रंगभूमीवरची पहाट

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
6 Nov 2022 - 9:46 pm

पुष्पांमाजी मोगरी आणि परिमळांमांजी कस्तुरी असलेल्या माझ्या माय मराठीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लवचिकता. लाकूड तेच - पण जात्यात घातलं की खुंटा होतो, गोठ्यात रोवलं की खुंट होतो आणि भिंतीत ठोकलं की खुंटी होते.

त्याचप्रमाणे, चौथरा तोच - पण रस्त्याच्या कडेला असेल तर आम्ही त्याला कट्टा म्हणतो, झाडाखाली असेल तर पार आणि समोर नारळ फोडून धूप लावला की आमच्यासाठी तो होतो "रंगमंच"! बाकी ते तुमचे लाइट्स, मायक्रोफोन, विंगा वगैरे सगळे लाड आहेत. ते नसले म्हणून "प्रयोग" थांबत नाही. माझी मराठी लोकं पण जरा वेडीच. ह्यांना थ्री-डी अ‍ॅनिमेशनचं अप्रूप नाही की कुठल्या स्टीरिओफोनिक सराउंड साऊंडचं कौतुक नाही. पण पखवाजाची थाप ऐकली की ही लोकं तल्लीन होतात, ढोलकी कडाडली की भान हरपून जातात, ऑर्गन किंवा संवादिनीचे सूर ऐकले की ह्यांचे कान टवकारतात. रुपेरी पडद्यावरच्या हीरोसाठी वाजत असतील टाळ्या-शिट्ट्या, पण माझा मराठी माणूस रंगमंचावरून त्याचं मनोरंजन करणार्‍या हाडामांसाच्या गायक, वादक, नर्तक वा अभिनेत्यावरून जीव ओवाळून टाकतो. की टाकायचा?

औचित्य होतं मराठी रंगभूमी दिनाचं आणि निमित्त होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रानी आयोजित केलेल्या "ललित पौर्णिमेचं." रात्री घरून निघायलाच ९:३० वाजून गेले. विद्यापीठाच्या आवारात शिरलो आणि पार्किंग केलेल्या अगणित गाड्यांनी आमचं दुतर्फा उभ्या राहून स्वागत केलं. "आजकाल नाटकं कोण बघतं?", "गाण्याच्या कार्यक्रमांना जाणं होत नाही." "ह्या कोव्हिडनंतर लाईव्ह परफॉर्मन्सेस पूर्वीसारखे होत नाहीत" वगैरे विधांनांच्या टायरांमधली हवा सुटत होती. विद्यापीठाचं हिरवंगार आवार, पौर्णिमेचं चांदणं, सुंदर सजवलेला अंगणमंच आणि त्या सौंदर्याला चार चांद लावणारी सर्वांत सुंदर गोष्ट - गर्दी. तरुणाईची गर्दी, रसिकांची गर्दी, आजी-माजी आणि भावी विद्यार्थ्यांची गर्दी. अगदी पाऊल ठेवायला जागा नव्हती. आणि त्या गर्दीतल्या प्रत्येक चेहर्‍यावर दिसत होता तो केवळ आणि निव्वळ आनंद. काहीतरी "चांगलं" बघायला, ऐकायला मिळतंय, मिळणार आहे.

सगळेच कलाकार विद्यार्थी होते - काही आजी-काही माजी, काही जात्यातले तर काही सुपातले. काही शहरी काही ग्रामीण, काही होतकरू काही तयारीचे. अक्षरशः भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेले. आजुबाजुला मधूनच सोलापुरी मराठी ऐकू येत होती, बंगाली आणि अगदी अवधी लहेज्यातली हिंदी सुद्धा. प्रत्येकजण वेगवेगळ्या परिस्थितीतून आपापल्या idiosyncrasies घेऊन आलेला. आणि त्यातून ही मुलं मुली ललित कला केंद्रात जे शिकतात ते बाहेरून आत जाणारं पुस्तकी ज्ञान नाही तर आपल्या अंतरंगातून बाहेर प्रकट होणारी "कला". त्यामुळे प्रत्येकाच्याच कलेला त्याच्या वा तिच्या मूळ मातीचा सुगंध. पण वरकरणी ही मुलं कितीही वेगळी वाटत असली तरी त्यांची जात, धर्म, प्रांत, भाषा सगळं काही एकच होतं "कला".

विषय ललित पौर्णिमेच्या कार्यक्रमांचा नाही. विषय आहे "रंगभूमीचं काय होणार?" या प्रश्नाचा. मी काय पाहिलं ठाऊक आहे? मी पाहिलं की ह्या पोरांनी प्रचंड मेहनत घेतली होती, मुलं त्यांच्या कलेत जीव ओतून समरस झाली होती. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मी पाहिलं पं. जितेंद्र अभिषेकी हे नाव उच्चारल्यानंतर एखाद्या रॉकस्टारसाठी व्हावं तसं टाळ्यांच्या गजरात झालेलं आजच्या तरुणाईचं "हूटिंग"! मी पाहिली नाट्यपदातल्या तानेसाठी हात वर करून दिली गेली "अहाहा" अशी खुली दाद. आलापीमधल्या एका कातिल सुरावर आपसूक निघालेलं "स्स्स्स्स्स"चं expression. नाटकातल्या एका रिअ‍ॅक्शनच्या टायमिंगसाठी कडकडून पडलेल्या टाळ्या, पखवाजाच्या नुसत्या बेसच्या थापेनं प्रेक्षकांत पसरलेली समाधानाची लाट. आतडं पिळवटून आलेल्या स्वगताला मिळालेलं अंतर्मुख, नि:शब्द शांततेचं बक्षीस. आणि हे सगळं करणारी लोकं होती त्यांच्या टीन्समधली, विशीतली, अगदी क्वचित तिशीतली.

"रंगभूमीचं काय होणार" हा प्रश्न माझ्यापुरता काल निकालात निघाला. ही तरुणाई खळखळत्या झर्‍यासारखी स्वच्छ आहे. ह्यांच्या जाणीवा समृद्ध आहेत, यांच्या संवेदना जागृत आहेत आणि सहवेदना आधीच्या पिढ्यांपेक्षा कितीतरी प्रगल्भ आहेत. बाकी तंत्र, क्राफ्ट, नेपथ्य, अभिव्यक्तीची पद्धत ह्या गोष्टी बदलत राहणारच आणि त्या बदलल्याच पाहिजेत. त्या बदलत नसत्या तर आपण अजूनही अडीच हजार वर्षांपूर्वीचीच नाटकं बघत असतो, संगीत ऐकत असतो. आधीच्या पिढ्यांची जबाबदारी आहे ती ह्या मुलांचा "पाया" भक्कम करण्याची. त्यांच्यात "साधना" "समर्पण" आणि "संयम" बिंबवण्याची. मूल्यं, तत्वं, नैतिकता ह्या गोष्टी भिनवण्याची. आपण त्यांच्यासाठी मार्ग बनवण्याची गरज नाही, त्यांना मार्ग शोधणं शिकवायचं बस. नाहीच सापडला तर पुढचा मार्ग निर्माण करायला ही नवी पिढी समर्थ आहे ह्याबद्दल मी नि:शंक आहे.

कारण आजच मी रंगभूमीवर पहाट होताना पाहिली आहे.

© - जे.पी. मॉर्गन

संस्कृतीकलानाट्यसंगीतप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

मिसळपाव's picture

7 Nov 2022 - 4:13 am | मिसळपाव

काय सुरेख लिहिलं आहेस रे! याची डीव्हीडी उपलब्ध करतात का ही मंडळी नंतर?
"

आतडं पिळवटून आलेल्या स्वगताला मिळालेलं अंतर्मुख, नि:शब्द शांततेचं बक्षीस.

" क्या बात!

कर्नलतपस्वी's picture

7 Nov 2022 - 6:48 am | कर्नलतपस्वी

मस्त लिहीलय, सुदंर लिहीलय....
असे लिहीणे म्हणजे "तुझे सुरज कहू या चंदा " सारखे होईल.

७०ते ७४ रंगभूमी अगदी जवळून म्हणजे विंगेतून, मेकप रूम ते तिकीटाची खिडकी. दुर्वांची जुडी, दिपा डे,जाॅनीबाबू,अझीझ नाझा,आदरक के पंजे ते घाशीराम पर्यंत पुणेकरांनी केलेले प्रेमही बघितले.
अभिषेकीबुवा,पं वसंतराव, पणशीकर, दादा कोंडके ,कानिटकर, जयवंत दळवी,शांता जोग,लागू जब्बार,मोहन आगाशे....

अरे किती नावे घेऊ जणू नावाचा लोंढा... यांना सर्वाना जवळून बघीतले, ऐकले,आणी बोललो सुद्धा.

निवृत्तीनंतर बालगंधर्व मधे जवळपास तीस पस्तीस वर्षानंतर नाटक बघायला गेलो होतो. वेळ होता पाठीमागे चहा घ्यावा म्हणून कॅन्टीन मधे बसलो होतो. तेवढ्यात नाटकात काम करणारे दोन नावाजलेले कलाकार जवळच्या टेबलावर आले. आंनद झाला . दोन शब्द बोलावे म्हणून उत्साहात जवळ गेलो पण प्रतीसाद बघुन निराशा झाली.
त्यावेळेचे कलाकार व आजचे यात फार मोठा फरक जाणवला. आसो काही कारणे असु शकतात. कदाचित रसिकही या करता जबाबदार असतील.

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2022 - 12:32 pm | प्राची अश्विनी

वाह!किती प्रसन्न वाटलं ह वाचून!

श्वेता व्यास's picture

7 Nov 2022 - 3:38 pm | श्वेता व्यास

काही गोष्टी बदलतात त्या जास्त स्मार्ट होत जातात, ते व्हायलाच पाहिजे हे खरंय.
आधीच्या पिढ्यांची जबाबदारी आहे ती ह्या मुलांचा "पाया" भक्कम करण्याची. त्यांच्यात "साधना" "समर्पण" आणि "संयम" बिंबवण्याची. मूल्यं, तत्वं, नैतिकता ह्या गोष्टी भिनवण्याची. आपण त्यांच्यासाठी मार्ग बनवण्याची गरज नाही, त्यांना मार्ग शोधणं शिकवायचं बस.
क्या बात है! हो अशी तरुणाई दिसते आणि 'कसं होणार पुढच्या पिढीचं' हे विचार कुठल्या कुठे पळून जातात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2022 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय सुंदर लिहिलंय. आमच्याकडे नुकताच युवकमहोत्सव झाला. एकांकिका पाहण्यात मजा असते. स्क्रीप्ट नव लेखकाच्या असतात. पण, अभिनय, संवाद मजा असते. आपण लिहिलेलं सगलं पोहोचलं. धन्स. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

अनिंद्य's picture

7 Nov 2022 - 4:35 pm | अनिंद्य

रंगमंच जवळ करणारी आणि नाट्याविष्कारांना प्रतिसाद देणारी नवी पिढी घडतेय,आनंद वाटला. उत्तम असेल ते / तर नाटक टिकेल... आशावादी राहू यात.

दरवर्षी पुण्यातला विनोद दोषी थियेटर फेस्टिवल, त्यातली नव्या-जुन्या विविधभाषी नाटकांची मेजवानी चुकवत नाही. तरुणांचा भरपूर प्रतिसाद दिसतो. आता 'सारंग' नावाने तो जलसा करतात बहुतेक, कोरोनापश्चात जाणे झाले नाही :-(

खुंटा, खुंट, खुंटी - भारीच !

मुक्त विहारि's picture

8 Nov 2022 - 12:35 pm | मुक्त विहारि

विषय बदलत राहतील ...

मित्रहो's picture

9 Nov 2022 - 4:45 pm | मित्रहो

सुंदर लेख आणि अनुभव
नाटक करुन पोट भरणार की नाही हा मुद्दा वादाचा आहे पण नाटक कधी मरणार नाही हे मात्र खरे. मनुष्य जन्माला आला की काही महिन्यातच नाटक करायला शिकतो. नाटक करायला दोनच गोष्टी लागतात नाटक करण्याऱ्यांचा उत्साह, दाद देणाऱ्यांचा जोष.