श्री गणेश लेखमाला २०२२ - अष्टदिक्पाल आणि सप्तमातृका

प्रचेतस's picture
प्रचेतस in लेखमाला
6 Sep 2022 - 11:40 am

h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float:left;width:20%;margin-right:20px;}
.mi-img {margin-top:8px;margin-bottom:16px; display: block; margin-left: auto; margin-right: auto;}
.mi-center {text-align:center;}
.mi-heading {font-family: 'Baloo 2', cursive; font-size:17px; font-weight:bold; text-decoration-line: underline;}

श्री गणेश लेखमाला २०२२अष्टदिक्पाल

प्राचीन मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांवर, तसेच सभामंडपामध्ये, अंतराळात आपणास अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात - शिव, विष्णू, देवी आदी देवता, सुरसुंदरी, नर्तक, वादक ह्याशिवाय सर्वसाधारणपणे हटकून दिसतात त्या लोकपालांच्या अर्थात दिक्पालांच्या मूर्ती. हे दिक्पाल त्या त्या विशिष्ट दिशांचे आणि उपदिशांचे पालन करतात, असे मानले जाते. इंद्र, अग्नी, वायू, यम, कुबेर, वरुण, ईशान आणि निर्ऋती ह्या त्या दिशांच्या देवता. मुख्य दिशांच्या देवतांची नावे वेगळी, मात्र उपदिशा आणि त्यांच्या देवता यांची नावे एकमेकांना समांतर असलेलीच आढळून येतात. उदा. आग्नेयेचा दिक्पाल अग्नी, नैर्ऋत्येचा निर्ऋती, ईशान्येचा ईशान आणि वायव्येचा वायू. ही उपदिशांची नावे त्या त्या देवतेपासूनच पडलेली आहेत, हे उघड आहे. इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण आणि ईशान ह्या वैदिक देवता आहेत, कुबेर हा यक्षांचा अधिपती, तर निर्ऋती हा चक्क राक्षस आहे. अगदी क्वचित ह्या दिक्पालांच्या मूर्ती त्यांच्या शक्तीसहदेखील आढळतात. दिक्पाल मूर्ती ओळखणे तसे सोपे आहे. त्यांची वाहने आणि हातातील आयुधे यावरून ते सहज जाणून घेता येते. चला तर मग, आता एकेक दिक्पालाची विस्ताराने माहिती घेऊ.

इंद्र (पूर्व दिशेचा अधिपती)

हा देवतांचा राजा. ऐरावत हत्ती हे त्याचे वाहन. वेदांतील सर्वाधिक प्रसिद्ध देवता म्हणजे इंद्रच. इंद्राची पूजा पूर्वी इंद्रध्वजाच्या रूपाने जनमानसात प्रचलित असे. ह्या इंद्रध्वजाच्या पूजेचे वर्णन माझ्या 'गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन' ह्या लेखात विस्ताराने दिलेले आहे. इंद्राची पत्नी शची. काही ठिकाणी इंद्र शचीसह दिसतो. इंद्राची मूर्ती ओळखणे अगदी सोपे. हत्तीवर स्वार किंवा पायाशी हत्ती अशा पद्धतीने इंद्र दाखवला जातो. हातातील आयुधे म्हणजे वज्र, अंकुश.

कायगाव टोके मंदिरात असलेली इंंद्राची मूर्ती - हातात अंकुश, गदा, अक्षमाला आणि कमंडलू आहेत, तर वाहन हत्ती हे पायाशी आहे.

a

वेरुळ येथील धुमार लेणीत शिल्पपटात असलेली इंद्राची मूर्ती

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातली हत्तीवर स्वार इंद्राची मूर्ती, हाती वज्र आणि अंकुश आहेत.

a

पेडगाव येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील इंद्राची मूर्ती

a

अग्नी (आग्नेयेचा अधिपती)
वैदिक देवतांत इंद्रानंतर कोणाचे स्थान असेल तर ते अग्नीचे. यज्ञाच्या माध्यमातून देवांना हवी पोहोचवण्याचे काम करणारा तो अग्नी. अग्नीची मूर्ती ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याचे वाहन एडका. यज्ञात अजापुत्राला अर्थात बोकडाला यज्ञपशू म्हणून महत्त्वाचे स्थान असल्याने अग्नीचे ते वाहन असल्यास नवल नाही. अग्नीच्या इतर लक्षणांमध्ये त्याची आयुधे म्हणजे ध्वज, कमंडलू, अ़क्षमाला, शक्ती. आयुधात बर्‍याच वेळा पोथी, गदा, स्रुक, स्रुवा अशी भिन्नताही आढळते.

कायगाव टोके येथील अग्नीचे शिल्प

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरील बाह्य भिंतीवर असलेली एडक्यावर स्वार अग्नी मूर्ती

a

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्य भिंतीवरील अग्नी शिल्प

a

वेरुळच्या प्रवेशद्वारावर कोरलेली अग्नी मूर्ती

a

ह्याशिवाय पाटेश्वर येथील लेणीत अग्नीची एक वेगळीच प्रतिमा बघायला मिळते.
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८व्या सूक्तातील तिसर्‍या श्लोकात अग्नीचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे -

चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||

अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.

चार शिंगे म्हणजे चार वेद, ३ पाय म्हणजे दक्षिण, गार्हपत्य आणि आहवनीय हे तीन प्रकारचे अग्नी, २ मस्तके म्हणजे एक मानवाचे (हवन करणार्‍या ऋषीचे) आणि दुसरे वृषभाचे (हे बांधलेल्या यज्ञपशूचे प्रतीक), ७ हस्त म्हणजे काली, कराली इत्यादी सात प्रकारच्या ज्वाला. असा हा अग्निवृष.

पाटेश्वर येथील अग्निवृष

a

अग्निवृष

a

वरुण (पश्चिम दिशेचा अधिपती)

वरुण ही जलदेवता. पश्चिमेकडील बाजूस समुद्र असल्याने साहजिकच हा पश्चिमेचा अधिपती झाला. पाश हे वरुणाचे प्रमुख आयुध आणि जलदेवता असल्याने मकर हे त्याचे वाहन झाले. जलदेवता असल्याने काही वेळा एका हातात तर काही वेळा दोन्ही हातात कमळे आढळतात. समुद्रच नव्हे, तर सरोवरे, नद्या जिथे जिथे जल असेल त्यांचा स्वामी वरुण बनला.

कायगाव टोके येथील वरुणाची मूर्ती

a

पेडगाव येथील वरुणाची मूर्ती, मकर हे वाहन पायापाशी दिसेल.

a

वेरुळ येथील कैलास लेणीतील वरुणाची मूर्ती

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील मकरारूढ वरुण

a

वायू (वायव्येचा अधिपती)

वैदिक ग्रंथांत वायूस महत्त्वाचे स्थान नाही, मात्र महाभारत, रामायण हा महाकाव्यांत अनुक्रमे भीम आणि हनुमान यांचा जनक म्हणून मानाचे स्थान आहे, तर वायूच्या आराधनेसाठी वायुपुराणही निर्मिले गेले. वायूच्या मूर्तीच्या निर्मितीत त्याच्या अंगभूत लक्षणांचा पुरेपूर वापर केला गेल्याचे आपणास दिसते. वायूच्या दोन्ही हातात फडफडत्या पताका/ध्वज दिसतात, वायूचे वस्त्रदेखील फडफडताना दिसते, वायुमूर्ती ओळखण्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याचे वाहन हरीण. वेगाने धावत असल्याने हरीण हेच वायूचे वाहन बनल्यास त्यात काहीच नवल नाही.

कायगाव टोके येथील दोन्ही हातांत फडफडत्या पताका, कमंडलू, अक्षमाला आणि वाहन हरीण यांनी युक्त अशी वायुमूर्ती

a

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील बाह्य भिंतीवरील वायुमूर्ती

a

वेरुळ लेण्यातील वायुमूर्ती

a

यम (दक्षिण दिशेचा अधिपती)

यम ही वैदिक देवता. सूर्याचा पुत्र. मृतांना स्वर्गास अथवा नरकास पोहोचवणारा हा देव. मृतांना नेण्यास हा आपल्या दूतांना पाठवतो. दक्षिण दिशा मृतांची मानली गेली आहे, साहजिकच यमाकडे दक्षिणेचे आधिपत्य आले किंवा यमाकडे दक्षिण दिशेचे आधिपत्य आहे, म्हणूनही दक्षिण दिशेस मृतांची दिशा मानले गेले असावे. ऋग्वेदातील १० मंडलातील यम-यमी संवाद हे संवादसूक्त अतिशय प्रसिद्ध आहे. तर महाभारतात पतिव्रतोपाख्यानात सत्यवान-सावित्री आणि यम यांची कथा विस्ताराने आली आहे. मार्कंडेयास नेण्यास आलेल्या यमाचे पारिपत्य करणार्‍या शिवाची कथा तर प्रसिद्धच आहे. कालारी शिव अर्थात मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शिव आणि यमाचे शिल्पांकन केलेले आढळते. यम हा काळाचे/मृत्यूचे प्रतीक, साहजिकच त्याचे वाहन रेडा हेच आहे. इतर लक्षणांत पाश, दंड, खड्ग, अक्षमाला/कमंडलू ही आयुधे अंतर्भूत आहेत.

कायगाव टोके येथील यमाची प्रतिमा - हाती दंड, यमपाश, अक्षमाला आणि पापपुण्याची नोंदवही आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपातील यमाचे शिल्प

a

कैलास लेणे, वेरुळ येथील यमाचे शिल्प

a

कुबेर (उत्तर दिशेचा अधिपती)

कुबेर हा विश्रव्याचा पुत्र असल्याने याला वैश्रवण असेही म्हणतात. हा यक्षांचा अधिपती. साहजिकच यक्षांप्रमाणेच ह्याचे शरीरही स्थूल दाखवले जाते. 'कुसित बेरं शरीरं यस्य सः' - अर्थात ज्याचे शरीर कुरूप, बेढब असा तो कुबेर. अर्थात कुबेराच्या सर्वच मूर्ती स्थूल आहेत असेही नाही. त्याच्या मूर्ती सडपातळही आहेत. कुबेर हा जैन आणि बौद्धांमध्येही आढळतो. बौद्धांमध्ये तो जंभाल होतो. त्याची पत्नी भद्रा ही बौद्धांमध्ये हरिती होते.

कुबेराची मूर्ती ओळखणे तसे अवघड, कारण कुबेराची लक्षणे एकसारखी नाहीत. त्याचे प्रमुख वाहन नर. स्थूल असल्याने पालखीद्वारे हा उचलला जात असल्याने कुबेराला नरवाहन म्हणतात. काही वेळा कुबेराचे वाहन हत्ती किंवा घोडा हेसुद्धा दाखवल्याचे दिसते. मात्र कुबेर ओळखण्याचे एक हमखास लक्षण म्हणजे त्याच्या हाती असलेली धनाची पिशवी आणि मुंगूस. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष. साहजिकच त्याच्या हाती धनाची पिशवी असते, तर मुंगूस हेसुद्धा धनाचे प्रतीक. मुंगूस दिसल्यावर धनलाभ होतो असे आजही मानतात. मात्र मुंगूस हे कुबेराचे वाहन नव्हे.

कायगाव टोके येथील कुबेर प्रतिमा. येथे वाहन हे हत्ती असून हाती धनाची पिशवी घेतलेली आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील घोड्यावर बसलेल्या कुबेराची प्रतिमा

a

पेडगाव येथील मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर

a

वेरुळ येथील क्र. २०च्या लेणीतील तुंदिलतनू असलेला कुबेर

a

वेरुळ येथील बौद्ध लेणीतील जंभाल आणि हरितीची प्रतिमा

a

निर्ऋती (नैर्ऋत्येचा अधिपती)

निर्ऋतीचे नाव ऋग्वेदात आढळते, मात्र त्याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. वेदात हा राक्षस म्हणूनच ह्याचा उल्लेख येतो. काही पुराणे निर्ऋतीला स्त्रीरूपी मानतात आणि अलक्ष्मी म्हणूनही निर्ऋतीचे नाव येते. वेदोक्त देवतांच्या रूपांमध्ये विविध कथापुराणांद्वारे हळूहळू बदल होत जाताना निर्ऋतीला दिशाधिपतीचे काम आले असावे, असे म्हणता येते. निर्ऋतीच्या मूर्तीही तुलनेने मोजक्याच आढळतात, ज्या मंदिरांमध्ये दिक्पाल मूर्ती आहेत, तिथेही काही वेळा निर्ऋतीची मूर्ती नसते. मात्र निर्ऋतीची मूर्ती जिथे असेल तिथे ती ओळखणे मात्र सोपे आहे. निर्ऋती हा प्रेतवाहन किंवा नरवाहन. हाती खड्ग, खेटक, नरमुंड ही सर्वसाधारण लक्षणे आणि चेहरा उग्र, दाढा विचकलेल्या असे रूप.

कायगाव टोके येथील निर्ऋतीची मूर्ती. हाती खड्ग, खेटक (ढाल), नरमुंड आणि एक हात अभयमुद्रेत आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील नरवाहन निर्ऋतीची मूर्ती

a

खिद्रापूरच्याच कोपेश्वर मंदिरातील प्रेतवाहन निर्ऋतीची मूर्ती

a

ईशान (ईशान्येचा अधिपती)
ईशान हे शिवाचेच एक रूप आहे, त्यामुळे ह्याच्या मूर्तीची लक्षणे जवळपास सर्वच शिव आणि भैरवासारखीच आहेत. हाती डमरू, कमंडलू, त्रिशूळ, नाग. याचे वाहन बैल. भैरवमूर्ती आणि ईशान यांच्यामधील फरक म्हणजे भैरव रौद्र आणि काही वेळा नग्न असतो आणि भूतगण, नरमुंडही बाजूला असतो, तर ईशान मूर्ती सौम्य असते.

कायगाव टोके येथील ईशान मूर्ती

a

पेडगाव येथील ईशान मूर्ती

a

पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ईशान मूर्ती

a

मातृका

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ||

ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, इंद्र आदी देवतांच्या अंशापासून मातृका उत्पन्न झाल्या, असे विविध पुराणांमध्ये उल्लेख आहेत, तर अंधकासुरवध कथेत शिवाने मारलेल्या अंधकासुराच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्यांचे रक्त पिण्यासाठी योगेश्वरी आणि इतर मातृका उत्पन्न केल्या, असा उल्लेख आहे. वर श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा ह्या सप्तमातृकांसह कधीकधी आठवी मातृका नारसिंहीसुद्धा दिसते. मातृका ह्या शाक्त अथवा तंत्र पंथामधील समजल्या जातात. ह्या मातृकांचे शिल्पांकन सर्वसाधारणपणे वेगवेगळे आढळत नाही, त्या पट स्वरूपातच आपल्याला दिसतात. सप्तमातृकापटात नेहमी मातृकांच्या एका बाजूला वीरभद्र आणि दुसर्‍या बाजूला गणेश आढळतो. ह्या दोघांच्या मध्ये सात मातृका आपल्या बाळांसह दिसतात. तर प्रत्येक मातृकेच्या खालील बाजूस त्यांची वाहने कोरलेली असतात. क्वचित प्रसंगी मातृकांची वेगवेगळी शिल्पेदेखील दिसतात. चामुंडा मात्र जवळपास सर्वत्रच स्वतंत्र कोरलेली आढळते.

मातॄकांची वाहने पुढीलप्रमाणे

ब्राह्मी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरुड
वाराही- वराह, घुबड, महिष
इंद्राणी - हत्ती
चामुंडा- प्रेत

आता काही सप्तमातृकापट पाहू या.

वेरुळ येथील कैलास लेणीतील सप्तमातृकापट

कैलास लेणीतील यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेला आहे हा प्रचंड सप्तमातृकापट. या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या सप्तमातृका. यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतीकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. मूर्तिभंजकांनी मातृकांची मस्तके जरी नष्ट केली असली, तरी प्रत्येक मूर्तीच्या खाली तिचे वाहन कोरलेले आहे, त्यावरून ह्या मातृका सहज ओळखू येतात. येथील एक वाहनांतील बदल म्हणजे वाराहीचे वाहन महिष असून चामुंडेचे शृगाल आहे.

a

वेरुळ येथील लेणी क्रमांक १४ येथील सप्तमातृकापट (येथे चामुंडेचे वाहन घुबड हे आहे)

a

वेरुळ येथील कैलास लेणीच्या डावीकडील लहानशा लेणीतील उभ्या स्थितीत असलेल्या सप्तमातृकांचा पट

a

टाकळी ढोकेश्वर येथील सप्तमातृकापट

लेणीतील प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी (गरुड), वाराही (वराह), ऐंद्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते, इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे. प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.

a

ह्याशिवाय खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातदेखील दोन सप्तमातृकापट आहेत.

a

a

आता मातृकांची काही एकल रूपातील शिल्पे पाहू या. (सर्व शिल्पे कायगाव टोके मंदिरातील)

माहेश्वरी - डमरू, खड्ग, नाग, वाहन- बैल

a

कौमारी -कमंडलू, पुस्तक, बीजापूरक आणि पंखा, वाहन - मोर

a

वैष्णवी - शंख, चक्र, कमळ, वाहन - गरुड

a

ऐंद्राणी - पाश, अंकुश, वाहन - हत्ती

a

वराहमुखी वाराही - वाहन - महिष

a

याशिवाय चामुंडेची स्वतंत्र शिल्पे तर पुष्कळ दिसतात, चामुंडा ओळखणे तर अगदी सोपे. मातृकापटांतील चामुंडेचे वाहन प्रेत, शृगाल, घुबड अशा भिन्न रूपांत दाखवलेले असले, तरी एकल चामुंडा मूर्तीत प्रेत हे वाहन असते. चामुंडेच्या पोटात विंचू असतो, जो तिच्या भुकेचे प्रतीक आहे. हातपायांचा अस्थिपंजर असून स्तन लोंबते असतात. रूप कराल असून दाढा विचकलेल्या असतात. भयप्रद स्वरूपाची चामुंडा बर्‍याच वेळा शीळ घालण्यार्‍या मुद्रेत असलेल्या दिसून येते.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील चामुंडा

a

पिंपरी दुमाला येथील चामुंडा मूर्ती

a

सर्वात शेवटी भुलेश्वर येथील सर्वांगसुंदर चामुंडा पाहू.

a

अष्टदिक्पाल आणि मातृका आपण वरील लेखात विस्ताराने पाहिले. आणखीही माहिती देता आली असती, मात्र ती तांत्रिक आणि किचकट झाली असती - उदा., पुराणांत वर्णन केल्याप्रमाणे असलेले त्यांचे रंग, त्यांच्या वाहनांचे विस्तारपूर्वक वर्णन, शिल्पशास्त्रात असलेली त्यांची संस्कृत वर्णने. येथे मी त्यांची सर्वसाधारण माहिती येथील मंदिरांच्या अनुषंगाने आणि ह्या मूर्ती सहजी ओळखता येईल अशा प्रकारे मांडली. काही शिल्पे भग्न झाल्यामुळे त्यात कदाचित काही त्रुटी असण्याचा संभव आहे - उदाहरणार्थ, खिद्रापूर मंदिरातील निर्ऋती आणि कुबेर यांच्या मूर्तीत गल्लत झाली असण्याचा संभव आहे. घोडा असलेली मूर्ती कदाचित कल्कीची असू शकते आणि नरवाहन असलेला निर्ऋती हा कदाचित कुबेर असू शकतो. मूर्ती उंचावर असल्याने आणि छायाचित्रातील लक्षणे पुरेशी स्पष्ट दिसत नसल्याने ही चूक होऊ शकते. इतर स्रोतातून अधिक माहिती मिळाल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद.

श्रीगणेश लेखमाला

प्रतिक्रिया

जैन आणि बौध्द शिल्पांमध्येही वासुदेव आणि संकर्षण दुय्यम देवता म्हणून अंकित केल्या आहेत. वैदिकांचा रुद्र पुढे शंकर म्हणून ओळखला जाऊ लागला..
शैव - वैष्णव संघर्षाने टोक गाठले होते..आणि यावर मध्यस्थी म्हणून गाणपत्य पंथ उदयास आला असेही मध्यंतरी वाचनात आले होते..

प्रचेतस's picture

22 Sep 2022 - 1:38 pm | प्रचेतस

शैव - वैष्णव संघर्षाने टोक गाठले होते..आणि यावर मध्यस्थी म्हणून गाणपत्य पंथ उदयास आला असेही मध्यंतरी वाचनात आले होते..

गाणपत्य हा संपूर्णतः वेगळा पंथ आहे पण तो फार प्राचीन मानता न येवा तसेच त्याची मूळे शैव पंथाकडूनच आली आहेत असे धाडसाने म्हणता यावे. . मात्र शैव वैष्णव संघर्षावर तोडगा काढण्याचा प्रयत्न महाभारतकर्त्यांनी केला होता व तो बहुतांशी सफल झाला असे मानता यावे. उदा द्रोणपर्वात श्रीकृष्णाने केलेली शिवाची स्तुती आली आहे, आरण्यक पर्वात अर्जुनाने केलेली शिवाची स्तुती आली आहे तर नारायणीय उपाख्यानात नारायणाने शिव व विष्णू एकच आहेत असे स्पष्ट सांगितले आहे.

अद्भुत आहे हे सारं!!! उत्तम माहिती आणि फोटो.
.

सागर's picture

18 Oct 2022 - 10:26 pm | सागर

नेहमीप्रमाणेच वाचकांस सुन्दर मेजवानी.
लेख अतिशय आवडला हेवेसांन..

यातला एक मुद्दा मला महत्वाचा वाटला की "वेदांत वायूला फारसे महत्वाचे स्थान नव्हते."
वेद ज्या परिसरात निर्माण झाले त्या कोणत्याही भागात वायू वेगाने वहात असे. त्यामुळे या गोष्टीचे महत्व नक्कीच आहे. मी काही वेद विषयातला तज्ज्ञ नाही. पण ऋग्वेदातली ऋचा सापडली. वायु ला मरुत नावाने देखिल ओळखले जाते. वायु = पवन = मरुत

तमस्य राजा वरुणस्तमश्विना क्रतुं सचन्त मारुतस्य वेधस:। दाधार दक्षमुत्तममहर्विदं व्रजं च विष्णु: सखिवाँ अपोर्णुते ॥
ऋ. १.१५६.४

मरुताचे उल्लेख वेदांत अनेक वेळा आले आहेत. या सर्व देवता वेद काळात वेगवेगळ्या होत्या की एकच समजल्या जायच्या ? हे माहिती करुन घ्यायला आवडेल.

सागर's picture

19 Oct 2022 - 10:03 am | सागर

नेहमीप्रमाणेच वाचकांस सुन्दर मेजवानी.
लेख अतिशय आवडला हेवेसांन..

यातला एक मुद्दा मला महत्वाचा वाटला की "वेदांत वायूला फारसे महत्वाचे स्थान नव्हते."
वेद ज्या परिसरात निर्माण झाले त्या कोणत्याही भागात वायू वेगाने वहात असे. त्यामुळे या गोष्टीचे महत्व नक्कीच आहे. मी काही वेद विषयातला तज्ज्ञ नाही. पण ऋग्वेदातली ऋचा सापडली. वायु ला मरुत नावाने देखिल ओळखले जाते. वायु = पवन = मरुत

तमस्य राजा वरुणस्तमश्विना क्रतुं सचन्त मारुतस्य वेधस:। दाधार दक्षमुत्तममहर्विदं व्रजं च विष्णु: सखिवाँ अपोर्णुते ॥
ऋ. १.१५६.४

मरुताचे उल्लेख वेदांत अनेक वेळा आले आहेत. या सर्व देवता वेद काळात वेगवेगळ्या होत्या की एकच समजल्या जायच्या ? हे माहिती करुन घ्यायला आवडेल.

प्रचेतस's picture

19 Oct 2022 - 8:00 pm | प्रचेतस

धन्यवाद मित्रा, तुला इकडे पाहून खूप छान वाटले.

वेदांत वायूला फारसे महत्वाचे स्थान नाही याचा अर्थ वेदात वायुसंबंधीची सूक्ते फार नाहीत. उदा. इंद्रसूक्ते २०६, अग्नीसूक्ते १६६, अश्विनीकुमारांची सूक्ते ५३, मित्रावरुण १९ तर उषासूक्ते १७ आहेत. मरुताची सूक्ते ५ आहेत तर वायूसूक्ते ६ आहेत. अर्थात सूक्ते जरी फार नसली तरी इतर देवतांच्या सूक्तांमध्ये वायूचा उल्लेख काही ऋचांमध्ये येतो.
मरुत आणि वायू या देवतांमध्ये किंचित फरक आहे. मरुद्गणांचा नायक हा वायू. वेगाने वाहणारा वारा, वादळ किंवा झंझावात, आवर्त ह्यांना मरुत ही संज्ञा आहे.

१० व्या मंडलात १६८वे सूक्त वायूचा स्वभाव उत्तमप्रकारे वर्णित करते.

वातस्य नु महिमानं रथस्य रुजन् एति स्तनयन् अस्य घोषः|
दि वि-स्पृक् याति अरुणानि कृण्वन् उतो इति एति पृथिव्या रेणुं अस्यन् ॥

आतां वेगाने धांवणार्‍या वायूच्या रथाची थोरवी (किती म्हणून वर्णावी?); तो रथ धांवत असतां (वाटेत येणार्‍या) कोणत्याहि वस्तूला फोडून टाकतो आणि असे होत असते तेव्हां त्या रथाचा निनाद दूरवर ऐकूं जातो; तो आकाशालाहि भेदून जातो, तसेंच दशदिशा धूसर करून टाकतो आणि पृथ्वीवर धुमश्चक्री घालतांना जिकडे तिकडे धुरळा उडवून देतो

सं प्र ईरते अनु वातस्य वि-स्थाः आ एनं गच्चन्ति समनं न योषाः
ताभिः स-युक् स-रथं देवः ईयते अस्य विश्वस्य भुवनस्य राजा ॥
ज्या ज्या वस्तु विशेष रीतीने स्थिर नसतात त्या आणि विशेष प्रकाराने स्थिर असतात त्याही वायूच्या धोरणानेच हलत राहतात. जणू काय समारंभामध्ये मिरविणार्‍या युवतीच! अशा वस्तूंना घेऊन वायू देव रथांतून जातात; कारण ते ह्या भुवनाचे राजे आहेत.

अन्तरिक्षे पथि-भिः ईयमानः न नि विशते कतमत् चन अहरिति
अपां सखा प्रथम-जाः ऋत-वा क्व स्वित् जातः कुतः आ बभूव ॥
अन्तरिक्षामध्ये आपल्या मार्गांनी जात असतां हा वायु एक दिवस देखील कधीं विश्रांति घेत नाही. याप्रमाणेच हा उदकांच सखाच आहे. प्रथम उत्पत्ति वायूची; सत्यस्वरूप तोच; पण खरे पाहिलें तर तो कोठे उत्पन्न झाला आणि कोठून आला ते कांहीच समजत नाही

आत्मा देवानां भुवनस्य गर्भः यथावशं चरति देवः एषः
घोषाः इत् अस्य शृण्विरे न रूपं तस्मै वाताय हविषा विधेम ॥
हा देवतांचा आत्मा म्हणजे श्वासोच्छवास आहे; सृष्टीचे बीज आहे. हा देवरूप वायु आपल्या इच्छेप्र्माणे वाटेल तिकडे संचार करतो. तसाच त्याचा निनाद मात्र सर्वत्र ऐकूं येतो. पण त्याचे रूप कोणालाहि दिसत नाही; तर अशा वायुदेवाला आपण हविर्भाग अर्पण करून त्याची सेवा करूं या.

मित्रा मी खूप मोठ्या काळानन्तर इथे आलोय हे खरे आहे. पण त्याहीपेक्षा आनन्दाची बाब म्हणजे मिपा वर दिसलेला आणि त्यात सातत्य असलेला तुझा हा लेखनयज्ञ !
फोटोंचे जेवढे कौतुक करावे तेवढेच कौतुक तुझ्या समृद्ध लेखणी चे देखिल ! अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद मित्रा ... शिवाय मरुत आणि वायु बद्दल नव्याने माहिती मिळाली. :) मनःपूर्वक धन्यवाद मित्रा

@मिसळपाव च्या संचालक मंडळासाठी सूचना: काही काही प्रतिसाद पाहून त्यांना ❤ असे इन्स्टाग्राम वर करतो तसे करावेसे खुप वाटते. ❤ या चिन्हासाठी मिपा अ‍ॅडमिन गटाला विनंती आहे की. मिपा सुरळीत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की अशी सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य आहे का या शक्यतेचा अवश्य विचार करावा. धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2022 - 11:49 am | चौथा कोनाडा

((( काही प्रतिसाद पाहून त्यांना ❤ असे इन्स्टाग्राम वर करतो तसे करावेसे खुप वाटते. ❤ या चिन्हासाठी मिपा अ‍ॅडमिन गटाला विनंती आहे की. मिपा सुरळीत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की अशी सुविधा उपलब्ध करुन देणे )))

अनुमोदन!

आजपर्यंत १० वेळा खिद्रापूरला जाऊन आलो पण फक्त जाऊन छान वाटले यापेक्षा जास्त काही नव्हते. परदेशात असे काही पहाताना टुरगाईड जी माहिती देतो ते ऐकून फार कौतुक वाटायचे. आपल्याकडे असे काही नाही याची कधी कधी खंत वाटायची.
पण हा लेख वाचल्यावर आता कळतंय. सगळं आहे आपल्याकडे पण सगळ्यांना माहिती नाहीये. वल्लींनी माझ्यासारख्या अडण्याचे डोळे उघडायचे काम केले आहे. ही माहिती चांगली अभ्यासली गेली पाहिजे आणि सर्वांना कळाली पाहिजे. मिपाकर झाल्याचे खरेच समाधान वाटले.
अवांतर : खिद्रापूरला त्या मुर्तींवर बसवून मुलांचे फोटो काढणार्‍या पालकांची किव वाटते. पिढ्यान् पिढ्या जतन करावा असा ठेवा, त्याची हेळसांड पाहवत नाही.