दिवाळी अंक २०२२ - गोष्टीची गोष्ट

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 2:45 pm

आजोबा......

डोंगराच्या पल्याड
चेटकीणीचा बंगला
घुबडाचा थोबडा
दरवाज्यावर टांगला

दारावरती वेताळ
अन् भिंतीवरती पाली
पायामध्ये घोटाळते
मांजर काळी काळी

चेटकिणीच्या घरात
सारे गौडबंगाल
न्हाण्यासाठी तपेली
पिण्यासाठी घंगाळ

बंगल्याच्या भोवताली
गोळ्या बिस्किटांचे मळे
त्याच्या मध्ये खोल खोल
साॅफ्ट ड्रिंकचे तळे

चंदेरी, मऊ मऊ,
चेटकिणीचे केस
घातला होता तिने
खवल्या मांजराचा ड्रेस

तीन तीन खविस
मालिश करत होते
लांबसडक केस
उन्हात वाळत होते

नाकाडी चेटकीण
हडकुळीच फार
रोज पकडून खायची
गोड, गोबरी पोरे चार

नातवंडे.........

आजोबा!!
गोष्ट तुमची झाली
आता खूप खूप जुनी
मोटू पतलू अन सिंघमची
आम्ही पोरं दिवानी

काळ्या काळ्या मांजराला
आता कुणी बी घाबरत नाय
टाॅमपेक्षा आमचा जेरीच
खूपच डांबरट हाय

काय पण आजोबा!!!!
काय बी 'फेकतात'
चॉकलेट, गोळ्या कुठे
झाडाला का लागतात?

फ्रुटी आणी साॅफ्ट ड्रिंक
माॅलमध्ये मिळतात
कशाला गुंडाळता आम्हाला..
त्या तर फॅक्टरीत बनतात

'ऑगी आणी झिंगुर'ची
जोडी जगात भारी
'हरी पुत्तर' करतो
झाडूवर सवारी


शुभंकरोती, पर्वचा कालबाह्य झाले
त्याच्या जागी
लिटिल कृष्णा, माय फ्रेण्ड गणेशा
आले

तोडले पोरांनी अकलेचे तारे
अन्
आजोबा चारी मुंड्या चीत झाले...

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

7 Nov 2022 - 5:37 pm | पाषाणभेद

हा हा हा, एकदम खरे आहे.

पॉइंट ब्लँक's picture

7 Nov 2022 - 6:30 pm | पॉइंट ब्लँक

काळ्परत्वे बदललेली परिस्थिती छान टीपलीये.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2022 - 12:31 pm | मुक्त विहारि

हे, एकदम योग्य भाषेत सांगीतले आहे ....

रंगीला रतन's picture

10 Nov 2022 - 3:21 pm | रंगीला रतन

कविता भारी आहे!!!

कर्नलतपस्वी's picture

10 Nov 2022 - 6:01 pm | कर्नलतपस्वी

सर्व वाचकांचे,प्रतिसादकांचे आभार.

चौथा कोनाडा's picture

10 Nov 2022 - 6:34 pm | चौथा कोनाडा

व्वा, खुपच छान.
चेटकीणवाल्या ओळी विशेष आवडल्या.

काळ तर बदलत असतोच
नातवंडांच्या जगात आजोबांना आता अवाक् व्हायचेच काम असते.
आपण जुने होत हित कालबाह्य होणार हे जाणवत आजोबा पिढी हसत असते.

नीलकंठ देशमुख's picture

10 Nov 2022 - 8:46 pm | नीलकंठ देशमुख

छान. आपण नातवंडे आणि आताची नातवंडे ....किती बदल झालाय.काळानुसार बदल होतोच पण अशात हे बदल फार लवकर फार मोठे होताहेत.

चित्रगुप्त's picture

10 Nov 2022 - 10:33 pm | चित्रगुप्त

कवितेची कल्पना आणि रचना आवडली.
सुरुवातीच्या तीन कडव्यातल्या चेटकीण आणि तपेली घंगाळाच्या वातावरणातून चवथ्या कडव्यात एक्दम गोळ्या- बिस्किटे- सॉफ्ट्ड्रिंकवर गाडी घसरल्याचे जरा नवल वाटले. मग आजोबा-नातवंडे वगैरेतून उलगडा झाला.
तपेली-घंगाळाच्या काळातल्या आजोबांना कदाचित असेही काहीतरी सुचले असते:
बंगल्याच्या भोवताली
चकली-करंज्यांचे मळे
त्याच्या मध्ये खोल खोल
बासुंदीचे तळे

असो.आपण कालबाह्य झालेलो आहोत या जाणिवेपेक्षाही आपण 'निरूपयोगी' झालेले असण्याची वेदना जास्त विषण्ण करणारी असते. खेळकर, गंमतीदार कवितेला असलेली ही विषण्णतेची धारदार किनार फार भावली.

प्रचेतस's picture

11 Nov 2022 - 8:52 am | प्रचेतस

एकदम मस्त कविता