माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर

अनिंद्य's picture
अनिंद्य in जनातलं, मनातलं
14 May 2022 - 8:02 pm

फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.

जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.

हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.

सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :

०१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.

दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.

०२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?

०३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.

०४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.

०५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..

०६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.

७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.

०८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...

०९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.

१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.

११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.

१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !

१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !

मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.

‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.

चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !

'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.

कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.

ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड :-)

आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकांसाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीझ आणि अमूल बत्तर ! ..

समाप्त

* * *

(लेखातील चित्रे जालावरून साभार)

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

15 May 2022 - 2:26 am | कर्नलतपस्वी

एखादा पिसाळलेला फुड ब्लॉगर चावल्यागत धागा लिवलाय.

भन्नाट, चाळीस वर्ष संसार केल्यावर बायको नवर्‍यावर या रेशीपींचा प्रयोग करताना दिसते.
एका प्रसिद्ध वाहिनी वर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने "आले पाक रस" ची रेसीपी सांगीतली होती.म्हणजे आलेपाक आणी ऊसाचा रस.

घेतलेला आढावा व विश्लेषण आवडले.

अनिंद्य's picture

17 May 2022 - 4:22 pm | अनिंद्य

आलेपाक रस ! हेच मी म्हणतो ते दळभद्री फ्यूजन

प्रतिसादाबद्दल आभार.

ते फिरंगी ब्लॉगर राहिलेच की. लिंबू सरबतला जबरदस्त म्हणणारे, आणि बर्फ नको नको करत त्याच रस्त्यावरच्या गाडीतल्या पाण्याचे सरबत पिणारे. एक एक नमुने असतात.

अनिंद्य's picture

18 May 2022 - 12:47 pm | अनिंद्य

फिरंग्यांना एकवेळ माफ करता येईल, ते इथे आपले पाहुणे असतात.

चांदणे संदीप's picture

15 May 2022 - 7:27 am | चांदणे संदीप

लेख आवडलाच.

यूट्यूबवर फूड ब्लॉगर्सची साथ येण्याआधी किंबहुना यूट्यूबच्याही आधी टीव्हीवर एक कार्यक्रम यायचा, हायवे ऑन माय प्लेट. माझा अत्यंत आवडीचा असा तो कार्यक्रम होता. अजूनही सुरू आहे पण आता टीव्हीवर बघणे होत नाही. यूट्यूबवर त्याचे काही जुने एपिसोड्स अधूनमधून पाहत असतो. इथे जुन्या एपिसोडमधला एक पाहता येईल.

अजून, या एक ना धड... परकारच्या फूड ब्लॉगर्सच्या पसाऱ्यात एक गौस बजाज आहे जो अगदी उठून दिसतो. इथे नक्की बघा.

सं - दी - प

अनिंद्य's picture

19 May 2022 - 11:46 am | अनिंद्य

@ सं - दी - प,

आ - भा - र

कॅटेगरी करा आता, रोस्टर्स ची वेगळी, स्वैपाक व्हिडिओ वाल्यांची वेगळी, ज्ञानदर्शन वाले वेगळे, क्राफ्ट वाले वेगळे, फिरस्ते वेगळे. रटाळ न्युजा घोळवून सांगणारे वेगळे. लेखमाला पोटेन्शियल आहे यामध्ये.

अनिंद्य's picture

19 May 2022 - 11:50 am | अनिंद्य

लेखमाला?
नको नको. उगाच डोक्याला ताप. :-)

अगदी मनातले. स्ले पॉइंटने यावर चपखल व्हिडिओ बनवला आहे.

चांदणे संदीप's picture

15 May 2022 - 2:00 pm | चांदणे संदीप

जबरदस्त व्हिडिओ बनवलाय. =))

सं - दी - प

sunil kachure's picture

17 May 2022 - 7:28 am | sunil kachure

मार्मिक टोलेबाजी

चौथा कोनाडा's picture

17 May 2022 - 6:09 pm | चौथा कोनाडा

जबराट ...
😂

तुषार काळभोर's picture

15 May 2022 - 11:55 am | तुषार काळभोर

चहांचा, थाळ्यांचा, मटणांचा, चुलींचा, मिसळींचा, चीजचा, चॅनल्सचा, ब्लॉगर्सचा इतका भडीमार होतोय, की आता शिसारी यायला लागलीय!

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 12:20 pm | सुबोध खरे

कुणीतरी हे लिहायलाच हवं होतं!

चहांचा, थाळ्यांचा, मटणांचा, चुलींचा, मिसळींचा, चीजचा, चॅनल्सचा, ब्लॉगर्सचा इतका भडीमार होतोय, की आता शिसारी यायला लागलीय!

बाडीस

अनिंद्य's picture

17 May 2022 - 1:03 pm | अनिंद्य

.. कुणीतरी हे लिहायलाच हवं होतं!....

मी लिहिलंय की ! :-)

जायका इंडिया का अप्रतिम होता. तसेच मयूर रॉकी च high way on my plate. याचे एपिसोड दर शनिवारी लागायचे याची वाट पहायचो.
नं

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 12:25 pm | सुबोध खरे

रॉकी आणि मयूर दोघांना आता मार्च मध्ये जोधपूरला जिप्सी हॉटेलात भेटण्याचा योग आला होता.

https://www.youtube.com/watch?v=kdp5yt7lg_M

दोघे अगदी दिसतात तसेच आहेत.

पण आताचे त्यांचे शो म्हणजे केवळ बाजारीकरण झालेले आहेत. प्रत्येक शो मध्ये कुठल्या तरी उत्पादनाची जाहिरातच दिसते.

हायवे ऑन माय प्लेट ची सर आता त्यात मुळीच राहिली नाही

अनिंद्य's picture

19 May 2022 - 11:54 am | अनिंद्य

जायका इंडिया का +१

आधीची बात न्यारी होती. मयूर रॉकी आता जे करतात त्याला 'माकडचाळे' म्हणता येईल.

मुक्त विहारि's picture

15 May 2022 - 9:32 pm | मुक्त विहारि

जाता जाता

आता चुलीच्या जागी बंब आला आहे

कालच एका मिसळ महोत्सवात, बंबातली मिसळ, हा प्रकार बघीतला

आता बंबातल्या पाण्याने अंघोळ केली असल्याने, त्या मिसळीच्या वाटेला गेलो नाही...

अनिंद्य's picture

16 May 2022 - 1:14 pm | अनिंद्य

बंबातली मिसळ !!

आता हेच बघायचे राहिले होते :-) ;-) :-)

प्रमोद देर्देकर's picture

15 May 2022 - 10:45 pm | प्रमोद देर्देकर

कय लिवलंय कय लिवलंय.

मी आजच खफवर लिहलंय की अजुन एक प्रकार म्हणजे सगळ्या पदार्थत श्रीखंड, कचोरी, लाडू, लस्सी, आईस्क्रिम सुकमेवा टाकला म्हणजे तो पदार्थ उत्कृष्ट बनला असं म्हणून किंमत ३०० च्या वर नेवून ठेवायला मोकळे.

अनिंद्य's picture

16 May 2022 - 10:58 am | अनिंद्य

+ १

सुकामेवा आणि चीज :-)

सर्व पदार्थांना सोन्याचं करणारा पारस :-)

यश राज's picture

16 May 2022 - 2:50 pm | यश राज

छान आढावा घेतलात.. अक्षरशः बाजार उठवला आहे.

अनिंद्य's picture

16 May 2022 - 3:06 pm | अनिंद्य

ठांकु यश.

'लेख वाचतांना हसू आले का?' असा प्रश्न आहे माझा सर्व वाचकांना. लेखात शेवटी तसे लिहायला हवे होते :-)

श्वेता व्यास's picture

16 May 2022 - 5:11 pm | श्वेता व्यास

छान खुमासदार लिहिले आहे. तंतोतंत! दोन मिनिटे व्हिडीओ बघितला की भाषा सहन न होऊन आपोआप बंद होतो.
आणि ते चीज, बटर पण असंच डोक्यात जातं.

अनिंद्य's picture

16 May 2022 - 5:22 pm | अनिंद्य

'लेख वाचतांना हसू आले का?

श्वेता व्यास's picture

17 May 2022 - 10:28 am | श्वेता व्यास

खळखळून हसू असं नाही म्हणणार, पण पूर्ण लेख वाचताना चेहऱ्यावर "अगदी अगदी" अशा अर्थाने हास्याची लकेर होती. :)

अनिंद्य's picture

17 May 2022 - 11:06 am | अनिंद्य

थँक्स :-)

उन्मेष दिक्षीत's picture

16 May 2022 - 7:21 pm | उन्मेष दिक्षीत

लेख वाचल्याचे चिज झाले ! :)

चीज शेवपुरी , ड्रायफ्रुट्स दहीपुरी खाल्ली आहे का ?

बाकी, स्ले पॉइंट भारी !

अनिंद्य's picture

16 May 2022 - 10:14 pm | अनिंद्य

चिज झाले :-) :-)

हेहे फारसा यांच्या मागे लागत नाही... लेख मस्त झालाय

अनिंद्य's picture

16 May 2022 - 10:16 pm | अनिंद्य

ठांकू !

sunil kachure's picture

16 May 2022 - 10:49 pm | sunil kachure

मस्त लिहले आहे.दर्जाहीन फूड ब्लॉगर वर.
काहीच कष्ट न घेता कोणत्या तरी मोठ्या शहरात रस्तावर अन्न पदार्थ विकणारे ज्यांना स्वतःला ते जे विकतात त्या विषयी शून्य माहिती असते.
देश विशाल आहे .खूप विविधता आहे देशात अन्न पदार्थ बनवायची
कष्ट घेवून प्रतेक राज्याच्या स्थानिक अन्न पदार्थ विषयी डिटेल मध्ये लोकांना दाखवले तर खूप माहिती मिळेल..पण हे पडले कष्टाचे काम ..फूड ब्लॉगर हे असे कष्ट घेणार नाही.

अनिंद्य's picture

17 May 2022 - 12:11 pm | अनिंद्य

प्रतिसादाबद्दल आभार.

sunil kachure's picture

16 May 2022 - 11:04 pm | sunil kachure

हे you tube channel खूप छान काम करत आहे त्यांचे व्हिडिओ मी हमखास बघतो.
देशातील विविध खाद्य संस्कृती ची अगदी योग्य माहिती ते देत असतात....

सुक्या's picture

17 May 2022 - 1:41 am | सुक्या

खर्ं आहे. ह्या फूड ब्लॉगर लोकांनी अगदी वात आणला आहे. कसल्याही फुटकळ / गलीच्छ पदार्थाला अहाहा .. ओहोहो वगेरे बोलत खोटी प्रशंसा करताना बघुन कानात मारावी वाटते.

फूड ब्लॉगर ते एक वात आणतात .. आजकाल फूड खाणारे वात आणता आहेत. सपाटु रमण सारखे महाभाग तर बकासुराला ही लाजवेल अशा भीषण प्रकारे अन्न खात असतो. एक लेख त्यावर पण येउ द्या.

अनिंद्य's picture

23 May 2022 - 1:13 pm | अनिंद्य

होय, बघितलाय तो बकासुर.

एकेक सहीसही निरीक्षणे आहेत, सर्व फूड ब्लॉगर्स डोळ्यांसमोर तरळून गेले. अगदी आमच्या पिंपरीतील काही सामान्य टपऱ्यादेखील यांच्या तावडीतून सुटल्या नाहीत हे आठवले.

प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड

ह्याविषयी अधिक लिहाच. दुआंचा हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार होता.

अनिंद्य's picture

17 May 2022 - 11:11 am | अनिंद्य

खानपान आणि आपल्या देशातील खाद्य-विविधता हे माझ्या आवडीचे विषय आहेत, त्यामुळे या विषयावर पुढेही लिहिणे होईलच.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे प्रचेतस.

तुषार काळभोर's picture

17 May 2022 - 7:47 am | तुषार काळभोर

एपिक चॅनलवर लॉस्ट रेसिपीज होतं (आता पुनःप्रक्षेपण आहे).
ती मालिका चांगली होती.
त्यावरच राजा, रसोई और अन्य कहानिया ही सुद्धा एक चांगली मालिका होती.
फॉक्स लाईफ वर Maeve O'Meara हिचा फूड सफारी प्रोग्राम सुद्धा मदत आहे. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या, तिथे रेस्टॉरंट चालवणाऱ्या जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशातील, संस्कृतीमधील पाककृती अगदी पाहुण्यांसोबत जिन्नस खरेदी करण्यापासून दाखवल्या जातात.

८०% पर्यटन माहिती अधिक वीस टक्के स्थानिक खाणे असे ब्लॉग पाहायचे. तिकडे गेलोच तर काय वेगळे पदार्थ खायला मिळतील एवढेच हवे असते. मोठ्या हॉटेलमध्ये कधीच जायचे नसते. गंडवतात.

अनिंद्य's picture

17 May 2022 - 12:09 pm | अनिंद्य

पण फूड ब्लॉग बघायचेच कशाला?...

नाही बघितले तर त्यांना शिव्या कशा घालता येतील ? :-)

कंजूस's picture

17 May 2022 - 1:09 pm | कंजूस

पण तो रेसिपी बरोबर श्रीलंका दाखवली असती तर बरं झालं असतं.

sunil kachure's picture

17 May 2022 - 1:21 pm | sunil kachure

12 कोटी फूड ब्लॉगर भारतात आहेत असा उल्लेख आहे म्हणजे हे 12 कोटी ब्लॉगर ला लोक पसंत करत आहेत.
जशी मागणी तसा पुरवठा.
चव म्हणजे काय हेच भारतीय लोकांस माहीत नाही.किंवा माहीत असेल तरी परदेशी,मॉडर्न आहे ह्यांची कुणकुण लागली तर शेणाच्या शेवया बनवल्या आणि हे मॉडर्न फूड आहे असे caption दिले तर त्या वर तुटून पडतील.
ही भारतीय लोकांची वृत्ती आहे.
चिकन किंवा मटण ,किंवा बटाटा, किंवा कोणती ही भाजी ह्या मध्ये इतके मसाले,विविध बाकी गोष्टी इतक्या टाकल्या जातात की मूळ चिकन किंवा बटाटा किंवा बाकी भाज्यांची चव पूर्ण निघून जाते
.
मला ह्या गोष्टींचा खूप तिटकारा आहे..चिकन बनवताना फक्त कांदा , लसूण,आले ,मीठ मिरची ह्या पलीकडे काहीच नको.
असा माझा हट्ट असतो
आणि तेव्हाच खऱ्या चिकन ची चव येते.

श्वेता२४'s picture

17 May 2022 - 2:07 pm | श्वेता२४

मी देखील व्हीसा टू एक्सप्लोअर नावाचे यूट्यूब चॅनेल नियमित बघते. श्री हरीष बाली एकेक राज्य प्रवास करतात व तीथले स्थानिक व त्यातही पारंपारीक पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. त्यांचे बोलणे व वर्णन करण्याची पद्धत अतीशय नैसर्गिक आहे. कोणताही पदार्थ वर्णन करताना काहीतरी अतिशयोक्ती करत आहेत असे अजिबात वाटत नाही. त्यामानाने मराठी फूड ब्लॉगर्स बालीश वाटतात. त्यांचे बोलणे अतीशय नाटकी असते. मूळात त्यांची भाषाच समृद्ध नसते त्यामुळे पदार्थांचे वर्णन करताना त्यांना वैविध्य जपता येत नाही. शिवाय मध्ये मध्ये इंग्रजी शब्द तर चीड आणतात. जसे की..... ''हे शिरवाळे ऑस्सम लागतायत" असं ऐकलं की तात्काळ मोबाईलमध्ये घूसून तो शिरवाळ्याचा वाडगा त्या ब्लॉगरच्या डोक्यावर पालथा करायची इच्छा होते मला.

अनिंद्य's picture

19 May 2022 - 12:01 pm | अनिंद्य

.....शिरवाळ्याचा वाडगा त्या ब्लॉगरच्या डोक्यावर पालथा....

हिंसक आहेत तुम्ही :-)

बाय द वे, 'वाडगा' शब्द अनेक वर्षात वाचला. इंग्रजीतील महारथी शेफ आणि फूड ब्लॉगर्स BOWL चा उच्चार 'बाउल' असा करतात तो 'बोल' असा हवा. चालायचेच.

श्वेता२४'s picture

19 May 2022 - 2:01 pm | श्वेता२४

खरंच या व्लॉगर्सनी (याकरीता मराठी भाषेतील प्रतिशब्द कोणता आहे?) ऊत आणलाय नुसता. तुमच्या लेखातील शब्दन शब्द पटला. लेख खुसखुशीत झालाय हे.वे.सां.न.ल.

sunil kachure's picture

17 May 2022 - 3:01 pm | sunil kachure

भारतात 28 घटक राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आहेत .विविध राज्यांची खाद्य संस्कृती खूप वेगळी आहे .राज्यात पण विविध भागात अनेक विविधता आहे..
फूड ब्लॉगर मूर्ख लोकांना हे माहीत नसावे..
Visa 2explorer मुळे देशातील सर्व पारंपरिक खाद्य पदार्थांची ओळख झाली.
अप्रतिम,अप्रतिम हाच शब्द त्या साठी वापरला जाईल..चीझ,बटर हे घटक भारतीय पारंपरिक जेवणात बिलकुल समाविष्ट नसतात.. चीझ ,बटर हे युरोपियन fad आहे.आपण त्यांचे गुलाम..बाकी चीन,जपान, इंडनिसिया,आणि बाकी सर्व पूर्वेचे देश त्यांची वेगळी विशिष्ट खाद्य संस्कृती आहे . चीज आणि बटर हे बकवास atom ते पण मोजकेच वापरतात

आपल्या देशाचे खाद्य-वैविध्य अद्भुत आहे, प्रचंड आहे - वादच नाही.

कुमार१'s picture

17 May 2022 - 4:28 pm | कुमार१

छान लेख

अनिंद्य's picture

19 May 2022 - 12:04 pm | अनिंद्य

आभार.

चौथा कोनाडा's picture

17 May 2022 - 6:01 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा ...
😄
भन्नाट लिहिलंय ... जबरी निरिक्षण शक्ती, सही डॉयलॉग लिहिलेत.
चांगलंच सोलून काढलंय ....

चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !

मजा आली वाचायला. खुप दिवसांनी असा फर्मास खमंग लेख वाचला !
मिपावर आल्याचं असं अधून मधून सार्थक होत असतं !
💖

+१, अनिंद्य साहेब !

कुठे दिला नसलात तर, कोणत्यातरी दैनिकाच्या रविवार पुरवणीला छापायला द्या !

मनमोकळे प्रतिसाद इथे मिळतात, ते वृत्तपत्रात कुठून मिळणार ? इथेच लिहिलेलं बराय :-)

तुमच्या पुढच्या कथावाचनासाठी ह्या लेखाचा विचार करा नक्की.

क.लो.अ.

वामन देशमुख's picture

17 May 2022 - 6:28 pm | वामन देशमुख

मस्त लिहिलंय, अनिंद्य.

वाहनांचे रिव्यू लिहिणाऱ्यांबद्धल देखील येऊ द्या.

अनिंद्य's picture

19 May 2022 - 12:09 pm | अनिंद्य

वाहनांचे रिव्यू ?

ते मी बघत नाही. मोबाईल फोन आणि अन्य उपकरणाचे वाचतो कधी कधी, पण मराठीत नाही कारण ते सरळ सरळ धेडगुजरी भाषांतर असते, अत्यंत वाईट दर्जाचे :-)

Nitin Palkar's picture

17 May 2022 - 7:53 pm | Nitin Palkar

वाचायला मजा आली.

अनिंद्य's picture

18 May 2022 - 11:05 am | अनिंद्य

थँक्यू

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 May 2022 - 9:24 am | ज्ञानोबाचे पैजार

याच कारणाने या मंडळींच्या फारसे वाट्याला जात नाही.

असेच डोक्यात जातात ते म्हणजे याच विषयांवर येणारे व्हॉटसपिय लेख. तेही असेच शब्दबंबाळ आणि अतिशयोक्त असतात.

मटन, चिकण, मेंदू वडा, हायजिन का पूरा ध्यान, मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त, बटर कौन सा यूज करते हो ? लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय या टिपलेल्या बारकाव्यांनी खुमासदार झाला आहे लेख.

"अरे वज्रमूर्खांनो" असे फुड ब्लॉगर्सचे चपखल वर्णन एका शब्दात करण्यासाठी तर २१ तोफांची सलामीच दिली पाहिजे.

जाता जाता :- खाण्याच्याच संदर्भात पण तरीही हटके व्यवसाय करणार्‍या सायली समेळ या मिनिएचर फुड आर्टिस्टची मुलाखत जरुर बघा. फारच नेत्रसुखद आहे तिचे काम.

लिंकः- https://youtu.be/Ql5-jblmKIk

पैजारबुवा,

अनिंद्य's picture

18 May 2022 - 11:01 am | अनिंद्य

बुवा, आभारी आहे.

'वज्रमूर्ख' - तोच चपखल शब्द आहे, इनका कुछ नहीं हो सकता :-)

Sayali is an artist !

प्रतिसादांत फूड ब्लॉगर्सचे उल्लेख आले आहेत. मी वेळोवेळी बघतो, काही मला आवडतात, काही नाही. लेख फक्त वात आणणाऱ्यांबद्दल होता :-)

कोणतेही चॅनेल अनेक महिने-वर्षे चालवायचे तर 'कन्टेन्ट' हवे, चांगल्या प्रतीचे. त्याची वानवा आहे. भाषा आणि रिसर्च यावर मेहनत घ्यावी लागते, त्याची तयारी कमी जणांकडे असते. जे चांगले ब्लॉगर्स आहेत त्यांनाही सर्व करून झाले आता 'नवीन' काय असे प्रश्न असावेत, त्यामुळे तोचतोचपणा येत असावा.

चित्रगुप्त's picture

21 Jan 2023 - 5:01 pm | चित्रगुप्त

'त्या' इडियोमुळं हा लेख वाचनात आला. गजब चीज है यार ये भी.

मस्तच 👍
हा लेख वाचनातून निसटला होता...

अनिंद्य's picture

25 Jan 2023 - 1:14 pm | अनिंद्य

@ चित्रगुप्त
@ टर्मीनेटर

आभार, शुक्रिया, थँकयू