h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Baloo 2', cursive;}
p {text-align: justify;font-family: 'Poppins', sans-serif;font-size:16px;}
.img-left {float: left;width:20%;margin-right:20px;}
ते गाव म्हणजे तसं खेडेगाव नाही. जिल्ह्याचं ठिकाण. जरा मागास राहिलेला असला, तरी जिल्हाच तो.
त्या गावातली ती बिल्डिंग खूप जुनी होती. अगदी खूप पूर्वी ब्लॉक या नावाने ओळखली जाणारी घरं ज्या इमारतींमधे असायची, त्यातली ही एक. बरीच वेडीवाकडी, नियम न पाळता बांधून काढलेली आणि वाढवलेली. बाकी मेन्टेनन्सच्या नावाने उजेडच असल्याने भिंती बाहेररून पाऊस खाऊन खाऊन करवडलेल्या. शेवाळाने काळ्या पडलेल्या. पिंपळरोपांनी ड्रेनेज पाईपांच्या आसपास प्रत्येक मजल्यावर मुळं धरलेली.. वगैरे सगळं रीतसर.
प्रत्येक मजल्यावर दोनच ब्लॉक्स. एक मोठा, एक छोटा. मुळात बिल्डरने सर्वांना एकेक छोटी बाल्कनी दिली होती. पण एकूण एक लोकांनी नंतर ती 'आत' घेतलेली.
या बिल्डिंगचं नावही अगदी चपखल होतं. ओळखा पाहू...
होय, 'समाधान'..!!
याच बिल्डिंगमध्ये सर्वात वरच्या मजल्यावर चिनू राहायचा. चिनू या टोपणनावावर तो समाधानी होता. कारण त्याचं मूळ नाव चिंतामणी. त्याच्या आजोबांनी ठेवलेलं. वास्तविक चिनूचा जन्म ज्या काळात, म्हणजे ऐंशीच्या दशकाच्या पूर्वार्धात झाला, त्या काळात श्रेयस, राहुल, आशिष अशी तुलनेत नवीन नावं ठेवायला सुरुवात झाली होती. ..आणि अगदी क्वचित का होईना, मयंक, आर्य, पार्थ वगैरेही जन्माला येत होते. अशा वेळी आजोबांच्या शब्दाखातर चिंतामणी हे जुनाट नाव आपल्याला पाडलं गेलं, याची चिनूला मनापासून लाज वाटत असे. तरी बरं, त्याचं टोपणनाव चिनू झालं. चिंतू नाही झालं.
आजोबा नाव ठेवून लगेचच गेले. नंतर चिनू दहा वर्षांचा असताना त्याचे बाबाही अचानक फॅक्टरीतून घरी आले ते 'कसंतरी होतंय' म्हणत. आईने चहा बनवून दिला, पण कप त्यांच्या हातातून गळून पडला. पुढच्या विधींसाठी बिल्डिंग उत्साहाने पुढे आली. नेहमी यायची.
चिनू सोसायटीतल्या आवारात मागे कुठेतरी लपलेल्या शेवग्याच्या झाडासोबत वाढत गेला. आईने त्याला अगदी छान मोठा केला. चिनू बीकॉमला शिकत असतानाच मागच्या गल्लीत असलेल्या सायबर कॅफेवाल्या घाडगेने तिथेच एका बाजूला चालू केलेल्या कॉम्प्युटर क्लासमध्ये आईने त्याला घातला. आई चांगली बीए झालेली होती. बाबा गेल्यापासून ती एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करायची. अशीच, लागेल ती मदत. पगार समाधानाने जगायला पुरायचा. पण अगदी स्ट्रिक्टली समाधानापुरता. त्याहून जास्त मागाल तर पगार उचल घ्या. तस्मात, समाधानी असण्याखेरीज चिनूच्या आईला काही इलाज नव्हता.
या घाडगे सरांच्या कॉंम्प्युटर क्लासमधून एका क्ष दिवशी चिनू चक्क हसत, खिदळत वेडावाकडा पळत बाहेर निघाला. चेहरा आनंदाने फुललेला.
कारण काय असेल? बीकॉमचा रिझल्ट? नाही. तो लागून गेला होता. सेकंड क्लास होता आलेला.
आजचं कारण वेगळं होतं. त्याला जॉब ऑफर आली होती. आणि तीही साधीसुधी नव्हती. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो.
त्याचं असं झालं की आईने कॉम्प्युटर क्लाससाठी चिनूला एक जुना सेकंड हँड पीसी घेऊन दिला होता. विंडोज नाईन्टीएट आणि पेंटियम थ्री लेटेस्ट, असा तो जमाना. त्या पार्श्वभूमीवर चिनूचा पेंटियम टू आणि विंडोज नाईन्टीफाय म्हणजे फार वाईट नव्हता. काळाच्या एक पायरी मागे फक्त. आईच्या मागे लागून लागून त्याने तो वसूल केला होता. क्लासवाल्या घाडगेकडूनच त्याचा जुना आईने घेतला चिनूसाठी. त्यावर तो एचटीएमएल पेजेसची प्रॅक्टिस करायचा. जावास्क्रिप्टही शिकत होता.
कॉम्प्युटर शिकलेला म्हणून खूप जण त्याच्याकडे आदराने बघायचे. एक-दोन मैत्रिणीही झाल्या होत्या. पण अस्मिता मात्र त्याला खूप आवडायची.
त्याचे मित्र - म्हणजे वर्गातली पोरं, उदाहरणार्थ पव्या, गणेश, विशल्या वगैरे हे सगळे इकडेतिकडे बेकार हिंडत होते. एकट्या मंग्यालाच संगम मेडिकलमध्ये काउंटरवर नोकरी लागली. तरी तेवढ्याने सर्व जण त्याच्यावर जळत होते. पण चिनूची स्वप्नं खूप मोठी होती. या काळपट शेवाळलेल्या भिंतींत राहूनही त्याने खूप उंच स्वप्नं नक्की केली होती. किमान पुण्यात किंवा मुंबईत पोहोचायचंच होतं त्याला. बीकॉम हे उगीच एक डिग्री हवी म्हणून. कॉम्प्युटरच त्याला तारणार होता आणि खूप वर घेऊन जाणार होता. कॉम्प्युटर क्लासचे घाडगे सरच त्याला हे नेहमी सांगायचे. घाडगे सरांमुळे चिनू ही स्वप्नं बघू शकत होता. एचटीएमएल वगैरे शिकून तर अनेक लोक परदेशात जाताहेत असं घाडगे सर सांगायचे. तेही शिकायला त्याने सुरुवात केली होती. अल्टाविस्टा सर्च वापरून तो जॉब या शब्दाच्या सर्चने जे काही ईमेल पत्ते मिळतील त्यावर आपला एक पानी बायोडेटा पाठवायचा. म्हणजे एक एचटीएमएल वापरून बनवलेलं वेब पेज त्याने जियोसिटिजवर बनवलं होतं. ते पेज म्हणजेच त्याचा बायोडेटा. त्यातच त्याचं एचटीएमएल कौशल्य त्याने वापरलं होतं. घरी फोन नव्हता. घरी इंटरनेट फार दूरची गोष्ट. क्लासला गेला की तो त्याचे ईमेल चेक करत असे. सरांची परवानगी होती. मोडेमचा कीं कीं कुर्रर्र आवाज यायचा आणि चिनूची उत्सुकता शिगेला पोहोचायची. आज काय ईमेल आली असेल?
त्याचा ईमेल पत्ता तर त्याने त्याच्या त्या पेजवरही टाकला होता. रोज तो आशेने ईमेल उघडायचा. फक्त देसीबाबा न्यूजलेटर असायचं. सर क्लासमध्ये नसतील, तेव्हाच ते पटकन बघता यायचं. आणि इतर सटरफटर ईमेल असायच्या. कामाची क्वचितच.
तर... त्या क्ष दिवशी मात्र इन्बॉक्समध्ये एक जॉब ऑफर आली होती. तीही चक्क फॉरेनची.. नीट पुन्हा पुन्हा डोळे फाडफाडून चिनूने ती ईमेल वाचली.
जॉबचं वर्णन वाचून चिनू जरा विचारात पडला. पण तरी त्याने धाडसाने रिप्लाय केला आणि मागितलेली सर्व माहिती दिली. घरी फोन नसल्याने परस्पर क्लासचा नंबर दिला. समोरून त्यांचं उत्तर आलं, तेव्हा चिनूला प्रचंड आनंद झाला. ईमेलवर आधीच ठरवून घेतलेल्या विशिष्ट वेळी मग क्लासच्या फोन नंबरवर एक कॉल आला. प्रत्यक्ष बोलणं झालं. चिनूचं इंग्लिश त्यांना चालून जाईल इतपत बरं होतं. फोनवरचा इंटरव्ह्यू छान पार पडला. त्यांच्यावर इतकी छाप पडली की त्याच कॉलवर त्याचं सिलेक्शन झालंसुद्धा. मुख्यत: पगार वगैरेबाबतच जास्त बोलणी झाली. पगाराचा डॉलर्समधला मोठ्ठा आकडा ऐकून चिनूला चक्करच आली. तिकडे राहण्यासाठी सोय वगैरे कंपनीच करणार होती. घाडगे सर क्लासमध्ये नसताना नेमका हा फोन झाल्याने बरं झालं. नाहीतर त्यांनी लगेच त्यांच्या क्लासच्या मुलांसमोर उघड केलं असतं आणि मग ते गावभर झालं असतं.
सगळ्यात आधी अस्मिताला भेटायला हवं, आई संध्याकाळी कामावरून आली की तिला सांगू या, असा विचार करत चिनू लगबग चालत अस्मिताच्या दारी पोहोचला. बरं झालं, ती घरातच होती. तिच्याशी काहीतरी कुजबुजला, आणि सत्कार उडुपीत जाऊन वाट बघत बसला. भेटायचं झालं की नेहमीची पद्धत.
अस्मिता पटकन पोहोचली. डोसा ऑर्डर. आज मसाला डोसा. चिनू म्हणाला, "ए, तुला काय पाहिजे ते मागव.. आपलं नशीब जोरात धावायला लागलंय.."
"काय झालं नीट बोल ना रे.."
"जॉब ऑफर. अस्मि, जॉब ऑफर.. आणि ती पण थेट फॉरेन कंट्री. मी तुला एचटीएमएल बोललेलो ना? घाडगे सरांनी मला बरोब्बर लेटेस्ट शिकवलं.."
"थेट फॉरेन? कुठलं फॉरेन? अमेरिका?"
"कॅनडा. तिथेच चिकटून आहे बाजूला."
"बस कर हं. तुला कोणी भेटलं नाही काय सकाळपासून?"
"ए, उगाच मस्करी करीन काय? तुला ईमेल दाखवतो. घरी चल. मी काय कच्चा खिलाडी वाटलो काय? मी सर्व प्रश्न विचारून खात्री करुन बोलतोय. फॉरेन कंपनी असल्यामुळे पहिला इंटरव्ह्यू फोनवर झालासुद्धा.. डिमांड खूप आहे एचटीएमएलला. नवीन नवीन हजारो वेबसाईट बनताहेत. नुसते शिकून बाहेर पडा, नोकरी आहे तिकडे. आता बोल."
"कॉंग्रॅच्युलेशन्स चिनू.. चाललास तू पुढे आम्हाला सोडून."
अस्मिताचा चेहरा आनंदाने फुलला होता आणि त्याच वेळी थोडा धास्तावलेला. अजून काहीच माहीत नव्हतं चिनूबद्दल तिच्या घरी वगैरे. कॉलेजातला मित्र इतकंच.
"अस्मि, तुला सोडून जाईन होय गं." चिनूचे डोळे भरून आले. "एखाद-दोन वर्षांचा प्रश्न. जरा सेटल झालो की तुला घेऊन जाणार. आईलापण."
"मी तुझी वाट बघीन नक्की. विसरु नको मला म्हणजे झालं. तिकडे तुला तिथल्या पोरी भेटतील."
"गप बस. तू सोडून कोणाचा विचार नाही शिवणार या चिनूला. एचटीएमएलची शप्पथ... ए, तूपण शिकून ठेव एचटीएमएल. खूप स्कोप आहे. तुलापण जॉब लागेल तिकडे." चिनूने ताण हलका केला. अस्मि हसली. डोळे पुसले. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन कोल्ड कॉफी मागवल्या.
आई घरी परत येण्याची वाट बघत अक्षरश: थरथरत चिनू खुर्चीत बसला होता. बाबांची आवडती खुर्ची. आई पंधरा मिनिटं उशिरा आली नेमकी. कसंबसं पाणी पिऊ दिलं आणि चिनू ओरडला.
"आई, जॉब लागला"
"आं.. काय सांगतोयस चिनू!!? कॉम्प्युटरचा का?"
"हो. आणि कुठे म्हणून विचार.. विश्वास नाही बसणार तुझा."
"कुठे?"
"फॉरेन जॉब आहे आई. थेट कॅनडा. म्हणजे अमेरिकेसारखंच आहे सगळं."
"चिनू.. ऑं? कॅनडा? पण तिकडे कसा थेट मिळाला? नीट बघ एकदा माहिती. आणि आईला काय अडाणी समजतोस? मला कॅनडा नाव माहीत नाही असं वाटलं? नोकरी करते, शिकलेली आहे मी पण."
"आई, मी काय भोळा आहे असं वाटलं? घाडगे सरांनी पण मला पूर्वी सांगितलं होतं की आज कॉम्प्युटर फील्डमध्ये अगदी फ्रेश लोकांनाही खूप मागणी आहे फॉरेन कंट्रीजमध्ये. वेबसाईट डेव्हलपमेंट. मोठं फील्ड आहे. तू कॉम्प्युटर घेऊन दिलास, बघ आज कसा कामाला आला.. आणि डायरेक्ट फॉरेन जॉब म्हणजे लक भारी आहे आपलं. योगायोग नसतो नुसता. माझं वेब पेज बघितलंय डेव्हिड सरांनी."
"कोण डेव्हिड सर?"
"ते कंपनीचे मेन आहेत. त्यांनीच इंटरव्ह्यू घेतला फोनवर. थेट सिलेक्ट केलं. काही जास्त प्रश्न पण नाही विचारले. आणि थेट जॉईन हो म्हणाले. माझं पेज बघून त्यांना स्किलबद्दल खात्री झाली असेल. पासपोर्ट, व्हिसा सगळं घ्यावं लागेल बनवून. पासपोर्टसाठी मलाच सगळं करावं लागेल. आज इकडे एजंटकडे जाऊन आलो. तो पासपोर्टचं बघेल. पण व्हिसा वगैरे सगळं डेव्हिड सर करून देणार. सर्व प्रोसेस डेव्हिड सरांनी सांगितली आहे. त्यांच्याकडे थोडे पैसे भरावे लागतील, मग सर्व कागदपत्रं बनवून देणार आहेत ते. पण आई.. आत्ता आधी थोडे पैसे त्यांना द्यावे लागणार आहेत या सगळ्या कागदपत्रांसाठी. मगच ते मला तिकडे परमनंट नोकरी देऊ शकतील, असं म्हणाले."
"किती?"
"आत्ता लगेच पन्नास हजार मागितलेत त्यांनी. म्हणजे असं आहे की नोकरी कॅनडात असली, तरी कंपनीचं हेड ऑफिस बुर्किना फासो नावाच्या देशात आहे. आफ्रिकेजवळ. डेव्हिड सर तिकडेच असतात. तुला माहीत नसेल. तिकडे वर्क परमिट आणि व्हिसा अशा गोष्टींसाठी डॉलर्समध्ये पैसे भरावे लागतात. पण डेव्हिड सर मला कागदपत्रे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत. आपण फक्त पन्नास हजार रुपये सुरुवातीला दिले की त्याचे डॉलर्स बनवून तिकडे कॅनडात भरुन बाकी सर्व काम ते करणार. तात्पुरता व्हिसा आणि मग वर्क परमिट. सगळी डोकेदुखी घ्यायला ते तयार आहेत. मधल्या काळात तिकडे कुठेतरी त्यांची मोठी इस्टेट आहे, त्यावर मी सुपरवायझर म्हणून कामाला आहे असं कागदोपत्री दाखवणार. नंतर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष कॉम्प्युटरचा जॉब मिळणार. जरा किचकट असतात या गोष्टी. पण मी नीट बोलून घेतलं आहे. तू फक्त आत्तापुरते पन्नास हजार भरायचेत ते देशील ना?"
"चिनू, बाळा तुला पैशाची कमी मी पडू देणार नाही. तू काळजी करु नको. जितके आहेत ते सर्व द्यायलाही मी मागेपुढे बघणार नाही. माझ्या नोकरीवर माझं पुढेही चालेल. उद्याच चेक देते."
"आई, तेही त्यांनी सांगितलं. चेक त्यांना चालणार नाही, डेव्हिड सर म्हणाले की भारतातला चेक त्यांना तिकडे वटवता येत नाही. शिवाय फिलिप्स नावाचे त्यांचे एक ऑफिसर नशिबाने नेमके आत्ता इकडे भारतात आलेच आहेत. ते मुंबई एअरपोर्टबाहेर परवा संध्याकाळी एका ठिकाणी खास माझ्यासाठी अर्धा तास वेळ काढून येणार आहेत परत जाता जाता. फिलिप्स सरांच्या हाती चेकपेक्षा डायरेक्ट कॅश दिली तर ते पुढचं सगळं काम झटपट करु शकतील. खूप मदत करताहेत डेव्हिड सर.. मी त्यांच्या कंपनीला कॅनडा सरकारने मान्यता दिल्याचं सर्टिफिकेट बघितलं. ईमेलवर त्यांनी पाठवलं. फिलिप्स सरांची वेळ चुकवायला नको. असा चान्स पुन्हा येणार नाही."
"चिनू, तुझ्यावर पैसे खर्च नाही करायचे तर कुणावर? तुझं चांगलं व्हावं ही एकच इच्छा नेहमी असते. तू खूप मोठा हो. मी आहे. बँकेत पैसे ठेवलेत तुझ्याचसाठी. चेक लिहून देते, उद्याच सकाळी पैसे काढून आण. मोठी रक्कम आहे. नाहीतर मीच येते बरोबर."
चिनू गहिवरला, वय आणि मिसरूड विसरून आईच्या कुशीत शिरला.
"आई, तुला मी लवकरच घेऊन जाईन तिकडे कॅनडाला. थोडा सेटल होऊ दे. मग नेईन. एकटीला इथे नाही ठेवणार. ...
... उद्या तू पण येशील का फिलिप्स सरांना भेटायला मुंबईला?"
"नाही रे. आत्ता रजा नाहीये मिळणं शक्य. तुला एअरपोर्टवर टाटा करायला नंतर येईन मी. तू आत्ता सुटसुटीत जाऊन ये." आईने नकळत आवंढा गिळला.
दुसर्या दिवशी रात्री चिनू मुंबईच्या बसमध्ये बसला होता. मोठी कॅश सोबत असल्याने झोप लागून चालणार नव्हती. तरी चुकून डुलकी लागलीच तर? म्हणून बॅग हाताने मांडीवरच गच्च दाबून तो बसला होता. थंड हवा अंगाला झोंबत होती. हो, तिकडे कॅनडात तर थंडी खूपच जास्त असते. डेव्हिड सरांनी सांगितलंय. गरम कपडे घ्यायला. ते आपण आईसोबत एकत्र जाऊन घेऊ या मुंबईत..
कितीही आवरले तरी डोळे पुन्हा पुन्हा मिटू पाहत होते. स्वप्नं डोळ्यांना बंद होण्यासाठी धडका देत होती.
बसने आता चांगलाच वेग पकडला होता आणि ती आता अध्ये मध्ये थांबणार नव्हती...
(समाप्त..)
प्रतिक्रिया
31 Aug 2022 - 11:55 am | ज्ञानोबाचे पैजार
मिपाकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
पैजारबुवा,
31 Aug 2022 - 12:00 pm | Trump
छान लेख.
पुढे काय होणार याचा अंदाज आला आहे.
31 Aug 2022 - 12:06 pm | कुमार१
आवडली गोष्ट.....
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
31 Aug 2022 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कथा. शेवट माहिती आहे. लब यू गविशेठ. लिहिते राहात जा राव.
गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. गलेमातला पहिला लेख लैच आवडला.
-दिलीप बिरुटे
31 Aug 2022 - 12:31 pm | तुषार काळभोर
शेवट माहिती आहे, तरी तो वाचायला न लावल्याबद्दल धन्यवाद..
1 Sep 2022 - 1:54 pm | राजेंद्र मेहेंदळे
अमेरिका काय, कॅनडा काय किवा सरकारी नोकरी, आर्मी पोस्टींग, मेडिकल्/ईंजिनीअरिंग अॅडमिशन काय. करोडो चिनु आणि लाखो डेव्हीड सर आहेत आपल्या आसपास. एक अडखळला तर मागे दुसरे हजार.
गोष्ट आवडली हेवेसांनल.
31 Aug 2022 - 12:18 pm | टर्मीनेटर
मस्त कथा 👍 श्री गणेश लेख मालिकेची सुरुवात छान झाली आहे.
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि १५ व्या मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
31 Aug 2022 - 1:56 pm | कर्नलतपस्वी
सुरवात छान झाली आहे.कुठे नेऊन पोचवणार,आदांज आलाय.
बाप्पा सर्वांचे रक्षण करो.
31 Aug 2022 - 2:21 pm | प्रसाद गोडबोले
वाह.
लेखमालिकेची उत्तम सुरुवात ! कथा वाचुन मात्स्यन्याय संकल्पनेची आठवण झाली. (मोठ्ठा मासा छोट्या माश्याला खातो , रादर त्याला खावेच लागते जिवंत रहाण्यासाठी. त्यात काही पाप नाही.)
अवांतर : बाकी देसीबाबाच्या आठवणीने गहीवरुन आले ;)
31 Aug 2022 - 4:39 pm | Bhakti
छानच लिहिलीय कथा!
कसं ना एका समांतर जगातील काही स्वप्ने...
सर्वांना गणेशोत्सवाच्या आणि मिपाला वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
31 Aug 2022 - 5:15 pm | सतिश गावडे
रोजीरोटीचा इमला ज्या तंत्रज्ञानावर उभा आहे त्याचे नाव मथळ्यात वाचून उत्सुकतेने कथा वाचू लागलो.
कथा इतकी ओघवती आहे की दोन दशकांपूर्वी ऐकलेले, अनुभवलेले संदर्भ पुन्हा नव्याने नजरे उभे राहीले. अल्टाविस्टा, जियोसिटीज, मोडेमचा कीं कीं कुर्रर्र आवाज आणि देसीबाबा न्यूजलेटर अशा सर्वच गोष्टींची मनात उजळणी झाली.
कथेचा शेवट मात्र अनपेक्षित आणि चटका लावणारा होता.
या वाक्यासाठी दंडवत राजे.
31 Aug 2022 - 10:59 pm | वामन देशमुख
गलेमातील ही पहिलीच कथा वाचली.
खूप दिवसांनी असं वाचून छान वाटलं.
कथेचा पुढचा न सांगितलेला भाग काय असणार हे सर्वज्ञात आहेच. ते इथे न लिहिलेले पाहून बरं वाटलं.
कथा आवडली हे वेगळं सांगायला हवंय का?
31 Aug 2022 - 11:41 pm | गवि
दोस्त लोक्स.. शेवट हा वाचकांवर खूप भरवसा ठेवून केला होता. ट्विस्टची आपल्याला सवय लागली आहे. पण ट्विस्ट नको होता. वाचकांवर विश्वास न ठेवेल तो लेखकच नव्हे..
चिनूचं नशीब आणि कथेचा अंत समजून घेतल्याबद्दल मायबाप वाचकांना अनेक धन्यवाद..!!
6 Sep 2022 - 11:09 am | तर्कवादी
कथाशैली, सगळे वर्णन आवडले.. नावाचा उहापोह मस्तच वाटला.
पण कथेला शेवट हा हवा असं माझं मत आहे..
इथे चिनूची फसवणूक असेल असेच बहुधा वाटते .. पण असे काही होवू नये ही हळवी इच्छाही आहे.
म्हणून शेवट वाचकांवर न सोडता लेखक म्हणून आपण आपणास अभिप्रेत शेवट सांगायला हवा असे मला वाटते.
धन्यवाद
1 Sep 2022 - 9:36 am | प्रचेतस
शब्दसामर्थ्य, वाक्यरचना खूपच जबरदस्त. जियो गविशेठ. लिहिते राहा.
1 Sep 2022 - 2:09 pm | सुरिया
ब्राऊ, दास्तान, गिटार मध्ये जंजीर, शोले, अभिमान मधला बच्चन होता.
.
लाल बादशाह आणि सुर्यवंशममधलाही बच्चन पाहिला, हे एचटीएमएलही वाचले.
.
माफ करा पण, पिंकचा बच्चन अपेक्षित आहे गवि आता......
1 Sep 2022 - 2:50 pm | गवि
:-D
धन्यवाद ..
1 Sep 2022 - 5:09 pm | जेम्स वांड
आपणांस दंडवत,
ऐंशीच्या उत्तरार्धात जलमलेली पोरं लैच रीलेट होतील ह्या कंटेंट सोबत, मालक तुमच्या हातोटीला आमचा पूनरेकवार दंडवत हो महाराजा.
१. समाधान बिल्डिंगची छबी बनवणे
२. देसीबाबा न्युज लेटर
३. कर्रर्र वाजणारे मोडेम
४. शेवग्याच्या झाडा सोबत वाढणे
कितव्यांदा दंडवत घालावा राव तुम्हाला !
रच्याकने,
गलेमासाठी फाँट निवड करणाऱ्या रसिक संपादक मंडळाला पण आपले अनेक अनेक आभार, तुमची कलासक्ती तुमच्या फाँट निवडीतून झळकली हो मंडळ. लगे रहो.
1 Sep 2022 - 5:52 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान कथा.
👌
1 Sep 2022 - 6:23 pm | कर्नलतपस्वी
आरे गविभौ आजच माझा चिनू झाला.
गोजिरे हे शब्द ह्यांचे देखणे देती दगे
हि कशाची माणसे ?हे बोलणारे पिंजरे
- सुरेश भट
1 Sep 2022 - 6:32 pm | नचिकेत जवखेडकर
छान कथा!!
1 Sep 2022 - 10:08 pm | जव्हेरगंज
मस्त लिवलंय!!!
2 Sep 2022 - 2:56 pm | नंदन
खास 'गवि'टच डिटेलिंग!
(स्क्रीन काळा... आठवलं)
3 Sep 2022 - 12:12 am | सुखी
भारी
3 Sep 2022 - 6:03 am | पुंबा
उत्तम आहे कथा. नेहमीप्रमाणेच.
चिनूला चांगलाच फटका बसला असणार. आई अजून काही महिने घालून पाडून बोलेल. शेजारपाजारचे, मित्र ह्यांच्यात टिंगलीचा विषय होईल चिन्या. पण चार पाच कंपन्यांना ॲप्लाय करताच झटकन नोकरी मिळून जाईल. एक-दोन वर्षे होतात तोवर कंपनी ऑनसाईट पाठवेल आणि सगळं मळभ दूर होईल. हे असंच घडेल कारण त्या काळातल्या अनेकांच्या बाबतीत असंच घडलंय.
3 Sep 2022 - 11:00 am | सोत्रि
खास गविटच असलेली कथा आवडली
- (एचटीएमएल कोडर) सोकाजी
4 Sep 2022 - 1:09 pm | मुक्त विहारि
कथा आवडली ...
4 Sep 2022 - 11:14 pm | वडगावकर
थोडासा हॅपी एन्डींग चा ट्विस्ट देता येणार नाही का सर ?
लेकराला पन्नास हजाराला फटका म्हणजे फारच होतंय हो
6 Sep 2022 - 9:26 am | चांदणे संदीप
ऐंशीच्या पूर्वार्धातलाच असल्याने कथा एकदम रिलेट झाली.
पी२, पी३, विंडोज९५, ९८ ही त्यावेळेसची स्वप्नंच होती.
सं - दी - प
6 Sep 2022 - 10:09 am | MipaPremiYogesh
एकदम जुन्या कॉलेज मधल्या आठवणी जाग्या झाल्या काय त्या फ्लॉप्प्या , काय ते कम्प्युटर्स, आणि काय ती आम्ही पोरं ...
सुंदर लेख
6 Sep 2022 - 12:49 pm | स्वधर्म
गवि सर, हळवं करणारी कथा आहे. शेवटच्या क्षणी चिनूला डेव्हीड सरांचा संशय येणे आणि त्याने ५० हजार न देणे, असा काही ट्विस्ट हवा होता असं वाटलं. ट्विस्टशिवाय कथेला मजा नाही, असं आपलं माझं मत.
7 Sep 2022 - 12:15 pm | चौथा कोनाडा
7 Sep 2022 - 12:16 pm | चौथा कोनाडा
बाप रे .. काय होणार चिनूचं ?
जबरी रंगवलीय ! सगळं डोळ्यांसमोर तंतोतंत उभं राहिलं
+ १
त्या काळात नेलंत राव गविशेठ !
कृपया समाप्त खोडुन क्रमशः करावे ही विनंती !
अस्मिताची पण उत्सुकता लागून राहिलीय राव !
.. आणि पुढचा भाग लवकर टाकावा ही विनंती गविशेठ !
8 Sep 2022 - 10:11 am | नचिकेत जवखेडकर
एकदम छान लिहिलंय. माझ्या मागे एक माणूस लागला होता की मी तुला जॉब देतो एका चांगल्या कंपनीत. त्याकरता एक अर्ज भरावा लागेल त्याचे ५५० रुपये दे. मी देणार पण होतो. पहिला जॉब शोधतानाच्या वेळेस. पण बहिणीला सांगितलं आणि ती म्हणाली की अजिबात असले प्रकार करायचे नाहीत. कुठलीही मोठी कंपनी असले पैसे मागत नाही अर्जासाठी!
8 Sep 2022 - 12:14 pm | Trump
सरकारी नोकरी साठीच्या अर्जासाठी पैसे द्यावे लागतात.
8 Sep 2022 - 10:38 am | विवेकपटाईत
कथा आवडली .
8 Sep 2022 - 11:16 am | सुमो
कथा. आवडली. 👍
8 Sep 2022 - 12:07 pm | चिगो
कथा आवडली, गविसेठ.. तुमची शैली तर नेहमीच आवडते. लैच भारी..
- कंप्युटरमधला ‘ढ’
चिनू..
11 Sep 2022 - 6:48 pm | Nitin Palkar
छान कथा, अतिशय सुरेख वर्णन. योग्य शेवट.
22 Sep 2022 - 3:52 pm | श्वेता व्यास
कथा आवडली, बरीचशी रिलेट झाली. आत्ता पन्नास हजार गेले तरी नंतर सुखांतच असेल अशी खात्री वाटते.