राजयोग - १६

Primary tabs

रातराणी's picture
रातराणी in जनातलं, मनातलं
8 Aug 2018 - 4:13 am

शेवटी एकदाचे रघुपती आणि नक्षत्रराय राजमहलला पोचले. पराजित होऊन पळून आल्यावर शुजा नवीन सैन्याची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करीत होता, पण राजकोष रिकामा झाला होता. प्रजा कराच्या ओझ्याने त्रस्त होती. याच दरम्यान दाराचा पराजय आणि नंतर त्याची हत्या करून औरंगजेब दिल्लीच्या सिंहासनावर बसला. ही बातमी शुजाला मिळताच तो अस्वस्थ झाला. पण सैन्याची तयारी झाली नव्हती, काहीतरी करून अजून वेळ काढता यावा म्हणून त्यानं एक दूत औरंगजेबाकडे पाठवला. दूताजवळ सांगितलं, 'सर्वांच्या डोळ्यांची ज्योती, हृदयातील आनंद, परमप्रिय बंधू औरंगजेब सिंहासन मिळवण्यात यशस्वी झाला, शुजाच्या मृत शरीराला जणू संजीवनी मिळाली - आता बंगालच्या राज्यकारभाराची जबाबदारी नवीन सम्राटांनी घेतली की शुजाचा आनंद द्विगुणीत होईल.' औरंगजेबाने अतिशय अगत्यपूर्वक दूताचे आदरातिथ्य केले. शुजाच्या तब्येतीची, मनस्वास्थ्याची आणि कुटूंबाची प्रेमाने चौकशी केली. उत्तर म्हणून दूताजवळ सांगितलं, "जेव्हा स्वतः सम्राट शाहजहाननी शुजाला बंगालच्या राज्यकारभारासाठी निवडलं आहे तर माझ्या वेगळ्या आज्ञापत्रकाची काय आवश्यकता?" दरबारात दूत नवीन सम्राटांचा निरोप सांगतच होता, त्याचवेळेस रघुपती तिथे उपस्थित झाला.

शुजाने कृतज्ञता आणि सन्मानपूर्वक त्याला संकटातून वाचवणार्याचे स्वागत केले आणि म्हणाला, "काय बातमी आहे?"

रघुपती म्हणाला, "बादशाहकडे एक विनंती आहे."

शुजाने मनातल्या मनात विचार केला, "आता विनंती आणि कसली? आता यानं काही धन मागितलं नाही तर बरं!"

रघुपती सांगू लागला, "माझी प्रार्थना ही आहे की.."

शुजा म्हणाला, "ब्राह्मण तुझी प्रार्थना मी नक्की पूर्ण करेन. फक्त काही दिवस धीर धर. सध्या राजकोषात फारसं धन नाही."

रघुपती - "शहेनशाह, सोन्याचांदीच्या किंवा इतर कुठल्याही गोष्टीच्या अपेक्षेने मी आपल्याकडे आलो नाही. या क्षणी मला फक्त तळपत्या तलवारीवर लालबुंद रक्त पहायचं आहे. माझी तक्रार काय ते ऐकून घ्या, तुम्ही न्याय करावा हीच माझी प्रार्थना आहे."

शुजा म्हणाला, "कठीण समस्या आहे. आत्ता न्याय करायला माझ्याकडे वेळ नाही. ब्राह्मण तू चुकीच्या वेळी आला आहेस."

रघुपती - "राजकुमार, वेळ तर वाईट वेळाचीसुद्धा असते. तुम्ही बादशाह आहात, तुमची वेळ आहे; आणि मी एक दरिद्री ब्राह्मण, माझीही आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार न्याय करायला बसाल पण तोपर्यंत माझी वेळ निघून गेली असेल, त्याचं काय?"

शुजा वैतागून म्हणाला, "कठीण आहे. इतकं काही ऐकण्यापेक्षा तुझी तक्रार ऐकलेली बरी. सांग काय सांगायचं आहे ते."

रघुपती - "त्रिपुराचे महाराज गोविंदमाणिकय यांनी त्यांचे छोटे बंधू नक्षत्रराय यांना काहीही अपराध नसताना राज्यातून निर्वासित केलं आहे.."

शुजा चिडून म्हणाला, "अरे ब्राह्मणा, तू दुसऱ्या कुणाची तक्रार घेऊन माझा वेळ कशाला वाया घालवत आहेस? आता या सगळ्याचा न्याय करायला मला वेळ नाही."

रघुपती - "फिर्यादी राजधानीत उपस्थित आहे."

शुजा - "जेव्हा तो स्वतः इथे येऊन आपल्या तोंडाने तक्रार करेल तेव्हा विचार केला जाईल."

रघुपती - "केव्हा घेऊन येऊ त्याला इथे?"

शुजा - "ब्राह्मण काही पिछा सोडणार नाही. बरं, एक आठवड्याने ये घेउन त्याला."

रघुपती - "जर बादशाहानी आज्ञा केली तर उद्याच घेऊन येतो."

शुजा त्याच्यावर जवळजवळ खेकसला, "बरं, आण उद्याच." कमीत कमी आजच्या दिवस तरी सुटका!

रघुपती निरोप घेऊन बाहेर पडला.

नक्षत्रराय रघुपतीला म्हणाला, "नवाबाच्या समोर जायचं आहे. रिकाम्या हाताने कसं जाणार? नजराणा काय नेऊ?"

रघुपती त्याला म्हणाला, "त्याची काळजी तू करू नको."

बादशहाला नजराणा देण्यासाठी त्याने दीड लाख मुद्रांचा कुठूनतरी बंदोबस्त केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी धडधडत्या हृदयाने रघुपती नक्षत्ररायला घेऊन शुजाच्या दरबारात पोचला. दीड लाख मुद्रांचा नजराणा नवाबाच्या पायाशी ठेवला, तेव्हा मात्र रघुपतीला नवाबाचा चेहरा आधीसारखा वैतागलेला, नाराज वाटला नाही. नक्षत्ररायची तक्रार तर त्याला अगदी सहज समजली. शुजा त्यांना म्हणाला, "आता तुम्हाला काय हवं आहे, ते सांगा."

रघुपती म्हणाला, "गोविंदमाणिकयना निर्वासित करून नक्षत्ररायला त्रिपुराचा राजा केलं जावं अशी आज्ञा द्या."

शुजाला आपल्या स्वतःच्या भावाबरोबर सिंहासन मिळवण्यासाठी चढाओढ करताना काहीच गैर वाटलं नव्हतं, पण का कुणास ठाऊक याबाबतीत हस्तक्षेप करावा हे काही त्याच्या मनाला पटलं नाही. पण आता या क्षणी रघुपतीची प्रार्थना मान्य करणंच योग्य आहे नाहीतर पुन्हा त्याची बडबड ऐकायला लागेल. झालंच तर दीड लाख मुद्रांचा नजराणा घेतल्यानंतरही नाही म्हणणं बरोबर दिसत नाही असा विचार करून तो म्हणाला,

"ठीक आहे. गोविंदमाणिकयचे निर्वासन आणि नक्षत्ररायच्या राज्याभिषेकाचं आज्ञापत्र तुम्हाला देतो. ते घेऊन जा."

रघुपती म्हणाला, "बादशाहचे काही सैनिकही बरोबर द्यावे लागतील."

शुजा ठामपणे म्हणाला, "नाही, नाही. ते मात्र शक्य नाही. मला आता युद्ध करणं मुळीच शक्य नाहीये."

रघुपती म्हणाला, "मी अजून छत्तीस हजार रुपये युद्धखर्चासाठी ठेऊन जातो. नक्षत्ररायचा राज्याभिषेक होताच एक वर्षाचा खजिना सेनापतीबरोबर पाठवून देईन."

हा प्रस्ताव शुजाला अगदी योग्य वाटला, सर्व मंत्रीही विनातक्रार सहमत झाले.

रघुपती आणि नक्षत्रराय मुघल सैनिकांची एक तुकडी बरोबर घेऊन त्रिपुराला निघाले.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

8 Aug 2018 - 8:48 am | प्रचेतस

खूप दिवसांनी आला हा भाग. कहाणी एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचली आहे.

ट्रम्प's picture

8 Aug 2018 - 9:51 am | ट्रम्प

माननीय संपादक मंडळ ,
विनंती विशेष :- सदर धाग्यांची अनुक्रमणिका लावण्यात येऊन तमाम मिपाकरांना एकाच टिचकी वर बाकीचे राजयोग 1 ते 15 एकत्र वाचण्याची सोय करण्यात यावी .

यशोधरा's picture

8 Aug 2018 - 11:04 am | यशोधरा

विंट्रेष्टिंग!

अनिंद्य's picture

8 Aug 2018 - 1:17 pm | अनिंद्य

बेष्ट !

टर्मीनेटर's picture

8 Aug 2018 - 1:32 pm | टर्मीनेटर

हा भागही आवडला.

सिरुसेरि's picture

8 Aug 2018 - 4:43 pm | सिरुसेरि

उत्सुकता वाढवणारे लेखन . हा रघुपती डोक्यात जायला लागला आहे .

अनिंद्य's picture

23 May 2020 - 9:01 pm | अनिंद्य

ही मालिका पुढे सरकली तर खूप आनंद होईल.