ऐसे ऐकिले आकाशी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 Dec 2021 - 11:06 pm

(१) ग्रहकक्षांच्या कातीव रेषा
वितान अवकाशाचे व्यापून-
अचूकतेची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या,"हे अष्टग्रहांनो,
फिराल तुम्ही अथकपणाने
विश्वांताचा क्षण आला तरी
अमुच्या आभासी पण तरिही
अभेद्य ऐशा बेड्या घालून?"

(२) पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला
म्हटले बिलगून जललहरीतून,
"झगमगणारे लोलक दाहक
त्वचेवरून देशील का काढून?
मावळतीवर जेव्हा तारे-
भल्या पहाटे फिक्कट होतील-
तेव्हा त्यांना तेज त्यातले
थोडे थोडे देईन वाटून"

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

11 Dec 2021 - 11:50 pm | चित्रगुप्त

निखळ काव्यानंद. अप्रतिम प्रतिमा. आफाट प्रतिभा. आमचा मानाचा मुजरा.

प्रसाद गोडबोले's picture

11 Dec 2021 - 11:58 pm | प्रसाद गोडबोले

=))))

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

12 Dec 2021 - 1:09 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान.

श्रीगणेशा's picture

12 Dec 2021 - 1:20 am | श्रीगणेशा

अप्रतिम शब्दरचना!
एखादं साधं दृश्य किंवा विचार एवढ्या सुंदर शब्दात व्यक्त करता येतं यावर विश्वास बसत नाही.

प्राची अश्विनी's picture

12 Dec 2021 - 7:04 am | प्राची अश्विनी

अप्रतिम! दिन बन गया!

पिठूर केशरी चंद्रधगीने
स्फटिकतळ्यातील मासोळीला

वाह!!

तुषार काळभोर's picture

12 Dec 2021 - 8:48 am | तुषार काळभोर

अप्रतिम!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Dec 2021 - 10:04 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त...
आवडली

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

13 Dec 2021 - 1:48 pm | प्रसाद गोडबोले

काय हे पैजार बुवा ?

ही कविता(?) म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या महान लोकोत्तर विडंबनकारांना दिलेले खुले आव्हान आहे - "दाखवा विडंबन करुन ह्या कवितेचे (कळली तर!)"

तुम्ही तर मस्त , आवडली असा प्रतिसाद दिल्याने एकदम कुरुक्षेत्रावर शस्त्रे गाळलेल्या अर्जुनाची आठवण झाली. श्या , आमच्या वेळाचं मिपा राहिलं नाही आता =))))

अनन्त्_यात्री's picture

13 Dec 2021 - 3:45 pm | अनन्त्_यात्री

विडंबन(?)कारांनी दारू(हा विषय) सोडून अन्य विषय निवडावा ही नम्ब्र विनंती :)

प्रसाद गोडबोले's picture

13 Dec 2021 - 5:02 pm | प्रसाद गोडबोले

विडंबन करायचा विषयच येत नाही हो, आम्हाला मुळ कविताच कळली नाहीये =))))

शिवाय तसेही मुक्तछंदातील कवितेचे , तेही यमक बिमक नसलेल्या गद्य सदृष अनाकलनीय कवितांचे विडंबन करण्यात मजा येत नाही , किमान कमीत कमी गेयता तरी पाहिजे राव .

तुम्ही चांगल्या दर्जाच्या कच्च्या मालाचा पुरवठा करा , आम्ही विडंबनासाठी नवनवीन विषय शोधु मग !

अनन्त्_यात्री's picture

13 Dec 2021 - 6:43 pm | अनन्त्_यात्री

नवकवितेच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक,
"गण-मात्रांचे कृत्रिम बंधन सत्वर तोडुनी टाक !"

यतिभंगाचे भूत लेखणीस कायम भिववित होते
त्या भीतीने तरल काहिसे हातून निसटत होते

गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको अता मळलेली
वाट पुन्हा ती छंद-बद्ध कवितांची कोंदटलेली

वृत्त-छंद-मात्रांचे अवजड ओझे लेवुनी बसली..
..होती माझी कविता, विमुक्त होता निर्मळ हसली

त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"मुक्तक लिही, पण ध्यानी ठेव..यमकाविण "गंमत" नाही !"

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Dec 2021 - 9:55 am | ज्ञानोबाचे पैजार

छंद काव्य ही सुंदर असते, गाता येते छान,
नियमांच्या बंधनाने पण अर्थ टाकतो मान,

विद्वानांनी दावणीस बांधले जेव्हा काव्यास,
तेव्हाच मग सुरु जाहला गण-मात्रांचा हव्यास,

शहाण्णव कुलीन यमकी कविता असते भेदरलेली,
थोरामोठ्यांच्या धास्तीने अविरत पदर सावरणारी,

मुक्त कविता लेवून बिकनी बीच वर बागडते
बंध सारे झुगारुन ती प्रेम स्वत:वर करते,

लोक काय म्हणतील भितीने जीवास का मारावे?
जीवन जगता जगता त्यावर शतदा प्रेम करावे,

सुंदर दिसण्या करता नाही असण्या करता लिहू,
छंद बध्द का मुक्त छंद हा वाद ही घालत राहू,

पैजारबुवा,

चांदणे संदीप's picture

14 Dec 2021 - 10:24 am | चांदणे संदीप

जगात भारी!

सं - दी - प

चांदणे संदीप's picture

14 Dec 2021 - 10:39 am | चांदणे संदीप

(१) चाळकऱ्यांच्या टोचीव भाषा
वितान प्रभातसमयीचे व्यापून-
टमरेलाची लय सांभाळीत-
परस्परांशी अंतर राखून-
कुजबुजल्या, "हे चाळकऱ्यांनो,
कुंथाल तुम्ही अथकपणाने
विसर्गाचा क्षण आला तरी
अमुच्या निर्वाणीच्या पण तरिही
खोचक ऐशा कोट्या घालून?"

इथून पुढच्या काव्याच्या कवेत हात घालून त्यास विडंबनद्वारी आणण्याचे सामर्थ माझ्या शब्दबाहूत नाही. ;)
(कॉलिंग आत्मुगुर्जी...)

सं - दी - प

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Dec 2021 - 10:47 am | ज्ञानोबाचे पैजार

तांब्याधिपतींच्या राखिव कुरणात आक्रमण?

दु दु तांब्याधिपती कोपले तर बद्दकोष्ठतेचा शाप देतील.

पैजारबुवा,

अनन्त्_यात्री's picture

14 Dec 2021 - 11:21 am | अनन्त्_यात्री

होल वावर इज आवर

अत्रुप्त आत्मा's picture

14 Dec 2021 - 10:59 am | अत्रुप्त आत्मा

ह्याह्याह्या =))))))))))))

चांदणे संदीप's picture

13 Dec 2021 - 3:26 pm | चांदणे संदीप

हे अष्टग्रहांनो

म्हणजे, त्यांचे आठ आणि आपले नऊ असं नाहिये का?

सं - दी - प

अनन्त्_यात्री's picture

13 Dec 2021 - 3:51 pm | अनन्त्_यात्री

सूर्य, चंद्र, राहू-केतू अशा अनुक्रमे तारा, उपग्रह व छायाबिंदू यांची एकत्रित मोट बांधलीय. म्हणून "त्यांचे" आठच (प्लूटो हा बटुग्रह वगळून) घेतलेयत.