'विपश्यना' - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग

Primary tabs

सोत्रि's picture
सोत्रि in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
'विपश्यना' - ध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्गध्यानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग हे फारच 'लोडेड' वाक्य आहे; कारण ह्यात ध्यान, ज्ञान आणि मार्ग (विपश्यना) ह्या तीन वेगवेगळ्या संकल्पनांचा उल्लेख येतो. प्रत्येक संकल्पना हा एक मोठा अभ्यासाचा विषय असल्याने ह्या तिन्ही संकल्पना स्वतंत्ररीत्या समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक संकल्पना स्वतंत्ररीत्या समजून घेतली की त्यांचा परस्पर संबंध, जो विपश्यनेचा गाभा आहे, त्याचे रसग्रहण करण्याचा ह्या लेखाचा मानस आहे.

सर्वात आधी ज्ञान म्हणजे नेमके काय ते बघू या...

शाळा-कॉलेजात शिकलेले, आजूबाजूच्या वातावरणात रममाण होऊन आत्मसात केलेले, स्वानुभवातून आलेले, असे अनेक प्रकारे मिळवलेले कौशल्य आणि माहिती, हे आपण ज्या भौतिक जगात वावरतो त्याबद्दलचे भौतिक ज्ञान झाले. ते ज्ञान आपल्याला रोजच्या जगात तग धरून राहण्यासाठी (Survival) गरजेच आणि तेवढ्यापुरतेच मर्यादित असते. जडसृष्टीच्या ह्या ज्ञानाने धुंद होऊन आपण सगळे एका कैफात जगत असतो.

दृश्य भौतिक जगातल्या सर्व वस्तू ह्या जड (Solid) असतात, हा न्यूटनच्या अभिजात भौतिकशास्त्राचा (Classical Physicsचा) पाया आहे. पदार्थ हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या सूक्ष्म कणांनी बनलेले असतात हे ज्ञान Classical Physicsनुसार प्रमाणित झाले होते. ते पुढे क्वांटम फिजिक्सने आमूलाग्र बदलून टाकले. क्वांटम फिजिक्सच्या विविध थिअरींनुसार, सर्वात सूक्ष्म कण तरंगलहरी (Waves) असतात आणि 'ऑब्झर्व्हर इफेक्ट'नुसार ते जड स्वरूपात प्रकट होतात, असा सिद्धान्त मांडला आहे. हे सर्व सूक्ष्मात जाणे कशासाठी? तर, हे विश्व कसे बनले आहे, आपण कसे बनलो आहोत, आपल्या अस्तित्वाच्या मागच्या कोणत्या शक्ती आहेत हे ज्ञान मिळवण्यासाठी! पण हे सगळे बाह्य, जड आणि दृश्य प्रकाराने मिळवलेले ज्ञान फक्त अस्तित्वाचा मागोवा घेणार आहे आणि अस्तित्वाच्या भौतिक सुखासाठीच आहे. अफाट वेगाने भौतिक प्रगती करूनही, भौतिक ज्ञानात भर पडूनही मनुष्यप्राण्याच्या आयुष्यातले दु:ख संपले का? तो समाधानी झाला का? त्याचे विकार संपले का? तर नाही, उलटपक्षी तो अधिक महत्त्वाकांक्षी होऊन अधिकाधिक विकारक्षम झाला आणि नेणिवेत जगू लागलाय.

मनुष्य, अज्ञानामुळे (Ignoranceमुळे) इंद्रियसुखांच्या मागे लागून, ‘इंद्रियसुख’ हेच अंतिम सत्य मानून बसला आहे. त्यासाठी भौतिकज्ञानाला म्हणजेच प्रत्यक्ष किंवा दृश्य ज्ञानालाच विज्ञान समजून तो सुखलोलुप होण्यात धन्यता मानतो आहे.images-4


ज्ञानं तेसहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः
यज्ज्ञात्वा नेह भूयोसन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते

भगवतगीतेतल्या ह्या श्लोकात (७.२) कृष्ण सांगतो - ज्ञान दोन प्रकारचे आहे, प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान. आपण ज्याला विज्ञान (Science) समजून बसलो आहोत ते प्रत्यक्षात आहे प्राकृत जगताचे ज्ञान (प्रत्यक्ष ज्ञान). कृष्ण ज्याला दिव्य ज्ञान म्हणतो आहे हे आहे खरे विज्ञान, जाणिवेचे (Consciousnessचे) आकलन. हे विज्ञान म्हणजेच, जडावस्थेच्या (gross reality) पलीकडे जाऊन सूक्ष्मावस्थेतली (subtle reality) अनुभूती घेत जाणिवेचे (consciousness) होणारे ज्ञान!

आता प्रश्न पडेल की ह्या दिव्य ज्ञानाची (विज्ञान) गरजच काय? भौतिक जगात सुखसोयीयुक्त (Luxurious) आयुष्य मजेत चालले आले की! त्या सुखाबरोबर दु:खही असतेच आणि त्यामुळे येणारे चढउतार मान्य करूनच आयुष्याचा गाडा मजेत चालू आहे. काय गरज आहे ह्या असल्या सूक्ष्मावस्थेची आणि जाणिवेची? प्रश्न रास्त आहे. जन्म झाल्यापासून ते आताच्या क्षणापर्यंत आपल्या जगण्याचा एक पॅटर्न तयार झाला आहे, तो शरीर आणि मन ह्यांच्या परस्पर संबंधांवर आधारित असतो. आपण सतत बाह्य जगाकडून, ५ इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या संदेशांवर प्रतिक्रिया देत असतो. आणि हे इतके यंत्रवत झालेले असते की आपण आपल्या नकळत रीअ‍ॅक्ट होत असतो, निरंतर. आपल्या रोजच्या अनुभवांमधून आपण आपला जगण्याचा पॅटर्न सतत सुधारत, अधिकाधिक साचेबद्ध, ठरावीक आणि यांत्रिक करत असतो, आपल्या नकळत. हे सगळे अतिशय सूक्ष्म पातळीवर चाललेले असते, अविरत.

पण आयुष्यात एखादी वेळ अशी येते की त्या परिस्थितीला कसे हाताळायचे हे ज्ञान आपल्याकडे नसते. त्या वेळी मनुष्य उन्मळून पडतो, उद्ध्वस्त होतो. बरेच जण म्हणतील की अशी परिस्थिती फक्त कमकुवत मनाच्या लोकांबाबत होऊ शकते, कणखर मनाचे लोक कुठलीही परिस्थिती हाताळू शकतात. हा आत्मविश्वास आतापर्यंतच्या आयुष्यातल्या अनुभवांवरून आलेला असतो. पण वृद्धावस्था, मोठे आजारपण किंवा मृत्यूची चाहूल ह्या आत्मविश्वासाला तडे देते, कारण ह्या परिस्थितींचा अनुभव नसतो आणि सूक्ष्म पातळीवर मन आणि शरीर ह्यांच्या परस्पर संबंधाच्या शास्त्राचे ज्ञान नसते आणि तेव्हा दु:खाशी सामना होतो, जो आतापर्यंत झालेला नसतो.

तर, मन आणि शरीर म्हणजेच आपण की आपण ह्या मन आणि शरीरापासून वेगळे आहोत? जर वेगळे आहोत, तर मग आपण म्हणजे नेमके कोण? आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? आणि अंतिम सत्य काय? हे जाणिवेच्या सूक्ष्म (विज्ञान) पातळीवरून समजून घेणे म्हणजे ज्ञान.

आता ध्यान म्हणजे काय ते बघू या.

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः।
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः।।

भगवद्गीतेतल्या ध्यानयोग ह्या प्रकरणातील वरील श्लोकात (६.७) कृष्ण सांगतो की ज्याने मन जिंकले आहे, त्याला शांती प्राप्त झाली आहे. अशा मनुष्यासाठी सुख-दु:ख, मान-अपमान, शीत-उष्ण हे समान असतात आणि तो मनुष्य कोणत्याही स्थितीत शांतच असतो.

ते मन का जिंकायचे आणि कसे जिंकायचे, त्याआधी हे मन म्हणजे काय आणि कसे काम करते हे समजून घ्यावे लागेल.

मज्जातंतुशास्त्राच्या सिद्धान्तांनुसार मानवी मेंदूची कार्यपद्धती, बाह्य जगतातून मिळालेल्या कुठल्याही संदेशाला ‘उपलब्ध माहितीच्या आधारे प्रतिक्षिप्त होणे (react)’ अशी असते. ही उपलब्ध माहिती आपण जन्म झाल्यापासून ते आतापर्यंत, पाच इंद्रियांच्या - कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा यांच्या साहाय्याने बाह्य जगतातून मिळवलेली असते. पंचेंद्रिये त्यांच्या कार्यपरिप्रेक्ष्यातल्या, बाह्य जगतातल्या प्रत्येक जड आणि सूक्ष्म गोष्टींच्या नोंदी घेत असतात आणि मेंदूतल्या स्मृतिकोशांमधे साठवून ठेवत असतात, चोवीस तास,अविरत. आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्ती, घटना, घटनास्थळे, घटनांच्या वेळा, त्या त्या वेळी त्या त्या व्यक्ती आणि घटनांवर व्यक्त केलेल्या / झालेल्या भावना, क्रिया-प्रतिक्रिया ह्या सगळ्या गोष्टी ‘स्मृती’ म्हणून स्मृतिकोशांमध्ये साठवल्या जातात.. बिग डेटाच म्हणा ना! ह्या व्यक्ती, ठिकाण, भौतिक वस्तू आणि वेळ ह्या संदर्भातल्या अनुभूती ज्या आपल्या स्मृती बनल्या आहेत, त्या आपले व्यक्तिमत्त्व ठरवतात, वर्तणूक ठरवतात. रोज रोज आपण त्याच-त्याच व्यक्तींच्या संपर्कात येतो, उदा. नातेवाईक, बॉस, सहकर्मी, मित्र, शेजारी, वगैरे; त्याच त्याच वस्तू हाताळतो, उदा., टूथब्रश, टॉवेल, कार, कपडे, बूट, वगैरे; त्याच त्याच ठिकाणी जातो, उदा., ऑफिस, कॉफीशॉप, बाग, देऊळ, थिएटर, बार, रेस्तराँ, वगैरे; त्याच त्याच गोष्टी करतो, उदा., ऑफिसमध्ये पाट्या टाकणे, फेसबुकवर मतांच्या पिंका टाकत बसणे, बिचिंग करणे, कुचाळक्या करणे, जप करणे, मंत्र म्हणणे, भजन करणे, वगैरे. हे होताना, आपल्या मनात विविध भावना निर्माण होतात आणि त्याही स्मृतिकोशांमधे साठवल्या जातात. ह्या स्मृतींशी निगडित भावनांवर आरूढ होऊन अंतःपटलावर सतत उगम पावणारे विविध विचार हेच आपले मन.

आता कल्पना करा, एखादा खडूस सहकर्मी तुम्हाला अजिबात आवडत नाही, कारण तुम्हालाही स्पष्ट सांगता येत नाही, पण तो तुम्हाला आवडत नाही. तो समोर आला की तुम्ही त्याच्याशी नजरानजर टाळता. हे सगळे स्मृतिकोशांमधे साठवलेले आहे. एके दिवशी ऑफिसामध्ये तुम्ही एक आवाज ऐकता, कान तो आवाज मेंदूच्या आवाज प्रोसेस करणाऱ्या विभागाकडे पाठवतात. तिथे तो आवाज ओळखला जातो आणि स्मृतिकोशातून त्या आवाजाचा मालक तुमचा खडूस सहकर्मी आहे हे कळते. आता लगेच त्याच्याविषयी असणाऱ्या भावनांचे मज्जातंतूचे जाळे (neural network) उद्दीपित होऊन त्या भावना शरीरभर पसरतात. हे झाल्या झाल्या तुमचे मन प्रतिक्षिप्त क्रिया करते आणि तुमचा चेहऱ्यावर नाराजी झळकू लागते. त्याच्याबद्दलच्या जुन्या आठवणी विचारांच्या स्वरूपात अंतःपटलावर उमटू लागतात, ज्या कटू असतात. ह्या विचारांमुळे उद्दीपित झालेल्या भावना आणखी तीव्र होऊ लागतात. त्या आवाजाची कुजबुज अजूनही चालूच आहे. कान ती कुजबुज मेंदूच्या आवाज प्रोसेस करणाऱ्या विभागाकडे पाठवत राहतात आणि विचार येत राहणे आणि भावना उद्दीपित होत राहणे हे दुष्टचक्र चालू राहते. हे इतक्या प्रचंड वेगात होत असते की हे होतेय ही जाणीवच आपल्याला नसते. मग भावनेचा प्रचंड उद्रेक होऊन तुम्ही आवाजाच्या दिशेने जाऊन, "शांत बसा!" असे जोरात ओरडता. पण ओरडून झाल्यावर तुमच्या लक्षात येते की तो तुमचा खडूस सहकर्मी नसतोच मुळी, नवीनच रुजू झालेला एक नवीन कर्मचारी असतो. नवीन असल्यामुळे तो हळू आवाजात बोलत असतो.

ह्या उदाहरणावरून लक्षात येते की पंचेंद्रियांकडून मिळणाऱ्या बाह्य जगतातील उत्तेजना (stimuli) आपल्या मनाचा ताबा घेतात आणि मन यांत्रिकपणे जुन्या स्मृतींच्या आधारे शरीराकडून प्रतिक्षिप्त क्रिया करून घेत, आपल्या नकळत. वरच्या उदाहरणात नेमका प्रॉब्लेम कुठे सुरू झाला? स्मृतिकोशातील मज्जातंतूंच्या जाळ्यातून मिळालेल्या माहितीवरून तर्कबुद्धी जेव्हा त्या आवाजाचा मालक खडूस सहकर्मी आहे हे ठरवते तेव्हा? नाही, मनाला अजूनही प्रतिक्षिप्त व्हायला अजूनही उत्तेजना (stimuli) मिळाली नाहीये. पण ज्या क्षणी त्या आवाजाचा मालक खडूस कर्मचारी आहे हे समजून भावना उद्दीपित झाल्या, त्याच क्षणी तिरस्काराच्या संवेदना शरीरभर पसरतात. ह्या संवेदनाच ओरडण्याची प्रतिक्षिप्त क्रिया होण्यास कारणीभूत असतात, कारण मन फक्त आणि फक्त संवेदनांवरच प्रतिक्षिप्त होतं.images-2


ह्या संवेदना बारा महिने चोवीस तास शरीरभर लहरत असतात. मन अविरत ह्या संवेदना वाचत असते आणि त्यांच्यावर प्रतिक्षिप्त क्रिया करत असते. हे होत असते, कारण आपण जाणिवेत नसतो. मोहाचा (ignoranceचा) पडदा पडल्यामुळे आपण नेणिवेत गेलेलो असतो आणि बाह्य जगातील घडामोडींमुळे उद्दीपित होऊन, मनाचा तोल जाऊन, मन शरीराकडून ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ करून घेत राहते, आपल्या नकळत.

मनाचे दोन भाग असतात. पंचेंद्रियांकडून माहिती मिळवत राहून ती मेंदूतल्या ज्ञानकेंद्रांकडे प्रोसेसिंगसाठी पाठवत राहणे हे काम करणारे मन 'चेतन मन' असते. त्या माहितीचे ज्ञानकेंद्रात प्रोसेसिंग करून प्रतिक्षिप्त क्रिया घडवून आणण्याचे काम करणारा भाग 'अचेतन मन'. हे अचेतन मन १२ महिने २४ X ७ कार्यरत असते, अगदी आपण झोपेत असतानाही. आपल्या वर्तणुकीला हेच अचेतन मन जबाबदार असते आणि संवेदनांवर प्रतिक्षिप्त होत असते . ह्या अचेतन मनाचा तोल ढळू न देणे आणि हे मन जे ‘आपल्या’ नकळत प्रतिक्षिप्त क्रिया करून घेतेय ते ‘आपण’ म्हणजे कोण? हेच ज्ञान मिळविण्यासाठी ध्यान करायचे.

ध्यान करायचे म्हणजे अचेतन मनाला ताब्यात ठेवून, प्रतिक्षिप्त क्रिया करू देण्याऐवजी, जाणिवेत ठेवून, ‘सुनियंत्रित क्रिया’ करायला शिकवायचे. ध्यान करायचे म्हणजे अचेतन मनाचे ‘रिप्रोग्रामिंग’ करायचे. हे ध्यान करणं अतिशय शास्त्रआधारित तंत्र आहे. ह्यात काहीही धार्मिक नाही, संप्रदायी नाही, दैवी नाही किंवा स्पिरीच्युअल नाही. ध्यान करणं आध्यात्मिक जरूर आहे कारण अध्यात्म म्हणजे स्वतःचं तटस्थ निरीक्षण, ह्यात आत्मा वगैरे काही नाही. मन आणि शरीर यांच्या परस्परसंबंधांचे शास्त्र अनुभवण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान!

आता ज्ञान आणि ध्यान म्हणजे काय हे कळल्यावर ध्यानाचा मार्ग, विपश्यनेकडे वळूयात...

आपलं मन चंचल असतं, ते शरीरावरील संवेदना पकडून, स्मृतीकोशांतील आठवणी काढून भूतकाळात रमलेलं असतं नाहीतर भविष्यातलं स्वप्नरंजन करण्यात मग्न असतं. नीट विचार करून बघा, मन वर्तमानात रमत नाही. ते वर्तमानात थांबायलाच तयार नसतं. जर मनाच रिप्रोग्रामिंग करायचं तर मन ताब्यात आणून त्याला वर्तमानात स्थिर करणं ही पहिली आणि गरजेची पायरी आहे. जर बाह्य संदेश मिळत राहिले तर मन आपला चंचल राहण्याचा धर्म पूर्ण करत राहणार म्हणजे हे बाह्य संदेश थांबावयाला हवेत. इथून थियरी संपून प्रॅक्टिकल (मार्गक्रमण) सुरू होते.

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिर: |
सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् ||

भगवतगीतेतल्या ध्यानयोग ह्या प्रकरणातील वरील श्लोकात (६.१३) सांगितलेल्या स्थितीत शरीर, मान आणि डोके उभ्या सरळ रेषेत धरून डोळे बंद करून मांडी घालून स्थिर बसायचे. डोळे बंद केल्यास आपण बाह्य जगताशी संबंध तोडू शकतो आणि अंतर्मुख होण्याची ती पहिली पायरी आहे. त्यानंतर मन एकाग्र करून त्याला वर्तमानात थांबून ठेवल्यास ते शांत होऊ लागत. जितकी मनाची एकाग्रता जास्त तितके ते अधिकाधिक शांत होत जाते. मनाला सतत काहीतरी काम लागत ते स्वस्थ बसत नाही. पण आता बाहेरचे मन उद्दीपित करणारे संदेश येणं बंद झालंय आणि मन वर्तमानात स्थिर झालंय, ही झाली समाधीवस्था. ह्या अवस्थेत मनाच्या तळाशी खोल दडलेले विकार बाहेर येतात, विचारांच्या रूपात आणि ते विचार शरीरावर संवेदना पसरवतात. बस्स, मनाला ह्या संवेदनाच हव्या असतात, त्याचं ‘प्रतिक्षिप्त होणं’ हा जन्मसिद्ध अधिकार बजावायला. पण इथेच आपल्याला रिप्रोग्रमिंग करायचेय मनाचे. शरीरावर होणाऱ्या संवेदनांचं तटस्थपणे फक्त निरीक्षण करायचं, अजिबात रीअ‍ॅक्ट न होता.

संवेदनाचं तटस्थ निरीक्षण म्हणजे काय? आपण परत वरचं उदाहरण बघूया. ज्याक्षणी त्या आवाजाचा मालक खडूस कर्मचारी आहे हे समजून भावना उद्दीपित झाल्या, त्याक्षणी तिरस्काराच्या संवेदना शरीरभर पसरल्या होत्या. म्हणजे नेमकं काय झालं होतं? सर्वप्रथम श्वासाची लय बदलते, नॉर्मल लयीतला श्वास जड होतो. त्यानंतर हाताच्या तळव्यांना कंप सुटतो, चेहऱ्याचं एकंदरीत तापमान वाढतं, जशा भावना तीव्र होत जातात तसं शरीरभर कंप जाणवू लागतो. ह्या साऱ्या संवेदना आहेत. हे जर त्यावेळी कळलं असतं आणि त्यावेळी जर श्वासावर आणि शरीरभर पसरत असलेल्या संवेदनांवर जर लक्ष केंद्रित केलं असतं तर जाणिवेत राहता येऊन जी प्रतिक्षिप्त क्रिया केली गेली, ती न होता, परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळता आली असती.

मनाची एकाग्रता आणि संवेदनांचे तटस्थ निरीक्षण हाच विपश्यना ध्यानप्रक्रियेचा गाभा आहे. विपश्यना शब्दाची फोड वि + पश्यना अशी आहे. पश्यना म्हणजे पाहणे आणि विपश्यना म्हणजे विशेष पद्धतीने पाहणे. थोडक्यात स्वतःच्या आत डोकावणे!

विपश्यना ध्यानपद्धतीच्या पहिल्या टप्प्यात (आनपान सती) केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव केला जातो. श्वासावर मन एकाग्र करून समाधीवस्था प्राप्त करायची असते. ही तीव्र एकाग्रता किंवा समाधीवस्था पुढच्या टप्प्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. पुढचा टप्पा आहे विपश्यनेचा, ज्यात शरीरभर क्षण-प्रतीक्षणं उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करायचे असते, त्या संवेदनांवर प्रतिक्षिप्त (react) न होता. डोक्याच्या टाळूपासून सुरुवात करून, इंचाइंचाने पुढे सरकत, पायाच्या अंगठ्यापर्यंत, शरीरावरील प्रत्येक भागावर उगम पावणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवेदनांचे तटस्थ निरीक्षण करत प्रवास करायची प्रक्रिया (body scanning) म्हणजेच विपश्यना!images-3


ह्या प्रवासात संवेदनांवर प्रतिक्षिप्त न होणं हेच असतं मनाचं रिप्रोग्रमींग! जितक्या नियमितपणे विपश्यना साधना केली जाते, तितके मनाच्या खोल भागात दबून ठेवले गेलेले विकार विचारांच्या स्परूपात वर येऊन शरीरभर संवेदना पसरवतात. त्या संवेदनांवर रीअ‍ॅक्ट झाले नाही तर त्या संवेदना क्षीण होऊन विरून जातात आणि मनाची त्या विकारांपासून मुक्तता होते.

विपश्यनाध्यानाची निरंतर साधना हेच सर्व विकारांपासून मुक्त होण्याचे गुपित, म्हणजेच ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग!


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

पण काये की मी अर्जुनासारखा व/वा श्रीकृष्णासारखा पराक्रमी नसल्याने मला नीटसं सांगता येत नाहीये.

अध्यात्मिक तळमळ असूनही जेंव्हा प्रत्यक्ष प्रगती वा अनुभूती शून्य अथवा उणे असते तेंव्हा आणी फक्त तेंव्हाच धार्मिक कट्टरता जन्माला येउ शकते. त्यासाठीच्या सुपीक जमीनीचे प्रतिक म्हणजे ते तुम्ही म्हणत असलेल्या अर्जुनासारखे गोंधळलेले मन.

राम असो की कृष्ण शेवटी झगडा त्यांनी भौतिककार्यभागासाठीच केला, की गितोपदेषही अर्जुनाला संन्यासी बनवायला केला नाही, म्हणूनच तर क्षमता राखूनही कृष्ण, राम धार्मिकदृष्ट्या कधी कट्टरवादी बनू शकले नाहीत. ते गोंधळलेले सत्पुरुष कधीच न्हवते.

पण आजकाल धर्म न्हवे कट्टरता दिसते, कारण तुम्ही अर्जुन आहात हे तुम्हास माहीत आहे, तत्वज्ञानाच्या सदोषतेकडे परंपरागत दुर्लक्ष करायच्या वृत्तिमुळे आता तुम्हाला मार्गदर्शन श्रीकृष्ण करत नाही हेच मुळी मान्य होत नाही.

गामा पैलवान's picture

5 Nov 2019 - 2:09 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,

तुमच्या भाष्यावरची माझी मतं सांगतो.

१.

राम असो की कृष्ण शेवटी झगडा त्यांनी भौतिककार्यभागासाठीच केला,

माझ्या मते त्यांनी कर्तव्यपूर्ती म्हणून झगडा केला. तसंही पाहता काही कारण वा कर्तव्य असल्याशिवाय झगडा करणे हा मूर्खपणाच होय.

२.

कारण तुम्ही अर्जुन आहात हे तुम्हास माहीत आहे, तत्वज्ञानाच्या सदोषतेकडे परंपरागत दुर्लक्ष करायच्या वृत्तिमुळे आता तुम्हाला मार्गदर्शन श्रीकृष्ण करत नाही हेच मुळी मान्य होत नाही.

हे ज्या कोणाला उद्देशून आहे तो अर्जुन नाही. कारण तो / ती अर्जुनाइतका पराक्रमी नाही. निदान सांप्रतकाळी तरी.

गीता सदोष असू शकते. पण तिच्यात जर खोड काढायची असेल तर आगोदर अर्जुनासारखा पराक्रम गाजवून दाखवावा. अन्यथा कावळ्याने सूर्यावरचा डाग दाखवल्यासारखं होईल.

आ.न.,
-गा.पै.

तो सुर्यच काय ज्यावरील डाग कावळाही बघू शकतो

सोत्रि's picture

5 Nov 2019 - 7:19 pm | सोत्रि

भगवतगीतेवर एक धागा लवकरच लिहायचा विचार आहे. तिथे त्या विषयावर चर्चा करूयात. इथे चर्चा फक्त विपश्यना आणि ध्यानमार्ग ह्यापुरतीच ठेवूया.

- ( साधक) सोकाजी

गामा पैलवान's picture

5 Nov 2019 - 8:20 pm | गामा पैलवान

ओके सर!
-गा.पै.

इरसाल's picture

6 Nov 2019 - 11:46 am | इरसाल

हे असं कोणी भौतिक सोडुन आदीभौतिकाबद्द्ल बोलयला लागलं ना की भुतकाळात मिपावरच्या काही लोकांनी उचलेल्या पावलांबद्दल आठवुन घाबरायला होतं.
सभ्यजनहो सांभाळुन रहा इतकीच विनंती.

आपणास घाबरायला लागू नये म्हणून पावले तुम्हाला उचलावी लागतील. इतरांना दिलेले सल्ले वा परखड बोल कामी येत नाहीत असाच अनुभव आहे.

सोत्रि's picture

10 Nov 2019 - 10:42 am | सोत्रि

आदीभौतिकाबद्द्ल

तुम्हाला अधिभौतिक म्हणायचं आहे का? तस असेल तर अधिभौतिक (अधि + भौतिक) म्हणजे भौतिकासंबंधीच. तुम्हाला बहुतेक आधिदैविक (अधि + दैविक) किंवा अध्यात्मिक (अधि + आत्म) असं म्हणायचं असावं.

तस असेल तर लेखात विपश्यना ही साधनापद्धती अजिबात दैवी, धार्मिक किंवा संप्रदायी नाही हेच स्पष्ट करायचा प्रयत्न आहे.

- (अध्यात्मिक) सोकाजी

तुम्ही ( लेखक सोत्रि) मुंबई ठाणे आसपास राहात असाल तर एक कट्टा करता येईल. यासाठी उत्तम जागा - युसुफ मेहेरली केंद्र - पनवेल पेण रस्ता, कर्नाळा जवळ . (गोग्रीन नर्सरीच्या बाजूला)
खाणे,जेवण, झाडाखाली पारावर बसणे इत्यादी छान व्यवस्था आहे. राहाण्यासाठी हॉलही देतात.
तुमच्या विषयाची छान चर्चा होईल.
--------
इतर कट्टेकरीही येऊ शकतात. मुलांसाठी ही खादीग्रामोद्योग प्रात्यक्षिक बघायची सोय आहे. पक्षीनिरिक्षणही होईल.

सोत्रि's picture

10 Nov 2019 - 10:47 am | सोत्रि

कौला लंपूर, मलेशिया हे सध्याचं कर्मक्षेत्र आहे. डिसेंबरमध्ये सुट्टीवर येणार आहे त्यावेळी कट्टा करायला नक्कीच आवडेल!

- (कट्टर कट्टेकरी) सोकाजी

प्रश्न हा होता की ध्यान, भजन, नामस्मरण, विपश्यना वा अध्यात्म साधना हे जन्म मृत्यूप्रमाणे अथवा एखाद्या शास्त्रीय नियमानुसार आपोआप का होत नाहीत ते आपल्याला प्रयत्नपूर्वक करावे का लागते, विनाकारण यामुळे आपल्याला भरकटनेही वारंवार वाट्याला येउ शकते, पण आज त्याचे समाधान मिळाले.

वरील बाबी आपण अतींम सत्यपाशी पोचायला अनुसरत असतो, असे सत्य ते कशाशी बांधील नाही, मुक्त आहे स्वयंपूर्ण आहे. याच्या जवळ जितके आपण जाऊ तसे आपल्यातही बदल होऊ लागतात म्हणूनच तर याला आपण मुक्तीचा मार्गही संबोधतो, आणि ही मुक्ती तेंव्हाच उपलब्ध असेल जेंव्हा आपण मुक्त झालेलो असू आणी ही मुक्ती जर आपोआप घडली तर ती मुळातच मुक्ती असणार नाही तर ते फक्त एखाद्या शास्त्राचे अथवा कायद्याचे बंधनकारक नियम अनुसरणे ठरेल. पण जी गोष्ट बंधन आहे ती मुक्ती कशी ठरू शकेल ?

म्हणूनच मुक्तीचा मार्ग हा आपली free will आहे, ती आपली निवड असणे अपेक्षित आहे, ते एखादे लादलेले ओझे न्हवे, म्हणूनच ते आपोआप घडणे नैसर्गिक ठरणार नाही कारण ती तुमची निवड नसेल, म्हणून मोक्षप्राप्तीच्या साधना कोणीही आपल्याकडुन आपोआप न घडता कराव्या लागणे हीच खऱ्या मुक्ततेकडे जाणारी प्राथमिक पायरी ठरते.

जेंव्हा जेंव्हा अध्यात्म मार्गात आपण कोणावरही अथवा प्रत्यक्ष अस्तित्वात असेल तर जगतनियंत्यावरही आपला भार सोडून देऊ तर ईश्वराने बहाल केलेले आपले मुक्तीचे स्वातंत्र्यही आपण तिथेच अमान्य करू मग जीवनमुक्ती वा मोक्षावस्थेसारख्या संपुर्ण स्वतंत्र अवस्थेत/व्यवस्थेत स्थिर होणे लांबच राहिले.

थोडक्यात अध्यात्म हे बालपण, तरुणपण, प्रौढत्व आणी म्हातारपणाप्रमाणे अथवा जन्ममृत्यू वा दिवस रात्र प्रमाणे आपोआप होणार नाही तर ते योग्य साधना सातत्याने अनुसरून सिद्ध करावे लागेलं कारण ती तुमची free will असेल आणी जी गोष्ट free will आहे तीच मुक्तीचा मार्गही आहे

म्हणूनच मुक्तीचा मार्ग हा आपली free will आहे, ती आपली निवड असणे अपेक्षित आहे

सुपर्ब!

Bow Down

- ('फ्री वील' वापरणारा) सोकाजी

पण एकूणच विपश्यना प्रकरण तगडे वाटत नाही

श्वेता२४'s picture

3 Jan 2020 - 2:02 pm | श्वेता२४

पूर्वजन्मातील निरीक्षणे आहेत ना ती.

हा प्रतिसाद आपल्या इतर /इतरत्र दिलेल्या प्रतिसादांच्या स्वभावधर्मापेक्षा निश्चितच वेगळा आहे असं एक निरिक्षण नोंदवावे म्हणतो. :-) असो.

आपण मांडलेले मुद्दे आणखी विस्तृतपणे समजून घेण्यासाठी काही प्रश्नः

- मुक्त असणं म्हणजे काय? कशापासून मुक्त व्हायचं? कारण काय?
- जी साधनं आपण उल्लेखलीत, त्यांनी साधकात असा नक्की कुठे/काय/कसा फरक पडतो की ज्यामुळे तो, तुम्ही म्हणता त्या, अंतीम सत्याच्या जळ पोहोचू शकतो?
- तुम्ही म्हणता ती फ्री विल [मुक्त ईच्छा?] जर अगदी लहानपणापासून अशी असेल की त्या अंतीम सत्याचा बोध करून घ्यावा, तर तो मार्ग आपोआप निवडला गेलाय की विचारपूर्वक निवडला आहे? यातला कोणताही पर्याय असला तर त्याचा साधनेच्या फळावर काय परिणाम होणार?
- कुणावरही भार टाकणे म्हणजे मुळात काय? त्यातलं पथ्य काय? संत/गुरु यांना दिलेली "कुलमुखत्यारी", हा शब्द काय बोध देतो?

हे प्रश्न तुम्हाला/कुणाला हिणवण्यासाठी घातलेले नाहीत. ते कुणा एका साधनेशी बांधीलही नाहीत. पण ते साधक प्रश्न आहेत. आपणांकडून सविस्तर व गहन उत्तराची अपेक्षा आहे.

हा प्रतिसाद जॉनविक्क यांच्या प्रतिसादाला आहे. चुकून स्वतंत्र दिल्या गेला.