हे‌ वाचा: शीतयुद्ध सदानंद

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
12 Aug 2023 - 1:23 am

कटाक्ष:

लेखक - श्याम मनोहर
प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
प्रथम आवृत्ती - १९८७, सध्या दुसरी आवृत्ती (२००७) (पुनर्मुद्रण २०२३)
पृष्ठ संख्या - १२२
किंमत - ₹१७५

ओळख:

या लघु-कादंबरीला अर्पणपत्रिका नाही तसेच प्रस्तावनाही नाही. उपोद्घाताच्या धाटणीची 'सदा आनंदात राहावे अशी माणसाची सनातन धडपड आहे आणि माणसांनी युद्धाचा शोध लावला' ही ओळ वाचूनही पुस्तकात नेमके काय असेल याचा अंदाज येत नाही. मुखपृष्ठावर लहान बाळाचे तिमिरचित्र (silhouette) पाहून पुस्तकात जागतिक राजकारण, युद्धे, शस्त्रास्त्र स्पर्धा यांचे संदर्भ असावेत असाही एक कयास केला होता. पण ही कादंबरी सदानंद दिनकर बोरसे या मध्यमवर्गीय व्यक्तीच्या जीवनातील एका घटनेवर आधारित आहे. घटना, घटनांच्या मालिका, पुन्हा घटना, पुन्हा घटनांच्या मालिका हीच सर्वसाधारण जीवनाची व्याख्या आहे. परंतु दिनकरच्या आयुष्यातली घटना साधारण नाही. ती दुर्मिळ आहे पण अशक्य नाही. अगदी सहज घडेल अशी, कुणासोबतही. पण दुर्मिळच‌! त्यातून एक शीतयुद्ध उद्भवते. सदानंदच्या आयुष्यात अडचणी आहेत, काही सुखे देखील आहेत. आधी अडचणी निपटून मग सुखे भोगायचे एक चुकीचे वैश्विक गणित सदानंद दररोज स्वतःच्या मनात मांडत असतो. सदानंदची पत्नी उर्मिला एक 'लिमिटेड स्त्री' (कारण समाजिक चौकटीने स्त्रीला मर्यादित केलेले आहेच) असूनही परिपूर्णतेने अभिव्यक्त होते. श्रीरंग आणि गोविंद हे दोन पैलवान सदानंदच्या बाजूचे आहेत की त्याचे विरोधक? सदानंदचे शेजारी आपल्या शेजाऱ्यांसारखे आहेत की ते ही कुण्या द्वंद्वात व्यस्त आहेत? मुखपृष्ठावरील बाळाचा संदर्भ काय? शीतयुद्ध कुणाचे, कुणा विरूद्ध चालू आहे? शीतयुद्धाचा अंत होतो की त्यातून खऱ्याखुऱ्या युद्धाचा जन्म होतो? यासाठी वाचा शीतयुद्ध सदानंद.

शिल्लक:

या लघु-कादंबरीत विनोद, तत्त्वज्ञान, राजकारण, सत्य, असत्य सत्य यांचे मिश्रण आहे. एकाच घटनेत सहभागी असणाऱ्या व्यक्ती फाशावर एक ते सहा आकडे असावेत अशा पद्धतीने सहभागी होतात. कुणाची भूमिका एक‌ तर कुणाची सहा. पण‌ फाशाप्रमाणे आयुष्यातही जे जे मत/व्यक्ती वर येते‌ ते ते त्या वेळी सर्वाधिक महत्त्वाचे होतात. श्याम मनोहरांची पात्रे स्वतःच्या वागण्याचे‌ स्पष्टीकरण देताना मानवी स्वभावाच्या कुटिलतेवर अलगद बोट ठेवतात. आपल्यात अपराधीपणाचा भाव जागू न देता मनुष्यातील नैसर्गिक अवगुणांची जाणीव या कादंबरीत होते. हे नैसर्गिक अवगुण असूनही गुण काय असावेत हे शोधणारा शेवटी हाच अवगुणी मनुष्य! दिनकरच्या आयुष्यातील प्रसंग क्वचितच एखाद्याच्या वाट्याला येतो पण दिनकरच्या मनातील विचार आपण रोज करतो. कथेतील इतर पात्रे शेजारी, घरमालक, पैलवान या सगळ्यांना समाधान हवे आहे. यातल्या प्रत्येकाच्या समजुती आणि कल्चर वेगवेगळं आहे. समाधानासोबत शांती येईल याची त्यांना खात्री आहे. शांतीसाठी सगळे युद्ध खेळत आहेत. शीतयुद्ध!

साहित्यिकप्रकटनआस्वादसमीक्षाशिफारस

प्रतिक्रिया

कंजूस's picture

12 Aug 2023 - 8:35 am | कंजूस

सदानंद.
.
शोध.
.
वाटा.