ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १०

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
7 Aug 2018 - 9:16 pm



रात्री लवकर झोपलो असल्याने सकाळी जाग पण लवकरच आली. फोन वर वेळ बघितली तर सात वीस झाले होते. आज फक्त आरामच करायचा असल्याने एवढ्या लवकर उठून काय करायचे म्हणून परत झोपायचा थोडा प्रयत्न केला, पण झोप काही लागली नाही. ह्या हॉटेलमध्ये पण ब्रेकफास्ट सकाळी आठलाच सुरु होत असल्याने सव्वा आठला तळमजल्यावर असलेल्या इन-हाउस रेस्टॉरंट मध्ये पोचलो.

हमादा नावाचा एक आफ्रिकन वंशाचा तरुण आणि त्याच्या मदतीला दुपारचं कॉलेज सांभाळून सकाळ-संध्याकाळ इथे पार्ट टाईम नोकरी करणारा खालिद नावाचा मुलगा ह्या रेस्टॉरंटची व्यवस्था बघत होते. हमादाने आणलेला नाश्ता करत असताना खालिद शेजारी उभा राहून माझ्याशी गप्पा मारत होता. किती दिवस मुक्काम आहे आणि इथे काय काय बघणार आहात वगैरे चौकशा केल्यावर त्याच्या वयाला साजेश्या ठिकाणी, म्हणजे नाईट क्लबला जरूर भेट देण्याची त्याने शिफारस केली आणि आणि जायचं असल्यास माझ्याबरोबर येण्याची तयारीही दर्शवली.

रेस्टॉरंटच्या मागे असलेल्या हॉटेलच्याच स्विमिंग पूल मध्ये काही पर्यटकांची दंगामस्ती चालू होती. मी पण तिथे जाऊन थोडावेळ डुंबावं अशी सूचना खालीदने केली पण आज मी कुठेच बाहेर जाणार नसल्याने आत्ता नं जाता संध्याकाळी जाईन असे त्याला सांगून तिथून निघालो आणि परत रूममध्ये आलो.

आत्तापर्यंत ईजिप्त मध्ये वास्तव्य केलेल्या कैरो आणि अस्वान मधल्या हॉटेल्सपेक्षा, छान मोठी रूम, किंग साईझ बेड, प्रशस्त बाथरूम, नाश्ता व जेवण मिळणारं इन-हाउस रेस्टॉरंट आणि स्विमिंग पूल अशा सर्व सोयी-सुविधांनी हे हॉटेल परिपूर्ण होते.

संपूर्ण दिवस मोकळा असल्याने इथेही अस्वान प्रमाणेच मस्तपैकी बाथटब मध्ये पडून राहून शाही स्नान वगैरे झाल्यावर ११:०० वाजता माहरुसला फोन केला. त्याने किती वाजता प्रतिनिधी पाठवू अशी विचारणा केली. मी आज दिवसभर रूमवरच थांबणार असल्याने कधीही प्रतिनिधी पाठव असे त्याला सांगितल्यावर, १२:०० वाजता हुसेन नावाच्या व्यक्तीला पाठवत असल्याचे त्याने सांगितले.

वेळ घालवण्यासाठी टी.व्ही. वर लागलेला ‘किल-बिल’ हा रक्तरंजित हाणामारीचा चित्रपट पहात असताना ११:५५ ला हुसेनचा तो खाली रिसेप्शन हॉल मध्ये माझी वाट बघत असल्याचे सांगणारा फोन आला.

खाली येऊन त्याला भेटल्यावर त्याने माझ्याकडे उपलब्ध असलेला वेळ आणि मी भेट देण्यासाठी नक्की केलेल्या ठिकाणां बद्दल विचारले. मला ईस्ना टेम्पल, लुक्झोर टेम्पल, कर्नाक टेम्पल, व्हॅली ऑफ किंग्स, हॅतशेपस्युत टेम्पल, हाबू टेम्पल आणि हॉट एअर बलून फ्लाईट करायची असल्याचे त्याला सांगितले.

उद्या सकाळी म्हणजे, ७ मार्चला टॅक्सी किंवा टूरिस्ट कारने इथून जवळपास साठ कि.मी. वर असलेले ईस्ना टेम्पल बघून बारा-साडे बारा पर्यंत परत येऊन, दुपारचे जेवण आणि थोडावेळ आराम केल्यावर तीन वाजताची ईस्ट बँक वरची कर्नाक टेम्पल आणि लुक्झोर टेम्पलचा समावेश असलेली हाफ डे सीट-इन-कोच टूर करावी.

त्यानंतर परवा म्हणजे ८ मार्चला पहाटे साडे पाच वाजता निघून हॉट एअर बलून फ्लाईट झाल्यावर हाबू टेम्पल, व्हॅली ऑफ किंग्स आणि हॅतशेपस्युत टेम्पलचा समावेश असलेली सकाळची हाफ डे सीट-इन-कोच टूर करावी असा कार्यक्रम हुसेनने तयार करून दिला.

माझ्या निवडीच्या सर्व गोष्टींचा समावेश असलेला हा कार्यक्रम मला पटला, आणि मी त्याला ईस्ना टेम्पल साठी त्याने सांगितलेला प्रायव्हेट टूरचा रेट अवाजवी वाटल्याने ती सोडून. बलून फ्लाईट आणि दोन्ही हाफ डे टूर साठीचे माझे बुकिंग कन्फर्म करण्यास सांगितले.

निघताना हुसेनने त्याचा एक मित्र नोकरी सांभाळून फावल्या वेळेत स्वतःची टॅक्सी चालवत असून तो तुम्हाला कमी भाड्यात ईस्ना टेम्पलला नेऊन आणू शकेल, जर तुमची इच्छा असेल तर त्याला फोन करून विचारुया का? अशी विचारणा केली. मी होकार दिल्यावर त्याने मोहम्मद नावाच्या त्याच्या मित्राला फोन केला आणि त्याला हॉटेलवर येण्यास सांगितले.

मोहम्मदला इथे पोचण्यासाठी १०-१५ मिनिटे लागणार असल्याने हुसेनच्या सूचनेनुसार तोपर्यंत वेळ काढण्यासाठी हॉटेलसमोर असलेल्या शिशा पार्लर मध्ये जाऊन बसलो. माझा चहा आणि हुसेनचा हुक्का संपत आला असताना पांढऱ्या आणि निळ्या रंगाची थोडी जुनाट टॅक्सी घेऊन मोहम्मद हॉटेलबाहेर पोचलेला दिसल्यावर हुसेनने त्याला हाक मारून पार्लर मध्ये बोलावले.

दिसायला थोडाफार, पण आवाज मात्र हुबेहूब आपल्या नसिरुद्दीन शाह सारखा असलेला हा मोहम्मद, कष्टाळू माणूस होता. लुक्झोर एअरपोर्ट वर ईजिप्त एअरचा ग्राउंड स्टाफ म्हणून कार्यरत असलेला हा गडी, बायको आणि चार मुले असे सहाजणांचे कुटुंब चालवताना अतिरिक्त कमाई करण्यासाठी फावल्या वेळात, त्याच्या वडलांच्या निधनानंतर त्यांची टॅक्सी चालवत होता. त्याने सांगितलेले भाडे वाजवी असल्याने त्याच्याबरोबर ईस्ना टेम्पलला जाण्याचे नक्की केले. सध्या त्याची रात्रपाळी सुरु असल्याने उद्या सकाळी आठ वाजता ड्युटी संपवून तो थेट साडे आठला मला पिक-अप करायला येणार होता.

ठरलेल्या दराच्या अर्धी रक्कम हुसेनला ॲडव्हांस देऊन त्या दोघांचा निरोप घेऊन मी रूमवर परतलो. टी.व्ही. बघत ऑफिसच्या इमेल्सना उत्तरे देत थोडावेळ घालवून अडीच वाजता रूम सर्व्हिसला फोन करून हक्का नुडल्स मागवून खाल्ले आणि मग साडे चार वाजेपर्यंत झोप काढल्यावर खाली स्विमिंग पूलमध्ये जायला निघालो.

कमाल खोली चार फुट असल्याने माझ्यासारख्या कामचलाऊ पोहता येणाऱ्यांसाठी आदर्श अशा त्या स्विमिंग पूलमध्ये तास-सव्वा तास डुंबण्यात गेल्यावर रूमवर येऊन शॉवर घेतला. आइस एज: कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट आणि डाय हार्ड असे कितीही वेळा बघितले तरी कंटाळा न येणारे दोन पिक्चर्स पाठोपाठ बघताना साडे नउ वाजता चीज पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड मागवून खाल्ले आणि पिक्चर संपल्यावर सकाळी सव्वा सात चा अलार्म लाऊन साडे दहाच्या आसपास झोपलो.


*****





सकाळी सव्वा सातला उठून तयार होऊन आठ वाजता नाश्ता करण्यासाठी खाली उतरलो. नाश्ता झाल्यावर चहा पीत असताना आठ पंचवीसला मोहम्मदचा तो हॉटेलच्या बाहेर उभा असल्याचे सांगणारा फोन आला. चहा संपवून बाहेर पडल्यावर गाडीत जाऊन बसलो आणि ईस्ना टेम्पलच्या दिशेने ६० कि.मी. चा प्रवास सुरु झाला.



Map

लुक्झोर मधून बाहेर पडल्यावर शेतीबहूल भागातून प्रवास करत नाईल वरचा एक भला मोठा पूल पार करून १० वाजता आम्ही ईस्ना शहरात पोचलो. पुलाच्या खाली ५-६ क्रुझ शिप्स उभी होती.

प्राचीन काळात ईजिप्त आणि सुदान मध्ये उंटांवर माल लादून खुश्कीच्या मार्गाने ये-जा करणाऱ्या व्यापारी आणि प्रवाशांच्या तांड्यांसाठी विश्रांती थांबा म्हणून ईस्ना (एस्ना) हे छोटे शहर प्रसिध्द होते. नाईल मधून लुक्झोर ते अस्वान दरम्यान प्रवास करणाऱ्या क्रुझ शिप्स साठी क्रॉसिंग पॉईंट याठिकाणी असल्याने सगळी क्रुझ शिप्स इथे नांगर टाकून पुढचा मार्ग मोकळा मिळण्यासाठी सिग्नलची वाट पहात थांबतात.

मंदिराच्या अगदी जवळ गाडी नेणे शक्य नसल्याने थोडे आधीच मी खाली उतरून प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत निघालो. मोहम्मद मी परत येईपर्यंत जिथे गाडी लावली होती तिथे समोरच असलेल्या शिशा पार्लर मध्ये थांबणार होता. ५० पाउंडसचे तिकीट काढून सुमारे तीस फुट खाली मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या उतरायला लागलो.



Esna entry ticket




Esna 1




esna2




ई.स.पूर्व पंधराव्या शतकात याठिकाणी बांधून ख्नुम ला समर्पित केलेल्या अतिप्राचीन मंदिराचा टॉलेमिक राजवटीत तिसऱ्या शतकापर्यंत विस्तार केला गेला. हजारो वर्षात आलेल्या पूर व भूकंपांमुळे वाळू आणि स्वतःच्याच अवषेशांखाली गाडले गेलेल्या ह्या मंदिराचा ९ मीटर खोल उत्खनन करून मोकळा केलेला, २४ खांब असलेला टॉलेमिक राजवटीत बांधलेला भव्य सभामंडपच फक्त बघायला मिळतो. (बाकीच्या भागावर घरे आणि मोठ्या इमारती उभ्या आहेत.)

एलिफंटाईन आयलंडवरचे ख्नुम देवाचे मंदिर नष्ट झाले असले तरी ईस्नाचे त्याचे मंदिर मात्र खूपच सुस्थितीत आहे. २४ खांबांवर कोरलेली रंगीत पाना-फुलांची नक्षी, हायरोग्लीफिक लिपीतला मजकूर, छत आणि भिंतींवरील रंगीत शिल्पे अतिशय प्रेक्षणीय आहेत. हजारो वर्षांपूर्वी वापरलेले रंग अजूनही टिकून आहेत हे बघून आश्चर्य वाटते.

ईस्ना येथील ख्नुम मंदिराची काही छायाचित्रे.



.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.

मंदिर बघून पावणे अकराला मोहम्मद थांबलेल्या शिशा पार्लर मध्ये आलो आणि चहा पिऊन तिथून परत लुक्झोरला जाण्यासाठी आम्ही निघालो. आज रात्रपाळीला जाऊन आल्यावर उद्या आणि परवा त्याला सुट्टी असल्याने पुढचे दोन दिवस लुक्झोर मध्ये भटकंती करायला तो आणि त्याची टॅक्सी माझ्या दिमतीस हजर असल्याची माहिती मोहम्मदने दिली.


Me & Mohammad

मी आणि मोहम्मद.



रस्त्यात एके ठिकाणी १ फलाफेल आणि १ फ्राईड पोटॅटो सँडविच पार्सल घेतल्यावर साडेबाराला मला हॉटेलवर सोडून नाईट शिफ्ट संपल्यावर ईजिप्त एअरच्या गणवेषातच आलेला मोहम्मद उद्या संध्याकाळी भेटू असे सांगून झोपायला घरी निघून गेला.

रूमवर येऊन फ्रेश झाल्यावर सँडविचेस खाऊन थोडावेळ टी.व्ही. बघत लोळत पडलो असताना हुसेनचा फोन आला. कशी झाली ईस्नाची टूर वगैरे विचारून झाल्यावर दुपारी तीन वाजता पिक-अप असल्याची आठवण करून देऊन संध्याकाळी जमलं तर भेटतो म्हणाला.

दीड वाजून गेला होता त्यामुळे आता झोपण्यात काही अर्थ नव्हता म्हणून व्हॉट्सॲप, फेसबुकवर थोडावेळ आणि भरपूर जमा झालेले लाईफस संपवत कॅन्डी क्रश खेळत पावणे तीन पर्यंत टाईमपास केला आणि मग तयारीला लागलो.

बरोब्बर तीन वाजता रिसेप्शन वरून पिक-अप साठी ड्रायव्हर आला असल्याचे सांगणारा फोन आला आणि मी खाली उतरलो.

ड्रायव्हर अहमद नावाचा म्हातारा माणूस होता. पहिला पिक-अप माझा झाल्यावर पुढे तीन वेगवेगळ्या हॉटेल्स मधून एक चीनी, एक थाई आणि एक फिलिपिनो जोडपे अशा सहा पर्यटकांना सामावून घेत कर्नाक टेम्पलच्या दिशेने आम्ही निघालो.

साडेतीनला कर्नाक टेम्पलच्या प्रवेशद्वारापाशी आमची वाट बघत उभा असलेला इमाद नावाचा ईजिप्तोलॉजीस्ट गाईड व्हॅनमध्ये येऊन बसला. गाडीची तपासणी पार पाडून आम्ही २०० एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या भल्या मोठ्या मंदिर संकुलात प्रवेश केला. पार्किंग लॉट मध्ये पोचल्यावर जवळच्या तिकीट काउंटरवर जाऊन इमाद आमच्या सात जणांची तिकिटे घेऊन आला. इथे प्रत्येकी १२० पाउंडस एन्ट्री फी होती.


Karnak Entry Ticket

ई.स.पूर्व विसाव्या शतकात बाराव्या राजवंशाचा दुसरा फॅरोह सेनुसरेत I पासून या ठिकाणी मंदिरे बांधण्याची सुरु झालेली परंपरा टॉलेमिक राजवटी पर्यंत दोन हजार वर्षे चालू होती. प्राचीन काळी सोळा लहान मोठ्या मंदिरांचा समावेश असलेल्या ह्या संकुलामुळे हा परिसर मंदिरांचे शहर म्हणून ओळखला जात असे.


karnak1




karnak2




karnak3




karnak4


मुख्यत्वे ‘अमुन रा’ देवाच्या मंदिरासाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्या मंदिर संकुलात ‘मुट’ आणि ‘मोन्तु’ ची मंदिरे आहेत, तसेच फॅरोह अमेनहोटेप-४ चे बांधल्यानंतर लगेचच जाणीवपूर्वक पाडून टाकलेले मंदिर देखील आहे परंतु हे मंदिर पर्यटकांना बघण्यासाठी सध्यातरी खुले नाहीये.

अनेक गोपुरे आणि ओबिलीस्कचा समावेश असलेल्या ह्या संकुलातील अमुन रा च्या मंदिराचा फॅरोह सेटी I आणि फॅरोह रॅमसेस II ह्या पिता पुत्रांनी बांधलेला १३४ खांबी, ५४००० चौरस फुट आकाराचा कालौघात छप्पर नष्ट झालेला विशाल सभामंडप खूपच प्रेक्षणीय आहे. सभामंडपाच्या मागे एक मोठे तळे असून ते फार पवित्र मानले जात होते.

प्राचीन काळी शेतीचा हंगाम संपल्यावर थकलेल्या जमिनीला पुन्हा उर्जा प्राप्त होऊन पुढच्या हंगामात भरघोस पिकोत्पादन मिळावे म्हणून दरवर्षी सत्तावीस दिवस चालणारा ‘ओपेत’ नावाचा उत्सव साजरा करण्याची ह्या मंदिरात प्रथा होती.

अमुन रा च्या मूर्तीला पवित्र तळ्यातील पाण्याने अंघोळ घालून नवीन वस्त्रे आणि सोन्या-चांदीच्या अलंकारांनी सुशोभित करून तिची बोटीच्या आकाराच्या पालखीतून इथून अडीच कि.मी. अंतरावरच्या लुक्झोर मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली जात असे.


कर्नाक मंदिराची काही छायाचित्रे.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.



प्राचीन काळी कर्नाक टेम्पल आणि लुक्झोर टेम्पल ला जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मानवी शिराचे हजारो स्फिंक्स होते म्हणून हा रस्ता पुढच्या काळात स्फिंक्स अव्हेन्यू म्हणून ओळखला जात होता. हजारोंपैकी खूपच थोडे स्फिंक्स आता या रस्त्यावर उरले असून बऱ्याचशा भागावर इमारती आणि घरे उभी राहिली होती. पुरातत्व खात्यातर्फे हि नंतरची झालेली बांधकामे पाडून टाकण्यात आली असून त्या संपूर्ण रस्त्यावर उत्खननाचे काम सुरु आहे. सुमारे ८५० प्राचीन स्फिंक्सचे अवशेष सापडले असून हा रस्ता पुन्हा दुतर्फा स्फिंक्स बसवून पूर्वी सारखाच करण्याची ईजिप्त सरकारची योजना आहे.


पाच वाजता हे मंदिर पाहून आम्ही पुन्हा गाडीजवळ आलो आणि लुक्झोर टेम्पलच्या दिशेने प्रवास सुरु झाला.दहा मिनिटांत लुक्झोर टेम्पलला पोचल्यावर इमाद आमची प्रत्येकी १०० पाउंडस किमतीची तिकिटे घेऊन आला आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला.


Luxor Entry Ticket


अठराव्या राजवंशातला फॅरोह अमेनहोटेप III ह्याने बांधायला सुरुवात केलेल्या लुक्झोर मंदिराचा पुढे तुत-अंख-अमुन आणि रॅमसेस II ने विस्तार केला. ईजिप्त मधल्या अनेक प्राचीन आणि भव्य मंदिरांपैकी एक असलेले लुक्झोर टेम्पल एका गोष्टीसाठी इतरांपेक्षा वेगळे आहे. बाकीची मंदिरे हि एकतर कुठल्यातरी देवाला अथवा फॅरोह ला समर्पित केलेली किंवा कुठल्यातरी फॅरोहचे अंत्यसंस्कार मंदिर म्हणून ओळखली जातात पण लुक्झोर मंदिर हे नवीन फॅरोहच्या राज्याभिषेकासाठी बांधलेले होते. ह्या मंदिरात नवीन राजाने मुकुट परिधान करून राज्याची सूत्रे हाती घेण्याची परंपरा होती.


Luxor 1


ओपेत उत्सवात मिरवणूक काढून आणलेली अमुन रा ची मूर्ती थोड्या वेळासाठी ह्या मंदिरात ठेवली जात असे आणि फॅरोह उत्सवासाठी जमलेल्या प्रजाजनांना याठिकाणी मेजवानी देत असे.

चौथ्या शतकात रोमन लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर ह्या मंदिरातला आतला भाग चर्च म्हणून वापरला जात होता. तिथल्या भिंतीवर रंगवलेली काही चित्रे प्रेक्षणीय आहेत.

त्यानंतर मुस्लीम राजवटीत डाव्या बाजूच्या काही भागाचे मशिदीत रुपांतर केले गेले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर पूर्वी दोन ओबिलीस्क होते त्यातला एक आजही मूळ ठिकाणी उभा आहे तर दुसरा आता पॅरिस मधल्या ‘प्लेस डी ला कॉनकॉर्ड’ (Place de la Concorde) चौकात उभारला आहे.


लुक्झोर मंदिराची काही छायाचित्रे.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.


.

इमाद्च्या मार्गदर्शनाखाली, बयानी आणि कॅरेन ह्या अभ्यासू फिलिपिनो जोडप्याच्या साथीने हि दोन्ही मंदिरे बघायला मजा आली. इमाद्ची गाईड करण्याची पद्धत छान होती. आधी तो सगळ्या वस्तू आणि वास्तूंची संपूर्ण माहिती द्यायचा आणि नंतर फोटो काढण्यासाठी मोकळा वेळ द्यायचा. नशिबाने माझ्या उद्याच्या वेस्ट बँक टूरवर सुद्धा गाईड म्हणून इमादच येणार असल्याचे त्याने सांगितल्यावर मला जरा जास्त आनंद झाला.


Luxor 2

मी, बयानी आणि कॅरेन.



हे मंदिर पाहून बाहेर पडल्यावर परत जाताना आधी तिन्ही जोडप्यांना त्यांच्या हॉटेलवर सोडल्यावर शेवटी सात वाजता मला माझ्या हॉटेलवर सोडून इमाद आणि अहमद निघून गेले.

रूमवर येऊन टी.व्ही. बघत बसलो असताना हुसेनचा फोन आला. काहीतरी काम निघाल्याने तो आत्ता येऊ शकत नसून उद्या सकाळी हॉट एअर बलून फ्लाईट साठी साडेपाचला पिक-अप असून त्यावेळेस तयार राहण्याची सूचना त्याने दिली.

उद्या सकाळी फारच लवकर उठायचे असल्याने रूम सर्व्हिसला फोन करून ऑम्लेट ब्रेड मागवून खाल्ला आणि पहाटे पावणे पाचचा अलार्म लाऊन साडेनऊ च्या सुमारास पहिल्यांदाच अनुभवायची असलेल्या बलून फ्लाईटच्या कल्पना करता करता झोपून गेलो.





क्रमश:


संजय भावे
(उर्फ ‘टर्मीनेटर’)

प्रतिक्रिया

सुरेख फोटो! ह्या जागांच्या संबंधित माहिती अजून विस्ताराने लिहाल का? तुमच्या गाईडने तुम्हांला काय काय सांगितले वगैरे वाचायला आवडेल. फोटो सुरेख आले आहेत! भग्नावशेष सुद्धा इतके देखणे व भव्य आहेत तर जेव्हा ही मंदिरे/ स्थळे चांगल्या अवस्थेत होती, तेव्हा किती देखणे दिसत असेल सर्व!

जेम्स वांड's picture

8 Aug 2018 - 11:41 am | जेम्स वांड

प्रथमतः मागच्या काही भागांवर नेहमीप्रमाणे प्रतिसाद न देता आल्यामुळे माफी असावी. पण सगळे भाग मी खूप नीटपणे फॉलो करतोय इतकी पोचपावती देतोय तितकी ठेऊन घ्याल. दुसरं म्हणजे त्या भरपूर साऱ्या स्फिंक्स मधील मेष मस्तकी स्फिंक्स एकदम वेगळेच भासले, मेंढा कुठल्या इजिप्शियन देवाचे वाहन/प्रतिक वगैरे होता का? पवित्र मानला जात असे का?? ह्या विविक्षित मेषमस्तकी स्फिंक्स बद्दल गाईडने काय सांगितले होते? ते वाचायला आवडेल.

धन्यवाद जेम्स वांडजी, मेंढा ज्याला प्राचीन ईजिप्त मध्ये 'रॅम' म्हणून ओळखले जात होते तो ख्नुम देवाचे प्रतिक मानला जात असे (ख्नुम चे मस्तक मेंढ्याचे दर्शवले जाते) तसेच कर्नाक मंदिर हे मुख्यत्वे अमुन रा म्हणजे सूर्यदेवाचे मंदिर असल्याने अतिप्राचीन काळी काही भागांमध्ये 'रॅम', जो अमुन रा चे प्रतिक मानला जात होता, त्याचे शीर असलेले स्फिंक्स ह्याठिकाणी मंदिराचे रक्षणकर्ते म्हणून स्थापन केले होते. सुर्यपूजक फॅरोह रॅमसेस II चे नाव देखील पवित्र रॅम वरूनच ठेवले गेले होते.

धन्यवाद याशोधराजी, वास्तविक हि सगळी स्थळे स्वतंत्र लेखाचा विषय आहेत. पुढे मागे वेळ मिळाला तर प्रत्येकावर लेख लिहिण्याची इच्छा आहे.

भग्नावशेष सुद्धा इतके देखणे व भव्य आहेत तर जेव्हा ही मंदिरे/ स्थळे चांगल्या अवस्थेत होती, तेव्हा किती देखणे दिसत असेल सर्व!

अगदी खरं आहे. मार्क मिलमोर नावाच्या अमेरिकन कलाकार प्रवाशाने भरपूर अभ्यास करून प्राचीन काळी कर्नाक मंदिर कसे दिसत असेल ह्याची काही कल्पना चित्रे तयार केली आहेत त्यातली दोन खाली उदाहरणार्थ देत आहे.

यशोधरा's picture

8 Aug 2018 - 3:31 pm | यशोधरा

वा! सुंदर!

लोनली प्लॅनेट's picture

9 Aug 2018 - 10:29 am | लोनली प्लॅनेट

फार म्हणजे फारच सुंदर
Awesome

टर्मीनेटर's picture

9 Aug 2018 - 10:39 am | टर्मीनेटर

धन्यवाद लोनली प्लॅनेट. _/\_

अनिंद्य's picture

8 Aug 2018 - 1:15 pm | अनिंद्य

@ टर्मीनेटर,

बहुप्रतिक्षित भाग आला, सचित्र सफर आवडली.

प्रतिसादातल्या मार्क मिलमोरच्या कल्पनाचित्रांसाठी विशेष आभार !

आता हॉट एअर बलून फ्लाईट..... वाट पाहायला लावणार पुढच्या भागाची चित्रे. ड्रोन, बलून, हेलिकॉप्टर, सीप्लेन आणि एलए फोटोग्राफी खूप आवडते आपल्याला. त्यात तुमचा कॅमेरा म्हणजे मजा येणार बघा.

पु भा प्र,

अनिंद्य

टर्मीनेटर's picture

8 Aug 2018 - 1:25 pm | टर्मीनेटर

@ अनिंद्य. अनेक आभार _/\_

मस्त चालूये सफर. आधीचेदेखिल सर्व भाग अतिशय आवडले.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

टर्मीनेटर's picture

8 Aug 2018 - 2:59 pm | टर्मीनेटर

धन्यवाद पुंबाजी. _/\_

सिरुसेरि's picture

8 Aug 2018 - 4:40 pm | सिरुसेरि

छान लेखन .

टर्मीनेटर's picture

8 Aug 2018 - 7:05 pm | टर्मीनेटर

धन्यवाद सिरुसेरिजी _/\_

प्रचेतस's picture

8 Aug 2018 - 5:51 pm | प्रचेतस

खूपच जबरदस्त झालाय हा भाग.
ही मंदिरसंकुलं निर्विवादपणे देखणी आहेत. हॅट्स ऑफ तुम्हाला ह्या भागासाठी.

टर्मीनेटर's picture

8 Aug 2018 - 7:06 pm | टर्मीनेटर

धन्यवाद प्रचेतसजी _/\_

कंजूस's picture

8 Aug 2018 - 6:22 pm | कंजूस

मजाच आहे.

टर्मीनेटर's picture

8 Aug 2018 - 7:06 pm | टर्मीनेटर

@ कंजूस :) :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Aug 2018 - 10:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर कोरीवकाम व स्थापत्य असलेली मंदीरे आहेत ही ! मार्क मिलमोरची चित्रे पाहून, ती मंदिरे त्यांच्या उत्कर्षकालात किती सुंदर आणि प्रभावशाली असावित याची कल्पना करता येते !

आता, हॉट एअर बलूनमध्ये बसून तुमच्या कॅमेर्‍यातून प्रकाशचित्रे बघायचे वेध लागले आहेत !

टर्मीनेटर's picture

9 Aug 2018 - 9:48 am | टर्मीनेटर

धन्यवाद डॉक्टर _/\_

अतिशय सुरेख सुरु आहे लेखमाला. आवर्जून फाॅलो करते आहे. इजिप्त फार दिवसांपासून खुणावते आहे. लेखमाला वाचल्यानंतर तर बकेटलिस्टमध्ये अगदी वर आणून ठेवले आहे!

धन्यवाद अजया जी, तुमच्या ईजिप्त भेटीसाठी खूप खूप शुभेच्छा.

रंगीला रतन's picture

10 Aug 2018 - 5:05 pm | रंगीला रतन

वरती प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे खरंच खूप जबरदस्त झालाय हा भाग! कल्पनाचित्रे भन्नाटच आहेत. पुढच्या भागाची वाट बघत आहे!

रमता जोगी's picture

10 Aug 2018 - 6:31 pm | रमता जोगी

तुमचं प्रवासवर्णन खूपच मस्त चाललंय. वाचताना अगदी गुंगून जायला होतंय.

अवांतर - तुम्हांला फलाफेल शिवाय इतर शाकाहारी पदार्थ मिळाले नाहीत का? कोशरी सोडून. तसंच लबान म्हणजे आपलं ताक मिळत नाही का तिकडे? मिडल इस्टर्न देशात मिळतं असं ऐकून आहे.

टर्मीनेटर's picture

10 Aug 2018 - 11:43 pm | टर्मीनेटर

धन्यवाद रमता जोगी जी, तुम्ही म्हणता तसे लबान कुठे नाही मिळाले . योगर्ट प्रय्तेक ठिकाणी होतंआणि फ्रुट ज्यूस मध्ये खूप व्हरायटीज मिळाल्या.

दुर्गविहारी's picture

11 Aug 2018 - 1:22 pm | दुर्गविहारी

उत्तम झाला आहे हा भाग. याविषयीची आणखी सविस्तर माहिती वाचायला आवडेल. याशिवाय त्या देशाच्या लोकजीवनाविषयी तुमची निरीक्षणे वाचायला आवडतील. एकदंरीत खाद्यसंस्कृती, लोकांचे रहाणीमान वैगरे हे हि येउ द्यात. पु.ले.शु.

टर्मीनेटर's picture

11 Aug 2018 - 8:17 pm | टर्मीनेटर

धन्यवाद दुर्गविहारीजी ,शेवटच्या भागात ह्याविषयी माहिती देणार आहे .

खूप छान सुरू आहे ही मालिका. फोटोही मस्त आहेत. हा भाग विशेष आवडला. अवशेषांबद्दल अधिक वाचायला मलाही आवडेल.

टर्मीनेटर's picture

12 Aug 2018 - 2:34 pm | टर्मीनेटर

धन्यवाद निशाचरजी.

एक_वात्रट's picture

16 Aug 2018 - 6:57 pm | एक_वात्रट

१२० इजिप्शियन पौंड म्हणजे जवळजवळ ५०० रुपयांना एक तिकीट. ४ लोकांचे कुटुंब असेल तर त्यांचे २००० रुपये होतात. हा खर्च थोडा जास्त वाटत नाही का? म्हणजे इजिप्त सहलीत तिकीटांच्या खर्चासाठी वेगळे पैसे काढून ठेवायला हवेत असं वाटतंय.

बाकी लिखाण (नेहमीप्रमाणेच) उत्तम. व्यक्तींची चित्रदर्शी वर्णने करण्याची आणि छोटेछोटे प्रसंग खुलवून सांगण्याची तुमची हातोटी विलक्षण आहे.

एक_वात्रट's picture

16 Aug 2018 - 7:00 pm | एक_वात्रट

प्रवास करण्यातला आपला सराईतपणा पाहून आपण असे अनेक परदेशप्रवास केले असावेत असे का कोण जाणे उगीचच वाटते आहे. त्यांचीही प्रवासवर्णने लिहिलीत तर वाचायला जाम मजा येईल! बघा वेळ मिळाला तर!

धन्यवाद एक_वात्रट. आपल्या पहिल्या प्रतिसादात म्हंटल्या प्रमाणे परदेशी पर्यटकांसाठी तिकिटांची किंमत खरंच जास्त आहे. संख्येने कमी पर्यटन स्थळे असतील तर एकवेळ ठीक होते परंतु इथे ज्या संख्येने ती आहेत त्यामानाने ती नक्कीच महाग वाटतात. पण ईजिप्शिअन नागरिकांना आणि कुठल्याही देशाच्या विद्यार्थ्यांना खूपच सवलतीच्या दरात प्रवेश मिळतो. तसा हा प्रकार सगळीकडेच चालतो म्हणा, उदाहरणार्थ आपल्या इथे ताज महाल बघण्यासाठी भारतीय नागरिकांना ५० रुपये असलेली एन्ट्री फी परदेशी नागरिकांसाठी ५४० ते ११०० रुपये आहे.
आणि दुसऱ्या प्रतिसादातल्या विनंतीला मान देऊन तसे करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. :)