क्लीक- २

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
19 Sep 2019 - 8:33 am

"अगं मुलाला भेट. बोला दोघे. कसं वाटतंय ते फील करा मग पुढे पाहू काय करायचं ते." गांगरलेल्या बॉलरला कॅप्टनने येवून पाठीवर हात ठेवत दिलासा द्यावा तस्सा बाबाने मला दिलासा दिला. "तु भेट एकदा श्री ला .भेटेल ग ती " बाबाने आईला परस्परच सांगुन टाकले. बाबाला नाही म्हणणं अवघड जातं. पक्का सेल्स्मन आहे.
निदान भेटीसाठी तरी मी तयार झाले या आनंदात आईने चहात तिसर्‍यांदा साखर घातली आणि तोंड गोड करा म्हणून तो कप बाबापुढे ठेवला.

मागील दुवा http://misalpav.com/node/45318
बरीच फोनाफोनी करत आजचा दिवस मुक्रर केला गेलाय. दाखवण्याचा तो तसला चहा पोह्यांचा कार्यक्रम मी विनोदी कार्यक्रम या सदराखाली टाकते. मुलीपेक्षा मुलीची आईच बावरलेली असते. काहीच न सुचल्यामुळे ती स्वैपाकघरात येरझार्‍या घालत असते. मग मुलीची काकू मावशी मुलीला घेवून सांभाळत येते. दिवाणखान्यात मुलाचे काका, वडील किंवा मामा , मुलीच्या काका , आतोबा किंवा तत्सम नातेवाईकाशी खोटं खोटंच हसत सकाळ मधील मुक्तपीठ , सम्ध्या नंद किंवा पोलीस टाईम्स मधील अग्रलेख किंवा अमेरीकेने ग्वाटेमालामधे सैन्य घुसवावे अशा स्थळ काळ वेळ आणि प्रसंगोत्पात विषयावर चर्चा करणार, धरुन आणलेल्या कोकराने आशालभूतपणे सगळीकडे नजर फिरवावी तशी नवर्‍यामुलाची नजर हॉलमधल्या सगळ्या फोटोंवरुन फिरते/ मुलगी चहा आणते तेंव्हा तीला प्रश्न पडतो की मुलाकडे बघत चहा दिला आणि तो देताना तो त्याच्या पँटवर सांडला तर काय? म्हणून ती चहाच्या कपावरची नजर काढतच नाही.इतका वेळचालू असलेलं खोटं खोटं हसू, बोलणं बंद पडतं. एक चमत्कारीक शांतता काही क्षण मुक्कामाला येते. पिक्चरमधे बर्म असत हो अशा प्रसंगी संतूर , सतार सनई यातलं काहीतरी वाजतं हीरो हीरॉईनचे चेहरे दिसतात, हीरॉईन लाजून चेहरा झाकते, दोन फुले एकमेकावर आपटतात,कुठूनतरी ढगात रंग उधळले जातात… इथे या पैके तसं काहीच होणार नसतं. मग ही कोंडी फोडण्यासाठी मुलाच्या बरोबर आलेला काका वगैरे जो कोणी असतो तो पुढाकार घेतो. चला गच्ची पाहून येवूया असं काहीसं म्हणतो. मुलगा आणि मुलगी सोडून सगळे गच्चीवर जातात. तिथेही त्याम्ना काय बोलायचं हा प्रश्न असतोच. खाली पुन्हा पाच मिनीटात जावे की सातव्या मिनीटाला जावे हे ठरवताना घड्याळाकडे वारंवार पहातात. घड्याळातला सेकंद काटा मिनीट काट्याच्या गतीने फिरत असतो. त्यालाही बहुधा अवघडलेपणा आलेला असतो. वेळ काड्।आयचा असतो म्हणून सम्बंध नसला तरी आसपासच्या सोसायट्यात जागेचे भाव काय आहेत याची विचारपूस होते. कशीबशी साडेचार मिनीटे सम्पतात. उरलेला अर्धा मिनीट जीने उतरण्यात जाईल या हिशेबाने कोणीतरी पुटपुटते "चला खाली जाऊया."
मंडळी हॉलमधे येतात. मुलगा मुलगी तशीच अवघडल्यासारखी मान खाली घालून बसलेली असतात. मुलाने ,विचारले तर बरे दिसेल का या विचारात काहीच विचारलेले नसते. बाकीची मंडळी मघाच्या पोह्याच्या बशीतले उरलेले पोहे खावेत की तसेच सोडून द्यावेत याचा विचार करायला लागतात.
हे सगळं मला एकदा शूट करायचंय आणि त्या वर शोलेचे डॉयलॉग मॅश अप करुन व्हॉट्सॅपवर फॉर्वर्ड करायचंय सगळ्या फिल्म वाल्याना. काय मजा येईल नाही. मुलीची आई विचारतेय कितने आदमी थे. मुलगी म्हणते दो सरदार. मुलीची आई दोन चहाचे दोन कप ट्रे मधे ठेवले जातात. माझ्या मनात ती फिल्म चालायला लागते.
हे असलं काही करणार नाही. भेटायला फक्त श्रीच येईल या मुद्द्यावर खरं म्हणायचं तर अटीवर मी मुलाला भेटायला तयार झाले आहे. श्री फायनान्स कन्सल्टन्ट आहे कमोडीटी मार्केट आणि मार्केट डेरीवेटीव या मला अगम्य असणार्‍या विषयात काम करतो. हे माझ्यासाठी बरं होतं. निदान बोलणं जावा, पायथॉन, एस ए पी,ऑरॅकल, डेटा स्ट्रक्चर यावर तरी होणार नाही.
आजचा दिवस ठरलाय. दुपारी पाच वाजता श्री येणार म्हणून आईने मला कालपासूनच चांगलं दिसावं म्हणून सूचना द्यायला सुरवात केली आहे.
दिवाळीच्या पूजेसाठीची ताम्हणं समई तांब्या कसं आपण आदल्या आठवड्यात चिंच पितांबरी वगैरे लावून लख्ख करुन ठेवतो तसं पार्लरवालीने कालच चेहेर्‍याला ब्लीचींग करुन ठेवलंय. साडीची सवय नसल्यामुळे असेल किंवा आणखी कशामुळे असेल पण काहीतरी वेगळ वाटतंय. हॉलमधे सगळं नीट आवरलंय .बाबाने खास सोनचाफ्याची फुलं आणून घरात ठेवली आहेत. घर कसं सुगंधी झालंय.
घरातली पुस्तकं नीट रॅकमधे गेली आहेत. टाईम्स आणि लोकसत्ता घडी होऊन टीपॉयच्या खालच्या कप्प्यात गेले. बाबाचे चष्मे टीव्ही सोफा टी पॉय, बाथरूम डायनिंग टेबलवरून मुक्काम हलवून कपाटात गेले. हॉलमधल्या सोफ्यावर खुर्च्यावरची कव्हरं जागच्या जागी आली. शू रॅक मधले सगळे एक्स्ट्रा करीक्यूलर आयटम्स कपाटात गेले. खिडक्यावरचे पडदे बदलायचा प्रश्न नव्हता पण तेही झाडून घेतले असावेत. घर कसं आईने नीट भांग पाडून शर्ट इन करुन खिशाला सेफ्ती पीन ने रुमाल लावून शाळेत सोडायला आणलेल्या केजी तल्या मुलासारखं नीटनेटकं वाटत होतं.
आईने जर्मनीहून आणलेल्या फ्लॉवरपॉट मधे ठेवायलाकुठूनतरी एक छान बुके आणून त्याचं उद्घाटन केलं होतं.
"हे कशाला आता. दारावर तोरण पण बांध एक"
अगं असू दे गं. फुलं असली की घर कसं प्रसन्न वाटतं. तू आवरलंस का तुझं. येतीलंच आता इतक्यात ते लोक.
हॉलमधल्या घड्याळाने ठण्ण करत साडेचार वाजल्याचे सांगीतले.
नाटक सुरू व्हायच्या अगोदर पहिली दुसरी तीसरी घम्टा वाजतात तसं काहीसं वाटलं. मला उगीचंच आनंद पिक्चरमधलं ते " बाबू मोशाय हम सब रंगमंचकी कठपुतलीयां है जिनकी डोर उपरवालेके हाथ मे है." आठवलं. गम्मतच वाटली. स्वतःशीच हसले. माझ्या त्या हसण्यावर आईने बाबाला विनर लूक दिला.
" टिंग टाँग" दारावरची बेल वाजली. आई बाबा दोघेही दचकले. आईने माझ्याकडे पाहीलं साडीच्या ब्रूचमधे माझा गजरा अडकलाय. तो सोडवणे ,साडी न फाडता, ही माझी पहिली प्रायोरीटी आहे.
"अहो जरा बघा ना. ते लोक आले असतील. मी आत जाते, पाण्याचं बघते. अगं ए ए ऊठ आत जा. इथे काय बसली आहेस.
मला खर्म तर आत जायच्म नाहिय्ये. मला शिर्‍याची एन्ट्री बघायची आहे. माणसाच्या एन्ट्रीवरून चालण्यावरून बॉडी लँग्वेजवरून त्याची कॉन्फिडन्स लेवल समजते. तो किती दिखाऊपणा करतो ते समजतं. आईला बहुतेक तेच नको असावं. तीने मला आत पिटाळलं. मी एका हाताने गजरा दुसर्‍या हाताने पदर सावरत आत जाते.
या आतल्या खोलीच एक आहे. बाहेर काय चाललंय ते समजून घ्यायला बाहेरच यावं लागतं. तरीही मी आतून कानोसा घ्यायचा प्रयत्न करेतेय. बाबाने दार उघडलं.....
दार लावल्याचा आवाज आला. ' नमस्कार या या या वेळेवर पोहोचलात , घर शोधायला काही त्रास नाही ना झाला." हे असलं काहीच ऐकायला आलं नाही.
" हे बघ आलं गं सगळं. सामोसे , ढोकळा , त्याने सांगीतली तशी हिरवी चटणीपण दिली आहे." बाबा बाहेरून बोलतच किचन मधे गेला. म्हणजे बेल त्या सामोसेवाल्याने वाजवली होती तर. तरी मी म्हणतेय पाच वाजता येणारा शिर्या साडेचार वाजताच कसा आला. दुसरी कामं नाहीत का याला. श्री या नावाचं मी शिर्‍या हे सुलभीकरण कधी केलं तेच समजलं नाही.
एक बरं झालं बेल वाजल्यावर लगबगीने आत येताना ब्रूच मधे अडकलेला गजरा सुटला. त्यामुळे मान मोकळी झाली आहे.
सकाळपासून ते साडी नेसणं , आईच्या सूचना ऐकणं, यात संध्याकाळी येणार्‍या लोकाम्साठी काय हे मी विचारलंच नव्हतं. ऑफीसमधे कोणी येणार असेल तर कँतीनवाल्या कोक पिझ्झाची ऑर्डर करतो. आईने मला अ‍ॅरेन्ज करायला संगितले असत तर मी तेच केले असते.बहुधा ते ओळखूनच आईने मला ती जबाबदरी दिली नसावी.
ढोकळा समोसे आले म्हंटल्यावर आईचा जीव ढोकळा समोशा सोबतच भांड्यात पडला. आता तीची पूर्न तयारी होती. ते लोक केंव्हाही आले तरी चालेल.
आपल्या भारतीय लोकांना पाच ला या म्हंटल्यावर साडेपाच पावणेसहा पर्यंत येतात.पण हा पडला कमोडीटी मार्केटवाला. मार्केटमधे सर्वात अगोदर उतरलेल्याला भाव चांगला मिळतो. नंतर कमोडीटीचा हळू हळू पुरवठा वाढला की तो भाव पडतो. या सवयीमुळे मुळे लवकरही येईल एखादवेळेस.
घड्याळात पाच ला दहा कमी आहेत. मला आवडत नाही पण तरीही आई रंगार्‍याने गणपतीवरून रंगाचा शेवटचा हात फिरवल्यावर पहावे तसे पहातेय. गजरा थोडा नीत करतेय. मला पुन्हा पुन्हा न्याहाळतेय. पुन्हा पुन्हा धीर देतेय. "सगळं व्यवस्थीत होईल गं" माझा हात हातात घेवून आईने मघापासून अकराव्यांदातरी हे वाक्य म्हंटलं असेल. माझ्यापेक्षा तीच जास्त अस्वस्थ झाली आहे.
खरं तर हा अस्वस्थपणा नर्वसनेस मला तो तसा अजिबात नाहिय्ये असंही नाही. थोडासा आहे.पण अगदी आई इतकाही नाही. दाखवणे / पहाणे या प्रकारचा जाम तिटकाराच आहे त्यामुळे असेल कदाचित. त्या पेक्षा सिर्‍याला त्याच्या ऑफीसमधे जाऊन काम करताना पहायला आवडलं असतं. एखादा माणूस कामाच्याजागी कसा वागतो त्यावरून तो कसा असेल ते ठरवता येते. अर्थात तो आमच्या एखाद्य अप्रोजेक्टच्या वेळेस आला असता तर त्याला भेटायला मला वेळही देता आला असता की नाही कोण जाणे.अर्थात हे सगळं जर... तर...
मला , आपल्याला कोणीतरी पहायला येणार याचाच राग येतो. कोणीतरी अनाहूत येणार आपल्याला आपल्याच घरात थेट आपल्या आईबाबंसमोर नखशिखान्त न्याहाळणार. आपल्या अंगप्रत्यंगाचे उभार नजरेनं जोखणार. सर्रकन अंगावर काटा आला. शिसारीच आली माझ्या बाईपणाची. मी साडीचा पदर घट्ट लपेटून घेते.
हे म्हणजे विंडो शॉपिंगच की. तिथे निदान वस्तू काचेच्या आड तरी असते. आणि त्या काचेआडच्या वस्तुला क्पोणी आपल्याला कसा पहातोय याच्म काहीच पडलेलं नसतं.
पण आपण स्वतःला वस्तु का समजतोय? आपणही ग्राहक आहोत की. वा हे छान मस्त आयडीया. शिर्‍यानं आपल्याला न्याहाळण्या ऐवजी आपणं त्याला न्याहाळायचं. जो काय नर्व्हसनेस यायचाय तो त्याला येवू देत. येस्स्स्स डन.... होकार नकार सांगायलाही दहावेला विचार केला पाहिजे त्याने.
;अग्न हा पण एक प्रोजेक्टच आहे की... त्या मेथडने जाऊ या. आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट चे प्रोजेक्ट घेतो. हा आयुष्याचा प्रोजेक्ट आहे. अगोदर प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट. त्या नंतर प्रोजेक्ट चार्टर म्हणजे कोणाचा रोल काय असणार, याची जंत्री, त्या नंतर प्रोजेक्ट प्लॅन . कोण कधी केंव्हा कुठे कसे ते. एक्झीक्यूशन, प्रोजेक्ट सुरू झाल्यानंतर . म्हणजे लग्न झाल्या नंतर. तेही तीन चार व्हेंडर्स मधून एक फायनल केल्यानंतर. मग….
हा हा हे भारीये. काय पण डोकं चाललंय. मी माझ्यावरच खुष झाले आहे. तो शिर्‍या की कोण आणि त्याच्या सोबत येणारे कोणकोण यांना फेस करायला मला सबळ कारण मिळालंय. नुसत्या एखद्या होकार नकारावर मला स्वतःला नाचवून घ्यायचे नाहिय्ये. आपल्याला जर शिर्‍या आवडला तर आपणच देवू की त्याला थेट होकार.
...….ऑ.. हे काय आपण असे लग्नाबद्दल एकदम इतके पॉझीटीव विचार का करायला लागलोय!लग्न हे काही अयुष्याची इतिकर्तव्यता नाही. पण लग्नामुळे आयुष्याला पूर्णत्व येते. जोडीदार असला की जगण्यात मजा येते. नांगराला सुद्धा बैलं जोडीनं असली तर नांगरट लवकर होते. एकटा बैल कंटाळतो. ... मला सोनुमामाने गेल्या आठवड्यात दिलेलं प्रवचन आठवलं. तो म्हणजे ना भन्नाटच आहे. कुठलंही उदाहरण कुठही देतो. पक्का वकील आहे. मला मघाचं ते बाबू मोशाय हम सब रंग मंच की कठपुतलीया है जिसकी डोर उपरवाले के हाथ मे है. हे वाक्य बदलून मिलॉर्ड हम सब खेतमे नांगरनेवाले बैल है जिनकी डोर शेतकरी के हाथ मे है असं म्हणावसं वाटतंय.
... अफाट माणूस आहे हा सोनुमामा. मी आणि तो अजून न भेटलेला शिर्‍या बैलजोडी होऊन शेतात नांगरतोय असं डोळ्यापुढे येतयं. शिर्‍याच्या गळ्यात लोढण्याऐवजी झोडीअ‍ॅकचा सिल्कचा टाय आहे. माझ्या गळ्यात..... हा हा ह. आपलं डोकं कुठच्या कुठे उड्या मारतंय. हे आईला सांगितलं ना तर ती एकाच्या ऐवजी दोन्ही हात कपाळावर मारून घेईल आणि मग गंभीर होऊन विचारेल " लहानपणी तुझी टाळू भरायला मी खोबरेलतेलाऐवजी कय अवापरलं होतं कोण जाणे! कुठे पण चालतं तुझ्म डोकं."
" डिंग डाँग…" बेलचा आवाज आला. वाजले वाटते पाच. इतकी पक्की वेळ पाळणारा शिर्‍या ग्रेटच म्हणायला हवा. मी कानोसा घेते. " या या या" बाबाचा आवाज " घर सापडायला काही त्रास तर झाला नाही ना" हे वाक्य मी म्हणायचं ठरवलं होतं. बाबा का म्हणतोय! प्रोजेक्ट कॉऑर्डिनेशन नीट व्हायला हवं." विनायकराव नाही आले" बाबा कोणाला तरी विचारतोय.
"नाही त्यांना अचानक...…" एक मस्त हरीश भीमाणी सारखा घनगंभीर आवाज उत्तर देतो. पोटात गुदगुल्या होतात या आवाजाने.
क्रमशः

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Sep 2019 - 9:07 am | प्रचेतस

बढिया एकदम.

सर्व प्रसंग जीवंत केलेत तुम्ही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2019 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजूभौचं लेखन एका लयीत आणि सुंदर असतं.
वाचतोय.

-दिलीप बिरुटे

पलाश's picture

19 Sep 2019 - 9:48 am | पलाश

पहिला भाग आवडला आहेच.
त्या मुलीविषयी चालू फॅशनप्रमाणे नकारात्मक न होताही वाचकांपर्यंत वास्तव व विनोद पोचतो आहे. या भागाचं हे मोठंच यश आहे. मालिका उत्तम चालली आहे.

यशोधरा's picture

19 Sep 2019 - 9:57 am | यशोधरा

सुरेख लिहिताय विजुभाऊ. नेहमीप्रमाणेच.

श्वेता२४'s picture

19 Sep 2019 - 10:58 am | श्वेता२४

ही मालिकाही सुरेख चालली आहे. शिऱ्या कसा असेल याची उत्सुकता आहे. :))

नि३सोलपुरकर's picture

19 Sep 2019 - 11:47 am | नि३सोलपुरकर

मिलॉर्ड हम सब खेतमे नांगरनेवाले बैल है जिनकी डोर शेतकरी के हाथ मे है ... हा हा हा मजा आ गया विजुभाऊ .

और आन दो .

नांगराला जुंपलेला बैल.
नि३

जॉनविक्क's picture

19 Sep 2019 - 12:22 pm | जॉनविक्क

पुभाप्र.

पद्मावति's picture

19 Sep 2019 - 1:37 pm | पद्मावति

मस्तंच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2019 - 3:41 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचल्यावर लेखक नक्की विजुभाउ आहे का विजुभाभी आहे असा प्रश्ण पडला आहे.
पैजारबुवा

स्वधर्म's picture

19 Sep 2019 - 5:14 pm | स्वधर्म

उत्कंठा वाढली अाहे. नवरदेवाला लवकर पाठवा.

सुधीर कांदळकर's picture

19 Sep 2019 - 7:04 pm | सुधीर कांदळकर

झ्कास लय आणि ओघवते कथन. टॉमबॉय बरीच आकर्षक दिसतेय. अगदी डोळ्यांसमोर उभी राहिली. मजा आली.

मुख्य स्टेकहोल्डरची वाट पाआतोय.

धन्यवाद.

नाखु's picture

19 Sep 2019 - 10:36 pm | नाखु

शिर्याबदद्लची उत्सुकता वाढली आहे.

कांदा पोहे आणि उपमा देणे घेणे अनुभवी वाचकांची पत्रेवाला नाखु

विजुभाऊ's picture

20 Sep 2019 - 8:18 am | विजुभाऊ

धन्यवाद
पु भा प्र http://misalpav.com/node/45333

संजय पाटिल's picture

20 Sep 2019 - 5:36 pm | संजय पाटिल

मस्तच हाही भाग!!!