श्रीगणेश लेखमाला २०२१ - चिरंजीवी (२)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
13 Sep 2021 - 10:23 am

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}

श्रीगणेश लेखमाला २०२१

मनस्वी सिद्धार्थला विविध विषयातील शिक्षण घेण्याची आवडच होती असं म्हंटलं तरी चालेल. म्हणूनच तो केवळ ग्रॅज्युएट आणि पुढे एम. बी. ए. होऊन थांबला नव्हता; तर त्याने कायद्याचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. सिध्दार्थला चित्रकलेची देखील खूप आवड होती. ती बहुतेक त्याच्या आईकडून आली असावी. त्याची आई वैदेही ही एक प्रथितयश चित्रकार होती. त्यामुळे त्याने चित्रकला देखील शिकून घेतली होती. त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे जिममध्ये जाऊन वजनं उचलून उगाच बॉडी बिल्डर प्रमाणे प्रचंड शरीरयष्टी निर्माण करण्यापेक्षा उत्तम योगाभ्यास करून त्याने उत्तम शरीरासोबत शांत आणि स्थिरचित्त मन-बुद्धी मिळवली होती. मितस्थ राहाणाऱ्या सिद्धार्थला आपल्या पुरातन काळातील कथा वाचायला खूप आवडत असे. केवळ कथा म्हणून वाचून विसरून जाणं त्याने कधीच केलं नाही. मग ते रामायण असो महाभारत असो किंवा विष्णू दशावतार, श्रीगणेश कथा... प्रत्येक कथा किंवा महाकाव्य वाचत असताना आणि त्यानंतर त्याने त्या-त्या विषयाचा बराच अभ्यास देखील केला होता. अलीकडच्या काळातील तरुण-तरुणी ज्या कथांना - मायथॉलॉजि म्हणजे मिथ - खोट्या कथा म्हणून संबोधून आपल्याच देशाच्या उज्वल भूतकाळाला हसत होती; त्यावेळी सिद्धार्थ प्रत्येकवेळी स्पष्ट शब्दात त्यांचे म्हणणे खोडुन काढत होता.

"यार, समजून घ्या. मुळात मायथॉलॉजि हा शब्द आपला नाहीच आहे. इंग्रजांनी जाता-जाता जे काही निरर्थक शब्द स्वतः तयार केलेल्या अर्थसकट आपल्याला दिले त्यातलाच एक हा. सॉरी, धर्म-जात आणि मायथॉलॉजि या त्यांनी दिलेल्या शब्दांना आणि त्याच्या अर्थांना आजही आपण चिकटून आहोत. थोडा अभ्यास आणि लॉजिकल विचार तुम्ही लोकांनी केलात ना तरीही तुमच्या लक्षात येईल की ज्याला तुम्ही 'मिथ' म्हणजे 'खोट्या कथा' म्हणून हसता आहात तो कदाचित आपला खरा भूतकाळ असेल. अरे; आपल्या भारता इतका पुरातन एकही देश किंवा संस्कृती नाही. त्यामुळे आपला इतिहास खूप जुना आहे. हे सत्य त्या गोऱ्यांना मान्य करायचं नव्हतं. त्यांच्या मते तेच सार्वभौम होते आणि म्हणून महान होते. त्यामुळे त्यांनी हा खेळ केला." सिद्धार्थ कायम हिरीरीने स्वतःच मत मांडत असे.

मात्र त्याचं म्हणणं तेवढ्यापुरतं ऐकून घेऊन त्याचे मित्र विषय संपवत असत. पुढे पुढे तर इतिहास आणि पुराण काळ हे विषय सिद्धार्थ असताना सगळेच टाळायला लागले. हे लक्षात आल्यानंतर तर सिद्धार्थ अजूनच अंतर्मुख झाला; पण म्हणून त्याने त्याला आवडणाऱ्या या विषयाचा अभ्यास सोडला मात्र नाही. त्याच्या या काहीशा वेगळ्या विषयाच्या आवडीमध्ये त्याला मनापासून साथ देत होती ती त्याची प्रेयसी कृष्णा. कृष्णा स्वतः पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती आणि तिने देखील 'महाभारतीय युद्धामधील पांडव पुत्र संहार' हा विषय अभ्यासासाठी घेतला होता. या निमित्ताने तिच्या सोबत सिद्धार्थ देखील या विषयावरील वाचन करत होता.

सिध्दार्थच्या घराच्या जवळच एक रद्दीवाला होता. कधीतरी एकदा सिध्दार्थने त्याच्याकडे एक जुनं पुस्तक बघितलं होतं आणि लगेच खूप जास्त मोबदला देऊन विकत घेतलं होतं. तेव्हापासून तो रद्दीवाला काही अशी जुनी पुस्तकं मिळाली की सिध्दार्थला स्वतः आणून देत असे. जर ते पुस्तक हवं असेल तर सिद्धार्थ त्याला न विचारताच पण मोठी रक्कम देत असे. असंच एकदा सिद्धार्थ ऑफिसला जायला निघाला होता आणि तो रद्दीवाला मुलगा अगदी धावत सिध्दार्थकडे आला.

"दादा, मला माजे काका सांगून ग्येले हुते की तुमाला जुनी पुस्तकं आन तसंच काही आसल तर सांगायचं. म्हनून आलोय; एक लाकडी पेटी हाय आलेली. थोडी जड पडली म्हणून नाय आणली हित. येता का बघायला. तुमाला पटली तर घ्या... नायतर मी टाकून देनार म्हनतो." सिद्धार्थ समोर उभा राहात तो म्हणाला. सिध्दार्थ मंद हसला आणि लगेच त्याच्या सोबत त्याच्या दुकानाच्या दिशेने गेला. त्या पोराने त्याच्या त्या पत्र्याच्या खोपटातून एक सुंदर लाकडी पेटी बाहेर काढली. तिच्यावर सुंदर नक्षीकाम केलं होतं. सिध्दार्थने पेटी हातात घेतली आणि तिच्यावरून हात फिरवत धूळ झटकली. हात फिरवताना मात्र त्याला त्या नक्षीमध्ये काहीतरी वेगळं आहे याची जाणीव झाली; त्याने नीट निरखून बघितलं तर ती केवळ नक्षी नसून संस्कृत श्लोक असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्या पेटीविषयीची उत्सुकता त्याच्या मनात निर्माण झाली. त्याने एकदा त्या पोरकडे बघितलं. ते पोरगं देखील सिध्दार्थकडे हसत बघत होतं. सिध्दार्थने खिशात हात घातला आणि दोन हजार रुपये काढून त्या पोराला दिले. तो पोरगा हसला आणि सिद्धार्थ मागे वळला. पण मग त्याला काय वाटलं कोण जाणे परत त्याच्या जवळ जाऊन सिध्दार्थने त्याला अजून दोन हजार दिले आणि मग वळून घराकडे आला. सिद्धार्थ गाडीत बसून ऑफिसच्या दिशेने निघाला. ती पेटी त्याने त्याच्या शेजारच्या सीटवर ठेवली होती. खरं तर ती पेटी उघडायची उर्मी त्याला स्वतः बसू देत नव्हती. पण एक महत्वाची मीटिंग ठरली होती ऑफिसमध्ये. त्यामुळे मन दाबून तो ऑफिसमध्ये पोहोचला. मात्र मीटिंग सुरू होण्याअगोदर त्याने कृष्णाला मेसेज करून ठेवला आणि सोबत त्या पेटीचा फोटो देखील पाठवला.

सिद्धार्थ कॉन्फरन्स रूममधून स्वतःच्या केबिनमध्ये आला तर समोर कृष्णा बसली होती. तिच्या समोर ती पेटी होती आणि हातातील भिंगाने ती त्या पेटीचं निरीक्षण करण्यात गुंग झाली होती. तिला तसं बघून सिद्धार्थ हसला आणि त्याच्या शेजारी येऊन बसत म्हणाला;"काहीतरी इंटरेस्टिंग सांग ग." त्याच्या आवाजाने कृष्णा एकदम दचकली. तिने सिध्दार्थकडे मोठे डोळे करून बघितलं. तिच्या त्या मोहक रुपाकडे बघत सिद्धार्थ म्हणाला;"यार, किती वेळा सांगितलं आहे तुला असं मोठे डोळे करून नको बघत जाऊस माझ्याकडे. सगळं विसरून या डोळ्यात हरवून जातो मी." त्याच्या त्या बोलण्याने मनातून सुखवलेली कृष्णा वरकरणी मात्र त्याच्या दंडाला चापट मारत म्हणाली;"उगाच मस्का मारू नकोस ह." तिचा चेहेरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरत सिद्धार्थ म्हणाला;"कृष्णा, खरंच मस्का नाही ग. तुझे हे टपोरे काळे डोळे मला खरंच वेड लावतात. तू सर्वार्थाने तुझ्या नावाला साजेशी आहेस. श्रीकृष्णाची कृष्णा! ती द्रौपदी देखील सावळी होती. काळ्याभोर विशाल नेत्रांची, हुशार, पराक्रमी आणि तरीही शालीन कुलीन होती ती. खरं सांगू? तुला जेव्हा जेव्हा हाक मारतो न मी तेव्हा तेव्हा मला ती आठवते." कृष्णा सिध्दार्थच्या कौतुकाने खूप सुखावून गेली होती आणि त्याच्या ओंजलीतल्या आपल्या चेहेऱ्यावर त्याची गुंतलेली नजर देखील तिला हवीशी वाटत होती. नकळत तिने डोळे मिटले आणि सिध्दार्थने न राहून तिचं चुंबन घेतलं. दोघेही हरवून गेले एकमेकांत. किती वेळ गेला कोण जाणे पण अचानक सिध्दार्थचा फोन वाजला आणि दोघेही भानावर आले. सिध्दार्थला हलकेच दूर ढकलत कृष्णा म्हणाली;"ए, ऑफिसमध्ये आहोत आपण. तुला बरा इथे चावटपणा सुचतोय." त्यावर मिश्कीलपणे हसत सिद्धार्थ म्हणाला;"यात चावटपणा काय? माझ्या लाडक्या प्रेयसीचं चुंबन घेतलं मी!" त्याचं बोलणं ऐकून कृष्णा एकदम कावरी-बावरी झाली आणि त्याला अजूनच ढकलून देत ती थोडं पलीकडे असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. तिच्या त्या कृतीने सिध्दार्थला खदखदून हसू आलं.

त्याच्या हसण्याकडे दुर्लक्ष करत कृष्णा म्हणाली;"सिद्धार्थ ही पेटी म्हणजे नक्की खजिना आहे पूर्वकालीन माहितीचा. अरे या पेटीवरचा हा श्लोक तू वाचलास का?" कृष्णाने विषय बदलला आणि सिद्धार्थ एकदम शांत होत तिच्या शेजारच्या खुर्चीत येऊन बसला. त्याने पेटी स्वतःसमोर ओढली आणि तिच्यावरून हात फिरवत त्याने श्लोकावरून नजर फिरवली आणि परत प्रश्नार्थक नजरेने कृष्णाकडे त्याने बघितलं.

"अग त्या रद्दीवाल्या पोराने मी अगदी निघताना हाक मारून ही पेटी दिली. ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग होती. त्यामुळे इच्छा असूनही मी पेटीकडे बघितलंसुद्धा नाही. तुला फोटो पाठवून इथे यायला सांगितलं आणि लगेच मीटिंगसाठी गेलो. ते आत्ता येतो आहे तुझ्यासमोर. मी पेटी हातात घेतली होती त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं की या पेटीवर ही नक्षी नसून काहीतरी लिहिलं आहे. पण मग म्हंटलं तू वाचून अर्थ शोधूनच ठेवशील." सिद्धार्थ म्हणाला.

कृष्णाने परत एकदा ती पेटी स्वतःपुढे ओढली आणि त्या श्लोकावरून हात फिरवत ती म्हणाली; "सिद्धार्थ ही पहिली पेटी नाही." चमकून तिच्याकडे बघत सिद्धार्थ म्हणाला;"म्हणजे? काय म्हणते आहेस तू कृष्णा?"

"सिद्धार्थ हा श्लोक वाच:

चतुर्थ्म सम्पुटकः अस्य सप्तैतान् विचितिः!
प्राप्तंतु इदम् विचितिः अर्थात् अन्य सर्व मंजुषा आप्स्यति!

या श्लोकाचा अर्थ:

ही पेटी चौथी आहे आणि अशा सात पेट्या आहेत. ही पेटी जर तुला मिळाली असेल तर याचा अर्थ हा आहे की तुला बाकी सर्व पेट्या मिळतील.

म्हणजे ही पेटी जर चौथी आहे तर पहिल्या आणि पुढच्या तीन कुठे आहेत? जर ही तुला मिळाली आहे तर याचा अर्थ इतर देखील तुला मिळणार." कृष्णा बोलायची थांबली आणि तिने सिध्दार्थकडे वळून बघितलं. सिद्धार्थ स्वतःच्याच विचारांमध्ये गुंगला होता. त्याचा तो चेहेरा बघून कृष्णाला त्याची चेष्टा करण्याचा मोह झाला आणि त्याच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवत ती म्हणाली; "पण मग नक्की तुलाच की त्या रद्दीवाल्या मुलाला मिळणार त्या पेट्या?" तिच्या त्या एका वाक्याने सिद्धार्थ एकदम झोपेतून जागा झाल्यासारखा उठला आणि तिचा हात एका हातात धरत आणि दुसऱ्या हाताने ती पेटी उचलत तो झपाट्याने त्याच्या केबिनबाहेर पडला.

समोरच त्याला नेने काका दिसले. नेने काका सिध्दार्थच्या वडिलांनी जेव्हा ही कंपनी सुरू केली त्यावेळेपासून त्यांच्या सोबत आणि आता सिध्दार्थसोबत काम करत होते. सिध्दार्थने लिफ्टच्या दिशेने नेने काकांना हाक मारली आणि म्हणाला; "काका, एक खूप महत्वाचं काम आठवलं आहे. आज परत येत नाही बहुतेक मी. तुम्ही सांभाळून घ्या. अर्थात तसं महत्वाचं काही असलं तर फोन आहेच. सकाळच्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली आहे; त्याचा निर्णय आपण घेतलाच आहे. त्यामुळे त्याचं execution तुम्ही सुरू करालच. येतो मी." नेने काका काही बोलायच्या आत सिद्धार्थ कृष्णा समवेत लिफ्टमध्ये शिरला होता.

सिध्दार्थने गाडी त्या रद्दीच्या दुकानाजवळ थांबवली. सिद्धार्थ आणि कृष्णा गाडीतून खाली उतरले आणि बघतात तर ते लहानसं पत्र्याचं खोपट पार तुटून गेलं होतं. आतमध्ये असणारा वजनाचा काटा देखील रस्त्यावर पडला होता. ते पाहून सिध्दार्थला खूप आश्चर्य वाटलं. तो पुढे झाला आणि त्या खोपटाकडे हतबल नजरेने बघणाऱ्या एका किरकोळ शरिरयष्टीच्या माणसाला त्याने विचारलं; "काय झालं हो या दुकानाचं?" सिध्दार्थकडे वळून बघत तो म्हणाला; "साहेब, काय सांगू? इतकी वर्षं आहे मी इथे. पण कधी काही प्रॉब्लेम झाला नाही. चार दिवस गावाला गेलो आणि बी एम सी वाले आले आणि माझं दुकान तोडून गेले." सिध्दार्थला ते ऐकून खूप वाईट वाटलं. त्याने खिशात हात घालून थोडे पैसे काढले आणि त्या माणसाच्या हातावर ठेवत विचारलं; "दादा, तुमचा भाचा कुठे गेला? तो होता का दुकान तुटत होतं तेव्हा?" त्यावर उसळून येऊन तो मनुष्य म्हणाला; "कुठला भाचा आन काय घेऊन बसलात साहेब? माझ्या झोपडीच्या शेजारी रस्त्यावरच राहात होता तो पोरगा. मला गावाहून फोन आला होता की आईची तब्बेत ठीक नाही. मला तसंच पळायचं होतं म्हणून मग त्या पोराला सांगितलं होतं काही दिवस दुकान सांभाळ. तसा प्रामाणिक आहे. त्यामुळे त्याच्यावर भरवसा होता. अर्थात जे झालं त्यात त्याची काहीच चूक नाही. उगाच रागावलो हो मी त्याच्यावर. हाकलून दिला त्याला. बिचारा कुठे जाईल आता काय माहीत." त्यांचं बोलणं ऐकून सिद्धार्थ विचारात पडला. तो मुलगा सापडला तर हे कळणार होतं की ही पेटी कोणी आणून दिली होती. पण तो कुठे गेला ते त्या दुकानदाराला माहीत नव्हतं. त्यामुळे सिद्धार्थ पुढे काय करावं या विचारात पडला.

सिध्दार्थचं मन थोडं शांत झालं आणि कृष्णा त्याच्या जवळ आली आणि म्हणाली; "सिद्धार्थ, तुला असं नाही का वाटतं की तू हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागला आहेस? अरे जी पेटी आपल्याजवळ आहे तिचा विचार तर करूया अगोदर."

सिध्दार्थने कृष्णाकडे वळून बघितलं आणि म्हणाला; "खरंय. चल, बघू तर खरं काय आहे त्या पेटीमध्ये. म्हणजे आपल्याला अंदाज येईल इतर सहा पेट्यांमध्ये काय आहे. मग ठरवू त्याच्या मागे लागायचं का."

सिध्दार्थचा हात धरत कृष्णा म्हणाली; "सिद्धार्थ, तू नीट ऐकलं नाहीस बहुतेक मी काय म्हणाले ते. मी म्हणाले; आपण विचार करूया या पेटी संदर्भात. एकूण सात पेट्या आहेत याव्यतिरिक्त त्या श्लोकातून काहीही प्रतीत होत नाही आहे. त्यामुळे ही पेटी उघडल्यानंतर आत काय असेल याचा विचार केल्याशिवाय उगाच धोका पत्करण्यात अर्थ नाही."

सिध्दार्थला तिचं म्हणणं पटलं आणि तो तिला म्हणाला; "इथवर आलीच आहेस तर चल घरीच जाऊया. शांतपणे विचार करून ठरवू काय करायचं आहे."

दोघेही घरी आले; पण कोणीही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. पेटी हॉलमधील मधल्या टेबलवर ठेऊन विचार करत-करत सिद्धार्थ गॅलरीमध्ये जाऊन उभा राहिला... कृष्णा मागून त्याचं निरीक्षण करत स्वतःच्याच विचारात गढून गेली होती. इतक्यात सिध्दार्थची आई तिथे आली. सिद्धार्थ आणि कृष्णा विचारात गढलेले बघून तिला हसायला आलं आणि ती त्याच्या सोबत सोफ्यावर बसली. तरीही दोघांचंही लक्ष तिच्याकडे गेलं नाही. मात्र वैदेहींच लक्ष समोर ठेवलेल्या पेटीकडे गेलं आणि अगदी सहज त्यांनी ती पेटी मांडीत घेतली. तिच्यावरील नक्षीकामावरून त्यांनी हात फिरवला. कोरलेला श्लोक देखील वाचला. त्यामुळे त्यांची उत्सुकता एकदम वाढली. त्यांनी एकदा परत सिद्धार्थ आणि कृष्णाकडे बघितलं. दोघेही आपापल्या विचारत गढलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. एक हलकंस स्मित करून त्यांनी ती पेटी उलट-सुलट करन बघितली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की इच्छा असली तरी ही पेटी अशी सहज उघडली जाणार नाही आहे. कारण ना त्याला काही लॉक होतं; ना कुठूनही उघडण्यासाठीची फट. कोणत्याही बाजुंनी हिंजीस नसल्याने पेटी कुठून उघडली जाईल ते देखील कळणं अवघड होतं. काही क्षण विचार करून वैदेहींनी केसातून पिन काढली आणि अगदी हलेकच ती पिन त्या कोरलेल्या श्लोकावरून फिरवायला लागल्या. संपूर्ण श्लोकावरून पिन फिरली पण तरीही काहीही झालं नाही. त्यावर खांदे उडवून वैदेहींनी पेटी परत टेबलावर ठेवली आणि आता मात्र त्यांनी सिद्धार्थ आणि कृष्णाला हाक मारली.

"तुम्ही एकमेकांसोबत आहात की एकटे आहात ते सांगा रे पोरांनो; त्याप्रमाणे कोणाशी आणि कसं बोलायचं ते मी ठरवते." त्यांचा आवाज ऐकून दोघेही भानावर आले आणि एकदम सगळेच हसले. सिध्दार्थचा मनस्वी स्वभाव माहीत असल्याने समोरच्या पेटीविषयी काही एक न बोलता वैदेहींनी इतर गप्पांना सुरवात केली आणि पेटीचा विषय मागे पडला. थोड्या वेळाने कृष्णा निघाली. तिला सोडायला सिद्धार्थ खाली गेला त्यावेळी त्याचा हात हातात घेऊन कृष्णा म्हणाली; "सिद्धार्थ, आता मला जाणं आवश्यक आहे. पण मी उद्या सकाळीच येते आहे. मग ठरवू आपण काय करायचं ते. पण तोवर ती पेटी उघडू नकोस हं; प्लीज!" कृष्णाचा हात हातात घेऊन त्यावर थोपटत सिद्धार्थ म्हणाला' "कृष्णा, Don't worry. नाही उघडणार मी ती पेटी तुझ्याशिवाय." त्यावर एक गोड हास्य करून कृष्णाने त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि मागे वळून चालायला लागली.

कृष्णा निघाली आणि सिद्धार्थ घरी परतला. समोर ती पेटी तशीच पडलेली होती. काहीसा विचार करून सिध्दार्थने ती पेटी उचलली आणि तो त्याच्या खोलीत गेला. समोर ती पेटी ठेऊन सिद्धार्थ पलंगावर बसला आणि परत स्वतःच्याच विचारांमध्ये गढून गेला आणि त्यातच त्याला झोप लागली. जेव्हा सिध्दार्थला भान आलं त्यावेळी किती वेळ गेला त्याला कळलंच नाही. पण खोलीमध्ये खूपच अंधार होता. सिध्दार्थचं लक्ष त्या पेटीकडे गेलं आणि तो दचकला. कारण पेटी एका बाजूनं उघडली गेली होती आणि त्यातून हिरव्या रंगाचा प्रकाश परावर्तित होत होता. आपण झोपेत तर नाही न असं वाटून त्याने स्वतःला चिमटा काढला... आणि आपण पूर्ण जागे असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अगदी सावकाश तो त्या पेटीच्या दिशेने गेला. तो पेटीला हात लावणार इतक्यात त्याला जाणवलं की समोरच्या स्टडी टेबलासमोरच्या खुर्चीवर कोणीतरी बसलं आहे. त्या जाणिवेने सिद्धार्थ खूपच दचकला.

"कोण? कोण बसलंय?" सिध्दार्थने धारदार आवाजात विचारलं. पण उत्तर नाही आलं. मात्र सिध्दार्थची खात्री होती की नक्की कोणीतरी आहे तिथे. त्याचा हात बाजूच्या दिव्याच्या बटणाकडे गेला.... त्याने सटकन त्याने दिवा लावला.... आणि समोर बघितलं......

दिवा लावण्यासाठी जो एक क्षण तो वळला होता त्यात देखील त्याच्या मनात एक विचार एखाद्या शलाके प्रमाणे चमकून गेला.... मी मान वळविन तेव्हा समोर कोणीही नसणार... आणि मग हा मला भास होता असं मी स्वतःला समजावणार!

.....आणि समोर बघितलं..... सिध्दार्थच्या समोर स्टडी टेबलाच्या बाजूच्या खुर्चीमध्ये अत्यंत सहजपणे एक मध्यम वयाचे गृहस्थ बसले होते. अत्यंत प्रसन्न चेहेरा होता त्यांचा. भरदार दाढी होती. शांत मनमिळाऊ नजरेने ते सिध्दार्थकडे बघत होते.

कोणीतरी आगंतुक आपल्या खोलीमध्ये असल्याचं बघून सिध्दार्थला खूप आश्चर्य वाटलं. पण मनात कुठेही भितीचा लवलेशही नव्हता. "कोण तुम्ही?" त्याने अगदी सहज आवाजात विचारलं.

"सिध्दार्थ, मी कोण आहे हे समजून घेऊन काय फरक पडणार आहे वत्सा?"

एक अत्यंत धीरगंभीर आवाज सिध्दार्थच्या मानत घुमला. सिध्दार्थला खात्री होती की आवाज समोरच्या व्यक्तीच्या दिशेनेच आला आहे. पण तरीही तीच व्यक्ती बोलली याबद्दल त्याला खात्री नव्हती. सिध्दार्थच्या मनाची अवस्था अत्यंत दोलायमान झाली होती. समोर कोणीतरी आहे; हे नक्की... पण ती व्यक्ती बोलते आहे की आपलं मन बोलतं आहे? या व्यक्तीचा समोरच्या पेटीशी काही संबंध आहे का?

"सिद्धार्थ, वत्सा, थोडं स्वतःच्या अंतर्मनात वळून बघितलंस तर तुला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला तुझ्यातच सापडेल."

परत एकदा आवाज घुमला आणि आता मात्र सिद्धार्थ अस्वस्थ झाला. खरं तर तो आवाज इतका शांत आणि गंभीर होता की एखाद्याला गुंगी यावी. पण सिद्धार्थ त्याक्षणी त्या आवाजाच्या जादूमध्ये किंवा त्यांनी बोललेल्या शब्दांमध्ये अडकला नव्हता; तर ही व्यक्ती इथे आलीच कशी या प्रश्नाशी त्याचं मन गुंतलेलं होतं.

"सिद्धार्थ, मी कोण आहे? इथे कसा आलो? हे जाणून घेण्यापेक्षा देखील महत्वाचं म्हणजे मी तुझ्याकडे का आलो आहे; हे तू जाणून घेणं नाही का?"

सिध्दार्थने पहिल्यांदाच कोणाचा आवाज आहे यापलीकडे जात तो आवाज काय म्हणतो आहे हे ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक मंद हास्य ऐकू आलं.

"मला खात्री होती की मी तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे." परत तोच आवाज. आता सिद्धार्थ मनातून शांत झाला होता. त्याच्या मनाने त्याला खात्री दिली होती की समोर बसलेली व्यक्ती त्यालाच काय जगात कोणालाही दुखवू शकत नाही. किंबहुना या व्यक्तीचं इथे असणं याला नक्की काहीतरी प्रयोजन आहे. एकदा मनाने ग्वाही दिल्यानंतर सिद्धार्थ देखील मंद हसला आणि म्हणाला;

"तुम्ही कोण आहात ते मला माहीत नाही. पण एक नक्की सांगेन की आम्ही मानव समोर कोण आहे, त्या व्यक्तीचं तिथे असण्याचं प्रयोजन काय अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये अगोदर अडकतो. त्यामुळे जर मला माझ्या मनातील या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर तुम्ही मला जे काही सांगण्यासाठी इथवरचा प्रवास केला आहात तो व्यर्थ जाईल."

परत एकदा एक मंद हास्य आजूबाजूला पसरलं आणि त्यासोबत त्या पेटीमधून येणारा हिरवा प्रकाश देखील.

"सिद्धार्थ, यापुढे तू एका वेगळ्या प्रवासासाठी निघणार आहेस. कदाचित तुझ्या मनात पहिला प्रश्न हा उद्भवू शकतो की तूच का? त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही; कारण माझं प्रयोजन त्यासाठी नाही. मात्र तुझ्या मनातील सर्व शंका दूर करणं आवश्यक आहे; हे मला मान्य आहे आणि म्हणूनच मी तुला माझी ओळख सांगतो आहे."

असं म्हणून ती व्यक्ती उभी राहिली आणि सिध्दार्थच्या लक्षात आलं की सर्वसाधारण मनुष्याच्या उंचीपेक्षा या व्यक्तीची उंची जास्त आहे. ती व्यक्ती सिध्दार्थच्या समोर येऊन बसली... बसताना त्या व्यक्तीने पद्मासन घातले. आता सिद्धार्थ त्या व्यक्तीचं पूर्ण निरीक्षण करू शकत होता. त्यांनी परत एकदा एक मंद स्मित केलं आणि बोलायला सुरवात केली...

"वत्सा, माझं नाव बिभीषण! मी सर्व वेद मुखोद्गत असलेल्या दशग्रंथी ब्राम्हण असूनही क्षत्रिय धर्म पालन करणाऱ्या रावणाचा बंधू आहे. हे सत्य तू अमान्य करूच शकणार नाहीस पुत्रा; कारण आजवर कोणत्याही माता-पित्याने आपल्या मुलाचं नाव बिभीषण ठेवलं नसेल. मी इथे त्या पेटीकेच्या साहाय्याने आलो आहे.... तुझ्या मर्त्य मनातील प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर आता मी माझ्या येण्याचे प्रयोजन संगतो. सिद्धार्थ; पुत्रा... मी बिभीषण श्रीरामांनी दिलेल्या वरानुसार चिरंजीवित्व स्वीकारून कालमापनाच्या मर्यादांच्या पलीकडे जात जगतो आहे. त्रेता युगातील श्रीराम जन्म आणि त्यांनी केलेले कार्य याचा मी साक्षीदार आहे. माझ्या सख्या भावांच्या वीरमरणाचं काही अंशी कारण मी स्वतः आहे... आणि तरीही मी श्रीरामांच्या आशीर्वादाने चिरंजीवी झालो आहे. माझ्या चिरंजीवित्वाचं कारण देखील तसंच आहे..."

ती व्यक्ती अव्याहत बोलत होती आणि सिद्धार्थ मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे ऐकत होता. परंतु तरीही त्याची सारासार विवेकबुद्धी जागृत होती. त्यामुळे समोरची व्यक्ती कोण आहे हे कळल्यानंतर सिध्दार्थचं मन देखील त्याच्याशी बोलू लागलं. नकळत हात जोडत सिध्दार्थ बोलायला लागला...

"महाराज; आपण ज्याप्रमाणे सांगता आहात की आपण स्वतः बिभीषण आहात... हे ऐकून माझ्या मानत कुतूहल जागृत झाले आहे."

"बोल वत्सा, आज खरं तर मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो आहे. परंतु एकतर्फी बोलणे मला कधीच मान्य नाही आणि नव्हते. त्यामूळे तुझ्या मनातील शंका दूर करण्यास मी तयार आहे."

"महाराज, माझ्या मानत काही प्रश्न उभे राहिले आहेत. आपण जर बिभीषण असाल तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या... स्वतःच्याच भावांच्या आणि आप्तस्वकीयांच्या मृत्यूचं कारण आपण स्वतः आहोत हे माहीत असूनही आपण चिरंजीवित्व का मान्य केलंत?"

सिध्दार्थचा प्रश्न ऐकून समोरची व्यक्ती काही क्षण शांत झाली आणि मग परत बोलायला लागली...

"वत्सा, मी ज्यावेळी पहिल्यांदा लंकेमधून बाहेर पडलो आणि श्रीरामांच्या समक्ष जाऊन उभा राहिलो त्यावेळी माझ्याही मानत हाच प्रश्न होता की स्वतःच्याच आप्त-स्वकीयांच्या विरोधात मी उभा राहतो आहे हे योग्य आहे का? मात्र श्रीरामांनी मला संगीतले की कोणीही कितीही दूषणे दिली तरी विवेकबुद्धिपासून ढळू नये. त्यावेळी दशग्रंथी अशा माझ्या बांधूने केवळ अविचार करून माता सीता यांचे अपहरण केले होते. ही कृती न्याय सम्मत नव्हती. मी विविध प्रकारे माझ्या बंधुला समजावण्याचा प्रयत्न केला... परंतु त्याचा उपयोग झाला नाही. सरते शेवटी समस्त मानव जातीच्या उध्दाराच्या दृष्टीने मी योग्य निर्णय घेतला आणि श्रीरामांना येऊन भेटलो. माझ्या या कृतीमधून माझे न्याय सम्मत संसार निर्मितीची उर्मी श्रीरामांच्या लक्षात आली आणि त्यांनी माझा हाच विचार पुढील पिढ्यांमध्ये मी रुजवावा यासाठी मला चिरंजीवित्व दिले. परंतु वत्सा आज या कलियुगामधील मानवाने सद्सद्विवेक बुद्धी दूर सरली आहे आणि केवळ स्वकेंद्री आयुष्याच्या मागे तो धावतो आहे. वत्सा, आता मी कितीही प्रयत्न केला तरी आजच्या मानवाने स्वतःच्या ह्रासाच्या दिशेने पाऊल उचलले आहे; ते मागे फिरवणे शक्य नाही. आज मी माझ्या उद्दिष्टापासून अनेक दशके दूर गेलो आहे... आणि तरीही चिरंजीवित्व वागवतो आहे. सिद्धार्थ, तुला भेटण्याचे हेच एक प्रयोजन आहे... तू एका वेगळ्या प्रवासाला निघतो आहेस. त्यामुळे या प्रवासादरम्यान जर तुझी गाठ अशा व्यक्तीशी झाली की ती व्यक्ती या माझ्या चिरंजीवित्वाचा परत एकदा विचार करू शकणार असेल; तर माझ्या मनातील व्यथा तू नक्की त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव. आजच्या या काळात ना न्यायसंमत राज्य चालवले जात आहे; ना खऱ्या सुखाचा विचार कोणी करतो आहे.... माझ्या आयुष्याच्या असण्याचे कारणंच संपले आहे. त्यामुळे मला हे माझे चिरंजीवित्व परत करायचे आहे. सिध्दार्थ केवळ तूच हे करू शकतो आहेस... कारण तुझी निवड करण्यात आली आहे.

"मी जे सांगितलं त्याचा विचार कर वत्सा....." इतके बोलून ती व्यक्ती बोलायचे थांबली. सिध्दार्थच्या डोळ्यावर झापड यायला लागली आणि नकळत त्याचा डोळा लागला.

सिध्दार्थला जाग आली त्यावेळी त्याच्या घडाळ्याचा अलार्म वाजत होता आणि खोलीमध्ये सूर्यप्रकाश शिरला होता.

क्रमशः

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

13 Sep 2021 - 1:16 pm | टर्मीनेटर

वाह! हा भागही मस्तच... 👍
पुढ्चा भाग लवकर येउद्यात!

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Sep 2021 - 1:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

किती भागांची मालिका आहे ही?
लवकर पुढचे भाग टाका राव, आता उत्कंठा लैच वाढली आहे
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

13 Sep 2021 - 2:00 pm | प्राची अश्विनी

+999999

सौंदाळा's picture

13 Sep 2021 - 3:57 pm | सौंदाळा

अप्रतिम सुरुवात
विश्वस्त, दा विंची कोड आठवले एकदम.
सिध्दार्थला प्रवासात सप्त चिरंजीव भेटणार का? पुभाप्र

प्रचेतस's picture

13 Sep 2021 - 4:45 pm | प्रचेतस

हा भागही उत्कंठावर्धक.
पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे.

कपिलमुनी's picture

13 Sep 2021 - 4:50 pm | कपिलमुनी

उत्कंठावर्धक !

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

13 Sep 2021 - 5:27 pm | ॲबसेंट माइंडेड ...

इंटरेस्टींग कथा आहे.

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 6:58 pm | गॉडजिला

बाकी पुराणाबाबत विवेचन पटले नाही अनेक बाबी आहेतच न पटणाऱ्या पण ही एक गोष्ट आहे म्हणून तूर्त फोकस कथेकडे आहे...

अजुनही उत्सुकता वाढावी असे काहीच घडलेले नाही. लेट्स सी.

गॉडजिला's picture

13 Sep 2021 - 7:00 pm | गॉडजिला

मिथ' म्हणजे 'खोट्या कथा'

हा अर्थ असतो हे प्रथमच समजले...

तुषार काळभोर's picture

13 Sep 2021 - 7:42 pm | तुषार काळभोर

पुढे काय वाढून ठेवलंय हे पाहायला हवं!

ज्योति अळवणी's picture

13 Sep 2021 - 11:23 pm | ज्योति अळवणी

मी देखील रोज एक भाग लिहिते आहे. Thanks to टर्मिनेटर! गणेश लेखनमालेसाठी काहीतरी लिही म्हणून त्याचा whatsapp वर मेसेज आला. त्यावेळी मनात हा विषय होता. कथा स्वरूपात लिहिताना liberty of thoughts असते म्हणून मला कथा लेखन जास्त भावतं.

मी देखील तुमच्या सोबतच कथा लिहिते/कल्पिते आहे. अशीच सोबत ठेवा. आपण सगळेच सातव्या चिरंजीवी पर्यंत पोहोचू... आणि या प्रवासात... ते आता काय विचार करतात ते समजून घ्यायचा प्रयत्न करू

रंगीला रतन's picture

14 Sep 2021 - 1:08 am | रंगीला रतन

वाचतोय.

चित्रगुप्त's picture

16 Sep 2021 - 9:01 am | चित्रगुप्त

उत्तम कल्पनाविलास. लिखाण कुठे कुठे थोडेसे पाल्हाळिक वाटले. सोबत काही चित्रे पण देता आली तर कथांची रंगत आणखी वाढेल असे वाटते.

खिळवून ठेवणारी कथा... पुढचा भाग कधी येणार आहे?