महिलादिन-एक चितंन

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
18 Mar 2023 - 7:12 pm

अस्वीकरण-सदर विडंबन केवळ मनोरंजना साठी लिहीले आहे. वाचल्यानंतर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी आगोदरच क्षमा मागतो.

बोले तो आज जागतीक महिला दिन है l

क्या बात करते हो! मै तो हर रोज महिला दिन मनाता हूँ l

सुबह उठते ही उसके लिये एक कप चाय बनाता हूँ l

सच कहता हूँ...

सुबह शाम हर कोई मुझे आयना दिखाती है l

फिर भी,

हर महिला मेरे लिये मायनारखती है l

कविवर्य बा.भ. बोरकर,संदीप खरे या दिग्गज कविनीं, "नसतेस घरी तू जेंव्हा" सारख्या कविता करून महिलांची महती गायली आहे.थोडा हातभार आमचा पण लागलायं.

असतेस घरी तू जेंव्हा
दह्या दुधाचे हांडे...

नसतेस घरी तू जेंव्हा
वाहती दुधाचे लोंढे

-कसरत

नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठलो, डोक्यात विचारचक्र सुरू होते.सर्वात आधी उठतो म्हणून दुध तापवणे,चहा बनवणे या सारखी मोठी मोठी कामे मलाच करावी लागतात.

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवायचा म्हणून काडीपेटीवर काडी घासली. काडीने चटकन पेट घेतला,काडी तुटली आणी जळत्या काडीचा तुकडा पोटावर पडला ( काडी पण स्त्रीलिंगी शब्द आहे ).वाटले,आधी पोटाला चटके तेंव्हा मिळतो....

डोक्यात लख्ख प्रकाश पडला, लक्षात आले बायको काड्या पेटीतल्या काडी सारखी. चटकन पेट घेते.तीच्या बरोबर जरा जपून रहावे लागते नाही तर केव्हा भडका उडेल सांगता येत नाही. कुठलाही बंब (आगीचा) ती आग विझवू शकत नाही, अगदी परमेश्वर सुद्धा. म्हणूनच शक्यतो नवरा बायको समोर जास्त बोलत नाही.

अर्थात याचा सकारात्मक दुसरा दृष्टिकोन आहे पण औचित्य नसल्यामुळे त्याबाबत लिहीत नाही. असो,

बायकोचे ऐकले की रामायण घडते हे तर सिद्ध झालेच आहे.महाराज दशरथ रंणांगणात फसले.त्यांना कैकयी वहिनी साहेबांनी ऐनवेळेस मदत केली म्हणून महाराजांनी तीला तीन वर दिले.कैकयी वहिनी लई हुश्शार अगदी मोक्याच्या टायमाला त्यांनी ती हुंडी (प्राॅमीसरी नोट) वटवली आणी रामायण घडले. सत्ययुग ते कलियुग असा इतका मोठ्ठा प्रवास जरी या जगाचा झाला असला तरी नवरा बायकोच्या नात्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही.आजही तेच गुण विषेश बघावयास मिळतात.

अडला हरी गाढवाचे पाय धरी व सगळेच नवरे गाढव.

असे असले तरी आमच्या सारखे काही महाभाग या पासून बोध न घेता आपण सुद्धा रामा सारखे पुरुषोत्तम होऊ या भ्रमात आयुष्यभर बायकोचे ऐकत राहातात व कलियुगातील दशरथ बनतात.गरीब, भाबड्या पुरुषांना हे कळत नाही सदी का महानायक एखादाच,कधीतरीच बनतो तसाच पुरूषोत्तम सुद्धा अनेक युगात एखादाच.

असाच एक राम भक्त, रामबोला. त्याची बायको रत्नावली, सौंदर्याची खाण असे जीचे वर्णन केले जाते,रामबोला रत्नावलीच्या मागे वेडा होता.तो म्हणे काळोख्या रात्री उधाणलेल्या वाऱ्यात उफानलेली नदी पार करून रत्नावलीच्या माहेरी गेला. खिडकीला लोंबकळणाऱ्या सापाला दोरी समजला व त्याला पकडून तिच्या शय्यागारात तीला भेटावयास पोहोचला.(खरे खोटे भगवंतच जाणे (मान नाही)).

मला कळत नाही, माहेरी आल्यावर बायकांना काय होते!नवर्‍याची गती पावनखिंडीत सापडलेल्या गनीमा सारखी करतात.अर्थात सुरवातीचे काही दिवस याला अपवाद असू शकतील.तद्वतच रत्नावलीला रामबोलाचे प्रेम म्हणजे लंपटपणा वाटला व ती म्हणाली ,

अस्थि चर्म मय देह यह,ता सों ऐसी प्रीति !
नेकु जो होती राम से,तो काहे भव-भीत ?

भावार्थ

अगर मेरे इस हाड-मांस के शरीर के प्रति जितनी तुम्हारीआसक्ति है, उससे आधी भी अगर प्रभु से होती तो तुम्हारा जीवन संवर गया होता.

ते शब्द रामबोलास लवंगी मिर्ची सारखे झोंबले व सर्वसंग परित्याग करून तो अरण्यात निघून गेला. च्यामारी, अशा एखाद्या प्रसंगी त्या बिचार्‍या नवर्‍याने कुठे जायचे?कलियुगात पर्यावरणीय र्‍हास झाल्यामुळे अरण्ये कुठे राहिली आहेत.आता कळाले, झाडे लावा, झाडे जगवा का म्हणतात.आज जर रत्नावली असती तर नक्कीच म्हणली असती मी होते म्हणून नाहीतर तुमचे हाल XXनी खाल्ले नसते. बिचारा मरता क्या न करता बायकोचे ऐकून बसला आणी तोच रामबोला आज संतश्रेष्ठ तुलसीदास म्हणून प्रसिद्ध आहे.

असो,याचीच दुसरी बाजू पण आहे.

मित्रांनो जे नवरे आपल्या बायकोचे ऐकत नाही त्यांचे काय होते हा सुद्धा एक मोठा प्रश्न ?

आता रामायणाचेच उदाहरण घेऊ. महा बलशाली रावण,अती दुराचारी,आजच्या भाषेत मेल च्यव्निस्ट (male chauvinist). त्याने सीतेचे हरण केले. लहानपणी मला रावण हा मोठ्ठा जादूगार वाटायचा. त्यावेळेस मला रावणाचे ते कृत्य आवडले होते.मी वडलांना विचारले रावणाने सीतेचे हरण केले(मला वाटले हरण म्हणजे Deer) तसे मला शेजारच्या संजीचे हरण करता येईल का? (खरे नाव संजीवनी,तीच्या बापाला म्हणे तीचा जन्म झाल्यावर दिर्घ आजारातून मुक्ती मिळाली म्हणजे आजार बरा झाला. उगाच वाईट साईट विचार करू नका.).वडीलांनी कानाखाली जाळ काढला. अर्थात माझी दृष्टी तिथपर्यंत पोचतनसल्याने मला दिसला नाही पण एक कानशील खुप गरम झाले.

पुढे, मोठा झाल्यावर मराठी भाषेतील पर्यायवाची शब्द शिकलो हरण या शब्दाची विस्तृत माहिती कळाली व त्याचे विवीध उपयोगही, जसे वस्त्रहरण,अपहरण इत्यादी. थोडा आणखी मोठ्ठा झालो आणी ज्ञात झाले की हरण करणे म्हणजे पळवून नेणे. हे कृत्य भारतीय दंड विधान,धारा ३५९ ते ३६६ नुसार गुन्हा आहे व गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्ष तुरूंगवासाच्या शिक्षेचे प्रावधान आहे.

जेंव्हा हे कळाले,तेव्हां मला रावणाचे कृत्य अजीबात आवडले नाही.मी आजही त्याची निंदा करतो.पुढे संजीचे हरण करण्याचा विचार पण सोडून दिला.

असो विषयांतर नको,रावणाची बायको मंदोदरी,पंचकन्या स्मरे नित्यम,या श्लोकाद्वारे सदैव प्रातःस्मरणीय . रावणाने सोन्याच्या लंकेत चौदा चौकड्याचे राज्य उपभोगत असताना माता मंदोदरीचे न ऐकता सीता हरण केले. शेवटी मरताना रामाचे नाव घेतल्याने त्याला विष्णूलोकात अढळस्थान प्राप्त झाले.(रावण म्हणे प्रकांड पंडित होता त्यामुळेच त्याला हा शार्टकट माहित असावा.).

दशरथ महाराज यांनी बायकोचे ऐकले व त्यांना पुत्रशोक झाला व चक्रवर्ती पद सोडून परलोकी प्रस्थान करावे लागले.रामाने सीतेचे ऐकले.तीला बरोबर वनवासात नेले.चौदा वर्ष वनवास,हालअपेष्टा भोगल्या. आपल्या बायकोला सोडवण्यासाठी त्याला समुद्रावर पुल बांधावा लागला व रावणाशी भयंकर युद्ध करावे लागले.(बाकी लक्ष्मण मात्र हुश्शार त्याने बायकोचे ऐकलेच नाही )

दुसरे उदाहरण, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. श्रेष्ठी देवाला म्हणतात बघा,

बरें जाले देवा बाईल कर्कशा ।
बरी हि दुर्दशा जन मध्ये ॥२॥

बरें जालें जगीं पावलों अपमान ।
बरें गेलें धन ढोरें गुरें ॥३॥

बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥४॥

बरें जालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं ॥५॥

महाराजांनी सुद्धा बायकोचे कधीच ऐकले नाही.जिजाबाई, महाराजांची बायको, म्हणायची,त्या विठ्ठलाच्या, काळतोंड्याच्या नादी लागू नका संसाराचा खेळखंडोबा होईल. बुवांनी अखेर पर्यंत बायकोचे ऐकले नाही.सरते शेवटी इहलोकी संत शिरोमणी, तुका झालासे कळस अशी ख्याती प्राप्त करून सदेह वैकुंठाला गेले.

सर्व आत्मचिंतनाच्या नादात चहाची गोळी झाली,दुध ओतू गेले.लिक्विड पेट्रोलियम युक्त हवेचा तीव्र गंध नाकपुडीतून डोक्यात गेला तेव्हां भानावर आलो.असो पुढे घडलेले रामायण सांगून काही फायदा नाही.

समर्थ रामदास म्हणतात,

"दिसामाजी काहीतरी लिहावे,
प्रसंगी अखंडित वाचीत जावे"

मित्रांनो, समर्थांच्या उपदेशाचे पालन करताना,म्हणजे अखंडीत वाचत राहिल्यामुळे माझा तर खुपच गोंधळ उडालाय.कधी असे,कधी तसे बायकोचे ऐकायचे किंवा नाही? म्हणून समर्थांनीच सांगीतल्या प्रमाणे आता काहीतरी लिहून तुमचा अनुभव काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कृपया शेअर करा.

बाकी काय करायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे.

शेवटी ज्याचे ओझे त्यालाच घाम.

&#128512.

मुक्तकविडंबनविचारचौकशीमदतविरंगुळा

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Mar 2023 - 9:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा लेख सुटला होता वाचनातुन. लेखात काही काही कोट्या भारी आहेत हो!!

अवांतर--
एक राजा होता. त्याने दवंडी पिटवली, सर्व पुरुषांनी राजवाड्यात जमावे. सगळे जमले.
पुढची सूचना--जो बायकोचा बैल असेल त्याने सफरचंद घेउन जावे आणि जो नसेल त्याने घोडा न्यावा.
अर्थतच सफरचंदाची टोपली रिकामी झाली. शेवटी एक महापुरुष घोडा घ्यायला आला. राजाने त्याचा सत्कार केला. सगळे घरी गेले.
हा महापुरुष दुसरे दिवशी परत आला. राजाने विचारले "काय झाले" तर म्हणतो "बायको म्हणाली, काळा घोडा अशुभ असतो, बदलुन पांढरा आणा" म्हणुन परत आलोय. राजाने डोक्याला हात लावला आणि त्यालाही सफरचंद दिले.

बाकी हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, तो सोडवायला आपण काय सुपरमॅन थोडीच आहोत? तुम्ही चहा करत रहा, आम्ही पीत राहु, काय?

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2023 - 5:11 pm | चौथा कोनाडा

मजेशीर मुक्तक .....

शेजारच्या संजीच्या हरणाचा विचार सोडावा लागला ... अर्रर्र ... पुन्हा प्रयत्न करून बघा .... हा .... हा .... हा....

चांदणे संदीप's picture

24 Mar 2023 - 12:32 pm | चांदणे संदीप

मजेशीर लेख! हरणाचा विषय भारी. :)

सं - दी - प

कर्नलतपस्वी's picture

24 Mar 2023 - 10:01 pm | कर्नलतपस्वी

वाचक,प्रतिसादांचे आभार.

काहीकळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे.

काही कळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे.

कर्नलतपस्वी's picture

25 Mar 2023 - 10:47 am | कर्नलतपस्वी

काही कळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे.

हे एक विडंबन आहे. नवरा बायकोचे नाते इतके घनिष्ट असते की बरेचवेळा आपण हे विसरतो की नात्या शिवाय प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत, विश्व,आवड निवड वेगळी असते.त्यात दुसर्‍याची ढवळाढवळ नको वाटते. अगदी एक मताने चालणाऱ्या नवरा किंवा बायकोची सुद्धा.मग थोडी चिडचिड होते. आजच्याच भाषेत कधीतरीच एकमेकाला स्पेस द्यायला हवी. लग्न म्हणजे थ्री लेग रेस. कधीतरी थ्री लेग रेस करता बांधलेले पाय मोकळे करून मुक्त पळावे व पुन्हा एकदा थ्री लेग रेस नव्या जोमाने सुरू करावी. हा विचार धरून हे विडंबन लिहीण्याचा प्रयत्न.

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा
सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा

मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली
न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी

दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट
गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट

नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा
साजरा उधळून आयु हो करावा संग हा

चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही
आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही

ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा

: आरती प्रभू

विवेकपटाईत's picture

26 Mar 2023 - 2:16 pm | विवेकपटाईत

मस्त. घरात नवऱ्याने राष्ट्रपती आणि रेव्हेन्यू मंत्र्याचे पदभार सांभाळावा आणि बायकोने प्रधानमंत्री सहित बाकी सर्व पदे. हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.

चित्रगुप्त's picture

26 Jul 2023 - 4:31 am | चित्रगुप्त

मस्त हो कर्नल भौ. पूर्वी वाचायची राहून गेले होतेसे दिसते.

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवायचा म्हणून काडीपेटीवर काडी घासली.

-- यावरून हा धागा आठवला. वाचून घ्या एकदा.

स्वराजित's picture

2 Aug 2023 - 2:23 pm | स्वराजित

साहेब खुप छान लेख
मजा आली वाचताना.

कर्नलतपस्वी's picture

2 Aug 2023 - 5:00 pm | कर्नलतपस्वी

उपसल्या बद्दल चित्रगुप्त व स्वराजित आपले धन्यवाद.