दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
16 Nov 2020 - 11:50 pm

दुबई : मरूभूमितले नंदनवन - भाग १

📢   हे प्रवासवर्णन एका दीर्घ लेखाच्या स्वरुपात यंदाच्या मिपा दिवाळी अंकासाठी लिहायला घेतले होते. परंतु प्रयत्न करूनही ते लेखन पाठवण्यासाठी वाढवून दिलेल्या मुदतीतही लिहून पूर्ण झाले नाही त्यामुळे दिवाळी अंकात नाही तर किमान दिवाळीत तरी ते मिपावर प्रकाशित करावे ह्या उद्देशाने हे प्रवासवर्णन आता पूर्ण करत करत तीन किंवा चार भागात प्रकाशित करत आहे.

प्रस्तावना :-
नमस्कार मिपाकरांनो,
गेल्या तीन वर्षांत अनेकदा ठरवूनही काही ना काही कारणांमुळे लिहायचे राहून गेलेले एक प्रवासवर्णन ह्या वर्षीच्या मिपा दिवाळी अंकासाठी लिहून पाठवायचे ठरवले होते. यंदाचा मिपा दिवाळी अंक हा "प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांक" असल्याचे आवाहनाच्या धाग्यात वाचले आणि लेखन विषयाधिष्ठित असणे बंधनकारक नसल्याचा स्पष्ट उल्लेख आवाहनात असूनही प्रवास वर्णनपर लेखन दिवाळी अंकासाठी पाठवावे की नाही ह्या विचारात पडलो होतो.

दुसऱ्या दिवशी आवाहनाच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचताना मिपाकर ‘चौकटराजा’ ह्यांच्या प्रतिसादातील,
प्रेम - एखाद्या गोष्टीतील गुणाचा साक्षात्कार होताना दोषांचेही ज्ञान होऊन आकर्षण निर्माण होणे, त्या अनुषंगिक काळजी व कौतुक निर्माण होणारी मनाची अवस्था म्हणजे प्रेम. साहजिकच प्रेम ही द्वेषाच्या मानसिक अवस्थेची दुसरी बाजू आहे . जगातील अनेक समस्या प्रेमाने सोडविल्या आहेत व प्रेमानेच त्या निर्माण केल्या आहेत असे मानवी इतिहास सांगतो.
रोमान्स - कोणत्याही लहान सहान गोष्टीतही आनंद शोधण्याची मानसिक अवस्था म्हणजे रोमान्स.
शृंगार- कोणत्याही साधारण दिसणाऱ्या गोष्टीला सजवून, नटवून उत्तम कसे दाखवता येईल असा प्रयत्न प्रथम मनाकडून मग शरीराकडून होणे म्हणजे शृंगार.
अशा प्रेम... रोमान्स...आणि शृंगाराच्या नव्या व्याख्या वाचल्या, आणि ह्या तिन्ही कसोट्यांवर हे लेखन खरे उतरेल अशी धारणा झाल्याने हे प्रवास वर्णन लिहायचे निश्चित केले!

वीस वर्षांपूर्वी म्हणजे २००० सालच्या नोव्हेंबर महिन्यात सिमला-कुलू-मनाली-वैष्णोदेवीच्या ट्रीपला गेलो असताना, त्यावेळी इयत्ता बारावीत शिकत असलेली सहप्रवासी अदिती आणि माझी पहिली भेट ट्रीपच्या पहिल्या दिवशी दिल्लीत झाली होती. लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे सारखा काही प्रकार नव्हता पण वरील व्याख्ये प्रमाणे आधीची काही वर्षे मैत्री, मग एकमेकांतल्या गुण-दोषांचा साक्षात्कार होऊन आकर्षण, प्रेम निर्माण होत पुढे प्रेम-विवाह असा ह्या नात्याचा प्रवास झाला आणि दरवर्षी लग्नाचा वाढदिवस शक्यतो परदेशी पर्यटनाला जाऊन साजरा करण्याच्या आमच्या परंपरेचे पालन करताना एकमेकांच्या सोबतीने हि सफर घडलेली असल्याने त्यात ‘प्रेम’ आहे.
कोणत्याही लहान सहान गोष्टीतही आनंद शोधण्याची सवय आम्हाला असल्याने त्यात ‘रोमान्स’ पण आहे.
तसेच लेखनात फारशी गती नसली तरी अतिशय साधारण अशा ह्या लेखाला यथाशक्ती नटवून, सजवून सादर करण्याचा प्रयत्न इथे करतोय त्यामुळे त्यात ‘शृंगार’ सुद्धा आहे.
अर्थात हे झाले माझे विचार आणि माझ्या कल्पना, प्रत्यक्षात तसे काही नाही आढळले तरी मिपाकर मोठ्या मनाने सांभाळून घेतील हा विश्वास देखील आहेच!

पूर्वतयारी :-
२ एप्रिल हा आमच्या लग्नाचा वाढदिवस. तो दिवस मध्यवर्ती ठेऊन पर्यटनाला जाण्यासाठी मला सुट्ट्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता पण अदितीला काही कार्यालयीन जवाबदाऱ्यांमुळे ३१ मार्च ते ४ एप्रिल असे एकूण पाचच दिवस सलग सुट्टी मिळणे त्यावेळी शक्य होते.

पाच दिवसात पर्यटनाच्या नावाखाली प्रवाशांची प्रचंड दमछाक करत एका किंवा दोन-तीन शेजारी देशांमधली ठराविक आकर्षणे दाखवून आणणाऱ्या पॅकेज टूर्सचे पर्याय जगभर उपलब्ध असतात, परंतु 'Package Tour' पेक्षा 'Leisure Travel' आम्हाला आवडत असल्याने नेहमीप्रमाणे स्वतःच टूरचे नियोजन करायला घेतले. काही वर्षांपूर्वी कामानिमित्ताने माझा एका रात्रीसाठी आणि अदितीचा लंडन ते मुंबई डायरेक्ट फ्लाईटचे बुकिंग उपलब्ध नसेल तेव्हा 'Emirates'ने केलेल्या प्रवासादरम्यान काही तासांचा ले-ओव्हर/फ्लाईट चेंज असल्याने अनेकदा दुबईच्या भूमीला पदस्पर्श झालेला होता. परंतु दोघांनाही त्यावेळी तिथली पर्यटन स्थळे पाहता आली नसली तरी आम्हाला ती कायमच आकर्षित करत असल्याने मग, फार लांबचा प्रवास पण नाही आणि एंजॉय करता येण्यासारख्या अनेक ठिकाणांमधून आपल्या आवडीनुसार निवड करण्याचे बरेच पर्याय उपलब्ध असल्याने दुबईला जाण्याचे ठरले.

शारजाला राहणाऱ्या एका मित्राकडून कानू ट्रॅव्हल (Kanoo Travel) नावाची कंपनी संपूर्ण युएई मध्ये दर्जेदार पर्यटन विषयक सेवा, सुविधा देत असल्याचे समजल्याने त्यांच्या वेबसाईटवर संपर्क साधला. त्यांच्याकडून आलेल्या उत्तरात त्यांनी आम्हाला हवी असलेली माहिती आणि मार्गदर्शनासाठी भारतातील दिल्लीस्थित ‘DestynAsia Holidays’ नावाची त्यांची संलग्न कंपनी आता आमच्या संपर्कात राहील असे कळवले.

त्यांनी कळवल्या प्रमाणे ‘DestynAsia’ ची प्रतिनिधी असलेल्या प्रगती शर्मा नावाच्या मुलीचा फोन आला आणि तिने आवश्यक तेवढी माहिती विचारून घेतली. थोड्याच वेळात व्हिसा, विमानाच्या जाण्या-येण्याच्या वेळा आणि त्यानुसार बदलणाऱ्या तिकिटांच्या किमती, फाईव स्टार/फोर स्टार/थ्री स्टार असे हॉटेल्स चे पर्याय आणि रूमच्या किंमती, भेट देण्यासारख्या ठिकाणांची यादी/ त्यांची प्रवेश फी, प्रायव्हेट टूर्स आणि सीट-इन-कोच चे पर्याय आणि त्यांचे दर, एअरपोर्ट ट्रान्सफर साठी अगदी अलिशान लिमोझिन पर्यंतचे पर्याय आणि त्यांची भाडी अशी भरपूर माहिती असलेली ईमेल तिने पाठवली.

विमानाची तिकिटे आम्ही 'त्यांचे निष्ठावान ग्राहक' असल्याचे बक्षीस म्हणून विशेष सवलत देऊ करणाऱ्या 'मेक माय ट्रीप' वरून स्वतःच बुक केली आणि हॉटेलची रूम स्वतः बुक करण्यापेक्षा DestynAsia तर्फे बुक करणे स्वस्त पडत असल्याने ते काम आणि बाकी सर्व गोष्टींचे बुकिंग जसे कि एअरपोर्ट ट्रान्सफर, निवड केलेल्या ठिकाणांच्या फुल डे / हाफ डे टूर्स आणि यु.ए.ई. व्हिसा वगैरे गोष्टी त्यांच्यावरच सोपवायचे ठरले.

त्यानंतर तीन-चार दिवस रोज आमचा आज हॉटेलच बदल, तर उद्या एखादे ठिकाण बदल, मग परवा आधी ठरलेल्या एखाद्या दिवसाचा कार्यक्रमच बदल असा खेळ ईमेल वर उत्तर-प्रत्युत्तरातून चालू होता. प्रगतीने अजिबात न कंटाळता त्याबरहुकूम आमची सर्व बुकिंग्ज करून दिली आणि आमचा चार दिवस आणि चार रात्री दुबईत व पाचव्या दिवशी घरी परत असा एकूण पाच दिवसांचा कार्यक्रम तयार झाला. सर्व बुकिंग्जचे पैसे भारतीय चलनात भरून झालेले होते त्यामुळे दुबईतील खरेदीची सारी भिस्त डेबिट/क्रेडीट कार्डसवर ठेऊन निघण्याच्या दोन दिवस आधी किरकोळ खर्चासाठी म्हणून थोडेफार दिरहम घेतल्यावर प्रवासाची तयारी पूर्ण झाली.

दिवस पहिला :-
शुक्रवार दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी सकाळी साडे आठ वाजता इंडिगोची मुंबई-दुबई फ्लाईट असल्याने त्याआधीचे विमानतळावरील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ हाताशी ठेऊन आम्ही पहाटे साडेपाचला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजर झालो. फ्लाईट ड्यूरेशन साडेतीन तासांचे होते आणि उड्डाण वेळेवर झाल्याने स्थानिक वेळेतील दीड तासाच्या फरकानुसार सकाळी साडेदहाला दुबईला पोचलो.

इमिग्रेशन साठी बरीच गर्दी असल्याने त्यात आणि बॅगेज कलेक्शन मधे जवळपास तासभर गेल्यावर मग प्रचंड विस्ताराच्या दुबई एअरपोर्ट वरून बाहेर पडण्यासाठी असलेल्या शटल ट्रेनने अगदी काही मिनिटांचा प्रवास करून पावणे बारा वाजता बाहेर आलो.

आदल्या दिवशी प्रगतीने फोन करून कळवल्या प्रमाणे आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी आलेला कानू ट्रॅव्हलचा 'झुबेर' नावाचा प्रतिनिधी गेटवर आमच्या नावाची पाटी घेऊन उभा होता. आमची भेट झाल्यावर त्याने पार्किंग मधे थांबलेल्या ड्रायव्हरला फोन करून गाडी तिथे घेऊन येण्यास सांगितले आणि एक मोठा लिफाफा माझ्या हातात दिला ज्यात आमच्या हॉटेलच्या बुकिंग पासून प्रत्येक दिवसाच्या प्रवासाची व्हाउचर्स आणि पर्यटन स्थळांची एंट्री टिकेट्स अशी कागदपत्रे होती. गाडीत बसल्यावर त्याने तो लिफाफा मला उघडायला सांगितले आणि त्यातल्या व्यवस्थित क्रमानी लावलेल्या व्हाउचर्स मधले पहिले व्हाउचर जे आत्ताच्या आमच्या एअरपोर्ट ट्रान्सफरसाठीचे होते ते हॉटेलवर पोचल्यावर ड्रायव्हरला देण्यास सांगितले. अशाच प्रकारे प्रत्येक वेळचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर त्या लिफाफ्यातल्या पोचपावत्या त्यावेळी आलेल्या ड्रायव्हरला देण्याच्या व कधीही, कुठेही काही समस्या उद्भवली तर कुठल्या क्रमांकावर फोन करायचा वगैरे सूचना आणि सहलीसाठी शुभेच्छा देऊन त्याने आमचा निरोप घेतला. एअरपोर्ट पासून जेमतेम बारा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर डेरा (Deira)भागात असलेल्या आमच्या 'फॉर्च्युन पर्ल' हॉटेलवर पोहोचून रूम ताब्यात मिळेपर्यंत साडे बारा वाजले.

हॉटेल छान होते. त्यात एकूण १३१ रूम्स, तळ आणि पहिल्या मजल्यावर भारतीय, दक्षिण भारतीय, पाकिस्तानी, श्रीलंकन बार आणि रेस्टॉरंटस तसेच एक कॅफे लाउंज, एक स्पोर्ट्स बार आणि एक आफ्रिकन डिस्को अशा खाण्या-पिण्याच्या आणि मनोरंजनाच्या सोयी होत्या, गच्चीवर स्विमिंगपूल होता. आम्हाला देण्यात आलेली दुसऱ्या मजल्यावरची रूम पण मस्त होती.

▲ हॉटेल 'फॉर्च्युन पर्ल' चा फोटो त्यांच्या वेबसाईट वरून साभार.

आता भुकेची जाणीव व्हायला लागल्याने फ्रेश होऊन एकच्या सुमारास आम्ही जेवायला खाली उतरलो. आमच्या हॉटेलमध्ये जेवणाची सोय उपलब्ध असूनही आम्ही तिथल्या उपहारगृहांत न जाता, एक इमारत सोडून त्या पुढच्या इमारतीत असलेल्या 'लाहोरी पकवान' नावाच्या एका पाकिस्तानी रेस्टॉरंट मध्ये गेलो, आणि त्याला कारणीभूत होता आम्हाला थोड्या वेळापूर्वी एअरपोर्ट पासून हॉटेलवर घेऊन येणाऱ्या गाडीचा ड्रायव्हर 'हबीब'! पाकिस्तानातील रावळपिंडीचा हा मध्यमवयीन हबीब गेल्या अनेक वर्षांपासून कानू ट्रॅव्हल मधे नोकरी करत असल्याने त्याला दुबईचा काना कोपरा माहिती होता आणि आजतागायत असंख्य भारतीय पर्यटकांच्या संपर्कात आल्याने भारतीयांच्या आवडी-निवडींचीही त्याला चांगली कल्पना होती. आमचा निरोप घेऊन निघताना "तुम्ही ह्या हॉटेल मधे मुक्कामाला आहात तर इथून चार पावलांवर असलेल्या 'लाहोरी पकवान' मधे एकदातरी जरूर जेवायला जा, तुम्हाला अस्सल पंजाबी खाद्यपदार्थांची लज्जत चाखायला मिळेल!" असा सल्ला त्याने दिला होता.

रेस्टॉरंटचा असा बोर्ड बघून आम्ही तिथे जेवायला जाण्याचा काय चहा/कॉफी प्यायलाही जाण्याचा कदाचित कधी विचार केला नसता. पण केवळ हबीबच्या अनुभवी सल्ल्याचा मान ठेऊन ते धाडस केले आणि काय सांगावे महाराजा, आम्ही चक्क तिथल्या ऑथेंटिक पंजाबी पदार्थांच्या चवीच्या प्रेमातच पडलो. आपल्या इथे पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील काही ठराविक ठिकाणे सोडली तर हल्ली अशी खास चव मिळणे दुरापास्त झाले आहे. उर्वरित भारतात (काही धाबे आणि रेस्टॉरंटचा अपवाद वगळता) विशेषतः शेट्टी लोकं चालवत असलेल्या हॉटेल्समध्ये पंजाबी डिशेसच्या नावाखाली ती एक टिपिकल काजूची ग्रेव्ही आणि रंग वापरून बनवलेले जे पदार्थ आपल्या माथी मारले जातात त्यांचा तर आता उबग आला आहे.

असो, ह्या दुमजली रेस्टॉरंटची अंतर्गत सजावट पारंपारिक पद्धतीची होती. त्यात रंगीत, झगझगीत किंवा मंद प्रकाशयोजना टाळून पांढऱ्या रंगांचा आणि पांढरा प्रकाश देणाऱ्या दिव्यांचा वापर केला होता. दोन मोठाल्या फिश टँक्स होत्या, आणि प्रत्येक भिंतीवर सुंदर पेंटिंग्ज आणि 50+ इंचांचे LED टी.व्ही. लावले होते आणि त्यांवर 'कोक स्टुडीओ' (पाकिस्तान) च्या आधी झालेल्या सिझन्सचे एपिसोड्स सतत लावलेले असत. आमच्या दुबईतील वास्तव्यात पाच वेळा जेवायला आणि एकदा लस्सी प्यायला ह्या ठिकाणी येणे झाल्यामुळे अनेक एपिसोड्स बघायला मिळाले आणि त्यावर अबिदा परवीन, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम अशा प्रस्थापित व परिचित, तसेच कुर्तलेन बलोच, उमेर जस्वाल, गुल पनरा अशा आणि कित्येक बलुची, पश्तून, पंजाबी आणि अफगाणी नवोदित गायक आणि गायिकांनी गायलेली अनेक सुंदर गाणी बघायला-ऐकायला मिळाली. तेव्हापासून अधून मधून कोक स्टुडीओचे एपिसोड्स युट्युब वर पाहण्याचा छंद आम्हाला जडला आहे.

▼ रेस्टॉरंटचे आणि मेनुचे काही निवडक फोटोज. (फोटोंवर क्लिक केल्यास ते एनलार्ज/मिनिमाईझ होतील)

×

▲ सर्व फोटो लाहोरी पकवान रेस्टॉरंटच्या फेसबुक पेज वरून घेतले असून मेनू वरील दर जुने आहेत.

वास्तविक भारत विरोधी कारवाया आणि दहशतवादी कृत्ये करणाऱ्या पाकिस्तान विषयी बहुतांश भारतीयांच्या मनात जो एकप्रकारचा संताप असतो तसा संताप आमच्याही मनात नक्कीच आहे, मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीचे अवशेष पाहण्यासाठी नाईलाजाने का होईना पण पुढे कधीतरी त्या नापाक इरादे ठेवणाऱ्या देशाला भेट दिली जाण्याची शक्यताही आहे. परंतु यु.ए.ई. सारख्या त्रयस्थ देशातील दुबईमध्ये आम्हाला भेटलेले ड्रायव्हर्स (सगळेच पाकिस्तानी होते), साठीच्या आसपास वय असलेले लाहोरी पकवानचे मालक रशीद भाई आणि तिथला शेफ ( त्याचे नाव आता विसरलो ) , आणि हॉटेलच्या स्टाफ पैकी काही पाकिस्तानी लोकांबाबत मात्र चांगला अनुभव आला. फक्त व्यावसायिक शिष्टाचार-सौजन्य म्हणून ती माणसे अशी शालीनतेने, आपुलकीने वागत, बोलत होती असे मानणे अयोग्य ठरेल कारण जर खरोखरीच ती भेटलेली माणसे सुस्वभावी असतील तर ते त्यांच्या चांगुलपणावर विनाकारण अविश्वास दाखवल्या सारखे होईल, त्यामुळे एकंदरीत अनुभव चांगला होता असेच नमूद करू इच्छितो. अनेक विषयांवर त्यांच्याशी थोड्याफार गप्पा झाल्या, पण दोन उघड-उघड शत्रुत्व असलेल्या देशांतील नागरिक एकमेकांशी बोलत आहेत असे कधीच जाणवले नाही. आमच्या देशात रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असत्या तर आम्हाला कुटुंबीयांपासून दूर राहून इथे अरबांची गुलामी करण्याची वेळ आली नसती अशी खंत त्यातल्या बहुतेकांनी व्यक्त केली होती.

जेवण झाल्यावर आम्ही चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या एका सुपर मार्केट मध्ये गेलो. तिथे परवाच्या अ‍ॅक्वाव्हेंचर वॉटर पार्क सहलीसाठी पाण्यात घालण्याच्या कपड्यांची आणि काही कॉस्मेटिक्स, ज्यूसचे कॅन्स, चॉकलेट्सची खरेदी केली. आता नाव आठवत नाही पण 'S' ह्या इंग्रजी आद्याक्षराने नाव सुरु होणाऱ्या त्या सुपर मार्केट मध्ये जीवनावश्यक वस्तूंबरोबरच अनेक विलक्षण गोष्टीहि विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. तो पर्यंत ऐकून-वाचून माहिती असलेला 'चायनीज सेक्स डॉल' हा प्रकार प्रत्यक्षात तिथेच पहिल्यांदा पाहायला मिळाला आणि मानवाच्या कल्पकतेचे कौतुक वाटून 'गरज हि शोधाची जननी आहे ' ह्या म्हणीच्या सत्यतेचा पुनःप्रत्यय आला.

खरेदी उरकून हॉटेलवर परतेपर्यंत साडेतीन वाजले होते. संध्याकाळी सात ते रात्री दहा 'दुबई मरीना' येथे 'धाऊ क्रुझ विथ फाइव्ह स्टार डीनर' असा पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि त्यासाठी साडेसहाला पिकअप करायला ड्रायव्हर येणार होता. परंतु त्यादिवशी शुक्रवार म्हणजे तिथला साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने संध्याकाळी ट्राफिक जाम होण्याची शक्यता बरीच असल्याने अर्धा तास आधी म्हणजे साडे सहा ऐवजी सहा वाजता पिकअप होईल असा झुबेरने आम्ही रुममध्ये नसल्याने खाली रिसेप्शनवर ठेवलेला निरोप चावी देताना रीसेप्शनीस्टने आम्हाला सांगितला. आज पहाटे साडेपाचला एअरपोर्ट वर पोहोचण्यासाठी मध्यरात्री तीन वाजता घरातून बाहेर पडल्याने पुरेशी झोप झाली नव्हती. पिकअप साठी अजून अडीच तासांचा अवकाश होता. अर्धा तास आवारा-आवरी साठी ठेऊन दोनेक तास आरामासाठी उपलब्ध असल्याने तेवढा वेळ मस्तपैकी झोप काढण्याचा आम्ही घेतलेला निर्णय साडेपाचचा आलार्म लाऊन लगेच अंमलातही आणला. जागरणामुळे असेल कि लाहोरी पकवान मध्ये जेवणानंतर खाल्लेल्या 'रस मलाई' मुळे असेल पण बेडवर पडल्या पडल्या झोप मात्र लगेच लागली.

साडेपाचला आलार्म वाजल्यावर उठून तयारी झाल्यावर आम्ही खाली उतरायला रूम मधून बाहेर पडणार तेवढ्यात रिसेप्शन वरून पिकअप साठी ड्रायव्हर आल्याचे सांगणारा फोन इंटरकॉम वर आला. 'टोयोटा प्राडो' ह्या एस.यु.व्ही. मधून आमचा हॉटेल ते दुबई मरीना असा ३० किलोमीटर्सचा प्रवास सुरु झाला.


सुट्टीच्या दिवसाची संध्याकाळ असल्याने मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकही बाहेर पडल्याने रस्त्यावर वाहनांची प्रचंड रहदारी होती. ठीक ठिकाणी सिग्नल्सवर आणि चौकांमध्ये ट्राफिक जाम लागत होता. विविध गाड्यांची इत्यंभूत माहिती असणारा अल्ताफ नावाचा आत्ताचा ड्रायव्हर खूप बोलका होता. आजू बाजूला दिसणाऱ्या एक से बढकर एक अलिशान गाड्यांची माहिती त्यांच्या वैशिष्ठ्यांसाहित त्याच्या कडून ऐकायला मजा येत होती. साधारणपणे इथपर्यंत पोचायला २५-३० मिनिटे लागतात पण त्या दिवशी वाहतूक खोळंब्यामुळे तेच अंतर कापायला आम्हाला एक तास लागला आणि सात वाजता आम्ही धाऊ क्रुझ साठी असलेल्या जेट्टीवर पोचलो.

परत आल्यावर गाडी कुठे उभी असेल त्याची माहिती आणि गाडी शोधण्यास सोपे पडावे तसेच एकमेकांची चुकामुक झाल्यास परत भेटण्याचे ठिकाण परस्परांना माहित असावे म्हणून गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो, ड्रायव्हरचे नाव आणि मोबाईल नंबर आमच्या दोघांपैकी कुणीतरी एकाने दुसऱ्याला व्हॉट्सॲप वर पाठवून ठेवावे अशी उपयुक्त सूचना अल्ताफने दिली (ती सवय इथून पुढे आमच्या अंगवळणीच पडली). यत्र तत्र सर्वत्र वाय-फाय उपलब्ध असल्याने लगेच त्याप्रमाणे कृती करत असताना सव्वा सात ते पावणे आठ पर्यंत बोर्डिंग सुरु असते आणि एअर कंडीशन्ड लोअर डेक व ओपन एअर अप्पर डेक असे दोन पर्याय क्रुझ वर उपलब्ध असले तरी बहुतांश पर्यटकांची पहिली पसंती ओपन एअर अप्पर डेकला असल्याने उशिरा पोचल्यास वरती टेबल मिळणे कठीण जाते आणि नाईलाजाने मग लोअर डेकवर बसावे लागते. तुमच्या बाबतीत तसे होऊ नये म्हणूनच पिकअप अर्धा तास लवकर झाल्याचे त्याने सांगितल्यावर मात्र मग अजिबात वेळ न दवडता अप्पर डेक वर टेबल मिळवायला क्रुझ ऑपरेटरचे काउंटर गाठले. क्रुझचा फ्लोअर प्लॅन बघून इच्छित टेबल निवडून बोर्डिंग पास आणि वाटेत देण्यात आलेले सुगंधी फेस वाइप्स घेऊन अप्पर डेकवरील आमच्या सीट्स वर स्थानापन्न होताच वेलकम ड्रिंक आणि खजूर सर्व्ह करून आमचे स्वागत करण्यात आले.

अल्ताफने सांगितल्या प्रमाणे अप्पर डेक लवकरच पूर्ण भरला. बरेच पर्यटक ट्राफिक जाम मध्ये अडकल्याने उशिरापर्यंत बोर्डिंग सुरू होते. शेवटी वीस पंचवीस इराणी स्त्रिया, पुरुष आणि लहान मुला-मुलींचा एक तांडा क्रुझ वर चढला आणि मग सव्व्वा आठ वाजता नांगर उचलून मंद गतीने धाऊचा पाण्यातून प्रवास सुरु झाला.

'धाऊ' ( इंग्रजीत Dhow ज्याचा 'डाऊ', 'दाऊ', 'धो', 'धौ' अशा अनेक प्रकारे उच्चार केला जातो ) म्हणजे अरब लोकांची पारंपारिक लाकडी बोट. मग ती एकाच व्यक्तीने प्रवास करण्यासाठी बनवलेली लहान आकाराची होडी असो किंवा शे-दीडशे लोकांना सामावून घेण्याएवढे मोठे गलबत असो त्याला नाव एकच ते म्हणजे 'धाऊ'. आता ड्रोन टॅक्सीच्या चाचण्या घेण्याएवढी प्रगती केली असली तरी १९६० च्या दशकात खनिज तेल सापडेपर्यंत स्थानिक अमीराती (Emirates) लोकांची उपजीविका प्रामुख्याने मासेमारी आणि सागरतळातून मोती काढण्याच्या व्यवसायावर अवलंबून होती. त्या कामांसाठी तसेच त्यांच्या आसपासचे आखाती देश, पूर्व आफ्रिका, पाकिस्तान आणि भारताशी चालणारा खजूर, मासे आणि इतर पदार्थांच्या व्यापारासाठी अशा लाकडी धाउंचा वापर होत असे, किंबहुना तोच पर्याय त्यांना उपलब्ध होता. जेमतेम पन्नास-साठ वर्षांपूर्वीपर्यंत स्थानिक समाजजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ह्या धाऊ म्हणजे अमीराती लोकांचा मानबिंदू आहेत, त्यांच्या संस्कृतीचे ते एक प्रतिक आहे.

मोठ्या लाकडी धाऊचे तरंगत्या, चालत्या-फिरत्या रेस्टॉरंट मध्ये रुपांतर करून त्यातून जलपर्यटन घडवून आणणाऱ्या 'धाऊ क्रुझ' दुबईत दोन ठिकाणी चालतात. एक 'दुबई क्रीक' (Dubai Creek) येथे आणि दुसरे 'दुबई मरीना' (Dubai Marina) येथे. दोन्ही ठिकाणी दिसणारे देखावे आणि त्यांच्या किंमतीत भरपूर फरक आहे, तसेच त्यांत 'सनसेट क्रुझ' आणि 'डिनर क्रुझ' असे दोन प्रकार असून, त्यात पुन्हा थ्री स्टार, फोर स्टार, फाइव स्टार असे उपप्रकारही आहेत. 'दुबई क्रीक' येथे शहराला 'बर दुबई' आणि 'डेरा' जे अनुक्रमे जुनी दुबई आणि नवी दुबई म्हणून ओळखले जातात अशा दोन भागांत विभागणाऱ्या नैसर्गिक खाडी मध्ये क्रुझिंग होते. त्या ठिकाणी बर दुबई भागातील किनारी मार्ग, दाटीवाटीने असलेली जुनी घरे, बाजार असे ग्रामीण आणि डेरा भागातील आधुनिक स्वरूपाच्या व्यापारी, निवासी इमारती, असे शहरी दृश्य आणि कामकाजात व्यस्त असलेले लोकजीवन नजरेस पडते. तसेच खाडीत संयुक्त अरब अमीराती अंतर्गत मालवाहतूक करणाऱ्या धाउंची लक्षणीय वर्दळ पाहायला मिळते.

'दुबई मरीना' येथील कृझिंग हे आजची अत्याधुनिक दुबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मानवनिर्मित कृत्रिम कालव्यातून समुद्रात थोडे आतपर्यंत होते. कालव्याच्या दुतर्फा उभारलेल्या, आधुनिक स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना म्हणावा अशा गगनचुंबी इमारती, पंचतारांकित हॉटेल्स, कॅफे, स्पा, किनाऱ्याला लागून असलेले पदपथ, तिथे राहणाऱ्यांची लक्झरीयस लाइफस्टाइल आणि कालव्यातून प्रवास करणारी मर्यादित संख्येत असलेली धाऊ कृझेस, अलिशान यॉट्स अशी दृश्ये ह्याठिकाणी दृष्टीस पडतात. अर्थात हा नजारा बघण्यासाठी आणि दर्जेदार सेवा सुविधा अनुभवण्यासाठी मोजावी लागणारी किंमतही 'दुबई क्रीक' येथील क्रुझ पेक्षा जवळपास दुपटीने जास्त आहे.

DestynAsia कडून व्यवस्थितपणे पुरवण्यात आलेल्या ह्या माहितीच्या आधारावर एक निवांत रोमँटिक संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी आम्ही 'दुबई मरीना' येथील 'धाऊ क्रुझ विथ फाइव्ह स्टार डीनर' ची निवड केली होती. चकचकीत पॉलिश केलेली आमची लाकडी धाऊ, तिची सजावट आणि रोषणाई सर्वच छान होते. सेवा अतिशय आदबशीर आणि तत्पर होती. मनोरंजनासाठी तनोरा डान्स, मॅजिक शो, रेकॉर्ड डान्स असे कार्यक्रम होते.

त्यातला पुरुष नर्तकाद्वारे सादर केला जाणारा तनोरा डान्स विस्मयकारक होता. इजिप्तचे पारंपारिक राष्ट्रीय नृत्य असा लौकिक असलेल्या आणि पुढे समस्त अरब विश्वात लोकप्रिय झालेल्या ह्या नृत्यप्रकाराचे मूळ सुफी संप्रदायात आहे. पारंपारिक पोशाखात थोडे बदल करून सुरवारी पासून डोक्याच्या फेट्यापर्यंत, चेहऱ्यावरचा मास्क आणि एकावर एक असे शेकडो रंगीबेरंगी LED लाईट्स बसवलेले दोन वजनदार स्कर्ट्स घालून, सतत २५-३० मिनिटे स्वतःभोवती गिरक्या घेत नाचणे हि सोपी गोष्ट नक्कीच नाही! बरं नुसतेच भिंगरी सारखे फिरायचे नाही तर जसे संगीत बदलत जाईल त्याप्रमाणे अनेक अदाकारीही पेश केल्या जातात.

त्या नर्तकाचे असे सतत गोल गोल फिरणे बघून आपल्यालाही चक्कर येऊ लागते त्यामुळे टक लाऊन त्याच्याकडे मिनिटभरापेक्षा जास्ती वेळ पाहताही येत नाही. अर्थात खात-पीत आजूबाजूचा परिसर न्याहाळताना आपल्याला हे नृत्य बघायचे असल्याने ते बघणे सुसह्य होते अन्यथा कितीही विस्मयकारक वाटत असला तरी हा नृत्यप्रकार पाच-दहा मिनिटांनंतर नक्कीच कंटाळवाणा वाटू शकतो. ह्याच नर्तकाने सादर केलेले हे नृत्य आम्हाला एकूण तीन वेळा पाहायला मिळाले. अप्पर डेकवर पहिल्यांदा पाहिले पण त्यावेळी आपण व्हिडिओ शूट केला नाही हे लक्षात आल्याने त्यासाठी लोअर डेकवर जाऊन दुसऱ्यांदा थोडावेळ पाहिले आणि शेवटच्या दिवशी डेझर्ट सफारी नंतर शारजातील बार्बेक्यू डिनर दरम्यान तिसऱ्यांदा पाहिले, व त्यामुळेच हा नृत्यप्रकार किती अवघड आहे ते प्रकर्षाने जाणवले. नमुन्यादाखल लोअर डेकवर शूट केलेला काही मिनिटांचा व्हिडिओ वर दिला आहे.


▲ सुफी संप्रदायातील पारंपारिक तनोरा नृत्याचा फोटो जालावरून साभार.

आल्हाददायक वातावरणात अप्पर डेकवर बसून आजूबाजूचा नेत्रदीपक असा मानवनिर्मित सुंदर परिसर न्याहाळत, अरेबिक आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या फोर कोर्स डिनरचा आस्वाद घेत, तनोरा डान्स, जादूचे प्रयोग आणि व्यावसायिक नर्तक-नर्तकिंनी सादर केलेल्या रेकोर्ड डान्सचा आनंद लुटत, खोल समुद्रात जाऊन 'पाम जुमेरा' ह्या मानवनिर्मित कृत्रिम बेटांवर बांधलेल्या 'अटलांटीस' ह्या अतिभव्य हॉटेलच्या खुल्या समुद्राकडील बाजूचे लांबून दर्शन घडेपर्यंत एका दिशेने झाल्यावर मग परतीचा प्रवास सुरु झाला. पुन्हा जेट्टीवर पोहोचेपर्यंत साडे दहा वाजले.

▲ 'अटलांटीस' हॉटेलचा (संध्याकाळचा) फोटो जालावरून साभार.

'धाऊ क्रुझ' वरील निवडक फोटोंचा स्लाइड शो

1 of 15

2 of 15

3 of 15

4 of 15

5 of 15

6 of 15

7 of 15

8 of 15

9 of 15

10 of 15

11 of 15

12 of 15

13 of 15

14 of 15

15 of 15


बऱ्याच पर्यटकांचे बोर्डिंग उशिरा झाल्याने दहा वाजता परतायच्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाला होता. जिना चढून आम्ही वरती रस्त्यावर आलो तर समोरच अल्ताफ आमची वाट बघत उभा असलेला दिसला. आम्हाला तिथेच थांबायला सांगून तो पार्किंग मधून गाडी घेऊन आला. परतीच्या प्रवासात रस्ता मोकळा मिळाल्याने सव्वा अकरा वाजता हॉटेलवर पोहोचलो. खरंतर क्रुझ वरचे जेवण तसे चांगले होते पण आपणा भारतीयांना विशेषतः मराठी लोकांना पदार्थांत तिखट-मीठ थोडे जरी कमी असले तरी ते अन्न अळणी वाटते त्यामुळे कुठलाही पदार्थ आम्ही पुन्हा घेऊन खाल्ला नसल्याने जेवण पोटभर झाल्यासारखे वाटत नव्हते. परत येताना लाहोरी पकवान उघडे दिसले होते त्यामुळे वर न जाता आधी लस्सी प्यायला म्हणून तिकडे गेलो. एकच लस्सी दोघात पिऊनही पोटाला तड लागली एवढी ती घट्ट आणि मलईदार होती.

रात्रीचे पावणे बारा वाजत आले होते, दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता 'दुबई सिटी टूर' साठी पिकअप असल्याने फार लवकर उठायची घाई नव्हती. मग दुबईतील नाईट लाईफ अनुभवण्यासाठी रूममध्ये जाण्या आधी हॉटेल मधेच असलेल्या 'आफ्रिकन डिस्को' मधे डोकावलो. तिथे फार कोणी लोकं नव्हती, फक्त दहा-बारा तरुण-तरुणींचा ग्रुप होता. त्यातली काही मंडळी यथेच्छ मद्यपान करून नाचण्याचा आनंद लुटत होती आणि बाकीच्यांतले काही जण त्यांना सांभाळण्यासाठी झटत होते तर काही टेबलवर बसून नाचणाऱ्यांना प्रोत्साहन देत होते. बहुतेक ती मंडळी श्रीलंकन असावीत असा अंदाज आहे, कारण जयसूर्या, कालुविथरणा, मलिंगा अशा श्रीलंकन क्रिकेटपटुंमुळे जी एक सिंहली लोकांची चेहरेपट्टी माहिती झाली आहे तिच्याशी त्यांचा रंग आणि चेहरेपट्टी व्यवस्थित जुळत होती. क्लब मधले बाउंसर्स आणि दुबईतील कडक कायदे सक्षम असल्याने त्यांच्यापासून कोणालाच काही त्रास किंवा धोका होण्याची शक्यता नव्हती आणि तसेही ते लोकं त्यांच्याच विश्वात मश्गुल होते.

ह्याठिकाणी रात्री एक नंतर बऱ्यापैकी गर्दी होत असल्याचे व्यवस्थापकाकडून समजले तेव्हा एकतर आत्ताचा माहौल फार काही जोशपूर्ण नसल्याचे आणि एक वाजेपर्यंत वाट बघायला आमच्याकडे वेळ नसल्याने परवा रात्री भरपूर वेळ असेल तेव्हा पुन्हा इथे येऊ असे त्याला सांगून तिथून परत फिरलो. रुममध्ये आल्यावर सकाळी साडेसातचा अलार्म लावला आणि आम्ही निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.

क्रमश:

पुढचे भाग:

प्रतिक्रिया

नचिकेत जवखेडकर's picture

17 Nov 2020 - 8:22 am | नचिकेत जवखेडकर

छान वर्णन. आमच्या दुबई प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या.

पुभाप्र

टर्मीनेटर's picture

17 Nov 2020 - 12:15 pm | टर्मीनेटर

धन्यवाद 🙏

आमच्या दुबई प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या.

आपल्या प्रवासाच्या आठवणी शब्दबद्ध करून मिपावर प्रकाशीत कराव्यात अशी विनंती! वाचायला नक्कीच आवडतील. आपण प्रत्यक्षात पाहिलेल्या गोष्टी दुसऱ्यांच्या नजरेतून बघण्यात/अनुभवण्यात पण खूप मजा येते 👍

दुर्गविहारी's picture

17 Nov 2020 - 8:45 am | दुर्गविहारी

पुन्हा एकदा मेजवानीचा योग आलेला आहे. धन्यवाद ! :-)

टर्मीनेटर's picture

17 Nov 2020 - 12:17 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

कंजूस's picture

17 Nov 2020 - 9:06 am | कंजूस

दिवाळी अंकात नसला लेख तरी या काळातच आहे. आवडला.

टर्मीनेटर's picture

17 Nov 2020 - 12:18 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

सुधीर कांदळकर's picture

17 Nov 2020 - 9:51 am | सुधीर कांदळकर

मस्त रंजक वर्णन आणि सुरेख फोटो. धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

17 Nov 2020 - 12:19 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

गोरगावलेकर's picture

17 Nov 2020 - 3:29 pm | गोरगावलेकर

परदेशी पर्यटन इच्छा असली तरी अजूनपर्यंत शक्य झालेले नाही. बघूया कधी योग येतो का

सिरुसेरि's picture

17 Nov 2020 - 6:03 pm | सिरुसेरि

सुरेख प्रवास वर्णन .

चौकटराजा's picture

17 Nov 2020 - 6:22 pm | चौकटराजा

लग्नाच्या पुढील काही वाढदिवसासाठी काही शिफारसी
१. कप्पाडोकिया (टर्की ) सह इफेसूस ( टर्की )
२. नेपल्स सह सोरेंटो (द इटली )
३. नीस सह मोनेको ( मोंन्टे कार्लो ) ( फ्रेंच रिव्हेरा )
४. मिलान सह डोलोमिटी ( इशान्य इटली ) .

टर्मीनेटर's picture

18 Nov 2020 - 10:05 am | टर्मीनेटर

@ चौकटराजा
आपल्या शिफारसिंपैकी कप्पाडोकिया (टर्की ) सह इफेसूस ( टर्की ) चा क्रमांक आधी येण्याची दाट शक्यता आहे. गेल्या वर्षा-दीड वर्षापासून आमच्या सौभाग्यवतींना टर्किश सिरिअल्स (सब टायटल्स वाचत) बघण्याचा दुष्ट नाद लागला असल्याने अधून मधून तिथे भेट देण्याचा विचार तिच्याकडून व्यक्त केला जात असतो 😀
आताचे करोना पर्व संपेपर्यंत कुठेहि बाहेर जाण्याचे नियोजन करता येत नाहीये त्यामुळे सगळी परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत वाट बघणे तेवढे आपल्या हातात आहे.
धन्यवाद 🙏

कुमार१'s picture

17 Nov 2020 - 7:26 pm | कुमार१

छान वर्णन
पु भा प्र

MipaPremiYogesh's picture

17 Nov 2020 - 8:17 pm | MipaPremiYogesh

वाह सुंदर इथ्यंभूत वर्णन , छान लिहिले आहे. साधारण खर्च किती आला हे पण लिहिता येईल का अंदाजे.

@ गोरगावलेकर, सिरुसेरि, कुमार१, MipaPremiYogesh
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@MipaPremiYogesh

साधारण खर्च किती आला हे पण लिहिता येईल का अंदाजे

तीन वर्षांपूर्वी आलेल्या खर्चाचा आकडा देणे आत्ता निरुपयोगी ठरेल, कारण त्यावेळी दुबईत दिरहम टॅक्स वगळता अन्य कोणताही टॅक्स आकारला जात नसे, आता सर्व गोष्टींवर VAT लावला जातो असे ऐकून आहे. तसेच सध्याच्या करोना काळात तेथील पर्यटन व्यवसाय प्रचंड मंदीत असल्याने ऑनलाईन चेक केले असता हॉटेलचे आणि पर्यटन स्थळांच्या प्रवेश फीचे दरही बरेच कोसळलेले दिसत आहेत. त्यामुळे माझ्यामते तिथे भेट देण्याचा तुमचा विचार असल्यास २०२१ च्या एप्रिल-मे पर्यंत दुबई सफर करणे खूपच फायदेशीर ठरेल.
धन्यवाद.

सौंदाळा's picture

18 Nov 2020 - 10:18 am | सौंदाळा

सफर मस्तच सुरू झाली आहे.
पूभाप्र

प्रचेतस's picture

18 Nov 2020 - 10:53 am | प्रचेतस

एकदम तपशीलवर वर्णनामुळे तुमच्यासोबत आमचीही दुबई ट्रिप होतेय. मजा आली वाचून.

बाकी इस्लामिक दुबई कितीही लिबरल असली तरी तिथे चक्क चायनीज सेक्स डॉल पण मिळते हे वाचून अंमळ धक्काच बसला.

टर्मीनेटर's picture

18 Nov 2020 - 12:03 pm | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

@ प्रचेतस

बाकी इस्लामिक दुबई कितीही लिबरल असली तरी तिथे चक्क चायनीज सेक्स डॉल पण मिळते हे वाचून अंमळ धक्काच बसला.

त्यांना यु.ए.ई. मध्ये मागणीही चांगली आहे. आम्ही गेलो नाही, पण तिथल्या अनेक पैकी एका 'लुलू हायपर मार्केट' मध्ये त्यांच्यासाठी एक विशेष दालन असल्याचेही ऐकून आहे 😀

अथांग आकाश's picture

19 Nov 2020 - 11:56 am | अथांग आकाश

खूप मस्त!!!
फोटो, वर्णन सर्वच भारी! वरती लिहिल्या प्रमाणे इजिप्त नंतर आता दुबईच्या मेजवानीचा योग आला आहे :-)
पुढील भागांच्या प्रतीक्षेत!!
.

टर्मीनेटर's picture

19 Nov 2020 - 5:46 pm | टर्मीनेटर

@ अथांग आकाश
सचित्र प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

एक_वात्रट's picture

21 Nov 2020 - 9:43 pm | एक_वात्रट

टर्मीनेटर साहेब, आपले आणि श्री. सुहास म्हात्रे यांचे प्रवासवर्णन म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणीच असते. प्रत्येक ठिकाणाचे तपशीलवार वर्णन, प्रत्येक प्रसंगाचे वाचकाला आपण तिथे प्रत्यक्ष उपस्थित आहोत असे वाटेल असे शब्दचित्रण, आपल्याला प्रवासात भेटणा-या लोकांचे मनोज्ञ, प्रामाणिक असे चित्रण ही आपल्या लेखनाची वैशिष्ट्ये आम्हाला अतिशय भावतात. पहिला भाग अर्थातच १००% जमून आलेला आहे, पुढीच भागांच्या प्रतिक्षेत...

टर्मीनेटर's picture

22 Nov 2020 - 6:06 pm | टर्मीनेटर

@ एक_वात्रट
स्वतः उत्तम प्रवासवर्णने लिहिणाऱ्या आपल्या सारख्या मिपा सदस्याकडून अशी प्रतिसादरूपी कौतुकाची थाप पाठीवर मिळणे हा मी माझा बहुमान समजतो.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏

फारएन्ड's picture

22 Nov 2020 - 1:00 am | फारएन्ड

मस्त वर्णन, माहिती आणि फोटो!

टर्मीनेटर's picture

22 Nov 2020 - 6:07 pm | टर्मीनेटर

@ फारएन्ड
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2020 - 2:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडला हेवेसांनलगे.

आता कंटाळा न करता पुढचे भाग लिहून काढा.

मजा येते आहे वाचायला

रच्याकने :- पहिले काही फोटू दिसत नाहियेत.

पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

23 Nov 2020 - 7:43 pm | टर्मीनेटर

@ पैजारबुवा
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
फोटो कुठले दिसत नाहीयेत ते नाही समजले, मला सगळे दिसत आहेत दुसऱ्या ब्राउझर मध्ये पण 🙄

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2020 - 10:48 am | ज्ञानोबाचे पैजार

आज सगळे फोटो दिसले
पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

23 Nov 2020 - 11:05 pm | मुक्त विहारि

वाचत आहे...

माझी पहिली गल्फ नौकरी, दुबई इथेच होती.

टर्मीनेटर's picture

24 Nov 2020 - 9:51 am | टर्मीनेटर

मुविकाका...long time no see
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

माझी पहिली गल्फ नौकरी, दुबई इथेच होती

हो, मला तुम्ही हे मागे सांगितल्याचे आठवतंय!

तुमची चित्रदर्शी लेखनशैली आवडते. मस्त वर्णन आणि फोटो. मजा आली वाचायला.
-अवांतर
चायनीज सेक्स डॉल विषयी काही माहिती नव्हती म्हणून गुगलत असताना हा रोचक video दिसला.
https://www.youtube.com/watch?v=jPXX0y8pmWc

टर्मीनेटर's picture

25 Nov 2020 - 10:15 am | टर्मीनेटर

@ रंगीला रतन
प्रतिसाद आणि व्हिडिओच्या लिंक साठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

जेम्स वांड's picture

25 Nov 2020 - 12:49 pm | जेम्स वांड

इजिप्तायनकार टर्मिनेटर भाऊंचे अजून एक सुरस प्रवासवर्णन, जियो, तुमचा लहजा अन लेखनशैली अमाप आवडते, और लिखो...

टर्मीनेटर's picture

26 Nov 2020 - 9:32 am | टर्मीनेटर

@ जेम्स वांड
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

रामदास२९'s picture

25 Nov 2020 - 1:46 pm | रामदास२९

फार सुन्दर .. आपल्या प्रवासवर्णनाची करावी तेव्हढी स्तुती कमीच आहे .. असेच लिहा.. वाचकान्ना आनन्द देत जा ..

टर्मीनेटर's picture

26 Nov 2020 - 9:33 am | टर्मीनेटर

@ रामदास२९
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

शेर भाई's picture

25 Nov 2020 - 6:35 pm | शेर भाई

लाहोरी पकवानच्या मेन्यूत शाकाहारी पदार्थात "Egg Chana" नाव दिसले. इथे Egg म्हणजे वांग अपेक्षित आहे का?

टर्मीनेटर's picture

26 Nov 2020 - 10:11 am | टर्मीनेटर

@ शेर भाई

इथे Egg म्हणजे वांग अपेक्षित आहे का?

नाही, इथे अंडेच अपेक्षित आहे 😀
अंडा चना (Egg Chana) हा लाहोर मध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. इच्छुकांना त्याची रेसीपी इथे पाहायला मिळेल.
बाकी 'शाकाहारी' बद्दल बोलायचे तर भारताबाहेर बहुतेक ठिकाणी अंडे हे शाकाहारी पदार्थांमध्येच गणले जाते. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासात (भारताबाहेरील विमान कंपनीच्या) 'व्हेजीटेरीयन' meal preference निवडला तरी मिळणाऱ्या बहुतेक पदार्थांमध्येही अंडे असल्याने १००% शाकाहारी असलेल्या कित्येकांना उपास घडताना पहिल्याचा अनुभव आहे. त्यावरून मग प्रवासी आणि एअर होस्टेस/फ्लाईट पर्सर मध्ये किरकोळ वादही होत असतात. विमानात हलाल फूड मिळते, जैन फूड मिळते मग हिंदू व्हेजीटेरीयन फूड का नाही मिळत असा प्रश्नही अधून मधून चर्चेत येत असतो पण दुर्दैवाने त्याचा नंतर कोणी पाठपुरावा करत नाही 😑

प्रतिसादासाठी धन्यवाद 🙏

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2020 - 5:34 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्त सुंदर भटकंती वर्णन आणि अप्रतिम फोटो !
स्लाइड शो बघताना दिवाळी साजरी करत असल्याचा फील आला !

👌

टर्मीनेटर जी, एक नंबर +१
पुढील भागाच्या प्रतिक्षते !

... आणि तुमच्या इमोजी धाग्यासाठी खास अभिनंदन !
मी आजकाल नेहमीच वापरायला लागलोय हे इमोजी !

टर्मीनेटर's picture

27 Nov 2020 - 10:53 am | टर्मीनेटर

@ चौथा कोनाडा
प्रतिसादासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏

स्लाइड शो बघताना दिवाळी साजरी करत असल्याचा फील आला !

(दोन फोटो सोडून 😀) ज्यात फक्त दिवाळी सारखी रोषणाईच दिसेल असे फोटो निवडण्याचा हेतू सफल झाला!

मी आजकाल नेहमीच वापरायला लागलोय हे इमोजी !

चला म्हणजे 'तो' धागाही सार्थकी लागला 👍

हॉटेल लाहोरी पक्वान वरुन आठवले . काहि वर्षांपुर्वी वेम्बले स्टेशनच्या परीसरात असलेल्या हॉटेल लाहोर मधे एकदा कुतुहल म्हणुन गेलो होतो . बिल पेमेंट करुन निघताना काउंटर वरील माणसाने "you are from which place ?" असे विचारले . तेव्हा थोड्याशा काळजीनेच India --Mumbai--Pune असे जुजबी उत्तर दिले . तेव्हा त्या माणसाने "I was in FC college , Pune . I like mango mastani ice cream " अशी माहिती देउन चकीत केले .

टर्मीनेटर's picture

27 Nov 2020 - 10:54 am | टर्मीनेटर

@ सिरुसेरि
रंजक अनुभव! असे अनपेक्षित धक्केही एक वेगळा आनंद देऊन जातात 👍

एक_वात्रट's picture

9 Dec 2020 - 2:24 pm | एक_वात्रट

दुस-या भागाची आतुरतेने वाट पहात आहे, लवकर येऊद्या...

टर्मीनेटर's picture

11 Dec 2020 - 11:03 am | टर्मीनेटर

सोमवारी किंवा मंगळवारी टाकतो, सध्या नको त्या कामात अडकलो असल्याने लिहायला वेळच देता येत नाहीये.

मिपाकर 'चौकटराजा' ह्यांचा आज प्रथम स्मृतिदिन.
सुरुवातच त्यांच्या नामोल्लेखाने झालेली ही प्रवासवर्णन लेख मालिका ज्येष्ठ मिपाकर स्वर्गीय चौकटराजांच्या पावन स्मृतीस अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतो 🙏