नेताजी आणि एमिली

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amनेताजी आणि एमिली

नेताजी सुभाषचंद्र बोस! एक अतिशय अद्भुत रसायन. अतिशय नाट्यमय आणि अशक्यप्राय गोष्टी करून दाखवणारे 'अवलिया'! १९२०च्या सुमारास ब्रिटिश साम्राज्यातील अतिशय प्रतिष्ठेची आयएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन ते प्रमाणपत्र ब्रिटनमध्येच फेकून देऊन सामाजिक जीवनात आलेले नेताजी! काँग्रेसमध्ये राहून गांधीजींना विरोध करून पराभूत करणारं एकमेव व्यक्तिमत्त्व! भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारताच्या शत्रूशी लढण्यासाठी अक्षरश: 'सैतानाशी मैत्री' करण्याची प्रगल्भता आणि स्पष्टता दाखवणारे सेनानी! त्यांच्या ह्या पैलूंची ओळख आपण सर्वांनाच आहे. मिपा दिवाळी अंकाची थीम यंदा 'प्रेम, शृंगार व रोमान्स' अशी आहे. त्यानिमित्ताने ह्या दिग्गज व्यक्तिमत्त्वातील थोड्या दुर्लक्षित राहिलेल्या बाजूवर लिहीत आहे. सर्वप्रथम सर्वांना मन:पूर्वक दीपावली शुभेच्छा!

नेताजी आणि एमिली शेंकल-बोस ह्यांचं सहजीवन ही खूप दुर्मीळ प्रकारची घटना होतं. त्या संदर्भात अनेक तपशील उपलब्ध असले, तरी काही मुद्द्यांबद्दल पूर्णत: एकवाक्यता नाही. त्यांचा विवाह युद्धादरम्यान १९४१-४२मध्ये झाला असं सांगितलं जात असलं, तरी काहींच्या मते तो त्यांच्या आधीच्या युरोप भेटीत - म्हणजे १९३५च्या सुमारास झाला असावा. त्यामुळे ह्या संदर्भातील काही बाबी स्पष्टपणे सांगता येत नाहीत. तरीही, उपलब्ध माहितीच्या आणि संदर्भांच्या आधारे हे सहजीवनाचे क्षण एकत्र समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. विशेष गोष्ट ही की, हे त्यांचं वैवाहिक नातं असलं तरीही तिथेही त्यांचं देशप्रेम आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व प्रकट होतं. नेताजींविषयी वाचलेल्या विविध पुस्तकांमधला पाठ असलेला मजकूर, विविध लेख, इंटरनेटवर उपलब्ध असलेले लेख आणि त्या कालखंडातील बाकी घटना विचारात घेऊन हा लेख लिहिला आहे.

नेताजींच्या १९३५च्या युरोप दौर्‍याच्या वेळी त्यांची एमिली शेंकलशी पहिली भेट झाली. अनेक वर्षांच्या हालअपेष्टा, तुरुंगवास आणि ब्रिटिशांशी संघर्ष ह्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना युरोपात जाण्याची संधी मिळाली. तेव्हा युरोपातील वेगवेगळे उपचार व हवापालट ह्यासाठी ते युरोपात काही महिने वास्तव्याला गेले. कालांतराने त्यांना जर्मनी व इटली देशांमध्येही जाण्याची अनुमती मिळाली. नेताजी पूर्वीही युरोपमध्ये राहिलेले असल्यामुळे आगामी काळात तिथे राजकारण कसा आकार घेणार आहे व भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल, ह्याची ते आडाखा घेत होते. आणि प्रकृतीच्या उपचाराबरोबरच वेगवेगळे विचारवंत व नेते ह्यांच्याशी भेटीगाठीही करत होते. कालांतराने युरोपमधल्या ह्या दीर्घ वास्तव्याचा त्यांना खूप उपयोग झालेला दिसतो. युद्धकालीन जर्मनीत व इटलीमध्ये त्यांना जी मान्यता मिळाली व भारतीय युद्धकैद्यांसह जे काम करता आलं, त्याची पायाभरणी इथे झाली होती. त्याच काळात एक व्यक्तिगत मदतनीस म्हणून एमिली शेंकल नेताजींच्या संपर्कात आली. तेव्हा तिचं वय साधारण २४-२५ असेल (जन्म १९१०). तेव्हाचे नेताजी कसे होते? श्री अरविंदांच्या पठडीतलेच अध्यात्मामध्ये गहन रुची असलेले; तरुणपणी हिमालयामध्ये साधूंच्या शोधात निघून गेलेले आणि नंतर व्यक्तिगत प्रपंचाऐवजी देशाच्या प्रपंचाची जवाबदारी घेतलेले ३८ वर्षांचे अतिशय मोठे भारतीय नेते ही तेव्हाची नेताजींची ओळख सांगता येईल. भारतातल्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत होता. आणि इतकी मोठी‌ ओळख असूनही साधा सौम्य स्वभाव आणि मेहनत करण्याची तयारी ही गोष्ट थोडी वेगळी होती. एमिली जेव्हा त्यांना पहिली भेटली, तेव्हा ती त्यांच्या तुलनेत लहान वयाची आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये नवखी असलेली मदतनीस होती. त्यांची ती टायपिस्ट झाली आणि त्यांचा पत्रव्यवहार, जर्मन-इंग्ग्लिश भाषांतर ह्याबद्दल तिने त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. त्यासुमारास नेताजी 'द इंडियन स्ट्रगल' हा ग्रंथ लिहीत होते.

ह्याच काळात त्यातून त्यांची मैत्री झाली असं म्हणता येऊ शकेल. परंतु त्यांच्या नात्याबद्दल त्यांनी तेव्हा निर्णय घेतला होता की नाही, ह्याबद्दल सांगणं कठीण आहे. कदाचित त्यांनी व्यक्तिगत पातळीवर निर्णय घेतला असेल, पण नेताजींच्या कुटुंबाला त्याची कल्पना नव्हती हे निश्चित. एक तर नेताजींनी स्वत:चं आयुष्य देशाच्या प्रपंचाकरता वाहून घेतलेलं होतं. शिवाय ब्रिटिशांसारखा शत्रू सतत नजरेसमोर होता. भारतात असलेल्या नेताजींची अक्षरश: अनेक वर्षं तुरुंगवासातच गेली होती आणि त्यांना खरं काम करण्याची उसंत कशीबशीच मिळालेली होती. ह्या गोष्टींमुळे कदाचित त्यांनी त्यांच्या नात्याचा निर्णय घेतला नसेल किंवा घेतला असेल, तरी तो जाहीर केला नसेल. परंतु हे नातं आणि हे प्रेम आगळंवेगळं होत आणि खर्‍या अर्थाने पूर्व-पश्चिमेचं मीलन होतं! आध्यात्मिक पठडीचे आणि देशप्रेमी नेताजी आणि साधीशी युवती एमिली. पण प्रेम हे प्रेम असतं, ते सगळ्या फरकांची आणि अंतरांची होळी करून टाकतं! नेताजींची स्वयंशिस्त, कठोर देशप्रेम, निर्धार, परकेपणा ह्या सगळ्यांमधून वाट काढत हळूहळू एमिलीने त्यांच्या हृदयात प्रवेश केला! नेताजींच्या विवाह न करण्याच्या तरुणपणापासूनच्या (ब्रिटिश अधिकारी होण्याला नकार दिला तेव्हापासूनच्या) निर्धाराला तडे गेले असतील. अनेकदा युरोपात आल्यामुळे नेताजीसुद्धा पूर्वीपेक्षा वेगळ्या नजरेने जग बघत असतील. शिवाय युरोपात अनेक महिने मिळालेला परस्परांचा सहवास व राहण्याच्या-बोलण्याच्या युरोपीय रिती ह्यांचाही त्यांच्यावर परिणाम झाला असेल. किंवा त्यांनी हेसुद्धा बघितलं असेल की, अनेक देशांमध्ये देशावर प्रेम करणारे आणि देशासाठी झटणारे नेते व देशसेवक हे संसार करतात आणि त्यांच्या कामावर कोणताही परिणाम होत नाही. कदाचित त्यांच्या भव्य उद्दिष्टांमध्येही एमिली सहकारी होण्यास तयार झाली असेल. ह्या कोणत्यातरी कारणामुळे हे नातं बहरत गेलं आणि सूर्याप्रमाणे दग्ध आयुष्य जगणार्‍या नेताजी सुभाषचंद्रांच्या आयुष्यातही 'चंद्र' फुलून आला!

1

हे नातं‌ कसं फुललं असेल ह्याची आपण आज फक्त कल्पनाच करू शकतो. दोघांसाठीही हे सोपं तर नसणारच. अनेक सांस्कृतिक फरक - रितीरिवाजांमधील अंतर - जीवनशैलीतील फरक - अभिव्यक्तीमधील फरक हे सगळे सगळे अडथळे त्यांनी ओलांडले. अनेक प्रकारची मानसिक द्वंद्व त्यांनी ओलांडली असणार. भविष्यकाळ संपूर्णपणे अनिश्चित असतानाचं ते काही महिन्यांचं सहअस्तित्व अतिशय रोमांचक झालं असणार. १९३५-३६चा जर्मनी. हिटलर व नाझी सत्तेची सामर्थ्याकडे वाटचाल सुरू होती. एमिली ऑस्ट्रियन होती व व्हिएन्नाची राहणारी होती. जर्मनी व ऑस्ट्रिया लवकरच एकत्र आले, तो हा साधारण काळ आहे. एमिलीला भारताबद्दल प्रचंड आकर्षण असेल आणि गांधीजींबद्दलही. त्यामुळे तिच्या दृष्टीने कदाचित नेताजी हे परिकथेतले राजकुमार ठरले असतील. एका वेगळ्याच जगाचे दूत ठरले असतील. त्याबरोबर एमिलीने चार वर्षं नन म्हणूनही शिक्षण घेतलं होतं. कदाचित त्या आध्यात्मिक प्रतलावरही त्यांची मैत्री जुळली असेल. हा सगळा एक खूप वेगळ्या प्रकारचा आणि वेगळ्या परिमितीतला रोमान्सच होता.. किंबहुना नेताजींच्या संपूर्ण आयुष्यात रोमांच आणि उत्तुंग असा रोमान्स सगळीकडे आढळतो. देशप्रेमासाठी त्यांनी वाट्टेल ते केलं. नंतर जवळच्या गांधीजींचा विरोधही पत्करला. देशप्रेमासाठी प्रेमळ कुटुंबीयांपासून दूर जाणं पत्करलं. एक प्रकारचा हा सब्लाइम रोमान्स त्यांच्या प्रत्येक कॄतीमध्ये आणि प्रत्येक पावलामध्ये आढळतो. एमिलीच्या नात्यामध्येही तेच असणार. तिथेही रोमान्स असणार, पण तो व्यक्तीचा कमी आणि देशप्रेमाचा जास्त, प्रपंच असणार पण तो व्यक्तीचा नाही तर देशाचा असणार आणि शृंगार हा दागिन्यांचा किंवा वस्त्रांचा नाही, तर शस्त्रांचा, युद्धाचा आणि विरहाचा असणार!

ह्या काही‌ महिन्यांच्या सहवासानंतर त्यांची खरी भेट झाली ती युद्धकालीन युरोपमध्ये एप्रिल १९४१ ते फेब्रुवारी १९४३! म्हणजे साधारण सहा वर्षांच्या गॅपनंतरच. पण ही वर्षं ह्या नात्याची कसोटीची असणार आणि नात्याची उंचीही वाढवणारी असणार. ह्या वर्षांमध्ये भारत आणि जर्मनीच नाही, तर सर्व जगच ढवळून निघत होतं. अस्थिरतेची आणि अशांततेची ही वर्षं. नेताजींनी १६ जानेवारी १९४१ला कोलकत्यामधून केलेलं‌ नाट्यमय पलायन आणि अफगाणिस्तान-रशियामार्गे १८ एप्रिल १९४१ला ते जर्मनीला पोहचले तो अतिशय रोमहर्षक प्रवास आपल्याला माहीतच आहे. प्रा. शिवाजीराव भोसले म्हणायचे की, केवळ 'संभोग से समाधी की ओर' प्रवचनमालेमुळे ओशो नोबेल पुरस्कारासाठी पात्र ठरतात; त्याप्रमाणे म्हणावसं वाटतं की, एखाद्याने केवळ असा फक्त प्रवास जरी केला असता, तरी त्याचं जीवन सार्थक झालं असतं! पण नेताजींनी पुढे त्याहूनही मोठे भयावह प्रवास केले, विराट साहसं केली आणि अग्निदिव्यही‌ केलं. घर सोडून निघताना एका अर्थाने दीर्घ काळासाठीच भारतभूमी सोडताना नेताजींना काय वाटलं असेल? कुटुंबप्रेम, मित्रप्रेम आणि देशप्रेम ह्या सगळ्यांची ताटातूट होती. सर्वच अनिश्चित होतं. निश्चित होता फक्त निर्धार. आणि ह्या निर्धाराला प्रकाश दाखवणारी एक मंद ज्योत म्हणजे एमिली असणार. ती लवकरच भेटणार, ह्या आशेमुळे आणि ह्या ओढीमुळे नेताजींचा हा अतिशय बिकट आणि सर्वच दृष्टींनी धोकादायक प्रवास काहीसा सुकर झाला असेल! एमिलीची ओढ त्यांना धीर देत असेल. ते ह्या प्रवासादरम्यान रहमतखान नाव घेतलेल्या भगतराम तलवारला विचारायचे, "रहमतखान, अब क्या होगा?" आणि तो ठरलेलं उत्तर द्यायचा - "सब ठीक होगा, आज नही तो कल!" अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि काहीशा निराधार अवस्थेत त्यांनी एक एक दिवस जिद्दीने टिकाव धरला. त्यामध्ये एमिलीची दूरस्थ सोबत निश्चित त्यांच्याबरोबर असणार. आणि एमिली निश्चित प्रकारे त्यांच्या देशसेवेचीही सहकारी झाली असणार.

१८ एप्रिल १९४१ ते ८ फेब्रुवारी १९४३ हे नेताजींचं नाझी जर्मनी व नाझी युरोपमधलं वास्तव्य! त्या काळात त्यांनी काय काय गोष्टी केल्या व किती मोठी उद्दिष्टं ते साध्य करू शकले हा वेगळा विषय आहे. रिबेनट्रॉप, हिटलर, मुसोलिनी ह्यांच्या भेटी घेतल्या व भारतीय स्वातंत्र्यासाठी त्यांची मदत त्यांनी मिळवलीच. भारतीय युद्धबंद्यांना संघटित केलं. आझाद हिंद नभोवाणी केंद्र सुरू केलं. त्या ठिकाणी जे जे शक्य होतं ते सगळं केलं. आत्ता आपण इथे त्यांच्या नात्याचा विचार करू या. पाच-सहा वर्षांनी भेटलेली एमिली! नेताजींना जर्मन सरकारने दिलेला अमेरिकन राजदूताचा बंगला! हे दिवसच पूर्वीपेक्षा वेगळे असणार आणि निश्चितपणे त्या नात्याचा खरा सहवास सुरू झाला असणार. इतक्या वर्षांची कसर भरून काढली गेली असणार. आणि सहकारी म्हणून एमिलीने पुन: काम सुरू केलं होतंच. किंबहुना औपचारिक दृष्टीने ती त्यांची व्यक्तिगत मदतनीसच होती आणि त्यांची पत्नी मैत्रीण म्हणून तिची ओळख अनेक नाझी नेत्यांना खटकणारी होतीच. किंबहुना अनेक नाझी नेत्यांचा एमिलीवर संशय होता की ती ऐशआरामासाठी नेताजींच्या सहवासात राहते. नाझी जर्मनीमध्ये असतानाही‌ नेताजींनी स्वाभिमान न सोडता नाझींच्या अनेक अटी मान्य केल्या नाहीत आणि उलट नाझींनाच आपल्या अटी मान्य करायला लावल्या होत्या. नाझी जर्मनी भारतावर उपकार करत नसून एका स्वतंत्र देशाला फक्त मदत करतो आहे आणि कर्ज देतो आहे, जे काही काळाने आपण परत करू, अशी नेताजींची ठाम भूमिका होती. एमिलीसाठीही त्यांना तीच ठाम भूमिका घ्यावी लागली असणार. त्यातून हळूहळू त्यांचा हा तात्पुरता संसार रुळला असणार.

नेताजी जर्मनीला गेले होते, तेव्हा त्यांचा अंदाज हा होता की लवकरच रशियाच्या मदतीने जर्मनी अफगाणिस्तानच्या आसपास ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उघडू शकेल. पण अगदी दोन महिन्यांनी - म्हणजे २२ जून १९४१ला जर्मनीने रशियाविरुद्धच युद्ध पुकारलं आणि नेताजींचा भ्रमनिरास झाला. किंबहुना जवळच्या लोकांसमोर त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला व इथून पुढे जर्मनीची लाट ओसरतच जाईल असंही ठामपणे सांगितलं. जर्मनी-रशियाच्या मदतीने व युरोपातील भारतीय युद्धबंद्यांची सेना बांधून अफगाणिस्तानमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात आघाडी उघडण्याचं स्वप्न कायमचं भंगलं. हा आघात पचवणं त्यांना कठीण गेलं. एमिलीने इथे त्यांना साथ दिली असणार आणि अनिश्चित भविष्याच्या अस्थिरतेतून हा तात्पुरता संसार उभा राहिला असणार. नाझींनी नेताजींचं जरी स्वागत केलं व त्यांना आदराने वागवलं असलं, तरी एक एक गोष्टीसाठी नेताजींना झटावं लागलं. स्वाभिमान न गमावता आम्ही फक्त ब्रिटिशांशी लढू हे त्यांना सातत्याने सांगावं लागलं. हे होताना अनेक नाझी त्यांचे मित्रही झाले. काही जणांना जरी वाटत असलं की, नेताजींनी हिटलरचा जयजयकार करावा, तरी त्यांना समजून घेणारेही मित्र मिळाले. जुन्या ओळखी खूप उपयोगी पडल्या. पण तरी प्रसंगी नेताजींना सांगावं लागलं, "मला जे मान्य नाही ते करायला तुम्ही मला बाध्य करू शकत नाही; तुमच्या गेस्टापोंनी मला अटक केली तरी मी अडकू शकत नाही. कारण ब्रिटिश साम्राज्याच्या पोलादी यंत्रणेलाही गुंगारा देऊन मी आलो आहे." असा हा वेगळाच काळ होता. जर्मनीने आपली सर्व शक्ती‌ रशियाच्या आघाडीवर उघडली असतानाही त्यांच्याकडून सहकार्य मिळवण्याचा भीमपराक्रम नेताजींनी केला.

हळूहळू युद्धाच्या झळाही वाढत चालल्या. नाझींच्या छळ छावण्या, अनेक समुदायांना त्यांनी गुलाम केलं ही वस्तुस्थिती आणि नाझीही अनेक बाबतीत ब्रिटिशांसारखेच आहेत ही प्रचिती नेताजींना येत होती. नाझी व हिटलर ब्रिटिशांच्या नजरेनेच भारताकडे कमकुवत लोकांचा देश म्हणून बघतो ही जाणीव होत होती. पण काहीही असो, आपण आपल्या देशासाठी शक्य ते करायचं, हा निर्धार पक्का होता. २१ जून १९४१ ते ७ डिसेंबर १९४१ हे सहा महिने नेताजींसाठी अतिशय कसोटीचे गेले. 'आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है' अशी स्थिती नेताजींसाठी होती! कुठेच त्यांना हवं तसं काही घडत नव्हतं. पण जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि ब्रिटन-जपान युद्ध सुरू झालं, तेव्हा त्यांना पुढची दिशा गवसली आणि नंतरच्या महिन्यांमध्ये जपानच्या विजयाच्या बातम्या खूप उत्साह देऊन गेल्या. फेब्रुवारी १९४२मध्ये जपानने सिंगापूर जिंकल्यानंतर लवकरात लवकर रासबिहारी बोसांना पूर्व आशियामध्ये कधी जाऊन भेटतो, अशी त्यांना घाई झाली आणि जपान निश्चितपणे जर्मनीपेक्षा भारताला जास्त मदत करू शकेल हा विश्वास वाटावा अशी स्थिती होती. अफगाणिस्तान नाही, पण ब्रह्मदेशाच्या आघाडीवर ब्रिटिशांशी लढू, हा विश्वास मिळाला.

बाहेरची स्थिती ही असताना ह्याच सुमारास अगदी निवडक व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये नेताजी-एमिली विवाहबद्ध झाले होते. त्याची जास्त वाच्यता कोणी केली नाही, कारण नाझी जर्मनीमध्ये शुद्ध आर्यन युवतीने बिगर-आर्यन व्यक्तीशी लग्न करणे हा अपराध मोठा होता. एमिलीला सातत्याने धमक्यांचे फोन यायचे. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हे प्रेम बहरलं आणि फुललं. अतिशय बिकट काळामध्ये हे दोन जीव एकत्र आले आणि तात्पुरता का होईना, त्यांचा संसार बहरला. २९ मे १९४२ रोजी नेताजींची हिटलरशी भेट घडून आली. जपानला जाण्यासाठी जर्मनी मदत करायला तयार झाला. नंतर हिटलरने माईन काम्फमधले भारताबद्दलचे उल्लेख आपण मागे घेत आहोत, असंही एका भाषणात सांगितलं. युद्धाची भीषणता वाढत जात होती. जर्मनी रशियामध्ये विजय मिळवू शकणार नाही, हे दिवसेंदिवस स्पष्ट होत होतं. एमिलीच्या कुटुंबाला युद्धाची झळ बसत होती. बाहेर निर्बंध सुरू झाले होते. अस्थिरता वाढत होती. जर्मनीचा पराभव असा झाला नसला, तरी हवाई हल्ले सुरू झाले होते. मुख्य म्हणजे नाझींच्या पापांचा पाढा मोठा मोठा होत होता. अशा काळात एमिलीला दिवस गेले होते!

जर्मनीमध्ये नेताजींची ज्या लोकांशी मैत्री झाली, त्यामध्ये एडम व्हॉन ट्रॉट हे अधिकारी एक जण होते. दोघांची मैत्री खूप घट्ट झाली. गाठीभेटी खूप व्हायच्या. त्यातून नेताजींना कळलं की, ट्रॉट हे नाझी पार्टीतील हिटलरविरोधी गटाचे आहेत! ट्रॉट एकेकाळी कट्टर हिटलरभक्त होते; पण नाझींचे अत्याचार आणि रशियावर हल्ला करण्याची घोडचूक ह्यामुळे त्याचे डोळे उघडले होते. ह्यांची मैत्री हीसुद्धा अतिशय विषम परिस्थितीमध्ये होती. कारण ट्रॉट आणि अशा काही तुरळक नाझींना (तेव्हा १९४२मध्ये असे नाझी अत्यल्प होते) हिटलरची राजवट पाडायची होती, जमल्यास त्याला ठार करायचं होतं. आणि नेताजींना हिटलरची मदत हवी होती! अशा परिस्थितीत त्यांची मैत्री झाली आणि दोघंही एकमेकांना हेच म्हणायचे - "बाकी सगळं झूठ आहे; आपल्याला फक्त आपल्या देशाचं भलं हवंय. आपल्या देशावर आपलं प्रेम आहे; बाकी कोणावरही नाही." एकमेकांच्या उद्दिष्टाला दोघांच्याही शुभेच्छाच होत्या. पुढे २० जुलै १९४४च्या हिटलरवरच्या हल्ल्यानंतर झालेल्या धरपकडीमध्ये हिटलरच्या विरोधात कट केल्याच्या आरोपावरून ट्रॉटना अटक झाली व नंतर 'जनता न्यायालयात' त्यांना मृत्युदंडही ठोठावण्यात आला.

९ ऑगस्ट १९४२ रोजी गांधीजींनी 'चले जाव' पुकारून ब्रिटिशांशी पुन: संघर्ष सुरू केला आणि नेताजी हळहळले की, ह्या वेळी मी भारतात असतो तर बाकी काही वेगळी गरज पडली नसती. 'ब्रिटन संकटात असताना त्यांच्याशी संघर्ष करणं नैतिक नाही' अशी सुरुवातीला भूमिका घेतलेल्या गांधीजींचाही तोपर्यंत भ्रमनिरास झाला होता व त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आणि आपला सुभाष सोबत नाही, म्हणून तेही हळहळतच होते. त्या वेळेपर्यंत नाझी जर्मनीतून नेताजींना पूर्व आशियात नेण्याचे काही प्रयत्न सुरू झाले होते. एकदा ते निघणारही होते, पण ब्रिटिश गुप्तचरांना सुगावा लागल्यामुळे, ते ट्रेनमध्ये चढत असतानाच शेवटच्या क्षणी तो बेत रद्द करावा लागला. इतक्या भीषण परिस्थितीमध्ये नोव्हेंबर १९४२मध्ये अनिताचा जन्म झाला! नेताजी व एमिली दोघांनी विचार करून जर्मन व भारतीय वाटतील अशी काही रिटासारखी नावं शोधली होती, त्यात हे एक नाव होतं. १९४२चा नाताळ ह्या छोट्या कुटुंबाने व्हिएन्नामध्ये एकत्र साजरा केला. काही ठिकाणी ते फिरलेसुद्धा. युद्धाच्या छायेमध्ये ह्या कुटुंबाच्या एकत्र असण्याची साक्ष देणारे काही फोटो आजही उपलब्ध आहेत! नेताजी मुलीला बहुतेक पहिल्यांदा व शेवटचेच भेटले असावेत. एक महिन्यांची बाळ अनिता! त्या वेळी त्यांच्या मनात काय भाव असतील, कोणती वादळं असतील हे सांगणं किंवा त्यांचा अंदाज करणंही शक्य नाही! एक पती आणि एक पिता म्हणून आपण काय काय करू शकणार नाही, ह्याची किती तीव्र जाणीव त्यांना असावी! किंवा मुलीला लवकर बघणं आपल्याला शक्य होणार नाही, ही जाणीवही असेल. किंबहुना आपण तिला पहिल्यांदा व शेवटचंच भेटतोय, हीसुद्धा जाणीव असावी. कारण पाणबुडीतून पूर्व आशियात जाण्याचा निर्णय झाल्यानंतर तज्ज्ञांनी त्यांना सांगितलं होतं की, ठिकठिकाणचे पाणसुरुंग, शत्रूचे सैनिक, पाणबुड्या व हल्ले ह्यामधून तुम्ही पूर्व आशियात सुखरूप पोहोचण्याची शक्यता १%सुद्धा नाही आहे! इतकी निर्वाणीची ही भेट झाली असणार. तोपर्यंत कधीही पूर्व आशियात निघायला तयार राहावं लागेल, अशी सूचना त्यांना मिळाली होती. अनिताच्या बाललीला आणि एमिलीचा प्रेमळ सहवास परत कधी बघायला मिळेल की नाही, अशी त्यांची स्थिती! ही कल्पना करून हे दृश्य डोळ्यासमोर आणलं तरी अंगावर काटा येतो...

Far across the distance
And spaces between us
You have come to show you go on

Near, far, wherever you are
I believe that the heart does go on

Once more you open the door
And you're here in my heart
And my heart will go on and on

एमिली व अनिता दोघींचा जवळजवळ कायमचा निरोप घेऊन नेताजी बर्लिनला परत आले. दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत होती. जर्मनीची घरंगळ सुरू होत होती आणि तिकडे पूर्व आशिया खुणावत होता. जपानने जिंकलेलं रंगून दिसत होतं. मंडालेचा त्यांचा तुरुंग आज ब्रिटिशांपासून मुक्त झाला होता! तिकडे जाण्याची हुरहुर आणि मुलीला व एमिलीला दूर करण्याचा असह्य विचार! आणि त्यातच युरोपातल्या उदासवाण्या हिवाळ्यातला हिमवर्षाव! १९४३ सुरू झालं. रशियन आघाडीवर जर्मनीला मोठा धक्का बसला. स्टॅलिनग्राडची लढाई जर्मनीने गमावली. १ फेब्रुवारीला हे घडलं आणि ८ फेब्रुवारीला अखेरीस नेताजींनी पाणबुडीतून जर्मनी सोडलं! जर्मनी सोडण्याची समयसीमा संपुष्टात येता येता त्यांचा पाय तिथून निघाला. कारण पुढे परिस्थिती इतकी बिघडत गेली की, जर्मनीला नेताजींसाठी काहीही करणं शक्य झालं नसतं किंवा नाझींनी केलं नसतं. युरोपात मागे थांबलेल्या स्वामी व नांबियार अशा सहकार्‍यांची व काही हजार सैनिकांची नंतर दुरवस्था झाली. नेताजींनी जेमतेम ती वेळ येण्याआधी जर्मनी सोडला.

जेव्हा जाण्याचं निश्चित असं ठरलं, तेव्हा निघण्यापूर्वी तीन महिन्यांच्या अनिताला व्हिएन्नाला सोडून एमिली त्यांना येऊन शेवटची भेटली! ही भेटही विलक्षण म्हणावी लागेल! पुढची काहीच शाश्वती नसताना आणि विपरीत तेच होण्याची जास्तीत जास्त शक्यता असतानाची ही भेट! नाझींचा शेवट व युद्धाची होरपळ जवळ येत असताना झालेली ही भेट! तीन महिन्यांच्या मुलीला आईकडे ठेवून एमिलीने युद्धकाळात केलेला व्हिएन्ना ते हँबर्ग हा प्रवास! नेताजींना काही जाणवलं असेल आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मेजदांच्या नावे चिठ्ठी लिहिली की, तुम्ही आयुष्यभर माझा संभाळ केलात, काळजी घेतलीत, तशी आता माझ्या पत्नीची व मुलीची घ्या. अतिशय हुरहुर लावणारी ही निरोपाची व शेवटचीच ठरलेली भेट घेऊन नेताजी ट्रेनने हँबर्गला गेले व तिथून पाणबुडीतून निघाले. असंख्य भावभावनांच्या वादळाला संयमाने स्थिर ठेवून निघाले. युद्धाचं पारडं फिरल्यावर आणि नेताजींमुळे मिळणारी व्हीआयपी वागणूक बंद झाल्यानंतर नाझींच्या राजवटीत एमिली व अनिताचं काय होईल, ह्याची काळजी तर होतीच. आणि नंतर त्यांचेही हाल झाले. ८ फेब्रुवारी ते २४ एप्रिल १९४३ पाणबुडीचा प्रवास! भारताच्या दक्षिणेवरून जाताना समुद्रातूनच भारतभूमीला वंदन करून अखेर पूर्व आशियात पोहोचले आणि पुढे इतिहास घडला! तो अनेक प्रकारे पुढे आलेला आहेच. त्या संदर्भात इतकंच म्हणेन की, एकदा कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन ह्यांनी नेताजींना सांगितलं की "नेताजी, तुम्ही तर प्रपंचात कधी आला नाहीत. प्रेमाचे बंध, ममता हे तुम्हाला कसं माहीत असणार?" तेव्हा त्यांना नेताजींनी एमिली व अनिताबद्दल सांगितलं होतं. युद्धाचा शेवट येईपर्यंत काही काळ एमिलीची पत्र मिळत होती. पण पुढे सर्वच गोष्टी बिकट बनल्या. जर्मनीच्या पराभवापर्यंत जपानचाही पराभव जवळ आला. आझाद हिंद फौजेने मोठी हिंमत दाखवून कर्तृत्व गाजवलं खरं, पण आलं अपयशच. तरीही नेताजी नवीन पर्याय शोधून त्या दिशेने जाण्यासाठी सज्ज झाले...

अशी‌ ही नेताजींच्या विलक्षण प्रेमाची तितकीच रोमँटिक कहाणी. पण इथे फक्त शृंगाररस नाही, तर त्याबरोबर वीररस, करुणरस आणि रौद्ररसही तितकाच! आणि कदाचित शेवटी शेवटी तर फक्त करुणरस उरतो, जेव्हा नेताजींना अज्ञात प्रदेशात विजनवासात दिवस व्यतीत करावे लागले! नेताजी निश्चित प्रकारे पुढेही‌ जिवंत होते, असं सांगणारे अनेक अप्रत्यक्ष पुरावे आहेत. ताश्कंदमध्ये त्यांच्यासारखी एक व्यक्ती लाल बहादुर शास्त्रींच्या फोटोत दिसते; नेहरूंच्या अंत्ययात्रेलाही त्यांच्यासारखी व्यक्ती दिसते. स्वत: गांधीजींनी कधी तैपेईच्या अपघातावर विश्वास ठेवला नाही. राजकीय स्वार्थ, देशांमधील सामोपचाराच्या तडजोडी, ब्रिटिशांशी कठोर शत्रुत्व पत्करल्याचा परिणाम (स्वतंत्र भारत हाही अनेक प्रकारे ब्रिटनचा अंकितच होता) किंवा भारतातील महान नेत्यांच्या बदनामीचा धोका ह्या सगळ्या गोष्टींमुळे नेताजींना पुन: कधीही नेताजी म्हणून राहता आलं नाही. आणि म्हणून त्यांना जो पर्याय उरला होता, तो त्यांना पत्करावा लागला, तो होता एक निनावी व्यक्ती आणि आध्यात्मिक पिंड असल्यामुळे साधू म्हणून एकांतवास. गुमनाबी बाबा! असो!

1

एमिली आणि अनिताबद्दल सांगायचं, तर युद्ध संपल्यानंतर १९४८मध्ये नेताजींचे मोठे भाऊ व्हिएन्नाला जाऊन त्यांना भेटले. अनिता बोस अनेकदा भारतात येऊन गेल्या. पण एमिली शेंकेल-बोस कधी आल्या नाहीत. जिथे माझा 'चंद्र' प्रकाशमान नाही, तिथे मी येऊ शकत नाही, असं त्यांना वाटत असेल. ते काहीही असो, एमिलींमुळे आपल्याला आजही ह्या तीव्र प्रकाशमान आणि रौद्र सूर्यामध्ये दडलेला आणि फारसा कधी समोर न आलेला - किंबहुना सूर्याच्या प्रकाशामध्ये हरवून गेलेला हळवा 'चंद्र' निश्चित प्रकारे दिसतो! त्या चंद्राची शीतलता दिसते, रमणीयता आणि मोहकताही दिसते आणि ह्या अग्निदिव्यातून गेलेल्या सूर्यामध्ये 'चंद्र'ही वसत होता, जे जाणून त्यांच्याबद्दलचा आदर आणि आपुलकीचा भाव आणखी वाढतो. खर्‍या अर्थाने एक रोमांचक आणि नाट्यमय आयुष्य ते जगले. त्यांच्या आयुष्यातही रोमान्स होता - किंबहुना त्यांचं संपूर्ण आयुष्य हा नियतीबरोबरचा एक खूप मोठा रोमान्स होता, असंच म्हणावं लागेल. त्यांच्यासाठी रोमान्स ही एक कृती किंवा घटना नव्हती, तर तो स्वभाव होता, ती जीवनशैली होती. नेताजींनी स्वत: म्हंटलंही आहे की, मी स्वप्नांमध्येच जगतो. स्वप्नंच मला पुढे नेत राहतात.

नेताजींची ही प्रेमकहाणी पुन: पुन: समजून घेताना आणि जाणून घेताना जाणवतं की, माणूस जर मोठा असेल तर तो प्रत्येक गोष्ट मोठ्या पातळीवर नेऊन ठेवतो. मग तो रोमान्स साधा न राहता सब्लिमेट होतो. प्रेम हे देशप्रेम होतं. ओशो म्हणतात तसं प्राथमिक पातळीवरील प्रेमाचं रूपांतर होऊन आध्यात्मिक प्रेम निर्माण होतं, जे कंडीशनल नसतं किंवा देवाण-घेवाणीचा भाग नसतं. ते युनिव्हर्सल असतं आणि state of being असतं. शृंगाररसाबरोबर इतर रसांची जोड असलेला हा रोमान्स जगाच्या रंगमंचावर अतिशय दुर्मीळ योग म्हणावा लागेल.
आणि मग हे गाणं आठवतं -

मैं अगर बिछड़ भी जाऊँ कभी मेरा ग़म न करना
मेरा प्यार याद करके कभी आँख नम न करना
तू जो मुड़के देख लेगा मेरा साया साथ होगा ...

मेरा ग़म रहा है शामिल तेरे दुख में, तेरे ग़म में
मेरे प्यार ने दिया है तेरा साथ हर जनम में
तू कोई जनम भी लेगा मेरा साया साथ होगा ...

- निरंजन वेलणकर
09422108376
niranjanwelankar@gmail.com
www.niranjan-vichar.blogspot.com

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 Nov 2020 - 2:24 pm | तुषार काळभोर

शेवटच्या पंक्ती वाचेपर्यंत अंगावर रोमांच उभे राहिले!

काय अफाट, अकल्पनीय आयुष्य जगला हा माणूस!
मनातली एकही इच्छा, योजना पूर्णत्वास नेण्याचे समाधान त्यांना लाभले नाही.

एमिली आणि विशेषतः अनिता यांच्याविषयी खूप हळहळ वाटते.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 1:30 pm | टर्मीनेटर

@मार्गी

'नेताजी आणि एमिली'

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

मार्गी's picture

20 Nov 2020 - 1:40 pm | मार्गी

जोरदारच टर्मीनेटर साहेब!!! खूप खूप धन्यवाद!

- आपला जॉन कॉनर.

नेताजींच्या या आयुष्याची फक्त तोंडओळख महानायक मध्ये झाली होती... लेखाबद्दल खूप धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2020 - 5:31 pm | सुधीर कांदळकर

महानायकांबद्दल नवी माहिती दिलीत. विश्वास पाटलांचे महानायक दहाबारा वर्षांपूर्वी वाचले होते. त्यात एमिलीबद्दल वाचल्याचे आठवत नाही.

छान लेख. आवडला, धन्यवाद.

नेताजींबद्दलची ही माहिती नव्याने समजली!!!
.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 11:03 am | ज्ञानोबाचे पैजार

नेताजींची वेगळी भेट घडवून आणल्याबद्दल मनःपूर्वक आभार
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

19 Nov 2020 - 5:51 pm | प्राची अश्विनी

+11

मित्रहो's picture

19 Nov 2020 - 11:55 am | मित्रहो

वाह नवीन माहिती मिळाली. नेताजी आणि एमिली याविषयी इतके सविस्तर प्रथमच वाचले. त्यांच्या जीवनातला हा कप्पा कधी फार पुढे आला नाही.
या माहितीबद्दल धन्यवाद

Jayant Naik's picture

19 Nov 2020 - 4:09 pm | Jayant Naik

फार सुंदर माहिती. आभार

मार्गी's picture

20 Nov 2020 - 1:40 pm | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

25 Nov 2020 - 6:00 pm | चौथा कोनाडा

नेताजी आणि एमिली यांची विलक्षण कहाणी !
ओघवत्या लेखनामुळे वाचताना रोमांच उभे रहात होते !

👌


मार्गी साहेब, अतिशय सुंदर लेखन +१