउताराचे घाट आहेत.
सकाळी तलकावेरी , भागमंडला बसने जाऊन पाहून आलो. पावसाळ्यात इथे जाणे योग्य. आता पाणी नव्हते. ( कन्नडा भाषेत 'तले' म्हणजे माथा) भागमंडला येथे भगंडेश्वराचे देऊळ आहे आणि दोन नद्यांचा संगम आहे.
आम्ही शहरातीलच फोर्ट, ओंकारेश्वर आणि राजाज सीट पायी फिरत पाहिले.
राजाज सीट ही छोटीशी बाग सर्वात चांगली जागा आहे. फुले भरपूर. शिवाय रोपवे आणि रॉकेट झोपाळा तरुणांना नक्की आवडेल. छोटी टॉय ट्रेन बंद होती. सकाळ संध्याकाळी वेळ घालवायला उत्तम.

इतर माहिती : वर दिलेल्या साईटवर चांगली माहिती दिलेली आहे. गाईडची गरज नाही. 'कॉफी इस्टेट टुअर' हवी का म्हणून कुणी विचारतात. त्यात बाग आणि मसाल्याची झाडे दाखवतात. आपण प्रवास करतानाच वाटेत दोन्ही बाजूस रबर, कॉफी,वेलदोडे, नारळ, ताड, सुपारी, फणस, यांची गच्च झाडी दिसतच राहाते. मडिकेरी हे कोदावू लोकांचे वसतीस्थान. ब्रिटिशांनी कूर्ग नाव ठेवले होते त्याला आता कोडगू म्हणतात. मरकेरा या नावाचे मडिकेरी झाले आहे. हॉकी खेळाचे बरेच खेळाडू इथले असत. सैन्यात जाणारे लोकही फार असत. ती माहिती इतरत्र मिळेलच. चार दिवस रेंगाळण्यासाठी मडिकेरी छान आहे.
मनोरंजन करण्यास भरपूर वाव आहे, फक्त वेळ आणि पैसे हवेत.

फोटो १
राजाज सीट जाण्याचा मार्ग रूट

फोटो २
तलकावेरीकडे ,४३ किमी

फोटो ३
मसाल्याची दुकाने

फोटो ४
ओंकारेश्वर वरून

फोटो ५
ओंकारेश्वर तलाव.

फोटो ६
राजाज सीट. इथे राजा बसून सूर्यास्त पाहात असे.

फोटो ७
राजाज सीट बागेतून दिसणारे दृष्य.

फोटो ८
वेलीची कमान, राजाज सीट बाग.

फोटो ९
कोटे महागणपती मंदिर, मडिकेरी किल्ला.

फोटो १०
मडिकेरी किल्ल्यातील राजाचा महाल. रंगकमामुळे आतून पाहता आला नाही. खूप मोठा आहे.

फोटो ११
मडिकेरी फोर्ट मधील दोन हत्ती पुतळे.

फोटो १२
किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारा मडिकेरी शहराचा भाग.

फोटो १३
तलकावेरी प्रवेशद्वार. मोठी वाहने, बसेस इथे थांबतात. येथून फक्त पाच मिनिटांवर कावेरी उगम मंदिर आहे. लहान वाहने अगदी पुढे जाऊ शकतात.

फोटो १४
प्रवेशद्वार, मडिकेरी फोर्ट.

फोटो १५
माहिती पाटी.

फोटो १६
या वेलीची फुले मडिकेरीमध्ये जागोजागी दिसतात.

फोटो १७
बेगम बहार नावाची झुडपे राजाज सीट बागेची शोभा वाढवतात.

फोटो १८
हत्ती पुतळा, राजाज सीट पार्क.

फोटो १९
फक्त दोन फुटी उंचीचे कॉफीचे झाड, फुलांचा बहर. पोस्ट ऑफिसच्या आवारात दिसले

फोटो २०
उडुपी कृष्ण मंदिर आवारातील विद्यावरिधिनी तीर्थ गेस्ट हाऊस इमारतीच्या रुममधून दिसणारे दृष्य. समोरच्या रस्त्याला कार स्ट्रीट म्हणतात. येथे कृष्णाची एक मूर्ती रोज वाजत गाजत फिरवतात.कौलारू मंदिर चंद्रमौलिश्वराचे. मागचा घुमट रथाचा आहे. गोपूर कृष्ण मंदिराचे आहे.

उडुपी श्रीकृष्ण मंदिराच्या आवारात रथमार्गावर संध्याकाळी श्री कृष्णाची मिरवणूक निघते.
Video link
https://youtu.be/xDY-hEua0DI

____________________________________

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Apr 2024 - 11:34 am | राजेंद्र मेहेंदळे

अरे वा!! मस्त सहल आहे.

मीं २०१९ डिसेंबरात बंगलोर-मैसुर-बांदीपुर-कूर्ग-बंगलोर अशी सहल केली होती. ईथे मडीकेरी नाव बघुन जरा बुचकळ्यात पडलो, पण मग वाचताना खुलासा झाला. ओंकारेश्वर मंदिर ग्रहणामुळे बंद होते, पण राजाज सीट आणि ईतर ठिकाणे बघितली. किल्ला बघितला नाही, कदाचित ट्रुरिस्ट कारवाले त्यात फारसे ईंटरेस्टेड नसावेत किवा पर्यट्कांचे अनुभव बघुन त्यानी टाळला असेल. बस/ट्रेन करत जायचे तर नीट माहीती पाहीजे आणि हाताशी जरा वेळ हवा, म्हणजे एखाद दिवस ईकडे तिकडे झाला तरी चालतो. एकदा स्वतःच्या गाडीने कोस्टल कर्नाट्क करायची ईच्छा परत बळावली. फक्त २-३ ड्रायव्हर पाहीजेत, म्हणजे एकावरच ताण येणार नाही.

ट्रुरिस्ट कारवाले त्यांच्या फायद्याचे टुअर आयोजन करतात. कोणती ठिकाणी दाखवायची आणि कोणत्या हॉटेलात खायला जायचे, कोणत्या दुकानात खरेदी करायची वगैरे.

मस्तच!बेगम बहार पहिल्यांदा पाहिलं ऐकलं.इकडे मिळत का पहावं लागेल.सुंदर फुले आहेत.

गोरगावलेकर's picture

1 Apr 2024 - 1:39 pm | गोरगावलेकर

नेहमीप्रमाणे ठिकाणाची सविस्तर माहिती. फोटो आवडले.

कर्नलतपस्वी's picture

1 Apr 2024 - 6:41 pm | कर्नलतपस्वी

निळी फुले बहुतेक विष्णूप्रिया असावीत.

आवडला व बकेट लिस्ट मधे दाखल झाला.

मस्त एकदम. फोटो आणि नेमके आणि नेटके वर्णन आवडले.
शाकाहारी जेवणाची वाट कोकणात देखील लागलेली आढळते, अपवाद वगळता सर्वत्र कोबीची भाजी, चवळी किंवा वाटाणा उसळ असेच खायला मिळते.
मडिकेरीचा किल्याची निगा उत्तम राखलेली दिसते. नुनिझने केलेल्या विजयनगरच्या वर्णनात बहुधा मडिकेरीचा उल्लेख आहे.

हे ठिकाण निवास आणि जेवण यासाठी ठीकठाक वाटले. मडीकेरीच्या मुख्य बाजारात उडुपी द व्हेज हे एक चांगले उपहारगृह वाटले.

मयुरा व्हॅली व्ह्यू आणि कर्नाटक सरकारची इतरही ठिकाणची पर्यटक निवासी संकुल चांगली असतात. त्यांना अतिशय मोक्याची जागा मिळते जी सहसा खाजगी व्यावसायिकांना मिळण्याची शक्यता नसते. हीच स्थिती इतरही राज्यात असते ज्यामुळे बऱ्याच वेळा जुने प्रशस्त बंगले निवासासाठी मिळू शकतात.

कुमार१'s picture

9 Apr 2024 - 9:53 am | कुमार१

अरे वा!! मस्त सहल आहे.

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2024 - 5:45 pm | चौथा कोनाडा

व्वा सुंदर भटकंती आणि प्रचि !
माहिती दिलीय उसका का तो जवाब नहीं !

कुर्ग ची चार वर्षांपुर्वी ही सहल केली होती.
बहुतेक सर्व स्थळे पाहिली होती.
तळकावेरीचे मंदिर अप्रतिम आहे !
राजा बैठक बेहद्द्द आवडली मला !
इथंनं सुर्यास्त पाहणं फारच सोयीस्कर आहे !
(महाबळेश्वरचा सनसेट पॉइन्ट टुकार वाटला मला)
इथून पाहिलेला खूप आनंददायी आणि संस्मरणीय वाट्ला मला !
कुर्ग अ थ वा कोडगू बेस्ट आहे फिरायला !

धन्यवाद, कंजूस जी !

कांदा लिंबू's picture

12 May 2024 - 11:35 am | कांदा लिंबू

माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः, पत्नी, दोन अपत्ये असं तीन-चार दिवस फिरण्याचा प्लॅन आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाण्यासाठी मैसूर कूर्ग मेंगलोर मुर्डेश्वर हे ठीक राहील का?

बेंगलोरच्या आसपास आणि परत बेंगलोरला परत जाणे असेल तर ....

मैसूर कूर्ग मेंगलोर मुर्डेश्वर या ठिकाणांपैकी मुर्डेश्वर आणि जमल्यास गोकर्ण प्रथम पाहावे. कारण पावसाळा तोंडावरच आहे. ही ठिकाणे समुद्राकाठी असून किनाऱ्याची मजा घेता येईल. मैसूर , कूर्ग हे बेंगलोरपासून (१२०+१२० किमी) असल्याने आणि तेवढ्याच उंचीवर (१०००मिटर्स) असल्याने फारसा फरक नाही वातावरणात फारसा फरक नाही.
कूर्ग बघण्यापेक्षा तिकडे दोन तीन दिवस रेंगाळणे अधिक आवडेल.

चौथा कोनाडा's picture

12 May 2024 - 1:02 pm | चौथा कोनाडा

तीन-चार दिवस फिरण्याचा प्लॅन आहे.

मैसूर कूर्ग मेंगलोर मुर्डेश्वर

माझ्या मते ३-४ दिवसात ही चार ठिकाणे म्हणजे धावपळ होईल.... कारण तुमच्या सोबत कुटूंब आहे... त्यापेक्षा आता २ च ठिकाणे फिरा, पुढच्या वेळी उरलेली २ .. या मुळं व्यवस्थित वेळ देऊन बघता हिंडता येईल. फार धावपळ आणि काटेकोर वेळापत्रक यामुळं सहलीचा नीट आनंद घेता येत नाही !

कंजूस's picture

12 May 2024 - 1:20 pm | कंजूस

लहान मुलांसाठी 'activity' देणारी ठिकाणं म्हटली तर.....
मैसुरूचा झू.
समुद्र किनारे ( मुर्डेश्वर/ गोकर्ण - पाच किनारे/उडुपी- माल्पे,काउप आणि मट्टू. )बाकी मुर्डेश्वरच्या पुतळ्यांत गंमत फारशी नाही. एकवीस मजली गोपुराचे आकर्षणही कमी होत आहे. कारण विविध शहरांत २५-४० मजली इमारती उभ्या राहतात आहेत.

कांदा लिंबू's picture

12 May 2024 - 9:19 pm | कांदा लिंबू

माझा बेंगलोरच्या आसपास स्वतः, पत्नी, दोन अपत्ये असं तीन-चार दिवस फिरण्याचा प्लॅन आहे

बंगळूर हून २५ मे शनिवारी सकाळी निघायचे आहे
चार दिवस हातात आहेत
२९ मे पर्यंत हैदराबादला यायचं आहे.

कंजूस's picture

12 May 2024 - 11:00 pm | कंजूस

' Not in office ' channel चे विडिओ पाहा.

चौथा कोनाडा's picture

13 May 2024 - 5:47 pm | चौथा कोनाडा

' Not in office ' channel चे विडिओ पाहा.

सुरेख चॅनेल आहे.. खुप उपयोगी माहिती आहे.
माहिती साठी धन्यवाद !

तुमच्या वाचनाला आणि बहुश्रुत ब्राउझिंगला मानलं पाहिजे.
या बाबतीत कंजूस जी रॉक्स !

बरेचदा असं होतं की हवे असलेले माहितीचे विडिओ इंग्रजी/हिंदी/ मराठीत असतातच असे नाही.

इतर भाषांत शोधावे लागतात. असाच एक DR BRO चानेल आहे . या मुलाने कन्नडामध्ये सुरू केलं आणि आता तो इंग्रजी सबटायटलही टाकतो. त्याचं वय आणि उत्साहामुळे खूप चांगले कंटेंट असते. पर्यटन चानेलच्या बाबतीत यूट्यूबरचे वय परिणाम करते.

चित्रगुप्त's picture

13 May 2024 - 6:44 am | चित्रगुप्त

अरे वा. छान भटकंती करत आहात. (एक प्रश्नः तुम्ही एकटे प्रवास करता किंवा कसे ?)
उतरत्या कौलारू छपरांची घरे हल्लीच्या शहरांमधे उरलेली दिसत नाहीत. मला ती फार आवडतात. त्यात एक कलात्मकता वाटते. तुम्ही फिरलात त्या भागात तशी घरे पुष्कळ असावीतसे फोटोंवरून वाटले. राजाचा १८१२-१४ मधे बनलेला महाल पाश्चात्य धाटणीचा वाटतो. . अर्धगोल कमानी आणि घड्याळाचा चौरस टॉवर. राजाच्या आसन-उद्यानातले हत्तीचे शिल्प अप्रतीम आहे. कातडीवरले सळ, सोंड, कान आणि सर्वच अवयव अगदी हुबेहूब.
सुरुवातीच्या बाजाराच्या फोटोत दुकानाबाहेर प्लास्टिक थैलीत ठेवलेल्या लांबट पिवळसर वस्तु, तसेच त्याशेजारी मोठ्या गोलसर वस्तु कोणत्या आहेत ?
असेच भटकत रहा आणि लिहीत रहा. पुढील सर्व प्रवासांसाठी शुभेच्छा.

प्रवास - एकटाच करतो किंवा कुटुंब.

दुसऱ्या कुटुंबाला घेत नाही कारण सहल आराखडा माझाच असतो आणि त्यात ऐनवेळी चर्चा किंवा फाटे फोडलेले मला आवडत नाहीत. अगोदर पुस्तकांतून माहिती वाचून आणि विडिओ पाहून त्या ठिकाणांच्या कोणत्या गोष्टी पाहायच्या टाळायच्या ते अगोदरच ठरवलेले असते. सर्व प्रवास रेल्वे, स्थानिक बसेस किंवा पायीच करतो. भाड्याचे वाहन टाळतो. फक्त एकदाच चिक्कमगळुरूला कार केली होती कारण ते उपयोगी होतं

फोटोत मसाल्याच्या दुकानाबाहेर ठेवलेल्या लांबट पिवळसर वस्तु म्हणजे वाळलेली शिराळी/ दोडके आहेत. पण ते तिथे का विकतात हे भाषेच्या अडचणीमुळे विचारता आले नाही.

त्यात ऐनवेळी चर्चा किंवा फाटे फोडलेले मला आवडत नाहीत.

A

मुझे परिवर्तन पसंद नही.

- कं. नारायण शंकर

;-)

चित्रगुप्त's picture

13 May 2024 - 3:35 pm | चित्रगुप्त

मलाही एकट्याने फिरायलाच आवडते. मला कोणत्याही शहरातली संग्रहालये प्रामुख्याने बघायची असतात. त्याखेरीज अगदी निर्मनुष्य, ओसाड, शहराबाहेरच्या जागा - उदाहरणार्थ शेकडो वर्षांपूर्वीच्या दफनभूमी, उत्खननच्या जागा, जुनी मंदिरे, किल्ले, प्रासाद, गिरिजाघरे, प्राचीन इमारतींचे पडके अवशेष वगैरे.
--- घरच्या मंडळींच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्यामुळे त्यांच्यासोबत गेलो तरी माझा मी एकटा भटकून संध्याकाळी सर्वजण भेटतो. भटकंतीत अगदी खास मित्र बरोबर असतील तर गोष्ट वेगळी, पण ते भाग्य गेल्या अनेक दशकात लाभलेले नाही.
ते वाळलेले दोडके स्नान करताना अंग चोळायला छान असतात. बाकी उपयोग माहीत नाही.

ते वाळलेले दोडके स्नान करताना अंग चोळायला छान असतात.

दोडके की घोसाळी ? (गिलके)

कंजूस's picture

13 May 2024 - 4:37 pm | कंजूस

गिलकेच.

शिरा नसलेले. भजी करतात ते.

अगदी आपलीच आवडणारा मित्र आणि सहलीच्या तारखा जमणे अशक्यच असते.

साधीच गोष्ट म्हणजे तंबू लावून राहण्याचे स्वप्न आहे. एकटाच राहण्याची भीती नाहीच.
परंतू तंबू लावल्यावर तो सोडून पाणी आणायला वगैरे जाणे शक्य नाही. आणि दुसरा कुणी बरोबर मिळणे (शनिवार रविवारच्या सुट्ट्या सोडून) हेसुद्धा बादच. कुटुंबाला खोलीवर सोडून जाणेही योग्य नाही. जमेल तेवढे करायचे.
मला एका अमेरिकेतल्या नातेवाईकाने सांगितले की तिकडे घेऊन गेला तंबू, आणि लावला कुठेही रानात डोंगरात असं करू देत नाहीत. परवानग्या लागतात आणि ठराविक नेमलेल्या जागीच ते लावावे लागतात. त्या बाबतीत इकडे बरंय. सह्याद्रीत कुठेही लावू शकतो.

तिकडे घेऊन गेला तंबू, आणि लावला कुठेही रानात डोंगरात असं करू देत नाहीत. परवानग्या लागतात आणि ठराविक नेमलेल्या जागीच ते लावावे लागतात.

-- ते चांगलेच आहे. कारण अमेरिकेत अस्वले, लांडगे वगैरे वन्य प्राणी असतात, त्यापासून धोका असतो. जंगले खरोखर घनदाट असतात. कँपिंगच्या जागा अगदी जंगलात असतात, तिथे संडास-बाथरूम, हँडपंप, पिण्याचे पाणी, लाकडी बाकडी, ग्रिल, नकाशे, वगैरे सोयी असतात त्यामुळे अगदी लहान मुलांना सुद्धा नेता येते आणि त्यांना बालपणापासूनच जंगलात फिरणे, रहाणे, मासेमारी, शिकार, नावा वल्हवत नदी-सरोवरातून फिरणे वगैरेंची गोडी लावता येते. रात्री मोठी शेकोटी पेटवून त्याभोवती बसून गरमागरम अन्न, चहा-कॉफी वगैरे घेत गप्पा, भेंड्या लावणे वगैरेतून कौटुंबिक आनंद घेता येतो. रात्री पायवाटेने फिरताही येते. आम्ही सहकुटुंब असे कँपिंग करत असतो, अद्भुत अनुभव असतो. मात्र अशा ठिकाणी एकट्याने जाणे मला शक्य नाही आणि योग्यही नाही, कारण काही संकट आले, तर मला तिथे काहीही करता येणार नाही.
-- 'परवानग्या' म्हणजे फक्त ऑनलाईन बुकिंग करावे लागते. जागेचे भाडे अगदी कमी असते. धबधबे, अरण्य, सरोवरे, डोंगर-दर्‍या वगैरे फिरणे त्यामुळे सर्वांना शक्य होते. रात्री जेवणानंतर अन्नाचा एक कणही जमिनीवर पडलेला नसेल याची खबरदारी घ्यावी लागते, कारण अन्नाच्या वासाने अस्वले येतात. मोठी कचरापेटी खूप वजनदार लोखंडाची असते, ती अस्वलांना उघडता येणार नाही, अशी रचना असते, त्यात सगळे खरकटे, प्लेटा वगैरे टाकायचे. एक तंबू तिथे सुरक्षा-कर्मचार्‍यांचाही असतो - (काही संकट आले तर जोरजोरात शिट्या वाजवायच्या म्हणजे ते मदतीला येतात, असे सगळे शिस्तशीर काम असते) .-- सगळे तंबू लांब लांब असतात. एकमेकांचा आवाज पोचणार नाही इतके लांब. तंबूखेरीज घनदाट जंगलात लाकडी केबिना पण आरक्षित करून रहाता येते.
-- अमेरिकेत जाण्याचा खरा फायदा शहरांपेक्षा अश्या जागी जाण्यात असतो.

मी येत्या सप्टेंबर २०-३० चे दरम्यान पुणे-मुंबई येणार आहे. त्यावेळी एक मिपा कट्टा असे तंबू लावून रहाण्याचा करुया.

परिवर्तन पसंद नही.

हाहाहा