माझी मॅट्रिक आणि आत्ताच्या एक्झाम्स.

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
21 Mar 2024 - 10:39 am

त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं!

बास,बास,बास! पिळापिळी पुरे! ह्याच लायनीवर ही सगळी पोस्ट लिहीत बसले ,तर माझी दमछाक होईल. सोप्या भाषेत मला एवढंच म्हणायचं आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या नशिबात, रोजच्या व्यवहारात परीक्षा देणं लिहिलेलंच असतं. खरं तर मला रोजच्या रोज येणाऱ्या संकटरुपी परीक्षेवर लिहायचंच नाहीये. मला लिहायचंय ॲक्चुअल परीक्षेवर. आपल्याला शाळेत घातल्यापासून ते आपल्या माथी कोणत्यातरी डिप्लोमा, डिग्रीचा शिक्का लागेपर्यंत द्याव्या लागणाऱ्या खऱ्याखुऱ्या पेपर,पेनवाल्या परीक्षेवर!

आमच्या वेळी पाडव्याच्या दिवशी पाटी पेन्सिल घेऊन शाळेत गेलं की भागत असे. परीक्षा पाटीवरच. शिक्षक प्रत्येकाच्या पाट्याच तपासायचे. हल्ली दुसऱ्या, तिसऱ्या वर्षीच शाळेत घालतात. प्ले ग्रुप,प्रिस्कूल ग्रुप,केजी अशा नावांची ती शाळाच असते. त्यासाठी सुद्धा पाल्याच्या मम्मी, पप्पांना शाळेत इंटरव्ह्यू द्यावा लागतो. शालेय साहित्याचा खर्च खूप असतो. मुलांना युनिफॉर्म असतो. साॅक्स,शूज,टाय असतो. मग पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतल्यापासून ते कंपलसरीली परदेशगमन करेपर्यंत अनेक परीक्षा द्याव्या लागतात. दहावी, बारावी, मग निवडलेल्या शाखेत ग्रॅज्युएशन. त्यासाठी एन्टरन्स एक्झाम. JEE, NEET, SAT, MHTCET, TOFEL, IELTS, GRE (एबीसी ते एक्स,वाय) अशा अनेक परीक्षा द्याव्या लागतात. ही सर्व परीक्षांची नावंही पुढच्या पिढ्यांना विचारून गोळा करावी लागली.

काही लेक्चर्स आणि क्लासेस आता ऑनलाईन असतात. मम्मी पप्पा महागडे मोबाईल्स, लॅपटॉपस् घेऊन देतात. मुलं सतत दबावाखाली, ताणलेल्या मनःस्थितीत असतात. शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणं आवश्यक असतं. नव्वद ते पंच्च्याण्णव टक्क्यांना ॲडमिशन मिळत नाही. मुलं हसणं,खेळणं, चेष्टा मस्करी करणं,टपल्या मारणं विसरून जातात. सगळ्यांचेच चेहरे लांबडे,आठ्यांच्या जाळ्यांनी ग्रासलेले होतात.

मला आमच्या वेळच्या परीक्षा आठवतात. वर्षभर हुंदडायचं आणि परीक्षा महिन्यावर आली की अभ्यास सुरु करायचा. अभ्यास पूर्ण झालेला नसायचा. पेपराला जायच्या आधी भीतीनं पोटात बर्फाची लादी ठेवलीय असं वाटायचं. सारखं "तिकडे"जावं लागायचं. पुढच्या वर्षी पहिल्या दिवसापासून अभ्यास करायचा असा निश्चय करायचा. आणि पेपर कसा का जाईना तो देऊन आल्यावर हुश्श करायचं. हेच सामान्य विद्यार्थी करायचे.

आमच्या वेळी फक्त मॅट्रिकची परीक्षा महत्त्वाची असायची. मग प्री डिग्री. त्यानंतर साईड निवडायची. आर्ट्स, कॉमर्स,सायन्स,एवढेच पर्याय. थोडी हुशार मुलंच डॉक्टर, इंजिनिअर व्हायची. नाहीतर वकील, शिक्षक किंवा बँकेत. मध्यमवर्गीय मुलांना एवढेच मुख्य ऑप्शन्स. त्यामुळे कसलाही काथ्याकूट, चर्चा, ॲप्टिट्यूड टेस्ट ही भानगड नाही. मुली बी.ए.पर्यंत शिकायच्या. लग्नाच्या बाजारात असलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार शिक्षक, इंजिनिअर वगैरे असलेला नवरा शोधायच्या. मग लग्न,मुलं.इतकं सोपं, सुटसुटीत होतं सगळं!

आपली मुलं कितवीतून कितवीत गेली हे आईवडीलांना माहीत नसायचं. मूल पास झालं एवढं पुरेसं असे. शाळेची फी दोन रुपये,पाच रुपये,दहा रुपये अशी असायची. माझ्या कॉलेज वयाच्या वेळी माझ्या वयाच्या इतर मुली थोड्या वाढत्या संख्येने काॅलेजात जायला (म्हणजे तिथपर्यंत पोचायला) लागल्या होत्या. मुलगी ग्रॅज्युएट झाली तर वरसंशोधनाच्या वेळी तिला प्रेफरन्स मिळेल ,हाही विचार पालक करु लागले होते. मुलगी ग्रॅज्युएट झाली तर नवरा मिळणं मुश्किल होईल, शिकलेली मुलगी संसार नीट करणार नाही, हे विचार हळूहळू मागे पडत चालले होते.

माझ्या बी.ए.च्या रिझल्टच्या वेळची एक गंमत आठवते. मी बी.ए.ला संपूर्ण विद्यापीठात तिसरी आले होते. पेढा देताना ही गोष्ट मी आमच्या कामवालीला अभिमानाने आणि आनंदाने सांगितली. तिनं निष्पापपणे विचारलं,"म्हणजे पास की नापास?". एकूण पास होणं महत्वाचं.

एवढं यश मिळाल्यावर,"माॅं,मैं बी.ए.पास हो गया!"असं सिनेमातल्या हिरोनं आईला उचलून, गरागरा फिरवून,सांगितल्यावर ती त्याच्यासाठी "गाजर का हलुवा" करते,तसं माझी आई माझ्यासाठी काहीतरी मस्त (म्हणजे गोड) खायला करेल असं मला वाटलं.

पण आई बाबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. त्यांनी पाठीवरून हात फिरवला. भावंडांनी हातात हात धरले. आईनं देवासमोर साखर ठेवली, हात जोडले. आणि त्यानंतर माझ्यासाठी मला आवडतात म्हणून बटाटेवडे केले. बास! एवढंच! त्यावेळी झगमगाट दाखवून सेलिब्रेशन करायची, पार्टी झोडायची पद्धत नव्हती.

बाय द वे, लहानपणी मला बटाटावडा आवडायचा. पण पुढं माझ्या करिअरमध्ये रेकाॅर्डिंगसाठी भटकंती करताना, जेवायला वेळ न मिळाल्याने मला अनेकदा वडापाव खावा लागला. त्याचा इतका वीट आला की आता मला वडा ही खावासा वाटत नाही आणि पावही खावासा वाटत नाही.

मी मॅट्रिकची परीक्षा द्यायला गेले ,तेव्हाची गोष्ट. तेव्हा एका दिवसात दोन पेपर्स असायचे. अकरा ते दोन पहिला मध्ये एक तास सुट्टी आणि तीन ते सहा , दुसरा पेपर. माझ्या मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी माझा परीक्षा क्रमांक बघायला, परीक्षेचं केंद्र बघायला घरातलं कुणीही आलं नाही. मीच ते शोधलं. परीक्षेच्या वेळी कुणीही मला केंद्रावर सोडायला आलं नाही. घरच्या मोठ्या मंडळींना नमस्कार करुन मी परीक्षेला एकटीच गेले. त्याच परीक्षेला एक मुलगी आली होती. श्रीमंताघरची वाटत होती. ती टांग्यातून आली. (त्यावेळी रीक्षा नव्हत्या.) बरोबर तिचे आईवडील दोघेही तिला पोहोचवण्यासाठी आले होते. तिचा नंबर माझ्याच वर्गात होता. तिचे आईवडील तिला वर्गात सोडायला आले. तिचा सीट नंबर त्यांनी पुन्हा पुन्हा चेक केला. मग जाताना घरुन आणलेलं लिंबू सरबत तिला प्यायला दिलं. तिच्या केसांवरुन, पाठीवरून हात फिरवला. पुन्हा पुन्हा बेस्ट लक दिलं. ते दोघं बाहेर पडले.

पहिला पेपर संपला. बरा गेला होता. खूप भूक लागली होती. आता डबा खायला म्हणून मी मैत्रीणींबरोबर बाहेर पडले. बघते तो काय!तिचे आईवडील दोघेही बाहेर तिची वाट बघत उभे होते. आम्ही सगळ्या मैत्रिणी झाडाच्या सावलीत डबा खायला बसलो. ते तिघे जण मला दिसत होते. तिच्या आईने डबा उघडला आणि तिला डब्यातलं भरवायला सुरुवात केली. तिचे वडील तिला पुढच्या पेपरासाठीचा धडा, तिच्या पुस्तकातून वाचून दाखवत होते. मग तिच्या आईने एक थर्मास उघडला. त्यातलं दूध एका कपात ओतलं. तिच्या ओठांजवळ कप नेत तिला पाजलं. इकडं वडील धडा वाचून दाखवत होतेच. मग तिच्या आईने पिशवीतून द्राक्षं काढली. ती एक एक द्राक्ष तिला भरवू लागली. मी थक्क झाले. मला तर ए व्ही एम पिक्चर्स मद्रासचा एखादा सिनेमा पाहतोय असंच वाटलं.

दुसरा पेपर सुरू झाला. एकदाचा संपला. ते तिघे मिळून टांग्यातून परत गेले.

मी घरी गेले. आईनं विचारलं ,"कसे गेले दोन्ही पेपर्स?"मी म्हटलं,"चांगले." आईनं विचारलं ,"पास होशील ना?"मी म्हटलं,"होईन."

मग आई म्हणाली,"मी जरा देवळात जातेय. दुपारी आजीसाठी दशमी केली होती. तुझ्यासाठी ठेवलीय. ती गुळांब्याबरोबर खा. गुळांबा बेतानेच घे. नाहीतर भरमसाठ खाशील. कुणी अचानक आलं तर वाढायला बरा पडतो. वर्षभर पुरायला हवा!"

या लेखात मी मॅट्रिक,टांगा,गुळांबा, दशमी सारखे अनेक आउटडेटेड शब्द वापरले आहेत. पण मी ते एके काळी माझ्या बोलण्यात वापरलेले आहेत, दुसऱ्यांकडून ऐकलेले आहेत. ते माझ्या काळातले "माझे" शब्द आहेत.

खरंच! बराच काळ लोटलाय नाही माझं लहानपण माझ्यापासून दूर निघून गेल्याला!

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

>>मॅट्रिक,टांगा,गुळांबा, दशमी सारखे अनेक आउटडेटेड शब्द

हे शब्द फक्त मुंबई पुण्याकडे कालबाह्य झालेले असतील. पुणेमुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे.

बाकी टीपीकल मराठीमध्यमवर्गीय "तेव्हा" किती भारी होतं... आता काहीच्च नाही.. चक चक टाईप लेख.
स्मरणरंजन सुद्धा धड करता येत नाही.

सौन्दर्य's picture

22 Mar 2024 - 11:21 pm | सौन्दर्य

मला वाटते प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात व जो तो आपापल्या अनुभवाला धरून लिहितो. आजींनी काही शब्द 'कालबाह्य' म्हंटले म्हणजे ते संपूर्ण जगातून निघून गेले असे नाही तर त्यांच्या स्वतःच्या जीवनात आता त्यांना ते फारसे ऐकू येत नाहीत असे आहे, असं मी मानतो.

ह्यात जर काही 'टिपिकल मराठी मध्यमवर्गीय' तुम्हाला आढळले असेल तर ते चांगलेच आहे. मला स्वतःला 'टिपिकल मराठी मध्यमवर्गीय' म्हणवून घेण्यास कोणतीही लाज अथवा भीड वाटत नाही. हे अनुभव असेच आहेत व त्यात कमीपणा वाटण्यासारखे काहीच नाही.

नमस्कार

आउटडेटेड नाहीत आमच्या घरात,गावात आजही वापरतात.

छान स्मरणरंजन.

गवि's picture

22 Mar 2024 - 11:14 am | गवि

लेख आवडला.

परीक्षा ही एक अशी चीज आहे की तिची भीती ही स्वप्न रुपात पुढेही आयुष्यभर कधीही उपटते.

जेव्हा सोबत घड्याळ नसे तेव्हा फक्त तासाचे टोल ऐकून वेळेचा अंदाज घेत पेपर देण्याच्या काळाची आठवण झाली.

काही पोरे पोरी दणादण पुरवण्या मागत असत आणि आपले टेन्शन उगीचच वाढे, तेही आठवले.

जास्त लिहिणे म्हणजे चांगले (इम्प्रेसिव्ह) ही गैरसमजूत नंतरच्या काळात दूर झाली.

नगरी's picture

22 Mar 2024 - 6:05 pm | नगरी

मी काही पाटीवर परीक्षा दिली नाही. पण साधारण अनुभव सारखाच.मस्तच झालाय लेख.
गेले ते दिन गेले.

मुक्त विहारि's picture

22 Mar 2024 - 10:12 pm | मुक्त विहारि

जेमतेम दहावी पास शेतकरी असल्याने, तुमच्या BAच्या उत्तुंग यशाचे जास्त कौतुक वाटले.

आपल्या प्रत्येकाकडे काहीना काही स्मरण रंजन असतेच, नव्हे ते असायलाच हवे. आयुष्यात मागे वळून बघताना ते पुनःप्रत्ययाचा आनंद देते.

तुमचे परीक्षेचे अनुभव आवडले, थोड्याफार फरकाने माझे देखील जवळ जवळ तसेच आहेत. दहावी एस एस सी ची माझी दुसरी बॅच त्यामुळे रोज एकच पेपर असायचा. परीक्षा सेंटर बघायला जाणे, आपला वर्ग कोणता असेल ह्याचा शोध घेणे वगैरे कामे मित्रांसोबतच उरकली. पहिला पेपर मराठीचा होता, तो लिहिताना सुरवातीला हात थरथरत होता हे आजही आठवतय. सायन्सचा एकच पेपर असायचा (जीव, रसायन व भौतिक शास्त्र). ह्या पेपरची एक गम्मत आठवते. जीवशास्त्र माझा आवडता विषय त्यामुळे तो पेपर सोडवताना काहीही चिंता नव्हती. त्यातील एका प्रश्नात शास्त्रीय नावे विचारली होती, बेडकाला 'राणा टायग्रिना' मांजरीला 'फेलिक्स डोमेस्टिकट्स' ही नावे आहेत हे लक्षात होते. आमच्या वर्गावर असलेली निरीक्षका आमच्याच कॉलोनीत राहणाऱ्या एक बाई होत्या. त्या मला येऊन, मी न विचारता काही वेगळीच (चुकीची) नावे सांगू लागल्या. त्या इतक्या आग्रहाने मला माझी उत्तरे बदलण्यास सांगू लागल्या की मला त्याचा त्रासच झाला. मी माझी उत्तरे बदलली नाहीत, पण ती चुकीची उत्तरे आजूबाजूच्या अनेक विद्यार्थ्यानी लिहिली असणार ह्यात शंकाच नाही.

दहावीच्या परीक्षेला जाण्यासाठी मला माझे पहिले रिस्टवॉच मिळाले होते.

सेम....

अर्थात, परीक्षा देतांना, त्याचा उपयोग, अजून किती वेळ, रेघोट्या ओढायच्या आहेत? इतपतच...

तसेही, जास्त मार्क मिळवायची बुद्धीमत्ता न्हवती. आडातच काही नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार?. त्यामुळे, ज्या प्रश्नांची उत्तरे येतात, तितकी उत्तरे लिहिली की, शांतपणे झोपायचो.

भागो's picture

23 Mar 2024 - 8:45 am | भागो

लेख वाचून "हमारे जमाने"वाल्या भिडेची आठवण झाली. ते काहीही असो लेख मस्त नोस्टाल्जिक झाला आहे. मला माझ्या अकरावीच्या मार्कशीटचा खूप अभिमान वाटायचा. आता जर ते गुण मी इथे लिहिले तर नवीन पिढीची मुले मुली रुमालाआड हसतील. म्हणतील वाटलच होतं. आता म्हणजे इंग्लिश मराठी हिंदी मधेही शंभर पैकी नव्व्याणव गुण मिळायचा जमाना आहे. माझ्या आजूबाजूला नव्वद टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवलेला मुलगा मुलगी अजून भेटला नाहीये.
पण जाता जाता एक--- एका NGOच्या सर्वेक्षणात असे दिसले कि चौथ्या इयत्तेच्या मुलाना हाच्चा घेऊन बेरीज वजाबाकी करणे अवघड जाते आहे.
एक गोष्ट मात्र मानली पाहिजे कि हल्लीची पिढी आमच्या पिढीपेक्षा जास्त हुशार आहे. त्या शिवाय का आपण मंगळावर यान पाठवू शकलो?

अहिरावण's picture

23 Mar 2024 - 10:49 am | अहिरावण

आम्ही न शिकता रोज चंद्रावर जायचो, जातो आणि जिवात जीव असेल तोवर जाऊ !!

diggi12's picture

26 Mar 2024 - 7:31 pm | diggi12

छान स्मरणरंजन

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2024 - 11:47 pm | श्रीरंग_जोशी

सहजसोप्या शैलीत लिहिलेले स्मरणरंजन भावले.
श्रीमंताघरची मुलगी व तिचे पालक यांचा प्रसंग अगदी डोळ्यांपुढे उभा राहिला :-).

आजी's picture

9 Apr 2024 - 12:15 pm | आजी

माझ्या ह्या लेखाची भरपूर वाचने झाली. तसेच आपण सर्वांनी त्यावर उत्तम प्रतिसाद लिहीले त्याबद्दल मी तुमची सर्वांची ऋणी आहे. सकारात्मक आणि टीकात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांचा लेखकाला नेहमीच उपयोग होतो. आपलं काही तरी चुकतंय हेही त्याला/तिला कळतं. तेव्हा सर्व प्रतिसादाचं मी स्वागत करते. सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

सर टोबी's picture

9 Apr 2024 - 1:49 pm | सर टोबी

लेख नेहमीप्रमाणेच सुंदर झाला. लहानपण आणि तरुणपणची निरागसता लिखाणात उतरवण्याचं तुमचं कसब हेवा करावं असंच आहे. आत्ताच्या लेखाला नेहमी इतक्या स्तुतीपर प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत म्हणून नाउमेद होऊ नका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Apr 2024 - 4:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्यापेक्षा तुम्ही अगोदरच्या पिढीच्या तेव्हाची परिक्षा काळ चलचित्रासारखा मस्त उभा केला आहे. खरं तर, तेव्हाची दहावीच्या गोष्टी इतकंच मला तुम्ही बीएला विद्यापीठात तिस-या आलेल्या. वाह ! क्या बात है. भारी. आम्ही दहावीला तुळशीची पानंआवर्जून नेलेली. परिक्षेत उत्तरं आठवतात म्हणे पटापट. पण पेपर लिहितांना कंपॉसातली तुळशीची पानं खायचीसुद्धा आठवण राहात नसायची. गणित-भुमिती नावडते विषय होते. आता आठवत नाही पण, तुळशीच्या पानांचा चांगला तोबरा भरला असावा.

लेखन भारीच केलं आहे. अधिक उत्साहाने लिहिते राहा. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

या लेखावर जे प्रतिसाद आले , त्यांना मी उत्तर दिलं आणि त्यानंतर सर टोबी आणि प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे या दोघांनीही लेखावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना माझा लेख आवडला असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादांतून मला नवी ऊर्जा मिळाली. दोघांचेही मनःपूर्वक आभार.