जानरावन कांतारा पायला

मित्रहो's picture
मित्रहो in जनातलं, मनातलं
10 Jan 2023 - 8:13 am

(खालील लेखात कांतारा या सिनेमाची गोष्ट काहीशी सविस्तर सांगितली आहे.त्यामुळे ज्यांनी याआधी चित्रपट बघितला नाही त्यांच्यासाठी चित्रपट बघण्याच्या अनुभवावर परिणाम होऊ शकतो.
साधारण अडीच वर्षानंतर वऱ्हाडी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतोय. खूप दिवसानंतर जानराव आलेत. )

अमदा आमच्या भागात कसा पाणी पडला तुम्हाले तर मालूमच हाय. माणूस माणूस पाणी धसल होतं वावरात, आठ दिस झाले तरी टोंगळा टोंगळा गाढणं होत. वावरात जाची सोय नव्हती. तो आपला ग्यानबा नाही तसा मोठा कास्तकार हाय तो, पण देवाच्या मर्जीपुढ का चालते जी. त्याच वावर तर नदीच्या काठावरच हाय पाणी उतराच नाव घेत नव्हतं. अमदा त्याले पीक घेता येईन का नाही आसच वाटत होतं. तवा तो नवस बोलला पाणी उतरु दे, पीक घेऊ दे आजनसऱ्याले कुडवभर पुरणाचा सैपाक करीन, बंद्या गावाले जेऊ घालीन. पाणी उतरलं जी आन त्याले शंभरेक पोते सोयाबीन पिकलं म्हणते. पऱ्हाटी सोयाबीनची दुसऱ्यांदा लावण करा लागली पण नुसकानी भरुन निंगाली. तस पायल तर अमदा ना सोयाबीनले भाव हाय ना कापसाले भाव हाय सारेच भाव उतरले हाय. आता नाही पेक्षा हे काय कमी होतं. दिवाळी झाली तसं त्यान आजनसऱ्याले सैपाक ठेवला. बंदा गाव जेवाले होता. त्याचीच चर्चा चालली होती. आमच्या आंगणात शेकोटी लावली होती म्या मारत्या आन गावातले दोन चार पोट्टेबाट्टे बसले होते. म्या मारत्याले म्हटलं
“बे मारत्या उद्या सकाळचा का ठरवलं बे?”
“आपल्याले का ठरवाच हाय जी मालकं.”
“मले ग्यानबा म्हणे हिंगणघाटच्या मार्केटात जाऊन आलू, कांदे, वांगे, मिरच्या अजून काही भाजी घेऊन ये जो.”
“आता जाच लागन ना तुम्हाले. देवाच्या कामाले नाही म्हणता का?”
“आबे तसं नाही बे. देवाच्या कामात म्या कधी नाही म्हटलं का. तू येथं बसून कोणत काम करनार हाय ते इचारल मी.”
“मले का कराच हाय जी. सकाळी बैल चारुन आणतो मंग जाइन तेथ बारा वाजेवरी.”
“तेथ बारा वाजतापासून का करणार हाय बे तू. बंद्या गावाचा सैपाक हाय तवा नैवेद्य वाढालेच दोन अडीच वाजते.”
“ते हाय म्हणा. आता आपल्याले अनुभव हायेच चार वाजते जेवाले.”
“म्या का म्हणतो येक पिक्चर मारुन याच का. भाजी टाकली का यायचा टेंम्पो जाते आजनसऱ्याले आपण जाऊ नागपूरले. पाहून येऊ कांतारा.”

आता मारत्या का नाही म्हणते. म्या येक टांग गाडीवर टाकत नाही तर तो दोन टांगा टाकून तयार रायते. बाहुबली, पुष्पा पायल्यापासून आमच्या गाववाल्यायले आता साऊथच्या पिक्चरचीबी चटक लागली. हिरो हिरोईन वळखीचे असो वा नसो पिक्चर पाहून येते. त्याच्यात फायटा लई जबरी रायते न जी. मी सकाळी मार्केटातून भाजी आन काही सामान घेतल, ग्यानबाचा टेंम्पोत लोड केल आन म्या, मारत्या, इस्वर, राहुल्या, किसन्या अशी बंदी गँग आपआपल्या फटफट्या घेऊन नागपूरले पोहचली. सकाळचाच शो पाहाचा होता तवा टिकिट भेटाले काही तकलीप झाली नाही.

पिक्चर सुरु झाला. कोण्या का राजाची गोष्ट चालू रायते. त्याच्या मनाले शांती भेटत नव्हती म्हणून तो परेसान होता. गावोगाव भटकत होता. त्याले एका गावात देवाचा दगड दिसला, आपल्या गावातली सटवाईच म्हणा ना जी. आन त्याच्या मनान म्हटल याच्यात काहीतरी शक्ती हाय. त्यान गाववाल्यायले सांगतलं तो देव मले द्या. तो पंजुर्ली देव हाय म्हणे. गाववाले काही बोलणार तसा तो देव त्या गावातल्या माणसाच्या आंगात आला. तो माणूस असा आंग हालवाले लागला, जोरात वरडला वॅओSSS. त्या आवाजानं मायी तंतरली. मारत्या तर अशी खुर्ची पकडून बसला का खुर्ची मोडते का अस वाटत होतं. कसा बोलत व्हता, कसा वरडत व्हता. तवाच म्या मनात म्हटलं जानराव भाऊ हे काहीतरी येगळंच रसायन दिसतं गड्या. आसं कुठं पाहाले भेटते जी पिक्चरमंधी. तवा त्या राजान त्या देवाचा आवाज जिथपावतर गेला तेवढी जमीन गाववाल्यायले देल्ली. आमच्या गावात बी सटवाईच्या तेथं कोणाच्या आंगात देवी येते. तेबी उपाव सांगते पण हे काही येगळंच व्हतं. देवाच्या तिथं मोठा खेळ होते त्याले भूत कोला म्हणते. त्या माणसाले देवावाणी रंगवते, त्याच्या कंबरेले नारळाच्या झाडाची पान बांधते. असा सजलेला तो नाचते रातभर. मंग त्याच्या आंगात पंजुर्ली देव येते. पंजुर्ली देवाचा का तो डांस, का ते गाण, का ते मुझीक. लय म्हणजे लयच मजा येत होती. त्या राजाच्या पुढच्या पिढितल्या लोकायन जमीनी वापस मांगतल्या. देवान त्याले समजावून पायल. तो मुजोर गडी त्यान देवालेच जाब इचारला. म्या म्हणतो कायले देवाशी हुज्जत घालाची जी. पंजुर्ली देवान त्याचा कोर्टाच्या पायऱ्यावर निकाल केला आन देव गायब झाला. ज्या माणसाच्या आंगात देव आलता त्या माणसाची बॉडीबी नाही सापडली म्हणे. मले येक प्रश्न पडला होता अजून काही दुसरी गोष्ट सांगनार हाय का हे अशी रामायण महाभारतासारखी पंजुर्ली देवाची गोष्ट हाय.

मंग लागली गावची जत्रा, तवा समजल नाही दुसरी गोष्ट बी हाय. मले तर आमच्या गावाचीच जत्रा आठवली, आकाशपाळणा, जिलेब्या, पुंग्या सारं होतं. मले जत्रेत फुगेवाले नाही दिसले बा. जत्रेत शर्यत रायते, गाढणातून डवरे हाकाची. तवा हिरोची एंट्री झाली. हा, हा, हा याले म्हणते येंट्री. तो असा तगडा पैलवाण हिरो, ते कायची शर्यत होती ते काही मले समजलं नाही, आपण बरसादीत डवरे नाही करत तसच काहीतरी होत पण येगळं होतं. त्याले बैल नाही रेडे म्हणजी आपले हले जुंपले होते. त्या गाढणातून जोऱात रेडे हाकनारा हिरो. त्यान दोन पाय ठेवून असा डवरा हाकला का आम्हा कास्तकाराची छाती अभिमानान भरुन आली, फुगुन गेली. म्या मारत्याले म्हटल
“मारत्या पाय अशी बंडी हाका लागते नाहीतर तू लेका.”
“तसे बैलं बी लागते” आमच्या मारत्याकडं कोणत्याबी प्रश्नाचं उत्तर तयारच रायते.

त्यायन डवऱ्याले हले जुंपले होते आमच्या गावातले हले तर काही कामाचे नाही जी. येक तर जगतच नाही जगले तरी काही कामाचे नाही. हे असे तगडे रेडे कुठुन आणले का. काही म्हणा हं लई दिसान पिक्चरमंधी अशी कास्तकारी पाहत होतो. दिल खूष झालतां. नाहीतर कास्तकारी म्हटल का भेगा गेलेली जिमीन आन रडके तोंडं करुन आभाळाकडं टक लावून बसलेला कास्तकार येवढच दाखवते. कास्तकारी लय म्हणजे लयच देवाच्या भरवशावर रायते याच्यात काही वाद नाही म्हणून काही कास्तकार हातावर हात धरुन आभाळाकड डोळे लावून बसला राहत नाही. काही ना काही करतच रायते, कराच लागते न जी सांगते कोणाल. कोण येत आपल्या मदतीले आपल आपल्यालेच पाहा लागते. कधी गणित चुकते कधी बराबर पडते सार आपल्यालेच निस्तरा लागते. असा तगडा गडी पण रातच्याले सपान पडलं का मायच्या कुशीत जाऊन झोपे. बंद्या गावाशी झगडून येते पण मायन मारलं का उठून पळते. मले तर लय हसू येत व्हतं. मी नाही गावात लोकायले गोष्टी सांगतो आसं करा, तसं करा पण बायको बोंबलली का पायात पायताण घालून घराच्या भायेर निंगतो. तिच्यासंग कोण बोलनं जी ते भडकली का पार राजधानी एक्सप्रेस हाय तोंडाचा असा पट्टा चालू करते का थांबाच नावच घेत नाही ना वर्धेल थांबत ना चंद्रपूरले.

हिरो तर आला पण हिरोईन कोठ हाय. मले तवा समजल तो हिरो म्हणजे तो मेला तो नर्तक नाही ज्याच्या आंगात देव आलता त्याचा पोरगा होता. तसं देवाच काम यान कराले पायजेन पण ते बदमाश पोंट्ट गावभर उरफाटे धंदे करत हिंडत रायते अशा पोट्ट्याले देवाच काम कस देईन जी, कोणी दुसरा करते. आपला हिरो लहान होत तवा बी येका पोरीकड पाहत होता आता बी हिरो येका पोरीकडं पाहत रायते. मले काही ते पोरगी हिरोईन वाटत नव्हती. मले तर राहुल्याच्या बायकोसारखी दिसत व्हती. त्याच आता उन्हाळ्यात लगीन झालतं म्या त्याले म्हटलं
“का बे राहुल्या तुयी बायको लग्नाआधी पिक्चरमंधी काम करत व्हती का?”
“काही काजी जानराव. तिनं पिक्चरमंधी काम केलं असत तर मायाशी लगन केल असत का?”

त्याच म्हणण बराबर होतं म्हणा. कोणी शिनेमावाली थोडी आमच्या गावातल्या राहुल्याशी लगन करनार होती. मंग समजल तेच पिक्चरची हिरोईन व्हती. गावातली स्टोरी, गावातला हिरो तर त्याले शोभन अशीच गावातली वाटनं अशी पोरगी हिरोईन होती. याले म्हणते दिमाग, गावातल्या चार पोरीत उठून दिसन अशी पोरगी हिरोईन. नाहीतर लेकाचे शयरातल्या दिसनाऱ्या पोरीले गावातले कपडे घालते ते बी बराबर नाही. तिले हिरोईन म्हणून आमाले दाखवते. अजी तशा पोरी गावात राहत नाही आन राहिल्या बी ना तरी ते पिक्चरमंधी दाखवते ना तशी कापडं घालून गावातली कोणती पोरगी हिंडत नाही. ज्यायन कधी गाव पाहिला नाही ते चालले गावावर पिक्चर बनवाले. म्हणून या पिक्चरमधला गाव, हिरो आन हिरोइन पाहून आपण खूष झालतो. उडत होतं.

मंग आला विलन फारेस्ट हापिसर, हे तगडा गडी. आमच्या गावातल्या रानडुकरायचा लय तरास झालाय त्याचा बंदोबस्त कराले धाडून द्या म्हणा त्याले. साध्या बनियानात बी त्याले पायलं ना तरी तो फारेस्ट हापिसरच वाटनं. त्याचा येकच मकसद रायते आपल्या हिरोले जेलात टाकाच. तो हात धुवुन त्याच्या मांग लागते जी. जेथ हिरो जाईन तेथ तो, दिवस पाहत नाही का रात्र. ते हिरोईन बी फारेस्टातच नोकरीले लागली रायते, हा तिलेबी त्याच्या इरोधात पाठवते. तगडा हिरो, त्याची हिरोईन आन त्याले तोडीस तोड विलन कशी मस्त भट्टी जमून रायली न जी, अशी भट्टी जमल्याबिगर मजाच नाही येत न जी. येक दिस बराबर हिरो त्याच्या हातात गावते आन तो त्याले जेलात टाकते. गोष्ट येथ संपत नाही पण म्या इतकीच गोष्ट सांगनार.

तुम्ही म्हणान जानराव ते हिरो, हिरोईन ठिक हाय बे पण त्या राजाच आन देवाच का झाल. आता का बंदी स्टोरी म्याच सांगू तुम्हाले. माया पैशानच पिक्चर पाहान का जी. आपल्या पदरचे पैशे खर्च कराना टाकीजमंधी जाऊन पिक्चर पाहा तवा सारी स्टोरी समजते. काही माये अंदाजबी चुकले असन का नाही. आपण पाहून आपण ठरवाच ना. येक सागतो येका टायमाले मात्र माया दिमाग आऊट झालता, यायन पिक्चरमंधी हिरोले मारलं जी. यायले बी कास्तकाराच मरणच दाखवाच होतं का. कास्तकाराच मरण दाखवून लय लोकायन पैसे कमविले. त्याच्यानंतर पिक्चरमंधी जे काही होते ते लिहाले तुमच्या आंगात देवच आला पायजे. मायासारख्या ऐऱ्या गैऱ्याच कामच नाही ते. म्या डोये वटारुन बिल्कुल न हालता फकस्त पाहत होतो. डोकं सुन्न झालतं. पिक्चर संपून गेला तरी आपण का पायल ते डोक्यातून जात नव्हतं. म्या येकटाच असा होतो का नाही जी बंदे तसेच. कोणी कोणाशी काही बोलत नव्हतं, साऱ्यायची तोंड बंद. आजनसऱ्याले पोहचलो तसे पाय धुवुन शिद्द देवाच्या गाभाऱ्यात गेलो आन देवाले म्हटल “हे देवा आम्हा कास्तकाराचा तूच येकटा वाली हाय. तवा तुयी किरपा अशीच राहू दे देवा.” परसाद खाले तोंड उघडल तवा मनातल्या मनात जोरात वरडलो “वॅओSSSSS”

लिहनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट, जि. वर्धा

मित्रहो
https://mitraho.wordpress.com

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

10 Jan 2023 - 9:48 am | टर्मीनेटर

वऱ्हाडी ठेचा आवडला 👍
हा सिनेमा पाहिलेला नाही (आणि पाहण्याची शक्यताही नाही 😀) त्यामुळे सगळे संदर्भ लागले नसले तरी वाचायला मजा आली!

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jan 2023 - 11:31 am | राजेंद्र मेहेंदळे

सिनेमा चकटफु घरीच पाहीला आहे, त्यामुळे पैसे वाचले पण डोक्याला शॉट झाला. मात्र आता हे विडंबन वाचुन मस्त करमणुक झाली. तो फॉरेस्ट ऑफिसर ड्वेन जॉन्सनसारखा दिसतो. (जर्नी टु द सेंटर ऑफ द अर्थ किवा नवीन जुमांजी बघा)

नि३सोलपुरकर's picture

10 Jan 2023 - 1:19 pm | नि३सोलपुरकर

Production House of Hombale Film's announced that " Kantara " has received 2 Oscar qualifications .

“वॅओSSSSS”

Bhakti's picture

10 Jan 2023 - 1:21 pm | Bhakti

मले आवडलं !
कास्तकारीची गोष्ट , बरोबर :)

कुमार१'s picture

10 Jan 2023 - 1:56 pm | कुमार१

वाचायला मजा आली!

मित्रहो's picture

11 Jan 2023 - 10:20 am | मित्रहो

धन्यवाद टर्मीनेटर, राजेंद्र मेहेंदळे, नि३सोलपुरकर, Bhakti, कुमार १
कालच जाहीर झालेल्या ऑस्करच्या नामांकन यादीत उत्कृष्ठ सिनेमा आणि उत्कृष्ठ अभिनेता या दोन पुरस्कारासाठी कांतारा टिकून आहे.
त्याच यादीत मराठी सिनेमा मी वसंतराव देखील आहे.

सस्नेह's picture

12 Jan 2023 - 5:09 pm | सस्नेह

=)))
लै भारी व-हाडी माप काढले जी

मित्रहो's picture

13 Jan 2023 - 2:03 pm | मित्रहो

धन्यवाद सस्नेह

श्वेता२४'s picture

13 Jan 2023 - 2:20 pm | श्वेता२४

मस्तच लिहीलं आहे. माझी एक विदर्भातली मैत्रीण अशीच बोलते. त्यामुळे हा लहेजा माहित होता. मजा आली वाचताना.

चांदणे संदीप's picture

13 Jan 2023 - 2:20 pm | चांदणे संदीप

जबरदस्त. कांतारा पाहिलाय आणि आवडलाही. तसाच हा लेखही फर्मास, खूपच भारी!

सं - दी - प

मित्रहो's picture

13 Jan 2023 - 3:04 pm | मित्रहो

खूप धन्यवाद संदीप चांदणे आणि श्वेता२४

विवेकपटाईत's picture

14 Jan 2023 - 12:17 pm | विवेकपटाईत

सिनेमा बघितला होता त्यामुळे विडंबन वाचताना लय मजा आली. वाचून एखाद्या सिनेमाचं व्हिडिओ म्हण लिहायची इच्छा मनात होत आहे.

मित्रहो's picture

15 Jan 2023 - 10:25 am | मित्रहो

धन्यवाद विवेकपटाईत
विडिओ करा छान होईल

प्रशांत's picture

15 Jan 2023 - 12:17 pm | प्रशांत

विडंबन लय आवडल मले, मस्त हो जानराव

मित्रहो's picture

15 Jan 2023 - 12:43 pm | मित्रहो

धन्यवाद प्रशांत