श्री गणेश लेखमाला २०२३

1

रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
1 May 2022 - 3:41 pm

रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा

काहींना पर्वत आवडतात, तर काहींना नदीकिनारा, काहींना फेसाळणार्या अथांग सागराचे प्रेम असते तर विलक्षण भव्य मानवनिर्मित गोष्टींचे. मला मात्र लहानपणापासून वाळवंट खूपच आवडत आले आहे. आणि ते सुद्धा सौदी अरेबियन किंवा आपल्या राजस्थानी पद्धतीचे वाळूचे नाही तर कोलोरॅडो किंवा मोहावे वाळवंटाचे प्रेम. डोंगर, नदी, समुद्र ह्यांत सजीवता असते, एक गतिशीलता असते. इथे जीव आहे, इथे काळ ह्या प्रकाराला महत्व आहे. समुद्राची प्रत्येक लाट आपल्यासोबत काळ कसा निघून जात आहे ह्याची जाणीव घेऊन येते. पण वाळवंटाचे तसे नाही. इथे काळ जणू थांबलेला असतो. ह्यांत एक गूढ आहे. जीवन बहुतेक करून नसतेच आणि असेलच एखादे झाड तरी ते विरक्त वाटते. बहुतेक लोकांना म्हणूनच वाळवंट आवडत नाही. पण मला तेच प्रचंड आवडते. म्हणूनच रांगो हा चित्रपट मला भयंकर आवडला.

रांगो हा नेवाडा मधील वाळवंटावर आधारित चित्रपट आहे. ह्यांत वाळवंट आहे म्हणूनच मला तो आवडला का ? नाही. फक्त त्यासाठी नाही. नेवाडा मधील ह्या मोठ्या वाळवंटातून भरधाव वेगाने एक गाडी जाते. गाडींत एक टॅंक आहे आणि त्यांत आहे कुणाचा तरी पाळलेला सरडा. हा ह्या कथेचा नायक. चुकून हा सरडा गाडीतून हवेंत फेकला जातो आणि कसा बसा त्या शुष्क वाळवंटात फेकला जातो.

कथेच्या ओघांत आपला हा नायक रांगो हे नाव धारण करतो. हे सुद्धा प्रतीकात्मक आहे कारण त्या पालतू सरड्याला आपले असे नाव नव्हतेच. खरे तर त्याला आपली अशी ओळख नव्हतीच. आणि कदाचित म्हणूनच सरडा हा आपला नायक आहे कारण बाहेरील परिस्थितीनुसार आपला रंग बदलणारा हा प्राणी त्याची आपली खरी ओळख काय ? हीच चित्रपटाची मुख्य कथा आहे.

तर आपला नायक चालत चालत डर्ट नावाच्या एका छोट्याश्या वेस्टर्न गावांत पोचतो. जुन्या स्पॅघेटी चित्रपटांची आठवण करून देणारे हे छोटेसे शहर इथे अनेक प्रकारचे प्राणी असतात. तर इथल्या सलून मध्ये जाऊन हा सरडा बढाया मारतो आणि बोलण्याच्या ओघांत रांगो हे नाव धारण करतो. वरून विचित्र वाटणारे हे शहर आणखीन गूढ होत जाते. ह्या शहरांत पाण्याची समस्या आहे. एक जुनाट कासव इथला मेयर आहे तर खलनायक आहे एक मोठा रेटल स्नेक. आपल्या बढाईखोर नायकावर अचानक ह्या शहराचा शेरीफ बनण्याची जबाबदारी येऊन पडते.

कथा तशी नेहमीच्या थाटाची वाटली तरी तशी नाही. पहिली गोष्ट ठळक पणे लक्षात येते ती म्हणजे संगीत. ह्यांत अचानक घुबडणाचा एक थवा येऊन मारियाची थाटाची मस्त गाणी म्हणतो. हि गाणी थोडी "नरेटर" प्रकारची आहेत.

प्रत्येक प्राणी हा इतर चित्रपटाप्रमाणे "क्युट" नाही तर उलट प्रत्येक प्राणी हा काही प्रमाणात अपंग आहे. आपल्या नायकाचा एक डोळा मोठा तर मान वाकडी आहे. ह्याला स्वतःची ओळख नाही तर तो आपली ओळख बनवतो, खोटी खोटी. त्यांत तो एक पराक्रमी हिरो आहे. पण जेंव्हा तो रेटल स्नेक पुढे पोचतो, तेंव्हा त्याचे पितळ उघडे पडते. साप हा इथे मृत्यूचे प्रतीक आहे. अचानक रांगो आपण हिरो नसून एक घाबरट सरडा आहे हे मान्य करतो आणि चालत वाळवंटातून जातो.

इथे चित्रपट थोडा डेव्हिड लिंच मार्गाने म्हणजे "surreal" होतो. रांगो आपल्याच विचारांत वाळवंटातून हायवे पार करतो. भरधाव वेगाने जाणार्या रस्त्याला पार करणे म्हणजे एका अर्थाने रंगो ने मृत्यूवर मात केली आहे असे दाखवले जाते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याची भेट "spirit ऑफ the वेस्ट" म्हणजे क्लिंट ईस्टवूड शी होते. वेस्टर्न चित्रपटांचा हा महानायक रांगो ला सल्ला देतो. "कुठलाच माणूस आपल्या स्वतःच्या कथेतून पळून जाऊ शकत नाही. लोकांना काय वाटते किंवा आपल्याला लोकांना काय भासवायचे आहे हे महत्व नाही. जे करण्याची गरज आहे ते आपण करावे, लोकांसाठी, स्वतः साठी नव्हे." ह्या भेटीनंतर रांगो चा "अहं" नष्ट होतो.

पुढे काय होते ते मी सांगणार नाही.

ह्या चित्रपटाची दुसरी महत्वाची जमेची बाजू म्हणजे जबरदस्त ऍक्शन. इतकी चांगली ऍक्शन मी कुठल्याच ऍनिमेटेड चित्रपटांत पहिली नाही. आणि हे प्राणी असल्याने तर ती आणखीन मजेशीर होते. एके ठिकाणी आपले गावकरी चक्क डुकराने ओढलेल्या गाडीवरुन भरधाव वेगाने गोळीबार करत जातात आणि त्यांच्यावर हवेतून वटवाघुळांवर बसलेले मोल (घूस) हवाई हल्ला करतात. ह्यांत मला एवेन्जर्स, मॅड मॅक्स, वंडर वूमन ह्या सर्व चित्रपटांची आठवण आली.

एकूणच मुद्धाम पाहावा असा हा चित्रपट आहे.

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

1 May 2022 - 5:12 pm | विजुभाऊ

पहायलाच हवा.....

मनिष's picture

1 May 2022 - 5:36 pm | मनिष

कुठे बघता येईल?

चलत मुसाफिर's picture

1 May 2022 - 9:21 pm | चलत मुसाफिर

अमेझॉन प्राईमवर आहे

मी हा सिनेमा थिएटर मध्ये बघितला आणि येताना CD विकत घेऊन घरी परतलो. अर्थात मला प्रतीत झालेला अर्थ आणि आपण दिलेला अर्थ थोडे निरनिराळे आहेत. CD मध्ये जास्तीची म्हणून जी माहिती दिली आहे त्यात एक तरुण प्राणीशास्त्रज्ञाने दिलेली वाळवंटातील जीव जंतूंची माहिती बघणीय आहे.
जाता जाता अवांतर रॅंगो इतकाच "कोको" ही सरस आहे. किंवा त्यांच्यात डावे उजवे करणे कठीण आहे. जमलंं तर त्याचेही परीक्षण लिहा. ही विनंती.

कोको बघितलाय. मस्त सिनेमा आहे.

सोबत आणखी आवडते एनिमेटेड सिनेमे-
श्रेक पहिला
स्पिरिटेड अवे, ग्रेव्ह ऑफ फायरफ्लायज- जपानी सिनेमे
युअर नेम- जपानी, पण नव्यामधला.
रामायण- लिजंड ऑफ प्रिन्स राम

निनाद's picture

3 May 2022 - 10:34 am | निनाद

खुपच छान आहे स्पिरिटेड अवे!
हॉव्ल्स मुव्हिंग कॅसल पण छान आहे.

जे करण्याची गरज आहे ते आपण करावे, लोकांसाठी, स्वतः साठी नव्हे.">>>
अस आहे का ?

हा सल्ला स्पिरिट ऑफ द वेस्ट रंगो ला देतो. (मी नक्की डायलॉग भाषांतरित नाही केले, जसे आठवले तसे लिहिले.)

चलत मुसाफिर's picture

1 May 2022 - 9:18 pm | चलत मुसाफिर

जबरदस्त सिनेमा आहे हा. कथा उघड होऊ नये म्हणून तुम्ही संक्षिप्त लिहिलं आहे (ते योग्यच). नाहीतर एकेका फ्रेमवर तपशीलवार लिहिता येईल. वेस्टर्न जॉनरचा भन्नाट उपयोग केला आहे. एका पातळीवर प्रहसन, एका पातळीवर ब्लॕक कॉमेडी, तआणि त्याच वेळी एका पातळीवर अत्यंत गंभीर असा हा चित्रपट लीलया पुढे सरकतो.

परीक्षण आवडले. सिनेमा बघावा वाटतो आहे.

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

2 May 2022 - 10:42 am | योगेश लक्ष्मण बोरोले

माझ्या मुलाला व मलापण मराठीत हा जामच आवडला. मस्त रांगडे शब्द वापरलेत.

बरोबर. रसभंग केल्याशिवाय चित्रपटावर सविस्तर लिहणे आणि त्याला योग्य न्याय देणे अजिबात शक्य नाही. बहुतेक वेस्टर्न चित्रपट हे redemption किंवा revenge ह्या भावनेवर आधारित असतात. वेस्टर्न प्रदेश सध्या सुबत्ते साठी ओळखला जात असला तरी हे चित्रपट ज्या काळावर आधारित आहेत त्यांत गरिबी, टंचाई पण त्या सर्वावर मत करण्याची विलक्षण मानवी जिद्ध ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या. कायदा आणि सुव्यवस्था हि दूरवरून फेडरल सरकारची नव्हती तर अत्यंत लोकल प्रकारची होती त्यामुळे राजकारण सुद्धा तसे सोपे साधारण होते. निव्वळ जगण्याची धडपड होती, स्वप्ने छोटी होती. बहुतेक लोक हे दूरवरून "सेकंड स्टार्ट" म्हणून ह्या प्रदेशांत यायचे. रंगो चित्रपटांत ह्या सर्व गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत.

डॉक्टर एक ससा आहे पण त्याला एक कान नाही. कोंबड्याला एक तंगडी नाही. सर्वांत मोठा बंदूकवाला सर्प आहे पण सर्प बंदूक पकडणार कशी ? तर त्याच्या शेपटीलाच बंदूक दाखवले आहे. एके ठिकाणी घुबडाला ठोसा मारला जातो पण घुबड आपले डोके १८० फिरवून ठोसा चुकवते.

प्रसाद_१९८२'s picture

3 May 2022 - 12:52 pm | प्रसाद_१९८२

एके ठिकाणी घुबडाला ठोसा मारला जातो पण घुबड आपले डोके १८० फिरवून ठोसा चुकवते.

--
डोके १८० अंशात फिरवून, घुबड ठोसा कसा काय चुकवु शकेल?
ठोसा डोक्याच्या समोर नाही तरी डोक्याच्या पाठीमागे तरी बसेलच.

असा मी असामी's picture

5 May 2022 - 4:50 pm | असा मी असामी

३६० नाही १८० आहे

असा मी असामी's picture

5 May 2022 - 4:51 pm | असा मी असामी

आय माय स्वारी बरे का