उंदराचा डोह (कथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
14 Jan 2021 - 9:55 pm

उंदरांचा डोह..

शाळा सुटल्या सुटल्या मी नदीकडे निघालो. हा माझा नित्य नेम होता. मी सहसा तो चुकवत नसे. सलग सात आठ तास शाळेत शिकवण्यामुळे, जो शीण अंगभर पसरलेला असतो, तो नदीवर जाऊन निवांतपणे व्यक्त करता येतो. नदीच्या वरच्या अंगाला एक ठिकाण होते. सहसा त्या ठिकाणी कोणी फिरकत नसे. का फिरकत नसे? हा विषय गौण आहे. कारण प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या असतात. आता काही जणांचे म्हणणे होते की, ते ठिकाण चांगले नाही. तेथे अजब घडामोडी घडतात. तिथे कधी काहीही घडू शकते. प्रत्यक्षात तसा कोणाला काही अनुभव आला नव्हता. पण एखादा म्हणाला ती जागा चांगली नाही, की दुसराही तेच म्हणतो. मग तिसराही. त्यामुळे मी अशा अफवांवर विश्वास ठेवणारा नव्हतो. मी त्या ठिकाणी नेहमी जात असे. तो माझा नित्यनेमच बनला होता. तिथे जो निवांतपणा भेटतो, तो आसपास कुठेच मिळत नाही. त्यामुळे मला हवी ती शांतता तेथे लाभते. त्यामुळे कोणी काहीही म्हणत असले तरी, मी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो.
               उंदराचा डोह! हो! हो! हेच ते ठिकाण. नदीच्या वरच्या अंगाचे ठिकाण. त्याला उंदराचा डोह का म्हणतात, हे मला प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यावरच कळले. डोहात अनेक जीव होते. मासे, खेकडे, साप, किटके विपुल प्रमाणात होते. पण याहीपेक्षा डोहाच्या आसपास उंदराचा प्रचंड सुळसुळाट होता. डोहाच्या चारही बाजूंनी जागोजागी यांचीच बिळे होती. सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर. काळे कुळकुळीत. लांब लांब शेपट्यांची. अणकुचीदार दातांची.  डोहाच्या आजूबाजूची सगळी जमीन यांनी भुसभुशीत केली होती. कुठेजरी दणकटपणे पाय आपटला की, फुटभर जमीन आत जायची. सगळीकडे यांचीच बिळे. दिवसातल्या काही वेळेला ते बिळाबाहेर यायचे, तेव्हा जमिनीवर काळे ढग उतरले आहेत, असा भास होत असे. सगळीकडे त्यांच्या त्या काळया पाठी दिसायच्या. इकडून तिकडे पळताना,त्यांच्या लहान मोठ्या आकृत्या दिसायच्या. कधी चुकून एखादा पाण्यात पडला की, आपले छोटे अंग हलवत काठावर येण्याची त्याची धडपड चालायची. एकदा पाण्याबाहेर आले की, आपले अंग इकडून तिकडे चांगले झटकवत, ते आपल्या बिळात जायचे. तेथे केवळ उंदरांचीच उपस्थिती असायची. तो भागच त्यांच्या नावावर जमा होता. त्यामुळे तर त्याला उंदराचा डोह असे नाव पडले होते.
पण एक गोष्ट मी कबुल करतो. मला कधी त्यांचा त्रास झाला नाही. मी ज्यावेळी डोहावर जायचो, तेव्हा ते बिळात असायचे. एखाद दुसरा बाहेर असायचा. इकडून तिकडे पळायचा. त्यामुळे मला त्यांचे विशेष असे काही जाणवले नव्हते.
               दिवस मावळतीला लागला होता. सूर्य कधीही मोठ्या डोंगराआड गेला असता. मी डोहाजवळ पोहोचलो होतो. नदी शांतपणे वाहत होती. अजिबात कसलीही हालचाल जाणवत नव्हती. घनघोर शांतता अवती भोवती पसरलेली होती. मला अशी शांतता हवी होती. मला हीच शांतता भावते. ही शांतता कमालीची गूढ असते. तिच्या आत कित्येक उलथापालथी असतात. पण मानवी मनाला त्या जाणवत नाहीत. केवळ सूर्यास्ताचीच वेळ ही शांतता घेऊन येते. मला ही शांतता अतिप्रिय आहे. आणि अशा शांततेत उंदराच्या डोहाजवळ बसून, ती आत्मिक अनुभूती घेणे हे परमोच्च सुखाचे असते.
               डोहाच्या शेजारी एक मोठा खडक होता. त्यावर आरामशीर बसून, मी त्या डोंगराआड जाणाऱ्या सूर्याकडे बघत होतो. क्षणाक्षणाला त्याची तांबूस लाली कमी होत होती. रात्रीचा काळा रंग, त्या तांबूस रंगाची जागा घेत होता. डोह शांत होता. पाण्यावर तरंगणारे लहान - मोठे कीटक तेवढी हालचाल करत होते. कधी येथे, कधी तेथे ते टुणकन उड्या मारत होते. त्यांच्या त्या हालचालींनी पाण्यावर अनेक लहान लहान वर्तुळे निर्माण होत होते. एखादी मासोळी वेगाने पाण्यातून सुळका मारत होती. त्याने पाण्याची मंदशी हालचाल जाणवत होती. शांतता आता कमालीची जाणवू लागली. क्षणभर मी स्वतःचा श्वास रोखून ती शांतता अनुभवू लागलो. मे येथे नेहमी येतो. पण आजच्या सारखी शांतता मी प्रथमच अनुभवत होतो. आजच्या शांततेत काहीतरी वेगळेपण होते. काहीतरी नावीन्य होते. नेहमी सारखी शांतता जाणवत नव्हती. नैसर्गिक हालचाली होत नव्हत्या. कोणीतरी हा अवती भोवतीचा व्यापार रोखून धरला आहे असे वाटत होते. साऱ्या परिसराने आपला श्वास थांबवला आहे, असा भास होत होता. सगळे काही स्थिर, ताणून धरल्यासारखे वाटत होते.
   
मला थोडीशी बेचैनी जाणवू लागली. तितक्यात पाठीमागे काहीतरी आवाज आला. खडकाच्या पाठीमागच्या बिळातून तीन उंदीर बाहेर आले होते. दोन मोठे आणि एक लहान पिल्लू. मी चमकुन पाठीमागे पाहिल्याने ते एकदम जागेवर थांबले. टकमक माझ्याकडेच बघू लागले. ते लहान पिल्लू तर आपली छोटी मान इकडे तिकडे हलवत टक लावून माझ्याकडे बघत होते. कदाचित ते त्या दोघांचे पिल्लू असावे. ते तिन्ही उंदीर अजूनही माझ्याकडेच बघत होते. कदाचित ते माझा अंदाज घेत असावेत. यापासून आपल्याला काही धोका नाही ना, याची चाचपणी करत असावेत. माझ्या ओठांवर हलकेसे हसू उमटले. किती निरागस जीव. किती तत्पर! किती सावध!

माझ्यापासून काही धोका नाही, असे त्यांना जाणवले असावे. टुणटुण उड्या मारत ते खडकांच्या आसपास घुटमळू लागले. मघाशी जी बेचैनी वाटत होती ती आता एकदम कमी झाली होती. हलके हलके वाटायला लागले. ते छोटे पिल्लू आता मनसोक्तपणे इकडे तिकडे पळू लागले. काही कुठे थोडासा आवाज झाला की, ते कान टवकारून त्याकडे बघायचे. त्याच्या सगळ्या हालचाली मजेशीर वाटत होत्या. अगदी निरागस हालचाली!
               मी पुन्हा पाण्याकडे नजर वळवली. पाणी अजूनही तसेच शांत होते. त्यात काही हालचाल जाणवत नव्हती. तसे ते शांत पाणी पाहून, पुन्हा मनावर मळभ चढू लागली. पुन्हा बेचैनी वाढू लागली. खडकावरचे दगडाचे बारीक बारीक तुकडे उचलून मी डोहात भिरकावले. डुबुकss डुबुकsss असा आवाज झाला. मला मजा वाटली. पाण्यातील शांतता थोडी तरी भंगली होती. मी पुन्हा थोडा मोठा दगड उचलला. डोहात फेकणार होतो, तेवढ्यात ते झाले. एक भलामोठा खेकडा हळूच पाण्यातून वर आला. तो काठावर येत असावा. मी वर उचललेला दगड तसाच खाली खडकावर ठेऊन दिला. खेकडा वर आला होता. आता माझे सारे लक्ष खेकड्यावरच स्थिर झाले.
             तो वर आला. क्षणभर जाग्यावर थांबला. नांगी जमिनीवर एक दोनदा आपटून तो पुढे चालू लागला. त्याची ती तिरकस चाल गमतीशीर वाटू लागली. तो खेकडा थोडे अंतर तुरुतुरु चालायचा, पुन्हा जाग्यावर थांबायचा. पुन्हा चालायचा. तो पुढे चालत निघाला की, पाठीमागे त्याच्या त्या पावलांची एक सलग रेषा, एकसंध माळ असल्यासारखी वाटू लागली. आपल्याच चालीत तो पुढे पुढे चालत होता. आता तो पुन्हा थांबला. त्याची दिशा बदलली. आता तो वेगाने मी बसलो त्या खडकाकडे येऊ लागला.
क्षणभर मला भीती वाटली. त्याने अचानक अशी आपल्या चालीची दिशा बदलल्याने, एक अनामिक हुरहुर मनात दाटून आली. आता तो खेकडा खडकाजवळ पोहोचला होता. तो पुन्हा जाग्यावर थांबला. त्याच्या पुढच्या नांग्या वर झाल्या. त्या नांग्याचा इशारा सरळ सरळ माझ्याकडेच होता. तो आता खडकावर चढू लागला. खडकावर चालताना, त्याची चाल काहीशी मंद झाल्यासारखी वाटली. तो त्या मंद चालीत माझ्याकडेच येत होता. एखाद्या सैन्याच्या तुकडीने शत्रू पक्षाकडे कुच करावी, तसा तर्‍हेने तो माझ्याकडे सरकत होता.
                एव्हाना अंधाराच्या कवडशा वातावरणात उमटायला लागल्या होत्या. तांबूस प्रकाश लुप्त झाला होता. केवळ परावर्तीत तोकडा प्रकाश वातावरणात शिल्लक होता. कधीही अंधाराचे जाळे डोहावर पसरले असते. मग अशा अंधारात येथे डोहावर थांबणे जिकिरीचे झाले असते. मला गडबड करायला हवी होती.
               तो खेकडा आता नजीक आला होता. मी थोडासा मागे सरकलो. तो खेकडाही तसाच पुढे सरकला. मी आता खडकाच्या एकदम कडेला आलो होतो. अजुन मागे गेलो असतो, तर खाली डोहात पडलो असतो. मी तसाच बसून राहिलो. आता खेकडा एकदम डावीकडे वळाला. आणि पुढे चालू लागला. त्याने पुन्हा दिशा बदलली होती. मी त्याच्याकडे नजर टाकली. आणि मला तो नजरा दिसला. पुढच्या पाच दहा मिनिटात काय घडणार आहे याची चाहूल लागली. खेकडा त्या उंदराच्या पिल्लाकडे निघाला होता. ते उंदराचे लहान पिल्लू त्याच्याच नादात इकडून तिकडे उड्या मारण्यात दंग होते. खेकडा आता संथ गतीने पिल्लाकडे सरकत होता. पिल्लाला धोका होता. ते मोठे दोन उंदीर कुठेतरी लांब गेले असावेत. ते पिल्लू एकटेच होते. त्याला धोक्याची जाणीव झालेली नव्हती. खेकडा तसाच हळू हळू त्याच्याकडे जात होता. माझा श्वास रोखला गेला. पुढे काय होणार हे पाहण्यासाठी मी उतावळा झालो होतो. उंदराचे पिल्लू अजूनही बेसावध होते. खेकडा आता त्याच्या अगदी नजीक होता. खेकड्याने त्याच्या नांग्या वर केल्या. चांगला पवित्रा घेतला. आता पिल्लावर झडप घालणारच की,  पिल्लाला त्याची चाहूल लागली. त्याने टुणकन एक मोठी उडी मारली. पुन्हा दोन तीन उड्या मारून ते पिल्लू खडकावर आले.  तेवढ्यात ते दोन उंदीरही तेथे आले. ते पिल्लू कमालीचे घाबरले होते. त्याने पुन्हा एक मोठी उडी मारली. आणि ते सरळ सरळ माझ्या अंगावर येऊन पडले. मी एकदम दचकलो. झटक्यात त्या पिल्लाला हातात घेतले आणि बाजूला फेकले. नेमके ते पिल्लू खेकड्या जवळ जाऊन पडले. फेकल्यामुळे ते काहीसे जखमी झाले असावे. त्याला चपळाईने हालचाल करता आली नाही. तेवढ्या अवधीत खेकड्याने आपले काम साधले. त्या पिलाला त्याने आपल्या नांगीत पकडले. चांगले मजबूत धरले. त्याने नांग्यांचा जोर वाढवला. ते पिल्लू दोन नांग्यात दबले गेले. त्याचा चीssचीsssचीssss आवाज वातावरणात घुमू लागला. ते त्याचे दोन पालक उंदीर त्या खेकड्याभोवती फिरू लागले. त्याच्यावर चाल करून जाऊ लागले. पण खेकड्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्या पिल्लाचा आवाज वाढतच गेला. आणि काही वेळानंतर तो आवाज शांत झाला. त्याची धडपड शांत झाली. ते मृत झाले होते.

खेकडा थोडा वेळ जाग्यावर थांबला. त्या नांग्यातून त्याने ते पिल्लू सोडून दिले. आणि तो पुन्हा डोहाच्या दिशेने आपल्याच चालीत निघून गेला. ते दोन उंदीर त्या मृत पिल्लाजवळ आले. ते तेथेच घुटमळू लागले. त्या पिल्लाच्या अंगाला धक्के देऊ लागले. कदाचित ते उठेल, त्यांच्या बरोबर येईल, असे त्यांना वाटत असावे. पण ते पिलू निपचित पडले होते. त्यात प्राण नव्हताच. ते दोघे उंदीर बराच वेळ तिथेच बसुन होते.
                 मी ती सगळी घडामोड पाहत होतो. मला आता त्या प्रसंगाची भीती वाटायला लागली. त्या खेकड्याचे माझ्याकडे येणे, त्याने नांग्यात असे पिल्लू पकडणे, त्या पिल्लाचा असा मृत्यू होणे, ही अवतीभोवतीची अनैसर्गिक शांतता! सगळे काही गूढ जाणवायला लागले. येथे थांबणे आता हिताचे ठरणार नव्हते. ते पिल्लू वाचले असते, पण मी त्याला नेमके खेकड्याजवळच फेकले होते. तो माझाच अपराध होता. मला त्याची टोचणी टोचू लागली.
                 अचानक काहीतरी आवाज आला. एकदम काहीसा वेगळा. अगदी शेवटच्या टोकाचा. भीती सरसर करत मेंदूपर्यंत गेली. मी  आवाजाकडे पाहिले. ते दोघे उंदीर मागच्या दोन पायांवर उभे राहून, माझ्याकडे क्रूर चेहरा करून, भेसुरपणे तो आवाज काढत होते. ते दोघेही एकटक माझ्याकडेच बघत होते. त्यांचे ते इवलेसे डोळे कमालीचे भेदक वाटू लागले. त्यात प्रचंड क्रोध जाणवत होता. भीती माझ्या अंगभर पसरून गेली. त्यांचा तो भेसूर आवाज आता टिपेला पोहोचला होता. आता तसा आवाज सगळीकडून येऊ लागला. अवतीभोवती तोच आवाज भरून गेला होता. सभोवताली काहीतरी प्रकट होत होते. भोवतालच्या बिळातून अनेक उंदराचे नाकाडे बाहेर आले होते. प्रत्येक बिळातून एकेक उंदीर बाहेर येऊ लागला. ते बाहेर येऊन, दोन पायांवर उभे राहून, तोच भेसूर आवाज काढत माझ्याकडे बघू लागले. त्या पिलाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, ही गोष्ट अंत:प्रेरणेने त्यांना समजली असावी. मी त्यांचा अपराधी होतो. गावातील लोक सांगत होते, ती निव्वळ अफवा नव्हती. डोह खरोखर चांगला नव्हता. हे उंदीर ही सामान्य नव्हते. सामान्य उंदरांना एवढी समज नसतेच.
               आता हळू हळू तो उंदरांचा प्रचंड समुदाय मी बसलो त्या खडकांकडे येत होता. त्या सगळ्यांच्या नजरा माझ्याकडेच होत्या. अजूनही त्यांच्या तोंडातून तो भेसूर आवाज येतच होता. तो समुदाय आता बराच जवळ आला. मला माहित होते. आता मला मागे सरकायलाही जागा नसणार. कारण मागे सरळ सरळ डोह होता. एकदम दहा पंधरा उंदरांनी हवेत उड्या घेतल्या, त्या बरोबर माझ्यावर कोसळणार होत्या. मी प्रतिक्षिप्त क्रियेने तसाच पाठीमागे सरकलो. आणि व्हायचे तेच झाले.
               मी डोहात कोसळलो गेलो. गार पाण्याचा स्पर्श हाडे गोठविणारी थंडी देऊन गेला. मी गटांगळ्या खाऊ लागलो. माझी नजर वर खडकाकडे गेली. तो उंदराचा प्रचंड समुदाय दोन पायावर उभा राहून माझ्याकडेच बघत होता. आणि बघता बघता तो समुदाय पाण्यात उतरला. सरळ सरळ माझ्या अंगावर चालून आला. माझ्या अंगाभोवती सगळीकडे ते उंदीरच उंदीर होते. मी हातपाय हलवत होतो. पण त्याचा फायदा होत नव्हता. माझे शरीर जड झाले होते. सगळ्या शरीरावर ते उंदीर चिकटले होते. मी हळू हळू डोहाच्या तळाशी जात होतो. काही वेळातच त्या पिलासारखा मीही गतप्राण होणार होतो!

समाप्त.
वैभव.

कथालेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

15 Jan 2021 - 6:18 am | तुषार काळभोर

डोह.
या शब्दातच एक गूढता आहे.
जेव्हा कथेत, वर्णनात डोह हा शब्द येतो, त्यावेळी नेहमीच काहीतरी वाईट, अमंगल, अतार्किक असं घडतं.

असो, कथा इंटरेस्टिंग आहे.

मुक्त विहारि's picture

15 Jan 2021 - 7:32 am | मुक्त विहारि

कथा आवडली

शा वि कु's picture

15 Jan 2021 - 9:09 am | शा वि कु

कथा आवडली.

सौंदाळा's picture

15 Jan 2021 - 6:00 pm | सौंदाळा

कथा, माहौल एकदम अंगावर आला.
छान लिहिली आहे.

vaibhav deshmukh's picture

15 Jan 2021 - 8:02 pm | vaibhav deshmukh

सर्वांचे मनापासून आभार.

योगी९००'s picture

19 Jan 2021 - 2:26 pm | योगी९००

कथा आवडली...छान शब्दात मांडली आहे.