त्रिभुवनसुंदरी

शिव कन्या's picture
शिव कन्या in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

त्रिभुवनसुंदरी

मी किती उंच पर्वतांतून चालले होते!

एवढ्या धवल उंचीवरूनच शंकरपार्वती जात असणार. खाली दरीतील नदी चांदीच्या दूर्वांइतकी बारीक दिसत होती. पर्वतांना तर अंतच नव्हता. एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा. जणू सगळे एकाच्या पोटात एक. खाली डोकावले की भोवळ येई. उंच शिखरांकडे पाहिले की हरवून गेल्यागत वाटे. कुठली गुंगी? कुठली धुंदी? ..... सगळे हवेहवेसे वाटणारे. स्वत:च्या क्षुद्रत्वाची जाणीव माणसाला गप्पगार करून टाकते. आपण गुणगुणलो तरी हे भव्य चित्र विस्कटून जाईल, असे भय. आम्ही खाली उतरू लागलो.

दरीतील नदीचा प्रवाह आणखी चमकदार दिसू लागला. आकाशातील निळासावळा पट्टा खळखळ वाहत होता.
त्या निळ्या पाण्यात सूर्याचे प्रखर किरण आरपार गेल्याने जणू चांदण्यांनी भरलेले आकाश दिवसा धरेवर आल्यासारखे दिसत होते. जणू दरीत स्वर्ग. क्षणभर जरी डोळे मिटले तरी, नजरेसमोर निळे पाणी आणि चंदेरी किरणे यांचा मिलाफ नाचे.

कंडक्टर म्हणाला, "आप यहां उतर जाईये. आगे के लिये आपको यहीं से बस मिलेगी."

एक हलकी सॅक पाठीवर. मी खाली उडी मारली. तितक्या प्रचंड उंचावरून इथपर्यंत सुखरूप आणणाऱ्या त्या छोट्याशा बसला मनातल्या मनात ‘धन्यवाद’ म्हणाले. बसने जपून एक वळण घेतले आणि ती पर्वतापलीकडे नाहीशी झाली.
खाली एक चहाची टपरी. बाकी तशी सामसूम. अंगात आणखी थंडी भरली. रस्त्याच्या कडेला उभी राहिले जरा. पुढची बस दिसेना की इतर कोणते वाहनही येईना. मग टपरीत जाऊन ‘एक प्याली’ चाय घेतला. परत बाहेर येऊन पाय मोकळे करण्यासाठी जरा इकडेतिकडे करू लागले. तिथे समोर एक कठडा होता. सहज म्हणून तिथे गेले आणि खाली वाकून पाहिले..... आणि मग पाहातच राहिले.

इतका वेळ झाला, पाण्याचा धाडधाडखळखळ आवाज होत होता, तरी आपल्याला कसा ऐकायला आला नाही, त्याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. मी काय पाहात होते?

मी जिच्यासोबत मंतरल्यासारखी इथपर्यंत आले होते, ती निळी अलकनंदा आणि पलीकडून फेसाळत्या दुधाच्या रंगाची अप्रतिम भागीरथी! त्या दोघींचा प्रयाग! संगम!

FB-IMG-1570976363949

रत्नासारखे निळे आणि दुधासारखे शुभ्र असे जीवनप्रवाह चमकत्या सूर्यप्रकाशात एकमेकांत मिसळून जातात, तेव्हा बघणाऱ्याचे मन गंगा होऊन जाते. अलकनंदा आणि भागीरथी यांच्या संगमातून पुढे गंगा वाहू लागते. संगमावरचे पाणी असे खळाळत होते, जणू भांडताहेत. प्रचंड संघर्ष. प्रचंड खळखळ. तिथे सुखावह असे काही नाही. त्यांचे सौंदर्य रुद्रभीषण. भय उत्पन्न करते. त्या दोघीही माझे रक्त शोषून घेत आहेत असा भास झाला. मी दचकले. दोघी एकमेकींवर कुरघोडी करताहेत. अलकनंदेचे निळेपण फुत्कारणार्‍या नागिनीसारखे डंख मारायला धावते, तर भागीरथीचे शुभ्रपण हिमालयातल्या यतीप्रमाणे डोळे फाडफाडून त्या नागिणीची मानगूट पकडायला धावतेय....

माझ्या अंगावर एकदम काटा आला. आणि पुढे पाहिले.... सौंदर्याच्या दीप्तीने डोळे दिपून गेले. ती गंगा होती! गंगेने अलकनंदा आणि भागीरथी, या दोघींचे रौद्रपण स्वत:मध्ये सामावून घेतले होते आणि स्वत: अपूर्व अशी त्रिभुवनसुंदरी होऊन भारदस्तपणे पुढे निघाली होती. तिच्यात आक्रस्ताळेपणा नव्हता. तालबद्ध गती होती. तिची वळणे क्लिष्ट होती, परंतु प्रचंड मोहक होती. तिला सगळे कळत असावे. ती अल्लड नव्हती, अजाण नव्हती, पण म्हणून गंभीरतेचा आव आणणारी प्रौढाही नव्हती. ती शालीन नव्हती, पण स्वैरही नव्हती. ती आमंत्रण देत होती – हर क्षणी, हर वळणावर. ती मोहिनी होती आणि योगिनीही होती. किचित हिरवा, किचित दुधाळ असा तिचा जगावेगळा वर्ण. ती कुणालाही दाद देत नव्हती. तिला स्वत:चा कैफ होता – युगायुगांचा!

तिला स्वत:ची मस्ती होती. कोण म्हणेल – ही समुद्राकडे धावत निघालीय म्हणून? गती हीच जिची प्रकृती, तिला समुद्रसंगमाची आस कशी असेल? उलट सागरसंगमापाशी ती शतश: विदीर्ण होते. शेकडो वाहिन्यांमधून स्वत:ची नाखुशी जाहीर करत, मग ती समुद्रात जाते. समुद्राला मुक्ती देते.

चहूकडून पर्वतांचा आणि जंगलाचा वास माझ्यापर्यंत येत होता. मला हरवल्यासारखे वाटू लागले. नजर तिच्यावरून हटत नव्हती. तिच्यावाचून मन दुसऱ्या कशाकडे ओढ घेत नव्हते. गंगेचे माहात्म्य खूप ऐकून नि वाचून होते. तिच्या दर्शनाने आपण काही मोहूनबिहून जायचे नाही, असे माझ्या बालिश बुद्धीने आधीच ठरवून टाकले होते. आपण काय नद्या पाहिल्या नाहीत? आपण काय ऊर दडपून टाकणाऱ्या, रोरावत जाणाऱ्या जिवंत नद्या पाहिल्या नाहीत? गंगेचे काय एवढे?

FB-IMG-1570976332721

परंतु तिचे आणखी एक कमनीय जीवघेणे वळण आले आणि नकळत माझे हात जोडले गले. ‘मला माफ कर,’ मी बोलून गेले.

दुपार कलता कलता गाडी हृषीकेशला पोहोचली. एका छानशा तिबेटी हॉटेलमध्ये फ्रेश होऊन परत तिच्याकाठी. संध्याकाळ होत आली होती. तिच्या दोन्ही तटांवर लगबग चाली होती. घाट झाडले जात होते. छोट्या द्रोणांमध्ये फुले, उदबत्ती आणि दिव्यांची वात सजवली जात होती. छोट्या मुलामुलीचे हात हे काम चटपटचटपट करीत होते. त्याचे डोळे निष्पाप नव्हते. गिऱ्हाइक शोधणाऱ्या व्यवहारी आणि धीट नजरा होत्या. समोर एक वीसेक वर्षांची मुलगी पायात खराटा धरून घाट झाडत होती. तिचे दोन्हीही हात नव्हते. पायाने ती इतकी स्वच्छ आणि भरभर झाडत होती की हाताने झाडणाऱ्यांनी क्षणभर पाहावेच तिच्याकडे.

"नाम क्या हें तुम्हारा?" मी कौतुकाने विचारले.
"सुमन!"
"तुममें बडी लगन हैं!"
"जिंदा तो रहना हैं."
"कहां से हो?"
"रुद्रपूर से."
"क्या काम करती हो?"
"मेरा छोटासा बिझनेस है. लोगोंको गंगाजी में डालने के लिये खुर्दे की जरुरत होती है. वो नोट देते हैं, मै उन्हे खुर्दा देती हूं. अगर किसीने दस रुपये कि नोट दी तो मैं उन्हें नौ रुपये लौटाती हूं, एक रुपया मेरा कमिसन."

मला भारी वाटले. एकदा गंगेकडे आणि एकदा दोन्ही हात नसणाऱ्या पण स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या सुमनकडे पाहिले. हिचा काठ सगळे शिकवतो माणसाला. बोलता बोलता माझे लक्ष खराटा धरलेल्या तिच्या पायाकडे गेले. तळपायांना इथून तिथवर भेगा पडलेल्या. काही ठिकाणी रक्ताच्या बारीक गोठलेल्या रेषा. अजून थोड्या वेळाने थंडी आणखी वाढेल. तिच्याकडे पहिले आणि माझ्या काळजातली काडी सरकली. वाटले, ‘वय लहानच आहे, पण हिने किती हिवाळे पाहिले असतील?’ त्या क्षणी काहीतरी वाटले, मी पटकन बूट काढून माझ्या पायातले सॉक्स काढून तिच्या समोर धरत म्हणाले, "नये हैं. आज ही पहने हैं. रख लो. ठंड बहोत हैं.."

तिच्या डोळ्यातली कृतज्ञता माझ्या डोळ्यांत उमटली. तिने तत्परतेने पायातला खराटा समोर धरला, म्हणाली, "इसके उपर रख दीजिये. मैं पहन लूंगी." तिच्या स्वच्छ खराट्यावर मी सॉक्स ठेवले. ‘अच्छा’ करून निघाले खरी, पण दोन्ही हात नसताना ती पायात सॉक्स कसे घालील, हा प्रश्न मनात आला. दुसऱ्याच क्षणी मन म्हणाले, जी या बनेल घाटावर हात नसताना बिझनेस करू शकते, तिच्यासाठी सॉक्स काय!

होलिकादहन सुरू व्हायला आणखी खूप वेळ होता. आता मात्र गार वारे चहूबाजूंनी घेरू लागले. गंगेच्या काठावर छोटेमोठे खडक होते. मी बूट दूर ठेवून, अनवाणी पायांनी तिच्या प्रवाहाकडे जाऊ लागले. तिच्या प्रवाहात पाय सोडणार, इतक्यात माझे हात माझ्या नकळत जोडले गेले. 'तुला माझे पाय लागतील. माफ कर.’

तिच्या प्रवाहात पाय ठेवले.... क्षणभरच!.... आणि कळून चुकले, ही मुक्तिदात्री का आहे. आजपर्यंतचे सगळे व्यापताप तळपायांवरील रेषांमधून, झरझर तिच्या प्रवाहात वाहून गेले. डोळे शांत झाले. मस्तक विश्रांत झाले. हृदयातील रक्ताची स्पंदने चंदनाची झाली. सगळ्याचा विसर. क्षणभरच – परंतु मुक्ती! तिचा शीतल प्रवाह माझ्या पायावरून वेगाने वाहत होता. कुणीतरी माझ्या प्रवासी पावलांना इतका जिवंत स्पर्श पहिल्यांदा करत होते. मुक्तीचा असा अनुभव घेतल्यानंतर मी माझे पाय खडकावर घेतले. आरशात चेहरा पाहावा, तशी मी माझे पाय पाहात होते. खूप प्रसन्न दिसत होते.

आता गंगेवर मावळतीचा शेंदरी रंग हळूहळू पसरू लागला. पाण्याबरोबर थरथरत जाणारा लालसर रंग पाहून उन्हातला गुलमोहोर आठवला. काठावरून एक एक दिवा गंगेच्या प्रवाहात येत होता. हरेक दिवा स्वत:चे प्रतिबिंब पाण्यात बघत नाचत नाचत पुढे जात होता. पुढे पाण्याला ओढ जास्त असे. मग दिवे झटेझोंबे घेत, शेवटी द्रोण कले आणि पापणी लवेतो गंगार्पण होत. गंगारतीचे सूर कानी येऊ लागले. मला काही तिच्यातून उठून आरतीसाठी जायची इच्छा झाली नाही.

चंद्र सी ज्योति तुम्हारी, जल निर्मल आता
शरण पडे जो तेरी, सो नर तर जाता ....

कुणी आरती गातोय की रडगाणे याच्याशी काहीही देणेघेणे नसल्यासारखी गंगा वाहत होती. अखंड. स्वत:तल्या प्रचंड ऊर्जेसह. मला ते पाहून एकीकडे विरक्त आणि दुसरीकडे उदास वाटत होते. आमच्या रक्तात इतकी मिसळूनही, आमच्यापासून इतकी दूर कशी काय? इतकी आत्ममग्न कशी काय?

आत आणि बाहेर, दोन्हीकडे इतकी तल्लीनता असल्याशिवाय का ती वंदनीय झाली! हळूहळू होळीचा चंद्र उगवला. लोकांची लगबग आणखी वाढली. होलिकादहनाची तयारी सुरू झाली. मी मात्र जिथे अरण्य सुरू होते, तिथल्या माझ्या तिबेटी झोपडीत निघून गेले. समोर चंद्रप्रकाशात उजळून निघालेला तिचा शुभ्र वाळूचा किनारा, चंद्राला अंगांगात मुरवून घेतलेला तिचा कमनीय प्रवाह आणि माझ्याच भूमीतले हे विलोभनीय रूप शांतपणे मनात साठवून घेत, रात्र जागवणारी मी.

आजही जगातली कुठलीही नदी पाहिली तरी, ‘गंगे भागीरथी’ हेच मनात उमटते... आणि त्या रात्रीचा प्रवाह मनात वाहत राहतो.

प्रकाशचित्रे श्रेयनिर्देश: कै. श्री. रघू अय्यर.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

खरेच आहे ती त्रिभुवनसुंदरी!

किति सुरेख लिहिलंय. फार आवडले.

मायमराठी's picture

26 Oct 2019 - 8:54 pm | मायमराठी

. समोर चंद्रप्रकाशात उजळून निघालेला तिचा शुभ्र वाळूचा किनारा, चंद्राला अंगांगात मुरवून घेतलेला तिचा कमनीय प्रवाह आणि माझ्याच भूमीतले हे विलोभनीय रूप शांतपणे मनात साठवून घेत, रात्र जागवणारी मी.

- हे अनुभवण्यापलीकडे अजून काय हवं?

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 12:54 am | गुल्लू दादा

काय सही लिहिलंय... खूप आवडले

नरेश माने's picture

2 Nov 2019 - 10:54 am | नरेश माने

खुपच छान लेख!

श्वेता२४'s picture

2 Nov 2019 - 11:58 am | श्वेता२४

आवडल

मित्रहो's picture

3 Nov 2019 - 10:56 am | मित्रहो

वाह काय वर्णन केले आहे. निव्वळ लाजवाब

काठावरून एक एक दिवा गंगेच्या प्रवाहात येत होता. हरेक दिवा स्वत:चे प्रतिबिंब पाण्यात बघत नाचत नाचत पुढे जात होता. पुढे पाण्याला ओढ जास्त असे. मग दिवे झटेझोंबे घेत, शेवटी द्रोण कले आणि पापणी लवेतो गंगार्पण होत.

गंगारतीच्या सुमारास दिसणारे हे दृष्य फारच विलोभनीय असते.
छान लिहिलंय, धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 10:46 pm | मुक्त विहारि

सरोवर आणि धरण बघीतले की भान हरपतेच.... आणि त्यातूनही, वाहती नदी असेल तर जास्तच.

Rockstar's picture

9 Jan 2020 - 5:12 pm | Rockstar

खूप छान लिहिलंय...

अनिंद्य's picture

5 Feb 2020 - 1:19 pm | अनिंद्य

सुरेख !

अजय खोडके's picture

5 Feb 2020 - 2:56 pm | अजय खोडके

खुप छान वाटले. स्वतःच सर्व अनुभव घेतोय असे वाटले.