तृष्णा भयकथा भाग -३

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
4 Aug 2022 - 12:32 pm

तृष्णा भयकथा भाग -३

जुन्या शहरांत संदीपला जो अनुभव आला तो त्याने चित्राला कथन केला नाही. नक्की का ? ह्या प्रश्नाचे उत्तर खरे तर त्याला सुद्धा ठाऊक नव्हते. चित्रा तशी घाबरणारी नव्हती. पण त्या मुलीच्या संदर्भांत आपण तिच्या सोबत चहा वगैरे पिणे तिला नक्की कसे वाटले असते हे त्याला ठाऊक नव्हते. त्याशिवाय अपघात झाला हि गोष्ट सुद्धा त्याला लपवणे आवश्यक वाटल.

तिचा फोन काय पण नाव सुद्धा मी विचारायला विसरलो ह्याची खंत त्याला होती. पण मेघदूत कॅफे मध्ये ती असते त्यामुळे पुन्हा तिथे जाण्याचा योग येणारच होता. संदीपने मफतलाल ला फोन करून तिच्या दुचाकीची चौकशी केली होती. मफतलाल अतिशय कनेक्टेड माणूस असल्याने त्याने संध्याकाळ पर्यंत ती ठीक करून मेघदूत कॅफे मध्ये पोचवली सुद्धा होती. खर्च संदीपने त्याला दुसऱ्या दिवशी देण्याचे वचन दिले.

हल्ली संदीपला संध्याकाळी लवकर झोप यायची. नेटफ्लिक्स वगैरे वर सर्व महत्वाच्या सिरीज पाहून संपल्या होत्या. चित्राने ऍमेझॉन वरून विविध गोष्टी विकत घेण्याचा जो सपाटा लावला होता त्याचा सुद्धा त्याला कंटाळा आला होता. संपूर्ण शहरांत चित्रपट पाहण्यासाठी एकच मल्टिप्लेक्स होते पण ते सुद्धा विशेष झकपक नव्हते. त्यामुळे तिथे सुद्धा त्यांना जावेसे वाटत नव्हते. चित्राला अनेक कला अवगत होत्या. हल्ली बागकाम ची आवड तिला लागली होती. ती जणू काही वनदेवीच होती. विविध प्रकारचा भाजीपाला आणि फुले त्यांच्या बागेत आता होती. काही आठवड्यांत भाजी खायला सुद्धा मिळणार होती. पण संदीपला मात्र दिवसभर घर खायला यायचे.

संदीप मात्र महा आळशी माणूस. तो जाग आली तरी लवकर बिछान्यातून उठत नसे. रात्रीचे ९ वाजले होते आणि संदीप ला गाढ झोप येत होती. चित्रा येऊन त्याच्या कुशीत झोपली. "संदीप, असा काय रे इतका थकलेला का वाटतोय ? आणि आज जास्त बोलत नाहीस ?"

"चित्रा .. मी काय म्हणतो."

"umm"

"किती दिवस मी असा रिकामटेकडा बसणार ? पैश्याची गरज नसली तरी मनाला काही उद्योग हवा कि नाही? आम्ही कुठे फिरून आलो तर ? अगदी विदेशांत सुद्धा जाऊ शकतो. थायलंड ला गेलो तर ? "

"अरे छान आयडिआ आहे रे. आम्ही ना खरेच जास्त पर्यटन केले पाहिजे. पण संदीप, त्यासाठी ना २५ लाख खूप कमी रक्कम आहे" .

"हो का ? किती लागतील ? "

"म्हणजे तसे आम्ही कमी पैशायंत सुद्धा जाऊ शकतो पण बघ, जास्त पैसे असले तर बिजिनेस क्लास ने जाऊ शकतो. मोठ्या हॉटेलांत राहू शकतो, मोठया रेस्टोरंट मध्ये खाऊ शकतो. अगदी राजेशाही थाटांत" .

"हो आणि हे पैसे येणार कुठून ?" त्याने विचारले.

चित्राने तोंड वेडावत त्याच्या तोंडावर प्रेमाने एक चापट लावली.

"अजिबात नाही ! नाही म्हणजे नाही. अग पुन्हा ते तांत्रिक उपाय नकोत. २५ लाख खूप आहेत. कोंकणात मालवण मध्ये एक मावशी राहते, तिथे जाऊन आम्ही थायलंड चा मजा घेऊया पण पुन्हा तिथे त्या स्मशानात नाही." . स्मशानाच्या विचारानेच त्याला कंप सुटला होता.

"अरे काय फट्टू आहेस रे तू. लोक खून करतात अश्या शॉर्टकर्ट साठी."

"हो का ? मग तू का नाही जात स्मशानात ? " त्याने विचारले.

"अरे गेले असते पण हि सिद्धी फक्त पुरुषांना साध्य असते" तिने सांगितले.

"चित्रा, खरेच सांग मला. असे शॉर्ट कट्स असते तर सर्वानीच नाही का वापरले असते ? उत्क्रांतच्या ओघांत असले मार्ग लोकांनी शोधून जास्त वापरले नसते का ? कशाला बिजिनेस वगैरे पाहिजे ? शवविच्छेददं करावे आणि तांत्रिक मुद्रिका वापराव्यात" . त्याने तिला गंभीर प्रश्न केला.

"माझा ह्या विषयवार अभ्यास आहे संदीप. तुला काय वाटते आम्हालाच हि सिद्धी आहे ? अरे सर्व जगांत असंख्य मंतरलेल्या गोष्टी आहेत आणि अनेक लोक त्याचा वापर सुद्धा करतात. अचानक कुणी न ओळखणारा माणूस राजकारणात बाजी मारून जातो. काल पर्यंत तुच्छ उद्योगपती असलेला माणूस अचानक दोन वर्षांत सर्वांत श्रीमंत माणूस बनतो. कुणी फक्त सट्टा खेळून श्रीमंत बनतो इत्यादी. आणि सिद्धी काय फक्त पैश्यांच्याच असतात असे नाही. चिरतारुण्य, आरोग्य, सत्ता, स्त्रीसुख, घाणेरड्या वासना, असंख्य सिद्धी असतात."

"पण एक सांग, विज्ञानाच्या चौकटीत ह्या गोष्टी कश्या बसतात ? "

"बसतात. गुरुत्वाकर्षण चा नियम ठाऊक नसला तरी चाकाचा शोध माणसाने लावून गुरुत्वाकर्षणाचा फायदा करून घेतला होता कि नाही ? त्याच प्रमाणे अतिशय लहान आणि क्षुद्र वाटणारी मुद्रिका विश्वाच्या पसाऱ्यातील काही मोठ्या गोष्टींची चावी असू शकते."

"चित्रा तू कधी कधी गूढ गोष्टी बोलतेस. तू गुप्त रूपाने एखादी डायन वगैरे नाहीस ना ?"

चित्रा गोड हसली. असले हास्य कि त्याच्यावर संदीप ने जीव सुद्धा ओवाळून टाकला असता.

"डायन ? अरे अप्सरा, कुणी शापित यक्षिणी असे तर म्हणायचेस. आणि मी डायन असले तरी तुझी मज्जा आहे. डायन म्हणे वाट्टेल ते रूप धारण करू शकते ? तुला कुणाचे रूप पाहिजे आहे ? तिने संदीपला घाट पकडत विचारले.

"तूच. तूच सर्वांत सुंदर आहेस" त्याने आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवत म्हटले.

"मग? आणखीन एकदा प्रयोग करून पाहू ? " तिने विचारले.

"तू ना, माझा जीव घेऊनच थांबेल." त्याने थोड्या खोट्या रागानेच म्हटले.

"अरे असे नको ना बोलूस. माझे तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. पैसे असोत नसोत फरक पडत नाही" तिने प्रणयक्रीडा चालू ठेवत त्याच्या तोंडावर बोट ठेवले.

..
सकाळ झाली तेंव्हा चित्रा आधी उठली होती. संदीपचे अंग प्रचंड दुखत होते. तो बाहेर आला तेंव्हा तिने तात्काळ त्याच्या पुढे गरम गरम चहाचा कप ठेवला.

"काय रे बरे वाटत नाही का ? " तिने विचारले.

"प्रचंड थकवा वाटतो. अंग दुखत आहे." त्याने म्हटले.

"चहा पी मग बरे वाटेल. पाहिजे तर डॉक्टर कडे जाऊ."

चहा पिल्यावर खरेच त्याला थोडे बरे वाटले.

चित्रा बाहेर गार्डन मध्ये आपल्या झाडांची मशागत करत होती तेंव्हा संदीपने हळूच लॅपटॉप काढला. आणि त्याने अगडंमवाडी शहराच्या इतिहासाबद्दल शोध सुरू केला. तसे काहीच विशेष त्या शहरांत नव्हते. सर्व काही अतिशय सामान्य. खाणकाम, त्या कंपन्यांची माहिती. तथाकथित जुने शहर ह्याची माहिती सुद्धा फारच थोडी होती. काही फोटोज होते पण ते सुद्धा त्या शहराच्या सौंदर्याला न्याय देत नव्हते. मुबईतील यिप्पी मंडळी नाहीतरी दर ठवड्याला सर्वत्र धुमशान घालायला जातात पण इथे कशी बरी जास्त मंडळी नाही ? गुगल मॅप वरून सुद्धा शहर अगदी नगण्य वाटत होते. विश्वकोश, विकिपीडिया कुठेही त्याला ह्या शहराबद्दल लक्षवेधक माहिती मिळाली नाही. महाराष्ट्राच्या भूगोल, अर्थशास्त्रांत सावंतवाडी चे स्थान त्यापेक्षाही नगण्य स्थान ह्या शहराचे होते.

काही व्यक्ती अश्या असतात ज्यांना मिळताच एक जिवाभावाचा संबंध निर्माण होतो. एक विश्वास आपसूक निर्माण होतो. काही वास्तू अश्या असतात जिथे आपण आपसूक अत्यंत निश्चिन्त होतो आणि काही संगीत असे असते जे ऐकतांच आपण एका दुसऱ्या विश्वांत जातो. रोजमर्रा च्या चिंता नाहीश्या होतात. त्याच प्रकारची एक अगम्य अशी ओढ ह्या शहरांत संदीपला वाटत होती.

आता हे गूढ उकलायचे असेल तर चित्राच्या काकांची डायरी हा एकच स्रोत राहिला होता पण आपण ती वाचतोय म्हटल्यावर चित्रा आपली खिल्ली उडवेल अशी भीती सुद्धा संदीपला वाटली. चित्राने ती डायरी कुठे ठेवली असेल बरे ? ती ती डायरी नेहमी लपवून ठेवायची.

पण शहराला जाणून घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शहरांतील लोकांची संवाद साधणे. आता त्याची ओळख सुद्धा झाली होती. कदाचित शेजारी पाजारी, इतर सामान्य लोकांशी ओळख करून घेतली तर शहर आणि त्याचा इतिहास जास्त समजेल असे त्याला वाटले.

"चित्रा .. मी मार्केट मध्ये फेरफटका मारून येतो, काही हवे असेल तर लिस्ट मेसेज कर मी घेऊन येतो" त्याने चित्राला ओरडून सांगितले आणि तो बाहेर गाडीत जाऊन बसला.

खरे तर त्याच्या मनातील एक कोपरा जुन्या शहराकडे त्या मुलीच्या शोधांत जाऊ इच्छित होता. पण त्याने मुद्दाम गाडी विरुद्ध दिशेने नेली. जॅक्सन कॉलोनी रोड सरोवराच्या कडेने जात पुढे शहराच्या गरीब लोकवस्तीत कुठे तरी लुप्त होत होता. तिथेच सरोवराच्या बाजूला स्मशानभूमी होती. संदीप त्याला पास होत असतानाच त्याला बाजूला गर्दी दिसली स्मशानात बरीच गर्दी होती म्हणजे कदाचित कुणीतरी लोकप्रिय व्यक्ती वारली असेल. त्याने आपली गाडी तिथेच पार्क केली. आणि आंत जाणाऱ्या लोकांच्या घोळक्यांत तो मिक्स झाला. आता कोण वारले असे विचारले तर लोक आपल्याला विचित्र पणे बघतील म्हणून त्याने तसा प्रश्न कुणालाच केला नाही. जणू काही आपण सुद्धा सांत्वनेसाठी आलो आहोत असा अविर्भाव त्याने तोंडावर ठेवला. किमान ५०-६० लोक तरी गोळा झाले होते. जिथे प्रत्यक्षांत चिता होती त्याचा जवळ तो गेला नाही. दूरच उभा राहिला. त्याच्या जवळच एक गृहस्थ सुद्धा उभे होते आणि दुरून सर्व काही पाहत होते.

"नमस्कार" संदीपने त्यांना हात जोडून नमस्कार केला. त्यांनी सुद्धा नमस्कार केला. आणि थोडा वेळ कपाळाला आठ्या घालून त्यांनी संदीप चा चेहेरा बारकाईने पहिला. "मी तुम्हाला कुठे तरी पहिले आहे. तुम्ही कोण म्हणावे ? "

"मग नक्कीच मफतलाल च्या हॉटेलमध्ये पहिले असेल. कारण अजून शहरांत येऊन फक्त ३ महिने झाले आहेत. मफतलाल सोडून कुठेच गेलो नाही. " संदीपने म्हटले.

"कंपनीचे काम करता ? मुक्काम कुठे ? "

"मी जॅक्सन कॉलोनीत राहतो." संदीप ने म्हटले.

ते ऐकल्यावर मात्र त्या गृहस्थाचा एकूण अविर्भाव बदलला. "कुठल्या घरांत?"

"हेच आपले घर नंबर २७" पिवळ्या कंपाऊंड चे." संदीप ने थोड्या अनिच्छेनेच सांगितले.

"अरे वा , म्हणजे शेवटी घरांत कुणी तरी आले म्हणायचे. नाहीतर ते घर इतका काळ बंद होते कि आम्हाला वाटायचे कुणीतरी सोडून दिले आहे. " मग आवंढा गिळून त्यांनीच आपली ओळख करून दिली.

"मी सुधाकर, कंत्राटदार. खाणीत माझे १४ ट्रक्स आणि ६ हेवी मशिनरी आहेत. इथेच जवळपास राहतो."

"पण तुम्हाला कुठे तरी मी पहिले आहे नक्की". त्यांनी पुन्हा संदीपकडे बारकाईने पहिले.

बराच वेळ संदीप आणि सुधाकर ह्यांनी बातचीत केली. संदीप कुणासोबत राहतो. कधी आला, काय करतो अश्या विविध चौकश्या त्यांनी केल्या. गृहस्थ थोडा चोंबडा वाटला तरी त्याने सुद्धा संदीप ला बऱ्यापैकी माहिती दिली. स्मशानात अंत्यसंस्कार शाळेतील श्रीवास्तव सरांचा होता. एका मायनिंग ट्रक चा ताबा जाऊन सरांच्या दुचाकीला त्याने ठोकर दिली आणि त्यांचा मृत्यू झाला. दोघांनीही एकमेकांचे नंबर सुद्धा घेतले .

"बरेच अपघात होतात वाटते नाही ह्या शहरांत ? " संदीपने त्यांना विचारले.

"हो. खाण उद्योग म्हणजे असले चालायचेच. आता पैसे पाहिजेत म्हटल्यावर रिस्क आलीच".

मग हळूच त्यांनी डावा खांदा वाकवत, आपले तोंड संदीपच्या जवळ नेले. "असे म्हणतात कि हि जागाच शापित आहे. खाणीत खणताना काय काय गोष्टी सापडतात म्हणून काय सांगू ? पण आम्हाला काय पैश्यांशी मतलब. ह्या दगडांना विदेशांत चिक्कार भाव."

"असे काय मिळते हो ?" संदीप ने विचारले.

"लहान मुलांची हाडे. स्त्रियांचे केस. तांब्याचे हांडे. आता पहा हा दगडी प्रदेश आहे. फक्त माती असती तर ह्या गोष्टी कुणी कधी पुरल्या होत्या असे समजू शकलो असतो. पण मोठ्या स्लेजहॅमर ने फोडलेल्या दगडांत हाडे कशी येऊ शकतात ? "

"पण आधुनिक तंत्रज्ञानाने शोधू शकतो ना ? " संदीपने प्रश्न केला.

"छया. पाहुणे. ह्या गोष्टी एकदा सरकारी नादात अडकल्या कि कुणी तरी आंदोलन वगैरे करेल आणि खान उद्योग बंद पाडेल. त्यामुळे आम्ही ह्या सर्व गोष्टी गुपचूप एका पेटीत टाकतो आणि आमचे दुसरे कंत्राटदार आहेत त्यांच्या हवाली करतो. जुन्या शहरांत एक म्यूजियम आहे. तिथे ठेवतो. थोडा वेडा वाकडा माणूस आहे पण तो ह्या गोष्टी गायब करतो. "

"आणि हि सर्व रहस्ये तुम्ही मला म्हणजे एका पूर्ण अनोळखी माणसाला सांगता ? मी समाजा पत्रकार असलो तर ? " संदीपने थोड्या मिश्किल पणे म्हटले.

"हाहा . अहो पाहुणे आम्ही आहोत इथली प्यादी. कंपनीची नजर सर्वत्र असते. एकदा आला होता एक अधिकारी चौकशी करायला, पुन्हा त्याचे काय झाले कुणाला ठाऊक सुद्धा नाही. मी तुम्हाला काही रहस्य सांगितले नाही. हे आहेच शहर तसे. कुणाला कशाचेही पडून गेले नाही. तुम्ही पाहिजे तर करा youtube व्हिडीओ वगैरे. मिळवा सबस्क्रियबर्स" सुधाकर ने सुद्धा संदीपला चांगले उत्तर दिले होते.

दूरवर चिता पेटली होती. लाकडे जाळण्याचा आवाज आणि धूर दोन्ही आसमंतात पसरला होता. लोकांची पांगापांग सुरु झाली होती.

संदीप आणि सुधाकर स्मशानाच्या बाहेर चालते झाले. संदीप त्यांना बाय म्हणून गाडीत बसणार इतक्यांत सुधाकर ने जवळ जवळ उडीच मारली.

"आत्ता आठवले. मी तुम्हाला पहिले नव्हते तुमचा फोटो पहिला होता." सुधाकरणे अतिशय उत्साहाने म्हटले. खरे तर संदीपला सुधाकर च्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता. ज्याचा सोशल मीडिया अकाऊंट सुद्धा नाही त्याचा फोटो ह्याला कसा दिसेल ?

"माझा फोटो ? तो बरे कुठे दिसला तुम्हाला ?" संदीपने विचारले.

"कुरियर ऑफिसांत. तुमच्यासाठी पार्सल होते. मी तिकडे गेलो होतो तर काऊंटरवला माझा चांगला दोस्त होता तो म्हणाला ह्याला ओळखता का. ह्याच्यासाठी कुणी पार्सल ठेवून गेलाय. त्यानेच फोटो दाखवला. "

"what ? फोटो लावून कुणी पार्सल पाठवतो का ? माझा पत्ता नव्हता का त्यावर ? हि कसली फुटकळ कुरियर सेवा ? " संदीपने त्राग्यानेच विचारले. मला आणि पार्सल कोण पाठवणार ?

"अहो ती जुन्या शहरांतील कुरियर सेवा आहे, तिथे असलेच कारभार चालतात. तिकडे विचित्र लोक येत असतात. कुणाला फोटोवरून पार्सल येणे ह्यांत मोठी गोष्ट नाही. आपण जरूर जा आणि स्वतः पहा. मला १००% खात्री आहे तुमचेच पार्सल आहे. "

मग पुन्हा सुधाकर संदीपच्या जवळ गेला आणि कुजबुजला.

"काय आहे, ती कुरियर सेवा ना खास पार्सल्स साठी आहे. त्यामुळे काही असेल तर महत्वाचे असेल ह्यांत शंका नाही" असे म्हणून सुधाकर आपल्या वाटेने गेला.

संदीप थोड्या संशयास्पद नजरेने सुधाकरच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहिला. ऊन डोक्यावर आले होते, लोक आपल्या गाडीत बसून AC लावून घरी जाण्याच्या तयारीत होते. श्रीवास्तव गुरुजींच्या इहलोकाची यात्रा संपली होती. पुढची त्यांची यात्रा आता त्यांना एकट्याला करावी लागणार होती तर त्यांच्या मागे कोण आहे त्यांना दररोज त्यांच्या न असण्याची खंत वाटत राहणार होती.

संदीपला आता पुन्हा जुन्या शहराकडे जायचे होते. त्याने चित्राला मेसेज पाठवून थोडा उशीर होणार असे सांगितले. पार्सल बहुतेक करून त्याचे असणार नव्हतेच कारण तो इथे आहे त्याने कुणालाच सांगितले नव्हते त्यामुळे सुधाकर ह्यांची काही तरी मिस्टेक झाली असावी. पण एका निमित्ताने जुने शहर आणि शक्य झाल्यास मेघदूत मध्ये सुद्धा एक भेट दिली जाऊ शकत होती. संदीप ने गाडी ओल्ड सिटी रोड च्या दिशेने घेतली.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

4 Aug 2022 - 12:55 pm | श्वेता२४

उत्सुकता वाढली आहे.

सुखी's picture

4 Aug 2022 - 1:47 pm | सुखी

छान लिहिलंय...

सौंदाळा's picture

4 Aug 2022 - 2:07 pm | सौंदाळा

कसले पार्सल आता? आणि परत तांत्रिक विधी केला का त्यांनी?
पुभाप्र

स्वधर्म's picture

4 Aug 2022 - 7:05 pm | स्वधर्म

कथा छान पुढे सरकत आहे.

धर्मराजमुटके's picture

4 Aug 2022 - 11:21 pm | धर्मराजमुटके

मजा येते आहे वाचायला !

उत्सुकता वाढत आहे साहना तुमचे अशाप्रकारचे भयकथा ,रहस्यकथा असे लेखष प्रथमच वाचत आहे . पूर्वी गावाकडच्या ,तुमच्या शाळेच्या इ० गोष्टी वाचलेल्या स्मरतात ,म्हणून मला वाटले तुम्ही फक्त हलकेफुलके ललित लेखनच करता,छान !! पुभाप्र. पुभा लवकर लवकर टाका व गोष्ट संपवा. शेवटाची उत्सुकता खूपच आहे.

कर्नलतपस्वी's picture

5 Aug 2022 - 3:52 pm | कर्नलतपस्वी

उत्सुकता वाढतीय दररोज एक भाग टाका.

यश राज's picture

5 Aug 2022 - 8:45 pm | यश राज

चांगली चाललीये कथा. पु.भा.प्र
प्रदिर्घ काळानंतर मिपावर खिळवुन ठेवणारी भयकथा आली आहे त्यामुळे पुढच्या भागांची उत्सुकता. कृपया पुढचे भाग लवकर टाका.

सुचिता१'s picture

6 Aug 2022 - 3:06 pm | सुचिता१

अती उत्तम!!! कथानक खुप छान खुलवले आहे. पुभाप्र.

बापरे ! काय असेल बरे त्या पार्सलात ? अशी उत्कंठा निर्माण करणारा या भागाचा शेवट लय भारी.