डीसी - द डेक्कन क्लिफहँगर

देशपांडेमामा's picture
देशपांडेमामा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

डीसी - द डेक्कन क्लिफहँगर

६४३ कि.मी.
३२ तास (कटऑफ वेळ)
RQ - रॅम क्वालिफायर
RQ १०३
1

२०१७मध्ये चारच्या टीममध्ये डीसी पूर्ण केली. प्रचंड समाधान आणि आनंद मिळाला होता, पण मनात काहीतरी वेगळ्याच घडामोडी सुरू होत्या. डीसी पूर्ण झाल्याच्या संध्याकाळी organizersतर्फे रात्रीचे जेवण असते. ते घेत असताना समुद्राकडे बघत मनात ठरवले - पुढची डीसी सोलो, म्हणजे एकट्याने पूर्ण करायची.

४ नोव्हेंबर २०१७ला डीसी झाल्यावर फार काही प्रॅक्टिस झाली नाही. आल्यावर काही दिवस आराम आणि मग थोड्याफार राइड्स ह्यातच दोन महिने निघून गेले. फेब्रुवारी २०१८मध्ये माझे पोटाचे छोटे ऑपरेशन झाले आणि त्यापुढे मेपर्यंत आराम. जूनमध्ये खडबडून जाग आली. डीसीला फक्त ५ महिनेच राहिले. ह्या वर्षी जमेल की नाही हा विचारही मनाला चाटून गेला, पण तिकडे सपशेल दुर्लक्ष करून ट्रेनिंग सुरू करण्याचे ठरवले. धावणे आणि छोट्यामोठ्या राइड्स सुरू केल्या. जूनमध्ये पावसाळ्याला सुरुवात झाली आणि कधी नव्हे तो ह्या वर्षी सलग पाऊस लागला. बाहेरचे सायकलिंग बंद झाले. जिम सुरू होती, पण सायकलिंग बंद असल्यामुळे काळजी वाटायला लागली. काय करावे हा विचार करत असताना मित्र मदतीला धावून आले. सागरने त्याचा इनडोअर ट्रेनर वापरायला दिला, त्यावर थोडी प्रॅक्टिस सुरू केली. हा ट्रेनर सागरला काही दिवसांनी परत द्यायचा होता, कारण मध्यंतरी झालेल्या त्याच्या धडपडीनंतर त्याचेही बाहेरचे सायकलिंग बंद झाले होते, त्यामुळे घरी प्रॅक्टिस करायला त्यालासुद्धा ट्रेनरची गरज पडणार होती. नवीन ट्रेनर घ्यावा का? हा विचार करत असतानाच दुसरा मित्र मदतीला धावून आला.

सुमीत! ह्या मित्राने मला आनंदाने स्वतःचा ट्रेनर दिला आणि विचारल्यावर चक्क सायकलसुद्धा दिली. खरे सांगायचे म्हणजे आपली सायकल हा प्रत्येक सायकलपटूचा जीव की प्राण असतो. कुणी दुसर्‍याने हात लावलेलेसुद्धा आवडत नाही. पण सुमीतने एक फोन कॉलवर सायकल देऊन टाकली. हा माणूस खरेच महान आहे!

जुलैअखेरपासून मग सायकल प्रॅक्टिसला खरी सुरुवात झाली. घराच्या गॅलरीत सायकल ट्रेनरवर लावून प्रॅक्टिस सुरू केली. आठवड्यातून ३ ते ४ दिवस साधारण ४५ मिनिटे ते १ तास ट्रेनिंग आणि आठवड्याच्या शेवटी १ ते १:३० तास असे शेड्युल फॉलो केले. अध्येमध्ये सूर्यनमस्कार आणि इतर व्यायाम सुरू होतेच.

डीसीकरता सपोर्ट क्रू असणे गरजेचे असते. कुठल्याही रेसमध्ये क्रू हा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. रायडरचे खाणेपिणे सांभाळून त्याला रस्त्यावर सायकल पळवत ठेवायला मानसिक आणि शारीरिकरीत्या तयार ठेवणे ही क्रूची एक महत्त्वाची जबाबदारी असते.

क्रूकरता ग्रूपवर विचारणा केल्यावर सगळेच तयार झाले. बाकीच्या टीम्सना क्रू शोधावा लागत होता आणि मला मित्रांना नाही म्हणावे लागले. मित्रांच्या बाबतीत मी प्रचंड सुदैवी आहे, ह्याची पुन्हा एकदा खातरी पटली. बर्‍याच चर्चांनंतर शेवटी गेल्या डीसीचा क्रू न्यायचा आणि त्यातल्या कुणाला शक्य नसल्यास मग नवीन क्रू घ्यायचा, असे ठरले. सरतेशेवटी खालील क्रू फायनल झाला -

१. डॉक, २.मोदक, ३. सरपंच, ४. अभिजीत बुचके, ५. नाजूक पाटील, ६. सागर, ७. मयुरेश.

2

3

बघता बघता डीसी रजिस्ट्रेशन झाले आणि परीक्षेच्या आधी पोटात बाकबुक होते, तसे फीलिंग यायला लागले. २३ तारखेला रजिस्ट्रेशन आणि इतर सोपस्कार पूर्ण करून 'Team AKS' डीसीसाठी तयार झाली!!

रेसदरम्यान काय काय खायचे, ह्यावर डीसीच्या आधी बराच विचार आणि अभ्यास करून मग तयारी करून ठेवली. त्यात हायड्रेशन, कार्ब्स आणि इतर जीवनसत्त्वे असा सेट होता. रेसदरम्यान क्रूने मला कधी आणि काय खायला द्यायचे ह्याची यादी करून क्रू मेंबरांना दिली.

डीसीच्या आदल्या संध्याकाळी सगळ्या गोष्टी चेक करताना लक्षात आले की माझ्या सायकल कॉम्प्युटरची बॅटरी गेली आहे. सायकल कॉम्प्युटरवर रेसदरम्यान केडन्स आणि स्पीड बघून रायडर सायकल पळवत असतो. एखाद्या विवक्षित जागेवर पोहोचायला अ‍ॅव्हरेज स्पीड कसा मेन्टेन होतोय, हे सायकल कॉम्प्युटर दाखवत असतो. (इतरही बरेच पॅरामीटर्स असतात - उदा., पॉवर, हार्ट रेट इ., जे बघून सायकलपटू किती वेगाने सायकल चालवायची, कुठल्या गियरमध्ये चालवायची हे ठरवत असतात.) तर असा महत्त्वाचा सायकल कॉम्प्युटर बंद पडल्याचे लक्षात आल्यावर मग गडबडीत जाऊन बॅटरी बदलून आणली. पण सायकल कॉम्प्युटर सुरू केल्यावर मोबाइलला पेअर झालाच नाही. बराच वेळ खटपट करून शेवटी तो नाद सोडून झोपायला गेलो. पहाटे ३:३०ला निघायचे असल्यामुळे घरी डॉक, मोदक आणि सरपंच आदल्या रात्री झोपायला आले होते.

रात्री झोप अशी काही लागलीच नाही. उद्या काय होणार आणि कसे होणार? ह्या विचारातच पहाट झाली. डोळे उघडल्यावर पहिला विचार होता - आज डीसी!!

पटापट आवरून सगळे निघालो स्टार्ट पॉइंटला जायला. परांजपे स्कीम, भूगाव येथील द क्लिफ ह्या हॉटेलपासून रेसची सुरुवात होणार होती. तिथे पोहोचून सेटल होईपर्यंत फ्लॅग ऑफकरता लाइन अप होण्याचे आयोजकांचे हाकारे सुरू झाले होते.

लाइन अप झाल्यावर लगेच एक एक रायडर निघायला लागला आणि रेस सुरू झाल्याच्या जाणिवेने पुन्हा एकदा पोटात बाकबुक सुरू झाली. फ्लॅग ऑफला माझा नंबर आल्यावर शेजारी मोदक रेस कार्ड घेऊन उभा होता. आयोजकांनी ३, २, १ असे काउंट डाउन केले आणि रेस कार्डवर माझी स्टार्ट वेळ लिहिली - ५:१९!

रेस सुरू झाल्यावर, अंधार असल्यामुळे रायडर सपोर्ट क्रूच्या गाडीसमोर असणे बंधनकारक होते. माझ्या मागच्या गाडीत डॉक श्रीहास, मोदक आणि सरपंच होते. सागर, नाजूकराव, मयुरेश आणि अभिजीत क्रूकरता ऑर्डर केलेले सँडविचेस घेऊन सिंहगड पुलाजवळून मग आम्हाला जॉइन होणार होते. रेसच्या सुरुवातीला अजिबात घाई न करता एका लयीत सायकल चालवणे सुरू ठेवले होते. आधी कात्रज, मग खंबाटकी आणि बघता बघता पसरणी घाटसुद्धा आरामात पार पडला.

पसरणी तर मेढा व्हाया भिलार असा रूट होता. हा रस्तासुद्धा घाटरस्ताच आहे. काही काही चढाव तर धडकी भरवणारे आहेत. पण रेसचा उत्साह आणि मागे क्रू असल्याने आश्वस्त होऊन सायकल हाणत होतो. गंमत म्हणजे ह्या रूटवरून दोन वेळेस प्रॅक्टिस राइड करूनसुद्धा रेसदरम्यान मी दोन वेळा रस्ता चुकलोच. क्रूने मागून हॉर्न वाजवून आणि आवाज देऊन मला योग्य रस्त्यावर आणले. भिलारमधून सातार्‍याला येता येता ११/११:१५ झाले होते. पुण्याकडून सातारा शहरात येताना दोन मोठे उड्डाणपूल आहेत आणि त्यानंतर मस्त उतार मिळतो. पुढे कोल्हापूरकडे जाताना रस्ता बर्‍यापैकी फ्लॅट आहे. स्पीड आणि केडन्स व्यवस्थित सांभाळत सायकल हाणत होतो. कोल्हापूर पार करून मग बेळगावात शिरेपर्यंत अंधार पडला होता. बेळगाव ते धारवाड रस्ता अतिशय उंचसखल (रोलिंग) आहे. धारवाडला पहाटे पोहोचल्यावर तिथे १५ मिनिटे पडी टाकली. तिकडे सगळ्या क्रू मेंबरांनी माझा आराम सुरू असताना बहुधा खाऊन घेतले. तिकडे क्रूकडून परत एकदा सेवा करून घेतल्यावर (हो, सेवाच! कुणी पायाला मसाज देतंय, कुणी खांदे आणि पाठ दाबून देतंय, कुणी पाण्याच्या बाटल्या भरून देतंय..) मग पुढे जायला निघालो. तोपर्यंतचा प्रवास व्यवस्थित आणि वेगाने पार पडला होता आणि ठरवल्यापेक्षा बरेच लवकर पोहोचू, असा विश्वास वाटायला लागला होता.

4

5

पण रेसची अनिश्चितता अनुभवणे अजून बाकी होते...

धारवाडहून निघाल्यावर थोड्या वेळाने गुंगी येतेय असे वाटत होते, म्हणून आजपर्यंत कधीही न घेतलेले रेडबुल घेण्याची घोडचूक केली. रेडबुल घेतल्यावर फ्रेश वाटेल असे वाटत असताना डोळ्यावर जबरदस्त झापड आली. सायकल साइडला घेता घेताच झोप लागली आणि रस्त्याच्या साइडला पडलो! मागून क्रू कारमधून सरपंच, डॉक वगैरे धावत आले आणि मला सांभाळले. त्यानंतर १० मिनिटे झोपतो असे सांगून डायरेक्ट ४० मिनिटांनंतर जाग आली!( मी ४० मिनिटे झोपलो होतो, हे मला रेस संपल्यावर सांगितले.) उठल्यावर विचारले, "किती वेळ झोपलो होतो?" तर डॉक म्हणाले, "फक्त १५ मिनिटे!" कारच्या बाहेर येता येता एक सोलो रायडर दिसला. मग काय, एकदम रेस स्पिरिट जागे झाले आणि मोठ्या जोशात त्या रायडरला ओव्हरटेक केले.

धारवाडहून बेळगावचा रस्ता बऱ्यापैकी सरळ/समतल होता. बेळगाव चेक पॉइंट पार करून आता चोरला घाटाचे वेध लागले होते. कारण चोरला घाट संपला की गोव्यात एन्ट्री होते आणि रेसचा शेवटचा टप्पा सुरू होतो. चोरला घाटाच्या सुरुवातीला बर्‍यापैकी चढ होता आणि मग नंतर रोलिंग टेरेन सुरू झाला. आधी ठरल्याप्रमाणे एक कार पुढे जाऊन थांबणार होती. माझ्या मागच्या कारवर montra हायब्रीड सायकल होती. चोरला घाटाच्या एका उतारावर सायकलचे मागचे चाक पंक्चर झाले आणि रेसमध्ये पहिल्यांदा टेन्शन आले. मी थांबताच गाडीतून क्रू धावत आले. सायकल पंक्चर झाल्याचे समजताच रिपेयरची तयारी सुरू केली आणि मला हायब्रीड काढून दिली. ऐकीव माहितीप्रमाणे थोड्या अंतरापासून पुढे उतार असणे अपेक्षित होते, त्यामुळे जड वाटतेय तरी थोडाच वेळ ही सायकल चालवावयाची आहे, ह्या विचाराने चालवणे सुरू केले. थोडे अंतर जाताच लक्षात आले की इथे उतार वगैरे काही नाही. दिवसभर वेगळ्या टाइपची (रोड बाइक) सायकल चालवत असल्यामुळे हायब्रीडवर पोश्चर आणि गियर रेशो एकदम वेगळे होते. चढावावर सायकल प्रचंड जड जात होती. चढाव सुरू झाले की अक्षरश: सायकल रिक्षासारखी उभे राहून सायकल ओढत होतो. प्रचंड दमायला लागले होते. गेले २४-२५ तास एरोबिक मोडमध्ये असलेला मी ३० मिनिटांमध्ये अनएरोबिक मोडमध्ये गेलो. आणखी १००+ कि.मी. बाकी होते. त्यामुळे एवढ्यात फार ताण नको द्यायला, म्हणून मग उतरून थांबलो. तेवढ्यात सायकल रिपेयर झाल्याची सुवार्ता मिळाली आणि मी उत्साहात आधीची सायकल घेऊन चालवणे सुरू केले. पण हाय रे दैवा! काही मीटर पुढे गेलो असेन, तेवढ्यात जोरात आवाज येऊन परत तेच चाक पंक्चर झाले! आता काळजीची जागा त्राग्याने घ्यायला सुरुवात केली. मात्र क्रू अतिशय थंड डोक्याने त्यांचे काम करत होते. आता दुसरी कारही समोरच होती. मग त्यातली राले रोड बाइक घेऊन पुढे जायचे ठरवले. रालेसुद्धा रोड बाइकच असल्यामुळे चढाव चढणे सोपे जाईल असा अंदाज होता. पण.. पण.. पण… राले चालवायला सुरुवात केली आणि रालेचे गियर शिफ्ट होत नसल्याचे लक्षात आले. हा एक मोठा मानसिक धक्का होता. तशीच सायकल दामटणे सुरू ठेवले आणि थोड्या वेळात अंगातली सगळी energy संपल्याची जाणीव झाली. गेली ४५ मिनिटे ते एक तास सारखे अनएरोबिक झोनमध्ये सायकल चालवण्याचा हा दुष्परिणाम होता.

7

चोरला घाटात डेल्टा नावाचे एक हॉटेल आहे, तिथे जाऊन जरा वेळ बसलो. समोरून रायडर्सना पुढे जाताना बघून प्रचंड निराशा आणि चिडचिड होत होती. मी आत्तापर्यंत ह्या सर्वांच्या पुढे होतो आणि आता लीड गेला ह्या जाणिवेने आणखीनच निराश वाटत होते. पण काही झाले रेस तर पूर्ण करायची होतीच. आता बेस्ट टायमिंग होणार नाही, हे मान्य करून आहे त्या वेळेत कसे संपवता येईल, ह्याचा विचार सुरू केला. सर्वात आधी मला त्राण गेलेल्या अवस्थेतून बाहेर यायचे होते. त्याकरता मग समोर जे दिसेल ते पोटात ढकलणे सुरू केले - दोन ब्लॅक कॉफी, २-३ काजू रोल्स, एक खाकरा, एक एनर्जी जेल आणि carb सप्लिमेंट्स.. जे हाताला लागेल ते खात सुटलो. जरा बरे वाटायला लागल्यावर मग सागर आणि मोदक यांच्या सल्ल्याप्रमाणे सायकल हातात घेऊन चालणे सुरू केले. उतार आला की सायकलवर बसायचे आणि चढाव आला की परत पायी, असे सुरू केले.

9

थोड्या वेळात नवीन टायर आणि ट्यूब लावून माझी मुख्य सायकल आली आणि मग गोव्याकडे प्रवास सुरू झाला! ह्या सगळ्या गोंधळात बहुमूल्य असे १:४५-२ तास गेले आणि माझी येऊ शकणार असलेली वरची पोझिशनसुद्धा!

8

चोरला घाट उतरून गोव्यात येईपर्यंत ऊन्ह चांगलेच तापले होते आणि दमट वातावरण सुरू झाले होते. गोव्यातला रस्ता अतिशय चढ-उताराचा होता. काही चढ तर थेट घाटातल्या चढावाची आठवण करून देणारे होते. एका ठिकाणी थांबून हातापायावर थंड पाणी ओतल्यावर मग जरा बरे वाटले. उन्हाचा त्रास होत होताच, पण शेवटचे काही कि.मी. राहिले, ह्या विचाराने सायकल चालवणे सुरू ठेवले.

बर्‍याच चढउताराच्या आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून शेवटी ओळखीच्या हमरस्त्याला आलो आणि अंगात उत्साह संचारला. इथून पुढे ५-६ कि.मी.च बाकी होते. ह्या रस्त्यावरसुद्धा चढाव होते, पण शेवटच्या काही अंतराच्या आनंदात ते झपझप पार पडले. हमरस्त्यावरून क्रू कारने डावीकडे चिंचोळ्या रस्त्यावर वळण घेतले आणि रेस समाप्त होत आल्याची जाणीव झाली. थोडे अंतर आत जाताच डाव्या हाताला John's Seagull रेस्टॉरंटचा दरवाजा जणू दोन्ही हात पसरून स्वागताला सज्ज होता. त्या दरवाज्यातून सायकल आत नेताना फिनिश लाइनची चंदेरी पट्टी पार केली आणि स्वप्नपूर्ती झाल्याची जाणीव झाली!

चंदेरी पट्टीवरून सायकल जातानाचा क्षण कायमचा मनात कोरला गेलाय!

मोदकने रेस कार्डवर फिनिश लाइनचा शिक्का घेतला आणि आम्हा सर्वांचा एकच जल्लोश सुरू झाला!

रेस रॅम क्वालिफायर वेळेच्या आत पूर्ण झाली होती.

डीसी सोलो करण्याचे एक वर्ष आधी बघितलेले स्वप्न पूर्ण झाले होते.

10

11

13

12

गेल्या वर्षीच्या लेखात लिहिल्याप्रमाणे, ह्या वर्षीसुद्धा नाजूक पाटलांच्या मातोश्रींच्या हातचे चवदार मटण खाण्याचे भाग्य लाभले! आणि ह्या वर्षीसुद्धा दुपारच्या जेवणाला कोल्हापूरला पोहोचता पोहोचता रात्र झाली.

क्रूमधला प्रत्येक जण हातातली कामे सोडून आणि पदरचे पैसे मोडून मला मदत करायला आला होता. मी ही रेस पूर्ण करू शकलो, ह्याचे श्रेय फक्त आणि फक्त क्रूला जाते. त्यांनी वेळोवेळी मला सपोर्ट करून आणि योग्य वेळी खोटे बोलून मला मनाने आणि पायांनी फिट ठेवले! अजिबात न झोपता संपूर्ण रात्र मोदक, सागर, सरपंच, अभिजीत, नाजूक पाटील, मयुरेश आणि डॉक मला सपोर्ट करत होते.

आमचे सायकल ग्रूपमधले स्नेही श्री. अरिंजय हे लातूरहून खास मला भेटायला गोव्यात बाइक चालवत आले. त्यांच्या आणि सायकल ग्रूपमधल्या सर्व मित्रांच्या शुभेच्छांमुळे संपूर्ण डीसीचा प्रवास सुखरूप पार पडला.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

25 Oct 2019 - 3:35 pm | बहुगुणी

तुमच्या आणि क्रूच्या जिद्दीला सलाम! लेख आवडलाच.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:41 pm | यशोधरा

आवडला लेख.

रेस कुणाशी असते? ताशी काय वेग पडतो?

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 9:05 pm | जेम्स वांड

शिरसाष्टांग दंडवत प्रणाम. आपल्याला हे बापजन्मात जमणारे नाही, परवडणारे तर त्याहून नाही. आपण आपले गुलहौशी वाचक म्हणून तुमचे रक्त घाम अश्रूंनी परिपूर्ण आचिवमेंट वाचून निःश्वास सोडायला तयार मोकळे कसे.

रॅम क्वालिफिकेशन म्हणजे काय असते? रॅम म्हणजे रेस अक्रोस अमेरिका असे गूगल महाशय म्हणाले! 3/3500 हजार मैल आडवा अमेरिका सायकलीवर ? हर हर

मार्गी's picture

30 Oct 2019 - 12:00 pm | मार्गी

अशक्यप्राय जबराट आहे हे!!! अभिनंदन!!! पण एक सायकलिस्ट म्हणून एक प्रश्न मनात आला- हे खरंच इतकं सोपंय? का तुम्ही काही अतिशय खडतर तयारीचे भाग लिहिलेले नाहीत? किंवा एंड्युरन्समध्ये प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात- एक असतो फिटनेस, मानसिक- शारीरिक सामर्थ्य, जिद्द व त्याबरोबर दुसरा भाग म्हणजे एक्सेसरीज/ रिसोर्सेस. कदाचित तिथे खूप जास्त तयारी केली असेल. पण हे दिसतं तितकं सोपं नक्कीच नसणार. दुस-या पैलूचे डिटेल्सही वाचायला आवडतील.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2019 - 7:21 am | मुक्त विहारि

मस्त

सुबोध खरे's picture

1 Nov 2019 - 8:11 pm | सुबोध खरे

साष्टांग दंडवत घ्यावा

एवढा अंतर मोटार सायकल वर जमेना

मित्रहो's picture

2 Nov 2019 - 10:14 am | मित्रहो

तुम्हाला सलाम

श्वेता२४'s picture

2 Nov 2019 - 2:25 pm | श्वेता२४

अतीशय वेगळा अनुभव. छान लिहीलंय

टर्मीनेटर's picture

3 Nov 2019 - 9:24 am | टर्मीनेटर

वर्णन आणि फोटो मस्त!लेख आवडला.

चाणक्य's picture

3 Nov 2019 - 12:34 pm | चाणक्य

हे भन्नाट आहे. प्रचंड भारी. अभिनंदन तुम्हा सगळ्यांचे.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 9:20 pm | मुक्त विहारि

मस्त.

ह्या अशा शर्यतीत भाग घेणे आणि ती शर्यत पार करणे महत्त्वाचे.

पुढच्या वर्षी परत एकदा भाग घ्यावा, ही विनंती. ..