मराठी सिनेमा पॅरॅडिसो.....

Primary tabs

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Feb 2020 - 10:04 pm

सिनेमा पॅरॅडिसो हा चित्रपट बर्‍याच जणांनी पाहिली असेल. म्हणून या लेखाचे नाव असे ठेवले आहे....

.....परवा एक मित्र सिनेमाला गेला होता. सिनेमा झाल्यावर त्याने माझ्या घरी चक्कर मारली. रविवार होता आणि सिनेमाचे तिकीट फारच जास्त होते अशी त्याची तक्रार होती. मी विचारले किती होते तिकीट? "चारशे'' त्याने उत्तर दिले. मला तिकीट महाग झाले आहे याची कल्पना होती पण ती त्याच्या पगाराच्या १% असेल याची मात्र मला मुळीच कल्पना नव्हती. हे त्याच्या लक्षात आणून दिल्यावर मात्र त्याने हळहळ व्यक्त केली पण तो परत तेथेच सिनेमाला जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरा पर्याय त्याच्याकडे नाही. तो गेल्यावर मी अंथरुणावर पडलो आणि डोळे मिटले आणि मला माझ्या लहानपणीचा सिनेमा आठवला....

आमच्या गावात दोन प्रसंग रोज साजरे व्हायचे. पहिली म्हणजे रोज संध्याकाळी अंधार जेव्हा अरुंद रस्त्यांवर सावल्या लांब व्हायच्या तेव्हा रस्त्यावरील खांबावरील कंदील पेटविण्यात सरकारी माणूस यायचा. हा एक आणि दुसरा त्यानंतर लगेचच एक बैलगाडी सिनेमाची जाहिरात करण्यास येत असे तो. पहिल्या प्रसंगात गल्लीतील सगळी लहान मुले हजेरी लावायची आणि तेथे एकच दंगा उडायचा. तो माणूस सायकलवर यायचा, सायकल त्याच्या स्टँडवर मागे खेचून लावायचा. त्याच्या हँडलच्या खाली असलेला एक पितळ्याचा बिल्ला मला अजून आठवतोय. तो त्या सायकलचा कर भरल्याचा बिल्ला असायचा. मग तो शांतपणे सायकलला लावलेली शिडी खाली घ्यायचा. ही शिडी बांबूची असायची आणि त्याला किती पायर्‍या होत्या ते मला अजून आठवतंय. असो. ती शिडी तो मग शांतपणे फरफटत त्या दिव्याच्या खांबाशी न्यायचा आणि त्याला लावायचा. मग मात्र तेथे एकदम शांतता पसरायची. खिशातून आगकाडीची पेटी काढून तो त्यातील एक काडी पेटवायचा. एका हाताने कंदिलाची काच वरती करून तो ती वात पेटवायचा. इतका वेळ आम्ही सगळे श्वास रोखून त्याचे ते काम पहात असू. जणू काही कसला आवाज झाला तर ती पेटती काडी विझेल किंवा ती शिडी घसरेल.. तो ज्या एकाग्रतेने तो कंदील पेटवायचा त्याच एकाग्रतेने आम्ही तो सोहळा पहात असू. त्याने कंदिलाची काच खाली केली की मग मात्र तेथे एकच गोंधळ उडे. सामना जिंकण्यास एक धाव हवी आहे अशी त्यावेळेस परिस्थिती असायची. हे असे का? हे माहीत नाही.. बरं हा प्रकार रोजच व्हायचा तरी पण ती शांतता पसरणे आणि मग एकच गोंधळ होणे हे रोजच व्हायचे. मग कोणाच्या तरी घरून चहा येई (बहुतेक वेळा आमच्याच घरून) असाच प्रकार आठवड्यातून तो एकदा कंदिलाची वात कापायला किंवा काचेवरची काजळी रांगोळीने साफ करण्यासाठी यायचा तेव्हा व्हायचा...

हा कंदील रात्री कोण विझवत असे हे मात्र लहानपणी मला कधीच कळले नाही... आजी म्हणायची झाडावरच्या मुंजाला त्या प्रकाशाने झोप आली नाही की तो त्यावर फुंकर घालतो...त्या काळात रात्री वारा सुटला की मला मुंजाच फुंकर घालतो याची खात्री वाटे. तो मंद उजेड फेकणारा कंदील, त्याचा मिणमिणता प्रकाश, फडफडणारी वात आणि मुंजाची फुंकर हे कधीतरी मला पाहायला आवडेल हे मात्र खरे... पण आता ते शक्यच नाही म्हणा..

त्यानंतर सिनेमाच्या जाहिरातीची गाडी येत असे. या बैल गाडीला एकच बैल असे. गाडाच म्हणाना ! बैलाच्या अंगावर एक मळलेली झूल असे आणि त्याची शिंगे रंगवलेली असत. गळ्यात सतत वाजणार्‍या घंटा असत. मला शंका आहे की त्या बैलाला थोडा वेळ झाला की मान हलविण्यास शिकवले असावे. नाहीतर ठरावीक वेळाने त्या घंटा कशा वाजल्या असत्या.? (गाडी उभी असेल तेव्हा...) त्या गाडीला बांबूच्या तट्ट्यांनी शाकारलेले असायचे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सिनेमाचे अत्यंत टुकार (हल्लीच्या तुलनेत) पोस्टर चिकटवलेले असायचे. चालू असलेल्या सिनेमाचेच पोस्टर लावायचे बंधन त्या गाडीवाल्यावर नव्हते आणि तंबूच्या मालकावरही नव्हते. कुठलेतरी पोस्टर लावले की झाले.. कारण आज कुठला सिनेमा आहे याची घोषणा स्वत: गाडीवान करायचा. आमच्या चौकात आला की तो गाडी उभा करायचा आणि एक पत्र्याचा भोंगा काढायचा. त्यातून बारशाला जसं बाळाच्या कानात कुर्र ऽऽ कुर्र ऽऽ असा आवाज करतात तसा आवाज तो त्या भोंग्यातून काढायचा. मुलांची झुंड तेथेच असायची. त्या गोंधळात ज्यांना ऐकू जायला पाहिजे त्यांना त्याची घोषणा ऐकू जावी म्हणून तो मुलांना गप्प करण्यासाठी प्रयत्न करायचा. अर्थात तो असफल झाल्यावर मग तो गोळ्यांचे अस्त्र बाहेर काढायचा मग मात्र जाहिरात पुढे जायची, "कुर्र ऽऽऽऽ कुर्र.ऽऽऽ... ऐका हो ऐकाऽऽऽ आज रात्री ऽऽऽ xxxx टॉकीजच्या रुपेरी पडद्यावर ऽऽ पहा खास लोकाग्रह परत समुंदरी डाकू.... लोकाग्रहास्तव हा शब्द त्याला म्हणता यायचा नाही मग तो त्याचा उच्चार लोकास्तव किंवा काहीही करायचा... मग त्यात काम करणार्‍या नट नट्यांची नावे जाहीर केली जायची. पहिली दोन नेहमीच प्रसिद्ध नट नट्यांची असायची... मी हा सिनेमा त्या तंबूत पाहिला. मला गोष्ट विशेष आठवत नाही. पण एक समुद्री चाचा आणि एक सुंदरी अशी काहीतरी गोष्ट होती... ( परवा गुगलवर शोध घेताना कळाले की त्यात नासीर खानने काम केले होते आणि त्यातील एक गाणे खाली टाकले आहे. नटी बहुधा फियरलेस नादिया/नादिरा असावी.) नवीन सिनेमा असेल तर घड्या घातलेली गाण्याची पुस्तके विकली जायची आणि जाहिराती वाटल्या जायच्या.

सिनेमाच्या तंबूतील वातावरणावर नंतर केव्हातरी लिहेन पण त्या काळात एकच प्रोजेक्टर वापरला जायचा आणि रीळ संपल्यावर ते रीळ गुंडाळून दुसरीकडे पाठवावे लागे. मग दुसरे रीळ लावल्यावर मग परत सिनेमा परत सुरू. पण, मधे हा जो वेळ असे त्यासाठी पडद्यावर कायम एक चित्र दिसत असे. गाईला चारा घालणार्‍या बाईचे ते चित्र मला अजूनही आठवतेय. जर हे रीळ न गुंडाळता तसेच पुढे पाठवले तर भयंकर मारामारी होण्याची भीती असे.... पडद्यावर केव्हाही प्रेक्षक दिसत असत. (सावल्या) पण त्याने काही भिघडायचे नाही म्हणा...

एकदा असंच सिनेमाला गेलो असताना (स्वतःच्या सतरंज्या घेऊन जाव्या लागत. सिनेमा बघण्याचे तसे कष्टाचे काम होते. खाण्याचा डबाही बरोबर घ्यावा लागे) तंबूचा मालक समोर आला. आम्ही सगळी शहरातील मंडळी आलेली पाहून तो त्याच्या डोअरकिपरकडे पाहून ओरडला, "अरे.... सावकार मंडळी आली आहेत. आत जा, जागा साफ कर, (म्हणजे बिड्यांची थोटके उचल) आणि धर्मेंद्रला म्हणावं आज जरा चांगलं काम कर !'' तो हे इतके आत्मविश्वासाने म्हणत असे की आम्हाला ते खरंच वाटे....

आणि हो ! तिकीट होते फक्त १ आणा दोघांसाठी ! आम्हाला बहुतेक वेळा फुकटच !

- जयंत कुलकर्णी.

समाजलेख

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

2 Feb 2020 - 11:14 pm | ट्रम्प

जयंत काका ,
वाचताना हरवून गेलो !
येवू दया हो अजून .

कमाल आत्मविश्वास!!

बबन ताम्बे's picture

3 Feb 2020 - 5:25 pm | बबन ताम्बे

तंतोतंत अणि सुरेख वर्णन.
आमच्या गावी दोन चाकी गाड्यावर सिनेमाची दोन पोस्टर कोनात ठेवुन ताशाच्या गजरात गावभर फिरवत. पत्र्याच्या भोंग्यात ओरडून चित्रपटाची जाहिरात करणारा इसम हा मल्टीस्किल्ड होता. चित्रपटाची जाहिरात तोच करायचा, पडदा तोच बांधायचा, प्रोजेक्टर तोच ऑपरेट करायचा, फिल्म मधेच तुटली तर जोडायचाही तोच.
त्याची पत्र्याच्या भोंग्यातून चित्रपटाची जाहीरात करायची विशिष्ट पद्धत होती. मोठ्या आवाजात तो घोषणा करायचा - " कुर्र ऐका आणि लक्षात ठेवा. आज रात्री ठिक साडे नऊ वाजता, महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणावर (ठिकाणाचा उल्लेख दोनदा), मराठी चित्रपट - थांब लक्ष्मी कुंकू लाविते , थांब लक्ष्मी कुंकू लाविते - कलाकार (प्रमुख कलाकारांची नावे) , तिकिट दर : आठ आणे, लहान मुलांस चार आणे. लक्षात ठेवा, आज रात्री ठिक साडे नऊ वाजता, महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणावर "

सतिश पाटील's picture

4 Feb 2020 - 12:17 pm | सतिश पाटील

लहानपणी काकीच्या भावाचे लग्नानिमित्त आम्ही त्यांच्या गावी गेलो होतो तेव्हा त्या खेडेगावात आम्ही ओपन एअर थियेटर पहिल्यांदा पहिले होते जिथे फक्त रात्रीच सिनेमा दाखवायचे . तोपर्यंत तालुक्याच्या ठिकाणीच फक्त थियेटर होते.

त्या गावात सिनेमा लागला होता अनाकोंडा !!! तेही हिंदीत.

गावात सर्वत्र रंगीत पोस्टर लागले होते, आणि जाहिरात करायला महिंद्राची कमांडर कापडी जीप यायची, ती जाहिरात भोंग्यावर असायची, ४० फुटी सापाचा खतरनाक खेळ, ४० फुटी सापाचा खतरनाक खेळ बघायला नक्की या अमुक तमुक थियेटर. आणि त्या पोश्टरच्या खाली देखील हेच लिहिले होते.

सोबत एक मित्र होता तो भलताच खुश. म्हणे यायला इंग्लिश पिच्चर हिंदीत दाखवणार ना? आणि इंग्लिश पिच्चरांत " सगळं " दाखवतात ना? मी म्हणालो हो सगळं दाखवतात. तो पर्यंत आम्ही दोघांनाही कधी इंग्लिश चित्रपट पहिला न्हवता. सतरंज्या घेऊन आम्ही तो पिच्चर पाहायला गेलो होतो, सिनेमा संपला तरी आम्हाला सगळं बिगळं काई दिसलं न्हवतं.
सिनेमा संपल्यावर तो म्हणाला " कायरे, कुटं काय दाखवलं? " मी म्हटले अरे येड्या एवढ्या गावासमोर असलं दाखवणार का ते ? कट केलं त्यांनी.

५ रुपये तिकीट होत तेव्हा.

जुइ's picture

6 Feb 2020 - 12:48 am | जुइ

या तंबू थिएटरच्या आठवाणी अनेकदा आईकडून ऐकल्या आहेत. तसेच या निमित्त तलत मेहमूद यांचे गाणेही बऱ्याच काळानंतर ऐकले.

श्वेता२४'s picture

6 Feb 2020 - 10:48 am | श्वेता२४

मी शहरात वाढले तीथे नुकतेच प्रदर्शित झालेले सर्व सिनेमे लागत असत. पण खेडेगावात तसे नसावे. माझ्या आईचे आजोळी लहानपणी गेले होते तेव्हा अजय देवगणचा दिलवाले लागला होता. खरं तर तो प्रदर्शित होऊन २ वर्षे झालेली. पण तरीही आम्ही तो सिनेमा त्या टॉकीज नामक खोलीत चक्क सतरंजीवर बसून पाहिला होता. तीथे तसंच होतं म्हणे.

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2020 - 5:47 pm | चौथा कोनाडा

स्मरणरंजन कहाण्या सुंदर लेख ! लहानपणी असल्या कहाण्या मोठ्या लोकांकडून
मी शाळेत असताना गावात तीन थिएटर्स होती. त्यातल्या सिनेमाची पोस्टर्स गावात ८-१० ठिकाणी लागायची, हीच ती जाहिरात !
कधी तरी सिनेमाच्या जाहिरातीची गाडी फिरायची, पण त्याचे अजिबात अप्रुप नव्हते.
हिन्दि, मराठी सिनेमाने आमचे बालपण समृद्ध केले.