अंधानुकरण

मायमराठी's picture
मायमराठी in जनातलं, मनातलं
10 Aug 2019 - 10:23 am

"अंधानुकरण"

काही वर्षांपूर्वी पाहिलेला एक व्हिडिओ आज पुन्हा बघायला मिळाला, हेच निमित्त. आंधळा माणूस इंग्रजीमध्ये क्रिकेट समालोचन करतो, एवढंच नव्हे तर गर्दीचा आवाज हुबेहूब काढतो. सरावलेला समालोचक असावा अशी शब्दफेकीची शैली. " हे कसं जमवलं? " असं विचारलं असता म्हणतो की रेडिओ व टिव्ही ऐकून ऐकूनच शिकलो, इंग्रजी येत नाही त्यामुळे चूका होण्याची शक्यता आहे. हे सांगताना थोडासा ओशाळल्यासारखा हसतो.
असंच एकदा एका सभेनंतर पांढरी काठी टेकवत टेकवत जाणाऱ्या व्यक्तीला पाहिले. त्याच्या अंगाखांद्यावरून सुटलेल्या सभेची गर्दी ओसांडत होती. न राहवल्याने त्यांच्याशी ओळख करून घेऊन त्यांना घरी सोडतो असं म्हणालो. सगळी पांगापांग झाल्यावर बाईक काढून त्यांना मागे घेऊन निघालो. वाटेत बोलत बोलता अनेकवेळा 'बघितले', 'पाहिले' असे उल्लेख येत होते, पुन्हा पुन्हा जीभ चावून घेत होतो. त्यांच्या घराच्या भागांत शिरल्यावर मला कळेना आता नक्की त्यांचे घर कोणते? तसं त्यांना विचारल्यावर म्हणाले," अजून थोडे पुढे जा, मग मी तुम्हाला दाखवतो." या वाक्याने वास्तविक मला ब्रह्माण्डच वगैरे दिसायला हवे होते. थोडं पुढे गेल्यावर त्यांनी सांगितले डावीकडे निळं गेट असेल तिथे गाडी थांबवा. उतरून माझ्यापुढे जाऊन पहिल्या मजल्यावर पोचले, मी नको नको म्हणत असताना त्यांच्या पत्नीला चहा करायला सांगितला. निघताना दारात निरोप घेताना " सर, माझ्यामुळे तुमचा बराच वेळ गेला, मुद्दामून वरती येऊन चहा घेतलात, बरं वाटलं, धन्यवाद." असं म्हणून हसले. तोपर्यंत माझे स्वरयंत्र फितूर झाले होते.
डोंबिवलीला रहात असताना आमच्या समोर एक सर रहायचे, ते चर्चगेटला एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. सकाळी ८ ते ८:१०च्या दरम्यान घराला कुलूप लावून बाहेर पडायचे. नाक्यावर रिक्षापर्यंत सोडायला चाळीतले कोण ना कोणी जायचे. कधी कधी मीही जायचो. उजवा हातात घेता घेता "सर, चला आज तुम्हाला मी सोडतो." असं म्हणा अगर काहीही न बोलता अलगद हात हातात घेतला तरी "अरे वा! आज अभिजीत आहे जोडीला..." हे ठरलेलंच सोबत अगदी नुकत्याच उमललेल्या फुलासारखं दिलखुलास हसणं. रिक्षात ते बसले की "बाळा, थँक्स बरं का " त्या वयात तसं काहीच अंगावर यायचं नाही.
दापोलीत एकदा स्नेहज्योती शाळेतल्या अंध मुलांचा गायन सराव चालू होता. सहज डोकवायला म्हणून गेलो आणि त्या मुलांचे हसरे, ताजेतवाने चेहरे, लख्ख , टकटकीत डोळे, तयार हात व गळे बघून ऐकून माझी गोची व्हावी, हे कळेना. इकडे आमचे डोळे पाझरू लागले. मागच्या मागेच पळालो.
आमचा एक मित्र स्नेहज्योती शाळेत काही त्या मुलांकरता काही वस्तू, काही औषधे घेऊन गेला होता. तेव्हाचा त्याचा अनुभव. तो मुलांना म्हणाला," चला रे पोरांनो, तुम्हाला सगळ्यांना गाडीत बसवून फिरवून आणतो." त्यावर त्यातील एक मुलगी म्हणाली," काका, आम्हाला गाडी ढकलायला द्याल का?" त्यावर महाशय थोडे हसून " कशाला ढकलायताय गाडी, मस्तपैकी आत बसून फिरा की. खिडकीतून बाहेरचा गार वारा खा, झाडं बघा..." ती मुलगी हसत हसत त्याला थांबवत म्हणाली," अहो काका, आम्हाला आत काय आणि बाहेर काय, काय फरक पडतो राहिला प्रश्न बाहेर बघायचा आम्हाला कुठं काय दिसतंय. तेव्हा आम्हाला गाडीला हात लावून मागे पुढे करू द्या, तेवढी मजा बस्स झाली."
त्यांचा गाडीचा खेळ खेळून मुलं आनंदाने त्यांच्या शाळेत गेली आणि गाडीचा मालक थोडं पुढे जाऊन गाडी बाजूला लावून ओक्साबोक्शी रडला.
परिपूर्णता लाभलेले आयुष्य असं शापित, विस्कटलेले वाटणारे, कायम अपरिपूर्णतेच्या आश्रयाला आलेल्या अश्या वेगळ्याच वळणावरच्या आयुष्याला बघते तेव्हा त्याची अशी तारांबळ होत असावी. प्रत्येकाच्या भावनांचे नळ कमीजास्त वाहत असतीलही. तरीही तिथं थबकायला होतं, घुटमळायला होतं. बिनाउत्तरांचे निर्लज्ज प्रश्न सभोवती पिंगा घालू लागतात. कारणमीमांसा, कार्यकारणभाव, कर्मगती आणि काय काय अशी व्रात्य कार्टी हैराण करतात.
त्यांच्यातलं उणेपण खिजवतं, डिवचतं आपल्याला, ते त्यांचं हसणं सहन नाही होत. त्यांच्यातला आशावाद फार क्रूर वाटतो, अंधारात अचानक समोर येऊन दचकवणाऱ्या प्राण्यासारखा. त्यांच्याकडून आभार घेणं परवडंत नाही. खरंच खूप महाग असतात ते, कमीत कमी एखाददोन रात्री द्याव्या लागतात त्यासाठी.
बुद्धीचा, स्वत्त्वाचा सगळा दिमाख उतरतो. मन पावसात भिजून गार पडलेल्या, आईपासून तुटलेल्या , एका कुत्र्याच्या पिलासारखं चिपाड होऊन कोपऱ्यात बसतं. अभिमानाची पुटं टपाटप गळतात, गांगरतात की कोणत्या भिंतीला लागलो होतो? स्वार्थ संकटात येतो आणि कधीही न बघता येणाऱ्याकडे एकटक बघत बसतो. एकेक अस्त्र गळू लागतात, दांभिकतेच्या अर्गला तुटून पडतात. शिल्लक राहते नुसतेच अस्तित्व , दोनचार श्वासांत अडकवलेले, ग्रहगोलांच्या सोबत हिंदकळणारे, भरतीत ओले होत, ओहोटीत कोरडे पडत पडत त्याच क्षणभंगुर समुद्रकिनाऱ्यावर अमर्याद काळ सत्ता गाजवायचे मनसुबे रचणाऱ्या रिकाम्या शिंपल्यासारखे. आयुष्याचा सप्तरंगी डोळा स्पष्टपणे दाखवून देतो की फारसं काही नवीन दिसणार नाही. जे आहे ते जुनेच आहे, हे झाड, हे त्याचे खोड, ही त्याची पानं आणि असंच इतरही वैश्विक महितीवजा ज्ञान. हे काही स्वयंभू नव्हे, शास्त्रज्ञ प्रयोग करून चूकत चूकत, ठेचकाळत आंधळेपणी प्रयोग करत राहतात आणि आमच्यासारखी डोळस दुनिया वाट बघत बसते की कधी कधी एकदा ते यश पुस्तकात येईल आणि मग त्याचा अभ्यास करता येईल. डोळस माणसाला परिणाम दिसतो, पराभव जाणवतो हा त्याच्या दृष्टीचा फायदा (?). शिवाजी राजांनी काही तरुण मंडळी गोळा केली खरी, शपथ घेतली पुढे काय..? अंधारात उडी आणि मनगटावरचा विश्वास.
आठदहा काड्यांनी बांधलेल्या घराला उघड्या डोळ्यांनी लावलेल्या कुलुपावरसुद्धा आमचा विश्वास नसतो. चार वेळा खालती वरती खेचून बघणारे आम्हीच खरे डोळस. एरवी एक जीवच तेवढा गमवायला घेऊन सिंहगड जिंकायला गेलेला तानाजी त्याच्या घराला कोणते कुलूप लावत होता? तो आंधळाच म्हणायचा. मायेने माखलेले डोळे फक्त त्यांना जमेल तेवढेच दाखवत असावेत. त्याच्या पलीकडील दुनिया आकळायला त्यांच्यात जादू नाही. आपल्याला दिसतं ते त्यांना नाही आणि त्यांना दिसतं, जाणवतं ते आपल्याला कळत नाही. दोघेही आंधळेच. विश्वव्यापक अंधाराला जन्मापासून खेळवणारे, त्याच्या गर्तेत स्वत:ला खुशाल झोकून देणारे, नियतीला वाकुल्या दाखवत आशेची किरणांनी इतरांचे डोळे प्रकाशमान करणाऱ्या अंधांचे अनुकरण करावे, असा नवीन अर्थ 'अंधानुकरण' या शब्दाचा घेतला तर काही गैर होईल का?

-अभिजीत श्रीहरी जोगळेकर

समाजविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

10 Aug 2019 - 1:06 pm | कुमार१

नियतीला वाकुल्या दाखवत आशेची किरणांनी इतरांचे डोळे प्रकाशमान करणाऱ्या अंधांचे अनुकरण करावे, असा नवीन अर्थ 'अंधानुकरण' या शब्दाचा घेतला तर काही गैर होईल का?

+११

टर्मीनेटर's picture

10 Aug 2019 - 1:35 pm | टर्मीनेटर

खूप छान लिहिलंय.
पुढील लेखनास शुभेच्छा!

मायमराठी's picture

10 Aug 2019 - 2:11 pm | मायमराठी

खूप खूप आभार

सध्याच्या रणधुमाळीत काहीतरी सामाजिक किंवा राजकीय धागा असावा म्हणुन उघडला तर, एकदम डोळे पाणावलेत कि राव.
मस्त लिहीले आहे. लीहीत रहा
पुलेशु

नाखु's picture

10 Aug 2019 - 5:59 pm | नाखु

बरं झालं धागा उघडला गेला
नाहीतर एक सुंदर धागा न वाचता तसाच राहिला असता

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2019 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहिले आहे. लिहीत रहा, वाचायला आवडेल.

जॉनविक्क's picture

10 Aug 2019 - 3:11 pm | जॉनविक्क

असे लिखाण इथे आहे म्हणूनच इथं येतो.
प्रत्येक शब्दनशब्द मौल्यवान.
_/\_

जालिम लोशन's picture

10 Aug 2019 - 3:40 pm | जालिम लोशन

सुरेख

भंकस बाबा's picture

10 Aug 2019 - 3:48 pm | भंकस बाबा

लिहित रहा

उगा काहितरीच's picture

10 Aug 2019 - 5:19 pm | उगा काहितरीच

शिर्षक सोडलं तर सगळा लेख आवडला.

सुमो's picture

10 Aug 2019 - 6:43 pm | सुमो

लेखन...

आवडलं.

प्रमोद देर्देकर's picture

10 Aug 2019 - 6:46 pm | प्रमोद देर्देकर

खूप छान लेखन.
खर्या अर्थाने डॊळे उघडले.

यशोधरा's picture

10 Aug 2019 - 6:59 pm | यशोधरा

सुरेख लिहिलंय.

राघव's picture

10 Aug 2019 - 7:01 pm | राघव

खूप आवडले.
या धाग्यावरून एक जुनी ब्लाईंड डेट आठवली..
http://misalpav.com/node/37670

उत्तम अश्या जुन्या धाग्यांची पोतडी उघडल्याबद्दल आभार.
एक स्वाती ताईचा आणि त्याच्या प्रतिसादात सहज ह्यांचा.

चंद्र.शेखर's picture

14 Aug 2019 - 5:45 pm | चंद्र.शेखर

वाह वाह, हा लेख ही सुंदरच आहे.

नावातकायआहे's picture

10 Aug 2019 - 7:53 pm | नावातकायआहे

सुंदर. आवडले.
पुढील लेखनास शुभेच्छा!!

उपेक्षित's picture

10 Aug 2019 - 7:57 pm | उपेक्षित

भिडणार लिखाण होत

मायमराठी's picture

10 Aug 2019 - 8:44 pm | मायमराठी

सर्व मंडळींचे खूप खूप आभार. मी मायमराठीच्या पदराचे टोक धरून हिंडणारा एक वाटसरू. माय नेईल तिथे जायचे बाकी सर्व आपोआप पुरवते ती. आपणां सर्वांना माझ्या लिखाणात उत्तम सापडले असेल तर ते त्या माऊलीचेच व तिच्यावर संस्कार करणाऱ्या, प्रेम करणाऱ्या अनेक लेखकांचे, कवींचे जे तेवढेच वंदनीय आहेत. काही न्यून असेल तर ते पदर सोडून आगाऊपणे माझा मी हिंडल्यानेच. आपल्या सर्वांचे प्रेम व स्तुती मायमराठीच्या चरणी अर्पण.

nishapari's picture

10 Aug 2019 - 9:27 pm | nishapari

खरंच खूप सुंदर

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 5:07 am | तमराज किल्विष

रडवलंत.

उत्कृष्ट लेखन. असेच लिहीत राहा.

झेन's picture

11 Aug 2019 - 8:44 am | झेन

फार सुंदर लिहिले आहे, फक्त एक समस्या आहे हा लेख कुणाला वाचून दाखवू शकत नाही ते भावनांचे नळ मधेच गोची करतात.

सुधीर कांदळकर's picture

11 Aug 2019 - 12:13 pm | सुधीर कांदळकर

आवडलेच.,

जॉनविक्क यांचेशी सहमत.

अंध मुले दंगामस्ती वगैरे देखील करतात बरे का. माझी बहीण दहावीपर्यंतच्या वर्गांना शिकवणारी मास्तरीण होती. अंधांना शिकवायचे स्पेशलायझेशन आहे तिच्याकडे. ब्रेल वाचता पण येते तिला. अंध मुलांच्या व्रात्यपणाचे, खोड्यांचे भरपूर किस्से कौतुकाने सांगते. बहीण आहे पण सेवानिवृत्त झाली. तिच्या वर्गात साठसत्तरपैकी दहापंधरा मुले अंध असत. पण अजूनही हाक मारतांना टाळी वाजवून हाक मारते. त्यावरून आम्ही तिला खूप चिडवतो.

रीटा अरिया नावाची एक पारशीण त्यांच्या शाळेची मुख्याध्यापिका होती. तिची मातृभाषा गुजराथी. गुजराथीत ढेकणांना माकड म्हणतात. तिच्या लाकडी खुर्चीत एकदा ढेकूण झाले होते. खुर्चीत माकड आहेत असे ती एकदा म्हणाली. तेव्हा तिचे खुर्चीतले माकड असे त्या पोरांनी बारसे केले होते

सुरेख लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद. पुलेशु

सुधीरजी, प्रोत्साहनाबद्दल खूप खूप आभार. खुर्चीतले माकड हवं नामकरण आवडलं.

लई भारी's picture

14 Aug 2019 - 12:16 pm | लई भारी

भिडणार लिहिलंय. लिहीत राहा!
_/\_

मायमराठी's picture

14 Aug 2019 - 12:38 pm | मायमराठी

नक्की प्रयत्न करेन..

साबु's picture

14 Aug 2019 - 1:13 pm | साबु

भिडणार लिहिलंय. लिहीत राहा! +१

संजय पाटिल's picture

14 Aug 2019 - 3:38 pm | संजय पाटिल

फार सुंदर, मनाला भिडनारे लेखन!!!

चंद्र.शेखर's picture

14 Aug 2019 - 5:43 pm | चंद्र.शेखर

खुप छान झालाय लेख. आवडला.

अभिजीतजी , हा लेख मी तुम्ही पाठवल्यानंतर , काही दिवसांनी वाचला होता । आज तो परत एकदा सवडीने वाचला. प्रत्येक शब्द परत परत,, परत परत वाचला कधी अख्खे वाक्य संपूर्णपणे परत वाचले. कधी तीन चार वाक्ये मागे जाऊन ती तीन चार वाक्ये पुन्हा वाचली .

तुमच्या लेखनाचा मी निःसीम चाहता आहेच , परंतु त्याचबरोबर तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा पण मी चाहता आहे.
तुमच्या लेखनावरून काही गोष्टी किंवा या सर्व घटना तुमच्या जीवनात सत्य घडलेल्या आहेत असे वाटते.
ज्या आत्यंतिक तळमळीने आणि मनाच्या खोल अशा कुठल्यातरी कोपर्‍यातुन तुम्ही तुमच्या भावना अतिशय प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहात. आपण सारेच कितीतरी अंध व्यक्ती आजूबाजूला बघतो . परंतु आपल्यापैकी किती जण त्या अंध व्यक्तीच्या आयुष्यात किती समस्या असतील आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण त्याला कोणत्या प्रकारे सहकार्य करू शकतो याचा विचार केला आहे? सहानुभूती, अनुकंपा ही जी काही जीवनमूल्ये आहेत ती जागृत ठेवण्यासाठी अशा लेखांची समाजाला खरेच आवश्यकता आहे . कृपया लेखन करीत रहा आणि आम्हाला एका सरस दर्जेदार वाचनाचा आनंद देत रहा.