माझे शिराप्रेम

Primary tabs

अपर्णा नाडकर्णी's picture
अपर्णा नाडकर्णी in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amमाझे शिराप्रेम

प्रेमाला उपमा नाही
हे देवाघरचे लेणे ...

ह्या ओळी ऐकल्या तर मला शिऱ्याची जाम आठवत येते,उपम्या बद्दल मला यत्किंचितही राग ,द्वेष नाही ,
पण शिरा तो शिराच .
प्रेमाला उपमा नाही तर तिला शिरा द्या अशा भन्नाट कल्पनेने शिरा प्रकरण चालू होतेय...
प्रकरण म्हणजे शिराप्रेमच हो.

लहानपणी आईच्या सुगरण हाताने अन पाककौशल्याने बनलेल्या रवाळ आणि लुसलुशीत अश्या शिऱ्यामुळे ही गोडी निर्माण झाली.
तेव्हा त्या खमंग ,गोड वासाने मला मोहित केले, घरात शिरा बनतो आहे अशी कानोकानी खबर मिळताच हाळी दिली की काय असे ओढले गेल्यागत मी स्वयंपाकघरात जाऊन पोहोचत असे...
बशीत घेऊन चाटून पुसून शिरा खाण्यात जी मजा आहे ती अवर्णनीय.
अचानक कुणी घरी आले की आई पटकन कांदा पोहे आणि शिऱ्याचा बेत करत असे,त्यामुळे त्याच्या ह्या गोड सहवासाने प्रेम आपसूकच निर्माण होत गेले..

लग्न झाल्यावर मुलांसाठी करतांना करत करत,चुकत माकत त्यातली गंमत कळाली.आई , आज्जी आणि अहो आई यांच्या हाताखाली शिकत सुधारणा होत गेली.

शिरा हा आपण पटकन करणारा होणारा पदार्थ म्हणतो खरे ,पण तो करताना यात प्रेम ओतावे लागते , पदार्थ करायचा म्हणून केला तर तोही रुसून बसतो ...

प्रेमाने प्रत्येक पदार्थ मोजून अंदाज घेऊन त्याचे रूप साकारावे लागते ते असे...

छान साजूक तुपात बारीक किंवा मध्यम रवा अलगद भाजून घ्यावा ,खमंग वास तर आला पाहिजे पण काळपट लाल न होऊ देता निगुतीने भाजावा मग आधण आणलेले दूध आणि थोडे पाणी एकत्रित घालून मस्त वाफ काढावी ,झाकण ठेवूनच ...

त्यानंतर नाजूकपणे मोजलेली साखर अंमळ जास्तच घालून छान ढवळून सारखे करावे ,वरून वेलची पूड आणि मनुका हवे तर काजू बदाम ने नटवुन त्याचे रुप अजून साजिरे करावे ...झाकण ठेवून कढईत सर्व पदार्थाना छान एकत्रितपणे एकमेकांत नांदू द्यावे ...
एकत्र कुटुंबासारखे सर्वांची एकमेकांबरोबर कशी छान नाती जुळतात फुलतात न अगदी तशीच....

1

अहाहा मग त्याची रंगत काय बहार आणते बघाच ...
देवास नैवैद्य दाखवून पहिला घास तोंडात टाकताच अप्रतिम , वाहवा, लाजवाब असे उदगार ऐकले की करणाऱ्या हाताला भरून पावल्यासारखे सुख लाभते.

मनसोक्त आस्वाद घ्यावा साजूक तुपाच्या प्रेमाने तृप्त व्हावे.
सुख सुख म्हणजे अजून काय असते हो ...
ह्या शिऱ्याची भावंड पण अति प्रेमळ ह...
पाईनपल शिरा , मँगो शिरा ,कणकेचा शिरा त्यातही गुळाचा किंवा साखरेचा ,ड्रायफ्रूईट्स चा आणि बदामाचा ....
उपवासाच्या सात्विकतेत भर घालणारा पण पोटभरीचा एहेसास देणारा बटाट्याचा ,रताळ्याचा शिरा .
उपवास करावे तर असे रईज आणि खानदानी असे ज्या खादाड संघटनेला वाटते तसेच मलाही वाटते.

माझ्या सासूबाई माझ्या बाळंतपणात रोज संध्याकाळी साजूक तुपातला कणकेचा बदामाचा शिरा प्रेमाने करून द्यायच्या ...
हे शिरा प्रकरण सलग एक महिना रंगले होते, मलाही रोज नियमाने त्याची आठवण येत असे.
इतकी लाडिक सवय करणारा हा ..... ,किती सांगावे आणि काय सांगावे.????

लग्नाच्या आधी आई आणि मी आई झाल्यावर अहो आई ह्या दोन सुगरण आईंच्या वात्सल्याने माझे शिराप्रेम अजून गाढ झाले ह्यातच दुमत नाहीच ..
आणि सर्व शिऱ्यात राजा म्हणजे सत्यनारायण प्रसादाचा शिरा ...
ह्यात माझ्या सासूबाईची पीएचडी असावी ,अक्षरशः तुपाने न्हाहलेला असा सोज्वळ प्रसाद त्या करत होत्या.
सव्वा सव्वा प्रमाणात घेतल्याने अन त्यात उत्तम पिकलेली केळी असल्याने अवर्णनीय आनंद देणारा असतो. त्याच्या गोडीत सात्विकता आणि सोज्वलता देवकृपेचा आनंद मिळतो

लोक हो ह्या शिरा कुटुंबात फक्त आणि फक्त प्रेम नांदत असते .
कुणीही अचानक अतिथी येताच चटकन मदतीला धावून येणारा ,सणवार गणपती ,नवरात्र प्रसाद म्हणून देण्यास आणि वाढदिवस म्हणो की सेलेब्रशन असो हा शिरा आपले स्थान कायम टिकवून आहे .

शिऱ्या शिऱ्याची गोष्ट सांगते..
तुझी नि माझी प्रिती..
अशा स्वरचित ओळी गुणगुणत शिरा करतांना बघून अहोची दिलखुलास दाद ही मिळाली.
और क्या चाहीये....

मला शिरा खायला कंपनी असो नसो , करायचा आणि सांगायचे देवासाठी केला होता ,अफलातून सुरेख होतोच होतो ...

वेगवेगळ्या प्रांतात ह्याची भावंड आहेत फक्त नावे वेगळी आहेत
जस सुझी का हलवा ,लेमटो आणि लंगर साठी ह्याला कडा प्रशाद असे म्हणतात ...
स्वर्गीय अनुभूती और क्या चाहीये..!!!!

एकूण ह्या शिऱ्यास दुसऱ्या मिठाईशी तुलना नाहीच असे त्याचे स्थान अबाधित आहे..
म्हणून तर मिठाईच्या दुकानात ह्याला अस्तिव नाहीच
ते आहे आपल्या सर्वांच्या हृदयातच...उच्च स्थानावर!!!!
त्याचे केलेले कौतुक तर त्याचे रुप अजूनच खुलवते आणि करणाऱ्याचेही !!!!!!

माझ्या बहिणी जेव्हा मला म्हणतात ..."तुझा शिरा अगदी आईसारखा होतो " !!!
मुलांना ही असा शिराप्रेमाचे संस्कार देण्यात जराही कमी पडले नाही असे वाटते ,हमखास डब्यात शिरा मागणारे माझी मुले पण त्याचे आणि अर्थात माझ्या ह्या कलाकारीचे चाहते बनले आहेत.
कौतुकाची ही थाप तुम्हाला प्रोत्साहित तर करतेच आणि परफेक्शन जवळ नेऊन सोडते ...अलगदपणे..

श्रावण तर सणवारांचे द्वार च आहे ,त्यापुढे भाद्रपद मध्ये गणपती ,आश्विन मध्ये नवरात्र आणि कार्तिक मध्ये आपली लहान थोरांना आवडणारी दिवाळी ...
शिरा करण्यासाठी अनेक संधी येतीलच ...
चुकवू नका एकही संधी,
तर असा हा शिरा करत राहा,
चार लोकांना खाऊ जरूर घाला
त्यात जे समाधान मिळेल ती अनुभूती वेगळीच आहे...!!!
शिरा प्रेमाने करून खिलवण्याचा रिवाज आहे ,शास्त्र असतंय ते .
केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे ...

तरच तो होईल बघा प्रेमाचा शिरा !!!!!

सौ अपर्णा नाडकर्णी
सहकारनगर
पुणे
9818618871
aparna.nadkarni16@gmail.com

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 Nov 2020 - 2:27 pm | तुषार काळभोर

मजा आला!!

कंजूस's picture

14 Nov 2020 - 4:53 pm | कंजूस

छान साजुक झालाय लेख.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 1:57 pm | टर्मीनेटर

@अपर्णा नाडकर्णी

'माझे शिराप्रेम'

वाचून तोंड गोड झाले.  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

Bhakti's picture

15 Nov 2020 - 2:33 pm | Bhakti

लग्नाच्या आधी आई आणि मी आई झाल्यावर अहो आई ह्या दोन सुगरण आईंच्या वात्सल्याने माझे शिराप्रेम अजून गाढ झाले ह्यातच दुमत नाहीच .
अगदी..
तरी मला अजून आई सारखा शिरा येत नाही.
अगदी मनातला लेख!

व्वा!! सांच्याला सांज्याचा बेत ठरवून टाकू...

छान झालाय लेख

बबन ताम्बे's picture

16 Nov 2020 - 3:24 pm | बबन ताम्बे

प्रेमाचा मार्ग पोटातून जातो म्हणतात. शिऱ्याने अजून गोडी वाढते असे तुमचा शिरा प्रेम वाचून वाटले. मस्त लिहिलेय .

शिरा थोडासाच घेतला की अप्रतिम लागतो. सत्यनारायणाचा हातावर ठेवतात तितका प्रसाद हे उत्तम युनिट. सत्यनारायण शिरा हाच एक बेस्ट शिरा असतो. बाकी ते सव्वा सव्वा प्रमाण कळत नाही. सर्वच सव्वा सव्वा.. म्हणजे प्रमाण एकसमानच / एकास एकच झालं की. (उदा. पाच घटक असतील तर प्रत्येक घटक एक पन्चमांश)

सुधीर कांदळकर's picture

17 Nov 2020 - 9:16 am | सुधीर कांदळकर

त्याच बशीत लोणच्याची फोड देत.

मस्त गोड लेख. धन्यवाद.

रच्याकने: लापशी रव्याचा गूळ घातलेला शिरा तान्ह्या बालकांना डब्यातल्या बाल-खाऊऐवजी देणे जास्त चांगले. आमचा चि. आठदहा महिन्यांचा झाल्यावर आम्ही त्याला वरणभात, गूळ घातलेला लापशी रव्याचा शिरा वगैरे आलटून पालटून देत होतो.

दुर्गविहारी's picture

17 Nov 2020 - 9:29 am | दुर्गविहारी

खल्लास ! समान आवड असलेल्या व्यक्ती आहेत हे वाचून आंनद झाला. मलाही शिरा प्रचंड आवडतो. भटकंतीमुळे अनेक ठिकाणचा शिरा आणि मिसळ खायचा योग आला. आपल्या धाग्याबध्द्दल धन्यवाद.

मित्रहो's picture

17 Nov 2020 - 10:24 am | मित्रहो

जिभेला पाणी सुटले. शिरा हे प्रकरण माझ्याही प्रचंड आवडीचे आहे. कुणी मला विचारले गोड काय करायचे तर १० पैकी ९ वेळा मी शिरा सांगेन.
मला फक्त साधा शिरा आवडतो बदाम, काजू ठिक आहे पण इतर फार आवडत नाही.
सत्यनारायणाचा शिरा नेहमीच नंबर १

सौंदाळा's picture

17 Nov 2020 - 12:27 pm | सौंदाळा

अंगावर आणि जिभेवर गोड 'शिरशिरी' आली.
बऱ्याच लोकांना साजूक तुपातला शिरा आवडतो पण मला मात्र तेलातला शिराच आवडतो. साजूक तुपातले इतर पदार्थ आवडतात पण शिरा समहाऊ तेलातला आवडतो.
शिऱ्याची अजून एक आठवण (आता आठवणच म्हणायची) म्हणजे गोवा किंवा सावंतवाडीला एस. टी. ने जाताना गाडी रात्री पुण्याहून निघायची आणि पहाटे पहाटे कणकवली किंवा आंबोलीला चहाला थांबायची. तिथे २० रुपयात शिरा आणि उपमा एक एक मूद आणि गरम चहा ठरलेला. त्या शिऱ्याची चव अजून आठवतेय.
कोंढाव्यात रमजानमध्ये मनसोक्त चिकन मटण खाऊन झालं की गोड खायला शिरा आणि परतीच्या आकाराची पुरी (आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पुरी तोडून मिळायची) शिरा अप्रतिम. हा शिरा मात्र अजूनही दरवर्षी खातो पण यावर्षी कोरोनामुळे स्टॉल लागलेच नाहीत त्यामुळे मिस झाला.

सुचिता१'s picture

25 Nov 2020 - 10:23 am | सुचिता१

तेलात ला शिरा पूर्वी ऐकून माहीत नाही. बाकी शिरा पुराण आवडले.

कर्नाटकात एकाच प्लेटमध्ये असा उपमा आणि शिरा मिळतो त्याला च्यावच्याव बाथ/भात म्हणतात.

शिरापोवा आठवतो का कुणाला? (शारापोवा नव्हे..)

मुंबईत अनेक ठिकाणी असतो. बशीत दाबून हाप शिरा हाप पोवा.

जगप्रवासी's picture

27 Nov 2020 - 11:26 am | जगप्रवासी

दर रविवारी परेलच्या नरेपार्क मैदानात खेळायला गेल्यावर मैदानाबाहेर हाफ पोहा आणि हाफ शिरा खाऊन मगच मैदानात पाऊल ठेवले जाते. तसेच सार्वजनिक मंडळाची काम करण्यासाठी जागरण करताना नास्ता म्हणून नेहमी ठरलेला.

शिरा जाम आवडीचा प्रकार त्यातल्या त्यात सत्यनारायणाचा प्रसाद म्हणजे अमृत. आणि तोच शिरा दुसऱ्या दिवशी शिळा झाल्यावर खायला अजून मजा येते.

विशल्पर्बत's picture

17 Nov 2020 - 8:33 pm | विशल्पर्बत

झक्कास जमून आलाय लेख.... उद्याच्या नाश्त्याचा कार्यक्रम ठरला....

नूतन's picture

20 Nov 2020 - 12:24 pm | नूतन

शि-यासारखाच गोड लेख.

प्राची अश्विनी's picture

24 Nov 2020 - 6:43 pm | प्राची अश्विनी

+11

मुक्त विहारि's picture

24 Nov 2020 - 8:05 pm | मुक्त विहारि

भरपूर तूप घालून, गुळात केलेला आणि मधातला...

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Nov 2020 - 10:31 am | ज्ञानोबाचे पैजार

या दिवाळी अंकात नसलेल्या पाककृती विभागाची कमतरता या लेखाने भरुन काढली
पैजारबुवा,

निनाद's picture

25 Nov 2020 - 10:39 am | निनाद

शिरा म्हनजे खरंच मस्त पदार्थ... एकदम आवडता. गुळाचा शिरा अजून खमंग लागतो चवीला.

सरिता बांदेकर's picture

27 Nov 2020 - 10:45 am | सरिता बांदेकर

मला पण गोडाच्या पदार्थामध्ये शिराच आवडतो.मस्त बदामी रंगाचा मऊसूत आणि दाणा न् दाणा फूललेला पाहिजे.
आमच्या डब्यातला शिरा बघून एकदा एका कॅथलिक मैत्रीणीने स्वत:च्या मनाने शिरा करून आणला होता. त्याला तिने राई, जिरं मिरची आणि काद्याची फोडणी केली होती.
त्याची आठवण झाली.
पण शिरा मस्तच तुमचा.

सतिश गावडे's picture

27 Nov 2020 - 10:21 pm | सतिश गावडे

शिरा पुराण आवडले. हैदराबादला एका उडूपी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो असता तिथे राईस प्लेटमध्ये "केशरी बाथ" होता. मला वाटले तो केशरी रंगाचा भात किंवा पुलाव असेल. प्रत्यक्षात तो केशरी केशरी रंगाचा शिरा होता.

@ अपर्णा नाडकर्णी,

लव्ह फॉर फूड इज द ट्रूएस्ट लव्ह - बाकी सब झूट बात :-))

शिरापुराण आवडले.

.....अचानक कुणी घरी आले की आई पटकन कांदा पोहे आणि शिऱ्याचा बेत करत असे.... डिट्टो ! पाहुणे नेहेमीचे असतील तर पोहे आणि खासमखास असतील तर शिरा - पोहे दोन्ही असा शिरास्ता, सॉरी शिरस्ता होता.

रव्याचा / सत्यनारायण प्रसादवाला शिरा 'न' आवडणाऱ्या दुर्मिळ मानवांपैकी मी एक आहे. साधा कणिक / आटा वाला शिरा उर्फ 'कडाह प्रशाद' मात्र फार आवडतो आणि उत्तम करताही येतो.

ह्या लेखामुळे तोंड गोड झाले, अनेक आभार !