सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. तसेच समाजात धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारं लिखाण आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

राधा पुन्हा निघाली..

Primary tabs

कलम's picture
कलम in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

राधा पुन्हा निघाली..

आयुष्य खर्च झाले कर्मास न्याय द्याया
कर्तव्यपूर्ती केली वचनांसवे दिलेल्या
दृष्टी अधू तरीही नजरेत आस वाहे
कान्हा तुझ्याचसाठी देहात प्राण आहे
शरीरात त्राण नाही, गात्रे शिथिल झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

कानांत रोज घुमती ते बासुरीचे सूर
स्वप्नांत पाहते ती मनमोहना स्वरूप
स्वर्गीय रासलीला धुंदीत आज वाहे
पटलावरी स्मृतींच्या अजुनी जिवंत आहे
क्षण ते पुन्हा जगाया, इच्छा अगम्य झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

ही द्वारका म्हणू की प्रतिस्वर्ग हाच आहे
अतिभव्य ते नजारे दृष्टीस दीपताहे
अजुनी तुझ्या स्मृतीत प्रतिमा तिची आहे ना
रमलास रे मुकुंदा तव राज्ञांसवे का
हृदयात स्पंदनांची गती का दुणावत आहे
थांबू निघून जाऊ मन संभ्रमात आहे
उठले तरंग हृदयी, प्रीती फितूर झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

संदेश धाडला की कितीदा तरी तुला जो
ये रे मनोहरा रे बघ समय थांबला तो
रवी आज क्रुद्ध व्हावा का आग ओकताहे
महालासमोरी राधा डोळ्यात प्राण आहे
हृदयात अश्रू वाहे, चक्षुकमले म्लान झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

घुमतो भुवनी पावा निःशब्द सूर बोले
जन बोलती अचंबे कान्हास काय झाले
का पामरा कळावे हे सूर अकस्मात
युगांसवे चाललेली ही आपुलीच प्रीत
डोळे मिटूनी राधा, मग मंत्रमुग्ध झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

असतील हेच कान्हा बघ खेळ प्राक्तनाचे
विधिलिखिती का नसावे अल्प क्षण मिलनाचे
मुखकमल जरी न दिसले तरी चित्तहर्ष वाटे
सहस्र प्रीतिसुमने डोळ्यांत प्रेम दाटे
शांती अनामिका का, आत्म्यास आज झाली
कान्हा तुला बघाया राधा पुन्हा निघाली..

H

दिवाळी अंक २०१८कविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Nov 2018 - 1:25 pm | यशोधरा

सुरेख!

कलम's picture

6 Nov 2018 - 2:27 pm | कलम

मनःपूर्वक धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2018 - 8:46 am | प्राची अश्विनी

खूप आवडली.

मित्रहो's picture

7 Nov 2018 - 11:13 pm | मित्रहो

सुरेख कविता

राधा पुन्हा निघाली.. हि कविता आहे राधेची. कृष्ण राधेला सोडून निघून गेल्यावर बरीच वर्षे राधेने आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. परंतु आता ती वृद्ध झाली आहे, तीचे मरण आता लवकरच येणार आहे आणि या जगातून निघून जाण्याआधी तिला एकदा कृष्णाला बघायचे आहे. त्यासाठीच ती एकटी द्वारकेला निघाली आहे. हि कविता आहे त्याच प्रसंगाची......

पद्मावति's picture

21 Nov 2018 - 2:11 am | पद्मावति

अतिशय सुरेख!

कलम's picture

21 Nov 2018 - 4:25 pm | कलम

मनःपूर्वक धन्यवाद

मदनबाण's picture

22 Nov 2018 - 9:45 pm | मदनबाण

सुंदर !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Na Ja (Official Video) :- Pav Dharia

कलम's picture

23 Nov 2018 - 9:36 am | कलम

खरं बघायचं झालं तर माझा genre कवितांचा. लहानपणापासून मी कविता करायचे. मध्ये अनेक वर्ष काही कारणांनी कविता लिहायचं बंद केलेलं होतं पण नुकतंच परत लिहायला सुरु केलं. पहिलीच कविता 'चंद्राचे मनोगत' मिसळपाववर प्रकाशित केली.

एकूणच पाहता, कविता वाचणारे वाचक फार कमीच. जेव्हा माझ्या एक दोन कविता टाकल्या तेव्हा असं जाणवलं कि फक्त माझ्याच नाही तर एकूणच सगळ्या कवींच्या/ कवियित्रीच्या कविता फार कमी वाचल्या जातात. जरी वाचल्या गेल्या तरी त्या पूर्णपणे शेवटपर्यंत वाचल्या जात नाहीत आणि जरी शेवट पर्यंत वाचल्या गेल्या तर त्यावर प्रतिसाद देणारे फारच कमी. एक क्षण वाटलं कि ह्या कवितेत साकारलेली गोष्ट एक कथा म्हणून सगळ्यांसमोर आणली असती तर ती जास्त लोकांनी वाचली असती. ह्या विचारातून माझ्या 'सूतक' ह्या कथेचा जन्म झाला.

आज रोज एखाद दुसरा प्रतिसाद ह्या कवितेवर येतोय आणि खूप बरं वाटतंय.
सगळ्यांना दिलेल्या प्रतिसांदाबद्दल मनापासून धन्यवाद.

ज्योति अळवणी's picture

12 Jan 2019 - 10:38 am | ज्योति अळवणी

अतिशय सुंदर कविता. योग्य शब्दात राधा साकारली आहे

ज्योति अळवणी's picture

12 Jan 2019 - 10:38 am | ज्योति अळवणी

अतिशय सुंदर कविता. योग्य शब्दात राधा साकारली आहे