डियर ममा..

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

डियर ममा..

डियर ममा,

आज बर्‍याच दिवसांनी मी तुला हे पत्र लिहीत आहे. जरासं खुट्ट वाजलं की फोन करणार्‍या आपल्या लेकीकडून चक्क पत्र आलंय, हे पाहून तुझ्या वर जाणार्‍या भुवया आताच मला दिसल्या आणि त्यांच्या खालच्या डोळ्यांत एक काळजीची लहरसुद्धा तरळताना दिसली मला! आहेच मुळी माझी मम्मी अशी... कशी? ते नाही नक्की सांगता येणार, पण नक्कीच 'वर्ल्ड्स बेस्ट'! ही ही ही!

ते राहू दे. तुझा विचार मनात आला की माझं असंच होतं बघ, मनातलं विसरायला होतं. तर मुख्य मुद्दा असा की, मी आज पत्र का लिहितेय? नाही माहीत. पण लिहावंसं वाटलं, लिहिलं. तुला काही सांगावंसं वाटलं, लिहिलं. समोर असताना तोंडातून शब्द बाहेर आले असते की नाही, माहीत नाही... बहुतेक नाहीच, म्हणून लिहिलं. तसं म्हणावं तर, फार मोठं काही घडलेलं नाही, पण म्हटलं तर घडलेलं आहे... आणि या पत्रात लिहिलेले मी तुला प्रत्यक्ष भेटीत सांगितलं असतं, तर माझ्या एखाद्या बेस्ट फ्रेंडसारखी, डोळे मिचकावून, चेहर्‍यावर मिश्कील हसू आणून, माझी जराशी टर उडवली असतीस... असं वाटत असूनही, लिहिलं. पण, तू तसं केल्यावर मी फुरंगुटून बसल्यावर, स्वतःचेच डोळे मिटून मला पोटाशी घेऊन, कुरवाळून, कपाळाचं चुंबन घेऊन झाल्यावर, माझ्या पोरीला आज असं काय झालं म्हणून काळजीने विचारपूस सुरू केली असतीस, याचीसुद्धा खातरी आहे.

हे सगळं मी अगोदर अनेकदा अनुभवलंय आणि आणखी एकदा अनुभवावं असं आज प्रकर्षाने वाटलं, हे मात्रं खरं. पण, आज आपल्यामध्ये हे हजारो किलोमीटरंचं दुष्ट अंतर आहे ना गं. आपली पुढची भेट होईतोवर किती तरी दिवस, महिने सरतील गं ममा. तितका वेळ काढणं मला अशक्य आहे. काही गोष्टी मनात खदखदायला लागल्या की इतकं कासावीस व्हायला होतं की त्या भडभडून बाहेर पडल्याशिवाय जीव थार्‍यावर येत नाही. तसंच काहीसं, म्हणून लिहिलं.

ते राहू दे. नाहीतर, मला काय सांगायचं आहे ते सांगायची ऊर्मीच नाहीशी होईल... या अगोदर अनेकदा ती अशीच उसळी मारून वर आली होती आणि विरून गेली, तशीच.

ममा, सातेक वर्ष झाली नाही का माझं लग्न होऊन? माझं लग्न यशस्वीच म्हणायला लागेल. खरंच, पीटरसारखा नवरा मिळायला नशीब असायला हवं. फार जीव आहे त्याचा माझ्यावर. लग्नाची पहिली दोन वर्षं कशी मोरपंख लावून उडून गेली ते समजलंच नाही. मग सोनपावलांनी मर्विन आला आणि त्याने आमचं जग पूर्णपणे बदलून टाकलं. त्या इवल्याश्या जिवाने आमच्या नात्यात नवीन गहिरे रंग भरले... त्याला नवा अर्थ दिला. एका वेगळ्याच जगाची ओळख करून दिली.

हा माझ्या काळजाचा तुकडा, आता पाच वर्षांचा झालाय. गेल्या महिन्यातल्या त्याच्या वाढदिवसाचे फोटो तुला व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवत होते तेव्हा "ग्रँम्मा का आली नाही माझ्या बर्थडेला? आता नको पाठवू तिला फोटो" असं म्हणत रुसून बसला होता. व्हिडिओ कॉलवर तू त्याच्या आवडीची छानशी भेट घेऊन लवकरच इथे यायचं प्रॉमिस दिलंस, तेव्हा कुठे रावसाहेबांचा पारा जरा खाली आला. नंतर माझ्याकडून त्याच्या आवडीचं होकीपोकी आइसक्रीम वसूल केलं, तेव्हा कुठे साहेबांचा मूड बरा झाला! असा आहे माझा मर्विन.

पीटर मनमोकळा, बेफिकीर, आपल्या आवडत्या गोष्टींवर जीव टाकणारा, आवडत्या माणसांना जीव लावणारा... त्यांना खूश करायचं मनात आलं तर खर्चाची, त्रासाची फिकीर न करता, वेळप्रसंगी त्यांना फरफटत ओढून घेऊन जाणारा! आणि त्याचबरोबर, एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर आरडाओरडा करत घर डोक्यावर घेणारा... पण थोड्या वेळात शांत होऊन, जरूर तर स्वतःकडे कमीपणा घेऊन, वातावरण हलकंफुलकं करणारा.

मर्विनचा स्वभाव पीटरच्या एकदम विरुद्ध. इवलंसं पिल्लू, पण बर्‍याचदा मोठ्या माणसांसारखा वागतो. फार हळवा, याची प्रत्येक गोष्ट आईने स्वत:हून ओळखून करायला हवी. नाहीतर स्वारी फुरंगटून बसणार, पण तक्रार नाही करणार. त्याचे डोळेच बरंच काही सांगतात. मला त्याच्या डोळ्यांची कधीकधी फार भीती वाटते. छोट्या छोट्या गोष्टींवरून ते इतके बदलतात की जणू जन्मभर केवळ सोसत असलेल्या माणसाचे डोळे! हा मला होणारा भास आहे का कोण जाणे. पण ममा, मला त्याच्या त्या डोळ्यांची फार भीती वाटते गं!

***

काल सकाळची वेळ. पीटर कंपनीत गेला होता. कधी नव्हे ते सकाळी सकाळीच माझं डोकं विलक्षण ठणकत होतं. बधीरपणे मी सकाळची कामं आटपत होते. मर्विनचं काय बिनसलं होतं कोण जाणे. त्याची नकारघंटा चालू होती... उठणार नाही, दात घासणार नाही, आंघोळ नको, रोज रोज दूध काय प्यायचं, एक ना अनेक. त्याचं कसंबसं आटपून त्याला ब्रेकफस्ट करायला बसवलं आणि मी परत किचनमध्ये गेले.

पाचच मिनिटं झाली असतील, काहीतरी पडून खळकन फुटण्याचा आवाज आला. दिवाणखान्यात जाऊन पाहिलं, तर माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. आमच्या दिवाणखान्याच्या कोपर्‍यात दिमाखाने उभी असणारी प्रेमी युगुलाची देखणी मूर्ती तुकडे होऊन फरशीवर विखुरली होती. आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त पीटरने आमच्या प्रेमाची खूण म्हणून आणलेली मूर्ती! ज्याची स्तुती करताना पीटरची जीभ थकत नसे असं देखणं डौलदार शिल्प! ममा गं, त्याचे तुकडे दिवाणखानाभर पसरले होते!

पीटर किती पझेसिव आहे हे मी तुला सांगायला नकोच. एखादी गोष्ट आवडली की तिच्यावर जीव टाकतो तो आणि तिला जरासा धक्का लागेल असा संशय आला तरी कासावीस होतो! मग ती त्याची बायको असो की आवडती मूर्ती. आता संध्याकाळी तो घरी आल्यावर कोणता युद्धप्रसंग उभा राहील, या धास्तीने माझ्या काळजात धस्स झालं! कमीत कमी तासभर तरी गोंधळ, आरडाओरडा होणार... मला आणि मर्विनला कुठे लपू आणि कुठे नाही असं होणार!

माझ्या डोक्यातली एक शीर अधिकच ठणकू लागल्याचं मला जाणवलं आणि मी मर्विनकडे वळले...

***

कोचावर पाय मुडपून, गुडघ्यांवर डोकं टेकवून, माझ्याकडे एकटक बघणार्‍या माझ्या काळजाच्या तुकड्याकडे पाहून भानावर आले आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. मर्विनवर मी हात उगारला? तो हात काही काळ सैतानाचा ताबेदार कसा झाला गं ममी? आयुष्यात पहिल्यांदा खाल्लेल्या माराचा अनुभव कसा असतो, ममा? तो अनुभव आम्हाला कधीच मिळाला नाही... तुझ्या वटारलेल्या डोळ्यांची जरबच आम्हा भावंडांसाठी पुरेशी होती. मग हे असं मी कसं करू शकले?

गोबर्‍या गालावर बोटांचे वळ उठूनही मर्विन जागचा हालला नव्हता. एवढंसं माझं पिल्लू, नेहमी त्याला कुरवाळणार्‍या माझ्या हाताच्या क्रूर स्पर्शाने त्याच्या शरीराचा जणू दगड बनवला होता. त्याच्या चेहर्‍याकडे फार काळ पाहणं मला मुश्कील झालं. अर्धा एक क्षणच त्याच्या नजरेला माझी नजर भिडली असेल, ममा. त्याचे ते डोळे... खोल, थंड, एकाकी, दुखावलेले. भीतीने माझं काळीज लक्कन हाललं. चटकन पुढे जाऊन मी त्याचा चेहरा माझ्या कुशीत लपवला... मी ते मायेनं केलं की त्याची नजर चुकवण्यासाठी? ममा, त्या डोळ्यांनी दिवसभर माझा पाठलाग करणं चालू ठेवलं होतं. मनाने त्या डोळ्यातल्या भावनांची सतत उजळणी करणं चालूच ठेवलं होतं.

मर्विनचे ते रुसलेले डोळे मला सर्रकन आठवऊ वर्षं मागे घेऊन गेले. कॉलेजचे फुलपाखरांचे पंख असलेले दिवस होते ते. हायस्कूलच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजमध्ये गेल्यावर जरासं बुजायलाच झालं होतं मला. पण, मैत्रिणींबरोबर धमाल करताना ती भीती कधी पळून गेली कळलंच नाही. तिथल्या मोकळ्याढाकळ्या वातावरणात, मैत्रिणींच्या घोळक्यात, काही मित्रही सहजपणे सामील झाले होते. अर्थातच, त्यात काही जगावेगळं नव्हतं आणि घरी आल्यावर मी तुला कॉलेजातली सगळी गंमत सांगत असेच. 'आमचं नातं केवळ आई-मुलीचं नाही तर बेस्ट फ्रेंडचंसुद्धा आहे' असं आपण दोघी सगळ्यांना मोठ्या अभिमानाने सांगतो, नाही का? तेव्हा, आता मी काय सांगणार आहे ते, लग्नाअगोदरच्या माझ्या प्रत्येक क्षणावर हक्क असलेल्या तुला, जरासं धक्कादायक वाटेल... कदाचित. म्हणजे, सगळ्या गोष्टी तुला सांगत असे मी, पण त्या एकाच गोष्टीबद्दल नाही सांगितलं कधी मी तुला, हे वाचून तुला वैषम्य वाटेल का गं ममा?

तसं म्हटलं तर ते काहीच नव्हतं, पण म्हटलं तर बरंच काही. ते काय होतं ते मला शेवटपर्यंत कळलंच नाही आणि कळलं तेव्हाही फारसं कळलं होतं असंही नाही. त्या वेळेस जेवढी मी गोंधळले होते, त्यापेक्षा काही फारसा कमी गोंधळ आज माझ्या मनात नाहीय. म्हणजे मी काय म्हणते आहे, हे तुला कळतंय का? तुला मी काय आणि कसं सांगावं हे मला तेव्हा कळलं नव्हतं. आता हे लिहितानाही ते फार कळत आहे, असं पण नाही. तर मग, मलाच न उमजलेली ही गोष्ट, कशी सांगितली असती मी तुला? आज इतक्या वर्षांनीही माझ्या मनाचा एवढा गोंधळ होतोय, तर तेव्हाच्या अननुभवी वयात माझी किती भंबेरी उडाली असेल हे कसं सांगू मी तुला? तुला समजतंय ना की मी तुला तेव्हा का नाही सांगितलं ते? आज माझं मन रितं करताना, तुझी माफी मागून, मी आपल्या खास नात्याचा अपमान करणार नाही. पण, तरीही, नाही म्हटलं तरी, मला जरासं अपराधी वाटणारच, नाही का? पण काही झालं तरी, आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा नेहमीप्रमाणेच मला आवेगानं कवेत घेशीलच तू... घेशील ना, मम्मा?

बघ किती गोंधळ होतोय माझा. इतकं लिहिलं, पण मुद्द्याचं काहीच सांगितलं नाही!

तर, ते कॉलेजचे दिवस आणि आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रूप... गप्पा, कॅन्टीन, आठवड्यातून एखादा पिक्चर, असं मस्तं चाललं होतं. तुला माहीत आहे ते सगळं. मीच तर सांगत असे ना तुला त्या सगळ्या गोष्टी. पण एकाबद्दल काही खास वाटायचं मला, ते नाही मी तुला सांगितलं. म्हणजे तसं काहीच नव्हतं सांगण्यासारखं... पण, असावं, काहीतरी व्हावं, म्हणजे तसं सांगण्यासारखं काहीतरी व्हावं, असं सतत वाटत असायचं. पण नाही मी कधी सांगितलं त्याला, आणि तोही नाही काही म्हणाला. आम्ही दोघे एकाच लॅबमध्ये आणि प्रोजेक्ट टीममध्ये होतो. अभ्यासाच्या विषयांवर जोरदार मोकळी चर्चा करायचो आम्ही... क्वचित विरोधात, पण बहुधा एकाच बाजूला असायचो आम्ही... त्याची-माझी मतं बर्‍याचदा जुळत असत. पण अभ्यास सोडून नाही फारसे बोललो आम्ही. मला तसा धीरच झाला नाही आणि ना त्याने धीर केला... पण, उगाच वाटायचं की मी त्याला आवडते. पण दुसर्‍या क्षणी हा माझ्या मनाचा खेळ समजून स्वतःला आवरत असे.

एक तर आपण ख्रिश्चन आणि तो हिंदू, ही एक मोठी मानसिक भिंत आमच्या मध्ये उभी होतीच... दोन्हीकडचे लोक काय म्हणतील, किती विरोध होईल, ही भीती सतत मनात असे. तिच्यावर मात करत, मी कधीमधी साडी नेसून आणि कपाळावर टिकली लावून कॉलेजला जात असे. वाटायचं, त्याच लक्ष वेधलं जाईल आणि तो जवळ येऊन कॉम्प्लिमेंट देईल... निदान भुवया विस्फारून "अरे वा, छान दिसतेस" अशा अर्थाचे भाव चेहर्‍यावर दाखवेल. पण, नाही केलं तसं काही त्याने. उलट, एकदोनदा तूच मला, "अरे वा, आज काय साडी डे आहे की काय?" असं टोकलं होतंस आणि "नाही गं, सहजच" असं म्हणून मी ते झटकून टाकलं होतं.

हा हा म्हणता कॉलेजची वर्षं संपली आणि शेवटची टर्म आली. सगळ्यांची प्रोजेक्ट संपवायची आणि सबमिशन्स करायची गडबड सुरू झाली. आमच्या ग्रूपने आतापर्यंत जरी फुल धमाल केली असली तरी सगळेच अभ्यासात कुठेच कमी पडलेलो नव्हतो. आता तर, इतर सगळ्या गोष्टी बाजूला टाकून, सगळे अभ्यास एके अभ्यासात बुडून गेले होते. म्हणजे आम्ही भेटत होतो, बोलत होतो, पण अभ्यास सोडून इतर विषयावर क्वचितच बोलणं होत असे. पुढचं करियर ठरवणार्‍या फायनल परीक्षेच्या दडपणापुढे इतर सर्व विषय आपोआप मागे पडले होते.

मला तो दिवस अजून लख्ख आठवतोय. सबमिशन संपवून आमचा ग्रूप बर्‍याच दिवसांनी हुश्श म्हणत कॅन्टीनमध्ये जमला होता. खाण्यापिण्याबरोबरच, प्रोजेक्ट आणि सबमिशन्स पुरी करताना कोणाची कशी तारांबळ उडाली होती यावर एकमेकाचे पाय ओढणं चालू होतं. डोक्यावरचं एक मोठं ओझं कमी झाल्यामुळे बर्‍याच दिवसांनी आम्ही खळखळून हसत होतो. तासभर असं झाल्यावर, फायनल एक्झामची आठवण काढत, एक एक जण निघून जाऊ लागले. तो मात्र शेवटापर्यंत बसून होता... आणि म्हणून माझाही पाय निघाला नव्हता. शेवटी आम्ही दोघेच उरलो... एकमेकाची नजर चुकवायचे अयशस्वी प्रयत्न करत आणि डोळे भिडले की उगाच कसनुसं हसत. अशी दोन-तीन मिनिटं झाली असतील, अचानक तो म्हणाला, "माझं पत्र मिळालं का? वाचलंस का? काय वाटतं तुला?"

तो काय म्हणतो आहे ते क्षणभर मला कळलंच नाही. "पत्र? कसलं पत्रं?"

"तुझ्या लॉकरमध्ये... तुला माझं पत्र... नाही मिळालं?" तो.

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आठवड्यापूर्वी मी माझा लॉकर उघडला आणि त्याच्या दरवाजाच्या फटीत घडी करून कसाबसा घुसवलेला एक कागद खाली पडला होता. उघडून पाहिला तर चक्क प्रेमपत्र म्हणावं अशी भाषा! पण जरासं वेगळं प्रेमपत्र होतं ते... जगाच्या अंतापर्यंत साथ हवी म्हणणारं, पण त्याच श्वासात, "मात्र, जर तू माझ्याबरोबर सुखी होशील असं तुला वाटत नसेल तर मात्र तू माझ्याबरोबर न येणंच ठीक, कारण मी तुला कदापि दु:खी बघू शकणार नाही." असं काहीबाही असलेलं पत्र. शेवटी त्याचं नाव होतं. ते पत्र वाचून मला काय करावं ते समजेना. इतका वेळ आजूबाजूला असताना अलिप्त राहणारा तो असं काही लिहील? इतक्या वर्षांत, मला एकटीला, "चल कॉफी पिऊ या" असं एकदाही न म्हणणारा तो असं काही करेल असं वाटलंच नाही. आणि तसं म्हणण्याच्या असंख्य संधी मिळालेल्या असतानाही तो असं पत्रबित्र लिहील यावर माझा विश्वासच बसला नाही गं. कदाचित, माझ्या मनातील चलबिचलीचा अंदाज घेऊन आमच्या ग्रूपमधल्या कोण्यातरी नाठाळाने माझे पाय ओढण्याचा प्रयत्न केला असावा, हाच विचार सर्वप्रथम मनात आला... नाही, नक्की तेच आहे असं वाटलं. तोंडावर आलेल्या परीक्षेच्या दडपणाखाली मी ते पत्र विसरूनच गेले होते, ममा.

मला काय बोलावं ते सुचेना. "अच्छा... ते पत्र... तू लिहिलं होतंस का? मला वाटलं... कोणीतरी थट्टा केली माझी" माझ्या कोरड्या झालेल्या घश्यातून शब्द कसेबसे बाहेर पडले.

तो गप्पच राहिला... चेहर्‍यावर उत्तराच्या अपेक्षेचे भाव घेऊन. काय उत्तर देऊ? मला काहीच सुचेनासं झालं. आज आश्चर्य वाटतं... इतके दिवस, महिने, वर्षं त्याने कसं का होईना पण विचारावं, या आशेने झुरणारी मी... त्या वेळेस, काय उत्तर देऊ म्हणून गोंधळून गेले. तोंडातून शब्द फुटेना. काळ किती वेळ नि:शब्द होऊन थबकला होता?... कोण जाणे.

"ठीक आहे. विचार करून सांग." असं म्हणून तो उठला, "बाइकवरून घरी सोडू का तुला?" म्हणाला.

खरं तर मीसुद्धा घरीच येणार होते. पण मनातल्या गोंधळाने काही वेगळंच बरळून गेले, "नाही... माझं थोडं काम आहे लायब्ररीत... ते करून मग मी घरी जाईन."

ती रात्र मी झोपेविना घालवली. त्याला काय आणि कसं सांगू, याचे असंख्य प्रकार मनात घोळवून नाकारले गेले. परत विचारात घेऊन परत नाकारले गेले. पटकन हो म्हणणं कसं दिसेल? त्याचा तो काय अर्थ लावेल? आम्हा मुली-मुलींच्या घोळक्यात बर्‍याचदा असा विषय येत असे. "आवडत असेल तर लगेच हो म्हणावं, उगा भाव खाऊ नये" ते "माझ्याकडे खूप ऑप्शन आहेत असं सुचवून, जरासं जळवून-जोखून-पारखून मग हो म्हणावं" ते "पहिल्यांदा नाही म्हणून चांगल्या नाकदुर्‍या काढायला लावून मग मोठा उपकार केल्याचा आव आणून हो म्हणावं"; हे आणि असे असंख्य पर्याय हिरिरीने मांडलेले ऐकले होते. पण तरीही मी मात्र त्याबाबतीत कोरडा पाषाणच राहिले होते, हे मला त्या रात्री प्रकर्षानं जाणवलं. आख्खी रात्र उलट सुलट विचार करत तळमळत गेली, पण काय करावं याचा निर्णय काही करू शकले नाही मी.

दुसर्‍या दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत एक पुस्तक आणायला गेले, तेव्हा तो व्हरांड्याच्या एका टोकाला जिन्याजवळ उभा दिसला. अंगात काय संचारलं कळलं नाही. जवळजवळ धावतच त्याला गाठलं. तिथपर्यंत गेले खरी, पण काय बोलायचं हेच ठरवलंच नव्हतं ना, मग बोलणार काय? अचानक समोर उभी ठाकल्याने तो काहीसा गडबडला. पण बोलला नाही काही. नेहमीच्या स्मितहास्यामागे एक प्रश्नार्थक चेहरा घेऊन उभा राहिला. "हा का नाही बोलत काहीतरी? का असा घुम्यासारखा उभा राहिलाय?" माझ्या डोक्याची शीर तडतडली.

"अं... म्हणजे असं बघ... म्हणजे तुझं ते पत्र... म्हणजे... माझ्या घरचे लोक एका मुलाचा विचार करतायत... म्हणजे नक्की काहीच नाही, पण विचार चालू आहे... म्हणजे..." मी काय बरळते आहे हे माझं मलाच कळत नव्हतं. त्याला काय वाटत असेल हा विचार मनात येणं दूरच होतं. वेड्यासारखी असंच काहीतरी बरळत होते मी.

एकाएकी त्याच्या चेहर्‍यावरचं स्मित गायब झालं. चेहरा आक्रसला, दगडाचा झाला. एखादं मिनिट निस्तब्धतेत गेलं असेल नसेल. मग, मोठ्या प्रयत्नाने बोलावं तसा म्हणाला, "ठीक आहे... म्हणजे... तुझ्यापुढे पर्याय आहेत... आणि ते स्वीकारण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे तू सुखी झालीस तर मला आनंदच होईल. मनापासून शुभेच्छा. माझ्या त्या पत्राच्या आगळिकीने तुला त्रास झाला असणार... त्याबद्दल मी दिलगीर आहे." तो थबकला. यापुढे काय बोलावं हे बहुतेक सुचलं नसावं त्याला. काहीसे मिश्कील असणारे त्याचे डोळे एकदम निस्तेज झाल्यासारखे वाटले मला. एकदम थंड, खोल, भीतिदायक गुहेसारखे... म्हणजे, आत काय आहे याचा ठाव लागत नाही म्हणून गोंधळवून टाकणारे. काय झालं हे, असा विचार मनात येऊन एक शिरशिरी माझ्या अंगभर भिरभिरली. माझाही जणू बर्फच झाला होता.

मिनिटभर नि:स्तब्धतेत गेलं असावं. तो वळला आणि निरोप घेतल्यासारखी मान हलवून पाठमोरा होत दूर, दूर जाऊ लागला. ममी, तो तसाच जात राहिला की गं! तो काहीसा पाय ओढत चालतोय असं मला जाणवलं... की तो मला झालेला भास होता? त्याला हाक मारून थांबवावं आणि धावत जाऊन त्याच्या बाहूत झोकून द्यावं, असाही विचार माझ्या मनात चमकून गेला. मनात दिशाहीन वावटळ घोंघावत होती, उलथापालथ करत होती... पण, शरीर थिजलेलं होतं. मी काहीच बोलू शकले नाही, काहीच हालचाल करू शकले नाही... त्याच्या दूर जाणार्‍या पाठमोर्‍या आकृतीकडे एखाद्या निर्जीव खांबासारखी पाहत राहिले. थोड्या वेळाने भानावर आले, तेव्हा पायातले त्राण निघून गेल्यासारखं वाटलं. जिन्याच्या कठड्याला धरून पायरीवर बसले... किती वेळ, कोणास ठाऊक.

त्या वेळी काय विचार मनात आले असतील त्याच्या? की, हिच्या मनात माझ्याशिवाय आणखी कोणी आहे? माझ्यापेक्षा त्याच्याबरोबर ती जास्त सुखात राहील? माझ्या मनाविरुद्ध माझी मनधरणी करून मला जिंकून घेण्यापेक्षा मी त्याला मनापासून स्वीकारणं त्याला जास्त महत्त्वाचं वाटलं असेल का? मी हो म्हणावं म्हणून त्यानं का नाही एकदाही प्रयत्न केला? सरळ पाठ फिरवून निघून गेला! वाईट, दुष्ट, शिष्ट कुठचा !

त्याची पाठमोरी आकृती दूर दूर जात होती तसतसा माझ्या मनातला राग?... की दु:ख?... की असाहाय्यता? जास्त जास्त खदखदत होती. नंतर कधीतरी त्याच्या वागण्याचा अर्थ पत्रातील त्या वाक्यावरून मला लागला... त्याने लिहिलं होतं की, 'मात्र, जर तू माझ्याबरोबर सुखी होशील असं तुला वाटत नसेल तर मात्र तू माझ्याबरोबर न येणंच ठीक, कारण मी तुला कदापि दु:खी बघू शकणार नाही.' माझ्या बरळण्याचा असा परिणाम होईल असं मला वाटलं नव्हतं... तसं काही वाटायला मी बोलण्याअगोदर विचार तरी कुठे केला होता गं ममी!

पुढच्या दिवसांत सगळेच परीक्षेच्या तयारीत गुंतले. कधी काही कारणाने कॉलेजात नाहीतर लायब्ररीत गेले तर कोणी भेटेल न भेटेल असं झालं. परीक्षेपूर्वी सगळा ग्रूप कधीच एकत्र जमला नाही. तो तर दिसलाच नाही. कोणीतरी, "त्याने स्वतःला अभ्यासात पार बुडवून घेतलंय" असं म्हणालं, तेवढंच त्याच्याबद्दल समजलं. परीक्षा झाल्यावर ग्रूप जमला तेव्हाही तो नव्हताच. तो दूरच्या कोणत्या तरी नातेवाइकाकडे गेल्याचं कोणीतरी म्हणालं. रिझल्ट लागला आणि प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या उच्च शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या मागे लागला. ग्रूप भंगला तो कायमचाच... ते जरासं अपेक्षितच होतं म्हणा.

सहा महिने वर्षभराने तुझ्या मैत्रिणीने - पीटरच्या आईने - तुला गळ घातली. पीटरचा स्वभाव कोणालाही आवडेल असाच होता. स्वतंत्र व्यवसायात त्याचा जम बसलेला होता. तुम्ही लोकांनी आमची भेटगाठ घडवून आणलीत. समोरच्या माणसाचं मन कसं जिंकावं हे कोणीही पीटरकडूनच शिकावं. एकामागोमाग एक गोष्टी घडत गेल्या आणि एक दिवस गुडघ्यांवर बसून त्याने माझ्यासमोर अंगठी धरली... मी नाही म्हणूच शकले नाही. मग काय? मोरपंखी दिवस सुरू झाले!

***

हे सगळं लिहायला मला दोन तास तरी लागले असतील. पण काल मर्विनचे रुसलेले डोळे पाहिले आणि हा सगळा चित्रपट क्षणभरात माझ्या मनात तरळून गेला. जणू एखाद्या वादळाने माझ्या मनाचा ठाव घेऊन त्याला पूर्णपणे घुसळून टाकलं... दूर कुठेतरी कानाकोपर्‍यात दडून बसलेल्या, विसर पडलेल्या आठवणींना घुसळून वर आणलं... सगळं मनच पार गढूळ करून टाकलं. त्याच्या सपाट्यात, भान विसरून, मी तशीच शून्यात टक लावून किती वेळ पाहत होते कोण जाणे. जरा वेळाने, ममा जरा जास्तच रागावलीय, असं मर्विनला वाटलं असावं. पाय आपटत तो त्याच्या खेळण्यांच्या खोलीत निघून गेला.

कसा उगारला गं मी हात माझ्या काळजाच्या तुकड्यावर? त्या दुष्ट क्षणी असा कसा माझा हात सैतानाचा ताबेदार झाला? पपांनी आणि तू आम्हाला कधीच बोटदेखील लावलं नाही. तुमच्या डोळ्यातली जरब आणि आवाजाचा बदललेला स्वर एवढंच पुरेसं होतं आम्हा भावंडांसाठी. मग मी असं कसं केलं, ममी? असा कसा ताबा सुटला माझा माझ्यावरचा? या विचारांनी उभ्याउभ्याच मला रडू कोसळलं. धावत बेडरूममध्ये जाऊन अंग बेडवर झोकून दिलं आणि माझ्या संयमाचा बांध फुटला. मी इतकी हमसून हमसून कधी रडल्याचं मला आठवत नाही. उशी भिजून चिंब झाली.

माझ्या रडण्याचा आवाज मर्विनला ऐकू आला असणारच. बेडरूमचं दार किलकिलं करून तो डोकावताना दिसला. मला या अवस्थेत त्यानं कधीच बघितलं नव्हतं. ममी गं, माझं कोकरू अगदी गांगरून गेलं होतं गं. तो धावत आला आणि माझ्या कुशीत शिरून माझी समजूत घालायला लागला, "सॉरी ममी, मी असं परत कधी नाय करणार. मी गुड बॉयसारखंच वागणार. बघच तू. नको ना रडू तू." आता काय सांगणार त्याला मी? त्याला मिठीत घेऊन मी जास्तच मुसमुसायला लागले. नंतर काही वेळ आम्ही मायलेक एकमेकांचे अश्रू पुसत एकमेकांची समजूत घालत होतो. त्याच्या वळ उठलेल्या गालांचे मुके घेत मी त्याचं सांत्वन करावं, तर "काय नाय, बघ अजिबात दुखत नाय" असं म्हणत त्यानं माझं सांत्वन करावं, असं किती तरी वेळ चाललं होतं. आता हे वाचताना तुला विनोदी वाटेल, पण ते कॅथर्सिस आम्हा दोघांच्या मनातलं बरचसं मळभ दूर करू गेलं हे मात्र नक्की.

मग मात्र माझ्यातली आई जागी झाली. दोघांचे चेहरे थंड पाण्याने खसखसून धुतले. पोरासाठी त्याच्या आवडीचं चॉकलेट मिल्क बनवून दिलं, माझ्यासाठी कडक कॉफी बनवली आणि दोन शिलेदार दिवाणखाना साफ करायला सज्ज झाले!

बाकी दिवस तसा असा तसाच गेला. दिवसभर मर्विन एकदम गुड बॉय झाला होता. किती नको नको म्हटलं तरी, मला मदत करण्याचा हट्ट करत, माझ्या सगळ्या कामांत त्याची सतत लुडबुड चालू होती.

***

साडेसात वाजून गेले होते. संध्याकाळचं जेवण कधीचं बनवून झालं होतं. पीटर यायची वेळ टळून गेली होती. त्याला दिवाणखान्याची टापटीप बिघडलेली अजिबात आवडत नाही. मर्विनने आणखी काही पसारा केला असला तर तो पीटर येण्याअगोदर आटपायला हवा, म्हणून मी किचनमधून बाहेर आले. दिवाणखान्याच्या रिकाम्या झालेल्या कोपर्‍यावर माझी नजर अडखळली. ते पाहून पीटर काय करेल या विचाराने माझ्या काळजात धस्स झालं!

कधी नव्हे तो आजच पीटरला घरी यायला उशीर झाला होता. कोणाची वाट पाहणं तसं कंटाळवाणं असतंच, आजच्या घटनेनंतर तर ते अधिकच जीवघेणं वाटत होतं. त्याच्या आवडीची मूर्ती भंगली हे पाहून तो कसा वागेल याचा विचार करता-करताना सकाळपासून झाकोळलेलं माझं मन आणखी उदास होत राहिलं. कदाचित माझी चलबिचल पाहून असेल, पण मर्विनचाही मूड बिघडू लागला होता. त्याच्या गालावरचे वळ नाहीसे झाले होते. पण लाडाकोडात वाढलेल्या माझ्या लेकाच्या मनातून माझ्या हातून खाल्लेली पहिली चपराक कशी नाहीशी करता येईल, याची काळजी माझं मन सतत खात होती. दिवसभर मी त्याची नजर चुकवत होते ती त्याला पहिल्यांदाच मारलं म्हणून की त्याच्या त्या नजरेची भीती माझ्या मनात रुतून बसली होती म्हणून, हे मला ठरवता येत नव्हतं.

गाडी पोर्चमध्ये शिरण्याचा आवाज झाला आणि मी खिडकीतून डोकावून पाहिलं. पीटरच होता. गाडीच्या डिकीमधून एक लांबलचक खोका बाहेर काढत होता. मी दरवाजा उघडला. खोका वजनदार दिसत होता, चांगला तीनएक फूट उंच होता. पीटर घरात शिरला. खोका काळजीपूर्वक खाली ठेवला. नक्कीच काहीतरी किमती वस्तू असेल त्याच्यात, मी मनातच अंदाज बांधला. त्याच्याकडे धावलेल्या मर्विनला त्याने उचलून घेतले आणि त्याच्या गालावर नेहमीची आवाजी पप्पी दिली. माझ्याकडे पाहिलं आणि लगेच त्याच्या चेहर्‍यावर काळजीच्या रेषा उमटल्या. मान जराशी वाकडी करून त्याने माझा चेहरा निरखून पाहिला आणि कपाळाला हात लावत म्हणाला, "आज चेहरा उतरलेला का दिसतोय तुझा? बरं वाटत नाही का?"

"काही नाही रे, जरासं डोकं दुखतंय सकाळपासून. आता तू आलास ना, होईल बरं आपोआप." मी बाजू सावरायचा प्रयत्न केला.

"ते काही नाही. निदान पॅरासिटॅमॉल तरी घेतलंस का? हे तुझं असं दुखणं अंगावर काढणं मला अजिबात पसंत नाही. उद्या सकाळीच डॉ. देसाईंकडे जाऊ या." त्याचा आवाजात जराशी जरब होती. पण त्या कडक आवाजाच्या कातळाखालचा मायेचा झरा माझ्या ओळखीचा होता. माझं हळवं मन अधिकच हुळहुळलं आणि डोळ्यात टचकन आलेलं पाणी मी रोखू शकले नाही. ते पाहून पीटर जरासा गोरामोरा झाला. माझे डोळे पुसत म्हणाला, "अगं, एकदम रडायला काय झालं? मला तुला दुखवायचं नव्हतं. पण, तू स्वतःकडे फार दुर्लक्ष करतेस हे मला अजिबात आवडत नाही. तुझा उतरलेला चेहरा पाहिला की मला काय वाटतं ते तुला कधीच समजणार नाही."

वर वर कणखर शिस्तिचा वाटणारा हा माणूस कधी इतकं हळवं बोलतो की प्रभूच्या आशीर्वादामुळेच तो माझ्या जीवनात आला आहे असं वाटतं. मर्विनची पप्पी घेण्याच्या मिशाने मी त्याच्यावर रेलले तेव्हा त्या स्पर्शानं जरासं बरं वाटलं मला. क्षणभरात मर्विनला खाली ठेवून तो म्हणाला, "अरे, मी एक सरप्राइज आणलंय तिकडे कोणाचंच लक्ष नाही. काय हे?"

"ते कुठे ठेवावं बरं?..." असं म्हणत त्याने दिवाणखानाभर नजर फिरविली आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला, पायतलं बळ निघून जाईल की काय असं वाटायला लागलं. त्याची नजर रिकाम्या कोपर्‍यावर अडखळली आणि तो जवळ जवळ किंचाळला, "अरे, इथली मूर्ती कुठे गेली? आँ?"

इतका वेळ पीटरच्या पायात घुटमळणारा मर्विन माझ्या बाजूला सरकला. खांदा पकडून मी माझ्या कोकराला माझ्या मागे ढकललं आणि चाचरतच म्हणाले, "पीटर, अरे... त्याचं असं झालं... सकाळी ना मी साफसफाई करत होते ना... तेव्हा कसा माहीत नाही... पण माझा धक्का लागून मूर्ती पडली आणि फुटली. आय अ‍ॅम सॉsssरी... पीटर!"

आता आरडाओरडा कधी सुरू होतोय याची मी वाट पाहू लागले. मर्विनने मागून माझ्या पायांना मिठी मारली. क्षणभर पीटरचा चेहरा किंचित रागीट झाल्यासारखा दिसला... की तसा भास झाला मला? कारण, लगेच पीटरच्या गडगडाटी हसण्याने मी भानावर आले. स्वप्नात आहे की जागी याची खातरी करण्यासाठी स्वतःलाच एक चिमटा काढावा असा विचार माझ्या मनात चमकून गेला. पण, मी काही करण्याआधी पीटरनं माझे खांदे पकडून, "ए वेडाबाई, जागी हो जागी" असं म्हणत मला गदगदा हलवलं... मी जागी असल्याचं मला पटलं. मर्विन अजून घाबरून मला जास्त चिकटला. त्याला माझ्या मागून ओढून काढत, हात घरून खोक्याकडे खेचत नेत, पीटर म्हणाला, "हे बघ मी काय आणलंय... सरप्राsssइज !"

त्या दोघांनी खोका उघडायला सुरुवात केली. माझ्या मन:स्थितीतून बाहेर येण्याचा माझा प्रयत्न चालला होता. खोक्यातून पीटरनं एक मूर्ती बाहेर काढली आणि मी पाहतच राहिले... पूर्वीच्या मूर्तीत फक्त प्रेमी युगुल होतं, या नवीन मूर्तीत प्रेमी युगुल तर होतंच, त्याशिवाय त्या दोघांच्या पायाला विळखा घालून उभं असलेलं त्यांचं पिल्लूसुद्धा होतं. पीटरनं तिकडे बोट दाखवत, "हा बघ, या नव्या मूर्तीत तूसुद्धा आहेस" असं सांगताच मर्विनने त्याच्या गळ्याला मिठी मारत, "माय डॅड, वर्ल्ड्स बेस्ट" असं जाहीर करून टाकलं आणि गालावरच्या आवाजी पप्पीने त्यावर शिक्कामोर्तबही करून टाकलं!

"काही हरकत नाही ती मूर्ती फुटली तर. नाहीतरी या नव्या मूर्तीला जागा करण्यासाठी तिला हलवायलाच लागलं असतं, नाय का?" असं म्हणत पीटरनं ती मूर्ती रिकाम्या जागेवर ठेवली, तिच्याकडे मान वाकडी करून निरखून पाहिलं, तोंडातून टक्क असा आवाज काढला आणि खूश होऊन तर्जनी व अंगठा एकमेकाला टेकवून मूर्ती सुंदर असल्याची खूण केली. मला स्वतःकडे ओढत मूर्तीतल्या युगुलासारखी पोझ घ्यायला लावली. आमच्या पिलाला काही वेगळं सांगायची गरज पडली नाही, त्याने मूर्तीतल्या पिलाप्रमाणे आमच्या पायांना आपल्या कोवळ्या हातांची मिठी मारली... शिल्प पुरं झालं!

माझा श्वास मोकळा झाला. दिवसभराचं गढुळलेलं वातावरण इतक्या वेगानं सुधारलं की त्या वेगाच्या धक्क्यातून बाहेर यायला जरासा वेळ लागला. "चला, बस झाले नखरे. जेवायचं आहे की मिठ्या मारूनच पोट भरलंय बापलेकांचं" असं लटक्या रागाने म्हणत मी जेवणाचं टेबल लावायला किचनच्या दिशेने वळले. बापलेकांचं एकमेकाचे लाड करणं चालूच होतं... आणि ते डोळ्याच्या कोपर्‍यातून किती वेळा पाहिलं तरी माझं पोट भरत नव्हतं!

***

ममा, आज हे लिहिताना, 'वादळी दिवसाचा शेवट सुखान्तिकेने झाला' असं म्हणता-म्हणतानाच, श्वास जरासा अडकतोच आहे. कालचा दिवस माझ्या मनात कायमचा कोरला गेलाय. तो मी कधी विसरेन असं वाटत नाही. ते डोळे मला परत परत दिसत राहतील काय?... माझं मन ढवळून काढून तळाशी कुठेतरी कोपर्‍यांत बसलेल्या आठवणी परत परत वर आणत राहतील काय? हे प्रश्न माझ्या मनात सतत घुमताहेत. तुझ्या कुशीत शिरावं, थोपटणारा तुझा हात माझ्या डोक्यावर असावा, असं आज मला प्रकर्षानं वाटतंय. माझ्या दुखण्यावर त्याच्या इतका दुसरा परिणामकारक उपाय मला सुचत नाहीय.

दोन महिन्यांनी ख्रिसमस येतोय. तू या ख्रिसमसमध्ये माझ्याकडे यायचं कबूल केलंयस ते लक्षात आहे ना? तुझं पिल्लू आणि तुझ्या पिलाचं पिल्लू तुझ्या कुशीत शिरायची वाट पाहत आहेत, हे विसरू नकोस. नक्की ये गं.

तुझीच लाडकी लेक,
...

***

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 5:40 pm | टर्मीनेटर

कथा खुप आवडली डॉक्टर साहेब.

ममा, आज हे लिहिताना, 'वादळी दिवसाचा शेवट सुखान्तिकेने झाला' असं म्हणता-म्हणतानाच, श्वास जरासा अडकतोच आहे.

दुसरा भाग लिहायला चांगला स्कोप आहे :)

कुमार१'s picture

6 Nov 2018 - 7:06 pm | कुमार१

कथा आवडली

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 10:28 pm | मुक्त विहारि

कथा आवडली..

Jayant Naik's picture

7 Nov 2018 - 10:49 am | Jayant Naik

एका मुलीचे आणि आईचे मनोगत उत्तम मांडले आहे. सुंदर कथा . आवडली .

एकाच व्यक्तीची भिन्न रूपे - मुलगी, पत्नी आणि आई.
प्रत्येक भूमिकेतून जगतानाची विचारांची, भावनांची आंदोलने वेगळी.

कथा आवडली.

नाखु's picture

10 Nov 2018 - 9:47 pm | नाखु

हा परकाया प्रवेश लीलया फक्त स्त्री करू शकते यावर निस्सीम विश्वास असलेला नाखु

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 8:43 pm | प्रचेतस

कथेच्या प्रांतातील तुमची मुशाफिरी खूप आवडून गेली.

सुधीर कांदळकर's picture

8 Nov 2018 - 7:14 am | सुधीर कांदळकर

माझ्या आयुष्यात घडला होता. हॉलमध्ये ठेवायचा शोभेचा टेराकोटा व्हास जवळजवळ तीस वर्षांपूर्वी दिवाळी चार दिवसांवर असतांना सौ. ने मोठ्या हौसेने घरात आणला. व्हास आणल्या दिवशीच ६ वर्षांच्या चि. च्या हातातला चेंडू पडला तो थेट त्या व्हासवर. संध्याकाळी घरी आलो तर दोघांचे चेहरे रडवेले. चि. ला उचलून घेतले. त्यानेच रडत रडत काय झाले ते सांगितले. त्याला आईने मारले तर नव्हतेच पण काही बोललीही नव्हती. व्हास फुटल्यावर आई रडली म्हणून त्याला वाईट वाटले होते. फुटूंदे आपण नवा आणूयात म्हणून तिघे आईसक्रीम खाऊन आलो आणि तो व्हास हवेत विरून गेला.

एक अमोल, हृद्य आठवण या भिडणार्‍या कथेतून जागी करून दिलीत. धन्यवाद.

अनिता ठाकूर's picture

9 Nov 2018 - 11:44 am | अनिता ठाकूर

एका स्त्रीच्या मनाची आंदोलनं अगदी नेमकेपणाने दाखवली आहेत. युगुलाच्या शिल्पात पिल्लूसुद्धा समाविष्ट करण्याचा वत्सलपणा दाद देण्याजोगाच ! एक तरल कुटुंबकथा !

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Nov 2018 - 1:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

कथालेखनाचा माझा हा केवळ दुसरा प्रयत्न. तो आवडल्याचे सांगणार्‍या सर्व प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद !

Nitin Palkar's picture

10 Nov 2018 - 7:07 pm | Nitin Palkar

अतिशय तरल कथा. खूप आवडली. अलीकडे ललित वाचनाच्या वाटेला फारसा जात नाही. कारण वाचून झाल्यावर अनेकदा उगाच वाचलं असं वाटतं. असं हळुवार आणि अलवार लिहिलेलं काही वाचलं की खूप बरं वाटतं.

माहितगार's picture

10 Nov 2018 - 7:48 pm | माहितगार

कथा आवडली. पु.ले.शु.

नूतन सावंत's picture

11 Nov 2018 - 2:54 pm | नूतन सावंत

कथा आवडली लिहीत रहा.

दुर्गविहारी's picture

12 Nov 2018 - 10:43 am | दुर्गविहारी

उत्कृष्ट कथा. मधे थोडी कंटाळवाणी वाटली. पण शेवटी षटकार मारला आहे. आणखी कथा येउ द्यात.

प्राची अश्विनी's picture

12 Nov 2018 - 11:05 am | प्राची अश्विनी

कथा आवडली.

ऑ मला वाटलं हॉरर ष्टुरी आहे द ओमेनसारखी!

पण हे तर ती सध्या काय करतेच प्रिक्वेल आहे की... वेगळ्या प्रकारची भयकथाच :-P

पद्मावति's picture

18 Nov 2018 - 10:11 pm | पद्मावति

खुप आवडली कथा.

प्रवास's picture

4 Jan 2019 - 12:44 am | प्रवास

अतिशय सुंदर नि हळुवार ..

मित्रहो's picture

6 Jan 2019 - 10:23 am | मित्रहो

कथा आवडली