सिलींडर ४

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
22 Jul 2021 - 8:33 am

सिलींडर ४
लग्नघरातून सुटका झाल्यावर,टेम्पोजवळ व-हाडाची वाट पाहात थांबलो.ड्रायव्हर क्लिनर बिड्या ओढत उभे होते.साडेचार वाजतआले होते.हळूहळू एक एक करत किरकोळ व-हाडी,किरकोळ सामानासह टेम्पोकडे येऊ लागले.काही वेळाने,बॅंडचा आवाज येऊ लागला.कपाळी मुंडावळी,हाती मोत्याच्या नारळाची दुरडी घेतलेला,डोक्यावरचे टोपी मुळे जास्तच बावळट दिसणारा नवरदेव,मागे कणकेचे दिवेअसलेले ताम्हण हाती घेतलेली करवली,वरमाय व इतर महत्वाची माणसे वाजत गाजत वरातीने आली.नशीब ,त्या काळी लग्न कायदेशीर ठरण्यासाठी वराती समोर नाचायचा विधी अनिवार्य नव्हता.नाहीतर रात्रीचे बारा इथेच वाजले असते.सामान आणि पॅशींजर टेम्पोत चढवणे,बसवणे मोठे अवघड काम होते.सामान बसवले तर पॅशिंजराना जागा नसे,व पॅशींजर बसवले तर सामानाला. त्यात सिलिंडरने जागा व्यापलेली.कुणीतरी सिलिंडर बाहेर काढून टाका,असे सुचवले.मी गॅसवर!पण ते 'संभाव्य भावी जावयाचे 'असल्याने,मामा आणि बापूसाहेबांनी ती सुचना त्वरित फेटाळून लावली.
माझी गप्प राहाण्याची मुत्सद्देगिरी इथे उपयोगी पडली.शेवटीड्रायव्हर,
क्लिनरचा अनुभव कामी आला.नवरदेव,वरमाय,करवली सह,सगळे व-हाड,सामाना सहीत टेम्पोत सामावले,खरेतर कोंबले गेले.नवरदेवाला उच्चस्थान मिळाले होते.सिलिंडर वर!केबीनमधे माझ्या बाजूला मामा आणि बापूसाहेब.टेम्पोच्या चाकाखाली नारळ वाढवण्यात आला.देवाचे  जयजयकार ओढत,चारपाच महाराजही जय असा घोष झाला.आणि पुन्हा एकदाचा टेम्पो मार्गस्थ झाला.मी पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास टाकला.टेम्पो थोडा पुढे जाताच,क्लिनरने टप वाजवून ड्रायव्हरला थांबवण्याचा इशारा केला.टेम्पो पुन्हा एकदा थांबला.माझे काळीज लकलकले.आता काय झाले असावे.मोठमोठ्या आवाजातील बोलण्यातून कळले की,महत्वाच्या आहेराची पिशवी घरीच राहिली होती,असे लक्षात आले होते.बापूसाहेबांनी या वेंधळेपणाबद्दल,घरच्यांवर भरपूर तोंडसुख घेतले.मग प्रमुख लोकांची चर्चा झाली त्या नंतर ,बॅगआणण्यासाठी,
भाच्याला घरी पाठविण्यात आले.तो यायला बराच वेळ लागला.टेम्पोत कोंबली गेलेली मंडळी मोकळे होण्यासाठी खाली उतरली.'त्या वेंधळ्याला उगीच पाठवले,त्याच्याऐवजी बापूसाहेबानी स्वत: जायला हवे होते,'अशी चर्चा महिला मंडळात सुरू झालेली ऐकू येत होती.तेवढ्यात आहेराची पिशवी  सिलिंडरचे मागे असल्याचे कुणालातरी दिसले.मग पुन्हा एकदा 'तूतू मैमै 'सुरू झाले.तरीही बॅग सापडल्यामुळे ,माझ्यासकट सगळे लोक हुश्श झाले होते.'चला निघू या,मग,उशीर झाल्याने उतावीळपणे मी पटकन बोलून गेलो.'निघायचे कसे त्याला येऊ द्यावे लागेल नं'!' मामा म्हणाले.बरोबरच होतं ते.नवरदेवाचा भाऊ येईपर्यंत टेम्पो निघण्याची शक्यता नव्हतीच. तोपर्यंत खाली उतरलेल्यांनी टेम्पोत बसून घ्यावे अशी सुचना मी केली. ती बापूसाहेबांनी पटली.पण,ती अमलात आणणे कठीण होते.कुणी अगोदर चढायचे,यावर मतभेद होते.शेवटी  खालचे खालीच राहिले.सर्वाचे डोळे,टेम्पोतच असलेली आहेराची पिशवी आणण्यासाठी घरी गेलेल्या कडे लागले होते.एकदाचा तो आला अर्थात.बॅगशिवाय.ती इथेच असल्याने तिथे असणे शक्य नव्हते.पण ते त्याला काय माहीत?हात हालवत आल्याबद्द,बोलणी खावी लागणार या अपेक्षेने,त्याने बचावाची पूर्वतयारी केली असावी असे त्याचे चेह-यावर दिसत होते.पण तो दिसताच ज्या लगबगीने खालची मंडळी टेम्पोत चढायची घाई करत, त्याला इशारे करू लागली,त्यावरून त्याने ओळखायचे ते ओळखले,अन बचाव बदलून आक्रमक पावित्रा घेतला.'होती न पिशवी इथेच,आधीच नीट पाहायली असती तर,मला कशाला हेलपाटा पडला असता 'वगैरे वगैरे सुरूकेले.त्यावर इतरांचे प्रत्युत्तर.पुन:श्च वादावादी.हा पठ्ठ्या टेम्पोत बसायला तयारच नव्हता.टेम्पोच्या बाहेरून तो ,विरुद्ध टेम्पो मधून इतर,असा जंगी सामना रंगला.तो सुरू राहीला असता,पण मामाने
मध्यस्थी करून प्रकरण मिटवले.भाच्चा टेम्पोला लटकला.
क्लिनरने टप वाजवून इशारा केला आणि टेम्पो परत एकदा सुरू झाला,
आणि ब-यापैकी वेग पकडला.केबीनचे खिडकीतून मागे एकमेकांना गच्च चिकटून बसलेले व-हाडी लोकांचा आरडाओरडा ऐकू येत होता.त्यात छोट्यांचे रडणे,आयांचे खेकसणे,मोठ्या मुलांचेओरडणे, प्रौढांचे कावणे,
असे मजेशीर मिश्रण होते.
'थोडं बाजूला सरकून घ्या की ',
सरकू कुठं?इथ बुड हलवायलाजागानाही,'
'मी तर एकापायावरच उभा आहे,'
'गप्प बसा,हे काय घरयंका आपलं',
'थोडी कळ काढाआत्ता येईल माजलगाव',
वगैरे संवाद केबीनच्या खिडकीतून कानी पडत होते.
'चांगली मोठी बस करा म्हणले होते पण नाही,आपलाच हेका,कोंबलं कोबड्यासारखं खुराड्यात.'ही वरमाय असावी.''हो नं पाहुण्यासमोर नसती  शोभा ,चांगलं दिसतं का? ह्याचं  पहिल्यापासून हे असंच "कुणीतरी म्हातारी.बाजूलाच बसलेल्या बापूसाहेबाकडे पाहिलं.त्यांनी सोयीस्करपणे डोळे(आणि बहुतेक कान पण )झाकले होते.ड्रायव्हरचे बाजूला बसलेल्या मामाच्या पायात गीयर होता.त्यामुळे ते वैतागलेले.रस्त्यावर दोन तीन वेळेस मोठमोठे खड्डे चुकवण्याचे नादात ,ड्रायव्हर ने करकचून ब्रेक दाबले होते.तेव्हा आत झालेला गोंधळ अवर्णनीय होता.अशा काही किरकोळ गोष्टी सोडल्यास आडगाव फाट्या पर्य॔तचा प्रवास सुरळीत झाला.फाट्याची खूण असलेले मोठेलिंबाचे झाड,त्या खालची चहाची टपरी दिसली.
झाडामागे एक बैलगाडी आणि आत गाडीवान ही दिसले .एकदाचा आडगाव फाटा आला .मनी आनंदीआनंद.पण त्या नादात थांबवायला सांगेपर्यंत ,तो बराच पुढे गेला होता. लक्षात येताच मी जोरात ओरडलो.ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबला.आमची डोकी  जोरात टपाला आदळली.मागे जोरात उलथापालथ झाली.मगआरडाओरड,मुलांचे रडणे,कुणाच्यातरी शिव्या. हे सगळेच  जोरात.असा माहौल तयार झाला.आता मला त्याच्याशी घेणे देणे नव्हते.टेम्पो जाणे अन व-हाड जाणे ,असा विचार करून खाली उतरलो. बापूसाहेब,मामा पण उतरले.,व-हाडी खाली उतरल्याशिवाय ,कोपर्‍यात अगदी मागे असलेले सिलिंडर खाली काढणेशक्य नव्हते.मंडळी आधीच वैतागलेली.उतरायची कुणाचीच तयारी नव्हती.पणमामांनी आवाजाची पट्टी चढवली.एकदम पोलीसी आवाज!तेव्हा कुठे टेम्पोची मागची पट्टी उघडल आणि एकावर एक
रचलेल्या वस्तू कोसळाव्या, तसे आतून जनता खाली आली.क्लीनरने
सिलिंडर ओढले पण ते निघेचना.बारा तासाहून जास्तीचे सहवासातून टेम्पो व सिलिंडर मधे बंध निर्माण झाले होते की काय?पण हे बंध दुसरेच होते.सिलिंडर हलू नये म्हणून  सकाळी निघताना टेम्पोचे लोखंडी पट्टीला खाली व वरती दोन्हीकडे दोरीने बांधले होते.क्लिनरने ते बंधमुक्त केले आणि सडकेवर ठेवले.लोकांची परत चढण्याची गडबड सुरू झाली.
ड्रायव्हर क्लिनर त्यांना चढवण्यात गुंतले. 'लग्नाला या की उद्या.सकाळी दहा एकवीस चा मुहुर्त आहे'बापूसाहेब आणि मामा दोघांनीही आग्रह केला."आलो असतो हो,पण ऊद्या घरी पाहुणे येणार आहेत".मी  बोलून गेलो.' पाहुणे?'मामानी विचारले. ''लग्न जमलंय माझं,उद्या व्याहीभोजन आहे ."आतापर्यंत झालेल्या मनस्तापाचा सूड उगवण्याच्या कुटील हेतूने मी मुद्दाम ही  लोणकढी थाप ठोकली. हे ऐकलं,अन दोघांचा नूरच बदलला.जणू काही मी त्यांची फसवणूकच केली होती अशा अविर्भावात मामाने माझ्याकडे पाठ फिरवली ,आणि ''चला बापूसाहेब,आधीच
उशीर झालाय",म्हणत त्यांच्या हाताला ओढत टेम्पोत सवार झाले.'चल ना आता तू का थांबलास?' हे ड्रायव्हरला!आमचा संवाद टेम्पोतील मंडळीने ऐकला होताच.अनेकांचे चेह-यावरचे माझ्या विषयीचे आदराचे भाव बदलून वेगळेच भाव दिसत होते.ते मी पाहात असतानाच,माझ्यावर धूर उडवत टेम्पो पसार झाला.
दिवस कललेला.सुनसान सडकेवर मी एकटाच  सिलिंडर सह उभा!
        क्रमश:
           नीलकंठ देशमुख
            

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2021 - 8:40 am | अभिजीत अवलिया

छान लिहीताय.

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 10:16 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Jul 2021 - 9:00 am | ज्ञानोबाचे पैजार

"लग्न जमलंय माझं,उद्या व्याहीभोजन आहे"

हा शुध्द हलकट पणा होता

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

22 Jul 2021 - 10:14 am | तुषार काळभोर

खरंय!
दुत्त दुत्त (भावी) जावईबापू!

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 10:17 am | नीलकंठ देशमुख

चार ही भाग आवडले हे आवडले

Bhakti's picture

22 Jul 2021 - 9:57 am | Bhakti

मस्त

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 10:17 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

Bhakti's picture

22 Jul 2021 - 9:57 am | Bhakti

मस्त

योगी९००'s picture

22 Jul 2021 - 10:23 am | योगी९००

वाक्या वाक्याला हसलोय...

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 11:47 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. छान वाटले

कंजूस's picture

22 Jul 2021 - 11:38 am | कंजूस

अजून काय बाकी आहे??

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 11:48 am | नीलकंठ देशमुख

वाट पाहा...
उद्याची.

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 11:48 am | नीलकंठ देशमुख

वाट पाहा...
उद्याची.

बापूसाहेब's picture

22 Jul 2021 - 2:15 pm | बापूसाहेब

अगदी पाहण्यासारखे चेहरे झाले असतील मामा आणि इतर व्हराडी मंडळींचे.. हाहा..
पुढचा भाग लवकर येउद्यात..

आणि हो. आपणास एक व्यानि केला आहे. पहिला नसल्यास कृपया एकदा बघा.

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 5:55 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. लिहिलेलं आवडतंय ,हे खूप समाधान देऊन जाते.

गॉडजिला's picture

22 Jul 2021 - 3:01 pm | गॉडजिला

अनेक खुसखुशीत वाक्ये पेरली आहेत पण

एकावर एक
रचलेल्या वस्तू कोसळाव्या, तसे आतून जनता खाली आली.

हे आणि

सिलिंडर ओढले पण ते निघेचना.बारा तासाहून जास्तीचे सहवासातून टेम्पो व सिलिंडर मधे बंध निर्माण झाले होते की काय?

यांचे टायमिंग जबरा होते... आपोआप हसू स्फुरले...मजा आली.

दूरदर्शन वर आठवडाभर वाट बघून आवडता एपिसोड बघितल्यावर जो भाव मनात यायचा त्याची पुनरावृत्ती आपली लेखमाला करत आहे.. ते म्हणजे नुकत्याच पाहिलेल्या एपिसोडचे अतीव समाधान अन इतक्या चांगल्या शो ला कमी वेळ दिल्याबद्दल दूरदर्शनची कोणाकडे न करता येण्याजोगी तक्रार :)

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 5:58 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद. आपण लिहितो ते इतरांना आनंद देते,वाचकांना पुढच्या भागाची वाट पाहावी वाटते ,हे कळल्यावर होणारे समाधान कसे असते हे मी अनुभवत आहे.

श्रीगुरुजी's picture

22 Jul 2021 - 4:13 pm | श्रीगुरुजी

लग्न ठरलंय हे समजल्यानंतर लाजत लाजत लाडू वाढणाऱ्या कमीची काय अवस्था झाली असेल?

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 6:00 pm | नीलकंठ देशमुख

त्यावर वेगळे काही लिहावे लागेल. या कथेतील पात्रांविषयी वाचक विचार करताहेत, हे जाणून खूप छान वाटले. यातून काही सुचते पण आहे.धन्यवाद

मराठी_माणूस's picture

22 Jul 2021 - 4:30 pm | मराठी_माणूस

त्या काळी लग्न कायदेशीर ठरण्यासाठी वराती समोर नाचायचा विधी अनिवार्य नव्हता.

खरे आहे. हा गचाळ प्रकार नक्की केंव्हा सुरु झाला , कोणास ठाउक

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 6:02 pm | नीलकंठ देशमुख

खरे आहे.वैताग आणणारा प्रकार असतो. अशा अनेक अनावश्यक गोष्टी शिरल्या आहेत

सौंदाळा's picture

22 Jul 2021 - 6:11 pm | सौंदाळा

मस्तच,
पुभाप्र

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 7:03 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

रमेश आठवले's picture

22 Jul 2021 - 8:38 pm | रमेश आठवले

चाळीस वर्षा पूर्वीची गोष्ट इतक्या छान , खुमासदार आणि रंगतदार पद्धतीने लिहीत आहात. तुमच्या स्मरणशक्ती आणि वर्णनशैलीचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

रमेश आठवले's picture

22 Jul 2021 - 8:39 pm | रमेश आठवले

चाळीस वर्षा पूर्वीची गोष्ट इतक्या छान , खुमासदार आणि रंगतदार पद्धतीने लिहीत आहात. तुमच्या स्मरणशक्ती आणि वर्णनशैलीचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 10:32 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

बर्‍याच दिवसांनी काहीतरी चांगले वाचले.

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 10:22 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले

रात्रीचे चांदणे's picture

22 Jul 2021 - 10:01 pm | रात्रीचे चांदणे

खुपच छान लिहलय. आणि महत्वाचे म्हणजे जास्त वाट बघायला न लावता दररोज पुढचा भाग टाकल्यामुळे लिंक तुटत नाही.

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 10:22 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

Rajesh188's picture

22 Jul 2021 - 10:22 pm | Rajesh188

माझे मत हे आहे तुमच्या लिखाणात जे खरेपणा वाचायला मिळायचा .तुमच्या लिखाणात नैसर्गिक पना होता कुठेच ओढून ताणून लिखाण तुम्ही करत नव्हता.
पण तुम्ही असे लिखाण सोडून एकच विषय लांबवण्या साठी आता जे लिखाण करत आहात ते तुमच्या नैसर्गिक लिखाण शैली ल धरून नाही.
स्पष्ट मत व्यक्त केल्या बद्द्ल .
क्षमस्व.

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 10:31 pm | नीलकंठ देशमुख

हे अनुभव कथन नाही.असे कथात्मक लिखाण अशा शैलीत योग्य वाटले. सुदैवाने बहुतेक लोकांना ते आवडत ही आहे असे दिसते.
मी जेव्हा अनुभव शब्दबद्ध होतात तेव्हा जे जगलो, जे अनुभव ले ते आपोआप आतून येते. म्हणून ते नैसर्गिक वाटत असावे.

नीलकंठ देशमुख's picture

22 Jul 2021 - 10:23 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद

सौन्दर्य's picture

22 Jul 2021 - 11:12 pm | सौन्दर्य

लेख वाचता वाचता, वाचक जसा काही अदृश्य रूपाने तुमच्या सोबतच आहे असे मस्त वर्णन आहे. वाचक ह्या कथेतील प्रत्येक क्षण जगतोय असं मला वाटतंय. माझ्या नोकरीच्या निमित्ते, गुजरातमधील विविध खेड्यापाड्यात फिरावे लागायचे. लोकल एसटी व्यतिरिक्त दोन गावांना, तालुक्यांना जोडणारी फक्त टेम्पो सर्व्हिस असायची. एकदा का एसटी निघून गेली की पुढचे अनेक तास निश्चिती असायची त्यामुळे अश्या टेम्पो मधूनच प्रवास करावा लागायचा. ते सगळं आठवलं व पुनःप्रत्ययाचा आनंद लाभला.
सुदृढ सुमी सारखा एक अनुभव माझ्या देखील गाठीला आहे पण तो पुन्हा कधीतरी.
निखळ आनंद दिल्याबद्दल आभार.

नीलकंठ देशमुख's picture

23 Jul 2021 - 8:23 am | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद. छान वाटले वाचून. तुम्ही पण लिहा त्या 'सुदृढ '
अनुभवाविषयी ....

चौथा कोनाडा's picture

24 Jul 2021 - 5:08 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !

सिलिंडर ओढले पण ते निघेचना.बारा तासाहून जास्तीचे सहवासातून टेम्पो व सिलिंडर मधे बंध निर्माण झाले होते की काय?पण हे बंध दुसरेच होते.सिलिंडर हलू नये म्हणून सकाळी निघताना टेम्पोचे लोखंडी पट्टीला खाली व वरती दोन्हीकडे दोरीने बांधले होते.क्लिनरने ते बंधमुक्त केले आणि सडकेवर ठेवले.लोकांची परत चढण्याची गडबड सुरू झाली.
जबरी धमाल ....

नीलकंठ देशमुख's picture

24 Jul 2021 - 5:16 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. छान वाटले प्रतिसाद वाचून.