लळा जिव्हाळा शब्दच खरे..!

Primary tabs

आकाश महालपुरे's picture
आकाश महालपुरे in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amलळा जिव्हाळा शब्दच खरे..!

'लळा जिव्हाळा शब्दच खोटे' असं गाणं ऐकलं. कदाचित ते शब्द चित्रपटाच्या कथानकासाठी तसे असतील, पण लळा, जिव्हाळा कसा जपायचा असतो हे मात्र मला नुकतंच पाहायला मिळालं. मग जाणवलं, लळा जिव्हाळा शब्दच खरे आहेत. त्यासाठी वेळ लागत नाही, मन असावं लागतं.
आयुष्याच्या थकबाकीचा हिशोब लावायला जोडीदाराची साथ लागतेच!

काल-परवाकडे पाळधीवरून एक वयस्कर जोडपं जळगावला आलं होतं.
कदाचित ते दवाखान्यात प्रकृती दाखवायला आले असावेत..
हे मला त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.
दवाखान्यासमोरच असलेल्या बगिचातील बाकावर बसून ते भुकेने व्याकूळ होऊन घरच्या शिदोरीचा आस्वाद घेत होते आणि गप्पा मारत होते. त्यांच्या पोटात जाणारा एक एक घास जणू मुखी पांडुरंगाची साद घालत होता आणि उभ्या आयुष्यात एकमेकांची साथ काय असते हे दर्शवत होता.
खूप बरं वाटलं त्यांच्याकडे बघून आणि मनाशीचं म्हटलं - खरंच, प्रेम असावं तर असं.. जे शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल.. अगदी परमेश्वरालाही प्रश्न पडायला हवा.. आपण एक जीव घेऊन चाललोय की दोन!

त्यांनी माझ्याकडे पाण्याची मागणी केली. "लेका, आम्हाला पाणी तरी आणून दे रे.."
मी म्हणालो, "बरं, देतो आणून."
मला ना, त्याच वेळेस त्यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमामुळे, जिव्हाळ्यामुळे त्यांचा नकळत फोटो घेण्याचा मोहच आवरला गेला नाही.
मी तो घेतला आणि त्यांना दाखवलादेखील.
त्यांनी फोटो पाहिला आणि त्यांना खूप खूप आनंद झाला. अगदी नवीन जोडप्यासारखे दोघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि हसू लागले.
"तुम्ही आजकालची मुलं ना.. काहीही करता."
फोटो पाहून त्यांनी अगदी पटकन आनंदाने प्रतिक्रिया दिली. कदाचित ते वारकरी संप्रदायचे असतील असं मला वाटलं. मी त्यांना त्याबद्दल विचारलं आणि ते म्हणालेही, "आज जे काही अहोत, ते या विठूमाउलीच्या आशीर्वादामुळेच."

मी तिथून जाण्यासाठी निघालो. पण आज्जीबाईंनी परत मला आवाज दिला आणि म्हणाली,
"अरे लेकरा, काय करणार आमच्या या फुटूचं?"
या प्रश्नांने मी थोडा दचकलो आणि थोडं मिश्कीलपणे हसत तसाच उभा राहिलो. तेदेखील मिश्कील हसत माझ्याकडे नजर रोखून उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागले आणि म्हणाले, "बोल रे.. लेका, घाबरू नको."
मी विचार केला - यार, काय उत्तर देऊ मी यांना आता? का काढला असावा मी यांचा फोटो?
फोटो काढत असताना‌‌ माझ्या मनात यांच्याविषयी प्रथम उमटलेली भावना काय होती?
थोडा कामात होतो, पण काहीही न बोलता निघून जाणं मला योग्य वाटलं नाही.

मी समोरील खुर्चीवर नि:शब्द बसलो आणि थोडा विचार करायला लागलो.
"आज्जी-आजोबा, तुमच्याकडे पाहून खरंच मनातील ओलावा जिवंत झाल्यासारखं वाटलं. आपलेपणाचं दर्शन झालं. जीवनाच्या शेवटच्या प्रवासापर्यंत अगदी सोबत..
सांगायचं तात्पर्य एवढंच. नाहीतर आज-कालची पती-पत्नी जुनी शिदोरी उपयोगात आणायची सोडून पिझ्झा-बर्गर ब्रेकफस्ट करून तुझं-माझं ब्रेकअप करतात."

आज्जी-बाबांनी त्यावर अगदी सुंदर शब्दात उत्तर दिलं..
ती भावना होती. तो काळ वेगळा होता. त्या काळातील दांपत्यजीवन हे सुसंवाद, परस्परांबद्दल प्रेम आणि विश्वास, पती-पत्नी नात्यांचा योग्य आदर यांनी ओतप्रोत भरलेलं होतं आणि म्हणूनच ते सुखी-संसाराची गाथा मांडत होते.
"आजकाल मुलं ना.. आईबापाला विचारतसुद्धा नाहीत, त्यांच्यासह राहत नाहीत. लाखो रुपये उधळून लग्न झालं न झालं तं वर्षाकाठीस वेगळे होतात. आपल्या स्वार्थापुढे कोणाचाही आदर नाही, सन्मान नाही. रोजच्याच जगण्यात आजूबाजूला हेच पाहतोय आम्ही."
मी म्हणालो, "पण मला ना, तुमच्या या प्रवाहाकडे पाहून एक वेगळंच आंतरिक समाधान वाटलं. मला माहीत नाही तुमची मुलं, मुली किंवा नातवंडं तुम्हाला सांभाळतात की नाही, पण तुमच्या एकमेकांबद्दलच्या जिव्हाळ्याने मी भारावून गेलो.
तुम्ही उभ्या आयुष्यात खूप उन्हाळे-पावसाळे बघितले असतील, कित्येक संकटं आली असतील, वाद-विवाद झाले असतील. पण तुमच्या एकमेकांच्या काळजीपुढे हे सारं नतमस्तक झालं असावं.. असचं मला वाटतं."

दोघांनीही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि मी त्यांच्याकडे पाहिलं.
त्यांनी ओघळणारे अश्रू लपवले नाहीत. मुक्तपणे वाहू दिले.
इतक्या निर्मळ मनाचे हे आज्जी-आजोबा मी आजवर बघितले नव्हते.

अगदी एकमेकांसोबत.. जगायचं तर शेवटच्या श्वासापर्यंत..
दोघांनाही मोठ्या कौतुकाने मला एक एक घास भरवला, "सुखी रहा" असा आशीर्वाद दिला आणि म्हणाले,
"आयुष्यात खुप मोठा हो! पण आई-बापाला आणि समाजाला कधीही विसरू नको. त्यांचाबरोबर जगण्याची मजा काही वेगळीच असते."

आकाश दीपक महालपुरे
मु.पो.गोंदेगाव ता.सोयगाव
जि.औ.बाद.
मो.नं..7588397772

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 4:31 pm | टर्मीनेटर

@आकाश महालपुरे

'लळा जिव्हाळा शब्दच खरे..!'

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

प्रचेतस's picture

23 Nov 2020 - 2:51 pm | प्रचेतस

छान आहे.

मुक्त विहारि's picture

24 Nov 2020 - 9:45 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2020 - 10:28 am | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख लिहिले आहे
आवडले
पैजारबुवा,

नूतन's picture

26 Nov 2020 - 7:13 pm | नूतन

छान

बबन ताम्बे's picture

27 Nov 2020 - 5:41 pm | बबन ताम्बे

आवडला लेख.