सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


सहभागासाठी व प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Primary tabs

मार्गी's picture
मार्गी in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

सहभागासाठी व प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

सर्वांना नमस्कार.

नुकतंच मला जालना येथे झालेल्या योग संमेलनामध्ये 'योग प्रसाराची साधने' ह्या विषयावर बोलण्याचा योग आला. त्यासाठी तयारी करताना व नंतरही अनेक मुद्दे मनात आले. योग असेल किंवा अन्य कोणतीही विद्या, एखादा खेळ किंवा अगदी वेगळे क्षेत्र अशा संदर्भात प्रसारासाठी व सहभागासाठी अनेक साधने किंबहुना तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो, ह्या दिशेने विचार केला. तेव्हा लक्षात आलेल्या अनेक बाबी आपल्यासमोर ठेवत आहे.

प्रसाराचा विचार करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. पहिली गोष्ट अशी की, प्रसार हे काही उद्दिष्ट किंवा ऑब्जेक्टिव्ह असू शकत नाही. ते घडतं ते परिणाम किंवा आउटकम म्हणून. आणि खरा प्रसार हा सर्वांगीण अंगीकारातून होत असतो. जर आपण एखाद्या गोष्टीचा खरोखर पूर्ण अंगीकार केला असेल आणि आपल्या जीवनशैलीचा भाग ती गोष्ट बनली असेल, तर आपोआपच आपल्याद्वारे त्या गोष्टीचा प्रसार होतो. तो करावा असा लागत नाही. त्यामुळे 'अंगीकार' हे प्रसाराचं मुख्य सूत्र आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा मनापासून अंगीकार करतो, तेव्हा आपल्याकडून अनेक प्रकारे ती गोष्ट अगदी सहज रिफ्लेक्ट होते. जमेल ते साधन व माध्यम वापरून आपण तिचा प्रसारच करत असतो. प्रसाराबद्दल दुसरी गोष्ट अशी की, काही जण खूप आग्रहीपणे एखाद्या गोष्टीचा प्रसार करतात. एखाद्या कार्यक्रमाला लोकांना पकडून पकडून आणून बसवणं असेल किंवा सक्तीने मुलाला एखाद्या शिबिराला पाठवणं असेल. कदाचित काही जणांच्या बाबतीत असा सक्तीचा प्रसार किंवा सक्तीचा सहभाग उपयोगी पडतही असेल, पण प्रसाराच्या त्यापेक्षा सूक्ष्म व सहज पद्धती आहेत. मला तरी वाटतं की, प्रसार हा खूप अप्रत्यक्ष व विनम्र असावा. त्यामध्ये सहभाग न घेण्याचं स्वातंत्र्य व त्या स्वातंत्र्याचा आदर असावा. शिवाय प्रसाराच्या किंवा सहभागाच्या अनेक सुप्त पातळ्या असतात - एखादी व्यक्ती कशा प्रकारे व कधी सहभागी होईल हे सांगता येत नाही. कोणता धक्का कोणाला व कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

ह्या संदर्भात एका साधूची एक गोष्ट आठवते. एका साधूने आपल्या साधनेच्या अनुभूतींचं एक टिपण बनवलं होतं. एकदा त्याने त्याच्या शिष्याला सांगितलं की, गावात असा असा एक माणूस आहे, त्याला हे नेऊन दे आणि तो काय म्हणतो हे मला सांग. शिष्य ते टिपण घेऊन त्या माणसाकडे गेला. शिष्याने त्या माणसाला ते टिपण दाखवलं फक्त आणि त्या माणसाने रागाने ते दूर फेकून दिलं. शिष्य अगदीच दचकला. तितक्यात त्या माणसाची बायको तिथे आली व म्हणाली की, "हे काय करताय? इतकं रागाने फेकायची काय गरज होती? अगदी प्रेमाने बोलून ठेवून घ्यायचं होतं. नाही वाचायचं तर नका वाचू, पण फेकायचं कशाला?" शिष्याने हे ऐकलेलं त्या साधूला सांगितलं. शिष्य म्हणाला की, "तो माणूस अजिबात धार्मिक नाहीये, त्याउलट त्याची बायको अतिशय धार्मिक वाटली मला." त्यावर साधूने जे उत्तर दिलं, ते सहभाग किंवा प्रसार कसा होत असतो, हे लक्षात घेण्यासाठी अतिशय समर्पक आहे. साधू म्हणाला, "तुला जे वाटलं ते अगदी उलट आहे. धार्मिक वाटणारी त्याची बायको अजिबात धार्मिक नाहीये. कारण ती ते पुस्तक कधीच वाचणार नाही. पण त्या माणसाने ते इतक्या रागाने ते फेकलंय, तो नक्कीच धार्मिक आहे. कारण त्याचा क्रोध, त्याचा त्वेषच त्याला उद्या ते वाचायला भाग पाडेल. तो शांत राहूच शकणार नाही. बघ तू!"

मला लहानपणापासून अनेक वर्षं आई सारखी म्हणायची, पहाटे ऊठ आणि पळायला जा. मी कधीच गेलो नाही. कधीच तसं वाटलंही नाही. पण कालांतराने इतरांकडून अप्रत्यक्ष प्रेरणा घेऊन सायकलिंग सुरू केलं. हळूहळू ह्या वाटेवर आलो आणि एका दिवशी हिंमत करून धावायलाही सुरुवात केली! जेव्हा आग्रही प्रसार होता, तेव्हा मला कधीच वाटलं नाही. पण जेव्हा अप्रत्यक्ष व दूरचं अपील झालं, तेव्हा हळूहळू मन तिकडे वळलं.

सहभाग किंवा प्रसार हा असा बराचसा भूमिगत असतो. आपण आज विविध क्षेत्रांमध्ये आलो आहोत; एखादी कला किंवा खेळ किंवा विविध विद्या आपण आत्मसात केल्या आहेत. पण आजपासून सहा किंवा दहा वर्षांपूर्वी आपल्यापैकी किती जण ह्या क्षेत्रात - ह्या विषयात येतील, ह्याची आपण कल्पना तरी केली होती? ह्या संदर्भात काही गोष्टी खूप विचारात घेण्यासारख्या आहेत. माझ्याच अनुभवातली काही उदाहरणं सांगावीशी वाटतात. मला लहानपणापासून अनेक वर्षं आई सारखी म्हणायची, पहाटे ऊठ आणि पळायला जा. मी कधीच गेलो नाही. कधीच तसं वाटलंही नाही. पण कालांतराने इतरांकडून अप्रत्यक्ष प्रेरणा घेऊन सायकलिंग सुरू केलं. हळूहळू ह्या वाटेवर आलो आणि एका दिवशी हिंमत करून धावायलाही सुरुवात केली! जेव्हा आग्रही प्रसार होता, तेव्हा मला कधीच वाटलं नाही. पण जेव्हा अप्रत्यक्ष व दूरचं अपील झालं, तेव्हा हळूहळू मन तिकडे वळलं. त्यामुळे जर प्रत्यक्ष व आग्रही प्रसार असेल, तर अनेकदा बुद्धी व अहंकार मध्ये येतात व सहभागाला बाधा येते असं दिसतं. आग्रही प्रसार हा तर हिंसकही असतो. आणि हे अनेक पातळ्यांवर सत्य आहे. अमुक अमुक गोष्ट करू नको असं एखाद्याला सतत सांगणं एका अर्थाने ती गोष्ट करण्यासाठी दिलेलं उत्तेजन असतं. त्याउलट अजिबात विरोध न करता आहे तसं सोडून दिलं, तर उद्या कालांतराने ती व्यक्तीच स्वत: परिस्थिती बघू शकते व आतून तिला काय बरोबर आहे ते जाणवू शकतं. असो.

आज आपल्याला खूप चांगलं तंत्रज्ञान व तंत्रज्ञानाची साधनं उपलब्ध आहेत. जी गोष्ट आपल्याला आवडते, ती आपण अनेक प्रकारे लोकांशी शेअर करू शकतो. कदाचित काही जण ह्याला प्रसार म्हणणारही नाहीत. एका अर्थाने ते आपल्या व्यक्तिमत्त्वातून उमटणारं प्रतिबिंब असू शकेल. पण ही प्रक्रिया लक्षात घेताना एक मात्र विसरून चालणार नाही की, प्रसार हा आपल्याआधीपासून सुरू असतो. योगाच्या संदर्भात सांगायचं तर मी योगाकडे येण्याआधी इतर अनेक जण योगामध्ये असतात. मग कोणीतरी कधीतरी मला धक्का देतो. तिथेही मी विरोध करतो. नाही म्हणतो. मग कालांतराने परत कोणी धक्का देतो. तेव्हाही मी तयार होत नाही. पण मला तोपर्यंत काही गोष्टी समजलेल्या असतात. नंतर केव्हा तरी एखादं निमित्त होतं आणि मग मात्र मी योगाकडे वळतो. म्हणजे सहभाग किंवा प्रसार हा प्रवाहासारखा असतो. आधीची लाट पुढच्या लाटेला धक्का देते. आणि वेगळ्या शब्दांत सांगायचं तर ती ती विद्या विविध माध्यमांमधून स्वत:च स्वत:चा प्रसार करत असते. आपण फक्त असं माध्यम होण्याचा किंवा न होण्याचा निर्णय घेत असतो. आणि कधीही स्वत: प्रसार करणारे होऊ शकत नाही. कारण मुळातच आपल्याकडेही ही विद्या बाहेरूनच येत असते. ती माध्यम म्हणून आपल्याद्वारे (आपल्या माध्यमातून) दुसर्‍याला मिळू शकते, पुढे मात्र जाऊ शकते.

मुलीला शाळेच्या बसवर रिसीव्ह करताना वेटिंग टाईममध्ये मी तिच्या बसच्या स्थानापासून दोनशे मीटरच्या पट्ट्यामध्ये फास्ट वॉक करतो. बस येणारा रस्ता व बस जिथे थांबते ती जागा ही लक्षात घेऊन दोनशे मीटरचं लूप घेऊन जितका वेळ थांबावं लागेल, तितका वेळ फास्ट वॉक करतो. आणि वेळेआधी येत असल्यामुळे साधारणपणे २० मिनिटं रोज मिळतातच. त्यामध्ये दोन किलोमीटर मस्त चालणं होतं.

एखाद्या माणसाने मल्लखांब किंवा कुस्ती अशा क्रीडाप्रकारांचा अंगीकार केला असेल, तर त्या माणसाकडून तिचा प्रसार होतोच. आणि मग त्याने स्वत: तो प्रसार केलाय अशी त्या माणसाला जाणीवही होत नाही. कारण मुळातून आतून त्याला इतकं समाधान व इतका आनंद मिळालेला असतो की, तो वाटून घेतल्याशिवाय चैनच पडू शकत नाही. आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट इतकं समाधान व आनंद देते, तेव्हा आपोआपच आपल्याकडून त्या गोष्टीचा प्रसार होतो. एखादं फूल उमललं की आसमंत प्रसन्न होतो, त्यानुसार. आणखी एक व्यक्तिगत उदाहरण सांगायचं तर असं म्हणतात की, पहाटे फिरायला जाणं, व्यायाम करणं किंवा सायकलिंग/ रनिंग करणं हा व्यायाम तर असतोच, त्याबरोबर तो इतरांसाठी मेसेजही असतो. एक प्रकारचं अप्रत्यक्ष अपील असतं. कारण आपण रनिंग किंवा सायकलिंग करतो तेव्हा खूप लोक आपल्याला बघत असतात आणि त्यांची रिअ‍ॅक्शन जाणवण्यासारखी असते! किंवा मुलीला शाळेच्या बसवर रिसीव्ह करताना वेटिंग टाईममध्ये मी तिच्या बसच्या स्थानापासून दोनशे मीटरच्या पट्ट्यामध्ये फास्ट वॉक करतो. बस येणारा रस्ता व बस जिथे थांबते ती जागा ही लक्षात घेऊन दोनशे मीटरचं लूप घेऊन जितका वेळ थांबावं लागेल, तितका वेळ फास्ट वॉक करतो. आणि वेळेआधी येत असल्यामुळे साधारणपणे २० मिनिटं रोज मिळतातच. त्यामध्ये दोन किलोमीटर मस्त चालणं होतं. अर्थात हे करायची इच्छा तेव्हाच झाली, जेव्हा व्यायाम किंवा फिटनेस एक जीवनदृष्टी म्हणून अंगीकारला गेला, चालण्याचं महत्त्व नीट समजलं आणि जिथे संधी मिळेल तिथे असा छोटा व्यायाम करता येऊ शकतो, ही जाणीव झाली. मग फोनवर बोलता बोलता नुसतं बसण्यापेक्षा येरझारा मारणं किंवा लिफ्ट लक्ष ठेवून टाळणं, बसलो असताना दुसर्‍याला एखादी वस्तू दे म्हणून सांगण्याऐवजी स्वत: जाऊन ती घेणं अशा गोष्टीही आल्या. क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं तर जर बॅट्समनकडे दृष्टी व सजगता असेल, तर तो डिफेन्सिव्ह पुशनेसुद्धा सिंगल घेऊच शकतो. आणि इतर लोकांनाही हळूहळू ह्या गोष्टी जाणवतात. पहाटे रनिंग करताना आरामात चाललेले इतर लोक बघतात किंवा स्कूल बसची वाट बघत गप्पा मारणारे/ बसलेले पालकही बघत असतात. तेव्हा ज्यांच्यामध्ये बघण्याची दृष्टी असते; त्यांना ही जाणीव होते. आणि एका अर्थाने ते स्वत: काही व्यायाम करत नाही आहेत, ही जाणीवही होते. अगदी कमी लोकांमध्ये होत असेल, पण होत असते. त्यातून प्रेरणा घेऊन मनामध्ये एखादी गोष्ट करण्याचा भाव येणे, हासुद्धा एक प्रकारे प्रसारच आहे. कारण मनातल्या भावना किंवा विचार हे प्रत्यक्ष कृतीचे आधार असतात. विचार हा अर्धी कृती मानला जातो. आणि आपण प्रत्यक्ष एखादी कृती करतो किंवा एखाद्या उपक्रमामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतो, त्यापूर्वी सहभागाच्या अनेक अंडरग्राउंड पातळ्या ओलांडलेल्या असतात; मनामध्ये तो विचार / तो भाव पक्का झालेला असतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती व प्रकृतीनुसार कमी जास्त वेळही लागू शकतो.

आजच्या काळातील जीवनपद्धतीचा व साधनांचा विचार केला, तर असं शेअरिंग अनेक प्रकारे केलं जाऊ शकतं. त्या संदर्भात काही गोष्टींचा विचार करू या. दहा वर्षांपूर्वी लोक ज्या प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते, त्याहून अधिक वैविध्यपूर्ण प्रकारे आज एकमेकांशी जोडले गेले आहेत. शेअरिंगच्या विविध पद्धतींचा विचार करताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. तंत्रज्ञानाचा परिणाम अनेक प्रकारे होत असतो. पण अंतिमत: आपली समज, आपली सजगता आणि आपली दृष्टी कशी आहे, हे महत्त्वाचं ठरतं. आज तंत्रज्ञानामुळे माहितीचा विस्फोट झाला आहे. अक्षरश: कोणतीही आधुनिक कला - अगदी ओरिगामी ते स्वयंपाकापासून कोणतीही कला किंवा कौशल्य/ शास्त्र ह्याची माहिती आपल्याला उपलब्ध आहे. ज्याला खरंच एखादी गोष्ट शिकायची आहे किंवा अभ्यास करायचा आहे, त्याला आज हे शक्य आहे. पण माहितीच्या विस्फोटाचा दुसराही असा परिणाम झाला आहे की, असंख्य डिस्ट्रॅक्शन्स झालेली आहेत. सोशल मीडियाचा सतत मारा होत असल्यामुळे एखाद्या गोष्टीच्या खोलात शिरून बाकी ९९ गोष्टी बंद करून केवळ एका गोष्टीवर फोकस करण्याची‌ क्षमताच अनेकांच्या बाबतीत कमी झाली आहे. त्यामुळे आज शेअरिंगची विविध साधनं / प्रकार उपलब्ध असले तरी तिथेही तेच झालं आहे. त्यामुळे आपली समज - सजगता किती आहे, ह्यानुसार आपल्याला ह्या शेअरिंगच्या साधनांचा उपयोग होऊ शकतो.

उदाहरणार्थ, फेसबुक किंवा व्हॉट्स अ‍ॅप ह्या साधनांचा वापर अतिशय क्रिएटिव्ह प्रकारे केला जाऊ शकतो. आज नाशिकसारख्या शहरामध्ये अक्षरश: हजारो हौशी सायकलपटू दिसतात, ही एक प्रकारची क्रांती एका अर्थाने ह्या सोशल शेअरिंगमुळेच घडली आहे. मी स्वत: ट्रेकिंग, सायकलिंग व रनिंगकडे वळलो, ह्यामागे हे सोशल शेअरिंगच आहे. आणि आधी म्हणालो त्यानुसार हा प्रसाराचा किंवा सहभागाचा अप्रत्यक्ष व विनम्र प्रकार असतो. त्यात हळूहळू इतर लोक जोडले जातात. आज फेसबुकचा वापर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व संवाद करण्यासाठी जसा होतो, तसाच तो गैरसमज व संकुचितता निर्माण करणारे संदेश प्रसारित करण्यासाठीही केला जातोच. तेच व्हॉट्स अ‍ॅपच्या फॉरवर्डबद्दल आहे. उपयोगाच्या संदर्भात हे सोशल शेअरिंग इतकं परिणामकारक कसं ठरलं असेल असा विचार केला तर एक गोष्ट जाणवते. जेव्हा एखादा माणूस त्याच्या फिटनेसबद्दलची एखादी कृती पोस्ट करतो आणि आपण ती पोस्ट बघतो, तेव्हा आपल्याला जशी त्या माणसाच्या फिटनेस अ‍ॅक्टिव्हिटीची जाणीव होते, तशीच 'मी आज व्यायाम केला नाही,’ ही जाणीवही होते. आणि जर वारंवार अशा प्रकारचं शेअरिंग समोर येत गेलं तर आपोआप 'मी व्यायाम करत नाही’ ही जाणीवही वाढत जाते. त्यातून थोडी सजगता वाढते; मनात काही व्यायाम करण्याचा भाव रुजतो व वाढत जातो. दुर्लक्ष किती वेळेस करता येणार? आणि कॉन्शस मनाने दुर्लक्ष केलं तरी अशी गोष्ट सबकॉन्शस मनामध्ये शिरलेलीच असते. त्यातून हळूहळू अशा गोष्टीचा प्रसार होतो. अर्थात हे सगळं होत असताना योगाच्या भाषेमध्ये "काया स्थैर्यम्" केलेलेही लोक असतातच. कितीही शेअरिंग असेल, कितीही नवीन गोष्टी समोर येत असतील, तरी ते स्थिर आणि निश्चल (ढिम्मच) राहतात! पण ज्यांना थोडी तरी जाणीव आहे, समज आहे, ते हळूहळू का होईना, पण पुढे सरकतात.

अगदी दहा-पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत ज्या ज्या गोष्टींसाठी आपल्याला अक्षरश: अनेक दुकानांमध्ये जावं लागत होतं, त्या आपल्याला आज आपल्या मोबाइलमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. पण परत प्रश्न आपल्या सजगतेचा येतो. आपण मोबाईल नुसता फोटोसाठी, व्हिडिओज बघण्यासाठी, फॉरवर्डससाठी वापरणार की त्यातले विविध फीचर्स आपल्या स्वत:च्या कामासाठी व आपल्या पॅशनसाठी वापरणार, हे त्या त्या व्यक्तीच्या सजगतेवर अवलंबून असतं.

हेच शेअरिंग जर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे करायचं असेल, तर काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. प्रसाराप्रमाणे शेअरिंगसाठीही आधी अंगीकाराची गरज असते. जर अंगीकार केलेले काही जण असतील, तर ते निश्चितच त्यांचा आनंद व अनुभव शेअर करू शकतात. एक उदाहरण घेतो. समजा, एखाद्या कंपनीच्या एखाद्या विशिष्ट युनिटच्या एखाद्या टीममध्ये टीम लीडरची इच्छा आहे की, टीम मेंबर्सनी फिटनेसबद्दल सजग व्हावं. ह्यासाठी तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येऊ शकेल? अगदी सोप्या पद्धतीने हे शक्य आहे. तंत्रज्ञानाची ही कमाल आहे की, अतिशय प्रगत अशा सुविधा आपल्याला सोप्या प्रकारे उपलब्ध झालेल्या आहेत. अगदी दहा- पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत ज्या ज्या गोष्टींसाठी आपल्याला अक्षरश: अनेक दुकानांमध्ये जावं लागत होतं, त्या आपल्याला आज आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. पण परत प्रश्न आपल्या सजगतेचा येतो. आपण मोबाइल नुसता फोटोसाठी, व्हिडिओज बघण्यासाठी, फॉरवर्डससाठी वापरणार का त्यातले विविध फीचर्स आपल्या स्वत:च्या कामासाठी व आपल्या पॅशनसाठी वापरणार हे त्या त्या व्यक्तीच्या सजगतेवर अवलंबून असतं. तर एखाद्या कंपनीतल्या टीम लीडरला फिटनेसबद्दल इतरांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर तो काय करेल - एखादा व्हॉटस अ‍ॅप ग्रूप व फेसबूक फक्त फिटनेससाठी बनवेल. मग त्या ग्रूपवर जे अ‍ॅक्टिव्ह - फिटनेस उत्साही सदस्य असतील, ते आपले रोजचे अपडेट्स तिथे टाकतील. अगदी दोन जरी उत्साही व सजग सदस्य असतील, तरी ते दररोज तिथे व्यायामाचे किंवा झुंबा, डान्स, जिम अशा फिटनेस उपक्रमांचे अपडेट्स टाकू शकतील. हळूहळू ते बघून इतरांना प्रेरणा मिळेल. आता ह्यामध्ये ग्रूपवर अवांछित मजकूर येणं, अनावश्यक गोष्टी येणं व महत्त्वाच्या अपडेट्सकडे दुर्लक्ष केलं जाणं हेही होणार. त्यासाठी सजग सदस्यांना योग्य त्या संदेशांना रिप्लाय करून परत व्हिजिबल करावं लागेल. आणि अशाच प्रकारे फेसबुकवरचा ग्रूप उपयोगी पडू शकतो. फेसबुकच्या ग्रूपचे काही लाभ असे आहेत की, व्हॉट्स अ‍ॅपसारखं तिथे सहज फॉरवर्ड नाही करता येत. शिवाय मॉडरेटर ठेवता येतो. (पण मग मॉडरेशन करणं हे एक वेगळं काम होतं.) शिवाय फेसबुक ग्रूपवर मॅसेज आला तर त्याचं नोटीफिकेशन मेलवरही जातं व जास्त व्हिजिबिलिटी मिळते. शिवाय काही महत्त्वाचे मॅसेजेस असतील, तर त्या ग्रूपवर पिन्ड पोस्ट्स ठेवता येते, काही मार्गदर्शक मुद्दे नेहमीसाठी व्हिजिबल ठेवता येतात. एखाद्या संस्थेच्या फील्ड वर्कर्समध्ये रिपोर्टिंग व डॉक्युमेंटेशनचं कौशल्य वाढवण्यासाठी त्यांचा एखादा ग्रूप बनवून तिथे ते फील्ड वर्कर्स रोजच्या अनुभवांबद्दल चार ओळी लिहितील, अशी व्यवस्था करता येऊ शकते व तंत्रज्ञानाचा वापर करून कौशल्याचा प्रसार / सहभाग वाढवण्याचं असं एखादं उदाहरण ते असू शकतं.

केरळच्या आपत्तीमध्ये काम करणार्‍या मैत्री संस्थेला छोटी मदत केली आणि इतर लोकांनाही विचारावं म्हणून कोणालाही डायरेक्ट मेसेज न करता स्टेटस ठेवला की, 'मी केरळच्या मदत कार्यामध्ये सहभाग घेतला आहे. आपणही घेऊ शकता. जर इच्छा असेल तर कृपया मेसेज करावा, मी डिटेल्स देईन.' हा स्टेटस ५० जणांनी वाचला व एकाचं उत्तर आलं की, मी मदत करेन. आणि मदत करायचं तिच्याही लक्षात राहिलं नाही. मी नंतर सहज विचारलं, तेव्हा तिला आठवण आली व तिनेही तिथे मदत केली.

पण हे सगळं करत असताना, वापरणार्‍या लोकांची मानसिकताही बघितली पाहिजे. समाजामध्ये जर लोकांकडे बोलण्याचं कौशल्य ऐकण्याच्या कौशल्याच्या चौपट प्रमाणात असेल, तर लोक स्वत:चं बोलण्यासाठी (म्हणजे तेही इतरांकडचं उसनं व बरेचदा न वाचलेलंच फॉरवर्ड करण्यासाठी!) जास्त उत्सुक असतात व आलेले मेसेजेस वाचण्यासाठी ते फार कमी उत्सुक असतात. आणि हे खरं आहे की, ऐकण्याचं / ग्रहण करण्याचं कौशल्य बोलण्याच्या / सांगकामाच्या कौशल्यापेक्षा अधिक कठीण व म्हणून दुर्मीळ. त्यात तंत्रज्ञान सुंदर असलं तरी वापरणार्‍या लोकांच्या पातळीमुळे सोशल शेअरिंगमध्ये अनावश्यक / उथळ / बिनकामाच्या कंटेंटचाही सुळसुळाट होत असतो. उदाहरणार्थ, कृत्रिम किंवा सोशली करेक्ट वाढदिवस शुभेच्छा. एखाद्याचा वाढदिवस मनातून लक्षात ठेवून शुभेच्छा देण्याची गंमत इन्फॉर्म्ड वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये येतच नाही. पण दुर्दैवाने अशाच व अशा प्रकारच्या अनावश्यक गोष्टींसाठी हे तंत्रज्ञान जास्त वापरलं जातं. तेव्हा खरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो आपली जाणीव व समज वाढवण्याचा. आणि ही गोष्ट खूप हळूहळू होत जाते. आपण आपल्या पातळीवर एकच करू शकतो की, जे चांगलं‌ आहे, क्रिएटिव्ह आहे, ते शेअर करू शकतो. आणि हे तंत्रज्ञान किंवा असे फीचर्स वापरणं कदाचित कोणाला अवघड वाटेल. पण ते तसं नाहीये. प्रत्येक ठिकाणी हार्ड किंवा स्मार्ट वर्कचीही गरज नसते. अगदी साध्या गोष्टींमधूनही कधीकधी एखादा विषय समोर ठेवता येऊ शकतो. अगदी 'योग - ध्यान' लिहिलेल्या टी शर्टमुळेही एखादा माणूस विचारतो की, मला ध्यान करायचं आहे, कुठे शिकता येईल? किंवा व्हॉट्स अ‍ॅपमधला स्टेटस जास्त लोक वेगवेगळे फोटोज किंवा मनातल्या भावना / उद्वेग इत्यादी शेअर करण्यासाठी वापरतात. पण तिथे आपण फिटनेसचे अपडेटसही शेअर करू शकतो. व्यक्तिगत उदाहरण सांगायचं, तर दोन महिन्यांपूर्वी केरळच्या आपत्तीमध्ये काम करणार्‍या मैत्री संस्थेला छोटी मदत केली आणि इतर लोकांनाही विचारावं म्हणून कोणालाही डायरेक्ट मेसेज न करता स्टेटस ठेवला की, मी केरळच्या मदत कार्यामध्ये सहभाग घेतला आहे. आपणही घेऊ शकता. जर इच्छा असेल तर कृपया मेसेज करावा, मी डिटेल्स देईन. हा स्टेटस ५० जणांनी वाचला व एकीचं उत्तर आलं की, मी मदत करेन. आणि मदत करायचं तिच्याही लक्षात राहिलं नाही. मी नंतर सहज विचारलं तेव्हा तिला आठवण आली व तिनेही तिथे मदत केली. आता इथे असं वाटेल की, स्टेटस ठेवण्याचा विशेष काहीच उपयोग तर झाला नाही. किंवा अगदी थोडाच उपयोग झाला. पण ज्यांनी हा मेसेज नुसता वाचला होता, त्यांना माझं अपडेट जसं कळलं, तसं 'मी अशी मदत अजून केली नाहीय,’ हेही कळलं. अंडरग्राउंड सहभागाचं एक पाऊल ते असू शकतं. असो. जाता जाता हेही सांगेन की, अशी मदत करणं म्हणजे काही उदात्त बिदात्त गोष्ट नाहीय. तर आपण सर्व एकच आहोत ह्या दृष्टीने एका अर्थाने ही स्वत:ला केलेली मदत आहे. व्यापक 'स्व'च्या दृष्टीकोनातून केलेला हा स्वार्थच आहे.

शेवटी इतकंच म्हणेन की, ह्या गोष्टी काही अवघड अजिबात नाहीत. आळशी शरीर आणि फिट शरीर ह्यामध्ये जो फरक आहे, तोच फरक साधनांचा आळसाने केलेला वापर व अशा कामासाठी केलेला सक्रिय वापर ह्यामध्ये आहे. एखादा मिस्त्री ज्याप्रमाणे तुटलेल्या विटाही खुबीने वापरून भिंत बनवतो, एखादी गृहिणी तिच्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग करत असते - वेळ असेल तर स्वेटर विणते किंवा एखादा गायक प्रवासात असतानाही मनातल्या मनात रियाज करत असतो, तसंच हे अगदी रोजच्या आयुष्यात सहज शक्य आहे. आपल्याला ज्या गोष्टी मनापासून पटतात, महत्त्वाच्या वाटतात, त्या आपल्याला जी परिस्थिती उपलब्ध आहे, तिचा वापर करून समोर ठेवण्याची थोडीशी दृष्टी फक्त हवी. आणि आपण जी साधनं वापरतो, त्यांचा वापर डोळसपणे करता यायला हवा. असं झालं तर छोट्या छोट्या गोष्टीतून थेंबे थेंबे तळे साचे व्हायला वेळ लागत नाही. कारण वस्तुत: आपण सर्व काय किंवा सर्व जीवन काय, वरवर स्त्री-पुरुष, प्राणी-निर्जीव असे कितीही फरक असले, तरी एका प्रवाहाने मुळात जोडलेलो आहोतच, जसे -

बूँद-बूँद मिलने से बनता एक दरिया है
बूँद-बूँद सागर है वरना यह सागर क्या है
समझो इस पहेली को, बूँद हो अकेली तो
एक बूँद जैसे कुछ भी नहीं
हम औरों को छोड़े तो,
मूँह सबसे ही मोड़ें तो
तन्हा रह ना ज़ाए देखो हम कहीं
क्यों ना बने मिल के हम धारा

H

दिवाळी अंक २०१८मनोगत/अनुभव

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 8:10 pm | तुषार काळभोर

मनापासून आपलं काम करत राहावं, लोकांना वाटलं-पटलं तर प्रेरणा घेतील. काम आणि विचार चांगले असतील तर अजेंडा न राबवताही त्याचा प्रचार प्रसार होईलच.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 2:08 pm | टर्मीनेटर

+१

यशोधरा's picture

7 Nov 2018 - 9:26 am | यशोधरा

विचार आवडला.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2018 - 9:48 pm | मुक्त विहारि

विचारमंथन आवडले....

मार्गी's picture

10 Nov 2018 - 12:28 pm | मार्गी

सर्वांना धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Nov 2018 - 5:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत ! अंतर्गत उर्मी असल्याशिवाय कोणतीही गोष्ट सातत्याने करणे शक्य होत नाही.

भुजंगराव's picture

12 Nov 2018 - 6:43 pm | भुजंगराव

फार मोठा विचार अगदी साध्या सोप्या भाषेत सांगण्यात आला , अभिनंदन मार्गी जी , न आपल्या HIV जन जागृतीसाठी करत असलेल्या सायकलवरून भ्रमंती ला शुभेच्या

कंजूस's picture

12 Nov 2018 - 6:47 pm | कंजूस

छान मनोगत.

पद्मावति's picture

19 Nov 2018 - 12:26 pm | पद्मावति

सुंदर विचार. लेख आवडला.