'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
30 Aug 2022 - 7:03 pm

.container1 {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}
.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}

'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.

परवा म्हणजे रविवारी संध्याकाळी आम्ही MX Player वर 'Day Of The Mummy (Hindi Dubbed)' हा हॉरर चित्रपट लावला होता. सुरु झाल्यावर सुमारे साडे दहाव्या मिनिटापासून एका पात्राने लावलेल्या चष्म्यातील छुप्या कॅमेरातून दिसणारी दृष्ये चित्रपट रूपाने प्रेक्षकांसमोर पेश करण्याची लेखक/पटकथा लेखक किंवा दिग्दर्शकाच्या दृष्टीने 'अभिनव' पण बघणाऱ्याच्या दृष्टीने अत्यंत वैतागवाणी कल्पना राबवलेला आणि एकही ओळखीचा कलाकार नसलेला असा हा तथाकथित 'हॉरर' सिनेमा तब्बल ४०-४५ मिनिटे उलटल्यावरही काहीच उत्कंठाजनक घटना घडत नसल्याने कंटाळून बंद केला.

दुसरा एखादा बघू म्हणून 'शिंडलर्स लिस्ट' आणि 'टेकन' सारखे गाजलेले सिनेमे देणाऱ्या लिआम नीसन ह्या अभिनेत्याचा 'The Grey (Hindi Dubbed)' हा चित्रपट मोठ्या अपेक्षेने लावला पण अतिशय संथगतीने पुढे सरकणारा हा तथाकथित 'थ्रिलर' सिनेमाही ३०-३२ मिनिटांनंतर बघायचा कंटाळा आल्यामुळे बंद करून होमपेज वर आलो आणि सहज नोटिफिकेशन्स बघितले तर त्यात 'Spider-Man: Far From Home actors...' ह्या व्हिडिओची शिफारस करण्यात आली होती. त्या व्हिडिओचे शिर्षक आणि थंबनेल वरचे स्पायडरमॅनचे गोजिरवाणे रुपडे बघून एकदम काही वर्षांपूर्वी पैजारबुवांनी मिपावर लिहिलेल्या "तूने चुरया मेरे दिल का चैन - विवाहोत्सुकांसाठी एक नवा मंत्र आणि विवाहितांसाठी वरदान" ह्या लेखातून ओळख करून दिलेल्या -

इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन ।
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन ।।
देख के तेरे करतब यारा मै तो बन गयी तेरी फैन ।।।
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन हो हो...

ह्या सुमधुर, अलौकिक अशा गाण्याची आठवण आली आणि गेला सव्वा तास दोन रटाळ चित्रपट अर्धवट पाहण्यात वेळ वाया गेल्याबद्दल आलेला सात्विक संताप कुठच्या कुठे पळाला. मग मूड फ्रेश करण्यासाठी तडक युट्युब वर सदर गाणे सर्च करून चार ते पाच वेळा लूप मध्ये बघण्यात आले.
ह्या सदाबहार गाण्याचे वर्णन करणे हि माझ्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे पण सुदैवाने गाण्याचे बोल, संगीत, गायिकेचा आवाज आणि गायनशैली तसेच लोकेशन, नायक-नायिकेचे फाडू नृत्यकौशल्य, हावभाव व कॅमेरामनचे नैपुण्य अशा अनेक 'वैशिष्ट्यांचे' पैजारबुवांनी आपल्या लेखात अतिशय समर्पक शब्दांत विवेचन केलेले आहे आणि ते अद्याप वाचले नसेल त्या सर्व वाचकांनी अवश्य वाचावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.

असो, बुवांनी आपल्या रसग्रहणात्मक लेखात नायिकेकडे थोडे जास्त लक्ष दिल्याने "मुख्य पात्र ‘इस्पायडर मॅन कडे, त्याच्या अफलातून नृत्य कौशल्याकडे त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाल्या सारखे (उगाचंच) वाटल्याचे, तसेच त्याच्या टॅलेंटलाही परीक्षणात समान न्याय द्यायला हवा होता असेही (उगाचंच) वाटल्याचे" त्यावर दिलेल्या प्रतिसादात लिहून त्या बिच्चाऱ्या 'नरपुंगवावर' झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा मागे मी छोटासा प्रयत्नही केला होता!

पण त्यावेळची माझी तक्रार किती क्षुल्लक होती ह्याची जाणीव परवा ते गाणे पुन्हा पुन्हा पाहताना स्क्रीनच्या उजव्या बाजूला पुढील व्हिडिओंच्या यादीत अग्रक्रमांकावर दिसलेल्या "Desi Spiderman - Worst Movie of All Time" असे शिर्षक दिलेल्या एका चित्रपटाच्या व्हिडिओचा थंबनेल पाहिल्यावर झाली. चित्रात दिसणारा देशी स्पायडर मॅन आणि त्या गाण्यातला 'इस्पायडर मॅन' हे एकच आहेत हे सहज लक्षात येत होते.

पैजारबुवांनी गाण्याची ओळख करून देताना ते अलौकिक गाणे कोणत्या चित्रपटातले आहे त्याचा साधा नामोल्लेखही लेखात केला नाही आणि पर्यायाने माझ्यासारख्या कित्येक चित्रपटप्रेमी मिपाकरांना हि महान कलाकृती बघण्यापासून वंचित ठेवले आहे हे लक्षात आल्यावर डोक्यात तड तड उडणाऱ्या संतापाच्या ठिणग्या कशाबशा सांभाळत आणखीन एक परखड प्रतिसाद लिहून त्यात तीव्र शब्दात बुवांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांच्या ह्या निंदनीय कृत्याचा जाब विचारण्यासाठी मी मिपावर लॉगिन करणार एवढ्यात बायकोने मला थांबवले आणि माझा राग शांत होण्यासाठी मनातल्या मनात एक ते शंभर आकडे मोजायला सांगितले.

तिने सांगितल्याप्रमाणे केल्यावर माझी मन:स्थिती थोडी ताळ्यावर आली असली तरी एखादा प्रतिसाद लिहून सौम्य शब्दात का होईना पण निषेध नोंदवण्याची माझी खुमखुमी काही जात नाही हे पाहून "आधी आपण हा चित्रपट पाहू. हे गाणे नक्की त्याच चित्रपटातले आहे कि नाही ह्याची खातरजमा करू, आणि त्यानंतरही बुवांच्या हेतू/उद्देशाबद्दल जर काही शंका मनात राहिली तर तुला हवे तसे कर... मी थांबवणार नाही." असा समंजस सल्ला तिने दिला. आणि काय आश्चर्य, कधी नाही ते मला तिचा सल्ला पटला आणि आम्ही 'Desi Spiderman' हा चित्रपट पाहायला सुरुवात केली!

ऐकणाऱ्याला बऱ्यापैकी त्रासदायक वाटेल अशा दणदणीत (अ)श्रवणीय बॅकग्राउंड म्युझिकच्या जोडीला स्क्रीनवर पांढरे बूट, काळी पॅन्ट, पांढरे हातमोजे, 'कान्हा मिल्क' ने आपल्या जाहिरातीसाठी पुरस्कृत केलेला पूर्ण बाह्यांचा लाल टी-शर्ट आणि चेहरा झाकणारा पांढरा मुखवटा अशा अवतारात 'देशी स्पायडर मॅन' ची मोहक छबी स्क्रिनवर झळकते.
desi spiderman
.
ह्या देशी स्पायडर मॅनच्या मोहक छबीच्या पार्श्वभुमीवर निर्माता, दिग्दर्शक वगैरे दिग्गज प्रभुतींची आणि अन्य काही किरकोळ मंडळींची नावे झळकल्यावर पहिल्याच सिन मध्ये गावातल्या लहान मुलांबरोबर गोट्या खेळणारा चित्रपटाचा पंचवीसेक वर्षांचा पण बालबुद्धीचा आणि बोबडे बोलणारा नायक 'शाम' ह्याला गावच्या सरपंचाची तरुण मुलगी 'राधा' (तीच ती 'इस्पायडर मॅन... इस्पायडर मॅन' ह्या शिर्षक गीतावर इस्पायडर मॅन बरोबर नाचणारी चित्रपटाची नायिका) गोट्यांचा खेळ सोडून तिच्याबरोबर शेतात फिरायला येण्यासाठी आर्जव करते.

त्यावर "तू मला टॉफी देशील का?" असा बालसुलभ प्रश्न शाम तिला विचारतो; तेव्हा "ठीक आहे आपण परत येताना मी तुला टॉफी देईन" असे राधाने कबूल केल्यावर "ओ लाधा तुम कितनी अच्ची हो" म्हणत टाळ्या वाजवत, उड्या मारत शाम तिच्याबरोबर जायला निघतो तिथपासून ह्या 'राधा आणि शाम' च्या सोबतीने शेतातल्या रस्त्यावरून पुढे एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा आपला रोमहर्षक प्रवास सुरु होतो.

शेतातल्या कच्च्या रस्त्यावरून चालत असताना 'राधा आणि शाम' चा लडिवाळ संवाद चालू असतो पण अचानक राधाच्या उजव्या पायाच्या टाचेत काटा घुसतो. त्या वेदनेने विव्हळून नायिकेच्या तोंडातून 'आह' असा शब्द बाहेर पडताना राधाची भूमिका साकारणाऱ्या त्या उच्च कोटीच्या अभिनेत्रीने जो भाव चेहऱ्यावर आणला आहे तो बघून (पुरुष) प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी अनपेक्षितपणे नायिकेची अशी दिलखेचक, जीवघेणी अदा पहायला मिळाल्याने बसलेल्या धक्क्यातून प्रेक्षक सावरत नाहीत तोच, "लाधा तुम लोना मत... अभी निकलता हू" असा तिला दिलासा देत शाम हळुवारपणे तिच्या टाचेत रुतलेला काटा काढतो आणि त्यानंतर पहायला मिळणारा कसदार दिग्दर्शनाचा अप्रतिम नमुना, कॅमेरामनचे नैपुण्य आणि नायिकेचा अव्वल दर्जाचा अभिनय असा कलात्मक त्रिवेणी संगम आपल्याला पुरता फ़्लॅट करून टाकतो.

जखमेतून अलगदपणे ओघळणारा रक्ताचा थेंब आपल्याला नीट दिसावा म्हणून झूम करून टाचेचा क्लोजअप शॉट घेणारा कॅमेरा दुसऱ्याच क्षणाला तारुण्याने मुसमुसलेल्या नायिकेचे मनमोहक भावविभ्रम टिपण्यासाठी थेट तिच्या चेहऱ्यावर स्थिरावतो. चावट वृत्तीच्या प्रेक्षकांना खात्रीने 'ते' भाव नायिकेला 'ऑरगॅजम' आल्याचे दर्शवणारे वाटतील, पण आपल्या सारख्या कलासक्त रसिक प्रेक्षकांना मात्र तो अत्युच्च अभिनयाचा अविष्कार वाटेल ह्यात तिळमात्र शंका नाही. पुराव्यादाखल हि खालची क्लिप बघावी-
.

.
सुमारे दहा ते बारा सेकंद नायिकेचे 'ते' मनमोहक भावविभ्रम पाहून संमोहित झालेल्या प्रेक्षकांना एका झटक्यात भानावर आणण्याचे काम खाडकन समोर येणारा पुढचा प्रसंग चोख बजावतो.

'रेडा गाडी' वर स्वार होऊन गाव लुटायला आलेली आठ खुंखार डाकूंची टोळी बघून उरात धडकीच भरते! हा प्रसंग अतिशय चित्तथरारक बनवण्याचे सर्व श्रेय हे फक्त आणि फक्त दिग्दर्शक, संगीतकार, कॅमेरामन, रेडा, संवादलेखक आणि डाकूंच्या भूमिका वठवणाऱ्या कलाकारांचे आहे.

दिग्दर्शकाने डाकूंच्या टोळीची एंट्री बैलगाडी किंवा घोडागाडीतुन न दाखवता एका रेडा जुंपलेल्या गाडीतून झाल्याचे दाखवून नाविन्याबरोबरच साक्षात यमराज आपल्या यमदुतांसमवेत आल्याचा प्रतीकात्मक संदेश देण्यासाठी रेड्याचा चपखल वापर केला आहे, तर संगीतकाराने ह्या भयावह प्रसंगाला एकदम साजेसे भयाण पार्श्वसंगीत देऊन आपली योग्यता सिद्ध केली आहे.

सुरुवातीला आणि सर्व डाकू गाडीतून धडाधड उड्या टाकून उतरल्यानंतर क्लोजअप घेण्यासाठी झूम करून त्याच्यावर रोखलेल्या कॅमेऱ्यासमोर त्या रेड्याने जे थंड, निर्ढावलेपणाचे भाव आपल्या मुखकमलावर आणले आहेत त्यातून त्याचे अभिनय कौशल्य तसेच कॅमेरामन आणि रेड्यामध्ये असलेले बॉण्डिंग/ट्युनिंग लक्खपणे नजरेत भरते.

संवादलेखकाने विशेष मेहनत घेऊन खास डाकुंसाठी लिहिलेले संवाद आपल्या दमदार संवादफेकीतून पेश करून प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवण्यात तसेच प्रभावशाली देहबोलीतून हा प्रसंग यादगार बनवण्यात डाकूंची भूमिका वठवणारे सर्व कलाकार(?) कमालीचे यशस्वी झाले आहेत. आठ डाकूंच्या ह्या टोळीत त्यांचा सरदार पकडून सात पुरुष डाकू तर 'रेश्मा' नावाची एक महिला डाकू आहे. ह्या रेश्माने तर पुढे कमालच केली आहे.
.

.
चित्रपट सुरु झाल्यावर चार मिनिटे चाळीस सेकंदांनी पहिले गाणे येते ते खाटेवर लोळत असलेली नायिका (राधा) आपल्या बिनडोक प्रियकराच्या (शामच्या) विचारांत हरवून पाहात असलेल्या दिवास्वप्नात! गाण्याच्या आधी तिच्या डोळ्यांसमोर तरळत असलेली टाचेत रुतलेला 'काटा' शाम काढत असतानाची आणि त्यानंतरच्या तिच्या मनमोहक भावविभ्रमांची दृष्ये पाहून आपल्याला तिच्या मन:स्थितीची व्यवस्थित कल्पना येते. आणि त्या मन:स्थितीला अत्यंत साजेसे बोल आणि दृश्ये असलेले एक सुमधुर आणि प्रेक्षणीय असे गाणे त्या ओघात आपल्यासमोर येते.

छम छम बरसा पानी...
पानी बडा है तुफानी...
जल्दीसे आजा सनम तू...
तडपे है ये 'तेरी रानी...

काळी साडी आणि चोळी ल्यायलेली राधा स्वप्नात पावसात भिजत, गाणे म्हणत आपल्या सुकोमल ओलेत्या देहाच्या आकर्षक हालचाली करत शाम सोबत नृत्य करत असलेली पाहून काही नतद्रष्टांना ही 'मोहरा' सिनेमातल्या 'टीप टीप बरसा पानी... पानीने आग लगाई...' ह्या गाण्याची भ्रष्ट नक्कल वाटेल पण बारकाईने बघितल्यास त्यातला फरक लक्षात येईल. 'टीप टीप बरसा पानी' गाण्यात नायिका पिवळ्या साडी-चोळीत दाखवली आहे तर ह्या 'छम छम बरसा पानी' गाण्यात नायिकेने काळी साडी-चोळी परिधान केली आहे. हा गाण्याची चाल आणि संगीत अगदी हुबेहूब वाटत असले तरी टीप टीप बरसाचे संगीतकार विजू शहा ह्यांचा 'संगीत चौर्याचा' इतिहास बघता काळाच्या कित्येक दशके पुढे असलेल्या ह्या चित्रपटातील 'छम छम बरसा पानी' गाण्याच्या संगीताची नक्कल त्यांनीच अठ्ठावीस वर्षांपूर्वी केली असावी असा संशय घेण्यास वाव आहे. पण ते असो...
.
छम छम बरसा पानी...

.
पुढे शाम राधा बरोबर बाजारातून खरेदी करून परत येत असताना उसाच्या मळ्यातून जाणाऱ्या रस्त्यात एक हृदयद्रावक घटना घडते आणि राधाला शाम हा 'कायर' असल्याचा साक्षात्कार होतो. खरंतर भरपूर साऱ्या टॉफ्या मिळणार म्हणून खुश झालेल्या बालबुद्धीच्या बोबड्या शामने राधाला तीन गुंड-मवाल्यांच्या हवाली करण्यात आणि ते तिच्या अंगचटीला जात असताना ती "छोड दो मेरा हात... शाम बचाओ मुझे" असे उद्गारते त्यावर "लाधा घाबलाओ मत... ये तुम्हे टॉफी देकल छोद देंगे" असे निरागस उत्तर शाम देतो त्यात त्याची काय चूक आहे ?उलट राधाला आपण सुयोग्य प्रियकर निवडला असल्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे होता!

बरं, पुढे ते गुंड राधाला उचलून उभ्या उसात घेऊन जातात तेव्हा बिचारा शाम रडत रडत जाऊन थोड्या अंतरावर शेतात काम करत असलेल्या लोकांना घेऊन येतो आणि राधाची अब्रू वाचवतो कि, मग तो 'कायर' कसा? पण हे लक्षात न घेता राधा त्याच्यावर नाराज होते आणि पुन्हा माझे नाव पण नको घेऊ असे रागाने बोलून तिथून चालू पडते. प्रेमीजीवांत दुरावा निर्माण करणारा हा प्रसंग म्हणजे शामचे रूपांतर इस्पायडर मॅन मध्ये होण्याच्या ऐतिहासिक घटनेची मुहूर्तमेढ असते.

असो तर ह्या हृदयद्रावक घटनेमुळे प्रेक्षकांच्या मनावर आलेला ताण हलका करण्याची खबरदारी दिग्दर्शकाने घेतल्याचे पुढच्या प्रसंग पहिला कि लक्षात येते.
उसाच्या शेतात बसून डाकूंच्या टोळीची मागच्यावेळच्या लुटीत मजा आली नसल्याबद्दल चर्चा चालू असते. त्यात धूम चित्रपटातल्या गाण्याचा उल्लेख येतो तेव्हा सरदार विचारतो कि हे काय प्रकरण आहे? त्यावर 'रेश्मा' सरदाराला धूम चित्रपटाची ऑडिओ सीडी दाखवून त्याचे अज्ञान दूर करते. त्यावर डाकूंच्या परंपरेला अनुसरून सरदार रेश्माला धुमच्या गाण्यावर नृत्य करण्याची फर्माईश कम आदेश देतो.

बिचारी रेश्मा, डाकूंच्या टोळीची सदस्य असली तरी आपल्या स्त्रीसुलभ लज्जेचा नमुना दाखवत आपल्याला लाज वाटत असल्याचे सांगते त्यावर "अरी ओ रेश्मा... छोड लाज शरम, और दिखादे हमें अपने डान्स करम" असा काव्यात्मक डायलॉग मारून सरदार तिला प्रोत्साहित करतो, आणि जुम्मन नावाच्या आपल्या सहकारी डाकूला गाणे लावण्याचा आदेश देतो.
पडत्या फळाची आज्ञा मानून जुम्मनने लाऊड स्पीकरवर लावलेल्या 'धूम मचाले धूम मचाले धूम' ह्या गाण्यावर सरदाराने इशारा केल्यानंतर रेश्माने सुरेख नृत्य करून कमाल केली आहे. नृत्य करताना नर्तक/नर्तकीच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील महत्वाचे असतात हा समज ह्या आपल्या नृत्यातून रेश्माने साफ खोटा ठरवला आहे. चेहरा शक्य तितका कोरा ठेवत नृत्य करण्याची नृत्यदिग्दर्शकाची अपेक्षा तिने यशस्वीरीत्या पूर्ण करून त्याचे आणि प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
.
धूम मचाले धूम मचाले धूम...

.
ह्या गाण्यानंतरच्या प्रसंगात राधा त्याच्यावर नाराज असल्याने जेवणावरची वासना उडाल्याचे शामने त्याची आजी शोभेल अशा वयाच्या वृद्ध आईला सांगितल्यावर त्या दोघांच्यात जो संवाद होतो त्यातून श्यामची आई जेव्हा "तू जन्माला आल्यावर लगेच मेला असतास तर बरे झाले असते" असे वाक्य उच्चारते तेव्हा नायिकेच्या वागण्याचा आपल्याला आलेला राग निवळतो. मग काय साक्षात जन्मदात्री आईच्या आपल्या दिवट्या मुलाबद्दल अशा भावना असतील तर त्या परक्या तरुणीला दोष कशाला द्यायचा?

त्यात गावकऱ्यांच्या शाम बद्दलच्या तक्रारी ऐकून रागावलेली शामची आई त्याला झोडून काढते त्याच रात्री अपमानित झालेला आणि झोप येत नसल्याने खाटेवर तळमळत पडलेला शाम घराबाहेर पडतो. विजांचा कडकडाट होत असलेल्या त्या काळरात्री एका झाडाखाली रडत बसून देवाकडे "अशा जीवनापेक्षा मरण बरे" वगैरे वगैरे तक्रारी करत असताना अचानक तिथे एक साधूबाबा प्रकट होतात आणि काही अटी-शर्तीं घालून शामला वरदान म्हणून त्याचा कायाकल्प होऊन त्याला दिव्य शक्ती प्राप्त करून देणारा एक मंत्र सांगतात आणि त्यातून आपल्या देशी स्पायडरमॅनचा जन्म होतो!

साधूबाबांनी वरदान दिल्यावर श्यामचे इस्पायडर मॅन मध्ये रूपांतर होण्यासाठी किंवा मूळ रूपात परत येण्यासाठी तसेच गायब होण्यासाठी किंवा कुठेही अचानकपाणे प्रकट होण्यासाठी त्याला फक्त एक गिरकी घ्यावी लागते. त्याची वाणीही सुधारते आणि तो बोबडे बोलणे सोडून सामान्य माणसांप्रमाणे व्यवस्थित बोलायला लागतो. तुंबळ हाणामाऱ्या करण्याची शक्तीही त्याला प्राप्त होते.
एकदिवस राधा रस्त्याने एकटी जात असताना पुन्हा त्या तीन गुंडांच्या तावडीत सापडते पण ह्यावेळी एक क्षणही वाया न घालवता आपला इस्पायडर मॅन तिथे प्रकटतो आणि त्या गुंडांचा खरपूस समाचार घेऊन राधाला त्यांच्यापासून वाचवतो.
त्यानंतर पुन्हा एकदा राधा आपल्या घरातल्या खाटेवर लोळत विचारांत हरवलेली बघायला मिळते, पण ह्यावेळी मात्र तिच्या दिवास्वप्नात शामच्या जागी इस्पायडर मॅन असतो. आणि ह्याच स्वप्नातून अनपेक्षितपणे ह्या लेखाची प्रेरणा ठरलेले,

इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन ।
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन ।।
देख के तेरे करतब यारा मै तो बन गयी तेरी फैन ।।।
इस्पायडर मॅन इस्पायडर मॅन तूने चुरया मेरे दिल का चैन हो हो...

हे अजरामर गीत आपल्या भेटीस येते. ह्या अलौकिक गीताचे वर्णन करणे माझ्या आवाक्या पलीकडचे असल्याचे मी आधीच स्पष्ट केले आहे त्यामुळे केवळ वाचकांच्या सोयीसाठी सदर गाण्याचा व्हिडीओ खाली देत असलो तरी ह्या गाण्याचे बारकावे आणि महती समजण्यासाठी पैजारबुवांचा लेख आणि त्यावरचे प्रतिसाद वाचणे अत्यावश्यक आहे!
.

.
असो, तर शामला आता अशी दिव्यशक्ती प्राप्त झाल्यावर तीचा वापर तो विधायक कामांसाठी करणार नाही असे तर होऊच शकत नाही! मग तो वारंवार त्याच्याकडून मार खाऊनही लोचटासारखे पुन्हा पुन्हा त्याचे गाव लुटायला येणाऱ्या डाकूंची यथेच्छ धुलाई करताना दिसतो. आईला मदत म्हणून काही क्षणात गच्चीवर कपडे वाळत घालतो इतकेच नाहीतर स्कुल बस चुकल्या मुळे रस्त्यात रडत असलेल्या गावातल्या एका लहान मुलाला तिथून त्याच्यासहित गायब होऊन शाळे समोर प्रकट होत बसच्या आधी शाळेत पोहोचवतो. अशा साध्या साध्या गोष्टींमधून त्याच्या कनवाळू वृत्तीचे आणि लोकोपयोगी कार्याचे दर्शन आपल्याला होत राहते.

राधा आता इस्पायडर मॅनच्या प्रेमात पडली असल्याने शामशी फटकून वागत असते. त्या प्रसंगांची दृश्ये आणि खालील क्लिप मधील -

मिलना हैं मिलना है मुझे मिलना है
आज उसीसे मुझे मिलना है...
खूब करुंगी उससे बाते सारी
कौन है वो... बोलोजी कौन है वो...
इस्पायडर मॅन है वोह

हे गाणे पाहिल्यावर काही छिद्रान्वेषी लोकांना 'शहेनशाह' चित्रपटाची आठवण येऊ शकते आणि हे गाणे देखील त्यातल्या,

जाने दो, जाने दो, मुझे जाना है
अरे, वादा जो किया है वो निभाना है

ह्या गाण्याची नक्कल वाटू शकेल पण मला वाटतं हा केवळ योगायोग असावा. गाण्याची चाल, आणि संगीत सारखेच वाटत असले आणि ह्या दोन्ही गाण्यांतील नायिकेच्या ड्रेस मधला 'पिवळा रंग' सामाईक असला तरी बाकी काही साम्य आढळत नाही! लोकं काय नावं ठेवणारंच आपण नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं!
असो, तर ह्या 'मिलना हैं मिलना है मुझे मिलना है' गाण्यात नायक-नायिके साठी शेतातील रस्त्यावरच्या ठरवुन दिलेल्या काही मिटर्सच्या हद्दितच राहुन एकदा पुढे तर एकदा मागे जात, कवायत केल्या सारखे हातवारे करत नाचण्याच्या, आणि 'इस्पायडर मॅन है वोह' ह्या ओळीवर नायीकेची नागीन डान्स सदृश्य अशा डान्स स्टेप्स नृत्य दिग्दर्शकाने योजल्या आहेत त्यावरुन त्याची शिस्तप्रियता आणि कल्पकता अधोरेखीत होते.

अजुन खुप काही लिहीण्यासारखे आहे पण वाचकांची हा चित्रपट पहाण्याची उत्सुकता जागृत रहावी म्हणुन आता थोडे आवरते घेतो!
१ तास ७ मिनिटे आणि २० सेकंदांच्या ह्या चित्रपटात नाट्य आहे, रोमान्स आहे, अप्रत्यक्ष विनोद तर ओतप्रोत भरलेला आहे, थरार आहे, हाणामारी आहे, थोडक्यात सांगायचे तर एकाच वेळी सर्व प्रकारच्या आणि वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास हा चित्रपट सक्षम आहे. लहान मुलांना बालपट म्हणुनही दाखवता येईल.

सुरुवाती पासुन प्रेक्षकांना खिळवुन ठेवणाऱ्या ह्या चित्रपटात नायकाची म्हणजे 'शाम' ची भूमिका वठवणाऱ्या सुरेंद्र हीनवार आणि नायिकेची म्हणजे 'राधा' ची भूमिका वठवणाऱ्या रानी राव ह्या अष्टपैलू कलाकारांनी आपल्या सशक्त(?) अभिनय , स्पृहणीय(?) नृत्य कौशल्याचे प्रदर्शन करून चार चांद लावले आहेत.

महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट पाहिल्यानंतर बुवांविषयी झालेला माझा गैरसमजही दूर झाला. ज्या अलौकिक गाण्याची दखल दस्तुरखुद्द 'टॉम हॉलंड' ने देखील घेतली आहे त्या गाण्यावर लेख लिहिताना बुवांची एकाग्रता फक्त आणि फक्त त्या गाण्यावरच केंद्रित झाली असणार ह्याविषयी आता माझ्या मनात अजिबात शंका उरलेली नाही!
अर्जुनाला जसा स्वयंवराच्या वेळी माशाचा डोळा सोडून दुसरे काहीच दिसत नव्हते अगदी तशीच अवस्था त्यावेळी बुवांची झाली असणार, त्यांचे ते गाणे सोडून इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष गेले नसणार हे लक्षात आल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर शतपटीने वाढला आहे.

असो, निव्वळ मनोरंजन हा उद्देश ठेऊन कधीतरी बिनडोक चित्रपटही पाहायला आवडत असतील त्यांनी खाली दिलेला 'देसी स्पायडरमॅन' हा अलौकिक चित्रपट (स्वतःच्या जवाबदारीवर) जरूर बघावा 😀 व्हिडिओवर आलेल्या कॉमेंट्सही वाचनीय आहेत हे. वे. सां. न. ल.
.

कलानृत्यसंगीतबालकथाविनोदचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

30 Aug 2022 - 7:22 pm | कुमार१

निव्वळ मनोरंजन हा उद्देश ठेऊन कधीतरी बिनडोक चित्रपटही पाहायला आवडत असतील

>>>
मला तुमचा परिचयलेख पुरेसा आहे 😉

फक्त परिचय लेखावर समाधान न मानता तुम्हीपण हा चित्रपट बघाच!
Entertainment Guaranteed 😂

मुक्त विहारि's picture

30 Aug 2022 - 8:16 pm | मुक्त विहारि

आवडले

टर्मीनेटर's picture

31 Aug 2022 - 12:34 pm | टर्मीनेटर

धन्यवाद मुविकाका 🙏

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

31 Aug 2022 - 7:34 am | ॲबसेंट माइंडेड ...

रात्री बघितला
😇

टर्मीनेटर's picture

31 Aug 2022 - 12:39 pm | टर्मीनेटर

रात्री बघितला

मग आवडला कि नाही आवडला 😀

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Sep 2022 - 5:31 pm | ॲबसेंट माइंडेड ...

हो आवडला. खुप हसू आले.
😅

सुखी's picture

31 Aug 2022 - 8:33 am | सुखी

MX player chya जाहिरातींच्या माऱ्यापुढे पिक्चर कसा काय बघता तुम्ही?

टर्मीनेटर's picture

31 Aug 2022 - 12:48 pm | टर्मीनेटर

AdBlocker Ultimate झिंदाबाद !
लॅपटॉप आणि डेस्कटॉप दोन्हीमध्ये AdBlocker Ultimate असल्याने बघू शकतो अन्यथा विचारपण करवणार नाही 😂
1080p किंवा त्यावरची Video Quality उपलब्ध असेल तर TV ला कनेक्ट करून पहातो.

याने यूट्यूब चे ads पण ब्लॉक होतात का?

हो. युट्युब सहीत सर्वच वेबसाईट्स वरच्या थर्ड पार्टी सर्व्हर वरुन दाखवण्यात येणाऱ्या अ‍ॅड्स ब्लॉक होतात.

चामुंडराय's picture

4 Sep 2022 - 12:09 am | चामुंडराय

"It can read and change all your data on all websites"
इन्स्टॉल करताना असा मेसेज आला.
हे सुरक्षित आहे का?
सगळा डेटा म्हणजे काय काय हॅक करतात?

टर्मीनेटर's picture

6 Sep 2022 - 11:29 am | टर्मीनेटर

हे सुरक्षित आहे का?

असावे बहुतेक! मी गेली ५-६ वर्षे वापरतोय पण काही संशयास्पद नाही जाणवले.

एकतर अशा गोष्टी 'शोधायच्या', आपोआप सापडल्या तरी स्किप न करता पाहायच्या, नुसत्या पाहायच्या नाहीत तर त्यांचा आस्वाद घ्यायचा, वर त्याचं कौतुकानं ओतप्रोत रसग्रहण करायचं!!

हे तर मालेगावपेक्षा भारी कॅटेगरी वाटतंय..

नक्कीच 👍

एकतर अशा गोष्टी 'शोधायच्या', आपोआप सापडल्या तरी स्किप न करता पाहायच्या, नुसत्या पाहायच्या नाहीत तर त्यांचा आस्वाद घ्यायचा

उत्तम स्ट्रेस बस्टर असतात असल्या बिनडोक गोष्टी 😊

वर त्याचं कौतुकानं ओतप्रोत रसग्रहण करायचं!!

ते कोणीतरी म्हंटलंय ना... ग्यान बांटनेसे बढता है 😇

मदनबाण's picture

31 Aug 2022 - 10:04 am | मदनबाण

पैजार बुवांनी यावर किर्तन केलेले आहे ! :)

अर्थातच! ते कीर्तनच तर अनपेक्षितपणे / अपघाताने ह्या लेखाची प्रेरणा ठरले आहे 😀

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 Aug 2022 - 12:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

परीक्षण वाचून मी अत्यंत भारावून गेलो आहे,

सिनेमा पाहायलाच हवा, गाण्याच्या प्रभावा पुढे चित्रपट पहायचा राहूनच गेला,

अत्यंत मनःपूर्वक आभार

पैजारबुवा,

सिनेमा पाहायलाच हवा, गाण्याच्या प्रभावा पुढे चित्रपट पहायचा राहूनच गेला,

ते गाणं तर फक्त हिमनगाचं टोक आहे! म्हणून काय वाट्टेल ते करून थोडा वेळ काढा आणि ह्या अलौकिक कलाकृतीचा मनसोक्त आस्वाद घ्या 😂

चांदणे संदीप's picture

31 Aug 2022 - 1:00 pm | चांदणे संदीप

पैजारबुवांच्या त्या धाग्यानंतर कितीतरी वेळा त्या गाण्याचा आस्वाद घेतला. चित्रपटही आहे हे वाचून पोटात उकळ्या फुटायला लागल्या. कधी एकदा बघतोय असं झालंय.

सं - दी - प

चित्रपटही आहे हे वाचून पोटात उकळ्या फुटायला लागल्या. कधी एकदा बघतोय असं झालंय.

अगदी अस्सच झालं होतं मला पण असा चित्रपट आहे हे समजल्यावर 😊 आणि ही माहिती लपवल्या बद्दल बुवांचा भयंकर रागही आला होता!

प्रचेतस's picture

1 Sep 2022 - 9:22 am | प्रचेतस

अरे....काय लिहिलंय हे...कहर!!!! aaaaaaaaaaaaa

दंडवत घ्यावा सायबा ___/\____

चावट वृत्तीच्या प्रेक्षकांना खात्रीने 'ते' भाव नायिकेला 'ऑरगॅजम' आल्याचे दर्शवणारे वाटतील, पण आपल्या सारख्या कलासक्त रसिक प्रेक्षकांना मात्र तो अत्युच्च अभिनयाचा अविष्कार वाटेल ह्यात तिळमात्र शंका नाही.

हे वाचून आम्ही कलासक्त रसिक प्रेक्षक नसून चावट वृत्तीचेच प्रेक्षक आहोत हा साक्षात्कार झाला आहे. aaa

अजुन खुप काही लिहीण्यासारखे आहे पण वाचकांची हा चित्रपट पहाण्याची उत्सुकता जागृत रहावी म्हणुन आता थोडे आवरते घेतो!

हे वाचून अधिक काही पाहण्याच्या इच्छेने आम्ही मुद्दामून तुम्ही दिलेल्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनवर जाऊन डोकावून आलो आणि राधेसमोर इस्पायडरम्यानचे एक गिरकी घेऊन श्यामच्या रुपात परिवर्तन होताना पाहून धन्य झालो. निव्वळ इतके पाहूनच संपूर्ण सिनेमा पाहण्याची तुमच्याइतकी चिकाटी आमच्यात नाही हे आम्हाला समजले व आम्ही मुकाट्याने लॅपटॉप बंद केला. aaa

आम्ही कलासक्त रसिक प्रेक्षक नसून चावट वृत्तीचेच प्रेक्षक आहोत हा साक्षात्कार झाला आहे.

अभिनंदन 💐 💐 💐 😀

निव्वळ इतके पाहूनच संपूर्ण सिनेमा पाहण्याची तुमच्याइतकी चिकाटी आमच्यात नाही हे आम्हाला समजले व आम्ही मुकाट्याने लॅपटॉप बंद केला.

अरेरे... तुम्ही सिनेमा पुर्ण पहायला हवा होतात, एका स्वर्गीय आनंदाला मुकलात आपण 😂

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Sep 2022 - 10:23 am | ज्ञानोबाचे पैजार

आताच "छमछम बरसा पानी" या कलाक्रूतीचा पन्नासाव्यांदी आस्वाद घेतला, हेच गाणे काल पासुन गुणगुणतो आहे, निव्वळ स्वर्गिय अनुभव होता तो.

छम छम बरसा पानी, पानी बडा है तुफानी,
जल्दीसे आजा सनम तू, तडपे है ये तेरी रानी,

काय ते शब्द काय तो आवाज काय तो ढॅण्स सगळे कसे एकदम परफेक्ट, चितळ्यांचे श्रीखंड खाल्ले की कशी एक सुखद गुंगी येते तसाच काहीसा अनुभव हे गाणे ऐकताना आला.

आपला ऋशभ पंत सुध्दा या स्पायड्याचा फॅन आहे तो चक्क खेळताना प्रेरणा म्हणून या सिनेमाची गाणी म्हणातो, विश्वास बसत नाहीये ना? मग हा घ्या पुरावा,

https://youtu.be/YWPJTQJhFAo

आयसीसीने सुध्दा पंतचा मग स्पायडर पंत म्हणुन गौरव केला व त्याचा देसी स्पायड्याच्या वेशातला फोटो जारी केला.
Spider Pant

पैजारबुवा,

ऋशभ पंत सुध्दा या स्पायड्याचा फॅन आहे

ऐकावे (बघावे) ते नवलंच! क्रिकेटशी संबंध तुटुन आता जमाना झाला आहे, त्यामुळे अशा बातम्या हल्ली वाचनात/पहाण्यात येत नाहीत.

आताच "छमछम बरसा पानी" या कलाक्रूतीचा पन्नासाव्यांदी आस्वाद घेतला, हेच गाणे काल पासुन गुणगुणतो आहे, निव्वळ स्वर्गिय अनुभव होता तो.

प्रगती योग्य दिशेने होत असल्याचे द्योतक आहे हे 😀

नागनिका's picture

1 Sep 2022 - 1:41 pm | नागनिका

भारावून गेले मी !

टर्मीनेटर's picture

2 Sep 2022 - 1:28 pm | टर्मीनेटर

😀 😅 😂
धन्यवाद!

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 9:15 am | जेम्स वांड

संजुभाऊ

आम्ही मद्यपान त्यागले होते पण आता असे वाटते तुम्ही लोक आम्हाला परत एकदा तो ओल्ड मोंकचा खंबा जवळ करायला लावणार !!

हर हर, देवा विश्वनाथा काय तो नाद अन् काय तो व्यासंग राजे

आम्ही मद्यपान त्यागले होते पण आता असे वाटते तुम्ही लोक आम्हाला परत एकदा तो ओल्ड मोंकचा खंबा जवळ करायला लावणार !!

असले बिनडोक चित्रपट अधून मधून बघत जा, त्यांच्या नशेपुढे बाकीच्या नशा फिक्या वाटतील 😀

यश राज's picture

6 Sep 2022 - 2:59 pm | यश राज

काय तो लेख.. काय तो स्पायडरमॅन .. काय ते खळखळुन हसवणारे पंचेस.. एकदम ओकेमध्ये आहे सगळे.
धमाल लेख.
आता तुनळीवर बघणे आले.

टर्मीनेटर's picture

6 Sep 2022 - 3:51 pm | टर्मीनेटर

धन्यवाद यश राज 😀

आता तुनळीवर बघणे आले.

जरुर बघा 😂