इन्शुरन्स कंपन्यांची फसवेगिरी

Primary tabs

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
30 Nov 2022 - 12:58 pm

पॉलिसी च्या नावाखाली इन्शुरन्स कंपन्या सामान्य माणसाची कशी मनमानी लूट करत आहेत, याचा नुकताच अनुभव आला.
२००९ मध्ये मी पीएनबी मेटलाईफ कंपनीकडून एक युनिट लिंक्ड लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली. वर्षाला एक लाख हप्ता आणि पुढची ५६ वर्षे १५ लाखाचे जीवनविमा कव्हर. पहिले ३ हप्ते कंपल्सरी नंतर ऑप्शनल.
मी पॉलिसी घेतली आणि दोनच वर्षांनी सदर पॉलिसी नवीन ग्राहकांसाठी बंद करण्यात आली.
पॉलिसी च्या नियमाप्रमाणे मी ५ वर्षांनंतर म्हणजे २०१५ मध्ये ₹ ७५०००/- पार्शल विथड्रॉवल घेतले. त्यावेळी पॉलिसी फंड व्हॅल्यू ₹ ३२५०००/- शिल्लक असल्याचे मला सांगण्यात आले. यानंतर २०२० मध्ये मला कंपनीचे वेगवेगळे प्रतिनिधी ३ वेळा भेटावयास आले व सदर पॉलिसी फारशी फायदेशीर नसून ती मी बंद करावी व कंपनीच्याच इतर काही पॉलिसीज भरपूर नफा देणारया आहेत त्यात गुंतवणूक करावी अशी गळ घातली. तथापि मला त्यात तथ्य न वाटल्याने मी ते नाकारले.
यानंतर गेल्या वर्षी २०२१ मध्ये मी पुन्हा ₹ १५००००/- पार्शल विथड्रॉवल घेतले तेव्हा फंड व्हॅल्यू शिल्लक ₹ २०००००/- असल्याचे मला सांगण्यात आले.
यानंतर नोव्हेंबर महिन्यात मी पुन्हा पार्शल विथड्रॉवल करण्यासाठी गेले असता मला सांगण्यात आले की फंड व्हॅल्यू शिल्लक ₹ १६८०००/- आहे. मी विचारले की गेल्या वर्षी ₹ २०००००/- शिल्लक होते व यावर्षी मार्केट इंडेक्स सुमारे १०००० नी वधारला असताना फंड व्हॅल्यू कमी कशी झाली ? त्यावर हे कंपनीचे गुंतवणूक धोरण आहे त्यावर आम्ही सांगू शकत नाही असे सांगण्यात आले. मग मी गेल्या ४ वर्षांचे फंड स्टेटमेंट मागून घेतले तर फंड व्हॅल्यू दर वर्षी २० टक्क्यांनी कमी होत आहे असे दिसून आले. शेअर मार्केट निर्देशांक चार वर्षात वाढत असून ही ही तूट का याचे उत्तर कंपनीकडून मिळाले नाही.
यात मेख अशी की फंड व्हॅल्यू एक प्रिमियम रकमेपेक्षा कमी झाली की पॉलिसी आपोआप लॅप्स/ रद्द होते व ती तूट वजा जाता राहिलेली रक्कम विमाधारकाला परत दिली जाते.
आता असेच सुरू राहिले तर दोनेक वर्षांनीं माझी फंड व्हॅल्यू नक्कीच एक लाखाहून कमी होणार आणि पॉलिसी आपोआप रद्द होणार हे मला स्पष्ट दिसून आल्यामुळे मग मी सरळ पॉलिसी सरेंडर केली आणि तूट वगळता इतर रक्कम परत मिळण्यास अर्ज केला.
एकूणच असे निरीक्षण झाले की सदर विमा योजना ग्राहकांना फायदेशीर असली तरी कंपनीसाठी फायद्याची नव्हती. म्हणूनच ती त्वरित बंद केली गेली.
अशा प्रकारे २००९ ते ११ साली गुंतवलेल्या ३ लाख रुपयांचे मला २०२२ अखेर ₹ ४ लाख मिळाले. बाकीचे अक्कल खाती !

धोरणप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

30 Nov 2022 - 2:06 pm | वामन देशमुख

विमा आणि गुंतवणूक या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना वेगवेगळ्या रीतीनेच हाताळायला हवं.

सौंदाळा's picture

30 Nov 2022 - 4:17 pm | सौंदाळा

वामन देशमुख यांच्याशी सहमत
विम्या साठी लाईफ टर्म योजना, हॉस्पिटलायझेशनसाठी मेडिक्लेम आणि गुंतवणूकीसाठी शेअर बाजार, सिप, म्युट्युल फंड, पीपीएफ वगैरे
अनुभव लिहिलात बरे झाले. पुढच्यास ठेच मागचा शहाणा.

बादवे चांगली मेडिक्लेम पॉलिसी कोणी सुचवेल का? (नवरा-बायको चाळीसच्या आतील आणि मुलगी १० वर्षे)

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Nov 2022 - 4:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी मॅक्स न्युयॉर्क लाईफ ची अशीच एक युनिट लिंक्ड पॉलिसी घेतली होती. ३ वर्षे हप्ते भरले, पण नंतर काही कारणाने पॉलिसी सरेंडर करावी लागली तेव्हा जेमतेम अर्धी रक्कम मिळाली. ३ वर्षे हप्ते भरा आणि विसरुन जा अशी जाहिरात करायचे, कारण तेव्हा मार्केट तेजीमधे होते त्यामुळे ३ वर्षंनी फायदा हा हप्त्याहुन जास्त होईल असे गणित होते. बहुतेक कंपन्या पहीली ३ वर्षात ऑफिस अ‍ॅडमिन आणि ईतर खर्च वसूल करुन घेतात त्यामुळे आपले रिटर्न्स कमी होतात.

१. विमा कधीच नफ्यासाठी नसतो, तो केवळ जोखीम कमी करण्यासाठी/आपत्कालीन योजना म्हणुन घ्यावा.
२. एक टर्म ईन्शुरन्स वेगळा घ्यावा (किमान घरातील मुख्य कमावत्या व्यक्तीने) म्हणजे त्याच्या पश्चात/आकस्मिक मृत्युनंतर कुटुंबाला मोठी रक्कम मिळु शकते.
३. नफ्यासाठी शेअर्स,म्युच्युअल फंडस, पी पी एफ,सोने वगैरे आहेतच.
४. काही रक्कम रोख तरलतेसाठी एफ डी. मध्ये असावी.

हे सगळे उशिरा आलेले शहाणपण आहे.

सुबोध खरे's picture

30 Nov 2022 - 8:29 pm | सुबोध खरे

आर्थिक नियोजनातील पहिला नियम म्हणजे विमा आणि गुंतवणूक याच काहीही संबंध नाही. त्यामुळे अशी दुहेरी पॉलिसी कधीही घेऊ नये.( हा आपल्याला सल्ला नसून आपण पोळल्या गेल्या आहात त्यातून इतरांनी घ्यायचा धडा आहे)

आपल्याला ५० हजार रुपये वर्षाला बचत करायची आहे तर
विमा उतरवायचा तर तो केवळ आणि केवळ टर्म इन्शुरन्स असावा म्हणजे तुमचे वय ४० वर्षे आहे आणि तुमचा ५० लाखाचा फक्त विमा घेतला तर त्याचा हप्ता
वर्षाला १० हजार येत असेल (एक उदाहरण म्हणून दिले आहे). तर १० हजार रुपये भरून मोकळे व्हायचे.

त्या वर्षात आपण मेलो नाही म्हणजे आपण सुदैवी आहोत हे समजून ते पैसे गेले म्हणून सोडून द्यायचे.

उरलेले ४० हजार रुपये आपण सर्वात सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर PPF मध्ये टाकावी. अन्यथा बँकेच्या मुदत ठेवी पासून म्युच्युअल फंड पासून बाजारात समभागात गुंतवणूक करून आपण उत्तम परतावा मिळवू शकता.

आपला विमा एजंट हा नेहमी स्वतःच्या फायद्याचाच विचार करत असतो (आणि स्वार्थात परमार्थ म्हणून) तुमचा हि फायदा होईल असे पाहत असतो असेच मी म्हणेन.

एखादा तसा नसेल तर तो अपवादच

तुषार काळभोर's picture

30 Nov 2022 - 9:47 pm | तुषार काळभोर

१. विमा व गुंतवणूक एकत्र करू नये.
२. कुठल्याही एजंटला आपल्या ग्राहकाच्या/क्लाएन्टच्या हिताची कणभरही परवा नसते. त्याच्यासाठी एकमेव महत्वाची गोष्ट म्हणजे कमिशन.
त्यामुळे,

यानंतर २०२० मध्ये मला कंपनीचे वेगवेगळे प्रतिनिधी ३ वेळा भेटावयास आले व सदर पॉलिसी फारशी फायदेशीर नसून ती मी बंद करावी व कंपनीच्याच इतर काही पॉलिसीज भरपूर नफा देणारया आहेत त्यात गुंतवणूक करावी अशी गळ घातली.

हे फक्त आणि फक्त त्यांनाच फायदेशीर असतं.
३. एजंट अगदी कोणीही (भाऊ, बहीण, वहिनी, दाजी, मेहुणा, मेहुणी, साडू, जावई, सून, सासू, सासरे, मामा, मामी, आत्या, भाचा, भाची, पुतण्या, पुतणी, शेजारचा, पाजारचा, गावचा, भावकीतला, आईच्या माहेरचा, बायकोच्या माहेरचा, ऑफिसमधला मित्र, ऑफिसमधली मैत्रीण, मॉर्निंगवॉकला भेटणारा, सोसायटीच्या कार्यकारिणीतला.....................कोणीही!!) असो, नाही म्हणायला शिकायचं.

आता माझ्या फसवणुकीची कथा -
२०१४ पासून मी भारती अ‍ॅक्साचा (ऑनलाइन) आरोग्य विमा घेतला होता. नो क्लेम बोनस म्हणून दरवर्षी प्रिमियमवर ५% सूट मिळायची. त्यावेळी भारती अ‍ॅक्साच्या साईटवर नुतनीकरणाचा थेट पर्याय नव्हता. आपला विमा नंंबर टाकल्यावर, ग्राहक सेवा केंद्रातून फोन येतो. मग ते आपल्याला एसेमेस ने पेमेंट लिंक पाठवतात. पेमेंट केल्यावर दोन दिवसात पॉलिसीची नवीन कागदपत्रे येतात. (आता थेट पेमेंटचा पर्याय आहे).
तर २०२० मध्ये मला फोन आला, त्यांनी सांगितलं की तुमचा आरोग्य विमा नुतनी करणाचा प्रिमियम क्ष्क्ष आहे (जो आधीच्या दुप्पट होता). मी सांगितलं, की मागील पाच वर्षे मी क्लेम न केल्याने माझा प्रिमियम दरवर्षी कमी होतो, मग आता का वाढतोय? तर त्यांनी सांगितलं की सध्या कोरोनामुळे सर्वच विमा कंपन्यांनी प्रिमियमच्या रकमा दुप्पट केल्या आहेत. मी सांगितलं की मला हे इमेल ने कळवा. मला तसा इमेल आला. फ्रॉम अ‍ॅड्रेस, लिंका, लिंकवर क्लिक केल्यावर येणारं पेमेंट गेटवेचं पेज हे सर्व जेन्युइन दिसत होतं होतं. मी तो ग्राहकसेवाकेंद्राला पाठवून विचारलं , तर त्यांनी जेनेरिक उत्तर दिलं की तुम्हाला आलेला इमेल नोंदणीकृत एजंटकडून आल्याची खात्री करून मगच पेमेंट करा. तोपर्यंत मुदत संपत आल्याने, मी लिंकवर क्लिक करून पेमेंट केलं. दोन दिवसात पॉलिसी डॉक्युमेंटपण आले.
आता पेमेंट केलं ते जेन्युइन होतं. कागदपत्रे आली ती जेन्युइन होती. मग फसवणूक कोठे झाली?
तर कागदपत्रानुसार माझ्या पॉलिसीचं पहिलं वर्ष होतं! म्हणजे मला चक्क नवी पॉलिसी विकली होती! (किंवा नव्या योजनेत ट्रान्सफर केलं होतं). तोपर्यंत वाढलेल्या वयाप्रमाणे मग दुप्पट प्रिमियम भरावं लागलं होतं. ग्राहक सेवा प्रतिनिधीशी थोडा वाद घातला, पण मी स्वतः "आय अ‍ॅक्सेप्ट"वर क्लिक करून ती पॉलिसी घेतल्याने ती माझी ऐच्छिक निवड असल्याचे त्यांनी सांगितलं.
पैसे तर गेलेच होते, मग २०२१ पर्यंत ते सहन करून एका "खर्‍या" एजंटकडून स्टार हेल्थचा आरोग्य विमा घेतला. आता पुढे काय होईल आणि कसा अनुभव येईल, ते येणारा काळच सांगेल!

विम्याचा फायदा हा फक्त, विमा कंपनीला, एजंट लोकांना आणि कुटुंबातील व्यक्तींना होतो...

वामन देशमुख's picture

1 Dec 2022 - 8:53 am | वामन देशमुख
विम्याचा फायदा हा फक्त, विमा कंपनीला, एजंट लोकांना आणि कुटुंबातील व्यक्तींना होतो...

कुणाच्या कुटुंबातील व्यक्तींना?
विमा विक्रेत्यांच्या?

मुक्त विहारि's picture

1 Dec 2022 - 10:56 am | मुक्त विहारि

हो

विमा म्हणजे जोखमीतून मुक्तता एवढाच भाग लक्षात ठेवायचा.

श्वेता२४'s picture

1 Dec 2022 - 11:36 am | श्वेता२४

लेखिकेने लेखात जे सांगितले आहे, त्या काळात या गोष्टींचे खूप पेव फुटले होते . कोणीही टर्म इन्शुरन्सबद्दल बोलत नव्हते. सामान्य माणसाला शेअर्स,म्युच्युअल फंड वगैरे माहित नव्हते. लोक त्यातल्या त्यात एलआयसी वगैरैमधअये गुंतवणूत करायचे. हो. गुंतवणूकच. मी पॉलीसी घेतली तर मला काय मिळेल याचाच लोक विचार करत. माझ्या मृत्यूनंतर काय होईल असा ते विचारच करत नसत. माझे हे निरीक्षण साधारण २००५-२०१० या सालातले आहे. साधारण २०१०-१३ च्या आसपास टर्म इन्शुरन्स बद्दल व म्युच्युअल फंडबद्दल जागरुक होऊ लागले.त्यावेळी मा बॅंकेत होते. व लोकांना टर्म इन्शूर्नसबद्दल खूप कन्विन्स करावे लागायचे. आता सगळीकडे फायनान्शिअल प्लानिंगबद्दल लोक जागरुक झाले असल्याने विमा व गुंतवणूक या दोन वेगळ्या गोषअटी आहेत हे लोकांना कळू लागलेय.

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2022 - 6:03 pm | चौथा कोनाडा

साधारण २०१०-१३ च्या आसपास टर्म इन्शुरन्स बद्दल व म्युच्युअल फंडबद्दल जागरुक होऊ लागले.

हा वीमा संकल्पना उच्च मध्यम वर्ग ते तळागाळा पर्यंत पहिला टप्पा होता असं म्हणावे लागेल. खालच्या कष्टकरी वर्गाला तर जगण्याची मारामार , वीमा हप्ता कोठून भरणार ? मर्यादित पांढरपेशे ज्यांचे वेतन बर्‍यापैकी आहे त्यांनी "मनी बॅक" पॉलीसी डोक्यावर घेतली. कारण त्यांना मेल्या नंतर होणार्‍या फायद्या पेक्षा जीवंत असतानाच "बॅक" मध्ये मिळणारे पैसे महत्वाचे वाटायचे .. अश्या बॅक मिळालेल्या पैशाचा वेळोवेळी उपयोग व्ह्यायचा. म्हणून अशा "गुंतवणूक" पॉलीसीजचा प्रचार प्रसार केला गेला. एलआयसीची मुळं घट्ट रोवली गेली.

पुढचा टप्पा "वीमा + गुंतवणुक" अशा प्रकारच्या पॉलीसीज द्वारे केला गेला ... उच्च मध्यम वेतन वर्ग यांचे लक्ष्य होते, हे ही चांगले साध्य होत गेले. याच दरम्यान खासगी वीमा कंपन्यांचा उदय झाला. एलआयसी सारख्या कंपन्यांनी आधीच बाजार काबीज केला होता, स्पर्धे साठी नविन संकल्पनानाचा मारा केला गेला. "टर्म इन्शुरन्स" या नावामुळेच आपला साधा इन्शुरन्स आहे ना, मग हा "टर्म इन्शुरन्स" कशाला हवा ही मानसिकता झाली होती. तथापि टर्म इन्शुरन्स लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली. ज्यांच्या कडे गुंतवणुकीसाठी वेगळी आणि वीम्यासाठी वेगळी रक्कम होती (अर्थात उच्च आणि उच्च मध्यमवर्गीय गट) हे टर्म इन्शुरन्सचे हप्ते भरू लागले.

पण एकंदरीत मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय हे "मनी बॅक" अ थ वा वीमा+गुंतवणूक पॉलीसीजच घेत राहणार.
आणि एकदा "गुंतवणूक" (आणी यात जोखीम असतेच) म्हटलं की धाग्यात लिहिलेत तसे अनुभव येत राहणार !

सगळीकडे फायनान्शिअल प्लानिंगबद्दल लोक जागरुक झाले असल्याने विमा व गुंतवणूक या दोन वेगळ्या गोषअटी आहेत हे लोकांना कळू लागलेय.

अगदी.

तुमचा अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद श्वेता२४.

सुबोध खरे's picture

1 Dec 2022 - 6:55 pm | सुबोध खरे

एलआयसी वगैरैमधअये गुंतवणूत करायचे. हो. गुंतवणूकच

एलआयसी वगैरै मध्ये गुंतवणूक नसून फसवणूक आहे हे मी गेली ४० वर्षे पाहत आलो आहे.

१९८१ मध्ये आमच्या वडिलांना त्यांच्या एका मित्राने एल आय सी ची कुठली तरी पॉलिसी विकली ज्याचे प्रीमियम रुपये १००० होते. वीस वर्षे असे १००० रुपये भरल्यावर त्यांना त्यातच २२००० रुपये परत मिळाले.

याच मित्राला मी हेच पैसे जर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सरकारची (त्याकाळची) जनता अपघात विमा योजना यात गुंतवले असते तर किमान चौपट पैसे परत मिळाले असते असे कागदोपत्री दाखवून दिले होते. हि विमा योजना अशी होती कि १० रुपये भरा आणि १० हजाराचा विमा एक वर्षासाठी घ्या. तुम्ही कितीही पटीत याचे प्रीमियम भरू शकत होता. म्हणजे १०० रुपये भरले तर १ लाखाचा विमा दर वर्षी. बाकी ९०० रुपये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मध्ये टाका.

या दोन्ही गोष्टीत आपल्याला विम्यासारखीच कर सवलत मिळत असे.

अर्थात "तुमचा मुलगा आगाऊ आहे" असे त्यांनी यावर आमच्या वडिलांना माझ्या परोक्ष सांगितले.

त्याला उत्तर म्हणून मी त्यांना तुमच्या मित्राला "यातून किती नफा झाला आणि हा माणूस स्वार्थी कसा आहे" हे हि दाखवून दिले.

कानडाऊ योगेशु's picture

1 Dec 2022 - 6:20 pm | कानडाऊ योगेशु

मेडिक्लेम एजंटांची अजुन एक क्लृप्ती म्हणजे आधी पॉलिसी आपल्याला विकतात व नंतर त्यांच्या मेडिकल टीम चा काहीतरी मेल येतो कि पॉलिसी रद्द झाली आहे अमुक अमुक कारणाने. पैसे वगैरे सगळे मिळते पण नुसता मनस्ताप.

सस्नेह's picture

1 Dec 2022 - 6:25 pm | सस्नेह

मेडिक्लेम मध्ये दातांची ट्रीटमेंट कव्हरेज नाही, डोळ्यांची अंशत: म्हणजे अर्ध्यापेक्षा ही कमी रक्कम आणि हॉस्पिटलायझेशनची अनेक चाळण्या लावून सुमारे 60-70 टक्के इतकीच रक्कम मिळते. शिवाय 55-60 नंतर हेवी प्रिमियम असतो.


मेडिक्लेम मध्ये दातांची ट्रीटमेंट कव्हरेज नाही


हो ना ,इतके वर्ष दातांच दुखणं घरात कोणाचं नव्हतं आता एक एक सुरु झालंय तर हाच प्रश्न पडतोय
कव्हरेज का नाही?

सुबोध खरे's picture

1 Dec 2022 - 7:02 pm | सुबोध खरे

सरकार तर्फे अनेक योजना सामान्य नागरिकांसाठी राबवल्या जातात.

परंतु बँका, विमा एजंट आणि खाजगी वित्त सल्लागार यापैकी कोणीही याला आश्रय देत नाही. आणि निम्न वर्गीय लोक कागदोपत्रींची कटकट म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. सार्वजनिक बँका सुद्धा "नसती कटकट" नको म्हणून या योजनांचा प्रसार करण्यात भरपुर कुचराई करतात

यामुळे या योजना ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांपर्यंत पोचत नाहीत.

समाजसेवेत आपला खारीचा वाटा म्हणून आपण आपल्याकडे येणाऱ्या कर्मचारी वर्गाला या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतो.

https://financialservices.gov.in/insurance-divisions/Government-Sponsore...

या दुव्यावर मुद्दाम एक क्लिक करून पहा.

आग्या१९९०'s picture

1 Dec 2022 - 7:48 pm | आग्या१९९०

१९९४ साली माझ्या विमा एजंट मित्राने तेंव्हा नुकतीच लाँच झालेली विमा किरण पॉलिसी घेण्यासाठी मला आग्रह केला होता, त्याने सगळ्या पॉलिसिंपेक्षा ही कशी अधिक फायदेशीर आणि स्वस्त आहे हे समजावून सांगितले. तेव्हा मी नुकतीच शेअरमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली होती. मनी बॅक पॉलिसीपेक्षा खूप कमी प्रीमियम असल्याने मीही तयार झालो आणि २५ वर्षाच्या मुदतीची दीड लाखाची बिमा किरण पॉलिसी काढली. २५ वर्ष पूर्ण होऊन maturity रक्कम मिळाली. पुढील १० वर्ष without premium जीवन विमा संरक्षण चालू राहील. ह्या २५ वर्षात मी परत कुठलीही जीवन विमा पॉलिसी काढली नाही. शेअर मध्ये गुंतवणूक केल्याने आतापर्यंत मिळालेला परतावा हा maturity amount पेक्षा कैकपट अधिक आहे. त्या वर्षामध्ये मी सोडल्यास विमा एजंट मित्राला एकाही क्लायंटला टर्म इन्शुरन्स पॉलिसी विकता आली नाही. मित्राचा अजून एक सल्ला मी पाळला, टॅक्स वाचवण्यासाठी कोणतीच योजना घेऊ नको, तुझा शेअरचा अभ्यास चालू ठेव आणि त्यातच गुंतवणूक कर, ९४ साली मला असा सल्ला देणारा एकमेव मराठी मित्र होता. त्याचा मला खूप फायदा झाला.

चौथा कोनाडा's picture

1 Dec 2022 - 10:02 pm | चौथा कोनाडा

व्वा, भारी !
असे लोक योग्यवेळी भेटणारा नशीबवान माणूस असतो !

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर वाढदिवसीच मृत्यू; डॉ खुर्जेकरांच्या कुटूंबीयांना पावणेसात कोटी रूपयांची भरपाई मिळणार !

हे अन्याय कारक आहे असे काही वीमा अभ्यासकांचे म्हणणे आहे !

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/maharashtra-pune-mumb...

अतिशय अन्यायकारी निर्णय. अशीच प्रचंड नुकसान भरपाई देत बसले तर वाहनांचा उत्तरदायित्व विमा महाग होत जाणार. एक तर द्रुतगती मार्गावर वाहन थांबविणे बेकायदेशीर आहे. त्यातही वाहन नादुरुस्त झाल्यास ते रस्त्याच्या बाजूला घेऊन (पांढर्‍या रंगाच्या पट्ट्यांनी बफर झोन दर्शविलेले आहेत) दर्शक दिवे (इंडिकेटर्स) लावणे गरजेचे आहे. इथे तर वाहन चालक टायर बदलत असताना शेजारी उभे राहणे हे पूर्णतः चूकीचे होते (द्रुतगती मार्गावर पादचार्‍यांनाही बंदी आहे).

अशा प्रकारे तीन कायद्यांचा ढळढळीत पणे भंग झालेला असल्याने पीडिताच्या वारसास विमाकंपनीने भरपाई देण्याची अजिबात गरज नव्हती. यापूर्वी अशा घटना झालेल्या आहेत ज्यात पीडित व्यक्तिने झेब्रा क्रॉसिंग व्यतिरिक्त इतरत्र रस्ता ओलांडला असता (कायदेभंग) त्यास वाहनाची धडक बसून मृत्यू झाल्यावर सदर पीडिताच्या वारसास नो फॉल्ट लायबलिटी वगळता इतर कोणतीही रक्कम विमा कंपनीने देण्याची गरज नाही असा निर्णय न्यायालयाने दिलेला होता.

बरोबर आहे का मिपाकर्स ?

नेत्रेश's picture

4 Dec 2022 - 12:27 pm | नेत्रेश

हा जर अपघात होता तर योग्य नुकसान भरपाई देण्याची वीमा कंपनीची जबाबदारी आहे. पीडित व्यक्ती डॉक्टर होती. त्यांनी पुढील आयुष्यात सात लाखांपेक्षा जास्तच कमावले असते (जे त्यांनी आतापर्यंत भरलेल्या आयकरावरुन सीद्ध होइल). त्यांचे वारस त्या प्रमाणात नुकसान भरपाई मागु शकतात, व ती देण्याची वीमा कंपनीची जबाबदारी आहे. विमा महाग होत जाणार या कारणासाठी पीडित व्यक्तीच्या वारसांना योग्य भरपाई नाकारणे चुकीचे आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Dec 2022 - 3:52 pm | चौथा कोनाडा

त्यांनी पुढील आयुष्यात सात लाखांपेक्षा जास्तच कमावले असते.

भरपाई रक्कम सात कोटी आहे !

विमा महाग होत जाणार या कारणासाठी पीडित व्यक्तीच्या वारसांना योग्य भरपाई नाकारणे चुकीचे आहे.

विमा महाग होत जाणार म्हणून जास्त भरपाई नाकारली जाते असे नसून ... जास्त भरपाई दिली की वीमा कंपनीचा लॉस होतो किंवा प्रॉफिट कमी होते त्यामुळे हप्ता वाढवावा लागतो असे म्हणतात.
वीमा हप्ता वाढला की मोठे दुरगामी परिणाम होतात. या वर जास्त माहिती तज्ज्ञच सांगू शकतील.

त्याच बरोबर एवढी भरपाई देताना कायद्यांचा भंग झाला असे संबंधित अभ्यासकांचे म्हणणे आहे.

कपिलमुनी's picture

5 Dec 2022 - 11:41 pm | कपिलमुनी

ड्रायव्हर ला किती भरपाई दिली हे गुलदस्त्यात आहे

चौथा कोनाडा's picture

8 Dec 2022 - 11:01 pm | चौथा कोनाडा

त्या बद्दल काही माहिती नाहीत बातमीत.
त्या गाडीच्या मालकाने ड्रायव्हर सहित विमा काढला असेल तर तो मिळाला असेल.

राघव's picture

6 Dec 2022 - 2:19 am | राघव

इन्शुरन्स कंपन्या केवळ फायदा कमवण्यासाठी बसलेल्या आहेत हे सत्य आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ तेवढे उत्तम.
त्यात आपण कितीही भांडलो तरी इन्शुरन्स कंपन्या सहज गोष्टी नाकारून पुढे जातात.
पण यावर एक चांगला उपाय आहे, अर्थात् आपली केस मजबूत हवी -

माझे बाबा स्टेट बँकेतून साधारण दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले तेव्हा त्यांना दोन पॉलिसी कव्हर मिळाल्यात, ज्यांचं प्रिमियम दरवर्षी ते भरत असतात. अर्थात् स्टाफ असल्यामुळे ते बरंच कमी आहे. या पँडेमिक च्या सुरुवातीला त्यांच्या दोन अ‍ॅजिओप्लास्टी झाल्यात. त्यात दुसर्‍या सर्जरीच्या वेळेस डाव्या ढोपराजवळ थ्रॉम्बोस झाला आणि त्यामुळे बराच त्रासही झाला. क्लेम केल्यावर इन्शुरन्स कंपनीकडून सांगण्यात आले की पॉलिसीत पैसे आहेत पण अंतर्गत कॅपिंग असल्याने पूर्ण क्लेम देऊ शकत नाही.
यावर एका ओळखीच्या काकांच्या सल्ल्यानुसार सर्व माहिती एकत्रीत करून, सोबत पॉलिसीचे कागदपत्र जोडून आणि मेडीकल उपचार अन् खर्च यांच्या फोटोकॉपीज (असे झेरॉक्सपेक्षा फोटो काढून ठेवणे नेहमीच गरजेचे आणि चांगले आहे), असे सगळे एका मुद्देसूद निवेदनासह इन्शुरन्स ओमबड्समनकडे (लोकपाल) मेल व स्पीडपोस्ट केले.
दुसर्‍या सर्जरीचा अडलेला क्लेम होता १.२० लाखाचा आणि साधारण ३ महिन्यानंतर आम्हाला मिळालेली रक्कम होती १.१० लाख. हे सर्व ओमबड्समनने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि आदेशामुळे झालंय हे नमूद करणे फार महत्त्वाचे आहे. नाही तर हा सर्व खर्च आम्हाला पडलाच असता.

सगळ्यांच्या माहितीसाठी:-

Office of the Insurance Ombudsman, Pune. 
III Floor, Jeevan Darshan-LIC Bldg.,
N C Kelkar Road, Narayan Peth, Pune-411030
Tel: + 91 20- 41312555
e-mail address : bimalokpal.pune@cioins.co.in
Jurisdiction of this office: State of Maharashtra except Mumbai Metro
To know more about us, please log on to www.cioins.co.in 

चौथा कोनाडा's picture

6 Dec 2022 - 1:44 pm | चौथा कोनाडा

ग्रेट. अभिनंदन !
महत्त्वाची माहिती दिलीय.

आपण मागे लागली नाही तर रक्कम न देण्याकडे कल असतो कंपन्यांचा ! आणि नाकारायला विविध नियम आणि खेंगटी असतातच !

सस्नेह's picture

6 Dec 2022 - 2:27 pm | सस्नेह

धन्यवाद राघव, उपयुक्त लिंकसाठी.
अर्थात माझ्या केसबाबत इथे तक्रार करून काही होईलसे वाटत नाही.
स्नेहा

श्वेता२४'s picture

6 Dec 2022 - 2:11 pm | श्वेता२४

आपण खूप उपयुक्त माहिती या निमित्ताने दिलीत.

श्वेता व्यास's picture

9 Dec 2022 - 11:14 am | श्वेता व्यास

LIC ची मनीप्लस की मार्केटप्लस कोणतीतरी पॉलिसी घेऊन नुकसान झाल्याने आईला पश्चात्ताप झाला होता.
नुकसान यासाठी म्हणायचं की एजंटने ३-५ वर्षात तुम्हाला तर काही होणारच नाही शिवाय पैसेही वाढवून मिळतील असं गाजर दाखवलं होतं.
तेव्हापासून सर्वांनीच ठरवलं की विमा आणि गुंतवणूक एकत्र करायची नाही.