बाळेश्वर मंदिर आणि पेडगावचा किल्ला

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
16 Nov 2022 - 3:25 pm

पेडगावची भग्न मंदिरे: भाग १
पेडगावची भग्न मंदिरे - लक्ष्मीनारायण मंदिर

बाळेश्वर मंदिर

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी पुढ्यातच आहे हे भग्न मंदिर, ते आहे बाळेश्वराचं. आजमितीस ह्या मंदिराचे शिखर आणि सभामंडप संपूर्ण उध्वस्त स्थितीत असून फत गर्भगृह शाबूत आहे. जरी हे मंदिर छोटेखानी आणि भग्न असलं तरी दिसायला अत्यंत देखणं आहे. कदाचित भग्न असल्यामुळेच अधिक देखणंही दिसत असावं असं मला वाटतं. हे मंदिर एका अधिष्ठानावर उभारले असून सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदिराचे शिखर भग्न झाल्यामुळे याची शैली कोणती ते आज कळत नसली तरी ते भूमिज मंदिर असावे असे वाटते. सभामंडपाचे छत आज अस्तित्वात नाही आणि फक्त आतले स्तंभ आज कसनुसे उभे आहेत.

बाळेश्वर मंदिर

a

सभामंडपातील स्तंभ निर्विवादपणे देखणे आहेत आणि त्यांवर विविध मूर्ती पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत.

स्तंभांवरील शिवतांडव आणि नृत्य करणारा गणेश

a--a

वाली-सुग्रीवाचे युद्ध, आणि बाजूला बाण सोडण्याच्या तयारीत असलेला राम

a

एका स्तंभावर योग नृसिंहाची मूर्ती दिसते.

a

येथील प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या प्रकारची सुरेख नक्षी दिसते.

a---a

मंदिराचे अंतराळ एकूण दोन अर्धस्तंभांवर आणि दोन पूर्ण स्तंभांवर तोललेले असून त्यावरील कलाकुसर देखणी आहे.

a

अंतराळातून दिसत असलेले समोरचे लक्ष्मीनारायण मंदिर.

a

अंतराळात समोरासमोर दोन देवकोष्ठे आहेत पण त्यात मूर्ती नाहीत. येथील सर्वाधिक देखणा जो भाग आहे तो येथले गर्भगृहाचे प्रवेशद्वार जे अतिशय सालंकृत आहे. द्वारपट्टीकेवर गणेश असून नक्षीदार स्तंभाच्या भोवती चामरधारी सेवक सेविका, द्वारपाल आणि मंदिराच्या बांधकामासाठी धन, पाणी वगैरे आणणारे सेवक कोरले आहेत. द्वाराची पायरी सुद्धा नक्षीकामाने अलंकृत असून त्यातही दोन्ही बाजूंनी किर्तीमुखे आहेत तर त्यांच्या बाजूस गजव्याघ्रादी शिल्पे कोरलेली आहेत. हे मूळात शैव मंदिर असून येथे वैष्णव मूर्तीचे प्राबल्य दिसते ते बहुधा समोरील भव्य लक्ष्मीनारायण मंदिरामुळे.

प्रवेशद्वारावरील गणेशपट्टीका

a

डाव्या बाजूवरील पाण्याचा हंडा घेऊन येणारे सेवक, चामरधारी द्वारपाल आणि सेविका

a

उजव्या बाजूवरील सेविका, द्वारपाल आणि धनाची पिशवी घेऊन येणारे सेवक.

a

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची सालंकृत पायरी

a

गज व्याघ्रादी जोड्या

a---a

गर्भगृहात शिवलिंग असून अभिषेकाच्या पाण्यास शाळुंकेतून वाट करुन दिली आहे. ह्या गाभार्‍यात दोन आश्चर्ये वसली असून ती आवर्जून पाहावी अशीच आहेत. पैकी छतावर एक प्रमाणबद्ध किर्तीमुख आहे तर एका भिंतीत गुडघ्याचा आधार घेऊन डोके टेकवून बसलेल्या एका वानराची अत्यंत सुरेख आकृती कोरलेली आहे.

शिवलिंग

a

छतात कोरलेले किर्तीमुख

a

वानराची अत्यंत देखणी मूर्ती

a

मंदिराच्या सभोवती फिरताना विविध देवकोष्ठे केलेली आढळून येतात. येथील बाह्यभिंतीची पडझड झालेली असल्याने पुरातत्व खात्यातर्फे जीर्णोद्धाराचा प्रयत्न सुरु असलेला दिसतो. व त्यांचे खडून कोरलेले क्रमांकही येथे टाकलेले दिसून येतात.

बाह्यभिंतीवरील विविध मूर्ती व पुरातत्व खात्याने टाकलेले क्रमांक

a

गरुड आणि विदारण नृसिंह

a ----a

ब्रह्मदेव

a

त्रिविक्रम विष्णू

a

मंदिराच्या बाह्यभिंती

a

कोसळते मंदिर

a

गेल्या ४/५ वर्षात पेडगावला जाणे झालेले नाही, आजमितीस हे मंदिर अजून ढासळले असेल की ह्याचा अजून जीर्णोद्धार झाला असेल याची काहीच कल्पना नाही पण आज ते ज्या अवस्थेत आहे त्यातही हे अतिशय सुंदर दिसते आहे हे निश्चित, मग ते पूर्णपणे शाबूत असताना काय सुंदर दिसत असेल.

भीमेच्या तटावर असणारे मंदिर

a

पेडगावचा बहादूरगड अर्थत धर्मवीरगड

पेडगावचा बहादूरगड हा मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश याने बांधला असे मानत असले तरी हा किल्ला निर्विवादपणे प्राचीन भुईकोट आहे. याची निर्मिती यादवांनी केली आहे असे येथील जुन्या मंदिरांवरुन निश्चितच म्हणता येते. मंदिरे सोडल्यास किल्ल्यात फारसे काही पाहण्यासारखे नाही मात्र हा किल्ला एका दु़:खद घटनेचा साक्षीदार आहे. येथेच औंरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत ठेवले होते, येथेच त्यांची उंच विदुषकी टोपी काढून धिंड काढण्यात आली होती व येथेच तापती सळई खुपसून त्यांचे डोळे काढण्यात आले आहे. संभाजी राजांच्या त्या बलिदानाला स्मरुनच ह्या किल्ल्याचे नामकरण अलीकडे धर्मवीरगड असे केले आहे.
ह्या किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादूरखानाची

जेथे संभाजी राजांचे डोळे काढले असे मानतात ती जागा, येथे एक जुन्या मंदिराचा स्तंभ असून तो बाळेश्वर मंदिराचा असावा असे वाटते.

a

किल्ला बघायला जाताना रामेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर बुरुजासारखे बांधकाम असलेली एक मोट आहे, तिला हत्तीमोट असे म्हणतात. भीमानदीचे पाणी मोटेखालच्या हौदात आणून ते वर उचलण्यासाठी मोटेवर एक दोरी अडकवण्यासाठी हूकांसारखी रचना केलेली आढळते. येथूनच पआणी किल्ल्यात खेळवण्यात येई.

हत्तीमोट

a

हत्तीमोटेवरुन पुढे गेल्यावर प्रवेशद्वार येते. ह्याच्या बाजूलाच मशिदीचे पडके बांधकाम आहे.

a

प्रवेशद्वारातून आत आल्यावर उपरोल्लेखित संभाजी महाराजांचे हाल हाल जिथे केले ते दृष्टीस पडते तर नदीकाठावर हमामखाना आणि काही उध्वस्त इमारतींचे अवशेष दिसतात.

इमारतींचे भग्नावशेष

a

हमामखाना

a

एकात एक असलेल्या खोल्या

a

येथूनच झरोक्यातून खाली पाहता नदीकाठावर एक बुरुजवजा बांधकाम दिसते जे बहुधा नदीचे पाणी वर उचलण्यासाठी बांधलेली मोट असावी.

a

येथून भीमेचे विस्तीर्ण पात्र दिसते.

a

येथे आपल्या पेडगावच्या भटकंतीची इतिश्री होते. ही भटकंती मोठे मोठे ब्रेक घेत लिहिली. मध्ये काही इतर विषयांवर लेख लिहित गेल्यामुळे पेडगाववर लिहिणे मागे पडले होते. पण शेवटी लिहिणे पूर्ण झाले इतकेच.

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

16 Nov 2022 - 5:06 pm | सस्नेह

शिल्पे सुरेख आहेत.
महाराष्ट्र पुरातत्व खात्याच्या ढिसाळ कारभाराची चीड येते असशी ढासळलेली वास्तुशिल्पे पाहिली की.

गवि's picture

16 Nov 2022 - 8:02 pm | गवि

आणखी एक उत्तम लेख.

भग्नता खिन्न करणारी. पण त्यातील बारीक काम बघून थक्क व्हायला होते.

पूर्वी विचारले होते का आठवत नाही पण हे सर्व डिझाईन (व्याघ्र, गज, वानरे, फुले, वेलबुट्टी वगैरे) नेमके कुठे काय खोदायचे ते कोणी वरिष्ठ निरीक्षक ठरवून देत असे की त्या त्या कामगारावर सोडलेले असे?

शिवाय हे खोदकाम करणार्याचा दर्जा कलाकाराचा असे की मजूरसदृश?
हे काम आख्ख्या प्रकल्पासाठी एकच एकटा मनुष्य करत नसणार. पण तरीही सफाईत / दर्जात / प्रपोर्शनमधे फारसा फरक कसा नसतो?

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2022 - 9:34 pm | चौथा कोनाडा

ही त्यावेळची मोठी इंडस्ट्री असणार..

मोठं डिझाईन ऑफिस असेल, मटेरियल ( दगडांची परीक्षण करणारी) लॅब, कोरीवकाम हत्यार आणि शस्त्र विभाग, हत्यार धार विभाग, कच्चे कोरीवकाम विभाग, टेम्प्लेट बनवणारा विभाग, पॉलिश विभाग, वाहतूक विभाग इत्यादि

व्हिजुलायझर, डिझाईनर, आर्किटेक्ट, प्रोजेक्ट हेड, मॅनेजर, सुपरव्हायझर, कुशल कारागीर, प्रत्यक्ष मजूर, हमाल इत्यादि

((( हे काम आख्ख्या प्रकल्पासाठी एकच एकटा मनुष्य करत नसणार. पण तरीही सफाईत / दर्जात / प्रपोर्शनमधे फारसा फरक कसा नसतो?)))
विविध प्रकारच्या टेम्प्लेट वापरात असणार. दर्जा नियंत्रण विभाग परीक्षण करत असणार.

एकंदरीत भव्य रोजगार इंडस्ट्री असणार. ( त्यापूर्वी गुहा कोरणे ही इंडस्ट्री असणार)

पूर्वी विचारले होते का आठवत नाही पण हे सर्व डिझाईन (व्याघ्र, गज, वानरे, फुले, वेलबुट्टी वगैरे) नेमके कुठे काय खोदायचे ते कोणी वरिष्ठ निरीक्षक ठरवून देत असे की त्या त्या कामगारावर सोडलेले असे?

हा विषय तसा जटील आहे, ह्याविषयी पुरेसे डॉक्युमेन्टेशन आपल्याकडे उपलब्ध नाही, ज्यात स्थपतींची नावे आली आहेत असे उल्लेख नगण्य आहेत. मात्र पूर्वी एक आपण ज्याला आर्किटेक्ट किंवा मुख्य अभियंता असे म्हणतो असा एक प्रमुख स्थपती नेमण्याची पूर्वीपासून पद्धत होतीच, त्याच्या हाताखाली गवंडी, सुतार, पाथरवट असे विविध मजूर काम करत असत. उदा. महाभारतातील आदिपर्वात असलेला पुढील एक श्लोक पहा.

यज्ञस्यायतने तस्मिन्क्रियमाणे वचोऽब्रवीत् |
स्थपतिर्बुद्धिसम्पन्नो वास्तुविद्याविशारदः ||

इत्यब्रवीत्सूत्रधारः सूतः पौराणिकस्तदा |
यस्मिन्देशे च काले च मापनेयं प्रवर्तिता ||

यज्ञाच्या स्थळी तेथे कोणी एक वास्तुविद्येत पारंगत असा एक बुद्धिमान स्थपती होता. त्या सूत्रधाराने सांगितले की यज्ञात एक मोठेच विघ्न उत्त्पन्न होणार आहे. येथे सूत्रधार हा शब्द महत्वाचा आहे. जो मुख्यतः प्रमुख वास्तुविशारद किंवा शिल्पकार म्हणून वापरला जात असे. ह्याचे अपभ्रष्ट रूप सुतार हे झाले.

अजून एक उदाहण म्हणजे खिलजी कुतुबुद्दीन याच्या कालातील विजापूर शिलालेख. (शके १२४२)

सालहौउटगेचा सुतारु रेवैये मसिति केली

सालोटगीचा सुतार (शिल्पकार) याने मशिद बांधवली.

अजून एक उदाहरण म्हणजे शके १२२३ चा रामचंद्रदेव यादवाचा हातनूर शिलालेख.

देओ पंडिती नागनाथाचा प्रसदु केला
व्रिद्धी केलि सुतारु हरिदेओ नागनाथा नमस्तु

नागनाथ देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार (वाढीव बांधकाम) कोण्या हरिदेव नामक सुताराकडून झाले.

ह्या शिवाय महाभारतात आदिपर्वातच भुयार खोदण्यार्‍या खनिकाचे स्पष्ट वर्णन आहे. त्यावरुन साहजिकच फार पूर्वीपासून एखादा प्रमुख वास्तुविशारद आणि त्याच्या हाताखाली काम करणारे मजूर असत हे उघड होते.

हे काम आख्ख्या प्रकल्पासाठी एकच एकटा मनुष्य करत नसणार. पण तरीही सफाईत / दर्जात / प्रपोर्शनमधे फारसा फरक कसा नसतो?

सर्वसाधारणपणे मंदिराच्या टेम्पलेट्स, मूर्ती ह्यांची ल़क्षणे भारतभर समानच आढळतात त्यानुसारच हे शिल्पकाम होत असे. ह्या विषयाबाबत रुपमण्डन, शिल्पसार वगैरे प्राचीन ग्रंथही होते. त्यामुळे थोडेफार व्हेरिएशन असून प्रप्रोर्शनमधे फारसा फरक कुठे आढळत नाही. हे अर्थातच एकूणातच सर्व मंदिर स्थापत्य कलेविषयी, एखाद्या प्रकल्पात मात्र प्रमुख शिल्पकाराच्या हातूनच शेवटचा हात फिरवला जात असावा. वेरुळ येथील कैलास मंदिराच्या कामाला सुमारे १२० वर्षे लागली असल्याने तेथील काही शिल्पकृतीत मात्र नक्कीच फरक जाणवतो.

गवि's picture

17 Nov 2022 - 9:05 am | गवि

अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभारी आहे.

सुरिया's picture

17 Nov 2022 - 1:47 pm | सुरिया

अगदीच अगम्य अशी काही कला किंवा गूढशास्त्र नाहिये. आजही भारतात अनेक शिल्पकार पिढ्यान पिढ्या मंदीरे त्याच जुन्या शिल्पशास्त्रानुसार घडवित आलेले आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर सोमपुरा फॅमिली. नागर शैलीनुसार मंदीरे घडविण्यात सोमपुरा कुटुंबिय विख्यात आहेत. नियोजित अयोध्येतील श्रीराम मंदीर ही त्यांच्याच आधिपत्याखाली घडविले जात आहे. सोमनाथ मंदीरासारखी अनेक मंदीरे अगदी अलिकडच्या काळात घडविली गेली आहेत. हे शिल्पकार पारंपारिक पिढीजात शिक्षणावर भर देतात. कारागीर बघत बघत शिकत जातात. काळानुसार जरी वाहतुकीची साधने, टूल्स, कॅड कॅम सारक्खी डीझायनिंग सॉफ्टवेअर्स आली तरी मूळ व्हिजुअलायझेशन, मोजमापे, घडाई आणि त्यामागे असलेले वास्तुशास्त्र, धर्मशास्त्र, कलाशास्त्र, दगडाची, धातूंची पारख हे त्यांचे पिढीजात आलेले ज्ञान आहे आणि ते सुम्दर रितीने आजही प्रत्यक्षात आणतात.
अगदी महाराष्ट्रात आंध्र तेलंगणा सीमेवर कित्येक गावात मंदीर कला नावाने टोळ्या असतात. नांदेडजवळील कळमनुरी हे गाव अशा मंदीर बांधून देणार्‍या शिल्पकारासाठी प्रसिध्द आहे. हे लोक बरीचशी आधुनिक म्हणता येतील अशी मंदीरे बांधतात. भडक रंगरंरंगोटी करतात पण त्याची मागणी असलेने ते तसे करुन देतात, अन्यथा पारंपारिक पध्दतीने तेही मंदीरे बांधू शकतात. त्यांच्याकडे आकार डिझाइन्स पॅटर्न ची टेम्प्लेट असतात, त्यानुसार कस्टमाईज करुन मंदीरे बांधून देतात.
दक्षिण भारतातही गोपुर शैलीत अशी मंदीरे बांधून देणारी शिल्पकारांची मांदीयाळी असते. त्यांनी ती कला , परंपरा आणि ज्ञान चिकाटीने टिकवून ठेवली आहे.
मुख्य भाग असतो आश्रयदात्यांचा, पूर्वीचे राज्यकर्ते अशा मंदीरासाठी धनाची तिजोरी खुली करत. शिल्पकारही त्यांची कला, श्रम पणास लावत, त्यातूनच एकाहून एक सुंदर नागर, वासर आणि गोपुर शैलीतील जुनी पुरातन मंदीरे आपणास पाहण्यास मिळतात.
हत्यारे, साधने बदलली गेली आहेत पण पूर्वीची ती कला आणि व्हिज्युअलायझेशन अजुनही टिकून आहे पण आधुनिक वास्तुशास्त्र(ते वास्तुपुरुषवाले पण आणि आर्किटेक्चरल पण) समोर त्याचि उपयोगिता केवळ मंदीरे इतपतच उरली आहे.

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2022 - 8:25 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर धागा.
माहिती आणि प्रचि अप्रतिमच आहे.
तिकडं गेलं की भेट द्यावे असे मस्ट ठिकाणाची महिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद!

पेडगाव खरंच आणखिन ढासळण्याआधी पाहायला पाहिजे.उत्तम लेखमाला!
सुबक मंदिर आहे.शैव मंदिरात वैष्णवांचा मूर्ती चांगला मेळ आहे.त्रिविक्रम विष्णु पहिल्यांदाच समजला आणि मूर्ती पाहिली.छतावरील व्याल आणि वानराची शिल्पे वेगळीच आहेत.

मुक्त विहारि's picture

16 Nov 2022 - 10:26 pm | मुक्त विहारि

तुमच्या लेखाला एकाच शब्दात प्रतिसाद देतो ...

वाखूसा

कंजूस's picture

17 Nov 2022 - 6:35 am | कंजूस

सुंदर.

कर्नलतपस्वी's picture

17 Nov 2022 - 9:44 am | कर्नलतपस्वी

मला वाटते इतीहास बघावा तर तुमच्याच डोळ्यातुन.

मी फक्त एवढंच म्हणेन,

"ये ऑंखे मुझे दे दे वल्ली"

श्वेता व्यास's picture

17 Nov 2022 - 7:07 pm | श्वेता व्यास

खूप सुंदर चित्रे आहेत.
प्रत्यक्ष जागेवर जाऊन घडणार नाही असे कलेचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.

चांदणे संदीप's picture

18 Nov 2022 - 10:04 am | चांदणे संदीप

मिपावर काही अंतराळाने परत आल्यावर असे काही वाचायला मिळाले की सुखाची अनुभूती होते मग इतर काही वाचायलाही प्रेरणा मिळाल्यासारखी होते.
वल्लींचा आणखी एक सुरेख वाचनीय आणि माहितीपूर्ण लेख. माहितीपूर्ण प्रतिसादही प्रचंड आवडला.

सं - दी - प

फोटो अप्रतिम आणि लेखन नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण

मस्तच आहे मंदिर. सुंदर शिल्पे आहेत.
हे पुरातत्व खात्याचे मंदिराच्या वेगवेगळ्या खांबांवर, इतर भागांवर क्रमांक वगैरे टाकलेले पाहिले आहे इतर काही ठिकाणी पण.
पण ही कामे पूर्ण झाल्याची काही माहिती, उदाहरणे तुमच्या बघण्यात आहेत का?

प्रचेतस's picture

21 Nov 2022 - 6:31 pm | प्रचेतस

धन्यवाद.
पुरातत्त्व खाते उत्कृष्ट काम करत आहे असे म्हणावेसे वाटते. बऱ्याच ठिकाणी त्यांनी उत्तम संवर्धन केलेले दिसते. उदा. वेरुळ, हंपी, राणी की वाव. मात्र आपल्या देशात हेरिटेज साईट खूप मोठ्या संख्येने असल्याने साहजिकच लहान वारसास्थळांकडे काहीसे दुर्लक्ष झालेले आढळते पण खाते त्यावरही काम करत आहे पण एकंदरीतच कामाच्या तुलनेत निधी आणि मनुष्यबळ कमी असल्यामुळे ही कामे चटकन दृश्य स्वरूपात त्यामामाने कमी दिसतात.

चित्रगुप्त's picture

22 Nov 2022 - 12:12 am | चित्रगुप्त

वा. अतिशय सुन्दर जागा आणि तितकेच देखणे फोटो. तुमचा अभ्यास, चिकाटी, तळमळ आणि रसिकता, सर्वांनाच मानाचा मुजरा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Nov 2022 - 12:32 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक दिवसाची ट्रिप करुन बघावे असे मंदीर दिसते आहे. वल्लींची माहिती नेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 4:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह ! पेडगावचा फेरफटका आवडला. लेखन नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण. शिल्पे त्यांची माहिती, इतिहासाच्या खाणाखुणा हे सर्व पाहण्यापेक्षा तुमच्याकडून समजून घेणे हा वेगळा अनुभव असतो. सुदैवाने तो अनुभव घेतला आहे. एकदा पेडगाव फिरवून आणा. बाकी, ते सुग्रीव वालीच्या युद्धाच्या प्रसंगावरुन एक आठवण झाली. वेरुळच्या कोणत्या तरी लेणीत रामायणातील युद्धवर्णनाची शिल्पे आहेत. अनेक लेण्यांमधे शिल्पांमधे अशी युद्धवर्ण असण्याची काही विशेष कारणे असावीत असे वाटायला लागले आहे. अर्थात असेलच असे नाही. बाकी, लेखन आवडले लिहिते राहावे. पुलेशु.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

24 Nov 2022 - 5:11 pm | प्रचेतस

वेरुळच्या कोणत्या तरी लेणीत रामायणातील युद्धवर्णनाची शिल्पे आहेत

कैलास लेणीतच आहेत भो, तुम्हाला दाखवली पण होती :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2022 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कैलास लेणीतच आहेत भो, तुम्हाला दाखवली पण होती :(

सॉरी शेठ, कैलास लेणी आणि अजिंठ्यातली चित्र-शिल्प या दोघांच्या बाबतीत
दोन्ही स्थळांच्या ष्टो-या कायम एकमेकात मिक्स होतात. वयेपरत्वे आता हे व्हायचंच.

बाय द वे वल्ली शिल्पातील स्त्री-पुरुष सौंदर्य शिल्पे, वस्त्रे, आभुषणे, महिलांच्या वेणी-फणीच्या गोष्टी
असे काही एखादे नव्या धाग्यात लिहा. म्हणजे, काष्टा पद्धतीच्या नेसलेल्या साड्या, स्तनहार, कर्णफूले,
मुकुटं, असं काही तरी लिहावे असे सुचवतो.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

24 Nov 2022 - 8:24 pm | प्रचेतस

बाय द वे वल्ली शिल्पातील स्त्री-पुरुष सौंदर्य शिल्पे, वस्त्रे, आभुषणे, महिलांच्या वेणी-फणीच्या गोष्टी
असे काही एखादे नव्या धाग्यात लिहा. म्हणजे, काष्टा पद्धतीच्या नेसलेल्या साड्या, स्तनहार, कर्णफूले,
मुकुटं, असं काही तरी लिहावे असे सुचवतो.

साड्या नेसलेल्या स्त्री शिल्पे साधारण पेशवेकालीन शिल्पामध्ये दिसतात, प्राचीन शिल्पात नाही. कर्णफुले तर बौद्ध लेणीत अतिशय सुंदर आढळतात. उदा. कार्ला लेणी. सहजसौंदर्य.
बाकी तुमची सौंदर्यविषयक मर्मग्राही दृष्टी उत्तम असल्याने तुम्हीच या विषयात अधिक लिहावे ही आग्रहाची विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2022 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साड्या नेसलेल्या स्त्री शिल्पे साधारण पेशवेकालीन शिल्पामध्ये दिसतात

पहिले छुट सांगतो तुमच्या इतका अभ्यास नै पण वेरुळच्या लेणी क्रमांक बहुतेक १६ मधे चुंबन देणारी स्त्रीचं एक शिल्प आहे तीची वस्त्रे आठवतात का ? तिथेच काही स्त्री प्रतिमांमधे स्त्री शिल्पांच्या वस्त्रांच्या नि-या उजव्या पायापर्यंत लोळतांना दिसतात ( असे वाटते) कैलास लेण्यातील यज्ञशाळेच्या बाहेर द्वारपालिकांच्या रुपात सुंदर स्त्रियांच्या वेशभूषेत तसं पाहिल्याचे आठवते. ( असे वाटते)

>>>तुमची सौंदर्यविषयक मर्मग्राही दृष्टी उत्तम असल्याने
धन्स. मी रसिक माणूस आहे, कलाप्रेमी आहे. जे जे सुंदर आहे ते ते आवडतं, तो काही प्रश्न नाही. बाकी, शिल्पातील केशरचना, मुकुट, कर्णकुंडले, गळाहार, स्तनहार, यावर वेळ मिळाला की नक्की लिहीन. फक्त कधी ते माहिती नाही.

-दिलीप बिरुटे

वेरुळच्या लेणी क्रमांक बहुतेक १६ मधे चुंबन देणारी स्त्रीचं एक शिल्प आहे तीची वस्त्रे आठवतात का

ती कैलास लेणीत नाहीत, अर्थात कैलास लेणीतील सभामंडपातील स्तंभांवर काही थोडीशी संभोगशिल्पे आहेत पण ती विजेरी घेऊन बारकाईने शोधली तरच सापडतात, तुम्ही म्हणताय तेथील शिल्पे ही नव्हेत.

कैलास लेण्यातील यज्ञशाळेच्या बाहेर द्वारपालिकांच्या रुपात सुंदर स्त्रियांच्या वेशभूषेत तसं पाहिल्याचे आठवते.

ती २१ क्रमांकाच्या रामेश्वर लेणीतील गंगा यमुना, पण त्या निर्‍या नव्हेत, केवळ झिरझिरित अधोवस्त्र, नदीचा प्रवाहीपणा दाखवणारं. १५ क्रमांकाच्या दशावतार लेणीत तुम्ही म्हणता तशी काही स्त्रीशिल्पे आहेत. बाकी यज्ञशाळेत द्वारपालिका नाहीत. राष्ट्रकूट राणी आणि तीच्या सेविका, सप्तमातृका आणि दुर्गा-लक्ष्मी-कालभैरव आहेत.

@ प्रा. डॉ. दि. बि. -- सौंदर्य शिल्पे, वस्त्रे, आभुषणे, महिलांच्या वेणी-फणीच्या गोष्टी, काष्टा पद्धतीच्या नेसलेल्या (किंवा न नेसलेल्यापण) साड्या, स्तनहार, कर्णफूले, मुकुटं ....... सौंदर्यविषयक मर्मग्राही दृष्टीने लिहीलेल्या लेखाची आतुरतेने वाट बघत आहोत. लौकर लिहा भौ.

.

प्रचेतस's picture

25 Nov 2022 - 11:42 am | प्रचेतस

वॉव.. फेमस दीदारगंज यक्षी, मौर्यकालीन झिलईचे उत्कृष्ट उदाहरण.

चित्रगुप्त's picture

25 Nov 2022 - 1:07 pm | चित्रगुप्त

झिलई म्हणजे दगडी मूर्ती घासून घाऊन गुळगुळीत करणे का ? (लाकडी फर्निचर घासून गुळगुळीत करतात त्याला काय शब्द आहे ?)
दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात पूर्वी शिरल्याशिरल्या समोरच ही यक्षी ठेवलेली असायची. अलिकडे अनेक वर्षात तिथे गेलो नसल्याने आताचे ठाऊक नाही.

झिलई म्हणजे दगडी मूर्ती घासून घाऊन गुळगुळीत करणे का ?

हो, तेच. अगदी घासून घासून गुळगुळीत करुन आपले प्रतिबिंब दिसावे इतका गुळगुळीतपणा यावा. महाराष्ट्रात भाजे लेणीतला स्तूप हा मार्यकालीन झिलई तंत्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

चित्रगुप्त's picture

25 Nov 2022 - 1:11 pm | चित्रगुप्त

'हमामखाना' म्हणजे स्नानगृह ना ? भारतात (रोमसारखे) मोठमोठे सार्वजनिक हमामखाने कुठे आहेत का ?

प्रचेतस's picture

25 Nov 2022 - 1:45 pm | प्रचेतस

बर्‍याच मुघलकालीन इमारतींमध्ये हमामखाने आढळतात. हंपीत विजयनगरच्या राजवटीत राण्यांसाठी एक, डिप्लोमॅट्ससाठी एक आणि सर्वसामान्यांसाठी एक भलामोठे स्नानगृह आहे.

श्वेता२४'s picture

25 Nov 2022 - 6:12 pm | श्वेता२४

तुमच्या लेखांमुळे नेहमीच नवनवीन माहिती कळते.

नेहमीप्रमाणेच मस्त लेख! पहिला आणि पाचवा फोटो CGI असल्या सारखा भास होतोय, अर्थात तो तसा नाहीये हा भाग वेगळा 😀
महाराष्ट्राच्या/भारताच्या कुठल्या कोपऱ्यात/गावात. एखाद्या अनवट ठिकाणी अशी सुंदर कोरीव कामे बघायला मिळतील ह्याचा खरंच काही अंदाज येत नाही!