तेंडुलकर अजूनही अ-जून !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
26 Jan 2021 - 9:06 pm

शालेय वयात असताना पेपरांत मनोरंजनाच्या पानावरती विजय तेंडुलकर लिखित ‘शांतता ! कोर्ट चालू आहे’ या नाटकाची जाहिरात नेहमी दिसायची. जाहिरातीची रचना आणि या वैशिष्ट्यपूर्ण नावावरून त्याबद्दल खूप उत्सुकता वाटायची. पुढे कॉलेज जीवनातही अधूनमधून ती जाहिरात पाहिली. पण ते नाटक काही पाहणे झाले नाही. कॉलेजच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केलेले ‘घाशीराम कोतवाल’ पाहिले होते. सन 2000 च्या सुमारास टीव्हीवर तेंडूलकरांच्या नाटकांवर आधारित काही कार्यक्रम पाहण्यात आले. तेव्हा त्या चर्चांमधील दिग्गजांनी ‘शांतता’चा आवर्जून विशेष उल्लेख केलेला आढळला. दरम्यान ‘तें’ ची काही मोजकी पुस्तके मी वाचली. त्यामध्ये ‘कोवळी उन्हे’ हे ललिगद्य लेखन भलतेच आवडले. त्यातून ‘तें’ बद्दल मनात काहीसे कुतूहल निर्माण झाले होते.

अशातच एकदा युट्युबवर चक्कर मारली असता तिथे ‘शांतता’ हे नाटक उपलब्ध असल्याचे दिसले. मग तातडीने ते अधाशासारखे पाहिले. अर्थातच आवडले. त्या पाठोपाठ त्यांचेच ‘अशी पाखरे येती’ हेही नाटक तिथेच बघायला मिळाले. ‘तें’चे १-२ कथासंग्रह मी वाचनालयातून आणले होते पण ते अर्धवट वाचूनच परत केले होते. ‘तें’ नी सुमारे पन्नास वर्षांच्या( १९५० – २०००) प्रदीर्घ लेखन कारकि‍र्दीत विपुल लेखन केले आहे. त्यापैकी मी अत्यंत मोजक्या साहित्याचा आस्वाद घेतलाय. तरीसुद्धा त्यातून त्यांच्याबद्दल एक विलक्षण आदर वाटला आणि जबरदस्त आकर्षण वाटत राहिले. ‘तें’ना स्वर्गवासी होऊन आता तप उलटलेले आहे. मग आज अचानक मी त्यांच्याबद्दल का लिहितोय ?

सांगतो.

दोन महिन्यांपूर्वी पुस्तक प्रदर्शनात गेलो असताना एका २९२ पानी पुस्तकाने लक्ष वेधून घेतले. त्याचे नाव आहे ‘अ-जून तेंडुलकर’. रेखा इनामदार-साने यांनी संपादित केलेलं हे पुस्तक 2015 मध्ये प्रकाशित झालंय. मी उभ्यानेच पुस्तक दोनदा चाळले – आधी पुढून मागे आणि नंतर मागून पुढे. बस्स ! एवढ्यानेच लक्षात आले की ते माझ्यासाठी योग्य आहे. त्याच्या शीर्षकातला ‘अ-जून’ हा शब्दप्रयोग अगदी दिलखेचक ठरला. ‘तें’ना जाऊन बरीच वर्षे लोटली असली तरी त्यांच्या साहित्यावरील चर्चा मात्र अजूनही बरीच वर्षे चालणार आहे, असेच ते सुचवते. पुस्तकात नाट्यचित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या साहित्यावर लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. सोबत संपादकांची दीर्घ प्रस्तावना देखील.

आता डोकावूया पुस्तकाच्या अंतरंगात. ‘मनोगता’तील संपादकांच्या पहिल्याच वाक्याने ‘तें’ च्या लेखनाचा व्यापक पल्ला व भिन्न आवाका लक्षात येतो त्यामध्ये एका टोकाला प्रसन्न आणि सतेज असे ललितलेखन, तर दुसर्‍या टोकाला वाचकाच्या अंगावर चालून येणारे लेखन यांचा समावेश आहे. पुस्तकात तब्बल 17 मान्यवरांचे लेख आहेत. प्रस्तावनेत स्पष्ट केल्याप्रमाणे हा निव्वळ गौरवग्रंथ नाहीच; किंबहुना तें च्या साहित्याचे अगदी सांगोपांग विच्छेदन करणारा समीक्षाग्रंथ आहे.

• या संग्रहलेखकांमधील काही ठळक नावे अशी :
गिरीश कार्नाड, शांता गोखले, रत्नाकर मतकरी, मुकुंद टाकसाळे. याशिवाय श्याम बेनेगल, जब्बार पटेल, अमोल पालेकर आदी दिग्दर्शकांच्या मुलाखतींचे शब्दांकनही केलेले आहे.

* पुस्तकात हाताळलेले ‘तें’ च्या साहित्याचे पैलू असे आहेत :
1. नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखा
2. नाटक आणि हिंसा
3. नाटकांतील रंगसूचना
4. एकांकिका, बालनाटिका व चित्रपटाच्या पटकथा
5. कथा व कादंबऱ्या आणि
6. ललित लेखन.

या व्यतिरिक्त ‘तें’ च्या ‘हे सर्व कोठून येते’ या व्यक्तिचित्रणात्मक एकाच पुस्तकाबद्दल तब्बल तीस पानी स्वतंत्र लेख आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर वरील मान्यवरांनी त्यांच्या लेखनाचे किती मार्मिक विश्लेषण आणि प्रसंगी चिरफाड केलेली आहे ते दिसते. त्यातील मला भावलेले काही ठळक मुद्दे लिहितो.

१. ते स्वतः पुरोगामी विचारांचे होते. तरीही त्यांनी नाटकातील स्त्रिया मात्र दुबळ्या, खचलेल्या आणि परिस्थितीशरण दाखवल्या आहेत. त्यांच्या बऱ्याच नाटकांचा पूर्वार्ध संपून उत्तरार्ध चालू झाला, की ‘तें’ आपले रंग बदलतात असे निरीक्षण गिरीश कार्नाडनी नोंदवले आहे.

२. माणसांच्या चेहऱ्यावरील मुखवटे उतरवून आतील हिंसा बाहेर काढून दाखवायचे काम ‘तें’नी अगदी चोख बजावले आहे. त्यानुसार तशा लेखनात रांगडी भाषा, अर्वाच्च्य शिव्या यांची त्यांनी मुक्त उधळण केलेली आहे.

३. नाटक हा वाचायचा साहित्यप्रकार नसून ते एक सादरीकरण असते याचे ‘तें’ ना पुरेपूर भान होते. त्यानुसार त्यांच्या रंगसूचना खूपच मौलिक आहेत. समकालीन नाटककारांशी तुलना करता त्यांचे हे वैशिष्ट्य नजरेत भरते. नाटक बरेच जण लिहू शकतात, पण नाटकांचे शेवट लिहावेत ते फक्त आणि फक्त ‘तें’ नीच, असेही एका नाट्यकर्मीने अनुभवातून लिहिले आहे.

४. ‘तें’ नाटककार म्हणून श्रेष्ठ आहेतच आणि जागतिक पातळीवरही त्यांचा सन्मान झालेला आहे. पण त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांच्या पटकथांची भट्टी तितकीशी जमलेली नाही. यासंदर्भात त्यांचे दिग्दर्शकांशी तीव्र मतभेद झालेले असायचे.

५. त्यांनी दोनच कादंबऱ्या लिहिल्या आणि त्यांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत – ‘कादंबरी एक’ आणि ‘कादंबरी दोन’. त्यातील ‘एक’ मध्ये लग्नसंस्थेचे विदारक रुप त्यांनी समोर आणले आहे. इतकेच नाही तर तथाकथित सुखी संसाराची व्यवस्थित चिरफाड करून दाखवली आहे. कादंबरी म्हणून ती जमलेली नसली तरी लग्नसंस्थेच्या दुटप्पीपणावरचे त्यांचे भाष्य अत्यंत नेमकं आहे.

६. त्यांचे ललित लेखनही कमालीचे सुंदर आहे. त्यापैकी ‘कोवळी उन्हे’ हे मुळात वृत्तपत्रीय दैनिक सदर होते. त्यातील बहुतांश लेखन हे अगदी प्रसन्न आहे. यासंबंधीच्या लेखात मुकुंद टाकसाळे म्हणतात, की या संग्रहातील ३-४ लेख हे ‘तें’ नी लिहिलेले आहेत की पुलंनी, असा प्रश्न पडावा इतके ते मध्यमवर्गीय खाक्यातील आहेत.

‘तें’ च्या ‘शांतता !’ नाटकाने मी तर खूप प्रभावित झालो. एका परिसंवादात विजया मेहता म्हणाल्या होत्या की ‘तें’ चे ते अत्यंत महत्त्वाचे नाटक आहे. त्यांची चिकित्सा करताना आपल्याला शांतताची ठळकपणे दखल घ्यावी लागते. या संदर्भात या नाटकाबद्दल प्रत्यक्ष घडलेला आणि मी वाचलेला एक किस्सा सांगायचा मोह होतोय.

या नाट्यप्रयोगात सुरुवातीपासून दीर्घकाळ बेणारेबाईंची भूमिका सुलभा देशपांडे करीत असत. त्याचा एक प्रयोग पुण्यात चालू होता. नाटकातील बेणारेबाई त्यांची दुर्दैवी कथा सांगून मंचावर हतबल अशा उभ्या असतात. तेवढ्यात प्रेक्षागृहातून एक प्रेक्षक चक्क रंगमंचावर चालत जातो आणि सुलभाताईपुढे उभा राहून त्यांना म्हणतो, “बेणारे बाई, मी तुम्हाला काही मदत करू का ?” त्यावर प्रेक्षागृह अक्षरशः हादरते आणि मग पुढे टाळ्यांचा कडकडाट होतो. या नाटकाच्या बाबतीत लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्हींच्या उत्कृष्टतेचा संगम झालेला असल्यानेच प्रेक्षकांवर त्याचा इतका खोल परिणाम होऊ शकतो. अशा अभूतपूर्व प्रसंगी आपण त्या प्रेक्षागृहात का नव्हतो याची चुटपुट नक्कीच लागून राहते !

‘तें’ त्यांच्या कारकिर्दीच्या पूर्वार्धात खरे गाजले ते घाशीराम, सखाराम बाइंडर, गिधाडे इत्यादी प्रक्षोभक नाटकांमुळे. त्याकाळी त्यांना यासंदर्भात बराच काळ सामाजिक रोष आणि कोर्टकचेऱ्यांचाही सामना करावा लागलेला होता. त्यांचे स्वतःचे आयुष्यही दुःखांनी भरलेले होते. पुढे त्यांनी अभ्यासवृत्तीच्या निमित्ताने गलिच्छ झोपडपट्ट्या, वेश्यावस्त्या आणि तुरुंग हेही पालथे घातले. एकंदरीत या सर्वांचा परिणाम म्हणून त्यांचे बरेचसे लेखन हे प्रखर, स्फोटक आणि वाचकांच्या अंगावर येणारे झालेले असावे.
पुस्तकाच्या प्रस्तावनेचा शेवट करताना संपादकांनी ‘तें’ चा अगदी ‘अर्क’ काढून आपल्यापुढे ठेवला आहे. कलेतून छान छान गोष्टी समाजापुढे मांडणारे कलावंत पुष्कळ असतात. पण समाजाचा कुरुप चेहरा दाखवणारे कलावंत तसे विरळा. त्यामुळेच असा लेखक कधी आपले ‘लाडके व्यक्तिमत्व’ बनू शकत नाही. पण मानवी मनाची चिरफाड करून (कटू) वास्तव समोर आणण्याची ‘तें’ ची कामगिरी समाजासाठी आवश्यक आणि अविस्मरणीय आहे हे निःसंशय .
……………………….
अ-जून तेंडुलकर
संपादक : रेखा इनामदार-साने
राजहंस प्रकाशन आणि साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान
पहिली आवृत्ती, २०१५
पाने २९२, किं. रु. ३००

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

तेंडुलकरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर पुनरावृत्त न होणाऱ्या अश्या त्यांच्या लेखांचा आणि त्यातील लेखकाचा मी चाहता बनलो. घाशीरामचा मूळ ऑडिओ YouTube वर आहे. तसंच मला त्यांचं छोटेखानी स्वगत, वसंतराव देशपांडे यांच्यावरचं, फार आवडलं. तसंच राजू परुळेकर यांनी घेतलेली मुलाखतही मी अनेकदा पाहिली. बाई म्हणजे विजया मेहता यांच्या मुलाखतीतही तेंडुलकर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्याला भेटतातच. (हे सर्व YouTube वर आहे) असे तेंडुलकर तुकड्या-तुकड्यात आपल्याला अर्धेमुर्धे दिसतात. कधी वाटतं की गुलजार यांनी जशी भीमसेन जोशींच्यावर अप्रतिम documentary बनवली आहे तशी तेंडुलकरांच्यावर बनायला हवी होती.

त्यांचा पानवलकरांच्या वरचा लेख अप्रतिम तर आहेच ( मी त्यांचं सर्व ललित लेखन वाचलेले आहे) पण त्यांची मुलगी प्रिया हिने अजून काही माहिती या दोघांविषयी लिहिली आहे, ती या लेखाला अजून सुंदर बनवते, विशेषतः तेंडुलकर इस्पितळात असतानाचा प्रसंग.

तीच गोष्ट राजू परुळेकर यांनी लिहिलेल्या आठवणींची. त्या जरी ओबडधोबड असल्या तरी त्यातून आपल्याला राजू तेंडुलकर आणि इतर बरेच संदर्भ लागतात.

असे हे माझ्या हाती लागलेले (आणि बरेचसे निसटलेले) तेंडुलकर.

पुस्तक अर्थातच घेईन, पण भारतात नसल्याने आता लगेच घेता येणार नाही ही चुटपुट लागून राहणार. मग लक्षात आलं की रोज या ना त्या प्रकारे तेंडुलकर मला त्यांच्या लेखनातून भेटतातच, मग ही पुस्तकरूपी नवीन भेट आता झाली काय आणि काही महिन्यांनी, त्यानं काय फरक पडतो!

कुमार१'s picture

27 Jan 2021 - 11:28 am | कुमार१

मनो,
सुंदर प्रतिसाद.

की रोज या ना त्या प्रकारे तेंडुलकर मला त्यांच्या लेखनातून भेटतातच,

हे बाकी अगदी खरं ! आवडले.
......
‘तें’चे लेखकांसाठी एक मार्गदर्शक कथन मला फार आवडते. त्यांना कोणीतरी विचारले होते, की चांगले लेखन करण्यासाठी परदेशी लेखखांप्रमाणे भरपूर देशविदेशांचा प्रवास वा दर्याखोर्यातून भटकणे असे काही करणे आवश्यक आहे काय ?

त्यावर तें म्हणाले, “अजिबात नाही. लेखनासाठीचे असंख्य विषय आपल्या अवतीभवतीच घुटमळत असतात. ते पकडण्याची क्षमता तुम्ही निर्माण करायची असते.
मलाही हे अनुभवातून खूप म्हणजे खूपच पटले.

मुक्त विहारि's picture

27 Jan 2021 - 11:51 am | मुक्त विहारि

सामना

तेंडूलकर यांनी, एव्हढी एकच कलाकृती निर्माण करून, निवृत्ती घेतली असती तरी चालले असते.... माझ्या दृष्टीने, ही सर्वात, अविस्मरणीय कलाकृती आहे.

एकापेक्षा एक भारी संवाद आहेत ....

"गर्व ही सुद्धा, एक प्रकारची वस्तुस्थिति आहे,"

"सध्या आम्ही फक्त दारूवादी."

"आपल्या, सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?" ..... हा तर मुकूटमणी...

आज परत एकदा, "सामना", बघायला हवा ...

आत्ता पर्यंत किमान, 40-45 वेळा बघीतला आहे .... पण दरवेळी, एखादा नवीन पैलू समजतो...

मला वाटतं... 'आपल्या निरागस निर्बुद्धपणाचे रहस्य काय' असा तो प्रश्न आहे. नक्की आठवत नाही. परत एकदा सामना बघायला पाहिजे हेच खरं.

कुमार१'s picture

27 Jan 2021 - 2:09 pm | कुमार१

मुक्त विहारि

सहमत. याप्रमाणेच ‘कोवळी उन्हे’ या पुस्तकाबाबत म्हणू शकतो.
या पुस्तकाचे कुठलेही पान कधीही उघडून वाचू शकता असे ते प्रसन्न लिखाण आहे

मित्रहो's picture

28 Jan 2021 - 5:22 pm | मित्रहो

तेंडुलकर म्हणजे नाटक, मराठीच नव्हे तर भारतीय नाटकाचा जरी इतिहास लिहायचा म्हटला तरी तो तेंडूलकरांशिवाय लिहता येणार नाही. त्यांच्या काही नाटकातील किंवा सिनेमातील विचार याविषयी कदाचित सहमत नसालही परंतु एक नाट्य कलाकृती म्हणून ती नाटक खूप समृद्ध होती. विजयाबाईंच्या झिम्मामधे रंगायणचे दिवस सांगताना तेंडुलकरांच्या नाटकांचा सुंदर आढावा येतो.
यु ट्युबवर मागे मकरंद साठे यांनी तेंडूलकरांची घेतलेली मुलाखत बघितली होती. Tendulkar and Violence then and now त्यात स्वतः तेंडुलकरांनी त्यांची नाटके, त्याकाळाचा त्यांच्या नाटकांवर असलेला प्रभाव याचा आढावा घेतला आहे.
मला वाटत झिम्मा मधे कुठेतरी विजयाबाईंनी म्हटले आहे की गिधाडे नंतर तेंडुलकरांची नाटके शांतता कोर्टचा अपवाद वगळता भडक होत चालली होती. स्वतः तेंडुलकरांनी म्हटले की घाशीरामला नाटक म्हणावे की नाही. ते खरे तो एक अद्वितीय प्रयोग आहे.

कुमार१'s picture

28 Jan 2021 - 5:56 pm | कुमार१

मित्रहो,
सहमत आहे. वरील नाटकांच्या तुलनेत मला ‘अशी पाखरे येती’ हे प्रसन्न नाटक खूपच आवडले. युट्युबवर आहे. लग्न न जमणाऱ्या मुलीचे कुटुंब त्यांनी किती छान रेखाटले आहे.

किंबहुना मी त्यांची भडक नाटके पाहणे जाणीवपूर्वकच टाळलं आहे ‘शांतता’ आणि ‘अशी पाखरे’ मला खूपच आवडतात आणि सहा महिन्यातून एकदा का होईना मी त्यांच्यासाठी यूट्यूबवर डोकावतो.

सुधीर कांदळकर's picture

30 Jan 2021 - 6:46 am | सुधीर कांदळकर

वा डॉक्टरसाहेब. आपण याही विषयवर एवढे छान, प्रसन्न वाटणरे लिहू शकतां! सादर प्रणाम!!

रीचार्ज करण्याच्या निमित्ताने जालावर आलो. जाल बरे चालले म्हणून मिपावर आलो. आपल्या आवडत्या साहित्यिकाबद्दल एवढे सुंदर लिखाण वाचायला मिळाले. आपल्या वेचक दृष्टीला आणि पुस्तक निवडीला दाद देत अनेक, अनेक धन्यवाद देतो.

साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हणतात. समाजातील विकृती परिणामकारक, तरीही चित्तवेधक, देखण्या, नीटनेटक्या रीतीने मांडणे यातच अशा थोर साहित्यिकांची प्रतिभा दिसून येते. माझ्या वाचनातून मला न कळलेले बरेचसे काही वेगळ्या चष्म्यातून वाचायला नक्की आवडेल. त्यामुळे हे पुस्तक वाचावेच लागणार.

मुख्य म्हणजे समाजातल्या न आवडलेल्या गोष्टीवर अभिनिवेश न आणता त्यांनी निर्विष टीका केली ती असामान्य कलाकृतीतून. त्यांना शतशः प्रणाम.

कोवळी उन्हे वाचले की नाही आठवत नाही. पुन्हा वाचावे लागणार.

कुमार१'s picture

30 Jan 2021 - 8:34 am | कुमार१

सुधीर,
नेहमीप्रमाणेच प्रसन्न आणि उत्साहवर्धक प्रतिसाद ! आवडला. जेव्हा शक्य होईल तेव्हा हे पुस्तक जरूर वाचा.

कोवळी उन्हे वाचले की नाही आठवत नाही.

हे जर वाचायचे राहिले असेल तर तेही नक्की वाचा. त्यातील काही लेख तर मुंबईप्रशस्ती आणि विशेष या प्रकारातील आहेत. तेव्हा सर्व आजी आणि माजी मुंबईकरांनी ते जरूर वाचावेत असे सुचवितो.

सिरुसेरि's picture

31 Jan 2021 - 7:16 pm | सिरुसेरि

छान लेखन . खुप वर्षांपुर्वी लोकप्रभाच्या एका दिवाळी अंकामधे मा. जब्बार पटेल यांनी "अशी पाखरे"चे दिवस हा लेख लिहीला होता . त्यामधे या नाटकाबद्दलच्या सुरेख आठवणी होत्या .

कुमार१'s picture

1 Feb 2021 - 6:39 pm | कुमार१

धन्यवाद
सिसुरेरी.
अशी पाखरे केवळ छानच आहे.
…..
लेखातील पुस्तकात सखाराम बाईंडर नाटकाबद्दल बरेच काही वाचायला मिळाले. गिरीश कार्नाड यांनी तर, ‘गेल्या एक हजार वर्षात असे नाटक झाले नाही’, असा त्याचा गौरव केला आहे. मी काहीही पाहिले नव्हते. सहज युट्युब वर उपलब्ध होते म्हणून पाहिले.

नाटक म्हणून छान आहे. ते 1972 मध्ये गाजले ते त्याला आधी दिलेली परवानगी आणि 13 प्रयोगानंतर काढून घेतलेली परवानगी आणि एकूणच सामाजिक गोंधळ यामुळे. एकंदरीत त्यातील आशय, रांगडी भाषा व अर्वाच्च शिव्या इत्यादी गोष्टी समाजाला मानवल्या नसाव्यात.
कलाकारांचा अभिनय तर उत्तमच आहे.

Nitin Palkar's picture

18 Feb 2021 - 7:55 pm | Nitin Palkar

विजय तेंडूलकरांचं खूपसं साहित्य वाचलंआहे, आणि तेंडुलकरांबद्दल अजून बरंचस जाणून घ्यायला हवं असं सतत वाटत असे. 'अ-जून तेंडुलकर' या पुस्तकाचा तुम्ही केलेला हा परिपूर्ण परिचय वाचून पुस्तक विकत घ्यावे असं वाटू लागलंय. यातच लेखाचं यश आहे. लेख आवडला आहेच, लेखावरील सर्वांचे प्रतिसादही सुंदर आहेत.
_/\_

कुमार१'s picture

19 Feb 2021 - 9:08 am | कुमार१

धन्यवाद !
पुस्तक जरूर वाचा व तुमचाही अभिप्राय सांगा.

कुमार१'s picture

2 Oct 2022 - 8:11 am | कुमार१

घाशीराम आणि सखाराम या नाटकांबद्दलची पन्नास वर्षांपूर्वीची एक आठवण सतीश आळेकर यांनी काल माझा कट्टा मध्ये सांगितली.
तेव्हा या नाटकांच्या विरोधात खूप गदारोळ झाला तेव्हा निषेधाचे विविध फलक लागलेले असायचे. त्यातील एकात,

"

आता गिधाडांच्या गोष्टी पुरे झाल्या, गरुडांच्या गोष्टी लिहा"

असा उपदेश केलेला होता.

कुमारजी आपल्याला आरती प्रभु ( ची त्र्यं खानोलकर ) यांचे लेखन आवडत असेल तर त्यावर लिहिलेले ज. या. दडकर यांचे पुस्तक नक्की वाचा ऐसे सुचविन
बहुतेक त्याचे नाव "आदिपर्व" आहे...नक्की आठवत नहीं

कुमार१'s picture

3 Oct 2022 - 11:02 am | कुमार१

सुचवल्याबद्दल धन्यवाद !

कर्नलतपस्वी's picture

23 Dec 2022 - 6:53 pm | कर्नलतपस्वी

पुण्यातली नामांकित नाट्यसंस्था घाशीराम या नाटका मुळे फुटली. नाव अठवणी प्रमाणे पि डी ए तुन जब्बार पटेल,मोहन आगाशे श्रीधर राजगुरू व इतर काही कलाकारांनी थिएटर अकॅडमी ही वेगळी संस्था काढल्याचे आठवते.

घाशीराम च्या प्रयोगाच्या वेळेस बालगंधर्व वर झालेला गदारोळ बघितला आहे.

मोहन आगाशे नाना फडणवीस व मोहन जोशी घाशीराम असा नटसंच आठवतो.

सामना,शांतता,आशी पाखरे या नाटकांच्या निमित्ताने तेंडुलकर बघायला ऐकायला मीळाले.

कुमार१'s picture

5 Apr 2023 - 10:26 am | कुमार१

सदर पुस्तकात ‘कमला’ या नाटकाबद्दल विद्वानांनी बरेच मतप्रदर्शन केलेले आहे म्हणून ते बघण्याची उत्सुकता होती. युट्युब वर ते दोन भागात उपलब्ध आहे. ते व्यावसायिक कलाकारांनी केलेले नसून नाट्य स्पर्धेतील कलाकारांनी केलेले आहे. नाटक आवडलेच.

त्याचा आशय, विषय, सादरीकरण संवाद आणि मधली निशब्द शांतता.. हे सर्व काही अगदी "तें" च !

१९७०मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर ते आधारित आहे. उत्तर भारतातील ढोलापुरात चालत असलेल्या स्त्री-विक्री बाजारातून इंडियन एक्सप्रेसचा एक पत्रकार एका बाईला (कमला) २३०० रु. ना विकत घेऊन येतो आणि तिला पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सादर करतो, ही ती घटना.

नाटकाचा सारांश दोन वाक्यात सांगता येईल:
१. बायकोसह कुठलीही स्त्री ही पुरुषाच्या दृष्टीने व्यवहारातील फक्त एक प्यादे आहे.
२. हुच्च सनसनाटी इंग्लिश पत्रकारितेचा केलेला
दंभस्फोट.

पत्रकाराने विकत आणलेली कमला जेव्हा खुद्द त्याच्याच बायकोला विचारते,
“तुला (नवऱ्याने) केवढ्याला विकत घेतलेले आहे ?”

हे भेदक वाक्य म्हणजे नाटकाचा आत्मा आहे.

तसेच...
“अहो, मोठ्या पेपरला प्रतिष्ठा नसते, त्यांना असतो तो फक्त खप आणि जाहिराती !”

या वाक्यातून तसल्या पत्रकारितेच्या अक्षरशः चिंध्या उडवलेल्या आहेत.

सुधीर कांदळकर's picture

6 Apr 2023 - 8:47 pm | सुधीर कांदळकर

एका वाहिनीवर आली होती. तुला कितीला घेतली या अर्थाचे वाक्य बाजी मारून गेलें खरे.
बर्‍यापैकी सुरू झालेली मालिका नंतर वाईट अभिनयामुळे आणि फिल्मी दिग्दर्शनामुळे बघायची सोडून दिली .

कुमार१'s picture

7 Apr 2023 - 8:43 am | कुमार१

खरे आहे. नाटक ते नाटकच.
त्याचे चित्रपटीकरण करताना बऱ्याचदा मनाजोगते होत नाही.

कर्नलतपस्वी's picture

7 Apr 2023 - 8:23 am | कर्नलतपस्वी

कमला हे नाटक लालन सारंग कमलाकर सारंग या जोडीने सादर केल्याचे आठवते.

सखाराम बाईंडर मधले निळू फुले,लालन सारंग आजही आठवतात.

त्यावेळची एक सक्षम नटी सुलभा देशपांडे सुद्धा प्रसिद्ध होती.

कुमार१'s picture

7 Apr 2023 - 8:41 am | कुमार१

बरोबर. 'शांतता कोर्ट चालू आहे' मुळे सुलभा देशपांडे खूप गाजल्या होत्या.

कमलामधील कुठलीतरी भूमिका विक्रम गोखले यांनी केल्याचेही वाचनात आले.