दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

प्रचेतस's picture
प्रचेतस in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

फार फार वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या निबिड अरण्यात भटकायला गेलो होतो. ठिकाण नेमकं विस्मरणात गेलंय. कदाचित सुधागडच्या पायथ्याचं धोंडसं असावं, तिकोना पेठ असावी, घनगडाच्या आसपासचं येकोले असावं, ताम्हिणीतल्या विंझाई मंदिराचं आवार असावं किंवा थेट रतनवाडी. तेव्हाचे ट्रेक बर्‍याचदा मुक्कामी असत. कारण वाहतुकीच्या सुलभ साधनांची कमतरता. एसटीवरच अवलंबून राहावं लागत असे. अशाच ठिकाणी कधी काळी मुक्काम असताना समोरच्या डोंगरावर एखादा वणवा लागलेला कधीतरी दिसे. अशा वेळी स्थानिक गावकरी म्हणत - "ती पहा वेताळांची सेना दिवट्या घेऊन समोरच्या डोंगरावर नाचत आहे." अशा अनगड ठिकाणांच्या वेताळांच्या दंतकथांशी प्रथम परिचय झाला तो असा. त्यापूर्वीही वेताळांशी परिचय होताच, मात्र तो होता तो चांदोबातील विक्रम आणि वेताळ ह्या सर्वाधिक रोचक कथांमधून आणि फॅण्टमसारख्या कॉमिक्समधून. फॅण्टम चित्रकथांचे मराठी अनुवाद कुठल्याशा दैनिकांतून अथवा मासिकांतून यायचे आणि ते आवडीने वाचले जात असत. फॅण्टम - वेताळ म्हणजे भुतांचा राजा. सज्जनांचा तारणहार, दुष्टांचं निर्दालन करणारा अशी काहीशी प्रतिमा तेव्हा मनात उमटलेली असे. वेताळ पंचविशीचं तर प्रचंड आकर्षण असे. उज्जैन नगरीचा राजा विक्रम, त्याच्यावर एका मांत्रिकाने वेताळाला धरून आणण्याची सोपवलेली कामगिरी, विक्रमाचं मौनव्रत, वेताळाचे विक्रमाला प्रश्न, वेताळाच्या कूटप्रश्नांची उत्तरं माहीत असूनही न दिल्यास मस्तकाची शंभर शकलं होण्याची भीती, तर उत्तर दिल्यास विक्रमाचं मौनव्रत भंग पावून वेताळाचं त्याच्या तावडीतून निसटून जाणं, अशाच पंचवीस विविध बोधप्रद गोष्टी आणि शेवटी वेताळाच्या मदतीने दुष्ट मांत्रिकाचा खात्मा. निव्वळ अद्भुत कथा होत्या त्या. अजूनही मी तत्कालीन अस्सल वेताळ पंचविशी शोधतो आहे. ह्या कथांमधील विक्रम म्हणजेच गुप्त साम्राज्यातील पराक्रमी राजा चंद्रगुप्त दुसरा, अर्थात विक्रमादित्य असावा असं मला नेहमीच वाटतं. ह्यानेच माळव्यातील क्षत्रपांचा संपूर्ण पराभव करून शकांची राजवट संपवली, इंडो-ग्रीक राजांपासून माळव्यात प्रचलित असलेल्या संवत्सराला ह्याच्याच पराक्रमाने 'विक्रम संवत' हे नाव मिळालं. ह्याच्याच पराक्रमाच्या कथा लोकांत झिरपत जाऊन दंतकथा निर्माण झाल्या. सिंहासन बत्तिशीमधल्या राजा भोजाला सिंहासनवरील पुतळ्या कथा सांगतात ते राजा विक्रमादित्याच्याच, वेताळ पंचविशीमधला विक्रमदेखील हाच. असो.
त्यानंतर हळूहळू मूर्तिशास्त्राची आवड वाढत झाली. देवदेवतांच्या मूर्तींबरोबर इतर काही रौद्र स्वरूपाच्या मूर्तींचा परिचय होत गेला. त्यात प्रामुख्याने होत्या त्या भैरव आणि चामुंडा. कालभैरव तर तेव्हा ठिकठिकाणी असत. आजही आहेत. पण इथल्या ज्या काही मूर्ती आहेत ती तांदळा स्वरूपात. अर्थात भैरवाच्या पूर्णाकृतीदेखील आहेत, पण त्या मुख्यतः दिसतात त्या प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर. नग्न भैरव, हाती कपाल आणि नरमुंड, गळ्यात नरमुंडमाला, कराल दाढा आणि शेजारी त्याचं वाहन कुत्रा अशी लक्षणं. अशाच स्वरूपाच्या विकराळ मूर्ती आहेत त्या चामुंडेच्या. प्रेतवाहना, अस्थिपंजर, लांबट स्तन, पोटात विंचू, कराल दाढा, काही वेळा करंगळी तोंडात घालून वाजवत असलेली शिट्टी अशा स्वरूपाच्या चामुंडेच्या मूर्ती आजही हमखास दिसतात. अशा भयानक मूर्तींबरोबरच वेताळ मूर्तींचाही परिचय होत गेला.
जीवधन किल्ल्यावर पहिल्यांदा गेलो ते साधारण २००१ साली. तेव्हा आपटाळ्याच्या पुढे रस्ता असा नव्हताच. जुन्नर-आजनावळे एसटीने घाटघरला उतरावं लागायचं. जीवधन तेव्हाही दुर्गम होता, आजही दुर्गमच आहे. मात्र आता रस्त्याची परिस्थिती खूपच सुधारल्याने स्वत:च्या वाहनाने जाणं मात्र खूपच सुलभ झालंय. चावंडच्या पुढेच जुन्नर-घाटघर रस्त्यावर पूरचा फाटा आहे. तिथून दोन-तीन किलोमीटर कच्च्या खडबडीत रस्त्याने आत गेल्यावर कुकडेश्वराचं प्राचीन मंदिर लागतं. हे मंदिर बहुधा शिलाहारांनी बांधलेलं असावं. इथला शिलालेख नष्ट झालेला असल्याने ह्या मंदिराचा निर्माता आजही अज्ञात आहे. २००१ साली जेव्हा हे मंदिर प्रथम पाहिलं, तेव्हा ते भग्नावस्थेत होतं. खांब, छत आणि भिंतीवरील काही मोजक्या मूर्ती फक्त अस्तित्वात होत्या. मंदिराचे अवशेष आवारात विखुरलेले होते. ते तसे आजही विखुरलेले आहेत. अगदी आता म्हणजेच ह्या जूनमध्येच कुकडेश्वराला जाऊन आलो होतो. मंदिराचा बर्‍यापैकी जीर्णोद्धार झालाय. बरेचसे विखुरलेले अवशेष मंदिरावर पुन्हा स्थापित करण्यात आले आहेत. मात्र मंदिराच्या पुढ्यातील एका लहानशा घुमटीत असलेल्या वेताळांच्या मूर्ती तेव्हा जशा होत्या तशाच आजही आहेत.
a
हे वेताळ म्हणजेच शिवगण. शंकराचं मूळचं अनार्यत्व अधोरेखित करणारं. फार पूर्वी - म्हणजे जेव्हा दहाव्या-बाराव्या शतकात हे मंदिर निर्मिलं गेलं, तेव्हा ह्यांचं स्थान कदाचित मंदिराच्या प्रवेशद्वारावर असावं, पण कालौघात जशी जशी मंदिराची दुरवस्था होत गेली, तेव्हा त्यांचं स्थान कदाचित ह्या घुमटीत आलं असावं. तसं ह्यांना वेताळ म्हणणंही फारसं योग्य होणार नाही. हे शंकराचे भूतगण. निम्न देवता. डोक्यावर शिरोभूषण, कानांत गोलाकार आणि लांबुळकी कर्णभूषणं, बटबटीत डोळे, हाडांचा संपूर्ण सापळा, हाती धरलेला खंजीर अशी ह्यांची रचना. हे मंदिराचे रक्षक. दुष्प्रवृत्तींना मंदिरात येऊ न देणं हे ह्यांचं काम. केवळ ह्या वेताळमूर्ती इथे असल्यामुळेच हे मंदिर बहुधा शिलाहारांची निर्मिती असावी असं वाटतं. शिलाहार कोकण, कोल्हापूर ह्या प्रांतांचं. कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा वेताळांची पूजा आजही चालत असते. देशावर सहसा अशा मूर्ती दिसत नाहीत. दिसतात त्या भैरव, चामुंडा अशा देवतारूपातच. अर्थात ह्याला अपवाददेखील आहेत. रांजणगावजवळील पिंपरी दुमाला येथील मंदिरात अशी वेताळ किंवा शिवगण मूर्ती मी पाहिलेली आहे. मात्र हे मंदिर यादवकालीन आहे. शिलाहारांनी निर्मिलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात मात्र भूतगण आहेत.
कुकडेश्वर येथील वेताळ
a
कुकडेश्वर येथील वेताळ
a
पिंपरी दुमाला येथील वेताळ किंवा भूतगण
a
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील भूतगण
a
गोव्यातील वेताळ मात्र वेगळे. तिथे ते गावचे राखणदार किंवा संरक्षक लोकदैवत म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. कदंब, शिलाहार राजवटीत गावोगावी ही ग्रामदैवतं स्थापित केली गेली. त्यांची मंदिरं अशी नव्हती. ह्या मूर्ती गावच्या वेशीवर उभ्या असत. कालांतराने हळूहळू ह्या मूर्तींसाठी मंदिरं बांधली गेली. वेताळदेव, बेताल, वेतोबा अशी त्यांची स्थानिक नावं. श्री. राजन पर्रिकर ह्यांनी गोव्यातील कित्येक वेताळ मंदिरांना भेटी देऊन त्यांच्याबद्दल लिहून ठेवलं आहे. गोव्यातील वेताळांबाबत पर्रिकर काय म्हणतात, ते पाहा.
"The ancient deity of Vetal, its iconography and associated rituals, are important elements of, and unique to, Goa‘s Hindu tradition. The deity was most likely worshipped by the Austric Gauda tribe, Goa‘s earliest settlers, and later embraced by the Nath Panthis between the 10th & 13th C. Eventually it came to be absorbed into the larger Hindu pantheon.
A mere 50 or so out of the hundreds of ancient Vetal sites in Goa survived the iconoclasm by the Portuguese. Every single site in the Bardez and Tiswadi talukas was destroyed.
Traditionally the images of Vetal were cast out in the open with provision for a simple roof overhead. After all, as the village protector, he was expected to be out on his nightly patrol. To this day, offerings of footwear are made at his temples. Buffalo sacrifice was once common but is now far less so. Fowl and goat are still routinely offered."
सुदैवाने गोव्यातील वेताळमूर्तींचा मागोवा घेण्याचा योग मला दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका गोवा वारीमुळे आला. जुन्या गोव्यातील चर्चेसच्या संकुलाच्या (चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी - बॅसिलिका ऑफ बॉम जीझसच्या समोर) एका इमारतीतच गोवा पुरातत्त्व खात्याचं एक संग्रहालय आहे. गोव्यातील कित्येक प्राचीन अवशेषांबरोबरच तिथे वेताळाच्या काही भग्न मूर्तीदेखील आहेत. त्यातील एक प्रमुख आहे ती वेताळभाटीच्या वेताळाची. मूळच्या जवळपास आठ फूट उंच असलेल्या ह्या मूर्तीचे हात-पाय नष्ट झालेले असून सध्या फक्त मस्तक आणि धडाचा भाग शिल्लक आहे. शिरोभूषण, मोठे बटबटीत डोळे, अस्थिपंजर, पोटातील विंचू अशी वैशिष्ट्यं आजदेखील बघता येतात. गोव्याला कधी गेलात तर हे संग्रहालय आणि त्यातल्या ह्या मूर्ती आवर्जून बघण्यासारखंच.
दक्षिण गोव्यात लोलये गावात आजही एका वेताळाची भव्य, नेत्रदीपक अशी मूर्ती आहे ह्याची माहिती मिळाली होती, ती पाहायला निघालो. जवळच असलेल्या पैंगीण गावात वेताळाचं एक मंदिर होतंच, तेही बघायचं होतं. दक्षिण गोव्यातील हा भाग अतिशय सुंदर, नेत्रावलीच्या घनदाट अरण्याच्या आजूबाजूने जाणारा रस्ता अतिशय देखणा. अतिशय शांत भाग. खरं गोवा अनुभवायचं असेल तर ते इथेच. काणकोण तालुक्याचा हा भाग संपताच कारवार लागतं.
पैंगीण गावातलं वेताळ मंदिर शोधणं तसं अवघड नाही. मडगाव-कारवार महामार्गावरून पैंगीण गावात उजवीकडच्या एका रस्त्याने साधारण दोनेक किलोमीटर गेल्यास हे मंदिर रस्त्यालगतच दिसतं. रस्त्यालगतच असलेलं आदिपुरुष मंदिर आणि तिथूनच खोलवणात असलेलं वेताळ मंदिर. कोकणात किंवा गोव्यात आदिपुरुष, ब्रह्मपुरुष, सातेरी अशा लोकदैवतांची मंदिरं विपुल प्रमाणात आढळतात. पैंगीणच्या आदिपुरुषाचं मंदिरही अगदी साधंसं पण सुंदर. आदिपुरुषाची मूर्ती नसून मूर्तीच्या जागी एक स्तंभ उभा आहे.
a
आदिपुरुष मंदिरातून बाहेर आल्यावर काही पायर्‍या उतरून वेताळ मंदिराच्या प्रांगणात आपला प्रवेश होतो.
a
वेताळ मंदिर
a
कोकणातील अथवा गोव्यातील मंदिरांचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काष्ठमंडप.
पैंगीणच्या वेताळदेव मंदिरातील काष्ठमंडप अतिशय नाजूक अशा कलाकारीने सजलेला आहे. स्तंभांवर, छतावर नक्षीकाम, काही पौराणिक प्रसंग, देवतांच्या मूर्ती, पशुपक्ष्यांच्या आकृती कमालीच्या नजाकतीने कोरलेल्या आहेत.
वेताळदेव मंदिरातील काष्ठमंडप
a
मंदिरातील लाकडी स्तंभ
a
छतावरील नक्षीकाम
a
गर्भगृहातील वेताळाची मूर्ती भयप्रद आहे. उभट चेहरा, बटबटीत डोळे, कपाळी मुकुट, मुकुटावर कीर्तिमुख, नागाकृती कर्णभूषणं, पिंजरलेल्या मिशा, विकराळ दाढा आणि त्यातूनच बाहेर काढलेली जीभ, अस्थिपंज शरीर, बाहूंना नागबंधनं आणि एका हाती कपाल असलेली मूर्ती भयप्रद असूनही कमालीची देखणी वाटते. वेताळाच्या कमरेला धोतर नेसवलेलं असल्याने खालचा भाग नीट ध्यानी येत नाही, मात्र इतर वेताळमूर्तींप्रमाणेच ही मूर्तीदेखील नग्न असावी असा कयास बांधता येतो.
पैंगीणचा वेताळ
a
a
a
वेताळ ही संरक्षक ग्रामदेवता. दुष्प्रवृत्तींपासून गावाचं संरक्षण करण्यासाठी रात्रीचा तो बाहेर पडतो, रानावनात, काट्याकुट्यांतून तो अपरात्री फिरत असल्याने त्याच्या वहाणा झिजतात, म्हणूनच वेताळाला वहाणा अर्पण करायची प्रथा आहे. ह्या मंदिरातदेखील ती दिसते ती भाविकांनी अर्पण केलेल्या वहाणांमुळे. येथील मंदिरात अगदी सामान्य आकाराच्या वहाणांपासून दीडेक फूट लांब असलेल्या वहाणांचा एक भलामोठा ढीगच आहे. ह्याच जोडीला भाविकांनी वेताळदेवाला अर्पण केलेली त्रिशूळ, तलवार अशी शस्त्रास्त्रंदेखील आहेत.
वेताळाला अर्पण केलेली शस्त्रास्त्रं
a
वेताळदेवाचा नैवेद्य, त्याला अर्पण करण्यात येणार्‍या इतर वस्तूदेखील रोचक. त्याचा एक फलकच येथे लावलेला आहे.
a
पैंगीणचं हे वेताळ मंदिर बघून आता वेध लागलेले होते ते लोलयेच्या वेताळाचे.
वेरूळच्या कैलास लेण्याबद्दल बर्जेस म्हणतो,
"It is by far the the most extensive and elaborate rock-cut temple in India, and the most interesting as well as the most magnificent of all the architectural objects which that country possess."
अगदी अशीच काहीशी भावना लोलयेचा वेताळ बघताना होते. गोव्यातील ही वेताळमूर्ती सर्वात भव्य, सर्वाधिक रौद्र, सर्वाधिक सुबक आणि सर्वाधिक प्राचीन, मूर्तिशास्त्रातील एक अद्भुत आविष्कारच जणू.
मात्र हा लोलयेतील वेताळ शोधणं सोपं काम अजिबात नाही. इकडील लोकांना हा वेताळ फारसा परिचित नसावा. बर्‍याच ठिकाणी विचारल्यावर नकारघंटाच ऐकू येते. त्यात दुपारचं सुस्तावलेलं लोलये. लोलये गाव झाडीत लपून गेलेलं आहे. लहान लहान घरांच्या समुदायाच्या स्वरूपात, उंचसखल अशा बर्‍याच जागी विखुरलेलं गाव. बर्‍याच ठिकाणी घरं बंद. कुणी कामानिमित्त बाहेर पडलेले, कुणी घरातच आळसावलेले असे. विचारायलादेखील असं कुणी मिळत नाही. शेवटी एका जणांना विचारल्यावर त्यांनी श्री आर्यादुर्गा मंदिरामागच्या रानात ही वेताळ मूर्ती आहे असं सांगितलं. कुणाला इथल्या वेताळाचा शोध घ्यायचा असेल, तर हे आर्यादुर्गा मंदिर हीच सर्वात मोठी खूण आहे. हे मंदिर रस्त्यालगत असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ह्या आर्यादुर्गा मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर एका ब्राह्मणाचं सुरेख घर आहे. आर्यादुर्गा मंदिर ही त्यांची खाजगी मिळकत आहे. त्यांचं आडनाव आता आठवत नाही, पण वझे किंवा असं काहीसं असावं. त्या घराच्या अंगणातूनच मागच्या वाडीत जायला पायवाट आहे.
आर्यादुर्गा मंदिराची कमान. उजवीकडे आर्यादुर्गा मंदिर तर डावीकडे मंदिराच्या पुजार्‍यांचं घर, मधल्या बेचक्यातून वेताळमूर्तीकडे जाण्याची वाट आहे.
a
घरासमोरच्याच पायवाटेने आपला वाडीत प्रवेश होतो. रानातच वेताळदेवाला जायला एक लहानशी कमान आहे. गच्च रान माजलेलं, पोफळीही अगदी विपुल. त्या बंबाळ्या रानात भर दुपारीही अंधार पसरल्याचा भास होतोय. पायवाटेने पुढेपुढे जात असतानाच अवचित ती भव्य मूर्ती समोर येतेय, काळीकभिन्न. असं वाटतंय जणू काही वेताळदेव दुष्ट शक्तींना हाकलण्यासाठी सज्ज होऊन उभा आहे.
वेताळदेवाला जाण्यासाठी वाडीतली लहानशी कमान
a
ह्या अशा रानातच वेताळदेव प्रतिष्ठित आहे
a
लोलयेचा वेताळ अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही गोव्यातील ज्ञात असलेली वेताळाची सर्वात प्राचीन मूर्ती, नवव्या-दहाव्या शतकातली. सर्वात उंच, अदमासे सातेक फुटाची, सर्वाधिक देखणी - अर्थात हे देखणेपण रौद्र आहे. त्रिभंग मुद्रेतील ह्या वेताळाचं असितांग भैरवाशी कमालीचं साम्य आहे.
ह्या वेताळाच्या मूर्तीला छत नाही, गाभारा नाही, मंडप नाही, कुठलाही आडोसा नाही. शेकडो उन्हाळे-पावसाळे झेलत ह्या रानात तो आजही उभा आहे. तसं बघायला गेलं, तर वेताळाच्या किंवा राखणदाराच्या मूर्ती ह्या उघड्यावरच असतात. गोव्यातील इतर वेताळ आता मंदिरांमध्ये स्थापित झालेले आहेत, पण लोलयेचा वेताळ आजही रानात उभा राहून गावाची राखण करतो आहे.
a
ह्या वेताळाची मूर्तीदेखील मोठी वैशिष्ट्यपूर्ण. ह्याच्या मस्तकी प्रभावळ आहे. मस्तकी शिरोभूषण असून त्यावर नागबंधन आहे. त्याने लांबुळकी कर्णभूषणं परिधान केली आहेत. त्याचे डोळे खोबणीतून पूर्णपणे बाहेर आलेले असून कपाळी तिसरा डोळा किंवा उभं गंध आहे. त्याच्या नाकपुड्या फेंदारलेल्या असून त्याच्या कराल दाढा तोंडातून बाहेर आलेल्या आहेत.
a
अस्थिपंजर अशा ह्या वेताळाने नरमुंडमाला धारण केलेली आहे. गळ्यातील हारात एक नक्षीदार पदक आहे. त्याच्या एका हातात खड्ग आहे, जे आता भंग पावलेलं आहे तर दुसर्‍या हाताने त्याने कपाल धारण केलेलं आहे. ज्या हातावर कपाल आहे, त्याच हाताच्या एका अनामिकेवर त्याने बकर्‍याचं मुंडकं अडकवलेलं आहे.
a
a
वेताळाला नक्षीदार कंबरपट्टा असून त्याजवर त्याने घंटांची मालाच धारण केलेली आहे. पूर्णपणे नग्न अशा त्याच्या देहावर ही माला विलक्षण खुलून दिसतेय. वेताळाच्या दोन्ही पायांत कंकणं असून पैंजणदेखील आहेत. त्याच्या उजव्या पायाशेजारी एक स्त्री सेविका असून डाव्या पायाजवळ एक खड्गधारी सेवक आहे.
a
वेताळाची ही सर्वात देखणी मूर्ती, अत्यंत भयप्रद, रौद्र. ह्या मूर्तीला कोणी शस्त्रं अर्पण केली नाहीत, कुणी वहाणा अर्पण केल्या नाहीत, कुणी बळी अर्पण केलेला नाही. त्याच्या गळ्यात मात्र कुण्या भाविकाने घातलेले काही पूर्ण सुकलेले तर काही कालपरवाचे असे झेंडूच्या फुलांचे हार आहेत. इतक्या दूरच्या रानात येऊन पोर्तुगीज मूर्तिभंजकापासून ह्या वेताळाने स्वतःचा संपूर्ण बचाव केलेला आहे.
a
a
a
लोलयेतील हा वेताळ एक अद्भुत अनुभूती देतो. केवळ ह्या मूर्तीसाठी इतक्या दूरवर आल्याचं सार्थक होतं. अक्षरशः झपाटून टाकणारी ही वेताळमूर्ती. यासम हीच. आजही लोलयेचा राखणदार म्हणून हा वेताळ उभा आहे माझ्यासारख्या दूरवरच्या मर्त्य मानवाला आकर्षित करत.

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2018 - 10:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली, नेहमीप्रमाणेच लेखन माहितीपूर्ण आहे, आवडले. वेताळ आवडले कसे म्हणायचे.
असले भयप्रद भुतं गावाचे संरक्षक होते गम्मत वाटते. गोव्याला गेलो तर पैंगलाला जाणे आले.

बाकी, या वेताळांवर अधिक माहितीपर तुम्हीच लिहू शकाल. तेव्हा त्याची एक चांगली
लेखमाला भविष्यात होऊ द्या. आभार.

-दिलीप बिरुटे
-

वा. वेताळाच्या मूर्ती प्रथमच बघितल्या. वेताळाखेरीज इतर मंडळीच्या ( - झोटिंग, पिशाच्च्य, मुंजा, हडळ, लावीण, ब्रम्हसमंध वगैरे) मूर्तीही कुठे आहेत का ?
याबद्दल गूगलताना काही मनोरंजक माहिती मिळाली, ती अशी:

ब्रह्मदेव – वेदपारंगत पण गर्विष्ठ ब्राह्मणाचे भूत.
समंध – ज्याला वारस नसतो व ज्याचे अंत्यसंस्कार विधियुक्त होत नाहीत तो, अथवा लोभी माणूस समंध होतो व तो आपल्या संपत्तीचा कोणाला उपभोग घेऊ देत नाही.
ब्रह्मसमंध – ब्राह्मण पण धनलोभी माणसाचे भूत मृत्यूनंतर तो आपल्या धनाचे रक्षण करतो. तो कोणाला पीडा देत नाही.
देवचार – लग्न झाल्यानंतर मेलेल्या शुद्राचे भूत गावातील भुते याच्या ताब्यात असतात.
मुंजा- सोड मुंज होण्यापूर्वी, मरण पावलेला ब्रह्मचारी ब्राह्मणाचे भूत, मुंजा पिंपळाच्या झाडावर राहतो व लोकांना पछाडतो.
गि-हा – पाण्यात बुडून मारणा-याचे अथवा ज्यांचा खून होतो याचे भूत. हा सामर्थ्यवान नसतो तो पाण्याच्या काठावर राहतो.
चेटक- शुद्र मनुष्याचे भूत असते.
झोटिंग- खारवी अगर कोळी अथवा मुसलमानाच्या भुतालाही झोटिंग म्हणतात. याला डोके नसते असा समज आहे.
वीर -अविवाहित क्षत्रीय पुरुषाचे भूत त्याला परदेशचे भूत म्हणतात.
म्हसोबा – हा भुतांचा राजा असून वेताळा इतकेच त्याचे सामर्थ्य असते. अनेक ठिकाणी याची देवळे असतात.
जाखीण- अळवत-बाळंतपणात अथवा सुवासिनीचे भूत. ही स्मशानात राहते. हिला अवगत असेही म्हणतात.
लावसट – विधवेचे भूत. स्मशान हे त्याच्या राहण्याचे ठिकाण.
हडळ – बाळंतीण झाल्यापासून दहा दिवसांच्या आत जी मृत्यू पावते, ती हडळ होते.
जिंद – कृपण पुरुषाचे भूत-मनुष्य किंवा सापाचे रूप धारण करते. आपल्या द्रव्याला हात लावू देत नाही.
पिलर- ठेंगणी व टोळय़ा करून हिंडणारी भुते. ती अपाय करणारी व उपकारकही असतात.
यदम कडताई- खूप मुलांच्या गरीब आईचे भूत.
कबंध – अनिच्छेने लढाईत जाऊन मेलेल्याचे भूत.
म्हैसासुर – रेडय़ाच्या आकाराचे भूत. हा भयंकर असतो.
कर्णपिशाच्च : विद्वान ज्योतिषी ब्राह्मणाचे भूत.
राणोबा – रानात राहतो, गाड्यांचे बैल सोडतो.
याशिवाय सटवाई, शाकिणी, तळखांबा, बापा, पाणीपात्र, सैतान, हिरवा, डाकण, कुष्मांड, खेचर, जाखरो, मारीच अशी ७० ते ८० विविध नावे असलेली भुते आहेत. (संदर्भ – भारतीय संस्कृती कोश)

ब्रह्मदेव? त्याला भूत करून टाकलं तुम्ही? तो बाप्पा आहे ना?

चित्रगुप्त's picture

7 Nov 2018 - 1:36 pm | चित्रगुप्त

ब्रह्मदेव? त्याला भूत करून टाकलं तुम्ही?

चोप्य्पस्ते आहे हो ते ताई. म्या पामर काय कुणाला भूत बनवणार ? तेही ब्रम्हाला ? कायतरीच.

तो ब्रह्मदेव का ब्राह्मणदेव?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्राह्मणदेवाची बरीच मंदिरे आहेत. पण मंदिरातील ब्राह्मणदेव म्हणजे भूत नक्कीच नसावे.

बरोबर, ब्राह्मण देव म्हणजे भूत नव्हे. ती रक्षक देवता आहे. घराण्याची रक्षक. कधी कधी घराण्याचा मूळ पुरुष वगैरे. बाहेरील बाधा वगैरे पासून आपल्या घराण्यातील सर्वांचे रक्षण करणारी, अथवा कोणी दूर प्रवासाला जाणार असले वा महत्त्वाच्या कामाला हात घालणार असेल, तर आधी ब्राह्मणाला साकडे घालतात. एकदा त्याची कृपा भाकली की मग कोणाचीच टाप नाही तुम्हांला त्रास द्यायची.

ब्राह्मणाच्या खूप हृद्य कथा कोकणपट्टी मध्ये ऐकायला मिळतील. प्रत्येकाची ब्राह्मणावर श्रद्धा असते. घराण्याचा रक्षक तो!

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 7:42 pm | प्रचेतस

ह्या ब्राह्मणाच्या रोचक कथांवर एक लेख अवश्य येऊ द्यात.

तुमचं kingdom तुम्हीच सांभाळा! =))

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 7:51 pm | प्रचेतस

=))

मला ह्यांची माहिती असती तर लिहिलं असतं हो नक्कीच. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2018 - 5:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही तर, "प्लँट किंगडम" व "अ‍ॅनिमल किंगडम" प्रमाणेच अख्खे होल "घोस्ट किंगडम "उभे केले आहे! =))

टर्मीनेटर's picture

6 Nov 2018 - 11:43 am | टर्मीनेटर

अप्रतिम लेख.
लोलयेतील वेताळमूर्ती खूप आवडली. माहिती आणि फोटो सुंदर.
धन्यवाद.

सुरेख लेख आणि साजेसे फोटो.
वेताळ मूर्ती सुंदर आहेत!
आमच्या आरवलीच्या वेतोबाचा का नाही फोटो टाकला? :|

जे वेताळ पाहिले आणि ज्यांची छायाचित्रे मी काढली आहेत तेच फोटो टाकले. तसे गोव्यात आमोणा, नेत्रावळी, प्रियोळ इकडेही वेताळ मंदिरे आहेतच.

प्रीत-मोहर's picture

6 Nov 2018 - 1:01 pm | प्रीत-मोहर

माझं गाव! !
आम्ही मात्र वेताळाचे फोटो काढु धजत नाही. माझ्या धाकट्या दिराचा रिसर्च या दैवतांवरच आहे

बिंधास्त फोटो काढा .. काही वाईट होणार नाही ...

श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नको.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2018 - 7:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुस्तक असेल तर सेंडवा प्लीज.

-दिलीप बिरुटे

प्रीत-मोहर's picture

6 Nov 2018 - 1:05 pm | प्रीत-मोहर

लोलयेचा वेताळ ज्यांच्या कुळागरात आहे ते आमचे पुरोहित. आणि प्रत्येक सणावाराला "बेतुबाब"ला आवाहन केल जातं. फक्त लोलये पैंगिण नाही तर उभा काणकोण बेतबाबाला संकटात पहिली हाक मारतो.

या पैंगिणच्या वेताळाचा टका आणि गड्यांचा उत्सव बघण्यासारखा असतो.

प्रीत-मोहर's picture

7 Nov 2018 - 1:01 pm | प्रीत-मोहर

हा उत्सव तिसालाने एकदा असतो. जत्रा/ गड्यांच्या उत्सवाच्या एक वर्ष आधी टका असतो. काही ठराविक घराण्यांतले पुरुष, शतकानुशतकांच्या ठरलेल्या वाटांवरुन पायी पायी पादत्राणं न घालता,पारंपारिक पोषाख व अन्य नियम पाळुन इतर दैवतांना गड्यांच्या जत्रेचं निमंत्रण देण्यास जातात त्याला टका म्हणतात.

गड्यांच्या जत्रेला बगाड टाईप असतं. त्याला तीन गडे बांधतात अन ते बगाड उंच नेतात. हे तीन गडे सात्विक आहार घेतात त्या जतरेच्या काही दिवस आधी.

टक्याच्या अन जत्रेच्या तारखा कळवते इथे लवकरच

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 6:31 pm | प्रचेतस

ह्या बगाडाचा खांब बहुधा पैगिणच्या वेताळ मंदिराच्या आवारातच आहे. मी पाहिला तो पण तेव्हा इथल्या बगाडाची कल्पना नव्हती.

प्रीत-मोहर's picture

8 Nov 2018 - 6:54 am | प्रीत-मोहर

हो करेक्ट. तोच तो खांब.

चालेल...

काही तरी अनवट बघीतल्याचे समाधान नक्कीच होईल...

कंजूस's picture

6 Nov 2018 - 1:28 pm | कंजूस

जाऊन बघावं लागणार.
लोलये कुठून कुठे जायचे कोणत्या मार्गावर?
सगळे वेताळ आवडले.

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 6:34 pm | प्रचेतस

पणजी कारवार महामार्गावरच. मडगावपासून साधारण ४० किमी. वेताळमूर्ती बघायला तीनेक किलोमीटर आत जावं लागतं. लोलयेला रेल्वेस्टेशन सुद्धा आहे. मात्र तिथे कुठल्या ट्रेन्स थांबतात ह्याची कल्पना नाही.

प्रीत-मोहर's picture

8 Nov 2018 - 6:51 am | प्रीत-मोहर

मालगाड्या अन मडगाव - कारवार intercity express थांबतात.

कंजूस's picture

6 Nov 2018 - 1:40 pm | कंजूस

इतर देवळे/ देव
१) नागरकोइल हे नागाचं देऊळ. ( नागर - नागाचे, कोईल - राजाचे घर, पण आता देऊळ हा अर्थ प्राप्त.) कन्याकुमारीपासून वीसेक किमीवर याच नावाचे गाव/शहर आहे.
तिथे गेलो, केरळच्या देवळात लुंगी नेसावी लागते म्हणून नेलेली ती नेसू लागलो देवळापाशी. तो एक माणूस हसला आणि खुणेनेच नको म्हणाला.
--
२) केरळच्या शंकराच्या देवळाच्या मुख्य देवाशिवाय बाहेर एक छोटेसे देऊळ असते त्याचे नाव "शास्ता" त्याचे दर्शन घेऊन मगच मुख्य देवाला पाहतात. तर हा शास्ता कोण हे माहीत करून घ्यायचे आहे.

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 3:36 pm | तुषार काळभोर

वेताळावर पण इतका छान लेख हाऊ शकतो!!

राही's picture

6 Nov 2018 - 4:40 pm | राही

नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर लेख.
जाता जाता: वेताळबांबार्डे हे ग्रामनाम त्यातल्या शब्दवैचित्र्यामुळे ध्यानात राहिले आहे. इथेही एक वेताळमूर्ती (होती) असेल का?

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 6:36 pm | प्रचेतस

नक्कीच असावी.
कोळव्याजवळील वेताळभाटी हे ग्रामनाम तिथल्या वेताळामुळेच आलेले आहे. येथील भग्न वेताळमूर्ती सध्या गोवा पुराणवस्तु संग्रहालयात आहे.

सुनील's picture

23 Nov 2018 - 9:44 am | सुनील

कोळव्याजवळील वेताळभाटी हे ग्रामनाम तिथल्या वेताळामुळेच आलेले आहे

बरोबरे. तसेच, जवळचे बाणावली (Benaulim) हे परशुरामाने बाणाने निर्माण केले, अशीही आख्ययिका सांगितली जाते.

आगळ्या विषयावरील लेख आवडला.

Nitin Palkar's picture

6 Nov 2018 - 5:17 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर, महितीप्रद आणि अभ्यासपूर्ण लेख. अप्रतिम फोटोज.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Nov 2018 - 5:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहिती आणि प्रकाशचित्रे !

प्रचेतस "कोणत्याही" मूर्तीवर रोचक लेख लिहू शकतात हे या लेखाने परत एकदा सिद्ध केले आहे !

नंदन's picture

6 Nov 2018 - 5:45 pm | नंदन

वेगळ्या विषयावरचा सुरेख लेख. काही विस्कळीत विचारः

१. नागरसंस्कृतीबाहेर असणार्‍या दैवताला/आदिबंधाला, आपल्यात सामावून घेणं हे तसं कायमच घडत आलेलं आहे - मात्र वेताळाच्या मूर्तीने आपलं राखलेलं वेगळेपण हे लक्षवेधक. थोडंफार एन्किडु/गिल्गामेश जोडीतल्या अनागर-नागर वेगळेपणासारखं.

२. वेताळाची लोकप्रियता ही तळकोकण आणि गोव्यात अधिक प्रमाणात दिसते. दक्षिण भारताशी असलेलं सान्निध्य आणि किर्र, दाटीवाटीच्या जंगलांचा भूगोल - आणि त्यातून ग्रामसंरक्षकदेवतेच्या प्रतीकाची निकड, ही यामागची कारणं असू शकतील का?

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 6:38 pm | प्रचेतस

२. वेताळाची लोकप्रियता ही तळकोकण आणि गोव्यात अधिक प्रमाणात दिसते. दक्षिण भारताशी असलेलं सान्निध्य आणि किर्र, दाटीवाटीच्या जंगलांचा भूगोल - आणि त्यातून ग्रामसंरक्षकदेवतेच्या प्रतीकाची निकड, ही यामागची कारणं असू शकतील का?

अगदी हेच कारण असावे असे मला वाटते.

पिवळा डांबिस's picture

8 Nov 2018 - 2:30 am | पिवळा डांबिस

वेताळाची लोकप्रियता ही तळकोकण आणि गोव्यात अधिक प्रमाणात दिसते. दक्षिण भारताशी असलेलं सान्निध्य आणि किर्र, दाटीवाटीच्या जंगलांचा भूगोल - आणि त्यातून ग्रामसंरक्षकदेवतेच्या प्रतीकाची निकड, ही यामागची कारणं असू शकतील का?

असू शकते. त्याहीपेक्षा तळ्कोकण/गोंयकरांशी असलेलं साम्य हेही कारण असू शकतं!
सरळ तर सूत नायतर तिठ्यावरचां भूत!!! :)

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2018 - 5:47 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त लेख.
लोलयेतील वेताळमूर्ती खतरनाक आहे. माहिती आणि फोटो सुंदर.
असे भन्न्नाट गुंगवून ठेवणारे लिहावे तर प्रचेतसनेच !
रसाळ लेखणीला कुर्निसात !

धन्स !

कंजूस's picture

6 Nov 2018 - 6:32 pm | कंजूस

वेताळाचेही आठ क्लोजअप, वेगळ्या कोनांतून.

माहितगार's picture

6 Nov 2018 - 6:56 pm | माहितगार

रोचक लेख

बोका's picture

6 Nov 2018 - 9:52 pm | बोका

दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर अनुक्रमणिका बघितली, वल्लींचा लेख दिसल्यावर सर्वात प्रथम तो वाचला !
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेखन.

कर्नाटकात बेलूर - हासन परिसरातील मंदिरे पहात असताना, अचानक वेताळांची जोडी भेटली.
दोड्डागड्डवळ्ळी गावात लक्ष्मी देवी मंदिरात गाभार्‍याच्या दोन बाजूंना हे सहा फूटी वेताळ उभे होते.
कमी उजेडामुळे फोटो वाईट आहेत.
अधिक माहीती ... https://kn.wikipedia.org/s/hvf
...

प्रचेतस's picture

7 Nov 2018 - 6:39 pm | प्रचेतस

दोन्ही वेताळमूर्ती जबरदस्त आहेत. भयानक सुंदर.

मुक्त विहारि's picture

6 Nov 2018 - 10:59 pm | मुक्त विहारि

च्यामारी, आम्ही आपले गोव्याला गेलो की भोजनालये शोधतो तर वल्ली मात्र वेताळमुर्ती आणि तत्सम मुर्ती शोधत बसतात.

असो,

ज्याची त्याची आवड.

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2018 - 8:51 am | प्राची अश्विनी

फार सुंदर लेख. वेताळाच्या गोष्टी ऐकत बालपण गेले. त्यामुळे अधीकच भावला.

नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण आणि रोचक लेख, यावेळी एक अनवट विषयावर. वेताळ !
बर्याच जुन्या मंदिरांत वेताळ मूर्ती पाहिल्या होत्या पण वरच्या फोटोंइतक्या नजरेत भरल्या नव्हत्या. आता मात्र वेताळ हीरो झाला आहे :)

मनिमौ's picture

8 Nov 2018 - 10:10 pm | मनिमौ

आता चारेक दिवसात गोव्याला जाणार आहे तेव्हा आवर्जून भेट देण्याचा प्रयत्न करेन.
यंदाच्या फेरीत तांबडी सुर्ला इथलं मंदिर टाॅपलिस्टीत आहे.

दुर्गविहारी's picture

9 Nov 2018 - 10:11 am | दुर्गविहारी

अप्रतिम माहिती. तुमच्या धाग्यामुळे उत्सुकता वाढली आहे. दक्षिण गोव्याची ट्रिप डोक्यात आहे, शक्य झाल्यास हा वेताळ बघणार. बाकी फोटो नेहमी प्रमाणेच सुंदर. फक्त आरवलीच्या वेतोबाचा उल्लेख हवा होता, कदाचित विषय गोव्यासंदर्भात असल्याने तो नसेल असे समजतो.

"आरवली" म्हणजे, चिपळूण आणि संगमेश्र्वराच्या मधले का?

हे आरवली वेंगुर्ल्याजवळचं.

अनिंद्य's picture

9 Nov 2018 - 11:34 am | अनिंद्य

@ प्रचेतस,

लेख आवडला. राजनजींच्या कॅमेराचा फॅन असल्यामुळे त्यांच्या ब्लॉगवर गोव्यातील 'वेतबाब'बद्दल थोडे वाचले होते, पण तुम्ही वेताळाबद्दल तुमच्या व्यासंगी शैलीत अगदी विस्तृत आणि रंजक लिहिले आहे.

चित्रगुप्त यांचे 'घोस्ट किंग्डम' धमाल आहे !

अभ्या..'s picture

9 Nov 2018 - 2:39 pm | अभ्या..

मस्त रे वल्लोबा,
एकच लंबर लेखन.

वेगळ्या विषयावरचा लेख आवडला. लोलयेची मूर्ती खरंच देखणी आहे!

वेताळाच्या पालखीच्या गोष्टी लहानपणी अनेकदा ऐकल्यात.