बोनेदी बारीर पूजो

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
10 Oct 2018 - 5:29 pm

“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो.

'दुर्गापूजा' (बंगालीत फक्त 'पूजो') असा नुसता शब्द जरी ऐकला तरी समस्त बंगालीजनांचे डोळे लकाकतात आणि चेहऱ्यावर हमखास स्मिताक्षरे उमटतात. महाराष्ट्र आणि बंगाल दोहोंमध्ये असलेल्या अनेकानेक साम्यस्थळांमधले एक उठून दिसणारे साम्य म्हणजे उत्सवप्रियता. त्यात मराठी मनात जे महत्व गणेशोत्सवाचे तेच महत्व बंगालीजनांमध्ये दुर्गोत्सवाचे. हे दोन्ही उत्सव साजरे करण्याची पद्धत, त्यातील उत्साह, जनसामान्यांचा सहभाग, भव्य कलात्मक मंडप, देखावे, पारंपरिक खाद्यपदार्थांची लयलूट, नातेवाईक-मित्रमंडळींचे एकत्र जमणे….. बरेचसे सारखे आहे. माझ्या कन्येच्या शब्दात सांगायचे तर 'बाप्पाज मॉम टेक्स हिज प्लेस अँड शी स्टील्स द शो. आफ्टरऑल शी इज द मॉम, सो शी नोज हाऊ टु'

लहान-थोर-जवळचे-दूरचे-नवीन-जुने नातेवाईक आणि मित्र सगळ्यांनी ठरवून एकमेकांना भेटायचा वार्षिक सोहळा म्हणजे बंगालातील दुर्गापूजा. महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध गणपती मंडळांसारखीच कोलकात्यात सार्वजनिक दुर्गा मंडळे आहेत. त्याचे भव्य पंडाल, रंगांची उधळण करणारे कलात्मक देखावे, रात्री रंगीबेरंगी रोषणाईने झगमगलेले वातावरण, खाण्यापिण्याची शेकडो दुकाने, सकाळ-संध्याकाळ होणारी पूजा आणि आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सगळीकडे कोलकातावासियांची अपार गर्दी असे दृश्य सर्वत्र असते.

पण हा झाला सर्वसामान्य लोकांचा वार्षिक दुर्गोत्सव. मी सांगतोय ती कहाणी थोडी वेगळी आहे - कलकत्त्याच्या गर्भश्रीमंत जमीनदारांच्या भव्य महालांमध्ये होणाऱ्या दुर्गोत्सवाची, म्हणजेच 'बोनेदी बारीर पूजो' ची.

पूर्व भारतात अनेक शतकांपासून शाक्तपंथाचा प्रभाव आहे. ईश्वराला शक्तीरूपात पुजण्याची परंपरा अगदी चौथ्या शतकापासून आहे. सहाव्या शतकानंतर अनेक आदिवासी दैवते हळूहळू वैदिक देवतांमध्ये समाविष्ट होऊ लागली आणि काली / चामुंडा अश्या रौद्ररूपिणी देवींचे उग्र स्वरूप उदयाला आले, लोकप्रिय झाले. देवतांना प्रसन्न करण्यासाठी अनेक पशुपक्ष्यांचे बळी-नरबळी पूजाविधीत समाविष्ट होते. मातृरुपी, शांत, लेकुरवाळी वत्सलमूर्ती 'दुर्गा' हे रूप बरेच उशिराने विकसित झाले आहे, साधारण सोळाव्या शतकाच्या शेवटी.

काही मोजक्या धनाढ्यांचे महाल वगळता शारदीय नवरात्रात दुर्गेची 'सारबोजनीन' (सार्वजनिक) पूजा हा प्रकार तर आणखीच उशिरा आला, साधारण अठराव्या शतकाच्या सुरवातीला. तोवर बंगालच्या नवाबाच्या सत्तेला उतरती कळा लागून बंगालातील जमीनदार स्वतंत्र झाले होते. १७५७ चे प्लासी युद्ध जिंकून ब्रिटिशांनी बंगाल ताब्यात घेतला तेंव्हा ह्या श्रीमंत जमीनदार मंडळींनी आपल्या निष्ठा इंग्रजांना वाहिल्या. इंग्रजांशी होणाऱ्या व्यापारामुळे त्यांच्या समृद्धीत आणखी भर पडली आणि त्यांच्या राजेशाही महालांमध्ये भव्य प्रमाणात वार्षिक दुर्गोत्सव साजरा करण्याची परंपरा विस्तार पावली, प्रचंड लोकप्रिय झाली. हीच ती बोनेदी बारीर पूजो..... आजच्या 'सारबोजनीन' दुर्गापूजेचे आद्य रूप.

‘सुमारे दोन आठवडे चालणारा, बंगाली संगीत, नाट्य, लोककला, मनोरंजन, खास लखनौ-अलाहाबाद आणि मुर्शिदाबादहून आलेल्या प्रसिद्ध नृत्यांगनांच्या मैफिली, खानपान यांची रेलचेल असलेला वैभवशाली महोत्सव’ असे वर्णन ब्रिटिश दस्तावेजांमध्ये मुबलक आढळते. आज तशी श्रीमंती आणि थाटमाट उरलेला नसला तरी ह्या दुर्गापूजा आपले ऐतिहासिक महत्व आणि पारंपरिक आब राखून आहेत.

जमीनदारांच्या भव्य महालांना बंगालीत 'राजबारी' असे नाव आहे. ह्या पूजा राजबारीतील 'ठाकुर दलान' नामक भव्य देवघरात साजऱ्या होतात, त्यासाठी पंडाल वगैरे बांधल्या जात नाहीत. महिना आधीपासून ठाकुर दलानाच्या साफसफाई आणि नवीन रंगकामाला सुरुवात होते.

पिढ्यांपिढ्यांचे ठरलेले मूर्तिकार ठरलेल्या साच्यात मूर्ती घडवायला घेतात आणि कलकत्त्याच्या कुमारटोलीचा भाग गजबजतो आणि शहराला दूर्गापूजेची चाहूल लागते.

प्रतिमा घडवणारे कलाकार दुर्गप्रतिमेच्या मुखासाठी लागणारी माती सोनागाछी भागातील वेश्यांच्या घरून समारंभपूर्वक आणतात - वारांगना ह्याच खऱ्या 'चिरसोहागिनी' - अखंड सौभाग्यवती असतात ही भावना त्यामागे आहे.

भारतभर शारदीय नवरात्र हा 'नऊ' रात्रींचा सण असला तरी बंगालात दुर्गापूजा पाच दिवसांची असते. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी (षष्ठी) राजबारीतील सजवलेल्या ठाकूर दलान मध्ये दुर्गेचे आगमन होते. बरे ही कुटुंबवत्सल दुर्गा एकटी येत नाही, तिच्यासोबत तिचा मोठा लवाजमा असतो - महिषासुराला पायाखाली चिरडणारी दुर्गा, तिचे दोन्ही पुत्र - गणपती आणि कार्तिकेय, सोबतीला लक्ष्मी आणि सरस्वती, क्वचित काही ठिकाणी शंकर सुद्धा सौंना सोबत करायला येतात :-)

दुसरे दिवशी सप्तमीला प्राणप्रतिष्ठेसाठी एक मजेशीर विधी असतो - कोला बहू ! सूर्योदयाच्या आधी केळीच्या कोवळ्या फांदीला गंगास्नान करवून वधूप्रमाणे भरजरी लाल वस्त्रांनी आणि दागिन्यानी सजवले जाते. हेच ते दुर्गेचे 'आत्मरूप' - कोला बहू किंवा केळीच्या पानातील सवाष्ण दुर्गा. प्राणप्रतिष्ठतेच्या वेळी आवाहन केल्यानंतर ह्या फांदीतून दुर्गेचे प्राण मृत्तिकेच्या मूर्तीत अवतरित होतात अशी श्रद्धा आहे. एकदा हे झाले की पुढील चार दिवस उत्सवाला उधाण येते. रोज सकाळ संध्याकाळ पूजा, भोग, 'अंजली' (आरती), नाचगाणे, सांस्कृतिक कार्यक्रम यांची रेलचेल होते.

(अवांतर :- सर्वच दुर्गा कुटुंबीय सुंदर दिसत असले तरी मला ह्यांचा महिषासुर फारच बापुडवाणा वाटतो. म्हणजे तो दैत्य तर दिसत नाहीच, उलट दोन्ही गालात रसगुल्ले भरून आळसावलेला व्रात्य मुलगाच जास्त दिसतो, ते एक असो :-)

बोनेदी बारींपैकी सुबर्ण रायचौधरी परिवाराची दुर्गापूजा कलकत्त्यातच नव्हे तर अक्ख्या बंगाल प्रांतातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित दुर्गापूजा आहे. कुटुंब जुन्या काळापासून गर्भश्रीमंत. सुवर्णबाबूंनी कलकत्ता शहर वसवण्यासाठी ब्रिटिशांना स्वतःची जमीन भाड्याने दिली होती, त्यावरून काय ते समजा. त्यांना आद्यपूजक परिवार म्हणून मान आहे. बारीषाच्या त्यांच्या मुख्य राजबारीत थेट १६१० साला पासून दुर्गापूजा होते आहे. प्रमुख राजबारीचे सद्य वारस आता आठ वेगवेगळ्या कुटुंबात विभागले आहेत. त्यांच्यापैकी एक सांगतात - ‘आमच्या दुर्गेला 'संगीतप्रिया' म्हणतात कलकत्त्यात. रात्र रात्रभर चालणारे शास्त्रीय गायनाचे जलसे आणि ते ऐकण्यासाठी लोटलेली दर्दीजनांची गर्दी हे दृश्य आता फार दिसत नाही, पण म्हणून आम्ही आमच्या दुर्गेला संगीत ऐकवत नाही असे नाही. या तुम्ही सप्तमीच्या रात्री, आता राजबारीचे 'नाचघर' नाहीये पूर्वीसारखे, ते कोसळले काही वर्षांपूर्वी. पण त्यानी फरक पडत नाही. बहारदार रबिन्द्र संगीताचा कार्यक्रम आहे इथेच, ह्या ठाकुर दलानमध्ये…..’ गर्वाने ओथंबलेली अशी अनेक विधाने अन्य सदस्यांकडून येतात. खऱ्या माणिकमोत्यांच्या दागिन्यांनी सजलेल्या त्यांच्या दुर्गेचे रूप मात्र फार सोज्वळ.

रायचौधरींच्या राजबारीला जाण्याचा रस्ता अगदीच सोप्पा आहे - डायमंड हार्बर रोड गाठा, गर्दीला न जुमानता बेहाला चौरस्त्याकडे निघा, साखेरबझारच्या अरुंद, गर्दीभरल्या चौकातून के के रॉयचौधुरी रस्त्यावर या. उजवीकडे सबर्ण पारा रोड दिसतो न दिसतो तसे आतमध्ये घुसा. काही पावलांवर अतिप्राचीन द्वादशशिवमंदिर दिसेल. तिथल्या गर्दीतुन वाट काढत काही पावलातच तुम्ही रॉयचौधुरींच्या भव्य ठाकुर दलान मध्ये पोहचाल (दमलात?) त्यांचे स्वतःचे कुटुंब प्रचंड मोठे असल्यामुळे इथे आगंतुकांना प्रवेश नाही, त्यामुळे हा खटाटोप वाया जाण्याची शक्यता आहे.

आगमन आणि विसर्जनाला ब्रिटिश काळापासून खऱ्याखुऱ्या तोफांची सलामी घेणारी राजा नवीनकृष्ण देव ह्यांची शोभाबाझार राजबारी दुर्गा ही पण अशीच एक पुरातन पूजा. स्थापनेचे वर्ष १७५७. कुटुंबीयांमध्ये काही वाद झाल्याने विभक्त झालेल्या दुसऱ्या पातीने समोरच असलेल्या ‘छोटो राजार बारी’ ठिकाणी दुसरी पूजा सुरु केली १७९१ साली.

"आमच्याकडे दुर्गापूजेला आलेल्या पाहुण्यांची यादी भारदस्त आहे. लॉर्ड कलाइव्ह, वॉरेन हेस्टिंग्स, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, नेपाळ नरेश महेंद्र, प्रिन्स ऑफ वेल्स, खुद्द रवींद्रनाथ टागोर आमच्या दुर्गेला नमन करायला येऊन गेले आहेत." राजा नबीनकृष्णांच्या सद्य वारसांचा अभिमान आजही शब्दा-शब्दातून ओसंडतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आता यथातथाच असली तरी दोन्ही राजबारी बऱ्यापैकी राखल्या आहेत आणि आधी आमंत्रण सुनिश्चित केल्यास दर्शनापुरता प्रवेश मिळण्याची शक्यता आहे इथे.

दुर्गा भोग :

उत्सव आणि खाणेपिणे ह्यांचा अन्योन संबंध आपल्या सर्वांना माहिती आहेच. पोटपूजेशिवाय उत्सवात कसली मजा? सार्वजनिक दुर्गापूजेच्या मंडपांमध्ये एक मोठा भाग ह्या 'भोग' (प्रसाद) साठी राखीव असतो. खिचुरी, पुरी, बेगुन भाजा, छेनार पायेश हा प्रसाद बहुतेक ठिकाणी असतो.

पण राजबारींची तऱ्हाच न्यारी. त्यांचा भोग अनेकदा ६० पेक्षा जास्त पदार्थांचा असतो ! घी भात, वासंती भात, मोठ्या परातीच्या आकाराच्या राधावल्लभी (ह्या बंगाल्यांचा रसबोध फारच उच्च दर्जाचा आहे राव - नाहीतर मैद्याच्या पुरीला कोणी ‘राधावल्लभी’ म्हणतं का?) केशरी पुऱ्या, गोडाच्या पुऱ्या, कोचू साग, खिचुरी, जिलबी, मालपुवा, अनेक प्रकारचे वडे, केशर पायेश, संदेश, इंद्राणी, हिरामणी, रसमणी, दुर्गाभोग, रसमोहन, खीरकदम, चमचम, खीरमोहन, कांचागोला, लेडी किनी (हो, मिठाईचंच नाव आहे ते :-) अश्या मनोरम नावांच्या डझनावारी प्रकारच्या बंगाली मिठाया असा भरगच्च मेनू दुर्गेच्या दिमतीला असतो.

शोभाबाझार राजबारीसारख्या काही क्षत्रिय यजमानांच्या दुर्गा ताजा शिजवलेला भात / अन्न खात नाहीत, त्यामुळे खिचुरी बाद होते पण 'भोग'च्या भव्यतेत काही कमतरता नसतेच. ह्या दुर्गे साठी मग आदल्या दिवशी वेगवेगळ्या चविष्ट मिठाया तयार केल्या जातात. ह्यांच्याकडच्या 'मोंडा' मिठाया फार कल्पक आणि त्यांचा आकार भव्य. साधारण पाच पाच किलो वजनाचे पांढरे शुभ्र मोतीचूर लाडू ही इथली खासियत आहे. (फोटोसाठी बंदी असल्यामुळे फोटो नाहीत). निमकी, चंदन खीर, तालशांश, चंद्रपुली, पंतुआ, पान गाजा, जोलभरा संदेश …… देब कुटुंबीयांनी सांगितलेली नावे लक्षात ठेवणे अशक्य इतके प्रकार ! काही बोनेदी बारींच्या राजगृहात आलेल्या दुर्गा मीठ खात नाहीत तर काही रुचिपालट म्हणून एक वेळ सामिष भोजन करतात - ‘कोई’ माश्यांचे कालवण ही विशेष सामिष 'भोग' डिश.

बंगाली लोक फक्त 'माछेर झोल आणि भात खातात' हा माझा गैरसमज नेहमीसाठी दूर झाला इतके प्रकार राजबारीच्या कुटुंबीयांनी दाखवले आहेत. दुर्दैवाने हा सगळा सरंजाम बघायला आणि भोग चाखायला मिळणे दुर्लभ आहे, त्यासाठी राजबारीच्या मालकांनी तुम्हाला व्यक्तिगत आमंत्रण द्यायला हवे. :-)

संगीत, रस, गंध, अन्न असा सर्व पाहुणचार भोगून आणि भक्तांना आशीर्वाद देऊन तृप्त मनाने दुर्गा 'बिजोया' म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सासरी जायला निघते. राजबारीचे प्रमुख यजमान 'नीलकंठ' पक्ष्यांची एक जोडी पिंजऱ्यातून मुक्त करतात, त्यांनी स्वर्गात शंकराला दुर्गेच्या आगमनाची पूर्वसूचना द्यावी अशी अपेक्षा असते. आता वन्यजीव कायद्यामुळे खरे नीलकंठ पकडण्यास मनाई आहे, तस्मात रेशमी रुमाल किंवा मातीच्या प्रतिकृती वापरतात.

मग आपल्याकडच्या गणपती विसर्जनासारख्या मिरवणुकांनी कलकत्ता शहर गजबजून जाते. एव्हाना संजय लीला भन्साली आणि तत्सम अन्य चित्रपटकारांमुळे आपल्या परिचयाचा झालेला 'सिंदूर खेला' ह्याच मिरवणुकीत होतो. दुर्गेची पाठवणी करतांना सवाष्ण स्त्रिया तिला रक्तवर्णी टिळा लावतात आणि मग एकमेकांना लाल रंगात माखवतात, एक मिनी रंगपंचमी घडते - पण रंग फक्त लाल आणि सहभाग फक्त स्त्रियांचा. 'पाड' म्हणजेच लाल काठाची पांढरी साडी हा युनिफॉर्म. रुपये पाचशे ते साठ हजार पर्यंत किमतीच्या ह्या साड्या म्हणजे बंगसुंदरींचा जीव की प्राण.

दुर्गा प्रतिमांच्या गंगेत विसर्जनाने उत्सव संपतो. पुढल्या दुर्गापूजेपर्यंत मग ह्या बोनेदी राजबारींमध्ये शुकशुकाट पसरतो. गुरुदेव रबिन्द्रनाथांच्या शब्दात सांगायचे तर - क्लांत दिवस आणि प्राणहीन रात्रींचे सत्र सुरु राहते.

* (लेखनाचे प्रताधिकार सुरक्षित. ह्या लेखातील कुठलाही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये.)

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

10 Oct 2018 - 6:32 pm | कुमार१

आणि फोटो देखील प्रेमात पडावे असे.
त्या 'भोगाचा' उपभोग घ्यावासा वाटतोय ☺️

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 12:39 pm | अनिंद्य

@ कुमार१,

आभार.
'भोगाचा' उपभोग .....
नक्की जाणार आहात का ? ह्या वर्षी शक्यता आहे, काही ठरल्यास व्य नि करा.

राही's picture

10 Oct 2018 - 7:07 pm | राही

फोटो उत्तम आणि वर्णनही तितकेच रसपूर्ण. अगदी कलकत्त्यात असल्यासारखे वाटले.

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 12:50 pm | अनिंद्य

आभार _/\_

प्रचेतस's picture

10 Oct 2018 - 8:14 pm | प्रचेतस

अप्रतिम लेख.

तुमच्या लेखनाची शैली खूपच जबरदस्त. एका भारित वातावरणात तुम्ही छानपैकी फिरवून आणलेत.

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 12:53 pm | अनिंद्य

प्रचेतस,
कौतुकाबद्दल आभार.
पूजोचे वातावरण 'भारित' असते खरे :-)

यशोधरा's picture

10 Oct 2018 - 8:23 pm | यशोधरा

सुरेख लिहिलंय.

यशोधरा,
प्रतिसादाबद्दल आभार.

प्रमोद देर्देकर's picture

10 Oct 2018 - 8:59 pm | प्रमोद देर्देकर

एका वेगळ्या पूजेच्या प्रथेचा खूप छान परिचय करून दिलात .

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 1:43 pm | अनिंद्य

@ प्रमोद देर्देकर,
आभार !
मी फारसा धार्मिक नाही, पण उत्सवातील इतिहास आणि सांस्कृतिक आयामाचे मला आकर्षण आहे.

अभ्या..'s picture

10 Oct 2018 - 9:01 pm | अभ्या..

प्रचंड सुंदर वर्णन. अगदी त्या मिठाईंच्या भरगच्च प्रसादासारखे.
काहीच माहीती नव्हते हो ह्यापैकी.
ते मूर्तींना वारांगनांच्या घरची माती वापरली जाते आणि काही चित्रपटांमुळे माहीत झालेले सीन वगळता सारे काही अनोखे आहे.
अवर्णनीय म्हणता येणार नाही कारण तुम्ही हे अवघड काम लीलया पेलले आहे.
धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 1:02 pm | अनिंद्य

अभ्या..

भरभरून केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे.

.... सारे काही अनोखे आहे.....

होय, अनेकदा आपलाच देश, आपलेच लोक यांच्यात interaction कमी पडते.

पिलीयन रायडर's picture

10 Oct 2018 - 9:03 pm | पिलीयन रायडर

अहाहा काय नावं! राधावल्लभी काय! वासंती भात काय!

सुरेख लेख! वाह!

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 1:07 pm | अनिंद्य

तेच तर :-)

म्हणूनच लिहिले - ह्या बंगाल्यांचा रसबोध फारच उच्च दर्जाचा आहे. नाहीतर मैद्याच्या पुरीला कोणी ‘राधावल्लभी’ म्हणतं का?

प्रतिसादाबद्दल आभार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Oct 2018 - 9:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रत्यक्षदर्शी वर्णन ! तुमच्याबरोबर बंगालातील दूर्गापूजेच्या उत्सवात आम्ही फिरत आहोत असेच वाटले. कितीतरी नवीन माहिती मिळाली.

नाखु's picture

10 Oct 2018 - 10:18 pm | नाखु

किमया आहे,आणि इतक्या पदार्थांची नावे पहिल्यांदा ऐकली, रसगुल्ला सगळीकडे उठाठेवी करीत असायचा.

भारी लेख

घरकोंबडा नाखु

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 2:04 pm | अनिंद्य

थँक्यू !

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 2:07 pm | अनिंद्य

डॉ म्हात्रे, आभार !

डोंबिवलीला राहत असताना विद्यार्थीदशेत व्यापारी मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात सक्रीय कार्यकर्ता असतानाची एक जुनी आठवण ताजी झाली ह्या निमित्ताने. खास 'कुमारटोली' च्या कारागिरांनी घडवलेल्या देवीच्या मूर्तीची एकावर्षी स्थापना केली होती. मूर्ती एवढी सुंदर होती कि फक्त दर्शनी भागच फिनिश्ड असून सुद्धा, विसर्जन करायची कोणाचीच इच्छा होत नव्हती. (त्यांच्या पद्दतीत मूर्ती घडवताना केवळ दर्शनी भागच पूर्ण केला जातो, मागच्या बाजूने आधाराचे वेत/बांबू, आणि माती तशीच दिसते)
खूप छान माहितीपूर्ण वर्णन केलं आहेत. धन्यवाद.

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 2:01 pm | अनिंद्य

@ टर्मीनेटर,

तुमचा अनुभव शेयर केल्याबद्दल आभार.

......मूर्ती घडवताना केवळ दर्शनी भागच पूर्ण केला जातो....

बरोबर. ह्या पॅनल पद्धतीच्या मूर्तींमध्ये आडवी बाजू बरीच मोठी असते, संपूर्ण एकसंध मूर्तीचे वजन पेलण्यासाठी हे पॅनल कमीत कमी वजनाचे करावे लागते. हौशी कलाकार म्हणून ह्यात थोडी लुडबुड केली आहे, म्हणून ही माहिती :-)

जोलभराच्या फॅनक्लबमध्ये स्वागत !

अनिंद्य

रागो's picture

11 Oct 2018 - 12:45 pm | रागो

अप्रतिम

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 1:11 pm | अनिंद्य

आभार

नंदन's picture

11 Oct 2018 - 2:23 pm | नंदन

लेख अतिशय आवडला. नेमका, माहितीपूर्ण आणि तरीही अजिबात बोजड न होणारा.
(अवांतरः 'राधावल्लभी'वरून 'माणिकपैंजण' आणि 'सुशीला' आठवले :))

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 3:58 pm | अनिंद्य

@ नंदन,
आभार !

......'माणिकपैंजण' आणि 'सुशीला' आठवले .....

सुशीला ऐकून माहिती आहे पण हे 'माणिकपैंजण' काय आहे ?

अभ्या..'s picture

11 Oct 2018 - 4:09 pm | अभ्या..

चपात्यांचा कुस्करा करुन त्याला फोडणी दिली की वाजले माणिकपैंजण असे वाचल्याचे स्मरते. त्यातच दह्याची अ‍ॅडिशन करुन गोपाळकाला पण ऐकले होते.
वरणफळांना एका कुटुंबात अमृतफळे असे संबोधन ऐकले होते.

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 4:54 pm | अनिंद्य

उडी बाबा !
भीषोण !!
:-))

मुक्त विहारि's picture

11 Oct 2018 - 2:51 pm | मुक्त विहारि

लेडी किनी (हो, मिठाईचंच नाव आहे ते :-)

ह्या बद्दल लोकसत्तेत एक माहिती आली होती.

"जे आले ते रमले" ह्या सदरात ही माहिती आली होती. व्हॉइसरॉय कॅनिंगच्या बायकोची, लेडी कॅनिंगची, ही आवडती मिठाई.तिच्या वाढदिवसाला, ही मिठाई, म्हणून ह्या मिठाईचे नांव "लेडी किनी."

गरजूंनी खालील लिंक बघावी....

https://www.loksatta.com/navneet-news/charlotte-canning-1767242/

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 4:05 pm | अनिंद्य

मुक्त विहारि,

हो, लेडी किनी फेमस आहे कोलकात्यात, इंग्रजांच्या जुलमाचा वचपा म्हणून आजही ह्या लेडीचे तुकडे तुकडे करून भक्षण करणारे लोक आहेत :-)

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

कंजूस's picture

11 Oct 2018 - 5:55 pm | कंजूस

लेख आणि चित्रे वाचनीय , सुरेख.
कोलकात्यात विशेष काही नाही अशी माझी समजूत होती म्हणून डिसेंबरात भुबनेश्वर गेल्यावर तिकडे गेलो नव्हतो.
टर्मिनेटर म्हणतात तसे डोंबिवलीतल्या अमच्या कंपनीतल्या बंगाल्यांचा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होतो दुर्गापुजेचा. ठाणे ते उल्हासनगर अंबरनाथचे सगळे बोंगाली येतात. धार्मिक / भाविक नसल्याने कधी गेलो नाही.

प्रत्येक शहर काही वेगळ्या पद्धतीने पाहायचे असते ते आज दिसले. माहितीपत्रके जमवून ठेवलेली आहेत ती पुन्हा वाचून काढतो.

वार्षिक अंक - दिवाळी अंक काढण्याची कल्पना बांगला दुर्गापुजा "पोत्रिका"(=अंक) मधून आली.

फोटो फार सुंदर आणि अप्रतिम आहेत.

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 8:20 pm | अनिंद्य

@ कंजूस,

जगात जिथे म्हणून मराठी माणूस पोहचलाय तिथे जसा गणेशोत्सव तसेच जिथे बंगाली तेथे दुर्गापूजा हे समीकरण आहे. मुंबई आणि उपनगरात जोरात असतो उत्सव, पण थोडा 'फिल्मीपणा' घुसलाय तिकडे.

.....प्रत्येक शहर काही वेगळ्या पद्धतीने पाहायचे असते....

नक्कीच.

.... दिवाळी अंक काढण्याची कल्पना बांगला दुर्गापुजा "पोत्रिका"(=अंक) मधून आली......

अगदी बरोब्बर, ह्यावर लिहिले तर एक लेख होईल :-)

विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार आणि तुमच्या कोलकाता भेटीसाठी शुभेच्छा _/\_

अनिंद्य

श्वेता२४'s picture

11 Oct 2018 - 6:00 pm | श्वेता२४

बंगाली दूर्गोत्सवाचं हे असं स्वरुप माहितीच नव्हतं. त्यात तुमचे सुंदर फोटो व ओघवती वर्णनशेली. खूपच आवडलं. या निमित्ताने बंगाली संस्कृती त्यांच्या खानपान सवयींची माहिती झाली. धन्यवाद

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 8:32 pm | अनिंद्य

@ श्वेता२४,

काही शहरांशी, संस्कृतींशी बॉण्ड तयार होतो, सकारण किंवा अकारणही.
माझे म्हणाल तर 'अनिंद्य' हे नावही बंगालीच आहे :-)

प्रतिसादाबद्दल आभार !

वाह! वाह! वाह! अप्रतिम धागा.
या दुर्गापुजेला कोलकात्यास जाण्याचा प्लॅन होता. दुर्दैवाने कॅन्सल करावा लागला. किती मोठा आनंद मिस केला याचं दर्शन तुमच्या धाग्यावर होते आहे. :(

अनिंद्य's picture

11 Oct 2018 - 8:07 pm | अनिंद्य

पुंबा,
आभार !
.......कोलकात्यास जाण्याचा प्लॅन दुर्दैवाने कॅन्सल ....
अजूनही जाऊ शकाल तुम्ही, षष्ठीला वेळ आहे अजून.

पिवळा डांबिस's picture

11 Oct 2018 - 11:14 pm | पिवळा डांबिस

अभिनंदन.
माहितीपूर्ण तरीही आटोपशीर असल्याने कंटाळवाणं न होणारं हे लिखाण आवडलं.
बंगालच्या इतर सांस्कृतिक अंगांविषयी आपल्या मराठी लोकांना अनोखं असं काही असेल तर जरूर येऊ द्या, माहिती करून घ्यायला आवडेल.

अनिंद्य's picture

12 Oct 2018 - 11:01 am | अनिंद्य

@ पिवळा डांबिस,

............बंगालच्या इतर सांस्कृतिक अंगांविषयी लिखाण .......

मनात आहे, एका मोठ्या लेखमालेचा विषय आहे तो.

प्रतिसादाबद्दल आभार.

अनिंद्य

मुक्त विहारि's picture

12 Oct 2018 - 12:38 pm | मुक्त विहारि

जरूर लिहा.

अनिंद्य's picture

15 Oct 2018 - 12:34 pm | अनिंद्य

प्रयत्न करीन.

निशाचर's picture

12 Oct 2018 - 1:21 am | निशाचर

अभिजनांच्या दुर्गापूजेची खूप सुंदर ओळख! फोटोही अप्रतिम आहेत.

शिकत असताना बरोबरीच्या वंग मित्रमैत्रिणींनी आयोजित केलेल्या पूजेला जायचे, त्याची आठवण आली. काहीही करायचं म्हटलं की 'पूजेआधी' किंवा 'पूजेनंतर' याची गंमत वाटायची. तेव्हाची भोगाची खिचुरी, बेगुन भाजा आणि आंबटगोड चटणी अजून आठवते.

नवर्‍याला खिचडीबिचडी आठवत नाहीये, पण आमचा दोघांचा फोटो काढलेला आठवतोय. बंगाली तरुणतरुणींसाठी पूजा म्हणजे प्रेमात पडण्याचे दिवस. (डोंबिवलीकरांसाठी दिवाळी पहाटेचा फडके रोड!) आणि आधीच प्रेमात पडलेले असाल तर दुर्गेच्या मूर्तीपाशी जोडीने फोटो काढायलाच हवा, असं बजावून फोटो काढला गेला होता ;)

अनिंद्य's picture

12 Oct 2018 - 12:23 pm | अनिंद्य

@ निशाचर,

तुमच्या आभिप्रायाची मला प्रतीक्षा होती. हा लेख मराठीत आणि इथे मिपावर लिहिला याचे प्रमुख श्रेय तुमच्याशी झालेल्या मराठी-बंगाली लोकजीवन आणि समाजशास्त्राच्या अंगांनी तुलना/ सांस्कृतिक जुळेपणाचे मुद्दे इत्यादी चर्चेला आहे _/\_

'पूजोआधी' किंवा 'पूजोनंतर' असे वर्षाचे विभाजन फारच क्यूट आणि हमखास आढळणारे :-)

तुमच्या पूजोच्या आठवणी सुखद आहेत.

अनेक आभार !

अनिंद्य

निशाचर's picture

13 Oct 2018 - 8:41 pm | निशाचर

_/\_

असे माहितीपूर्ण आणि रोचक लेखन वाचायला मिळणार असेल तर चर्चा करायला अर्थातच आवडेल!

अनिंद्य's picture

13 Oct 2018 - 9:46 pm | अनिंद्य

:-)

वरुण मोहिते's picture

13 Oct 2018 - 11:36 am | वरुण मोहिते

शिक्षणा निमित्त पश्चिम बंगाल ला राहिलो आहे त्या मुळे अधिक भावला

अनिंद्य's picture

13 Oct 2018 - 8:07 pm | अनिंद्य

@ वरुण मोहिते,

...... शिक्षणानिमित्त पश्चिम बंगालला राहिलो आहे ....

अरे वा, मग तुम्हाला बंगबंधूंकडून एखादे आमंत्रण नक्कीच मिळाले असेल पूजोचे.

अभिजीत अवलिया's picture

13 Oct 2018 - 6:50 pm | अभिजीत अवलिया

अप्रतिम लेख.

अनिंद्य's picture

13 Oct 2018 - 8:08 pm | अनिंद्य

आभार _/\_

नि३सोलपुरकर's picture

13 Oct 2018 - 9:29 pm | नि३सोलपुरकर

दारून सुंदर .._/\_

चष्मेबद्दूर's picture

13 Oct 2018 - 9:29 pm | चष्मेबद्दूर
Nitin Palkar's picture

13 Oct 2018 - 9:29 pm | Nitin Palkar

खूपच छान वर्णन! लेख खूपच आवडला. कोल्कात्त्याचे एकंदर वर्णन ऐकून भारत दर्शनाच्या कार्यक्रमात कोलकत्ता option ला टाकला होता, पुढच्या दसऱ्याला नक्की कोलकत्ता.... पुलेशु

अनिंद्य's picture

13 Oct 2018 - 9:44 pm | अनिंद्य

नितिनराव,
पुढच्या पूजोला जाणार असाल तर आधी मला सांगा नक्की.

चष्मेबद्दूर's picture

13 Oct 2018 - 9:30 pm | चष्मेबद्दूर
अनिंद्य's picture

13 Oct 2018 - 9:34 pm | अनिंद्य

@ नि३सोलपुरकर
@ चष्मेबद्दूर,

आभारी आहे _/\_

अनिंद्य's picture

22 Oct 2020 - 5:24 pm | अनिंद्य

आज षष्ठी, बंगाली कुटुंबात दुर्गापूजेची सुरुवात होण्याचा दिवस. त्यानिमित्ताने धागा वर काढत आहे.

यावर्षी उत्सवावर करोनाची दाट छाया आहे असे तिकडचे मित्र सांगत आहेत.

महासंग्राम's picture

22 Oct 2020 - 10:32 pm | महासंग्राम

अप्रतिम

अनिंद्य's picture

24 Oct 2020 - 9:04 pm | अनिंद्य

_/\_

शेखरमोघे's picture

22 Oct 2020 - 11:59 pm | शेखरमोघे

खूब भालो, ऑनिन्द्द बाबू!!

अनिंद्य's picture

24 Oct 2020 - 9:04 pm | अनिंद्य

धोन्योबाद महाशय !

अरविंद कोल्हटकर's picture

23 Oct 2020 - 3:37 am | अरविंद कोल्हटकर

'अंतरमहाल' हा हिंदी चित्रपट बंगाली जमिनदार वातावरणाशी संबंधित आहे. त्यामध्ये जमिनदाराच्या वाड्यातील दुर्गापूजाहि दाखविली आहे. हे जमिनदार इंग्रजांची चापलुसी करण्यात धन्यता मानत. चित्रपटातील जमिनदाराने आपल्या वाड्यातील दुर्गेला विक्टोरिया महाराणीचे रूप द्यायचे ठरविले आहे आणि त्यासाठी एक इंग्रज शिल्पकाराला आपल्या वाड्यातच नेमले आहे.

चित्रपट ऋतुपर्ण घोष दिग्दर्शित असून जॅकी श्रॉफ, अभिषेक बच्चन, सोहा अली खान अशी कलाकारांची नावे आहेत

अनिंद्य's picture

24 Oct 2020 - 8:57 pm | अनिंद्य

स्टारकास्ट बघता कोणी हा चित्रपट बघितला असेल किंवा बघेल असे वाटत नाही.

सोत्रि's picture

23 Oct 2020 - 4:30 am | सोत्रि

दणदणीत लेख!

- (कहानी चित्रपटातील दुर्गापुजेची पार्श्वभूमी आठवलेला) सोकाजी

अनिंद्य's picture

24 Oct 2020 - 8:55 pm | अनिंद्य

@ सोकाजी,
आभार !

सुधीर कांदळकर's picture

23 Oct 2020 - 6:38 am | सुधीर कांदळकर

१६१० म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरची गोष्ट - थरारून गेलो.

चित्रवाणीवरच्या एका पाकृ कार्यक्रमात राधावल्लभी, वासंती भात, बेगुन भाजा आणि लेडी किनी यापैकी काही सांगितले आणि काही करून दाखवले होते.

मस्त लेख पुन्हा वर काढलात हे छान झाले. आवडला. धन्यवाद.

अनिंद्य's picture

24 Oct 2020 - 8:54 pm | अनिंद्य

.... १६१० म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरची गोष्ट - थरारून गेलो.....

विचार मजेशीर आहे. 😇

विश्वनिर्माता's picture

23 Oct 2020 - 9:11 am | विश्वनिर्माता

खूपच छान.
फोटोंचे तेव्हडे बघा प्लिज. दिसत नाहीयेत.

अनिंद्य's picture

24 Oct 2020 - 8:40 pm | अनिंद्य

@ विश्वनिर्माता,

आभार.

लेखातल्या फोटोंचे काय बिनसले माहित नाही. आता नव्याने संपादित करता येत नाही त्यामुळे फोटो बाद :-)

गोरगावलेकर's picture

24 Oct 2020 - 9:04 pm | गोरगावलेकर

फोटो आत्ता दिसत नसले तरी आधी पहिले आहेत. तेव्हा प्रतिसाद मात्र द्यायचा राहिला होता.

अनिंद्य's picture

24 Oct 2020 - 9:06 pm | अनिंद्य

आभारी आहे _/\_

चौथा कोनाडा's picture

25 Oct 2020 - 8:52 pm | चौथा कोनाडा

व्वा, दुर्गापुजेची सुंदर माहिती !
वाचताना मजा आली.
फोटो दिसत नाहियत (गायब झाले आहेत) फोटो असले असते तर आणखी मजा आली असती !

अनिंद्य साहेब,
_/\_

अनिंद्य's picture

27 Oct 2020 - 10:29 am | अनिंद्य

@ चौथा कोनाडा
आभार.
फोटो का गायबले ते मला समजले नाही. पुन्हा कसे ऍडवावे ते पण माहित नाही :-)

चौथा कोनाडा's picture

28 Oct 2020 - 10:18 am | चौथा कोनाडा

अनिंद्य साहेब,

ती फोटो शेअरिंग साईट बोंबलली असेल, म्हणौन गायबले असतिल.

मिपा संपादक / सहित्य संपादक यांना सांगून ह्या धागा संपादनाचा अधिकार घेऊन हे फोटो परत अ‍ॅडवता येतील.
कदाचित वेगळ्या साईट वर फोटो टाकून शेअरिंग करावे लागेल.

पॉइंट ब्लँक साहेब तुम्हाला मदत करु शकतील, कारण खालील धाग्यात त्यांनी फोटोसाठी धागा संपादनाचा प्रयोग नुकताच केलेला आहे.
http://www.misalpav.com/node/47723

अनिंद्य's picture

28 Oct 2020 - 9:27 pm | अनिंद्य

ओके, ट्रायतो हे.
फोटो पुन्हा ऍडवणे जमले तर चांगलेच आहे :-)

प्राची अश्विनी's picture

27 Oct 2020 - 10:34 am | प्राची अश्विनी

काय सुरेख लिहिलंय.

अनिंद्य's picture

27 Oct 2020 - 5:48 pm | अनिंद्य

थँक्यू !

अनिंद्य's picture

26 Sep 2022 - 11:35 am | अनिंद्य

आज शारदीय नवरात्र सुरु होत आहे, त्यानिमित्ताने धागा वर काढत आहे.

लेखातले भरजरी फोटो गायबल्याचे दुःख आहे.

श्वेता व्यास's picture

26 Sep 2022 - 12:27 pm | श्वेता व्यास

लेखाच्या निमित्ताने खूप नवीन माहिती समजली. ओघवतं वर्णन लेखाशी खिळवून ठेवत आहे. फोटो पाहायला मिळत नसल्याने वर्णन वाचून कल्पनाशक्ती तिचं काम करत आहे. :)

अनिंद्य's picture

27 Sep 2022 - 9:35 am | अनिंद्य

थँकयू, शुक्रिया, आभार !

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2022 - 10:06 pm | चौथा कोनाडा

लेख पुन्हा वाचला (गेला ) मजा आली !

बोनेदी = ?? अर्थ नाही लागला मला
बारीर = राजबारी येथील
पूजो = पूजा

कृपया बोनेदी चा अर्थ उलगडून दाखवावा !

| अनिंद्य साहेब, फोटो जोडायचे मनावर घ्याच .. या सुंदर लेखाला चार चाँद लागतील

अनिंद्य's picture

29 Sep 2022 - 10:18 pm | अनिंद्य

बारीर = राजबारी येथील
पूजो = पूजा

तुमचा गेस बरोबर आहे :-)

बंगालीत बोनेदी म्हणजे उच्चकुलीन, अभिजन, ईलीट ....distinguished family of high lineage

हा शब्द बुनियादी या उर्दू शब्दावरून आला असावा. ज्या श्रीमंत जमीनदार घराण्यांनी कोलकात्याची पायाभरणी (बुनियाद) केली ते बुनियादी- अपभ्रंश बोनेदी.

अनिंद्य's picture

30 Sep 2022 - 11:30 am | अनिंद्य

फोटो जोडायचे मनावर घ्याच ..

हे कसे जमवायचे ?

सुमो's picture

30 Sep 2022 - 12:45 pm | सुमो

तुम्ही फ्लिकर वरून डकवले होते. ते अजूनी फ्लिकर वर आहेत का? असतील तर पुन्हा इथे डकवता येतील.

अनिंद्य's picture

30 Sep 2022 - 1:09 pm | अनिंद्य

तपासतो, थँक्यू.

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2022 - 10:28 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद अनिंद्य !

बोनेदी बुनियादी या उर्दू शब्दावरून आला असावा. ज्या श्रीमंत जमीनदार घराण्यांनी कोलकात्याची पायाभरणी (बुनियाद) केली ते बुनियादी- अपभ्रंश बोनेदी.

रोचक आहे हे !

कर्नलतपस्वी's picture

30 Sep 2022 - 10:44 am | कर्नलतपस्वी

खिचुरी, पुरी, बेगुन भाजा, छेनार पायेश हा प्रसाद बहुतेक ठिकाणी असतो.
तुमी बंगाली मराठी का मराठी बंगाली?

सैन्यात बंगाली सैनीक भरपुर त्यामुळे प्रत्येक स्टेशन मधे दुर्गापुजा होते.
पुण्यात खडकी मधे कुमारटोला आहे तीथेच मुर्ती बनतात.
बाकी लेख एखाद्या सिद्धहस्त बंगाली मराठी ने लिहील्या सारखे वाटते.
पूजेची सांगता शांतीजल या कार्यक्रमाने होते असे बघीतले आहे. मुर्ती विसर्जन केल्यानंतर पुन्हा सर्व पंडाल मधे एकत्र येतात.
खुप छान लेख आहे.

अनिंद्य's picture

30 Sep 2022 - 11:28 am | अनिंद्य

प्रतिसादाबद्दल आभार !

इथे मिपावर माझी 'आमार कोलकाता' शीर्षकाची दीर्घ लेखमाला आहे, विस्ताराने लिहिले आहे. अनेक मराठी-बंगाली साम्यस्थळे दिसतील. सवडीने वाचा. ही पहिल्या भागाची लिंक :-

https://www.misalpav.com/node/45320