जमतारा पॅटर्न

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
14 Jan 2021 - 1:20 pm

नमस्कार मंडळी
नुकताच आलेला अनुभव तुम्हाला सावध करण्यासाठी मांडत आहे.

घराची आवरा आवरी करताना बर्‍याच वस्तु माळ्यावरुन निघाल्या, त्यातली एक वस्तू मी ओ एल एक्स वर विकायला टाकली होती. सहसा ओ एल एक्स वर जाहिरात टाकली की लोक चॅटवर चौकशी करु लागतात. बहुतेक वेळा स्थानिक लोकच असतात.बहुतेक जण जास्त फोटो वगैरे मागतात किवा किमतीत घासाघीस करतात. मग फोन नंबर मागतात आणि बोलणे होउन वेळ ठरवुन कधीतरी वस्तु घेउन जातात. पेमेंट सहसा कॅश किवा गूगल पे वर होते.

आता या केसमध्ये मला लगेच फोन येउ लागले सगळे लोक हिंदी बोलणारे होते.
पहिला फोन आला. समोरच्या माणसाने किमतीत फारशी घासाघीस न करता सरळ पेमेंट कसे करणार वगैरे मुद्द्याला हात घातला. कॅश घेणार म्हटल्यावर म्हणे आमचा जुने सामान घेण्याचा धंदा आहे आणि पेमेंट फक्त फोन पे किवा गुगल पे ने होईल. त्याला माझी हरकत नव्हती. मग म्हणाला मला कायप्पावर लाईव्ह लोकेशन पाठवा. ह्यात मला संशय आला (पण कारण समजले नाहि, कदाचित कायप्पा पे वर काहितरी फिचर असेल). म्हटले मी मीटींगमधे आहे थोड्या वेळात करेन. फोन ठेवल्या ठेवल्या ट्रु कॉलरवर नंबर चेक केला तर नाव बरोबर दाखवत होता पण नंबर आसामचा होता. मधेच अजुन वेगवेगळ्या हिंदी भाषिक लोकांचे फोन येउ लागले. तेही बिहार्,आसामचे होते.कदाचित आपल्या जाहिरातीला किती रिस्पॉन्स आहे अशी समजूत व्हावी हा हेतू असेल. मागे लहन मुलांचा बोलण्याचा आवाज वगैरे, म्हणजे कोणीतरी कुटूंबवत्सल माणुस फोन करतोय असा समज व्हावा किवा घरबसल्या टेलिकॉलिंग द्वारे पैसे कमवा वगैरे योजना असेल.

काही वेळात त्याचाच दुसरा फोन--पैसे ट्रान्स्फर करतोय अ‍ॅक्सेप्ट करा. मी म्हटले थोडा वेळ लागेल. कायप्पावर बघितले तर मेसेज तातडीने डिलीट केला होता. आता माझा संशय बळावला. तिसर्‍या फोनच्या वेळी त्याने गुगल पे वर मेसेज टाकला चेक केले तर पैसे देण्याचा नव्हे तर घेण्याचा मेसेज होता. कामाच्या गडबडीत ओके दाबले असते तर पैसे क्रेडिट नाही तर डेबिट झाले असते. म्हणजे वस्तू घरीच आणि वरती काही हजाराला बांबु लागला असता. त्यामुळे काही न करता रिक्वेस्ट एक्सपायर होउ दिलि आणि ताबडतोब सकाळपासुन चौकशीचे आलेले सगळे नंबर ब्लॉक केले. ओ एल क्स वरुन जाहिरातही काढुन टाकली. भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती झाली.

तेव्हा कुठलाही ऑन लाईन व्यवहार करताना सावधगिरि बाळगा, घाईगडबडीत किवा हुरळुन जाउन काही करुन नका. कोणाला प्रत्यक्ष भेटल्यावाचुन पैसे वगैरे ट्रान्सफर करु नका. मुळात बचत खात्यात ३०-४० हजारपेक्षा जास्त रक्कम ठेवुच नका .एफ.डी. करुन टाका. असे अनाहूत सल्ले देउन लेख संपवतो.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

तुम्ही वाचलात हे तर आहेच.. पण अजुन एक वेगळा फ्रौड होतो माहीत आहे का?

हेच लोक वस्तु विकत घ्ययचि आहे म्हणून तुमच्याकडून सगळी माहिती घेतात, आणि तशीच लिस्टिन्ग टाकतात. फक्त किंमत खुप कमी असते.

समोरचा माणूस वस्तु स्वस्त मिळतेय म्हणून पैसे देऊन मोकळा होतो. पैसे मिळाले कि सिमकार्ड बंद.. आणि जाहिरतीत अल्टरनेट नंबर म्हणून तुमचा नंबर दिलेला असतो.. त्यामुळे समोरच्याने तक्रार केली की पोलीस तुमच्या दारात :)

चौथा कोनाडा's picture

14 Jan 2021 - 1:45 pm | चौथा कोनाडा

या बहुचर्चित पॅटर्नचे लघूअनुभवी ग्राहक म्हणून अभिनंदन.
आणि सावध केल्याबद्दल धन्यवाद !
माझा एक मित्र न लागणारे जुने वैद्यकिय उपकरण ओएलएक्स वर विकायला काढले तेव्हा त्याला असाच अनुभव आला. थोडक्यात बचावला तो.
जागे रहा मित्रांनो, दिवस सायबर चोरट्यांचे आहेत.

तुषार काळभोर's picture

14 Jan 2021 - 2:21 pm | तुषार काळभोर

कोणत्याही वॉलेटमध्ये किंवा युपीआय अ‍ॅप्प मध्ये पैसे घ्यायचे असतील तर घेणार्‍याला काहीही अ‍ॅक्सेप्ट किंवा क्लिक करावे लागत नाही. गुगल पे (किंवा तत्सम काहीही) वर ९क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष१ वर पैसे पाठव असे सांगितले की पैसे येतात. त्याउप्पर आपण काहीच करत नाही.

मराठी_माणूस's picture

14 Jan 2021 - 2:46 pm | मराठी_माणूस

ह्या लोकांना पकडणे खुप अवघड आहे का ?

अवघड नसावे पण बरेच लोक आहेत. शिवाय वेगवेगळ्या राज्यात आहेत. लाच घ्यायचं सोडून त्यांना पकडण्याचे धंदे कोण करणार? केसेस कोण उभ्या करणार? दुसऱ्या राज्याच्या कोर्टात धावाधाव कोण करणार?

माझ्या मते इथे बिझनेस ला संधी आहे. एक वेबसाईट तयार करायची ज्यावर तक्रार नोंदवली जाईल. पैसे वसूल करणारे निम्म्या पैशांच्या बदल्यात पैसे परत करून देतील. त्या फ्राउडस्टर ची हाडे मोडायची असतील तर 5000 रुपये एक्स्ट्रा.

मराठी_माणूस's picture

15 Jan 2021 - 10:57 am | मराठी_माणूस

अवघड नसावे पण बरेच लोक आहेत. शिवाय वेगवेगळ्या राज्यात आहेत. लाच घ्यायचं सोडून त्यांना पकडण्याचे धंदे कोण करणार? केसेस कोण उभ्या करणार? दुसऱ्या राज्याच्या कोर्टात धावाधाव कोण करणार?

आपल्या यंत्रणेचे हे खरे दुखणे आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात. सामान्य लोकांनी एकत्र येउन यंत्रणेवर दबाव आणायला हवा. ते घडत नाही. माध्यमांनी समोर जे टाकले असते त्या वर चरीतचर्वण करणे हे सोडुन द्यायला हवे. हा लेख आणि अशा प्रकारचे प्रबोधन सतत व्हायला हवे.

फडणवीस सरकार असताना याबाबतीत एक अत्यंत महत्वाकांक्षी operation सुरू केले गेले होते अशी माहिती ऐकून आहे.
पण सरकार कोसळले आणि तो प्रकल्प पण कोसळला.

सतिश गावडे's picture

14 Jan 2021 - 6:04 pm | सतिश गावडे

>> कामाच्या गडबडीत ओके दाबले असते तर पैसे क्रेडिट नाही तर डेबिट झाले असते.
हे तांत्रिकदृष्ट्या कसे होत असावे याबद्दल मला उत्सुकता आहे. म्हणजे मेसेज अ‍ॅकसेप्ट केला आणि जिपे मधले पैसे उडाल्या अशा कहाण्या अधून मधून कानावर येत असतात.

म्हणजे असे मेसेजचा एक विशिष्ट पॅट्टर्न/फॉर्मॅट असावा जी खरं तर जिपेसाठी पैसे देणाची किंवा घेण्याची सुचना असावी जी ओके बटन दाबताच कार्यान्वित होऊन पैसे दिले/घेतले असावेत. खरं तर ही जिपेमधील सोयीची सुविधा असावी जिचा लबाड लोक लोकांच्या अज्ञानाचा/निष्काळजीपणाचा फायदा घेत असावेत असा माझा अंदाज आहे.

>>> खरं तर ही जिपेमधील सोयीची सुविधा असावी जिचा लबाड लोक लोकांच्या अज्ञानाचा/निष्काळजीपणाचा फायदा घेत असावेत असा माझा अंदाज आहे.

तसेच आहे - UPI मध्ये request payment म्हणून एक ऑपशन असतो, त्यात तुम्ही समोरच्याकडून payment स्वीकारू शकता. पण त्यामध्ये समोरच्या माणसाने त्या व्यवहाराला मान्यता देणे आवश्यक असते. तुम्ही जर jio चे recharge किंवा कोणतेही ऑनलाइन payment UPI ने केले तर लक्षात येईल.

ती सुविधा exploit करून हा फ्रॉड केला जातो.

कंजूस's picture

14 Jan 2021 - 7:23 pm | कंजूस

त्याच स्मार्टफोनमध्ये ठेवले नसेल तर ही ओटिपी-ढापणे युक्ती बहुतेक चालत नाही.

मग तुमच्या नंबरने तो अंदाजाने एक दोन हजार काढतो. कारण ओटिपी तिकडे जातो तो वापरता येतो. त्यात त्याला बँलन्स कळतो. खूप शिल्लक दिसल्यावर आणि तुमचा फोन "मला पैसे मिळण्याऐवजी माझेच गेले" समजल्यावर दुसरी 'करेक्ट'
लिंक पाठवतो. आता तो balance मधले दोन हजार ठेवून बाकीचे काढतो, फोन सीम फेकून देतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jan 2021 - 7:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

सहसा आपण जीपे पेमेंट करण्यासाठी वापरतो तेव्हा कोड स्कॅन करुन पैसे पाठवतो किवा नंबरवर पाठवतो. इथे पैसे डेबिट होण्याची किवा "रिक्वेस्ट पेमेंट" म्हणुन लिंक येते आणि कामाच्या गडबडीत किवा एकिकडे फोन सुरु असल्याने अनवधानाने आपण ती क्लिक केल्यास पैसे डेबिट होतात.

सुबोध खरे's picture

15 Jan 2021 - 7:41 pm | सुबोध खरे

कामाच्या गडबडीत किवा एकिकडे फोन सुरु असल्याने
असे असताना कोणताही आर्थिक व्यवहार करू नये हा नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे.

हीच स्थिती वाहन चालवत असताना कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. एकीकडे फोन वर बोलत असताना वाहन चालवणारे रस्तोरस्ती दिसतात.

बहुतांश लोकांच्या फोन वर फालतू व्हाट्स ऍप्पची नोटिफिकेशन येत राहतात आणि त्यात महत्त्वाचे असे आर्थिक नोटिफिकेशन हरवून जाते असा अनेक वेळेस अनुभव येताना दिसतो.

+१^१
तीव्र सहमती.

चौथा कोनाडा's picture

16 Jan 2021 - 1:27 pm | चौथा कोनाडा

+१०^१०
अतितीव्र सहमती.

तुमच्यासाठी तुमचे नेटबँकिंग खाते ओपरेट करते तुम्ही रेजिस्टर केलेला लॉगिन डेटा वापरून.
पण स्मार्टफोन नसलेला फोन वापरला तर त्यातून ओटिपी कॉपी करता येणार नाही.
म्हणजे असं की एक डब्बी फोनमध्ये नेट बँकिंगला जोडलेले सिम कार्ड ठेवायचे. आणि इतर काम android स्मार्टफोनातून करायचे.

मी विंडोजवाला स्मार्टफोन ओटिपीसाठी ठेवला आहे. सिम चालू ठेवण्याचे ४९ रु महिना भरतो.

मी देखील असेच करत होतो पण आयसीआय आणि इतर काहि बँकांचे मोबाईल बँकींग अ‍ॅप्स हे ओटिपी वाले सिम आणि अ‍ॅप असलेला मोबाईल एकच असेल तरच चालते त्यामुळे तुम्ही सांगीतलेला ऑप्शन बरेदचा बाद होतो. दुसरा एक उपाय म्हणजे आपला बँकींग शी संबंधीत मोबाईल क्रमांक वेगळा ठेवणे व तो रोजच्या व्यवहारासाठी न वापरणे आणि कोणाला ही न देणे.

सतिश गावडे's picture

14 Jan 2021 - 8:18 pm | सतिश गावडे

आयसीआय आणि इतर काहि बँकांचे मोबाईल बँकींग अ‍ॅप्स हे ओटिपी वाले सिम आणि अ‍ॅप असलेला मोबाईल एकच असेल तरच चालते त्यामुळे तुम्ही सांगीतलेला ऑप्शन बरेदचा बाद होतो.

यावर उपाय म्हणजे मोबाईल बँकींग अ‍ॅप्स न वापरणे. गरज असेल तेव्हा त्यांच्या नेट बँकींग वेबसाईटला लॉगिन करुन काम करणे :)

धर्मराजमुटके's picture

14 Jan 2021 - 8:30 pm | धर्मराजमुटके

बरेचसे काम तसेच करतो. मात्र कधी कोणाला अर्जंट पैसे द्यायचे असले तर गोची होते. मग कोणाला तरी सांगून करुन घेतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jan 2021 - 8:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

प्रत्येक वेळी मोबाईल बँकिंग अ‍ॅप वापरण्या ऐवजी जीपे किवा दुसरे यु पी आय वापरणे सोपे जाते. पण अकाउंटला जास्त पैसे लिक्विड न ठेवणे हे कधीही चांगले.
आता यु पी आय व्यवहारांना आर बी आय चार्जेस लावणार आहे म्हणे. मग काय पर्याय निघतील काय माहित?

या साठी मी 2 अकाउंट वापरतो. सॅलरी अकाउंट आयचिआयचीआय मध्ये. आणि फुटकळ वापरासाठी आयडीबीआय. पण आयडीबीआय बहुतांशी व्यवहारात फेल होणारं अकाउंट आहे. ऐनवेळी धोका देतं.

कंजूस's picture

14 Jan 2021 - 8:52 pm | कंजूस

यावर उपाय म्हणजे मोबाईल बँकींग अ‍ॅप्स न वापरणे. गरज असेल तेव्हा त्यांच्या नेट बँकींग वेबसाईटला लॉगिन करुन काम करणे



हो. स्टेटबँकेची साइटच वापरतो. किंवा रिचार्ज/बिलातून साइटचे पान उघडून मिळते ते. SBIचं YONO app वापरत नाही.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2021 - 8:02 pm | मुक्त विहारि

जुन्याच पद्धती योग्य होत्या

नीळा's picture

14 Jan 2021 - 8:32 pm | नीळा

मी एक टिफिन सर्व्हीस चालवतो. मला बरेच फेक लोक फोन करतात. ईंडीअन आर्मी से बोल रहा हु. ओनलाईन पेमेंट करैंगे...हमारी जीप आयेगी डब्बे लेने...आधी त्यांना वीचारायचो कुठली बटालीयन...वगैरे.....

परवा विचारतो मला एक टिफिन का क्या चार्ज?
मी म्हणालो दो लाख रुपया....

येड पीसाळल की .।।घान घान शीव्या द्यायला लागल की..

आनन्दा's picture

14 Jan 2021 - 10:19 pm | आनन्दा

हा हा.
मला असा फोन आला होता.. सर तुमचं क्रेडिट कार्ड ब्लॉक होतंय, पटकन नंबर सांगा, extend करतो म्हणून.
म्हणलं माझ्याकडे 4 कार्ड आहेत, त्यातलं कोणतं ते सांग आधी..

डायरेक्ट माय बहीण सुरू केलं त्याने..

सुबोध खरे's picture

15 Jan 2021 - 7:50 pm | सुबोध खरे

मला पण असाच फोन आला होता. तेंव्हा मला भरपूर वेळ होता.

मी त्याला "शहाणा कि वेडा" असा मराठीत प्रश्न विचारला.

सुरुवातीला त्याला कळलंच नाही. मग त्याने घाण शिव्या द्यायला सुरुवात केली.

एक मिनिटाने मी त्याला सांगितले कि तू आत्ता रागाच्या भरात आहेस.

शांत झालास कि तुझ्या आई आणि बापाला घेऊन ये

आपण त्यांचं लग्न करून देऊ.

त्याने भरपूर शिव्या देऊन फोन बंद केला.

यानंतर मी तो फोन नंबर कारवाले, कारदेखो, कार ट्रेड, बजाज फायनान्स या सर्व वेब साईट वर पंडितजी आणि चिमा साहेब या नावे रजिस्टर करून त्यांना डिसेंबर मधल्या डिस्काउंट स्कीम बद्दल देताय फोन करायला सांगितले.

थोडा वेळ पोट भरून हसलो आणि नंतर तो फोन ब्लॉक केला.

टवाळ कार्टा's picture

15 Jan 2021 - 8:51 pm | टवाळ कार्टा

=))

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jan 2021 - 11:53 am | राजेंद्र मेहेंदळे

कसला भारी सूड घेतलाय डॉक्टरसाहेब

एक गोष्ट जी मला इथे हायलाईट करावीशी वाटते की बऱ्याच वेळेला हे लोकं आपण इंडियन आर्मी मध्ये नोकरी किंवा ऑफिसर आहोत असे सांगतात..
कारण सर्वसामान्य लोकांमध्ये आर्मीबाबत एक आदर आणि विश्वास आहे. त्यामुळे आपण आर्मीत आहोत असे सांगितल्यावर पुढच्या माणसाचा विश्वास संपादन करणे सोपे जाते.

फक्त वस्तु विकत घेण्याच्या बहाण्याने नाही तर कधी कधी वस्तु विकण्याच्या बहाण्याने पण फसवतात. मी एकदा गाडी विकत घेत होतो. Olx वर अगदी कमी किमतीत ऍक्टिवा दिसत होती. कॉल केला असता truecaller वर XYZ इंडियन आर्मी असं नाव दिसत होते. कॉल केल्यावर गाडी पुण्यात माझ्या वडिलांची बदली चंदीगड येथे मिलिटरी एरियात झालीये आणि त्यामुळे गाडी लवकरात लवकर विकायची आहे म्हणूनच गाडीची किंमत इतकी कमी लावली आहे. . गाडी घेणार असताल तर मला आत्ता xxxx ऍडव्हान्स द्या मग मी इतर कोणाला गाडी विकणार नाही. आणि ती किंमत आपण final अमाऊंट मध्ये अड्जस्ट करू..

कित्येक जण स्वस्तात गाडी मिळतंय म्हणून टोकन अमाऊंट च्या स्वरूपात ही रक्कम लगेच ट्रान्सफर करतात आणि फसतात.