फुलले रे क्षण माझे

Primary tabs

हजारो ख्वाईशे ऐसी's picture
हजारो ख्वाईशे ऐसी in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amफुलले रे क्षण माझे

त्या दोघांचं लग्न झालं, तेव्हा तो फक्त दोन-तीन आठवड्यांच्या सुट्टीवर आला होता. सैन्यात होता तो. आई-वडील कधीचे मागे लागलेले लग्न करू या म्हणून. लग्न झालं, सुखाच्या पावलांनी ती घरी आली. त्याच्या घरी तो एकुलता एक. आई, वडील आणि म्हातारी आज्जी. तिच्या येण्याने घर पूर्ण झालं.

एक आठवडा असाच गेला. पाहुणेरावळ्यांनी घर भरलं होतं. तिला जाणवलं, तो सगळ्यांचाच लाडका होता. थोरांपासून लहानांपर्यंत सगळेच त्याच्या आवतीभोवती. आईला सामान आणायला मदत करायची असू दे, नाहीतर बाबांना पाय चेपून द्यायचे असू दे किंवा धाकट्या चुलत भावंडांना त्याच्या जीपमधून फेरफटका मारून आणायचा असू दे, सगळीकडे तोच हवा असायचा. या सगळ्यातही तो आज्जीची आठवण ठेवायचा. संध्याकाळी दिवेलागण झाली की आज्जीला गोष्टी सांगत बसायचा त्याच्या पोस्टिंगच्या.

आज्जीने त्या दोघांना जवळ बोलावलं एका दुपारी, म्हणाली,
“बाळांनो, पूजेला तसा उशीरच झाला तुमच्या. पण परवा पूजा आहे तर कुलदैवताला जाऊन या उद्या."
ते दोघे हो म्हणाले.
सकाळी पहाटे उठून तिने सगळं आवरलं. सासूबाईंनी लग्नाचा शालू नेसायला सांगितलं होतं, तो नेसली. नाश्ता करून ते दोघे निघाले.
तिला मनातून खूप छान वाटत होतं, पण त्याचबरोबर संकोचही वाटत होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ते दोघेच एकत्र घराबाहेर पडले होते. त्याची जीप निघाली, तसा सगळ्या लहान भावंडांनी एकच कल्ला केला, “आम्ही पण येणार” म्हणून. तो हसला आणि काहीतरी सांगून आला त्यांना. पोरंही लगेच हो म्हणाली. तिला आश्चर्य वाटलं होतं. काय सांगितलं असेल याने?

गाडी गावाबाहेर पडेपर्यंत ती अगदी शांत खाली मान घालून बसली होती. आजूबाजूला बघावं तर रस्त्याने त्याच्या ओळखीचे सगळे चेहरे. त्याच्या एका मित्राने तर गाडीपुढे आपली मोटारसायकल आडवी घातली, "आधी पार्टी कधी देणार ते सांग, तर जाऊ देतो" असं म्हणून हटून बसला. तिला उगाच कानकोंडं झालं. ह्याने त्याचीही समजूत काढली. अखेर गावाबाहेर पडल्यावर तिला जरा हायसं वाटलं.
“देव दिसल्याशिवाय बोलायचं नाही असं ठरवलंय वाटतं?!” शेवटी तोच बोलला.
“नाही, तसं काही नाही..” ती अजूनही पायावर रुळणाऱ्या शालूच्या भरगच्च विणकामावरच नजर खिळवून होती.
“मला मान्य आहे शालू खूप आवडलाय तुम्हाला. सुंदरच आहे तो आणि तुम्ही नेसल्यामुळे तर अजूनच सुंदर दिसतोय. पण म्हणून काय त्याच्याकडेच बघत बसायचं का?” त्याने पुन्हा टोकलं तिला.
ती हसली. म्हणाली,
“मला तू म्हणा. अहोजाहो नको, प्लीज.”
“एका अटीवर तू म्हणेन - तूही मला अहोजाहो करायचं नाहीस.” तो तिच्याकडे पाहत म्हणाला.
आणि पहिल्यांदाच तिने त्याला इतकं निरखून पाहिलं असेल. खरंच लाखात एक म्हणावा इतका देखणा होता तो. तिच्यापेक्षा कांकणभर काय, कित्येक कांकणभर सरसच.
ती आपल्याकडे एकटक बघतेय, हे कळल्यावर तो उमजल्यासारखं हसला, म्हणाला,
“काय मग? पसंत का?” आणि ती झक्कपैकी लाजली.

पुढचा प्रवास जणू हवेत तरंगतच झाला. कुलदैवताच्या जोडीने पाया पडताना तिने त्याचं सौख्य, उदंड आयुष्य मागितलं.
दिवस भुरुभुरु उडून गेले आणि बघता बघता त्याची सुट्टी संपली. तो परत रुजू व्हायला गेला.
तिच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. येत-जाता, उठता-बसता तिला त्याची आठवण यायची. आता पुन्हा कधी रजा मिळणार आणि तो घरी येणार.. काय माहीत.

एके दिवशी दुपारी ती अशीच हातावरच्या हळूहळू फिक्या होणाऱ्या मेहंदीला निरखत बसली होती.
आणि तिला आठवलं -
लग्नात तिच्या तळहातावर मेहंदी खूप छान रंगली होती. त्याच्या चुलत बहिणीने हट्ट केल्यावर त्याने मेहंदीत त्याचं नाव शोधलं होतं - अगदी विनासायास. त्या दिवशी रात्री तो तिचे हात हातात घेऊन म्हणाला होता, “किती सुंदर वास आहे तुझ्या हातांवरच्या मेहंदीचा! मेहंदीचा वासच इतका छान असतो की ती तुझ्या हातांवर आहे म्हणून तो इतका मोहक वाटतोय?” आणि ती लाजून चूर झाली होती.
तिला त्या मेहंदीकडे बघूनही रडू कोसळलं.

बघता बघता सहा महिने सरले. घरी काम असं खूप नसायचं. इन मीन चार माणसांचं असं काय काम असणार. तरीही ती उगाचच स्वच्छताच काढ, माळाच झाडायला घे, परसात रोपंच लाव असं करून दिवस घालवायची. सगळ्यात अंगावर यायची ती मात्र रात्र. काही दिवसानंतर तर तिने सरळ आज्जीशी बोलत बसायला सुरुवात केली. आज्जीची झोप अशीही म्हातारपणामुळे कमी झाली होती. त्यामुळे दोघी मस्त गप्पा मारत बसायच्या. आजीच्या गोष्टींमध्ये तिचा वेळ जायचा. आठवड्यातून कधीतरी त्याचा फोन यायचा, महिन्यातून एखादं पत्र. पण त्यातही वाटेकरी असायचे.
ती चातकासारखी वाट बघत राहायची कधी तो येईल याची.

बघता बघता नागपंचमीचा सण दोन-तीन दिवसांवर आला. घरात त्याच्या चुलत बहिणी माहेरपणाला येणार होत्या. सासूबाईंनी तिला "मेहंदी काढणार का?" म्हणून विचारलं. हिने त्यांच्या हातांवर छान मेहंदी रेखली. पण स्वतःच्या हातावर रेखायचं मात्र तिची इच्छा होईना. मेहंदीचा कोन तसाच ठेवून ती आज्जीपाशी जाऊन बसली.
“काय ग बाय, मेहंदी काढ की तुझ्या पण हातावर?” आज्जीने विचारलं.
“नको आज्जी. मन लागेना” ती कसंबसं म्हणाली. तिचे डोळे डबडबले होते.
गेला महिना झाला, त्याचा ना फोन आला होता ना पत्र. त्याचं पोस्टिंग नवीन जागी झालं होतं आणि तिथून लगेच फोन करणं किंवा पत्र पाठवणं शक्य होणार नाही, हे त्याने आधी सांगितलेलं असूनसुद्धा ती वाट बघत होती.
आज्जीला एकंदरीत अंदाज आला काय झालंय याचा. तिनेही मग मेहंदीचा लकडा लावला नाही तिच्यामागे. न बोलता तिला कुशीत घेऊन झोपवलं आज्जीने.

रात्री तिला स्वप्न पडलं तो आलाय असं. सकाळी उठली, तर दुसऱ्या खोलीतून हसण्याचा आवाज येत होता, तिची चुलत नंणंद अली होती. तिने हट्ट करून करून हिला मेहंदी काढायला लावलीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी ती आवरून स्वयंपाकघरात चहा ठेवायला आली. चहाचं आधण ठेवून त्यात चहा पावडर टाकल्यावर हातावरच्या गर्द लाल खुललेल्या मेहंदीच्या रंगाकडे बघतच राहिली ती. पुन्हा एकदा त्याची सय दाटून आली तिच्या मनात. तो, त्याचा स्पर्श, त्याचं बोलणं. भावनातिरेकाने तिने डोळे मिटले.
आणि ती चपापलीच.
तिच्या मागे अगदी एका हाताच्या अंतरावर कोणीतरी उभं होतं. झर्रकन मागे वळून तिने पाहिलं, तर समोर तो होता. आणि तिचे शब्द जणू हवेतच विरले.
“तू?!!” तिच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहायला लागल्या होत्या.
“हो मीच. किती आठवण काढशील माझी!”
त्याने तिचे हात हातात घेतले आणि तिच्या मेहंदीचा गंध स्वतःच्या श्वासात भरून घेतला आणि त्याच्या मिठीत तिची मेहंदी सोनसळी रंगात खुलली.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

14 Nov 2020 - 4:33 pm | विजुभाऊ

वा छान लिहीली आसे कथा
शेवटपर्यंत उत्कंठा लागते
शेवट पाॅझिटीव्ह केला से ही छानच

सोत्रि's picture

15 Nov 2020 - 11:57 am | सोत्रि

नेमकं हेच म्हणतो!

- ( विजुभौशी सहमत असलेला) सोकाजी

सतिश गावडे's picture

14 Nov 2020 - 7:45 pm | सतिश गावडे

आवडली. सहसा सैनिक प्रेमकथेचा शेवट दुःखद असतो, त्यामुळे सुखांत आवडला.

प्राची अश्विनी's picture

18 Nov 2020 - 6:16 pm | प्राची अश्विनी

हेच म्हणते. कथा आवडली.

सतिश गावडे's picture

14 Nov 2020 - 9:07 pm | सतिश गावडे

आवडली. सहसा सैनिक प्रेमकथेचा शेवट दुःखद असतो, त्यामुळे सुखांत आवडला.

तुषार काळभोर's picture

15 Nov 2020 - 11:41 am | तुषार काळभोर

जसा जसा शेवट जवळ येत होता, तस तसं धाकधूक वाढत होती. पण इतका गोड, सुखांत शेवट केला की जीव अगदी भांडी घेऊन पडला :)

छान कथा!

सहसा सैनिक प्रेमकथेचा शेवट दुःखद असतो, त्यामुळे सुखांत आवडला.

शत प्रतिशत सहमत..

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2020 - 11:31 pm | संजय क्षीरसागर

हळूवार मांडणी, सुरेख भाषा आणि अपेक्षित पण नेमका हवाहवासा वाटणारा शेवट यामुळे कथा छोटी असली तरी कवितेसारखी झाली आहे.

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 5:35 pm | टर्मीनेटर

@हजारो ख्वाईशे ऐसी

'फुलले रे क्षण माझे'

ही तुमची कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

शा वि कु's picture

16 Nov 2020 - 9:02 am | शा वि कु

छान कथा.

सुखी's picture

17 Nov 2020 - 11:13 pm | सुखी

व्वा... छान कथा, आवडली

मित्रहो's picture

18 Nov 2020 - 4:21 pm | मित्रहो

कथा आवडली. वर म्हटल्याप्रमाणे सैनिक कथा असूनही सुखद शेवट केल्यामुळे अधिक आवडली

चौथा कोनाडा's picture

18 Nov 2020 - 5:44 pm | चौथा कोनाडा

व्वा किती सुंदर, किती हळूवार ....... !

👌

बेहद्द आवडली कथा !
हख्वाऐ, एक नंबर !

नूतन's picture

18 Nov 2020 - 8:31 pm | नूतन

छान.

nanaba's picture

26 Nov 2020 - 7:10 am | nanaba

Awadali!

कंजूस's picture

26 Nov 2020 - 9:09 am | कंजूस

त्याने लबाडाने बहिणीला निरोप पाठवून मेंदी काढायला लावली. गोष्ट जमली.