कडं २

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
19 May 2020 - 1:42 am

तपकिरी रंगाचं बांड कुत्रं ते. इवल्याशा झुडपाच्या सावलीत अंग चोरून बसले होते. दुपारचं लाही लाही करणारं ऊन. रानवटीचे खुरटे झोंबरे काटे. वारा सुटला तरी तापलेल्या झळया लाग्याव्यात. वाळलेली कुसळं आणि सुदूर पसरलेल्या येड्या बाभळी. चढउतार असलेला खडकाळ प्रदेश. पहावे तिकडे मृगजळेच दिसावी. लखोबाची वाडी अशी भरदुपारी शांत निवांत सुस्तावून जायची. भरगच्च जेवलेल्या ढेरपोट्या म्हाताऱ्यासारखी.

बांड्या कुत्र्याचा डोळा लागणारंच होता की भरधाव वेगानं एक गाडी त्याच्या पुढून निघून गेली. कुत्रं थोडं भांबावलं. आणि आयतीच नामी संधी शोधत गाडीच्या मागे तुटून पडलं. जोरजोरात भुंकत गाडीच्या मागे धाव धाव धावलं. मग थकलं. थांबलं. आणि शेपूट वर करून गाडीकडे जरा वेळ पाहत बसलं. मग पुन्हा झुडपात येऊन सुस्तावलं.

चकचकीत काळी गाडी पळत राहिली. महंमद रफीची सुरेल गाणी मंद आवाजात वाजत होती. एसीच्या थंडगार हवेत आत बसलेल्या दोघांना बाहेरच्या ऊन्हाची फिकीर नव्हती.
"भाऊश्या, जरा चुकलंच रे.. असं नाही करायला पाहिजे होतं.." स्टेअरींग सांभाळत सुरेंद्र बोलत होता.

भाऊश्या काही बोलला नाही. डॅशबोर्डवरची नव्या गाण्याची सीडी कधी लावतोय असं त्याला झालं होतं. पण या अशा डोंगराळ जागी रफीचीच गाणी चांगली म्हणून सुरेंद्रने त्याला लावू दिली नव्हती.

"तू माझ्या जागी असता तर काय केलं असतं? सांग बरं.." सुरेंद्रनं अजून एक खडा टाकला.

"मेन म्हणजे, मी असल्या भानगडीत पडलोच नसतो. कुठून अवदसा आठवली आणि तुझ्या नादी लागलो भेंचोद" भाऊश्या खवळला होता.

"हाहाहा, भाऊश्या कुल डाऊन, तुला पाहिजे का एखादी फटाकडी पोरगी? जमवून देतो" खड्ड्यातून गाडी आरामात काढत सुरेंद्र डोळा मारत म्हणाला.

"तुला कशी काय पटली रे ती? तुझी आधी ओळख होती काय?"

'तारीफ करू क्या उसकी' कातिल आवाजातलं मनमोहक गीत माहोल बनवत होतं.

"कॉलेजमधली मैत्री रे.. सगळ्यांची असते तशीच.. प्रपोज केलेले एक दोनदा.. पण उडवून लावलं सालीनं.. "

"हा हा हा.. उडवून लावलं.. आणि आता गळ्यात पडली भेंचोद.." भाऊश्या कधी कसा वैतागेल सांगणं कठीण.

"मग मी ईकडे कामानिमित्त मुंबईला आलो. आणि साली तीही लग्न होऊन ईकडेच.."

"बरं.."

"नवं नवं शहर.. कोणी ओळखीचं असेल तर बरं वाटतं रे.. मग मीच एकदा तिला फोन केला.. चार्मिंग यार.. तिचा आवाज चार्मिंग. गेलो ना भेटायला.. मग भेटतंच राहिलो.. बेडरूमपर्यंत कधी गेलो कळलंच नाही"

"बास.." भाऊश्या हात करत म्हणाला. "आता मला पेटवतो का? एवढा पण इमोशनल होउ नको भेंचोद"

सावकाश ब्रेक मारत सुरेंद्रने गाडी थांबवली. इंजिन बंद करून आतच तो काहिवेळ थांबला. मग दरवाजा उघडून सावध बाहेर आला. बाजूलाच एक खोलवर गेलेली घळी होती. मोठाड झाडांची मुळे आतवर पसरली होती.

"लोकेशन बेस्ट वाटतंय" भाऊश्या बाहेर येत म्हणाला.

सिगारेट पेटवून सुरेंद्र गाडीला टेकला. त्याची नजर चौफेर फिरत होती. परिसरात लांबवर जाऊन त्याने दोन चकरा मारल्या.

"सालं साधं कुत्रही दिसत नाही इथं." एव्हाना भाऊश्यानेही एक सिगारेट पेटवली.

"यस, बेस्ट आहे" सुरेंद्रने मान डोलावली. आणि खूण केली.

मग दोघे डिकीकडे आले. डिकी उघडली गेली. आतमध्ये अमेरिकेत टूरिस्टरची भलीमोठी सुटकेस होती. दोघांनी जोर लावून उचलली. नाही म्हटलं तरी कडक ऊन्हाने दोघांना घाम फुटला. घासत फरफटत त्यांनी ती घळीजवळ आणली. आणि मातीवरून घसरवत खाली सोडून दिली.

"माती टाकायची वरून थोडीफार?" भाऊश्याने पॉईंट काढला. सुटकेस वरून दिसत होती. पण बारीक बघावे लागत होते.

"चल चल लवकर बस, निघूया" सुरेंद्र दरवाजा उघडत म्हणाला.
"झालं? एवढंच होतं? भेंचोद!" भाऊश्या गाडीत बसला तशी यू टर्न मारून गाडी भरधाव निघाली.

रफीला बाजूला काढून 'झलक दिखला जा' फुल बासमध्ये वाजवले जात होते. एक्सलरेटर दाबून खड्डयांची पर्वा न करता गाडी आता अधिक वेगाने पळत होती.
"चारशे किलोमीटर लांब आलो होतो आपण" भाऊश्या मीटर बघत म्हणाला.
सुरेंद्र काही बोलला नाही. त्याला आता लवकरात लवकर घरी पोहोचायचे होते.
"काल मी तुझ्याकडे आलो नसतो, तर काय केले असते रे?" भाऊश्या बाहेर होत जाणारी संध्याकाळ बघत म्हणाला.

"काहितरी केलंच असतं, फक्त मला ते तुकडे करायला जमलं नसतं"

"जसं काय मी खाटीकंच आहे. भेंचोद एवढे तुकडे करायला लावले!"

"अबे तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखतं? पैशासाठी तू काहिपण करशील?"

"ते फार्महाऊस विकलं का रे?"

"नाही बे, तिथं तिचा सासरा राहतोय. "

मघाचं ते बांडं कुत्रं भॉक करून गाडीच्या मागे पळालं. पण तिकडे कोणीच लक्ष दिलं नाही.

गाडी हायवेला लागली तशी अधिकच भरधाव धावू लागली. वाऱ्याच्या वेगाने आता मुंबई जवळ येत चालली.

"मिनल, खरंच सायको होती भेंचोद" भाऊश्या आता अधिक पसरून बसला होता.

"घटस्फोट घे बायकोपासून म्हणून मागेच लागली. गेल्यावर्षी तिच्या नवऱ्याला टपकावलं, तेव्हाही एवढा त्रास झाला नाही. तेवढा दिला सालीन."

"हू.."

"मग एक वेळ येते. आणि सारं संपतं.."

गाडी आता मुंबईत पोहोचली होती. रात्री दहा-अकरा वाजल्या असतील. भाऊश्या ठार झोपला होता. त्याचं घर आलं तशी सुरेंद्रने गाडी थांबवली.

"थँक्स यार, एवढ्या भयंकर लफड्यातही तू मला मदत केली. दोस्ती असावी तर अशी" सुरेंद्र त्याला निरोप देत म्हणाला.

"सुरेंद्र, या असल्या लफड्यात दोस्ती नाही, पैसा बोलतो. पंचवीस लाख द्यायचे कबूल केले आहेस. विसरु नको" आपलं जॅकेट घालत भाऊश्या बोलला.

"अरे दिले असं समज, " आणि अचानक काहीतरी आठवून सुरेंद्र एकदम चिंताक्रांत झाला. "तुला सांगायचं राहिलं. तिच्या हातात एक कडं होतं. सोन्याचं. कालंच काढून घ्यायला पाहिजे होतं. शिट! शिट! शिट!"

भाऊश्या नुसता बघंतच राहिला. "ते सोन्याचं होतं? मला वाटलं असंच फालतू कशाचतरी आहे. पण आता काय?"

"जायचं का परत? कडं काढून घेऊन येऊया सालीच्या हातातलं" सुरेंद्र हतबल होत म्हणाला. "तेच विकून तुला पैसे देणार होतो.

"पागल झाला का भेंचोद? अजूनतरी सहिसलामत सुटलाय नशीब समज. एवढा पण हाताबाहेर जाऊ नकोस. नाहितर जेलमध्ये खडी फोडत बसशीर आयुष्यभर. आणि मलाही अडकवशील" आता मात्र भाऊश्या चांगलाच खवळला.

"मला काय आता पैशांची गरज नाही. निवांत दे. तुझ्याकडे येतील तेव्हा.. काही घाई नाही.. जा आता" भाऊश्याने पुन्हा एकवार त्याला समजावले.

"ठिक आहे." समजुतीच्या सुरात सुरेंद्र म्हणाला. "पैसा आज आहे ऊद्या नाही. नसतं धाडस अंगलट येईल. बरोबर आहे तुझं.." मग तो थोडा वेळाने थंड झाला. "झालं तेवढं पुरे.. आता या फंद्यात कधी पडणार नाही." सुरेंद्र म्हणाला. त्याच्या आवाजात एकप्रकारचा प्रामाणिक निश्चय होता. त्याने गाडी स्टार्ट केली. आणि भरधाव निघून गेला.

जाणाऱ्या गाडीकडे बघत भाऊश्या बराच वेळ ऊभा होता. त्याने विचार केला. आणि स्वतःशीच हसला. घरी येऊन त्याने पार्किमधली बाईक बाहेर काढली. आणि किक मारून लखोबाच्या वाडीकडे निघाला. सोन्याचं कडं हस्तगत करण्याची आता त्याला फार घाई झाली होती.

क्रमशः

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

उत्तम.. हा हि भाग भारी झालाय..
कडं, पुढे कुठल्या कडेला न्हेते आहे त्याची उत्सूकता लागली आहे..
भारी लिहिता तुम्ही जबरदस्त....

योगी९००'s picture

19 May 2020 - 8:47 am | योगी९००

मस्त रंगतेय कथा...

मी लिहीलेल्या शशक कडं ची आठवण आली...

भाऊश्या ते कडं मिळवतो. तो बॅकेत शिपाई असतो. रोज लोकलमध्ये जाता-येता एक मुलगी त्याला लाईन देत असते. खरं म्हणजे ती पोलिस असते. ती त्या कड्याच्या मागावर असते. ती हळूच त्याची माहिती काढते आणि त्याला आत टाकते. भाऊश्या पोपटासारखा बोलतो आणि बाकी सर्व खूनांचा तपास लागून सगळे जेलात जातात.

जव्हेरगंज's picture

19 May 2020 - 11:00 am | जव्हेरगंज

=))

सहीच वाढवलीय..!!

राजाभाउ's picture

19 May 2020 - 1:29 pm | राजाभाउ

मस्त !!! मेजवानी....

प्रचेतस's picture

19 May 2020 - 1:53 pm | प्रचेतस

झक्कास...!

चांदणे संदीप's picture

19 May 2020 - 3:04 pm | चांदणे संदीप

रोचक वळण.
पुभाप्र!

सं - दी - प

तुषार काळभोर's picture

19 May 2020 - 5:47 pm | तुषार काळभोर

पहिल्या भागाच्या प्रतिसादात
पहिल्या बॉलवर षटकार असं नको लिहायला पाहिजे होतं.

आता काय लिहिणार?

तेव्हा चौकार लिहिलं असतं तर आता लिहिलं असतं, क्रीजच्या बाहेर पाऊल टाकून long ऑफच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार!!

पण नको तसं.

पुढच्या भागात अजून काय प्रतिसाद देणार..?

आनन्दा's picture

19 May 2020 - 6:41 pm | आनन्दा

आता भाउश्याचा नंबर काय?

सॅम's picture

19 May 2020 - 11:32 pm | सॅम
मोगरा's picture

19 May 2020 - 11:33 pm | मोगरा

भारी लिहिता आहात

नावातकायआहे's picture

20 May 2020 - 12:14 am | नावातकायआहे

पु भा प्र जव्हेर भाउ!

राजाभाउ's picture

22 May 2020 - 9:55 am | राजाभाउ

पुढील भाग ???

निनाद's picture

28 May 2020 - 10:37 am | निनाद

पुढील भागाची वाट पाहतो आहे.

जव्हेरगंज's picture

28 May 2020 - 11:14 am | जव्हेरगंज

_/\_
एक दोन दिवसांत नक्की!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 May 2020 - 12:03 pm | ज्ञानोबाचे पैजार

लवकरात लवकर पुढचा भाग लिहा असे तुम्हाला साकडे घालतो
पैजारबुवा,

अभिजीत अवलिया's picture

20 Jun 2020 - 10:54 pm | अभिजीत अवलिया

'एनी अपडेटस् प्लीज?.' महीना झाला दुसरा भाग टाकून.

जव्हेरगंज's picture

21 Jun 2020 - 11:31 pm | जव्हेरगंज

सॉरी हो!!!
लॉकडाऊन संपल्याने लिखाण बंदच पडले.. कधी योग येईल माहीत नाही. पण नक्की पुर्ण करेन.. _/\_

चांदणे संदीप's picture

22 Jun 2020 - 4:44 pm | चांदणे संदीप

तुम्हाला लिहायला लॉकडाऊन'च' पाहिजे का? हाईट्ट हाईट्ट! ये नॉय चॉलबे. ;)

सं - दी - प