प्रस्थापितांचे सामाजिक भान

सर टोबी's picture
सर टोबी in जनातलं, मनातलं
12 Jul 2019 - 8:34 pm

या लेखात प्रस्थापित म्हणजे ज्यांनी जीवनातील अनिश्चितता संपवून स्थैर्य प्राप्त केले आहे असे सर्व जण. आता यातील प्रत्येक जण जाणीव पूर्वक समाजाकरिता काही करेलच असे नाही. परंतु ज्या देशात पदोपदी तुम्हाला जीवनाशी झगडणारे लोक दिसतात तेथे प्रस्थापितांकडे आपसूकच 'टॉर्च बेअरर' या अर्थाने बघितले जाते. आणि म्हणून त्यांचे सामाजिक भान असणे किंवा नसणे हे देखील इतरांसाठी महत्वाचे असते.

तर हा असा प्रस्थापित एकूणच समाजासाठी आणि देशासाठी कळत नकळत महत्वाची भूमिका बजावत असतो. या समाजाने जर पुरोगामी भूमिका पत्करली तर इतर समाज घटक देखील अशा गोष्टींचे अनुकरण करतात. असा हा प्रस्थापितांच्या गट आज आपल्याला पदोपदी प्रतिगामी, सनातनी भूमिका घेताना दिसतो. आषाढी एकादशीचेच उदाहरण घ्या. तीस वर्षांपूर्वी पुण्यात पालखी येण्याचा दिवस आणि आषाढीच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा विठ्ठलाची शासकीय पूजा करतानाच फोटो सोडला तर त्याची फारशी चर्चा नसायची. आज सलग तीन आठवडे सर्व आघाडीची वृत्तपत्रे, टेलिव्हिजन पालखीचा मागोवा घेतात. समाजधुरिणांना तर श्रावण भाद्रपदात जशी भटजींची चलती असते तशी चलती प्राप्त झालेली असते. वारीला नाही नाही ते गुणविशेष बहाल करून लेख पाडणे, त्यावर भाषणे देणे असा प्रकार चालतो. आज एकूणच आरोग्याची परिस्थिती बरी आहे नाही तर पूर्वी वारी म्हणजे पटकीची साथ पुढेपुढे घेऊन जाणारा माणसांचा जथा होता.

जुन्या वेडगळ चालीरीती पुन्हा एकदा घासून पुसून वर आणण्यात येत आहेत. एकदा एका प्रथितयश 'टीम बॉण्डिंग ' चा सोहळा पार पडणाऱ्या संस्थेत एक रात्र राहण्याचा योग्य आला. तेथील आय.आय.टी. प्रशिक्षित चालकांनी संध्याकाळी घंटीनाद करण्याच्या प्राचीन संस्कृतीचे आम्हाला वैज्ञानिक महत्व सांगितले ते असे कि देवघरात घंटीनाद केल्यामुळे डासांची अंडी फुटतात! अशाच प्रकारे 'पलंगतोड' ताकदीसाठी भिकबाळीला परत झळाळी प्राप्त झाली आहे.

व्रतवैकल्य, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान आणि त्या निमित्ताने वाढणारी सामाजिक दरी याचा जनू विसर पडल्यासारखी अवस्था झाली आहे. एवढा प्रचंड लोकसंख्येचा देश केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक सलोखा यांच्या बळावरच तगू शकतो पण समाज म्हणून आपली द्विधा मनःस्थिती आहे. मोठमोठे उत्सव साजरे करण्याआधीचे कवित्व आणि नंतरचा मनःस्ताप असे दोन परस्पर विरुद्ध अनुभव आपण आजकाल वारंवार घेत आहोत.

सध्या तरी, मी माझ्यापुरता हा विरोधाभास थांबविला आहे. घरात कोणत्याही प्रकारचे धार्मिक अवडंबर माजविले जाणार नाही याची मी काळजी घेतो. गणपतीला पत्री, दसऱ्याला आपटा, आंब्याच्या डहाळ्या यांना फाटा दिला आहे. संस्थळावरील अजून काही लोक यात सामील झाले तर नकळत एक चांगला बदल आपल्या आजूबाजूला होऊ शकतो एवढेच या लेखाचे प्रयोजन.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

12 Jul 2019 - 10:25 pm | जॉनविक्क

पहिला पॅराग्राफ आवडला. सहमत आहे. लिखाणाचा सूरही काहीसा पटतो.

शेवटचा पॅरा सत्यात उतरवायचा असेल तर आव्हान न्हवे तर स्वच्छ भारत सारखे स्ट्रॅटेजीक कॅम्पेनिंग आवश्यक आहे. जे इथून एकदम घडणे अशक्य.

श्रद्धा एकदम मोडीत काढणे मला पटत नाही त्याचे परिणाम बटरफ्लाय इफेक्ट प्रमाणे असतात.

जालिम लोशन's picture

12 Jul 2019 - 11:54 pm | जालिम लोशन

अध्यात्म आणी सामाजिक भान यात गल्लत करता आहात. निसर्गात कुठेही तुम्हाला charity सापडणार नाही.

नाखु's picture

20 Aug 2019 - 11:10 am | नाखु

वेगवेगळ्या तीन चार गोष्टी एकत्र करून झोडपायची लै जुनी फॅशन आहे मिपावर,एक लेखसम्राट यना महाशय यांचे सर्वोच्च नेते आहेत तेही "सिलेक्टिव रिडींग विथ ओन डान्सिंग"

या पंथाचे मिपा आद्य संस्थापकांपैकी एक आहेत.

परंपरा आणि धार्मिकता, सश्रद्ध आणि देवभोळा यात अजिबात गल्लत करण्यात तरबेज असलेल्या स"माजसेवका"ना ओळखणारा वाचकांची पत्रेवाला नाखु

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2019 - 11:33 am | प्रकाश घाटपांडे

आजचे मटा मधील त्यांचे पत्र वाचा.

नाखु's picture

20 Aug 2019 - 1:31 pm | नाखु

आणि म्हणूनच इथे प्रतिसादात मी उल्लेख केला आहे.

शब्दपिसोरा पुरविणाऱ्या व्याख्याते भोसले यांची निष्काम कर्मयोगी दुर्गा भागवत यांनी केलेली समीक्षा जरूर वाचा.

ज्यांना समाजसेवा करायचीच आहे ते मी नास्तिक आहे असा मागेपुढे लवाजमा घेऊन सांगत फिरत नाही.
प्रसिद्धी लोलुपता व हटवादीपणा या पातळीवर कुठलेही बोगस भोंदू बाबा आणि हे नास्तिक एकाच पातळीवर आहेत.

मटा वाचक नाखु बिनसुपारीवाला

प्रकाश घाटपांडे's picture

23 Aug 2019 - 8:48 am | प्रकाश घाटपांडे

खर आहे!

प्रसिद्धी लोलुपता व हटवादीपणा या पातळीवर कुठलेही बोगस भोंदू बाबा आणि हे नास्तिक एकाच पातळीवर आहेत.

अगदी रामबाण

जॉनविक्क's picture

23 Aug 2019 - 9:43 am | जॉनविक्क

माहितगार's picture

13 Jul 2019 - 11:45 am | माहितगार

आता पर्यंतच्या सर्व सामाजिक सुधारकांनी सर्वसामान्यांना समाज सुधारणा चळवळीत सहभागी करून घेतले असावे. त्यात अगदी वारकरी संप्रदायाच्या संतांचाही समावेश करता यावा. सामाजिक भानाचे ओझे केवळ तथाकथित प्रस्थापितांवरच असते की हि सर्व व्यक्ति आणि समाजास लागू पडणारी बाब आहे ? पहिली गल्लात शिर्षकातच होत नाहीए ना अशी साशंकता वाटते.

धागा लेखक महोदय अंधश्रद्धा आणि संस्कृती यांची गल्लत करत नाहीएत ना अशी दुसरी साशंकता वाटते. अंधश्रद्धा त्याज्य असाव्यात या बाबत दुमत नाही. पण अंधश्रद्धा मोडीत काढण्यासाठी संस्कृती मोडीत काढण्याची गरज असू शकते का ? हा माझा तिसरा आणि महत्वाचा प्रश्न आहे. मी अगदी ज्यात अंधश्रद्धा नाही अशा सर्वसाधारण रांगोळीसही (आपल्याच) लोकांना नाक मुरडताना अनुभवले आहे.

दुसरीकडे काम्य व्रतांचा निषेध करून मुर्तीपुजा जोपासणारे संत एकनाथ आहेत. भारतीय "वैचारीक दृष्ट्या प्रगल्भ" धर्मसंस्था वस्तुतः इच्छांवर विजय मिळवण्यासाठी मर्यादीत करण्यासाठी सुचवतात आणि इच्छा टाळल्यानंतर काम्यव्रतांना नकार दिल्या नंतर समानतेचा अंगिकार केल्यानंतर आणि महादेवाची खुलभर दुधाची कहाणी समजून घेतल्यानंतर भरीला व्यक्ती आणि पुस्तक पुजा नाकारल्यास अंधश्रद्धांचे अवडंबर बरेच कमी होऊ शकत असावे. सुधारणा अंगिकारत उत्क्रांत होत जाणारी भारतीय संस्कृती अभिमान आणि आनंदाने जगण्यास हरकत नसावी असे वाटते.

अर्थात आनंद साजरा करताना अगदी टोक गाठण्याची गरज नसावी पण सामाजिक भान असणेही गरजेचे असावे. एखाद्या छोट्या फुलाने होऊ शकणार्‍या स्वागता एवजी फुलांच्या गुलदस्त्यांचा अथवा हारांचा अगदीच मारा करणे किंवा सांस्कृतिक अंग म्हणून थोड्याश्या तेला आटोपता येणार्‍या दिव्यांएवजी बघा आम्ही किती दिवे जाळून रोषणाई केली एक तर करूच नका म्हणणे किंवा अतिरेक करणे या दोन्ही बाबी टोकाच्या असाव्यात.

लोकसंख्येच्या अतिरेकामुळे आपट्याच्या अथवा अंब्यांच्या झाटाच्या पानांवर येणारा ताण समजण्यासारखे आहे. असा ताण टाळण्यासाठी अंब्याच्या पानांचे तोरण मोजक्याच प्रमाणात बांधणे किंवा आपट्याची पाने मोजक्या लोकांना देऊनही टोके गाठण्याचे टाळलेतर सांस्कृतिक परंपरा चालूही ठेवता यावी आणि परंपरेच्या नावावर नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास होणारा अतीरेकही टाळता यावा

यशोधरा's picture

13 Jul 2019 - 12:07 pm | यशोधरा

चांगली पोस्ट.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jul 2019 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर विवेचन !

धागा लेखक महोदय अंधश्रद्धा आणि संस्कृती यांची गल्लत करत नाहीएत ना अशी दुसरी साशंकता वाटते. +१

आपला मुद्दा मांडताना कळत-नकळत वहावत गेल्यावर होते असे कधीकधी. :)

माहितगार's picture

13 Jul 2019 - 2:08 pm | माहितगार

आपल्या दोघांचे आभार

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2019 - 10:47 am | प्रकाश घाटपांडे

खर आहे. भारत एकाच वेळी तीन शतकात वावरतो आहे. त्यामुळे हा बँड खूप मोठा आहे.

माहितगार's picture

13 Jul 2019 - 12:06 pm | माहितगार

मोठमोठे उत्सव साजरे करण्याआधीचे कवित्व आणि नंतरचा मनःस्ताप असे दोन परस्पर विरुद्ध अनुभव आपण आजकाल वारंवार घेत आहोत.

मला वाटते केस टू केस बेसिस वर संबंधीत उत्सवा संबंधी अडचणी आणि मर्यादा लक्षात घेऊन, संबंध उत्सव बंद करण्याच्या अट्टाहासांपेक्षा सुयोग्य सुधारणा अंगिकारण्यावर भर असावा. धागा लेखकाने असे सरसकटीकरण करणारे बोलून कोड्यात टाकण्यापेक्षा प्रत्येक उत्सवाच्या अडचणींचीही चर्चा अधे मधे होतच असते त्या त्या चर्चा धाग्यातून सहभाग घेऊन आपली भूमिका अवश्य मांडावी आणि ज्या विषयावर धागा चर्चा निघालेल्या नाहीत त्यावर चर्चा धागाकाढून त्यावर चर्चा अवश्य करावी. आपल्या नाराजीस्तव संबंध संस्कृतीचा बळी देण्याचा आग्रहही धागा लेखक महोदयांचा नाही अशी आशा करता येऊ शकेल का ?

एवढा प्रचंड लोकसंख्येचा देश केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक सलोखा यांच्या बळावरच तगू शकतो पण समाज म्हणून आपली द्विधा मनःस्थिती आहे.

सांस्कृतिक जोपासना म्हणजे सामाजिक सलोख्यास तिलांजली हा निष्कर्ष धागा लेखक कशाच्या बळावर काढतात. भारतातील सामाजिक संघर्षांना बर्‍याचदा जातीय अथवा धार्मीक संघर्षांची धार असते हे खरे आहे. हे ही खरे आहे की जाती आणि धर्मांचे लोक सम्स्कृतीवर एकाधिकारशाही असल्याप्रमाणे वागताना दिसताता पण धर्म आणि संस्कृतीची गल्लत धर्मांध लोक करतात तर धर्मांधतेवर टिका करा. धर्मांधांशी दोनहात करता येत नाहीत म्हणून धर्म आणि संस्कृतीच्या सरमिसळीत आपणही सहभागी होऊन संस्कृतीच्या चांगल्या अंगांचाही बळी देण्यात कोणता शहाणपण आहे?

वैज्ञानिक दृष्टीकोणांशी किमान माझे आणि बहुधा उत्क्रांत होत जाणार्‍या भारतीय संस्कृतीचे कोणतेही दुमत होण्याचे कारण नसावे.

माहितगार's picture

13 Jul 2019 - 12:12 pm | माहितगार

व्रतवैकल्य, संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान आणि त्या निमित्ताने वाढणारी सामाजिक दरी याचा जनू विसर पडल्यासारखी अवस्था झाली आहे.

व्यक्तिगत पातळीवर पार पडणार्‍या व्रत वैकल्यांचा सामाजिक दरीशी काय संबंध असावा ? कदाचित लेखक महोदयांना सामुहीक स्वरुपाच्या व्रत वैकल्यांबद्दल म्हणायचे आहे का ? असेल तर नेमक्या कोणत्या ?

माझ्या साततत्याने उत्क्रांत होणार्‍या सुधारणांना वेळोवेळी सामावून घेणार्‍या सांस्कृतिक ठेव्याचा जाज्वल्य अभिमान आम्हाला का असू नये ? आमच्या साततत्याने उत्क्रांत होणार्‍या सुधारणांना वेळोवेळी सामावून घेणार्‍या सांस्कृतिक ठेव्याचा जाज्वल्य अभिमानाबद्दल चुकीचे प्रश्न कुणी उपस्थित केले तर आम्ही आमचा अभिमान अभिमानाने अब्जावधीपटीने वाढवतो आणि का वाढवू नये ?

माहितगार's picture

13 Jul 2019 - 12:41 pm | माहितगार

जुन्या वेडगळ चालीरीती पुन्हा एकदा घासून पुसून वर आणण्यात येत आहेत. एकदा एका प्रथितयश 'टीम बॉण्डिंग ' चा सोहळा पार पडणाऱ्या संस्थेत एक रात्र राहण्याचा योग्य आला. तेथील आय.आय.टी. प्रशिक्षित चालकांनी संध्याकाळी घंटीनाद करण्याच्या प्राचीन संस्कृतीचे आम्हाला वैज्ञानिक महत्व सांगितले ते असे कि देवघरात घंटीनाद केल्यामुळे डासांची अंडी फुटतात! अशाच प्रकारे 'पलंगतोड' ताकदीसाठी भिकबाळीला परत झळाळी प्राप्त झाली आहे.

मानवी स्वभाव लॉजिकलवर अवलंबून न रहाता इलॉजीकल तार्किक उणिवेचे समज का स्विकारतो हे एक न उमगलेले गूढ आहे. लॉजिकच्या विषयावर मागील धागा लेखातून लेखन झालेले असल्याने त्याचा दीर्घ पुर्न उल्लेखाचा मोह तुर्तास टाळतो.

भिकबाळीबाबत अथवा घंटीनादाबाबत अंधश्रद्धामय विधानांचे खंडण वैज्ञानिक प्रयोगांच्याद्वारे करता यावे ते अवश्य करावे. न कळत्या वयात बालकांच्या शरीरात टाळता येणारे विशेषतः इजा करणारे बदल करावेत का ? विशेषतः लैंगिक अवयवांनाही अंधश्रद्धेतून इजा पोहोचवल्या जातात आणि विशेषतः बाळ अंगावर दूध पितानाच्या काळात इजा पोहोचवणे बाळाच्या दूध पिण्यात बाधा आणणारे नाही का ? या विषयावर सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. पण कळत्या वयात स्वेच्छेने अलंकार परिधानाच्या इच्छेने नाक अथवा कान टोचून घेण्यात काही गैर असू शकते का?

घंटीनाद डासांची अंडी फोडण्यासाठी अथवा आजू बाजूच्या परीसरात ध्वनी प्रदुषण होईल असा भयंकर करू नये. पण घरच्या देवघरातल्या छोट्याश्या घंटीचा मधूर नाद करून मित्र परिवारास आरतीस बोलावणे टिम बाँडींगचे योग्य उदाहरण असू शकतेच ना?

सुधारणा अवश्य सुचवाव्यात , मी सुद्धा अगदी नास्तिकांचे पसायदान कसे असावे या बद्दल धागा चर्चा काढतो ते सुधारणाच्या इच्छेने. पण पसायदानातील किंवा सर्व आरत्यांमधील सर्वच टाकावू आहे असे कदाचित म्हणता येणार नाही. त्यातील चांगले घेऊन नव्या प्रार्थना लिहा नव्या आरत्या लिहा, वैज्ञानिक दृश्टीकोणही आणा; संस्कृतीची पूर्ण मुस्कटदाबी करण्याच्या आग्रहात काय पॉईंट आहे?

मानवी स्वभाव लॉजिकलवर अवलंबून न रहाता इलॉजीकल तार्किक उणिवेचे समज का स्विकारतो हे एक न उमगलेले गूढ आहे.

Because human race is far more emotional being than the intellectual one . It's our greatest weakness as well as strength too

माहितगार's picture

13 Jul 2019 - 1:06 pm | माहितगार

आषाढी एकादशीचेच उदाहरण घ्या. तीस वर्षांपूर्वी पुण्यात पालखी येण्याचा दिवस आणि आषाढीच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा विठ्ठलाची शासकीय पूजा करतानाच फोटो सोडला तर त्याची फारशी चर्चा नसायची. आज सलग तीन आठवडे सर्व आघाडीची वृत्तपत्रे, टेलिव्हिजन पालखीचा मागोवा घेतात. समाजधुरिणांना तर श्रावण भाद्रपदात जशी भटजींची चलती असते तशी चलती प्राप्त झालेली असते. वारीला नाही नाही ते गुणविशेष बहाल करून लेख पाडणे, त्यावर भाषणे देणे असा प्रकार चालतो. आज एकूणच आरोग्याची परिस्थिती बरी आहे नाही तर पूर्वी वारी म्हणजे पटकीची साथ पुढेपुढे घेऊन जाणारा माणसांचा जथा होता.

मी व्यक्तीशः गर्दीचा भोक्ता नाही, मी आरत्या फारश्या अटेंड केलेल्या नाहीत, रिच्युअलीस्टीक भागातील अंधश्रद्धा सोडली तर टिमबाँडींगचा मुद्दा लॉजीकली स्विकारणीय आहे. गर्दी प्रिय नाही कोणत्याही गर्दीत जात नाही तसा नित्या प्रमाणे मी या वर्षीही वारीत गेलेलो नाही पण मला वाटते की तरीही वारीची परंपरा मी समजून घेऊ शकतो.

आरोग्य आणि सुगोग्य गर्दी व्यवस्थापन केले, तर 'मुलांनी आईवडीलांची सेवा करावी ' हा आणि त्या निमीत्ताने अभंगातून होणारे काही चांगले संस्कार स्विकारण्यासाठी आणि टिम बाँडींगसाठी लोक वारीस जातात त्यात मला अयोग्य काही दिसत नाही. जिथपर्यंत अंधश्रद्धा निर्मुलन आणि समाज प्रबोधन आहे ते वारीत सहभागी होऊन करण्यास पुरेसा वाव असावा असा माझा समज किंवा गैरसमज आहे. माझा समज चुकीचा असल्यास चुभूदेघे, आणि शिक्षणपर आणि नव प्रबोधनात्मक अभंगांनाही वारीत वाव असावा पण अगदीच वारी नावाचा प्रकारच असू नये अशा टोकाच्या मताचा मी नाही.

माध्यमांना त्यांचा रिकामा वेळ कंटेंटने भरायचा असतो. माध्यमातून चुकीची माहिती प्रसारीत करणारे लोक पुढे दिसत असतील तर त्याचे कारण सुयोग्य माहिती मांडणार्‍यांची माध्यमातून कमतरता आहे. विरोधाकरता विरोध हि भूमिका न ठेवता एका सकारात्मक प्रबोधनाची बाजू लावून धरून नव समाज प्रबोधन कारांनी माध्यमातून अशावेळी अवश्य सहभाग घ्यावा. नुसती बोटे मोडू नयेत.

आषाढी एकादशीचेच उदाहरण घ्या

आषाढी एकादशीचा उपवास मी सोडून माझ्या परिवारातील इतर सदस्य करतात. आषाढी एकादशी असो वा इतर उपवास असोत ते कार्बोहायड्रेड आणि तेल युक्त खाण्यापेक्षा; फळे प्रोटीन युक्त कडधान्ये , बी-१२ यूक्त दूध मायक्रो न्युक्रीअंट आहार घेऊन करावा असा आग्रह माझे कुणी मानत नसले तरीही प्रत्येक परिचितास करतो - माझ्या मागच्या पंढरपूर ट्रिपेत बस मधील अनोळखी उपवास धारकासही मी तोच आग्रह केला होता. समाज सुधारणा लांबची प्रक्रीया असते. उपवास पद्धती बंद करण्यास सांगण्याची गरज नाही.

बटाटा, साबुदाणा, मिरची हे मुळचे भारतीय नसलेले पदार्थ येऊन उपवास पदार्थात बदल होऊ शकतात तर अधिक सुयोग्य बदल करण्याचा आग्रह समाज मानसात धरता येऊ शकतो. त्यासाठी संस्कृति बुडवण्याची आवश्य्कता मला समजत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Jul 2019 - 1:11 pm | प्रकाश घाटपांडे

तथाकथित का होईना पण धर्मनिरपेक्ष देशात 'शासकीय पूजा' हा प्रकार कसा काय असू शकतो याचे मला कोडे आहे.

माहितगार's picture

13 Jul 2019 - 2:07 pm | माहितगार

प्रश्न भारतीय राज्यघटना विचारवंतांच्या वैचारीक दृष्टीकोणातून आदर्श आहे का नाही हा नाही ती बर्‍यापैकी आदर्शच आणि काळाच्या पुढेच आहे.

याचा अर्थ ती जन स्वभावाशी जुळणारी होतीच असा होत नाही. प्रत्यक्ष जन-स्वभाव आणि आदर्श म्हणून रचली गेलेली राज्यघटना यातील किंबहूना विचारवंतांचे विचार आणि जनस्वभाव यातील तो गॅप आहे.

सर्व धर्मापासून दूरतेच्या भावापेक्षा सर्व-धर्मसमभाव हा परंपरेने भारतीय राज्यसंस्कृतीस अधिक जवळचा नाही का ? दुसरीकडे विज्ञान आणि त्या योगे होणारी नास्तिकतेचे प्रगती (चांगल्या अर्थाने) यांचा समन्वय राज्यकर्त्यांना साधावा लागणे समजण्यासारखे असावे.

अर्थात मतपेटीसाठी असलेले लोकानुनयाचे इतर मुद्द्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच असणार लोकशाहीत नेते लोकानुनय करणारच. समाज प्रबोधनाची पहिली जबाबदारी प्रबोधनकारांची असते. समाज त्याच्या स्वभावानुसार वर्तन करत असतो. असो.

प्रकाश घाटपांडे's picture

16 Jul 2019 - 12:59 pm | प्रकाश घाटपांडे

सर्व धर्मापासून दूरतेच्या भावापेक्षा सर्व-धर्मसमभाव हा परंपरेने भारतीय राज्यसंस्कृतीस अधिक जवळचा नाही का ? >>>> तटस्थतेला दूरता का म्हणाय्चे?

माहितगार's picture

13 Jul 2019 - 1:43 pm | माहितगार

तर हा असा प्रस्थापित एकूणच समाजासाठी आणि देशासाठी कळत नकळत महत्वाची भूमिका बजावत असतो. या समाजाने जर पुरोगामी भूमिका पत्करली तर इतर समाज घटक देखील अशा गोष्टींचे अनुकरण करतात. असा हा प्रस्थापितांच्या गट आज आपल्याला पदोपदी प्रतिगामी, सनातनी भूमिका घेताना दिसतो

मिपावर अरुण जोशींचा "लॉजीक म्हणजे काय ?" हा लॉजिक बद्दलच्या शुद्धत्वाचे धिंडवडे उडवू इच्छित लेख आहे, त्या लेखाच्या प्रतिसादातून मी इथल्या प्रमाणेच माझ्या साशंकताही नोंदवल्या आहेत तरीही त्यातील माहौलिक सत्याची संकल्पना, व्यक्ती आणि समाज धारणा कशा बनतात हे समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे असे वाटते.

आपल्या व्यवहारात आहे त्यास माहौलिक सत्य समजून व्यक्ति आणि समाजाचे रहाटगाडे धावत असते. त्या धावण्यात कुठे अडखळले तर तेवढ्यापुरती दुरुस्ती करून तो धावत असतो . धावण्याचे त्याचे उद्दीष्ट सहसा त्याचा स्वतःचा फायदा असतो, ज्या बदलांनी त्याचा स्वार्थ साधेल आणि अडखळले जाणार नाही असा विश्वास मिळेत तसे आणि तेवढेच बदल तो स्विकारत जातो. ऐकुन न ऐकल्यासारखे केले तरी पुढील पिढीत तो बदलणार असतो.

प्रत्येकाकडे एक काल्पनिक बाळ असते बाळाचे नाहू घातलेले पाणी फेकण्यास कोणाचीच हरकत नसण्याचे कारण नसते पण त्याचे काल्पनिक बाळ वाहून जाणार नाही याची त्याला काळजी असते. फार फार तर आपले काल्पनिक बाळ आणि नाहू घातलेले पाणी याबाबत संभ्रम असतो. व्यक्ति आणि समाज आपले काल्पनिक बाळ वाहून जाणार नाही याची आधी काळजी घेतात आणि त्यांचे बाळ आणि चांगले पाणी वाहून जाणार नाही याची खात्री मिळाल्या नंतरच ते खराब झालेले पाणी टाकू देतात.

लोकांच्या सांस्कृतिक अस्मितांवर सरसकट हमला केला तर लोक ते बाळ वाचवण्यासाठी धावून येतात पण समाज सुधारकांनी संयम दाखवून चांगले ते राखले जाणार आहे आणि केवळ दुषित पाण्याचीच विल्हेवाट लावली जाणार आहे याची खात्री दिली तर समाज बदल स्विकारून पुढे धावू लागतो पण चांगले राखण्याची खात्री देण्यात समाज सुधारक जेथे कमी पडतात तेथे समाज सनातनी भूमिकांकाना जोजावतो. माहौलिक सत्यावर जगणे हा तर कोणत्याही समाजाचा स्थायी भाव आहे. ज्यांना बदल घडवायचे आहेत त्यांनी तुमचे चांगले आहे त्यात बाधा येणार नाही हे आश्वासन देण्यात कमी पडून चालत नाही. आणि सध्याचे तथाकथीत समाज सुधारक त्यात कमी पडतात म्हणून दोष मी तथाकथीतांच्या तथाकथीत पणाला आधी देईन.

प्रस्थापित व्यक्ती आणि समाजाच्या व्यवहारातले 'माहैलिक सत्य' असते, प्रस्थापित व्यक्ती आणि समाज = 'माहैलिक सत्य' नव्हे त्या दोन्हीत गल्लत करण्याचे कारण नाही. आपल्या फायद्याबाबत विश्वास वाटला तर लोक अनुकरण करतात, बदल स्विकारतात. अनुकरण प्रस्थापित आणि सर्वसामान्य एकमेकांचे करत असतात ते फायद्याच्या गुणोत्तरावर अवलंबून असते.. आणि फायद्याबाबत विश्वास निर्माण करण्यात समाज सुधारक कमी पडत असेल तर त्यात फायदा नसेल किंवा समाज सुधारकाचे पटवून देण्याचे कौशल्य कमी पडते आहे. असे मी म्हणेन.

माहितगार's picture

13 Jul 2019 - 1:54 pm | माहितगार

प्रस्थापितांकडे आपसूकच 'टॉर्च बेअरर' या अर्थाने बघितले जाते.

प्रस्थापित आकाशातून पडलेले नसतात, सर्व सामान्यातूनच स्थैर्य प्राप्त केले काही जण असतात. सर्वसामान्यांचेच गुणदोष दोन्हीही त्यांच्यात असतात. (गुण) दोषयुक्त प्रस्थापित टॉर्च बिअरर कसे असू शकतील ? टॉर्च बिअरर असण्याची पहिली जबाबदारी समाज सुधारकांची स्वतःचीच असते. स्वतःला समाजात विश्वास निर्माण करण्यात अपयश आले की समाजाच्या एखाद्या गटाला लक्ष करून खापर फोडले हे तथाकथित समाज सुधारकांनी टाळावयास हवे.

आपल्या दुषित पाणी टाकून देण्याच्या आग्रहात समाजाच्या सांस्कृतिक चांगल्या अंगाचे बाळ टाकून दिले जात नाही , खर्‍या दुषित पाण्यास टाकल्याने व्यक्ति आणि समाजाचा कसा फायदा आहे हे सांगण्याची समन्यायी वृत्तीने विश्वास संपादन करण्याची आणि त्यासाठी स्वतःतील तथाकथितपणास तिलांजली देण्याची पहिली जबाबदारी समाज सुद्धारकांची स्वतःची असते किंवा कसे

जालिम लोशन's picture

13 Jul 2019 - 3:11 pm | जालिम लोशन

माहितगार साहेबांचा धागा समतोल, मुद्देसुद, आणी पुर्वग्रहद्वेषित नसलेला आहे. मुळ धागालेखक हे गोधळलेले व पुर्वग्रह असलेल्या विचारसरणीतुन आलेल्या विचारवंताच्या? लेखांनी प्रभावीत झालेले असावेत. काल्पनिक शत्रुंशी बहुतेक त्यांचा लढा असावा.

Rajesh188's picture

17 Jul 2019 - 11:43 am | Rajesh188

माहितगार
ह्यांनी लेखकाच्या सर्व प्रश्नांना सुयोग्य उत्तर दिली आहेत .
समाजाच्या एकाच घटकावर एकांगी टीका करण्या मुळे लोक
तथाकथित विचारवंत लोकांची कोणतीच मते ऐकून घेत नाहीत .
शिक्षित लोक जे सायन्स कोळून पिलेत ते सुद्धा संस्कृती रक्षण आणि संस्कृतीचा अभिमान बाळगतात .
आणि त्यात गैर काही नाही

संगणकनंद's picture

23 Aug 2019 - 10:26 am | संगणकनंद

ढ्याण्ग ढ्याण्ग ढडंक ढ्याण्ग टाय
ढ्याण्ग ढ्याण्ग ढडंक ढ्याण्ग टाय
ढ्याण्ग ढ्याण्ग ढडंक ढ्याण्ग ढ्याण्ग ढडंक ढ्याण्ग ढ्याण्ग ढडंक ढ्याण्ग टाय

- जून ते गणेश विसर्जन या काळात सन्ध्याकाळी ६ ते रात्री १० संस्कृतीचे ढोल बडवणारा संस्कृतीप्रेमी