पेडगावची भग्न मंदिरे - लक्ष्मीनारायण मंदिर

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
27 Jul 2022 - 7:34 pm

a

पेडगावची तीन भग्न मंदिरं बघत बघतच आपण येतो ते इथल्या सर्वांगसुंदर मंदिरासमोर. ते म्हणजे इथले प्रसिद्ध असे लक्ष्मीनारायण मंदिर.

हे मंदिर अप्रतिम अशा कोरीव कामामुळे नटलेलं आहे. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी त्याची रचना. सभामंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. पैकी बाजूंची दोन प्रवेशद्वारे अर्धमंडपातून उघडतात. म्हणजेच हे मंदिर मुखमंडप, सभामंडप आणि अर्धमंडप अशा मंडपाच्या विविध प्रकारांनी युक्त आहे. ह्या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं की इथं अतिशय देखणी जालवातायनं आहेत जी समकालीन मंदिरांत अगदी अभावानंच दिसतात. मंदिराच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदरी, वादक, अष्टदिक्पाल, विष्णूचे २४ अवतार, गजथर, अश्वथर, नरथर, देवकोष्ठ असे विविध प्रकार दिसतात.

पेडगावचं मंदिर हे भीमेच्या काठावर. इकडच्या पाच मंदिरांच्या संकुलातलं सर्वात मोठं, सर्वाधिक सालंकृत आणि सर्वाधिक देखणंं तसंच पुरातत्व खात्याकडून सर्वाधिक निगा राखलं गेलेलं.

a

आजमितीस ह्या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. मूळच्या कमालीच्या देखण्या असलेल्या मंदिराच्या बाह्यभिंतींवरील मूर्ती आज बर्‍याचश्या झिजल्या आहेत. अर्धमंडप आणि गर्भगृह यांची शिखरे आज पूर्णतः नष्ट झालेल्या अवस्थेत असल्याने मंदिराचे शिखर पूर्वी कोणत्या पद्धतीचे असावे हे आजमितीस ओळखता येत नाही.

कोरीव दरवाजातूनच मंदिरात प्रवेश होतो. मंदिरात रंगशिळेला चार स्तंभांनी आधार दिलेला आहे, ह्याव्यतिरिक्त अंतर्भागात इतर स्तंभ नाहीत मात्र जालवातायनाला, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला कोरीव अर्धसतंभांचा आकार देऊन जास्त स्तंभ आहेत असा आभास निर्माण केलेला आहे.

मंदिराचे प्रवेशद्वार

a

आतील स्तंभांवर शैव, वैष्णव द्वारपाल, विविध पौराणिक प्रसंग, नर्तिका आदी मूर्ती कोरलेल्या आहेत. स्तंभांना भारवाहक यक्षांनी आधार दिलेला आहे.

स्तंभांवरील कोरीव कामे

a-a-a

मंदिरातील स्तंभाची रचना खाली तळखडा, त्यावर कुंभ, त्यावर चौकोनी उभट स्तंभ, त्यावर अष्टकोनी स्तंभ, त्याच्यावर आमलकरुपी कलश त्यावर चौरंगासारखी नक्षी, त्यावर उद्गम आणि सर्वात वर भारोत्तलन करणारे यक्ष अशी गुंतागुंतीची रचना आहे.

a

स्तंभांवर देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

शिव आणि भैरव

a-a

विष्णू आणि सूर्य

a-a

मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर

a

कुस्ती खेळणारे क्रिडापटू

a

जैन साधू

a

गर्भगृहाचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून ते पंचशाख पद्धतीचे आहे. कल्पलता, स्तंभ, पद्मलता, गंधर्व आणि व्याल त्यावर कोरलेले आहेत तर त्याच्या खालील बाजूस गंगा, यमुना, चामरधारी द्वारपाल आणि किर्तीमुखे आहेत.

प्रवेशद्वार रचना

a

इस्लामी आक्रमणात ही मंदिरे भग्न झालेली असल्याने येथील गाभार्‍यात मूर्ती नाही, त्याऐवजी वीरगळाचा एक अर्धवट तुटलेला वरचा भाग येथे पीठाच्या स्थानी ठेवलेला आहे.

अंतर्भागातील मंदिर रचना

a

इथली जालवातायने अतिशय देखणी आहेत हे आधी सांगितलेच आहे, मात्र त्यांचे खरे सौंदर्य दिसते ते आतील मंडपातूनच.

जालवातायन

a

विविध प्रकारचे नक्षीकाम असलेले जालवातायन

a

चला तर आता मंदिराच्या सभोवताली एक फेरफटका मारुयात

बाहेरील बाजूस मंदिर पंचरथ पद्धतीचे असून गजथर, अश्वथर, नरथर, जंघा आणि त्यावर देवकोष्ठ अशी रचना आहे.

a

एका वेगळ्या कोनातून मंदिर

a

बाहेरुन दिसणारे जालवातायन
a

गजथर व अश्वथर
a

मंदिराच्या बाह्यांगावर विविध सुरसुंदरी, नर्तक, विष्णूचे अवतार, अष्टदिक्पाल यांच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. ह्यापैकी काही आता आपण बघू.

नृसिंहावताराची ही भग्न मूर्ती

a

त्रिशूळ आणि नाग हाती धारण केलेली ही भैरवमूर्ती

a

विष्णूचा वराह अवतार

a

भैरवाची अजून एक मूर्ती

a

एडका वाहन असलेली हाती जपमाळ, ध्वज, पाश आणि कमंडलू धारण केलेला हा आग्नेयेचा दिक्पाल अग्नी

a

ऐरावत वाहन असलेला वज्र धारण करणारा पूर्वेचा दिक्पाल इन्द्र

a

दोन कमळे हाती घेतलेला सूर्य

a

येथील सर्वात जास्त आवडलेली दिक्पाल मूर्ती म्हणजे वायव्येचा दिक्पाल असलेल्या वायूची.
दोन फडफडते ध्वज, खांद्यावर घडा, झेपावत असलेले वाहन हरीण ह्या सर्वांशी विलक्षण समतोल साधत असलेली त्रिभंग मुद्रेतील वायू.

a

आता सुरसुंदरींच्या मूर्ती बघू

एका सुंदरीच्या पायात अडककेला काटा काढण्याच्या प्रयत्नात असलेला बटू

a

आळस देणारी आलस्यसुंदरी

a

सुरसुंदरी शुकसारिका- हिच्या डाव्या हातात असलेला पोपट आज पूर्णपणे नष्ट झालाय मात्र हातातील फळांच्या घडामुळे हीची ओळख अगदी सहज पटतेय.

a

ही बहुधा दर्पणसुंदरी असावी

a

आता मंदिराच्या बाह्यभिंतींचे अवलोकन करु

a

a

a

मंदिराचे विलक्षण कोनातून होत असणारे दर्शन विलक्षण सुंदर भासते.

a

भीमेच्या ऐन तटावर हे मंदिर वसलेले आहे.

a

a

बाहेरुन दिसणारे जालवातायन
a

a

मंदिरासमोर असलेले भीमेचे विस्तीर्ण पात्र

a

लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी समोरच आहे ते अजून एक नितांतसुंदर पण भग्न झालेले बाळेश्वर मंदिर, त्यासकट पाहूयात बहादूरगडाचे काही अवशेष पुढच्या भागात.

प्रतिक्रिया

लोगन's picture

27 Jul 2022 - 8:01 pm | लोगन

खूप छान .. फोटो पाहून हे ठिकाण माझ्या भटकंती च्या बकेटलिस्ट मध्ये जमा झाले आहे .. मी आता मॅप वर पाहिले तर .... दौंड आणि श्रीगोंद्याच्या मध्ये आहे, बरोबर ना?

प्रचेतस's picture

27 Jul 2022 - 8:17 pm | प्रचेतस

हो, दौंड-श्रीगोंद्याच्या मध्ये. अजणूज रस्त्याने जावे लागते मात्र रस्ता प्रचंड खराब आहे. नगर-श्रीगोंदा-पेडगाव हा चांगला रस्ता आहे. पुण्यावरुन जायचे असल्यास मात्र पुढे रस्ता खराब असलातरी यवत दौंड हाच मार्ग धरावा.

फारच सुंदर. अद्भुत जग आहे हे.

यातील काही शब्दांचे अर्थ कळायला तुझे आधीचे लेख पुन्हा वाचावे लागतील. शिल्पांचे विषयही भन्नाट. काटा काढणारा बटू, आळस देणारी स्त्री. कसे डोक्यात येत असेल? एवढी मूर्ती कोरायची म्हणजे कष्टच. केवळ अंदाजाने करीत असतील की समोर काही मॉडेल बसवून?

शुक सारिका आणि दर्पणसुंदरी एकच आहेत का? की तिथे दर्पणसुंदरी वेगळी आहे आणि फोटो मिस झाला?

धन्यवाद. शिल्पे कोरणारेही खास शिल्पी होतेच. तसेच सर्व शिल्पांचे संकेत जुन्या काळापासून चालत आले आहेत त्याबरहुकूम शिल्पे कोरली जात. मूर्तीलक्षणे सर्वत्र समानच असतात.

शुक सारिका आणि दर्पणसुंदरी एकच आहेत का? की तिथे दर्पणसुंदरी वेगळी आहे आणि फोटो मिस झाला?

लक्षात अणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. छायाचित्र टाकायचे राहून गेले होते, आता धागा अद्ययावत केला आहे.

धन्यवाद. शिल्पे कोरणारेही खास शिल्पी होतेच. तसेच सर्व शिल्पांचे संकेत जुन्या काळापासून चालत आले आहेत त्याबरहुकूम शिल्पे कोरली जात. मूर्तीलक्षणे सर्वत्र समानच असतात.

शुक सारिका आणि दर्पणसुंदरी एकच आहेत का? की तिथे दर्पणसुंदरी वेगळी आहे आणि फोटो मिस झाला?

लक्षात अणून दिल्याबद्द्ल धन्यवाद. छायाचित्र टाकायचे राहून गेले होते, आता धागा अद्ययावत केला आहे.

Bhakti's picture

27 Jul 2022 - 8:15 pm | Bhakti

जालवातायन तर सुरेख आहेतच सर्वच कोरीव काम अप्रतिम आहे.कोणत्या काळातील आहेत या?दिक्पाल विषयी नवीनच समजलं.

मंदिराच्या एकूण शिल्पशैलीवरुन हे मंदिर साधारण १२ व्या शतकातील यादवांच्या काळातील असावे.

मुक्त विहारि's picture

27 Jul 2022 - 8:22 pm | मुक्त विहारि

वाखूसा

सुंदरच आहे ही लक्ष्मीनारायण मंदीर.
फोटो आणि त्याचे चटपटीत वर्णन यामुळे गाईड घेऊन फिरल्यासारखे वाटले.

फोटो बघायचे... वर्णन वाचायचं... मज्जा नी लाईफ!
बाकी ते नेहमी प्रमाणेच छान लेख वगैरे लिहायचा आता कंटाळा येऊ लागलाय राव 😀 😀 😀
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!

कर्नलतपस्वी's picture

27 Jul 2022 - 9:54 pm | कर्नलतपस्वी

वास्तुशिल्पे बघताना आपल्या सारखा वाटाड्या आसेल तर शिल्प जिवंत होऊन बोलायला लागतील. हाच अनुभव लेख वाचताना आला.

छान,सुंदर, अभ्यासपूर्ण वगैरे शब्द तोकडे पडतात.
आपल्या बरोबर भटकंतीचा योग आला तर तो कपिलाष्टीचाच म्हणावा लागेल.

Nitin Palkar's picture

28 Jul 2022 - 8:07 pm | Nitin Palkar

+११११

सुक्या's picture

27 Jul 2022 - 11:13 pm | सुक्या

प्रचेतस यांचा धागा म्हणजे चंगळ असते. सुंदर विवेचन .. (प्रचेतस यांना ह्या सार्‍या मंदीरांचा जिर्णोध्दार / रेस्टोरेशन करायचे काम द्यायला हवे असे राहुन राहुन वाटते. सगळ्या मंदीरातल्या मुर्त्या जिवंत करतील ह्यात शंका नाही)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2022 - 7:03 am | अत्रुप्त आत्मा

+++111

..
धाग्याला कित्ती उशिरा मुहूर्त लागला ! 6 वर्षांनी!
दुत्त दुत्त आगोबा! आता प्रायश्चित्त म्हणून फक्त अष्ट दिक्पालांचे वर्णन बरहुकूम फोटू टाक. ल्लउल्लूल्लूल्लू..

सौंदाळा's picture

28 Jul 2022 - 6:30 am | सौंदाळा

अप्रतिम फोटो, सुंदर लेख.
कळस शाबूत असते तर कित्ती जबरदस्त दिसले असते हे मंदिर.
बाकी विष्णूचे २४ अवतार कोणते? दहा अवतार ऐकले आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2022 - 7:05 am | अत्रुप्त आत्मा

प्लस वण*
सांग रे आगोबा सगळे अवतार!

* - पांडुब्बा चा शब्द! =))

२४ अवतार म्हणजे २४ रुपांतरे. शंख, चक्र, गदा, पद्म या लक्षणांच्या क्रमानुसार त्यांची विविध नावे ठरतात.
उदा.
केशव- (डावीकडून)पद्म, शंख, चक्र, गदा
नारायण - शपगच
माधव-गचशप

अशी गोविंद, विष्णू, मधूसूदन अशी संध्येतील २४ नावे.

Bhakti's picture

28 Jul 2022 - 10:42 am | Bhakti

मलाही हा प्रश्न पडला होता.या बद्दल आणखी कोठे वाचायला मिळेल?एखादा विदा.

प्रचेतस's picture

28 Jul 2022 - 11:07 am | प्रचेतस

अग्नीपुराण, पद्मपुराण, चतुर्वर्ग चिंतामणी, धर्मसिंधु, अभिलाषार्थ चिंतामणी इत्यादी ग्रंथात ही २४ नावे कमी अधिक फरकांसह दिलेली आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jul 2022 - 9:13 am | ज्ञानोबाचे पैजार

उशिराने का होईना लिहिलेत हे महत्वाचे.... लेख आवडला...

पैजारबुवा,

प्रदीप's picture

28 Jul 2022 - 9:19 am | प्रदीप

लिखाण, माहिती व चित्रे.

ह्याचा साहित्यप्रकार 'भटकंती' व्यतिरीक्त 'कलादालन' असावा, असे वाटते.

गोरगावलेकर's picture

28 Jul 2022 - 11:14 am | गोरगावलेकर

काय ते फोटो! जोडीला लेखन तर अतिशय माहितीपूर्ण.

तुषार काळभोर's picture

28 Jul 2022 - 3:09 pm | तुषार काळभोर

मंदीरं, मुर्त्या आम्हीपण बघतो. आम्हाला त्यात गणपती-रावण-हनुमान असे चार दोन प्रसिद्ध सोडले तर बाकी सगळ्या 'मुर्त्या'.
त्याच मुर्त्यांमध्ये यांना भैरव, अग्नि, सूर्य, दिक्पाल, यक्ष, सुरासुंदरी, शाकसुंदरी, दर्पणसुंदरी, कुबेर, नरसिंह असे सगळे दिसतात.
बरं. यंदा फोटो देताना त्यात काय बघायचं तेपण दिलंय. तरी आमच्या डोळ्यांना ते दिसंना!
उदा.

एका सुंदरीच्या पायात अडककेला काटा काढण्याच्या प्रयत्नात असलेला बटू

हे बघून फार तर 'एक बाई कुणाच्या तरी डोक्यावर पाय देतेय' याच्यापलिकडे आकलन नसतं झालं!

येथील सर्वात जास्त आवडलेली दिक्पाल मूर्ती म्हणजे वायव्येचा दिक्पाल असलेल्या वायूची.
दोन फडफडते ध्वज, खांद्यावर घडा, झेपावत असलेले वाहन हरीण ह्या सर्वांशी विलक्षण समतोल साधत असलेली त्रिभंग मुद्रेतील वायू.

कुठंय ध्वज? हरिण आणि त्रिभंग (काजोलच्या कृपेने) ओळखता आले.

ऐरावत वाहन असलेला वज्र धारण करणारा पूर्वेचा दिक्पाल इन्द्र

ऐरावत आणि वज्र आमच्या डोळ्यांना नाही दिसले.

एकदा अशा गोष्टी समक्ष प्रचेतसबुवांचा सान्निध्यातच अनुभवायला हव्या!!

बघू, दैव कधी योग जुळवून आणतं ते!

प्रचेतस's picture

28 Jul 2022 - 3:53 pm | प्रचेतस

हे बघून फार तर 'एक बाई कुणाच्या तरी डोक्यावर पाय देतेय' याच्यापलिकडे आकलन नसतं झालं!

ह्या अशा प्रकारच्या मूर्ती अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे भग्न जरी असल्या तरी प्रसंग ओळखता येतो :)

कुठंय ध्वज? हरिण आणि त्रिभंग (काजोलच्या कृपेने) ओळखता आले.

खाली बाणाने वायूचे दोन्ही ध्वज दाखवले आहेत.
a

ऐरावत आणि वज्र आमच्या डोळ्यांना नाही दिसले.

ऐरावत हा पायाशी आहे. बाणाने त्याचा निर्देश केला आहे. डावीकडे वरच्या हातात धारण केलेय ते वज्र आहे तर उजवीकडे अंकुश आहे.

a

बघू, दैव कधी योग जुळवून आणतं ते!

७ ऑगस्टला बहुधा भुलेश्वरला जायचा योग आहे. तुम्हाला जवळच आहे. :)

वा!!
मी कन्फर्म!!

श्वेता व्यास's picture

28 Jul 2022 - 3:36 pm | श्वेता व्यास

खूप सुंदर प्रचि आणि वर्णने. सर्वच मूर्ति अप्रतिम !

अनिंद्य's picture

28 Jul 2022 - 4:18 pm | अनिंद्य

सुंदर लेख ! नेहेमीप्रमाणे माहितीने भरलेला, आशयसंपृक्त.

मलाही विष्णूचे २४ अवतार कोणते याबद्दल प्रश्न पडला होता, पुढे तुमच्या प्रतिसादाने उलगडा झाला

अग्नीचा एडका, कुबेराचा मुंगूस, इंद्राचा ऐरावत.... ही वाहनसाखळी ठरवतांना काही लॉजिक असते का मूर्तिशास्त्रात ? जस्ट आपला एक प्रश्न.

प्रचेतस's picture

28 Jul 2022 - 8:50 pm | प्रचेतस

अग्नीचा एडका, कुबेराचा मुंगूस, इंद्राचा ऐरावत.... ही वाहनसाखळी ठरवतांना काही लॉजिक असते का मूर्तिशास्त्रात ?

अर्थातच.
उदा. यज्ञात अग्नीला हवि अर्पण केला जातो. तो मुख्यतः बोकडाशी संबंधित असल्याने एडका हे अग्नीचे वाहन ठरवले गेले. " अजापुत्रम बली दद्यात" हे तर प्रसिद्धच आहे. वायूचे वाहन हरीण हे हरिणाच्या वेगाने धावण्याच्या असलेल्या पद्धतीमुळेच बनवले गेले. ऐरावत हा समुद्रमंथनातून बाहेर पडला आणि इंद्रानेते वाहन म्हणून स्वीकारले. वरुण ही जलदेवता, साहजिकच मगर हे त्याचे वाहन झाले.
येथे एक नमूद करावेसे वाटते, कुबेराचे वाहन हे मुंगूस नव्हे, मुंगूस हे धनाचे प्रतीक असल्याने ते कुबेरासोबत असते. कुबेर हा नरवाहन. तो यक्षांचा अधिपती.

एकंदरीत त्या त्या देवतांच्या स्वभावामुळे किंवा पौराणिक कथेत असलेल्या प्रसंगामुळे त्या त्या देवतांना विशिष्ट वाहने मिळाली आहेत.

कुबेराचे वाहन हे मुंगूस नव्हे, मुंगूस हे धनाचे प्रतीक असल्याने ते कुबेरासोबत असते. कुबेर हा नरवाहन. तो यक्षांचा अधिपती.
वल्ली उर्फ प्रचेतस, कुबेर या विषयावरच अधिक माहिती देणारा धागा काढावा ही विनंती ! तुम्ही दिलेल्या फोटोत धनाची थैली आणि मुंगस मला का दिसत नाही ते कळेना !
धागा नेहमी प्रमाणेच उत्तम आहे ! :)

जाता जाता :- का कोणास ठावूक परंतु लोक दिवाळीत लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कुबेर पुजन करायचे विसरत चालले आहेत का ? असे वाटते.
या दिवशी गणपती-लक्ष्मी आणि कुबेर यांचे पुजन एकत्रीत करणे महत्वाचे असते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ghana Ghana Mala Nabhi Datalya | Prathamesh Laghate | Paus | Rainy Season |

प्रचेतस's picture

1 Aug 2022 - 9:04 am | प्रचेतस

कुबेर या विषयावरच अधिक माहिती देणारा धागा काढावा ही विनंती

पुढेमागे दिक्पालांवर लेख लिहिण्याचा मानस आहे, त्यात अधिक माहिती देईनच.

तुम्ही दिलेल्या फोटोत धनाची थैली आणि मुंगस मला का दिसत नाही ते कळेना !

कुबेराच्या खांद्यावरुन डोक्यावरुन जाणारी एक फुगीर भाग असलेली लांबलचक माळ दिसेल तीच धनाची थैली. ह्याच्या एका टोकाला मुंगुसाचे शिर व दुसर्‍या टोकाला फुगीर भाग दाखवलेला आहे तीच धनाची थैली.

पुढेमागे दिक्पालांवर लेख लिहिण्याचा मानस आहे, त्यात अधिक माहिती देईनच.
धन्यवाद. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal Song

यश राज's picture

28 Jul 2022 - 6:27 pm | यश राज

नेहमीप्रमाणे सुंदर आणि माहीतीपुर्ण लेख.

Nitin Palkar's picture

28 Jul 2022 - 8:11 pm | Nitin Palkar

लेख आणि प्रची किती सुंदर आहेत याचे वर्णन करायला शब्द तोकडे ....

_/\_

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

28 Jul 2022 - 8:27 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान लेख आणि फोटो.

गणेशा's picture

28 Jul 2022 - 11:53 pm | गणेशा

अप्रतिम

सस्नेह's picture

29 Jul 2022 - 8:10 pm | सस्नेह

अत्यंत देखणी वास्तू आहे. शिखरे जागेवर असती तर नितांतसुंदर दिसली असती !
तुमचा वास्तु अभ्यास दांडगा बॉ !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2022 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन आवडले. पेडगावची शिल्प आणि त्या मूर्ती ओळखणे खरंच कठीण काम. पण, ते ओळखणे वल्लीचं सर्वात सोपं काम.
भैरव, इंद्र, विष्णू तो वराहवतार, या सर्वांची ओळख आवडली. खरं तर, तुम्ही शिल्प टाकत जा आणि ते ओळखायचं कसं इतकं शिकवा बॉ..!

बाकी, एक अवांतर, ते वेड पांघरुन पेडगावला जाणे याचा काही इतिहास.

-दिलीप बिरुटे

सस्नेह's picture

30 Jul 2022 - 9:47 pm | सस्नेह

वही, जो आप सिखाते है, सरजी :)

कर्नलतपस्वी's picture

31 Jul 2022 - 5:27 pm | कर्नलतपस्वी

*पेडगावचे शहाणे*
*बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ? दुसरे कुठलले गाव का नाही ? पाहुया तर मग*

*६ जून १६७४,ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्या साठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ?*

*त्याची ही गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-*
*अहमदनगर जिल्ह्यात 'पेडगाव' नावाचं एक गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे).*
*कोणासठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो मजूर्डा चेष्टेने हसत म्हणाला, "सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किले के दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे."*
*तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादुरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर, आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तो लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षित पणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली, खूप जवळ आली तशी त्यांचे नशीबा बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादुरखान स्वतः त्यांच्या समाचारस मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली. कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !*
*खानाच्या फौजेत एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावलं हे काही छोट काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला! ही जीत औरंगजेबास कळाल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, "अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?" "कोई नही जहांपन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है ". आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज आला. आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं.* *आणि ज्याची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , "हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २००० मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके सब लूट लेके चले गए हुज़ूर!".*
*अशा प्रकारे राज्याभिषेकाचा खर्च एक कोटी ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात. आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही नसांडता.*
आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून, *पेडगावचे शहाणे*
आणि *वेड पांघरून पेडगावला जाणे*

हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

प्रचेतस's picture

1 Aug 2022 - 9:32 am | प्रचेतस

धन्यवाद.
याशिवाय, ह्याच बहादूरखानाला महराजांनी तहाची बोलणी झुलवले होते, औरंगजेबाचे शाही फर्मान येईपर्यंत महाराजांनी आपले गडकोट मजबूत करुन ठेवले आणि फर्मान आल्यानंतर बहादूरखानाने महाराजांना सांगावा धाडल्यावर तुझी पात्रता ती काय असे म्हणत चांगलेच फटकारले होते.

हे पेडगाव शहाणे प्रकरण माहीत नव्हते. कर्नल तपस्वी यांचे मनापासून आभार

कर्नलतपस्वी's picture

31 Jul 2022 - 5:39 pm | कर्नलतपस्वी

टायपींग चा कंटाळा व थंड खांद्या( frozen shoulder) मुळे जवळ आसलेली पोस्ट तशीच उचलून डकवली आहे. पण "इतीहास गवाह है"

पॉपकॉर्न's picture

1 Aug 2022 - 12:38 pm | पॉपकॉर्न

याच लक्ष्मीनारायण मंदिरात संभाजी राजे यांचे राजपुत्र शाहुंचे लग्न लागले होते आणि अक्षदा टाकायला औरंगजेब ही हजर होता.
या लग्नात वाजंत्री आणि मंगल वाद्ये वाजवायला औरंगजेबाची खास परवानगी काढली होती.

Jayant Naik's picture

1 Aug 2022 - 10:06 pm | Jayant Naik

सुरेख फोटो आणि उत्तम वर्णन. हे स्थान बघायची उत्सुकता लागून राहिली आहे. या मूर्तीच्या वर्णनावरून या बाबतीत तुमचा अभ्यास लगेच लक्षात येतो. धन्यवाद.

Jayant Naik's picture

1 Aug 2022 - 10:16 pm | Jayant Naik

सुरेख फोटो आणि उत्तम वर्णन. हे स्थान बघायची उत्सुकता लागून राहिली आहे. या मूर्तीच्या वर्णनावरून या बाबतीत तुमचा अभ्यास लगेच लक्षात येतो. धन्यवाद.